डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अगदी गेल्या साठ-सत्तर वर्षांतील मराठी कवितेचा विचार केला तरी हे लक्षात येईल की मर्ढेकरोत्तर मराठी नवकवितेचा वारसा ज्या काही थोड्या कवींनी समृद्ध केला आहे/करतआहेत, त्यात वसंत आबाजी डहाकेंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ‘योगभ्रष्ट’, ‘शुभवर्तमान’, ‘शून:शेप’ आणि ज्या कविता संग्रहाला आता साहित्य अकादमीने सन्मानित केले आहे तो ‘चित्रलिपी’... असा एक एक मोठा विस्तार डहाक्यांच्या कवितेने व्यापलेला आहे. आणि या कवितेचा‘विशेष’ म्हणजे ही कविता नेहमीच समकालीन, आजची कविता राहिली आहे.

1.

‘कवी-लेखक-कलावंत एखाद्या पुरस्काराने सन्मानित केला जातो तेव्हा नेमकं काय होत असतं?’

या प्रश्नाचा विचार करताना मला दोन शक्यता दिसून आलेल्या आहेत: एक म्हणजे काही पुरस्कार-सन्मान एखाद्या कवी-लेखक-कलावंताला मोठे करतात. तो लेखक चर्चेत येतो, त्याला तात्पुरती का होईना एक वेगळी ओळखमिळते. यात त्या पुरस्काराच्या-सन्मानाच्या वजनाइतके त्या कवी-लेखक-कलावंताचे वजन नाही असे गृहीतक आपण मनाशी ठरवलेले असते.

दुसरी शक्यता- काही पुरस्कार-सन्मान ज्या कवी-लेखक-कलावंताना मिळतात तेव्हा त्या पुरस्कारांचे वजन वाढते, महत्त्व वाढते.

परवा मराठीतले ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांना मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार या दुसऱ्या शक्यतेत बसणारा आहे. अशी वेळ आपल्या मराठी संस्कृतीत अपवादानेच येत असते किंवा तशी वेळ येण्याच्या शक्यता अत्यल्प असतात. अर्थात, तरीही या गोष्टीचे महत्त्व याचसाठी की आपल्या सगळ्यांचा चांगल्या व महत्त्वाच्या लेखनावर-कलाकृतीवर असलेला विश्वास टिकवून ठेवण्यास हातभार लागतो.

म्हणूनच वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेचा सन्मान, मराठी कवितेसाठी, कवितेच्या वाचकांसाठी, त्यावर आस्था असणाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. अर्थात, माझ्या सारख्यांना  ही खंत वाटतच राहते की डहाकेंसारख्या महत्त्वाच्या कवी-लेखकांना या पुरस्कारासाठी-सन्मानासाठी आपल्या मराठी संस्कृतीने खूप वाट पहायला भाग पाडले आहे. अरूण कोलटकर या जागतिक दर्जाच्या कवीची उपेक्षा तर सगळ्याच मराठी कवितेच्या, संस्कृतीच्या नागरिकांना शरमेने खाली मान घालायला लावणारी आहे. त्यातल्या त्यात हेच समाधान की त्यांच्या मृत्यूनंतर का होईना साहित्य अकादमी पुरस्कार देण्याचा शहाणपणा दाखवला गेला. असो. देर आये दुरुस्त आये...

2.

मराठी कवितेचा पट, तिला असलेली सातशे-आठशे वर्षांची समृद्ध परंपरा, ही भारतातील कोणत्याही प्रादेशिक भाषेला हेवा वाटावी अशी गोष्ट आहे. मराठी कवितेच्या परंपरेत नेहमीच (वेगवेगळ्या कालखंडात का होईना) महत्त्वाच्या कवींनी आपली उपस्थिती दर्ज केली आहे.

अगदी गेल्या साठ-सत्तर वर्षांतील मराठी कवितेचा विचार केला तरी हे लक्षात येईल की मर्ढेकरोत्तर मराठी नवकवितेचा वारसा ज्या काही थोड्या कवींनी समृद्ध केला आहे/करत आहेत, त्यात वसंत आबाजी डहाकेंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ‘योगभ्रष्ट’, ‘शुभवर्तमान’, ‘शून:शेप’ आणि ज्या कविता संग्रहाला आता साहित्य अकादमीने सन्मानित केले आहे तो ‘चित्रलिपी’... असा एक एक मोठा विस्तार डहाक्यांच्या कवितेने व्यापलेला आहे. आणि या कवितेचा ‘विशेष’ म्हणजे ही कविता नेहमीच समकालीन, आजची कविता राहिली आहे.

लघु-अनियतकालिकांच्या चळवळीतून पुढे आलेल्या (?)अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, मनोहर ओक, तुलसी परब, नामदेव ढसाळ, प्रकाश जाधव इ. कवींनी मराठी कवितेचा चेहरा आमूलाग्र बदलवून टाकण्याचा प्रयत्न चालवलेला होता. अशावेळी काही उथळ समीक्षकांनी, कवी, लेखकांनी या चळवळीला समांतर असलेल्या समकालीन महत्त्वाच्या कवींचे महत्त्व दुर्लक्षित केले होते... त्यातच भर म्हणजे नव्वदोत्तर कवी-समीक्षकांनी या कवींच्या महत्तेवर शिक्कामोर्तब केल्यामुळे वसंत आबाजी डहाके, विलास सारंग इ. यासारख्मा ‘मौजे’चे म्हणून ओळख लादल्या गेलेल्या कवींकडे दुर्लक्ष करणे अधिकच सोयीचे झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर वसंत आबाजी डहाकेंची कविता स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व, ओळख टिकवून उभी होती/आहे, हे मला अधिक महत्त्वाचे वाटते. कविता कोणतीही असो, कुठल्याही प्रवाहातून आलेली असो तिचे मराठी कवितेच्या परंपरेतले योगदान महत्त्वाचे असते... मला वाटते या पुरस्काराने-सन्मानाने पुन्हा एकदा हेच अधोरेखित केले आहे.

3.

मराठी कवितेत खऱ्या अर्थाने सामाजिक कविता, राजकीय कविता फारशी लिहिली जात नाही असे नेहमीच म्हटले जाते. हिंदीतले ज्येष्ठ कवी चंद्रकात देवतालेंनीही एकदा चर्चेत हा प्रश्न उपस्थित केल्याचे मला आठवते. हे काहीसे खरेही आहे. आपल्याकडे हा ‘स्वर’ फार चलनात नाही. कदाचित मराठी कवितेच्या प्रवृत्तीत तो सहजपणे येत नसावा. पण मला वाटते भारतीय कवितेत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करू शकेल इतका मोठा, निश्चितच होता/आहे. मग तो नारायण सुर्वेंच्या कवितेत असेल, नामदेव ढसाळ, प्रकाश जाधव किंवा अलिकडे अरुण काळेच्याही कवितेत आहे. मात्र यात डहाकेंच्या कवितेतला ‘सोशल व्हाईस’ या सगळ्यांपेक्षा वेगळ्या जातकुळीचा, वेगळ्या पद्धतीचा आहे. या अंगाने डहाकेंच्या कवितेची चिकित्सा होणे गरजेचे आहे. या सगळ्या परंपरेत डहाकेंची कविता नेहमी तिच्या स्वरात बोलत आलेली आहे. तिच्या आवाजात आक्रोश, संताप, आवेश नसेलही; पण सामान्य माणसांची होणारी होरपळ, अगतिकता, जगण्यातली भयावहता याविषयी ती सातत्याने बोलत आलेली आहे. एका अर्थाने डहाकेंची कविता म्हणजे आजच्या सामान्य माणसाचे या सगळ्या कोलाहलाविषयीचे स्वगत आहे. त्यांच्या कवितेइतके जोरकस भाष्य त्यांच्या समकालीन कवींमध्ये अभावानेच आढळते. डहाक्यांचा कवितेचा स्वर वरवर सौम्म वाटत असला तरी नेमकेपणाने या सगळ्यांकडे बोट दाखवतो, बोल लावतो. ही कविता सातत्याने आजच्या जगण्याविषयी, भवतालाविषयी,सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय घडामोडींविषयी स्पष्टपणे, नेमकेपणाने बोलत आलेली आहे. ती नेहमी ‘आजची’ कविता राहिली आहे.

डहाक्यांच्या चारही संग्रहाचा विचार नव्या-जुन्या समीक्षकांनी या दृष्टीने अधिक सूक्ष्मपणे करायला हवा. तसा काही एक प्रयत्न करावा म्हणून आम्ही ‘खेळ’च्या वसंत आबाजी डहाके विशेषांकाचे प्रयोजन केले होते.

दुर्दैवाने मराठी समीक्षकांची उदासीनता (कालच्या नि आजच्याही) अनास्था यामुळे तो प्रयत्न पूर्णत: यशस्वी होऊ शकला नाही. असो. या पुरस्काराच्या-सन्मानाच्या निमित्ताने मराठी वाचकांचे, समीक्षकांचे लक्ष या कवितेकडे गेले, तिची खोलवर चिकित्सा झाली तर तिचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित करता येईल. कोणत्याही चांगल्या महत्त्वाच्या कवितेचे यापेक्षा वेगळे काम मागणे असणार आहे?

4.

साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन डहाकेंची कविता सन्मानित केलेली असली तरी कादंबरी, समीक्षा, चित्र, संपादन यामुळे व एक विचारवंत म्हणूनही डहाकेंची वेगळी ओळख आहेच.

या पार्श्वभूमीवर त्यांच्या ‘कादंबरी’ची (जिच्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष झाले) चिकित्सा करावी लागणार आहे. कवितेइतकीच त्यांची चित्रशैली स्वतंत्र आहे. परंतु जितका न्याय डहाकेंनी कवितेला दिला किंवा वाचकांनी, समीक्षकांनी दिला त्या प्रमाणात त्यांचे स्वत:चेही चित्रकलेकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते. येत्या काळात डहाकेंकडून त्यांचा हा दुर्लक्षित राहिलेला ‘विशेष’ सगळ्यांच्या समोर येईल अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?

5.

मी या टिपणाचे शीर्षक ‘कवितेचे झाड’ असे दिले आहे. या मागे निश्चितच काही एक धारणा आहे.

वसंत आबाजी डहाकेंची कविता, चित्रकला किंवा इतर लेखन आपल्याला समजून घ्यायचे असेल; त्याच्या जवळ जायचे असेल तर डहाकेंमधील कविवृत्ती समजून घेणे गरजेचे आहे. त्यांची एक कविता या सगळ्या संदर्भात एक विधान म्हणून पहाता येईल-

झाड तोडायचे, कापायचे

लगदा करायचा, कागद बनवायचा

त्यावर लिहायचे, ते छापायचे

मग वाचयचे

एवढा खटाटोप कशासाठी?

सरळ

झाडच वाचावे!

डहाकेंच्या कवितेचे हे सगळ्यात महत्त्वाचे सूत्र आहे, असे मला वाटते.

Tags: कवितेचे झाड कविता मंगेश नारायणराव काळे मराठी लेखक मराठी कवी विचारवंत समृद्ध परंपरा मराठी कविता सन्मान लेखक कवी चित्रलिपी साहित्य अकादमी वसंत आबाजी डहाके Mangesh Narayanrao kale Poetry Thinker Poet Writer Marathi Poetry Marathi poet Chitralipi Sahitya Akademi Vasant Abaji Dahake poetry Kaviteche Jhad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके