डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अखेर आमचं गल्बत तुमच्याच किनाऱ्याला लागतं !

26 आणि 27 डिसेंबर या दिवशी चिपळूण येथे कोकण मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अधिवेशन भरले. संमेलनाध्यक्ष कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या अध्यक्षीय भाषणाचा सारांश साधनेच्या वाचकांसाठी देत आहोत...

हे पहिले कोकण साहित्य संमेलन कवी माधव केशव काटदरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भरवलं जात आहे. या गोष्टीचा विशेष आनंद मला होतो आहे. कवी माधव यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे. मोठ्या माणसाशी लहानांनी तुलना करू नये, हा विवेक माझ्याकडे आहे, यावर आपण विश्वास ठेवा. पण तरीही या क्षणी काहीसा मोहवश होऊन, मी एका योगायोगाचा उल्लेख करतो. मी माझी पहिली कविता लिहिली, तेव्हा मला तेरा वर्ष संपली होती, आणि चौदावं वर्ष सुरू होतं. आता मला त्रेसष्ट वर्ष झाली आणि चौसष्टावं सुरू आहे! मी पहिली कविता लिहिली त्याला आता 50 वर्ष होऊन गेली. म्हणजेच, मी लिहिलेल्या पहिल्या कवितेच्या जन्माची या वर्षी अर्धशताब्दी आहे! एक कवी म्हणून मला हे अध्यक्षपद आपण दिलंत ते हे वर्ष माझ्या कवितालेखनाच्या अर्धशताब्दीचं वर्ष असावं, हा योगायोग मला सुखवणारा आहे!

कविता लिहिणं आणि कविता वाचणं यांनी मला खूप आनंद दिला. हा आनंद सतत देत आणि घेत असताना, माझी कवितेची जाणीव कशी फुलत जाते आहे, गतिमान होत जाते आहे याचा शोध घेणं हा असाच माझ्या आनंदाचा सुंदर खेळ आहे, असंच आपण समजा!

मी लहान असताना एकदा आकाशात कडकडणारी वीज पाहिली होती. विजेचं ते पहिलं दर्शन अजूनही माझ्या स्मरणात ताजं आहे! आकाशात विजेचं ते नागमोडी कडाडणं पाहताना मनात लख्ख झालं होतं. अगदी तसंच लख्खपण कवितेचा पहिला स्पर्श झाला, तेव्हा मी अनुभवलं होतं. कवितेचा पहिला स्पर्श झाला तेव्हा मी खूपच लहान होतो. त्या पहिल्या स्पर्शात मी अनुभवलेलं कवितेचं हे लख्खपण नेमकं कशात होतं? हे वेगळेपण भाषेच्या एका वेगळ्या अनुभवात होतं.

मी लहान होतो, तेव्हा आईने एक गाणं मला शिकवलं मला ते फार आवडायचं. गाण्याच्या या चार ओळींनी मला पुरतं नादावून टाकलं होतं. त्या ओळी ठेक्यात म्हणत राहणं मला फार आवडायचं.

हे ऐसे अद्भुत शब्द कुठले 

आनंदासि आनंदाचे कोंब फुटले

असंच याचं वर्णन करावं लागतं? पुढे मी शब्दांशी नादावून अधिकाधिक खेळू लागलो. मी असं खेळता खेळता, माझ्या भावना माझी सुखदुःखं, माझे नानाविध अनुभव या खेळातल्या शब्दांना येऊन चिकटू लागले. बिलगू लागले.

जो कविता लिहितो, जो कविता वाचतो त्याला भाषेचा हा मूलभूत आनंदरूप अनुभव आधी घेता आला पाहिजे आणि त्यानंतर बाकी सगळं. भाषेचं हे जे फुलून येणं असतं त्यातूनच माणूस आंतरिक फुलणं, आंतरिक विकास अनुभवतो. निर्मितीच्या मूलस्रोताला स्पर्श करतो. सर्जनशील चेतनेचा हा स्पर्श असतो.

कवीला आपली कविता साकार करण्यासाठी उपयोग करावा लागतो भाषेचा. ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगात आणली जात असल्यामुळे, नित्याच्या सवयीमुळे भाषेविषयीच्या आपल्या संवेदना अपरिहार्यपणे बोथट बनलेल्या असतात.

1. तिकडे 2. आनंद 3. इकडे 4. गडे 5. आनंदी 6. चोहिकडे- हे सहा शब्द घ्या. या शब्दांनी तुम्हांला निर्मितीचा प्रत्यय दिलेला नाही. आता हेच शब्द बालकवी ढोमरे यांच्या हातात द्या. दिलेत? आता काय जादू होते ते पहा. काय केलं बालकवींनी या शब्दाचं?

आनंदी आनंद गडे 

इकडे तिकडे चोहिकडे!

सरावाने बोथट बनलेले हे शब्द, बघता बघता आनंदाचा सुंदर साक्षात्कार बनले. ते नाचू लागले. गाऊ लागले. स्वतःतूनच एक नवा जन्म त्यांनी घेतला. हे शब्द तुमच्या जाणिवेत फुलं होऊन फुलू लागले. तुम्ही हे शब्द हळुवार मनाने गुणगुणू लागला. अर्थ कळला, शब्द कळला असं आता त्यांचं होत नाही. भाषेत अंतर्भूत असलेली व्याकरणाला बांधलेली शब्दांची घडण इथेही आहे. पण ती आनंदरूप रचना झाली आहे. 

कवितेची भाषा हा मूलतः आनंदाचा अनुभव असतो. याचा अर्थ असा नव्हे की, या भाषेला विचारांचं वावडं असतं. 'इथे प्रवेश मना आहे' अशी पाटी कवितेच्या भाषेने जीवनातल्या कुठल्याही अनुभवाला दाखवलेली नाही! वैचारिक असो, भावनात्मक असो, संवेदनात्मक असो, सामाजिक-राजकीय असो किंवा अन्य कुठलाही असो, कवितेच्या भाषेचे दरवाजे मानवी जीवनातल्या कुठल्याही अनुभवाला खुले आहेत. पण प्रवेश हवा असेल, तर कवितेच्या भाषेची एकच अट आहे आणि ती अट कुठल्याही अनुभवाला पाळावीच लागेल. 

ही अट अशी की, कवितेच्या भाषेचं मूळ स्वरूप हे आनंदरूप आहे. या आनंदरूपावर कुठल्याही अनुभवाला आक्रमण करता येणार नाही. ही नानाविध आनंदरूपे ही निर्मितीची लीला आहे. आनंद म्हणजे रूढ अर्थाने आपण ज्याला सुख म्हणतो ते नव्हे. खरे म्हणजे निर्मितीचा हा आनंद ही सुख आणि दुःख या द्वंद्वांच्या अतीत असलेली अनुभूती आहे. आणि म्हणूनच मानवी दुःख हा जरी कवितेतून व्यक्त झालेला अनुभव असला, तरीही अशी कविता आपल्याला काव्यानंद देऊ शकते.

कवितेची भाषा माणसाच्या आयुष्यातला कुठलाही अनुभव स्वीकारायला तयार असते असं मी म्हटलं. याचा अर्थ असा की, एक कवी म्हणून मी नानाविध रूपं घेणाऱ्या जीवनाला सामोरं जाऊ इच्छितो. कसल्याही बांधिलकीच्या साच्यात काव्यनिर्मितीची माझी उर्मी मी कोंडून घेऊ इच्छित नाही. मी हे स्वातंत्र्य मानतो ते केवळ कवी म्हणून मानतो असं नव्हे. तर कवितेचा एक रसिक वाचक म्हणूनही मानतो. सलाम या माझ्या कवितासंग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनेत मी स्पष्टपणे म्हटलं होतं- 'मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा कुठल्याही इझमच्या झेंड्याखाली पूर्वी कधीही उभा नव्हतो आणि आजही उभा नाही. माझ्या या मुक्त वृत्तीचा मला अभिमान आहे. खरा कवी हा कुठल्याही विचाराचा प्रचारक नसतो. 

आपली जीवनदृष्टी तो वाचकाच्या गळी उतरवण्याचा कधीही प्रयत्न करीत नाही. असा कवी वाचकांचे विचारस्वातंत्र्य, अनुभूतिस्वातंत्र्य आदरपूर्वक गृहीत धरून चालतो. तो नम्रपणे इतकेच म्हणतो की, माझा जीवनविषयक अनुभव हा असा आहे. जीवनाकडे पाहण्याची हीसुद्धा एक शक्यता आहे. माझी कविता मला नवनिर्मितीचा आनंद देते. नवनिर्मितीच्या प्रेरणेतून मी माझं माणूसपण खऱ्या अर्थाने अनुभवतो. कवी जीवनातला कुठलाच अनुभव नाकारीत नाही. कुठल्याही साचात न अडकता जीवनाप्रमाणेच सतत प्रवाही राहण्याचा त्याचा प्रयत्न असतो.’

मराठी माणसांच्या रसिकतेचा अनुभव मी घेतलेला आहे. 1949 पासून, म्हणजे गेली 44 वर्षे मी, विंदा करंदीकर आणि वसंत बापट - आम्ही तिघे महाराष्ट्रभर फिरून लोकांना कविता वाचून दाखवतो आहोत. 

या 44 वर्षीचा आमचा अनुभव हेच सांगतो की, कवितेचा आनंद घेण्याची मराठी माणसाची शक्ती अजून शाबूत आहे. तुमच्यासारख्या हजारो रसिकांची ही शक्ती हाच मराठी कवितेच्या विकासाचा, तिच्या अस्तित्वाचा खरा आधार आहे. कुठल्याही साच्यात न अडकता आणि कसल्याही गटबाजीपुढे मान न वाकवता कविता लिहिण्याचा आत्मविश्वास तुमच्या या रसिकतेने मला दिला. तुमचं हे ऋण मी मानतो आणि आज त्याचा उल्लेख कृतज्ञतेने करतो. कधी आमच्याही चुका होतात. 

आमचे सुद्धा मार्ग चुकतात, 

बघता बघता बेत हुकतात...!

रसिकांच्या आळंदीला 

जाण्याचं योजतो आम्ही 

विद्वानांच्या आळंदीला 

आणि जाऊन पोचतो आम्ही! 

या पठीक विद्वानांचा 

शेंदूर असतो, दगड असतात, 

मत्सर असतो, गट असतात, 

स्वतःच्या पूजेसाठी पोसलेले 

ठराविक भट असतात! 

पेंडीभूत विद्वानांच्या जगामध्ये 

'लोकप्रिय' ही एक शिवी असते 

आम्हांला विद्वत्कृपा हवी असते!


तुम्ही ठरता सामान्य, 

आम्ही होतो विद्वन्मान्य! 

सहनशक्ती आमची अखेर 

तुटेपर्यंत ताणली जाते, 

भाडोत्री संकेतांची पोपटपंची 

समीक्षेतून आमच्यावर हाणली जाते!

पण अखेर आमचं गल्बत 

तुमच्याच किनाऱ्याला लागतं, 

तुमच्यासमोर उभं राहून 

अखेर तुमचाच कौल मागतं!

तुमचा हा कौल मराठी कवितेला सतत लाभो, कवितेचा आनंद घेण्याच्या तुमच्या मूलभूत शक्तीला स्पर्श करण्याची संधी आम्हां कवींना सतत मिळो अशी प्रार्थना करून माझं हे भाषण मी संपवतो.

Tags: कविता माधव केशव काटदरे वसंत बापट विंदा करंदीकर मंगेश पाडगांवकर Poem Madhav Keshav Katdare Vasant Bapat V.D. Karandikar Manghesh Padgonkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके