डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

2008 या वर्षात ‘साधना’ने वाचकांना काय दिलं? (भाग : 1)

‘साधना’च्या जुन्या-जाणत्या वाचकांपैकी एक महत्त्वाचे नाव-मंगेश नाबर. मागील तीन वर्षे त्यांनी ‘साधना’ अंकांचा वर्षभराचा आढावा नेमकेपणाने घेतला होता. यावर्षी त्यांनी दीर्घ आढावा परिश्रमपूर्वक घेतला आहे, तो तीन भागांत क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक

2008 हे ‘साधना’ साप्ताहिकाचे 61 वे वर्ष. हीरक महोत्सवाच्या धामधुमीतून बाहेर आलेल्या ‘साधना’साप्ताहिकाचे अंतरंग कसे असेल, ते किती बहरलेले असेल, त्यात नवीनतेची कसकशी भर पडलेली असेल याची उत्सुकता माझ्याप्रमाणे तुम्हा सर्व वाचकांना लागली असणार यात तीळमात्र संशय नव्हता आणि संपादकांनी, ‘साधना’च्या 5 जानेवारी2008च्या अंकात यंदा  ‘साधना’मध्ये कोणकोणती सदरे असतील, काय विशेषांक असतील याचा दोन पानी विस्तृत आलेख मांडला होता. त्याला अनुलक्षून 2008 मधील‘साधना’च्या अंतरंगाचा आढावा घेण्याचा मानस आहे, पण या साप्ताहिकाचा आवाका पाहता असा विस्तृत व संपूर्ण आढावा घेणे अशक्य आहे. यंदा च्या वर्षातील एकंदरीत साहित्यातील आवडनिवडीचा हा लेखाजोखा म्हणजे एका सामान्य वाचकाच्या नजरेला जे दिसले, जे मनाला भिडले, त्याचा हा धावता आलेख.

प्रतिसाद :

सर्वप्रथम ‘साधना’च्या सर्व वाचकांना सलाम! कारण यंदाचे वर्ष हे ‘साधना’वर खरोखर मनापासून प्रेम करणाऱ्या वाचकांचे होते, हे त्यांच्याकडून येणाऱ्या लहानमोठ्या पत्रांच्या प्रेमळभडी मारावरून आणि त्याला संपादकांनी दिलेल्या पानभर खुलासेवजा उत्तरावरून (5 जुलै) सिद्ध झाले. यंदा ‘साधना’च्या काही अपवाद वगळता प्रत्येक अंकात वाचकांच्या सखोल व जागरूक प्रतिसादाला भरपूर जागा देण्यात आली होती. छोट्यामोठ्या आकारातली ‘साधना’तील विचारांना साथ देणारी तसेच त्या विरुद्ध बेधडक टीकाप्रहार करणारी पत्रेही यंदा होती. डॉ.राहुल वसंत रेवले या सातारास्थित एका तरुण वाचकाचे समाजवादाच्या विरोधी मतप्रदर्शन करणारे पत्र साधनात (10 मे)आले आणि त्यावर विचारमंथन करणारी समर्पक पत्रे प्रसिद्ध झाली आणि रेवले यांना आपली चूक प्रांजळपणे मान्य करावी लागली. 26 नोव्हेंबरच्या मुंबईवरील अतिरेयांच्या हल्ल्यानंतर चिदानंद खण्णू यांनी व्यक्त केलेल्या संतप्त भावना कुणाही देशप्रेमी नागरिकाच्या मनात येतील अशा होत्या. साधनाच्या व्यासपीठावरील ही मुक्त चर्चा समतोल व संयमी विचारांचे महत्त्व सध्याच्या काळात किती आहे, हे सिद्ध करणारी आहे. म्हणून यंदा  ज्या इतर वाचकांची पत्रे- प्रतिसाद, वादसंवाद आणि चर्चा-मंथन सदरात प्रसिद्ध झाली, त्यांची नावे पुढीलप्रमाणे-

स.ह. देशपांडे (12 व 19 जाने.), श्याम केळकर, प्रभातुळपुळे, दत्ता वान्द्रे (12 जाने.), पन्नालाल सुराणा (26 जाने.),संजय जोशी व अवधूत परळकर (2 फेब्रु.), विद्याभाऊ पटवर्धन(9 फेब्रु.), दत्तप्रसाद दाभोलकर (16 फेब्रु.), पम्मी खांडेकर,विद्याधर म्हैसकर, लीलाधर हेगडे (1 मार्च), सुभाष आठले (8मार्च), पुरुषोत्तम खांडेकर, अमरजा नेरूरकर (15 मार्च), देवदत्त दाभोलकर, वा.डो. बाकडे, हमीद दाभोलकर (5 एप्रिल), रमेश आगाशे (26 एप्रिल), पुरुषोत्तम शेठ (3 मे), माधव दातार, प्रभातुळपुळे, शफी मुा, गौरी सामंत, डॉ.श्रीकांत परळकर (24 मे,6,20 डिसें.) वि.रा. भागवत, अनिल द. तिकोनकर, का.वा.शिरसाठ (31 मे), प्रभाकर गुप्ते, केशव फडणीस (7 जून),दशरथ जंगमाडे, दादा हसबनीस, रमानाथ सावंत, शाहीरतुळशीराम जाधव (28 जून), भामिनी दाते धारवाडकर, शोभना शिलोत्री, परमेश्वर कोडकणी-कोइमतूर, डॉ.अ.ना. पातूरकर (5जुलै), विकास देशपांडे-बॉस्टन, अरविंद निगळे (12 जुलै),स्वानंदी वडगावकर, सुधाकर सोनावणे, प्रतिभा आळतेकर,

मनोहर जोशी (19 जुलै), आरोहण पेणकर-इस्रायल, पन्नालालसुराणा, डॉ.भालचंद्र कानगो, शेखर गजभार (26 जुलै), रमेश आगाशे (2 व 9 ऑगस्ट), दत्ता वान्द्रे, मंगेश नाबर, नारायण नारकर, सुलोचना वाणी (9 ऑगस्ट), वि.शं. गोखले, अंबिकाचरण विरुकोंडा, वि.शं. चौघुले, अमेम रानडे, दामोदर भानुशाली-भोपाळ, मोहनदास मेहता-भावनगर, विनायक देशपांडे (30 ऑगस्ट), डॉ.अनंत फडके, रमेश आगाशे, दिलीप कामत (13 सप्टें.), संतोष बुरंगे, हेमांगी जोशी, मुरली पाठक(20 सप्टें.), फुलचंद सांकला, पन्नालाल सुराणा (27 सप्टें.),पद्मा चिकूर, वृन्दाश्री दाभोलकर (11 ऑटो.), सर्वोत्तम ठाकूर(22 नोव्हें.), भालचंद्र राजे (29 नोव्हें.), कमलाकर गोटखिंडी,चिदानंद खण्णू (13 डिसें.), डॉ.दत्ताजी भापकर (20 डिसें.)

सदरे :

विविध विषयांवरील सदरे म्हणजे साधनाची एकेक दालने आहेत. ताज्या घटना मग त्या राज्य , राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील असो, त्यावरील विश्लेषण पहिल्या दालनात आपल्याला मिळत असते. गोविंद तळवलकरांचे या वर्षभरात 20 लेख त्यांच्या ‘परामर्श’ या सदरात आले. लोकशाही समाजवादाची वाटचाल या शीर्षकाने त्यांनी लिहिलेले चार लेख हे प्रा.डोनाल्ड ससून यांच्या ‘वन हन्ड्रेड इयर्स ऑफ सोशलिझम’ या ग्रंथाच्या अनुषंगाने लिहिले होते. अमेरिकेत जेव्हा अध्यक्षीय निवडणुकीचे वेध लागले, नंतर प्रचाराचे ढोल वाजत होते, शेवटी निवडणुकीचा निकाल लागला, तेव्हा तळवलकरांनी त्याचा आपल्या सदरात वेधकतेने परामर्श घेतला. मॅकेन व ओबामा यांची चढती कमान(23 फेब्रु.), ओबामा लाट अडली (15 मार्च), अमेरिकेत जेव्हा इतिहास घडतो (13 सप्टें.), नेतृत्वहीन अमेरिका (11 ऑटो.),ओबायांचा  विजय- देशोदेशींच्या प्रतिक्रिया (29 नोव्हें.),ओबामा यांचे मंत्रिमंडळ (27 डिसें.) हे तळवलकरांचे लेखने या परिस्थितीचे दर्शन घडवणारे होते. याशिवाय देशव्यापी असे शेतीविषयक धोरण स्वामीनाथन आयोगाने जाहीर केल्यावर गोविंदरावांनी ‘सावकारी पाश’ (29 मार्च) हा लेख लिहून या धोरणातील त्रुटींकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रातील राजकीय बजबजपुरीकडे त्यांचे सतत लक्ष होते, त्यातून ‘कर्नाटक नंतर महाराष्ट्र’ (28 जून), महाराष्ट्रात सौरशक्तीचा उपक्रम का अंगिकारला जात नाही, याचा प्रश्न पडून त्यांनी ‘सूर्य  उगवला, प्रकाश पडला...’ हा मर्य भेदी लेख 12 जुलैच्या अंकात लिहिला. ‘अशांत तिबेट’ हा त्यांचा 19 एप्रिलच्या अंकातील लेख कम्युनिस्ट पक्षातील एकाधिकारशाही व लामाशाही यांचे वास्तव दाखवणारा होता. तळवलकर अमेरिकेत वास्तव्य करून असल्याने आणखी एक लाभ वाचकांना झाला. तेथील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्रात त्यांना मुंबईच्या ‘आरे’ दुग्ध योजनेच्या दुर्दशेवरील वार्तापत्र आढळले. सामान्य मुंबईकरांसाठी आणलेल्या या कल्याणकारी योजनेचा प्रारंभ ज्या तळवलकरांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला होता, त्याचा पार बोजवारा उडाल्याचे त्यांना झालेले दु:ख त्यांनी याच तिबेटच्या लेखासोबत व्यक्त केले. नेपाळ या आपल्या शेजारी देशात जो सत्ताबदल झाला, त्यावरील ‘नेपाळमधील प्रचंड उलथापालथ’ (3 मे), ‘नेपाळी पक्षीय राजकारण’ (10 मे), हे तळवलकरांचे सर्वांगीण वेध घेणारे दोन लेख होते. स्टीव्ह कोल यांच्या  बिन लादेन्स या पुस्तकाच्या अनुषंगाने तळवलकरांचा ‘बिन लादेन कुटुंबाचे आर्थिक साम्राज्य’ हा प्रदीर्घ लेख 31 मे च्या अंकात होता. ‘लोकमान्य टिळक यांच्या कारावासाची शताब्दी’ (19 जुलै), रॉब गिफर्ड यांच्या ‘चामनारोड’ या ग्रंथाच्या अनुषंगाने ‘चीनचे खरे दर्शन’ (9 ऑगस्ट), अणुकरार तडीस नेण्यासाठी मनमोहनसिंगांचे निकराचे प्रयत्न होत असताना ‘हंसे मुक्ता नेली’ (27 सप्टें.), तर देशात दहशतवादाचे थैमान माजले असताना ‘दहशतवादाचा विस्तार’ (13 डिसें.) असे हे तळवलकरांचे लेख वाचताना मटामधील त्यांच्या अग्रलेखांची आठवण झाली.

तळवलकरांच्या जोडीला यंदा  साधनाला परिचित नसलेले एक विचारवंत लेखक अशोक राजवाडे आपल्या ‘कुंपणांपलीकडे’ या सदरातून भेटत राहिले. जातीची, धर्माची, भाषेची, प्रदेशाची, कार्य क्षेत्राची आणि विचारांची कुंपणे ओलांडून जे काही दिसते ते देण्याचा निर्धार हे पाक्षिक-सदर सुरू होण्यापूर्वी व्यक्त केला होता. तरी प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय संदर्भांतले विषय घेण्याचा राजवाडेंचा मानस होता. विज्ञान,कला, राजकारण, तंत्रज्ञान यांपैकी कोणतेच विषय व्यर्ज नसतील, असे त्यांचे निवेदन होते. या वर्षात त्यांचे 13 लेख आले होते. जागतिकीकरणाचा सामान्य माणसावर होणारा परिणाम त्यांच्या 5 जानेवारीच्या लेखात जाणवणारा होता. ‘लिबरेशनथिऑलॉजी’ वरील त्यांचे तीन लेख (5, 26 जुलै व 9 ऑगस्ट) वाचकांना एका वेगळ्या विषयाकडे नेणारे होते. तरी राजवाडेयांचे  हे सदर इतक्या थोड्या लेखांमुळे ‘साधना’मध्ये म्हणावे तितके रुळू शकले नाही, हे खेदाने म्हणावेसे वाटते. राजवाडेयांनी प्रचलित घटनांवर आपले विचार मांडावेत.

गेल्या वर्षी ज्येष्ठ साहित्मिक रवींद्र पिंगे यांचे ‘पाटाचे पाणीफहे सदर होते. पिंगे यांनी वयोमानाप्रमाणे वाचकांचा निरोप घेतल्यानंतर प्रतिथमश लेखक सुभाष भेंडे यांनी ‘कुळागर’ मानावाने साहित्य-संस्कृती निर्मितीचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन‘साधना’तून घडवले. महाभारत (5 एप्रिल), स्वत:चा चेहरा असलेली कविता (3 मे), एका युगाचा अंत (7 जून), कवींचा कवी (6 सप्टें.), उत्तुंग (11 ऑटो.) या सर्व लेखांतून भेंडेयांनी आपल्या लेखणीतून त्यांना दिसलेले साहित्य क्षेत्रातील दिग्गज वाचकांसमोर वैशिष्ट्यपूर्ण शैलीद्वारा उभे केले.

राजन गवस हे अशाच प्रकारे साहित्य दिंडी पुढे नेणारे समर्थ लेखक. त्यांना तर ‘कैफियत’ मांडायची होती-माणसांची, प्राण्यांची, निसर्गाची... सर्वांचीच. पहिल्याच लेखाने गवस यांनी वाचकांच्या मनाचा ताबा घेतला- चिमण्या (5 जाने.). तसाच दुसरा लेख त्यांनी गावात आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर नाभिकाचे काम करणाऱ्या शांताबाईची कैफियत (9 फेब्रु.) मांडली. त्यानंतर मुलांनी ‘गुर्जी’ संबोधणे बंद करण्याचा आटापिटा करणाऱ्या एका शिक्षकाची हकीकत

(23 फेब्रु.), बुडालेल्या ग्रामीण पतसंस्थेमुळे सर्वस्व गमावून बसलेली झेंडाबाई (8 मार्च), कर्जापायी जमीन विकणारा शुक्राचार्य  (5 एप्रिल), शंकर सुतार (26 एप्रिल), अशा अनेकांच्या कैफियती सादर करून राजन गवस वाचकांना थक्क करतात. ‘या लोकवाद्यांचं शास्त्र शोधावं, असं कुणालाच कसं वाटत नाही’ (7 जून) हा राजन गवस यांच्या शैलीतून उतरलेला लेख त्यांच्या शोधक वृत्तीचे द्योतक आहे. मध्यंतरी एका गावातील श्रीधर कांबळे या विद्यार्थ्याने आपली ‘नासा’त निवड झाल्याचे भासवून थेट राज्याच्या मुख्य मंत्र्यांपर्यंत अनेकांना फसवले. या विद्यार्थ्याला असे वागण्यास कोणी प्रवृत्त केले, हा गवस यांचा लेख (28 जून) विचार करायला लावणारा होता. यानंतर राजन गवस यांनी कैफियत प्रदीर्घ कालखंडानंतर 20डिसेंबरच्या अंकात आली. पक्षीय राजकारणामुळे मृत देहाला अग्नी देण्यासही आडकाठी होऊ शकते, ही त्यांनी नोंदवलेली कैफियत लक्षात राहील अशी आहे.

यंदा ‘साधना’तून आपल्या लेखणीने भारून टाकणारे आणखी लेखक होते, आसाराम लोमटे. त्यांच्या ग्रामीणढंगाच्या लेखणीचा बाज काही औरच आहे. त्यांनी ‘तळटीपा’सदरात शेतकऱ्यांच्या दु:खाला वाचाच फोडली. सावध ऐका पुढल्या हाका (12 जाने.), दु:ख देखणे तुझे (16 फेब्रु.), पाणीकुठवर आलं गं बाई... (26 एप्रिल), ऊस गोड झाला म्हणून(17 मे), राबणाऱ्यांच्या गर्दीतला गर्दीश (7 जून), तो पाऊस कसला (7 जून), देवा ह्याही देशात पाऊस पाड (26 जुलै) हे त्यांचे लेख म्हणजे अस्सल अनुभवाची खणखणीत नाणी आहेत. यानंतर या परभणीच्या लेखकाचे सदर दिसले नाही, याचे नवल वाटते.

माझ्यासारख्या नित्य नवे शोधणाऱ्या वाचकाला मुग्ध करणारे साईनाथ पाचारणे आणि राजा शिरगुप्पे. त्यांनी अनुक्रमे ‘कानगोष्टी’ आणि ‘न पेटलेले दिवे’ या सदरातून उपेक्षित ग्रामीण जीवन वाचकांसमोर आणले.

उल्लेखनीय अशी इतरही सदरे आहेत. वसंत आबाजी डहाके यांचे ‘चौक’, संतोष शेणई यांचे ‘साहित्य  शिफारस’, सतीश काळसेकरांची ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’, वैशाली रोडे यांचे ‘परिघावरून’ आणि हेरंब कुलकर्णी यांचे ‘तिरकस चौकस’.

यंदा 5 जुलैच्या अंकात साधनाच्या वाचकांचे लाडके लेखक अवधूत परळकर यांनी वाचकांचा अकस्मात निरोप घेतला. गेली 6-7 वर्षे ‘जनअरण्य’, ‘माध्यम कोळ’, ‘सत्यातून साहित्याकडे’ या पाक्षिक-सदरातून आपले निर्भीड विचार परळकर मांडत होते. त्यांनी ‘साधना’चा अचानक निरोप घेतला असला, तरी यापुढे अधूनमधून त्यांचे लेखन ‘साधना’त यावे.

8 मार्च या आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त ‘साधना’तून विद्या कुलकर्णी यांनी महाराष्ट्र, हरियाणा, ओरिसा, उत्तरांचल आणि मध्य प्रदेश या राज्यांतील धडाडीच्या महिलांचा करून दिलेला परिचय (8 मार्च) उत्साहवर्धक होता.

‘बालसाधना’ हे मुलांसाठी असलेले सदर अवधूत डोंगरे सादर करत होते. डॉ.प्रकाश जोशी यांची ‘गणित म्हणजे काय रेकाका’ ही गणित विषय  सोपा करून देणारी लेखमाला बारालेखांद्वारे प्रसिद्ध झाली. शालेय विद्यार्थी व शिक्षकांना ती किती उपयोगाची वाटली, हे कळले तर बरे होईल. हे व असे लेखन आता यापुढे ‘कुमारसाधना’ या सदरात प्रसिद्ध होत आहे. अत्यंत लहान मुले व कुमारवयाची मुले यांच्या  वयातील फरक जाणून घेऊन केलेला हा बदल योग्य वाटला.

‘नोकरशाईचे रंग’ ही ज्ञानेश्वर मुळे यांची लेखमाला यंदा फक्त तीन लेखांपुरती प्रसिद्ध झाली होती. परंतु आता त्या गाजलेल्या व रंगलेल्या लेखांचे संकलित पुस्तक ‘साधनाप्रकाशना’कडून प्रसिद्ध झाले आहे. ‘व्यासपीठफ’ या तीन किंवा अधिक लेखांच्या सदरात यंदा संजय जोशी, अच्युत गोडबोले, डॉ.अभिजित वैद्य आणि रझिया पटेल यांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली होती आणि ती त्यांनी अगदी व्यवस्थित पार पाडली.

साने गुरुजींचे एक लाडके शिष्य यशवंत. ब. क्षीरसागरयांनी गुरुजींना लिहिलेले एक पत्र सर्वत्र दाद मिळवून गेले. यशवंत क्षीरसागर, श्रीरंग वरेरकर यांसारख्या साने गुरुजींच्या काळातल्या सेवाभावी कार्य कर्त्यांनी असे अधूनमधून लिहावे असे सुचवावेसे वाटते.

शेखर गजभार यांनी महेश माळी या एका दुर्दैवी मुलाच्या आजारपणाचे वृत्त (28 जून) वाचकांच्या कानावर घातल्या वरत्याला वाचकांकडून चोहोबाजूंनी मिळालेली आर्थिक मदत‘साधना’चे समाजातील अढळ स्थान दाखवते.

मराठीतील एक बुजुर्ग लेखक यशवंत कर्णिक यांच्या मुलाखतीवर आधारित एक लेख कर्णिक यांच्या  83व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘साधना’मध्ये (19 जुलै) आला होता. नंतर खुद्द यशवंत कर्णिक यांनी या मुलाखतीत उल्लेख झालेल्या विजय तेंडुलकरांच्या अविस्मरणीम भेटीचा सविस्तर वृत्तांत (22नोव्हें.) सादर करून वाचकांना एक वेगळाच आंनद दिला.

यंदा 5 ते 7 डिसेंबर या काळात ‘साधना’ने आयोजित केलेले ‘साधना साहित्य संमेलन’ हे कादंबरी या साहित्य प्रकाराला वाहिलेले होते. संमेलनाला अध्यक्ष नव्हता, पण रंगनाथ पठारे यांचे बीजभाषण झाले. चर्चा, कादंबरीकारांशी गप्पा, वाचक-लेखक संवाद, प्रश्नमंजूषा स्पर्धा या उपक्रमांमुळे ‘साधना’चे हे पहिले संमेलन मराठी साहित्य विश्वाला खऱ्या अर्थाने भावले. असे साहित्य संमेलन दरवर्षी होणार आहे आणि ते वेगवेगळ्या साहित्य प्रकाराला वाहिलेले असेल, ही आनंदाची बाब आहे.

निमित्त मराठीच्या स्वाभिमानाचे- मुद्दा सार्वजनिक विवेकाचा ही सुहास पळशीकर यांची लेखमाला 6, 13, 20 व 27 डिसेंबर या चार अंकांतून प्रसिद्ध झाली.

(क्रमश:)

Tags: सतीश काळसेकर राजा शिरगुप्पे साईनाथ पाचारणे वसंत आबाजी डहाके साधना 2008 मंगेश नाबर sadhana 2008 mangesh nabar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके