डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कवितेचा वसंतोत्सव - पुनर्भेट

कवी वसंत बापट यांनी 25 जुलै 1996 रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले तेव्हा त्यांचे दीर्घकालचे जिवलग स्नेही, कवी मंगेश पाडगांवकर यांनी लिहिलेला हा लेख 20 जुलै 1996 च्या साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झाला होता. आता ते दोघेही हयात नाहीत, पण 25 वर्षांपूर्वी लिहिलेला हा लेख वसंत बापट यांची शताब्दी वर्ष सुरू होत असतानाही ताजातवाना वाटतो आहे. म्हणून येथे पुनर्मुद्रित केला आहे.

- संपादक

वसंत बापट हा चैतन्याने सळसळणारा माणूस. एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने जीवनावर प्रेम करणारा. आणि लहान मुलासारखाच आतल्या चैतन्यामुळे एका जागी ठरू न शकणारा, अस्वस्थ. अगदी अलीकडची दोन तीन वर्षे सोडली, तर गेल्या चाळीस वर्षांत थकलेला कंटाळलेला वसंत बापट मी कधी पाहिलाच नाही.

तीन एक वर्षांपूर्वी बापट अमेरिकेला गेले होते. त्यांनी अमेरिकाभर कविता वाचनाचे कार्यक्रम केले, तिथल्या रसिक मराठी माणसांना भरभरून कवितेचा आनंद दिला. तिथल्या मराठी कलाकारांना ‘सुंदरा मनामधि भरली’ हे तमाशाच्या माध्यमातले दृष्ट लागावी असे लेखन करून दिले; ते भटक भटक भटकले. पण अमेरिकेतल्या या भटकंतीत ‘नागीण’ या आजाराने त्यांना गाठले. फड जिंकणाऱ्या धुंद लावण्या लिहिणाऱ्या बापटांना आज ना उद्या एखादी नागीण विळखा घालणार याची अटकळ विंदा करंदीकरांना आणि मला अर्थातच होती. त्यामुळे, बापट तिथे नागिणीने आजारी झाल्याचे कळले तेव्हा, करंदीकरांना आणि मला काळजी वाटली, पण आश्चर्य वाटले नाही.

बापट बरे होऊन भारतात परतले तेव्हा अतिशय थकलेले, संत्रस्त असलेले जाणवले. त्या नागिणीचे विष उजव्या हातात उतरल्यामुळे लिहिणे शक्य होत नव्हते, हा उजवा हात वर्षभर जायबंदी होऊन बसला होता. या प्रेमळ नागिणीने वर्षभर बापटांचा हात अगदी घट्ट धरून ठेवला, या काळाचा अपवाद वगळला, तर गेली 40 वर्षे वसंत बापट सतत चैतन्याने सळसळत राहिले, चैतन्य उधळत राहिले.

वसंत बापटांच्या या चैतन्याने सळसळण्याची आठवण झाली याचे कारण असे की, 25 जुलैला वसंत बापटांचा वाढदिवस. बापट चक्क 74 वर्षे संपवून पंचाहत्तरीत, म्हणजे, आपल्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश करणार. या आकडयांची जाणीव झाली, तेव्हा क्षणभर विश्वासच बसेना. अवघे पाऊणशे वयमान! शक्यच नाही. दंताजीपासून कानोजीपर्यंत बापट अजून पूर्वीसारखेच ठणठणीत आहेत. व्यासपीठावर उभे राहून लावण्या म्हणू लागले की, अजूनही आवाज कसा सुरेल, मिस्कील आणि खणखणीत लागतो.

तरुण नव्या झाडाला फुटावी तशी नव्या नव्या कवितांची पालवी अजूनही त्यांच्या प्रतिभेला फुटतेच आहे. पायावरचे भटक नक्षत्र अजूनही तसेच लखलखीत आहे. महिनाभरापूर्वी सगळा ऑस्ट्रेलिया भटकून आले. आपल्या कवितांनी रसिकांना जिंकून आले. कविता वाचनाच्या कार्यक्रमासाठी जिथे प्रवास जिकिरीचा आहे अशा एखाद्या दूरच्या गावाचे निमंत्रण येवो- अजूनही बापट तरुणपणीच्या उत्साहानेच तिथे जाणार, चांगली दोन अडीच तासांची मैफल रंगवून येणार.

विंदा करंदीकरांचा मला फोन आला की, बापट सध्या कुठे आहे? मला निश्चित ठाऊक नाही, असे मी म्हटले की करंदीकर मला म्हणतात, अरे, मी तुला सांगतो वसंता कुठे असेल ते! नुकताच त्याने बुद्रुक खेमटे गावात एक काव्यवाचनाचा कार्यक्रम घेतला आणि तिथून एस.टी. पकडून तो ढेमरे या गावात काव्यवाचन करायला गेला. मध्यरात्री तिथून निघून तो पहाटे पुण्याला येणार, कारण संध्याकाळी पिंपरीला तिथल्या कन्याशाळेत ‘लावणीचे लावण्य’ या विषयावर त्याचे व्याख्यान जाहे.

वसंत बापटांना मी प्रथम पाहिले आणि ऐकले 1949 साली पुणे येथे. पुण्याला आचार्य जावडेकरांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन भरणार होते. या संमेलनात होणाऱ्या कविसंमेलनात मला बोलावलेले नव्हते. माझे नाव तेव्हा फारसे कुणाला ठाऊक नव्हते. साहित्य संमेलनाच्या आदल्या दिवशी एस.पी कॉलेजच्या हॉलमध्ये एक छोटेसे कविसंमेलन भरले होते. या कविसंमेलनाचे अध्यक्ष होते विठ्ठलराव घाटे. आचार्य जावडेकर, आचार्य भागवत, गुजरातचे श्रेष्ठ कवी उमाशंकर जोशी, कवी बोरकर अशी बडी बडी मंडळी तिथे हजर होती.

दोन दिवसांपूर्वी मी बोरकरांबरोबर विठ्ठलराव घाटे यांच्या घरी गेलो होतो. तिथे काव्यगायनाची मैफल रंगली होती. बोरकरांनी अतिशय आग्रह केल्यामुळे मी तिथे घाबरत घाबरत दोन कविता म्हटल्या. विठ्ठलरावांना माझ्या कविता अतिशय आवडल्या. एस.पी.कॉलेजच्या हॉलमध्ये भरलेल्या या कविसंमेलनात या दोन कविता म्हणण्याचे निमंत्रण विठ्ठलरावांनी तिथल्या तिथे मला दिले.

अशा रीतीने, केवळ योगायोगाने, मी या कविसंमेलनात भाग घेतला. कविसंमेलनात ज्यांनी भाग घेतला ते सर्व कवी नामवंत होते. माझ्याप्रमाणेच नावाला प्रसिद्धी नसलेला, एकही पुस्तक नावावर जमा नसलेला आणखी एक कवी त्या कविसंमेलनात होता. तो माझ्यासारखा घाबरत घाबरत व्यासपीठावर आला नाही. व्यासपीठावर श्रोत्यांसमोर उभे राहण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग असल्यामुळे, मी काहीसा नर्व्हस होणे स्वाभाविक होते. पण माझ्याप्रमाणेच प्रसिद्दीचे पाठबळ जराही नसलेला हा कवी विलक्षण आत्मविश्वासाने व्यासपीठावर आला. सभा जिंकणे हे आपले कामच आहे ही गोष्ट त्याने जणू गृहीतच धरली होती. त्याने ‘बिजली नाचेल गगनात’ ही आपली कविता गाऊन दाखवली.

त्याचे हे काव्यगायन इतर कवींच्या काव्यगायनाहून वेगळे होते. हा तरुण कवी केवळ चालीवर कविता गाऊन दाखवत नव्हता. लयीचा ढंग, शब्दांचे उच्चार, कवितेत असलेले नाट्य सहजपणे, केवळ उच्चारातून उभे करण्याची उद्‌भुत वाटावी अशी ताकद यांमुळे त्याचे काव्यगायन हा एक आगळाच अनुभव असल्याचा प्रत्यय श्रोत्यांनी घेतला आणि दाद देणाऱ्या टाळ्यांचा कडकडाट केला. एखादा चमत्कार पाहावा त्याप्रमाणे मी हे पाहिले आणि अगदी थक्क होऊन गेलो. या कवीचे नाव होते वसंत बापट!

या माणसाला वाणीचे ईश्वरी देणे लाभले आहे असा विचार तेव्हाही माझ्या मनात आला, आणि पंचाहत्तरीत प्रवेश करणाऱ्या बापटांचे काव्यवाचन किंवा भाषण मी ऐकतो, तेव्हा हा विचार आजही माझ्या मनात येतो. संमेलन संपल्यानंतर कोणी तरी बापटांशी माझी ओळख करून द्यावी, असे मला तीव्रतेने वाटले, आणि झालेही तसेच. माझी आणि बापटांची कोणी तरी ओळख करून दिली. कलाशाखेचे, म्हणजेच कलापथकाचे नेतृत्व करीत राष्ट्र सेवादलासारख्या संघटनेत वावरणारे, मुंबईच्या कॉलेजात प्राध्यापकी करणारे हे वसंत बापट होते! आणि सार्वजनिक जीवनाचा, चळवळीचा किंवा संघटनेचा कसलाही अनुभव नसलेला, या बड्या लोकांच्या गर्दीत बावरून गेलेल्या खेडुतासारखा मी!

मी तेव्हा वीस वर्षांचा होतो आणि बापटांचे वय होते सत्तावीस. घट्ट काचाचे धोतर, शर्ट, कोट, सोनेरी काडीचा चष्मा अशा वेषातल्या या देखण्या तरुण कवीपुढे मी उभा राहिलो, तेव्हा मला क्षणभर अगदी बावळटासारखे वाटले. माझा हा बावळटपणा बापटांनाही जाणवला असणार! त्यांनी मला फारसे महत्त्व दिले नाही. औपचारिक नमस्कार केला, बस्‌! इतकेच. कौतुक करण्यासाठी आलेल्या माणसांच्या गराड्यात बापट एखाद्या सराईत हीरोसारखे मिसळले! पहिल्या भेटीतला हा इतकाच परिचय! तेव्हा आम्ही दोघेही मुंबईला राहत होतो. या अनुभवामुळे, मुंबईला गेल्यावर बापटांना आपण भेटू असा विचारही माझ्या मनात आला नाही! हा अतिशय शिष्ट माणूस आहे, असेच माझ्या मनाने घेतले.

त्यानंतर सहा सात महिन्यांनंतर बापट मला पुन्हा भेटले. गिरगावातल्या बॉम्बे बुक डेपो या पुस्तकांच्या दुकानात मी कुठले तरी पुस्तक विकत घेण्यासाठी गेलो होतो. वसंत बापटही तिथेच आले होते. त्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वात आणि माझ्या बावळट व्यक्तिमत्त्वात कसलाही फरक झालेला नव्हता. बापटांच्या मला जाणवलेल्या शिष्टपणातही फरक पडलेला नव्हता. आम्ही रीतीप्रमाणे एकमेकांना नमस्कार केला. कॉलेजच्या लायब्ररीसाठी पुस्तके पाहायला आलो, असे बापट म्हणाले. मला हवे होते ते पुस्तक मी घेतले. बापटांना नमस्कार करून परत जायला निघालो, बापटांनी काही तरी जवळीक दाखवावी असे मला मनातून वाटले होते. पण तसे घडले नाही. पुस्तके निवडण्याच्या कामात बापट गर्क झाले. सोनेरी काड्यांचा चष्मा लावणारा हा माणूस आपला नव्हे, ही खूणगाठ मनाशी पक्की बांधून मी दुकानाच्या पायऱ्या उतरून निघून गेलो.

मी मनाशी कितीही पक्की खूणगाठ बांधली, तरी ती टिकू नये, सोनेरी काड्यांचा चष्मा लावणाऱ्या या माणसाला माझ्या आयुष्यात जिवाभावाचे स्थान मिळावे, साहित्याच्या क्षेत्रात याचे नाव माझ्या नावाशी कलम केल्यासारखे जोडले जावे, अशीच नियतीची इच्छा होती! नियतीने आपली इच्छा पूर्ण केली. हे माझे फार मोठे भाग्य असेच मी समजतो.

1953 साली मी साधना साप्ताहिकात काम करू लागलो. आचार्य जावडेकर आणि रावसाहेब पटवर्धन तेव्हा साधनाचे संपादक होते. आचार्य जावडेकर इस्लामपूरला राहत आणि तिथूनच लेखन पाठवीत, संपादक म्हणून प्रत्यक्ष हजर असत रावसाहेब पटवर्धन. संपादकीय खात्यात नोकरीला असा मीच होतो. साने गुरुजी आणि साधना यांच्याशी वसंत बापटांचे जिवाभावाचे संबंध. बापट साधनेच्या कार्यालयात दररोज, अगदी न चुकता येत आणि संपादकीय कामकाज पाहात, साधनेसाठी लेखन करीत. कॉलेज, राष्ट्र सेवादल आणि साधना ही तेव्हा बापटांनी स्वीकारलेली प्रमुख कामे होती. मला या कामाचा कसलाच अनुभव नव्हता. प्रुफे तपासणे म्हणजे काय हेही मला ठाऊक नव्हते! रावसाहेब, श्रीरंग वरेरकर, वसंत बापट, यदुनाथ थत्ते या सर्वांनी या प्रारंभीच्या काळात, माझ्या उणेपणाचे कसलेही दडपण माझ्या मनावर न आणता, मला अक्षरशः सांभाळून घेतले!

वसंत बापटांचे आणि माझे जिवाभावाचे स्नेहसंबंध जुळून यावे यासाठी नियतीने साधना कार्यालयाचा दरवाजा मला उघडून दिला होता, असेच मला आज वाटते. कारण जेमतेम दोन वर्षे मी मुंबईला साधनात काम केले असेन. साधनेचे कार्यालय पुण्याला हलवण्याचे ठरले. आणि मला मुंबई सोडून पुण्याला जाणे शक्य नव्हते. साधनाशी असलेले माझे कार्यालयीन संबंध सुटले, पण साधनाच्या निमित्ताने जवळ आलेला सोनेरी काड्यांचा चष्मा लावणारा हा शिष्ट माणूस माझ्या आयुष्यात स्नेहाची मुळे घट्ट रोवून उभा राहिला तो कायमचा.

स्नेहाचा हा आकृतिबंध दोन परिमाणांचा नसून तीन परिमाणांचा असावा, अशीही नियतीची इच्छा होती. अनेक शाळा कॉलेजांची भटकंती पुरी करून विंदा करंदीकर हे मुंबईच्या रुइया कॉलेजात प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि नियतीच्या इच्छेनुसार स्नेहाच्या या आकृतिबंधाला अटळ असे तिसरे परिमाण लाभले. फटकळपणा, धसमुसळा रांगडेपणा, झपाटलेगिरी असे विविध वेष धारण करणाऱ्या करंदीकरांचाही अक्षरशः नाइलाज झाला! तेही आतून आतून आमच्याशी जोडले गेले. यासाठी कसलाही प्रयत्न आम्ही कधी केला नाही. कसलेच मंडळबिंडळ स्थापले नाही. एकामेकांच्या घरी जाणे-येणेही फारसे कधी केले नाही.

आमचे तिघांचे काव्यवाचनाचे सर्वत्र एकत्र कार्यक्रम होऊ लागले, तेही आम्ही ठरवल्यामुळे नव्हे! आम्ही तसे कधीही ठरवलेले नव्हते-अगदी आजही नाही. तिघेही कविता वाचून दाखवत होतो - कविता (कशाही आवाजात) चालीवर म्हणून दाखवण्याचा तो काळ होता. लोकांनाही काही तरी वेगळेपणा हवा असतो. लोक तोचतोपणा आला की, नाही म्हटले तरी, थोडे कंटाळतात. आम्ही तिघेही कविता वाचून दाखवीत होतो, हा वेगळेपणा लोकांना भावला. आणि त्यातही पुन्हा असे की, कविता वाचण्याची आणि कविता लिहिण्याची तिघांचीही शैली वेगळी. त्यामुळे, कार्यक्रम ठरवणाऱ्या संस्था कवितावाचनाचा कार्यक्रम ठरवताना तिघांनाही एकत्र बोलावू लागल्या. यात कसलीही योजना नव्हती, केवळ योगायोग होता.

हा योगायोग पुढे पुढे इतका रुळला की जवळ जवळ चाळिसाहून अधिक वर्षे तो रूढ होऊ बसला. एखाद्या ठिकाणी जर एकाचा किंवा दोघांचा कार्यक्रम ठरला असला तर, तिघेजण एकत्र नसल्यामुळे, श्रोत्यांनाच चुकल्या चुकल्यासारखे वाटू लागले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिघांचे एकत्र येणे, एकत्र खाणे जेवणे, एकत्र प्रवास करणे सतत होऊ लागले. मैत्री अधिकाधिक दृढ होण्यास या कार्यक्रमांचे निमित्त पोषक ठरले. तिघांनाही लोकांनी भरभरून प्रेम दिले, यश दिले. त्यामुळे असेल किंवा आंतरिक स्नेहभावनेमुळे असेल, मत्सराची भावना तिघांनाही कधी चुकूनही शिवली नाही.

तिघेही एकत्र असलो की, एकमेकांच्या किंवा कुणा इतराच्या साहित्याबद्दल चुकूनही बोलणे नाही, चर्चा नाही. तीन खट्याळ पोरे एकत्र जमली की जसा उनाडपणा करतील, एकमेकांची थट्टा वा टिंगलटवाळी करतील तसा सर्व प्रकार. एखाद्या, आम्हांला न ओळखणाऱ्या माणसाने हा प्रकार पाहिला तर त्याला वाटेल, हे आता भांडून एकमेकांच्या उरावर बसतील!

मला असे वाटते की, नकळत जर काही मनात साचले असेल तर, या व्रात्यपणामुळे त्याचा अगदी सहजपणे निचरा होऊन मन अगदी निर्मळ प्रवाही होत असणार. पण या व्रात्य वागण्यामागे खोल स्नेहभावना होती, तिचा चुकूनही उल्लेख आम्ही कधी केला नाही. एखाद्या नाटकात एखादे पात्र असे असावे की, जे रंगमंचावर कधीच येत नाही पण तरीही सगळ्या नाटकावर त्याचा प्रभाव असतो, तशीच ही स्नेहभावना होती. व्रात्यपणाच्या मागे दडलेल्या या खोल स्नेहभावनेचे एक उदाहरण देण्याचा मला इथे मोह होतो आहे- आणि मी तो आवरणार नाही... 1991 साली मी अमेरिकेला होतो. तिथे विंदा करंदीकरांचे एक पत्र मला आले. हे पत्र असे :

प्रिय मंगू,

तू तिकडे गेल्यापासून काव्यवाचनाच्या कार्यक्रमांनी अक्षरशः हैदोस मांडला आहेस असे अजित, श्रीपु व वसंत या तिघांनीही सांगितले. एकूण डॉलर किती मिळाले असतील याचे तिघांनीही वेगवेगळे अंदाज केले आहेत. वस्तुस्थिती त्या अंदाजांच्या बेरजेएवढी असणार असा माझा अंदाज! असह्य पोटदुखीवर एखादे चांगले औषध असले तर माझ्यासाठी घेऊन ये!

जागतिक वाङ्‌मयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या दोन गोष्टी तुझ्या कानावर घालून ठेवतो, दोन्ही गोष्टी साधना दिवाळी अंकात समाविष्ट झालेल्या आहेत.

1. वसंताने त्याच्या संकल्पित महाकाव्यातील दोन काण्डे साधना दिवाळी अंकात प्रसिद्ध केली आहेत: ती जागतिक वाङ्‌मयाच्या दृष्टीने कशी महत्त्वपूर्ण ठरतात, हे कळण्यासाठी तुला ती मुळातूनच (शेजारी संस्कृतचा कोश घेऊन) वाचावी लागतील. आता फक्त एवढेच सांगतो. ती वाचण्यासाठी बुश साहेबांनी नानासाहेबांचा वशिला लावून साधनाचा हा दिवाळी अंक मागवून घेतला आहे. वसंताचा मोठेपणा हा की, बुशसाहेबांच्या या मराठी वाङ्‌मयासंबंधीच्या कुतूहलाचे श्रेय तो मुक्तपणे तू अमेरिकेत करीत असलेल्या काव्यवाचनांना देतो.

2. याच अंकात वसंताने माझ्यावर एक अत्यंत साक्षात्कारी लेख लिहिला आहे. तो इतका गाजतो आहे की, त्याचा आवाज अमेरिकेतही तुझ्या कानावर पडला असणार. दिवाळीचा फराळ करीत असताना मी तो लेख प्रथम वाचला. वाचता वाचता नकळत माझे डोळे भरून आले. घरातली इतर मंडळी माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली; नव्हे, मलाही या अशक्यप्राय गोष्टीचे आश्चर्यच वाटले! पण शांतपणे विचार केल्यावर उमगले की, तो मी खात असलेल्या फरसाणातील कच्च्या कांद्याचा परिणाम होता! असो.

मराठी वाङ्‌मयातील या दोन्ही घटना तुझ्या कानावर पडलेल्या असणे इष्ट, म्हणून हा प्रपंच.

तू जानेवारीत परत येत आहेस हे वाचून आनंद वाटला. वस्तुतः तू मुंबईत असलास तरीही दोन दोन महिन्यांत प्रत्यक्ष भेटत नाहीस. पण आता या वयात जवळची माणसे दूर गेली की, विनाकारणच एकाकी व रिते रिते वाटू लागते. तू परत आलास की, न भेटताही घर भरल्यासारखे होईल.

तुझा विंदा.

वयाची 74 वर्षे पूर्ण करून 25 जुलै 1996 या दिवशी वसंत बापट आपल्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश करीत आहेत. त्या निमित्ताने मी हा लेख त्यांच्यावर लिहीत असताना, अनेक आठवणी मनात दाटून येऊन, या क्षणी माझेही डोळे भरून आले आहेत. परंतु, हा लेख लिहीत असताना मी कोणत्या पदार्थात कच्चा कांदा घालून खात आहे हे मात्र मी सांगणार नाही. मी आणि करंदीकर यांच्या स्वभावातला हा फरक आहे, असे म्हटले तरी चालेल!!

कच्चा कांदा कितीही खाल्ला तरी, वसंत बापटांची थोरवी मी मनोमन जाणून आहे. वसंत बापट ही असामान्य बुद्धिमत्ता लाभलेली व्यक्ती आहे. गेली 40-45 वर्षे मी जीवनाच्या विविध क्षेत्रांत नामवंत असलेली अनेक माणसे कमी-अधिक अंतरावरून पाहात आलो. पण वसंत बापटांसारखी तीव्र, तल्लख, कोणत्याही विषयाचा विनासायास ठाव घेऊ शकणारी बुद्धी क्वचितच दिसते असा माझा अनुभव आहे.

या बुद्धिमत्तेप्रमाणेच वाणीच्या शक्तीचे जन्मजात देणे बापटांना लाभलेले आहे. वसंत बापट हे उत्तम कसलेले वक्ते आहेत. त्यांची भाषणे ऐकताना त्यांच्या वाणीच्या शक्तीचा प्रत्यय येतो. पण बापटांच्या वाणीची ही शक्ती आपल्या सोळा कळांनी प्रगटते. बापट कवितावाचन करताना, (मग ही कविता बापटांची असो की अन्य कुठल्या कवीची असो) भाषेचा अनुभव आपण अनेक पातळ्यांवर घेत असतो. कवितेच्या रूपाने येणारा भाषेचा अनुभव हा सर्जनशील असतो. इथे भाषा सांगून संपत नाही; ती रुजत राहते, उगवत राहते. आणि म्हणूनच, कविता वाचताना तिचा उच्चार हा केवळ बुद्धीने, वाक्चातुर्याने, कारागिरीच्या आडाख्यांनी करता येत नाही. तसल्या उच्चारणाला कविता वश होत नाही.

बापटांनी वाचलेली कविता ऐकणे हा एक अलौकिक अनुभव असतो. ते श्रोत्यांसमोर कविता वाचतात तेव्हा जणू आपल्या जन्मजात प्रतिभाशक्तीने त्या कवितेच्या अस्तित्वाचा शोध घेत असतात. एकच कविता वेगवेगळ्या कार्यक्रमांत जरी दहा वेळा बापटांच्या तोंडून ऐकली, तरी ती प्रत्येक वेळी नव्याने आपण ऐकतो आहोत असा प्रत्यय येतो. बापट कविता वाचू लागले की आपण पुस्तकात किंवा मासिकात वाचलेली ही कविता छापील फासातून मुक्त होऊन चैतन्यमय उच्चार होते, याची सुखद जाणीव आपल्याला होऊ लागते.

बापट उत्तम गद्य लिहितात, अगदी सहजपणे लिहितात. नर्मविनोदापासून तीक्ष्ण उपहास-उपरोधापर्यत, तर्कशुद्ध विश्लेषणापासून भावनेच्या उत्कट आवाहनापर्यंत, प्रवासवर्णनापासून व्यक्तिचित्रणापर्यंत, राजकीय विषयापासून एखाद्या कवितेच्या आस्वादापर्यंत त्यांची गद्य शैली नवी नवी रूपे लीलया धारण करते. पुष्कळ वेळा कवी गद्य लिहू लागले की, हे गद्य ‘काव्यमय’ वगैरे ‘करण्याचा’ नकळत प्रयत्न करण्याचा धोका निर्माण होतो. बापटांचे गद्य हे सहज, स्वच्छ, प्रवाही असते. काव्यात्मतेचे नटवे आविर्भाव चुकूनही या गद्याला स्पर्श करीत नाहीत. वक्तृत्वाची सुंदर कळा या गद्याला लाभली आहे, त्यामुळे बापटांनी लिहिलेले गद्य छापील राहत नाही, ते ऐकू येते, आपल्याशी मनमोकळ्या जिव्हाळ्याने बोलू लागते.

नट, दिग्दर्शक, तमासगीर, वक्ता, गद्य लेखक, संपादक, खाजगी बैठकीत नकलांचा एकपात्री कार्यक्रम करून मैफल रंगवणारा, कलात्मक कार्यक्रमांचा कसबी आणि सुसंस्कृत निवेदक, संस्कृतचा पंडित, यशस्वी प्राध्यापक अशा विविध गुणांनी आणि रूपांनी गेली पन्नासहून अधिक वर्षे बापटांनी समाजावर प्रभाव टाकला आहे, मान्यता मिळविली आहे हे अगदी खरे. पण मराठी माणसाने बापटांवर जिवापाड प्रेम केले ते कवी म्हणून. जीवनातले नानाविध अनुभव बापटांच्या कवितेने झेलले. हे अनुभव साकार करीत असताना त्यांच्या शब्दकळेने नवनवी रूपे, नवनवे उन्मेष धारण केले. बापटांची कविता कुठल्याही साच्यात कधी अडकली नाही, अभिव्यक्तीच्या कुठल्याही फॅशनच्या दबावापुढे वाकली नाही. तिने आपल्या अंतःप्रेरणेशी असलेले इमान कधी ढळू दिले नाही. या कवितेची सामाजिक, राजकीय जाणीव प्रखर होती. पण ही जाणीव कुठल्याही पक्षाचा, वादाचा, संघटित विचारप्रणालीचा बांधील पुरस्कार करण्यासाठी उभी राहिली नाही. माणसाविषयी वाटणारा कळवळा हाच तिचा गाभा होता, हीच तिची प्रेरणा होती.

बांधिलकीचे, प्रयोगशीलतेचे, विशुद्धतेचे, प्रतिमावादाचे, कसलेही लेबल तिने स्वतःला चिकटू दिले नाही. यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष होण्याची, अनुल्लेख होण्याची उघड उघड शक्यता असूनही ती कधी भ्याली नाही. अनेकदा मंचावरून गात असताना ती एकटी, आत्ममग्न उभी असते हे अनेकांच्या ध्यानातही आले नाही. पण तिला कसलीच फिकीर नव्हती. आधुनिक म्हणून मिरवण्याची घाईही नव्हती. नवतेचे, आधुनिकतेचे, हुषार-बुद्धिनिष्ठ अशा प्रयोगशीलतेचे बहुतेक झेंडे काही काळ फडकतात, फडफडवले जातात, पण अखेर ते खाली उतरवले जातात. अंतःकरणाला भिडणारी चांगली कविता हीच शेवटी उरते, रसिकांच्या मनावर राज्य करते, ही गोष्ट वसंत बापटांच्या कवितेने निर्भय अशा अंतःप्रेरणेने जाणली होती. त्यामुळे आपली कविता ‘वेगळी’ आहे हे ठासण्याचा प्रयत्न न करता वसंत बापट चांगली कविता लिहीत राहिले आणि गेली पन्नास वर्षे संकेतग्रस्त नसलेली मराठी रसिकता त्यांच्या कवितेवर प्रेम करीत राहिली. कवितेच्या या वसंतोत्सवाचे मराठी रसिकांनी उत्फुल्ल मनाने स्वागत केले..

कवितेचा हा वसंतोत्सव आता अमृतमहोत्सवात प्रवेश करीत आहे. माझा मित्र अजूनही कविता लिहितो आहे, कविता गातो आहे, जगभर मनमुराद भटकतो आहे. प्रतिभेची, वाणीची कृपा त्याच्यावर कायम आहे. त्याने फार प्रवास करू नये, प्रकृतीची काळजी घ्यावी म्हणून मी आणि करंदीकर अधून मधून त्याला त्याच्या वयाची आठवण करून देण्याचा प्रयत्न करतो- पण आमचा हा प्रयत्न निखालस व्यर्थ ठरतो. चांगलाच खोकला झालेला असूनही हा गडी एस.टी. पकडून कुठे तरी बुद्रुक ढेमरे येथे काव्यवाचनाच्या कार्यक्रमासाठी निघतो, तो तरी काय करणार? कॅलेंडरच्या तारखांनी वय मोजणे त्याला ठाऊकच नाही आणि अनेकांना वाकवणारे हे आयुष्यही त्याला फितूर आहे. हे आयुष्य....

शरदामधली पहाट आली तरणीताठी,

हिरवे हिरवे चुडे चमकती दोन्ही हाती!

असे रूप घेऊन रोज त्याच्या भेटीला येते, आणि तेही पहाटे! सतत तरुण राहण्याखेरीज माझ्या या मित्राला गत्यंतरच उरत नाही. सतत तरुण राहणे आणि शतायू होणे त्याला भागच आहे.

Tags: जन्मशताब्दी विशेषांक वसंत बापट मंगेश पाडगांवकर visheshank vasant bapat mangesh padgaonkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके