डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

लाविते लळा ही जशी माउली बाळा: मज आवडते ही मनापासुनी शाळा!

सरांचा निरोप घेतल्यानंतर काही माजी विद्यार्थ्यांची मी भेट घेतली. या शाळेविषयी त्यांचे विचार जाणून घ्यावेत हा हेतू! ठराविक प्रश्न वगैरे न विचारता किंवा सदर लेखाची पूर्वकल्पना त्यांना न देता मी त्यांचे विचार जाणून घेतले. एक गोष्ट लगेच लक्षात आली-मी ज्या सात माजी विद्यार्थ्यांकडे गेलो त्यांच्या बोलण्यात 'आपली शाळा' असा शब्दप्रयोग वारंवार आला!

मुंबईत शाळा तशा किती तरी. स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाचं लोण पोचलं. खेड्यापाड्यातले लोकही साक्षर होत आहेत. पण मुंबईत राहूनही काही गरीब मुलांची बाराखडीशी गाठ पडली नाही! कारणे अनेक असतील. त्यातील एक प्रमुख असे की, उपहारगृहांप्रमाणे रस्त्यांच्या बाजूलाच पॉश वस्त्यांमध्ये शाळांच्या इमारती खड्या झाल्या!...मुंबईच्या सांताक्रूझ या उपनगरातील एक विभाग-चुनाभट्टी. झोपडपट्टीचा एक गलिच्छ विभाग. म्हशींच्या गोठ्यामुळे डासांचा, माशांचा नुसता अहोरात्र बुजबुजाट. गटारांतल्या पाण्यातच खेळणारी शेंबडी पोरं. उघड्यावरच शौचाला बसणारे लोक. दारूचे अड्डे आणि वेश्याव्यवसाय. अशी ही वस्ती.   

कै.डॉ.वसंत अवसरे, डॉ.काशीबाई अवसरे इत्यादी साने गुरुजींच्या परिवारातली मंडळी 1954 साली इथे हजर झाली. साने गुरुजींचं एखादं स्मारक अशा जागी व्हावं म्हणून त्यांनी या वस्तीच्या मध्यभागी एक शाळा सुरू करण्याचे ठरवले. डॉ.अवसरे पती-पत्नींनी त्यासाठी मनोभावे प्रयत्न केले. सरकारकडून काही जमीन त्यांनी लीजवर मिळवली. नंतर 30 फूट X 60 फूटचा एक शेडवजा हॉल उभा केला. परंतु 1962 पर्यंत सारे जैसे थे राहिले! पुढे पाऊलच पडेना. जून 1962 मध्ये राष्ट्र सेवा दलाच्या तळमळीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्याचा हात देऊ केला. 'साने गुरुजी आरोग्य मंदिर ट्रस्ट'ने प्रारंभी केवळ 3 मुलांसह शिशुवर्ग सुरू केला. पुढील केवळ 12 वर्षांत एस्.एस्.सी.(अकरावी)ची पहिली बॅच या शाळेतून तयार झाली. 1968 साली शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले. 1980 साली एक चित्रातल्यासारखे विद्यामंदिर तयार झाले. विद्यार्थ्यांची संख्या 2000च्या आसपास! हे सारे कसे झाले? कोणी या जागी जादूची कांडी फिरवली?...शाळेच्या व्हरांड्यातील एका फलकावर याचे उत्तर सापडते-

त्याच्यानंतर काय घडले? पुढच्या शाळेशिवाय नडले! एक, दोन, तीन, चार-चार यत्ता... बघता बघता. छोटी शाळा पुरी झाली. पुन: भुकेची वेळ आली! आता याच बाळांसाठी शाळा हवी खूप मोठी. 

आणा काड्या, गवत दोरे. शाळेमध्ये बख्खळ पोरे! 
मोठ्या शाळेत चार वर्ग. चार वर्ग-सहा तुकड्या. त्यांना खोल्या किती तोकड्या!
म्हणून पुनः झोळी घेतली. चांगली भली मोठी बेतली. 
तुम्ही त्यात असे उदार, झोळी भरली अपरंपार.

देणग्या मिळवून, कर्ज काढून, मुलांनाही निधी जमविण्यास सस्नेह प्रोत्साहन देऊन, तसेच उत्तम संघटनकौशल्य, कल्पकता दाखवून ही तीन मजली सुंदर शाळा उभी करणाऱ्यांचे कौतुक वाटते!

आज मात्र ती पूर्वीची चुनाभट्टी कुठंच दिसत नाही, कुठे गेले ते म्हैशींचे गोठे? कुठे गेली ती गटारे? याचे श्रेय बव्हंशी या 'साने गुरुजी विद्या मंदिर'च्या सुंदर वास्तूकडेच जाते. शिक्षणाइतकेच आरोग्य हे जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे, ही जाणीव विद्यामंदिराच्या विश्वस्तांनी व कार्यकारी समितीने ठेवल्याने आज चुनाभट्टीचा परिसर पूर्वीसारखा गलिच्छ राहिलेला नाही. गावाहून आलेलं पत्र धाडधाड आपल्या आईला एखादं दहा वर्षांचं पोर वाचून दाखवू शकतं! दोन भैय्याणी कुटुंबनियोजनाविषयी बोलू लागल्या आहेत. अनुकूल झाल्या आहेत. नवऱ्याचं नाव सांगायला आता त्या लाजत नाहीत. पाच वर्षांनी एकदा दाराशी येणाऱ्या निवडणुकीतल्या उमेदवाराला त्याच्या डोईच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अगदी नीट न्याहाळतात. काही गृहिणी घरी शिवणकाम करून घरखर्च चालवतात. बालकांना दूध व पावासारखा सकस आहार मिळतो. फॅक्टरीत नोकऱ्या करणाऱ्या स्त्रिया मुलांना पाळणाघरात ठेऊ शकतात. महारोगापासून सर्दीपडशापर्यंत सर्व रोगांवर वेळेवर औषधोपचार माफक दरात मिळतो. विद्या मंदिराच्या या सुंदर इमारतीत शिवणकामाचे वर्ग, सकस आहार केंद्र, पाळणाघर, लघुउद्योग व्यवसाय; व्यायामशाळा, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाशी संलग्न वाचनालय, अंधांसाठी स्वयंरोजगार योजना, एक छोटेसे इस्पितळ असे अनेक उपक्रम चालतात. शिवाय सांस्कृतिक विभागातर्फे नवोदित कवींचे एक मंडळही चालविले जाते. मुंबईतूनच नव्हे तर अगदी ठाणे, डोंबिवली, पालघरपासून नवोदित कवींची इथे उपस्थिती असते. किती ही धडपड! केवढी जबाबदारी! शाळेच्या कार्यवाहाची जबाबदारी हेगडेसर(श्री.लीळाधर हेगडे) कशी पेलतात याचे मला आश्चर्य वाटते! 

हेगडेसरांना शाळेविषयी मी काही प्रश्न विचारले. 

माझा पहिला प्रश्न होता - या जागी विद्या मंदिर बांधायला तुम्ही प्रथम आलात तेव्हा तुमच्या मनात प्रथम नेमके काय विचार होते? 
मी 62 साली इथे काम करायला आलो त्यावेळी एवढ्या मोठ्या शाळेची मनात कल्पनाही नव्हती. मी सेवादलाचा सर्ववेळ कार्यकर्ता होतो; त्यामुळे पहिली जबाबदारी सेवादल होती. त्यात कलापथकाचीही जबाबदारी. शाळा हळूहळू मार्गी लागल्यावर मग मात्र अनेक कल्पना स्फुरू लागल्या.

दुसरा प्रश्न - पुढील योजनांविषयी थोडक्यात माहिती सांगा. 
सध्या इथे व्यायामशाळा चालते. त्याचाच एक भाग म्हणून आमचा कबड्डी संघ आहे. तो मुंबईत खेळतो आणि बक्षिसं मिळवून आणतो. आता व्हॉलीबॉल, टेबल-टेनिस, खो-खो, स्केटिंग आणि जिम्नॅस्टिक सुरू करू. सेवादलाची शाखा चालू असते; त्या शाखेला या साऱ्याचा फायदा मिळतो व मिळेलही. सांस्कृतिक विभागात कविमंडळ आहे त्याप्रमाणे नृत्य-नाट्य, संगीत विभाग सुरू करण्याचा विचार आहे. नाट्यप्रेमी युवकांचा गट निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. श्री रमेश चौधरी यांनी मला मदत केली. परंतु तो यशस्वी झाला नाही... शिवणकाम चालू आहे त्याबरोबर आता इथं टाइपरायटिंग सुरु करायचं आहे, शिवणयंत्र आणि टाइपरायटर्स दुरुस्त करण्याचे क्लासेस सुरू करण्याचाही विचार आहे. तसंच लहान मुलांसाठी एक मिनी पार्क करायचा आहे. त्यात मुलांना कारंजाखाली यथेच्छ भिजता येईल अशी सोय असेल. 

माझा प्रश्न- शाळेवर किती कर्ज आहे?
अडीच लाख काढलं होतं. फेडत आणलंय. आता 58,000 राहिलं आहे. कंत्राटदाराचे साडेचार लाख रुपये देणे होते; त्यातलं 30 हजारच बाकी आहे.

सरांचा निरोप घेतल्यानंतर काही माजी विद्यार्थ्यांची मी भेट घेतली. या शाळेविषयी त्यांचे विचार जाणून घ्यावेत हा हेतू! ठराविक प्रश्न वगैरे न विचारता किंवा सदर लेखाची पूर्वकल्पना त्यांना न देता मी त्यांचे विचार जाणून घेतले. एक गोष्ट लगेच लक्षात आली-मी ज्या सात माजी विद्यार्थ्यांकडे गेलो त्यांच्या बोलण्यात 'आपली शाळा' असा शब्दप्रयोग वारंवार आला! 

जवळच्याच बेस्ट कॉलनीत राहणारा विजय केरकर शाळेच्या इमारतीवरचं गांधीजींच्या पडछायेचं भलंमोठं चित्र दाखवत म्हणाला, 'ते चित्र आमच्या घरातून दिसतं. सकाळी ऑफिसला जायला निघालो की त्या चित्राकडे हमखास नजर जाते-ही आयडिया ज्याच्या डोक्यातून निघाली तो खरंच ग्रेटचाय, यार!'

खोतवाडी या जवळच्याच एका झोपडपट्टीच्या मोहल्ल्यातला एक माजी विद्यार्थी सखाराम गोताड म्हणाला, 'अरे आपल्या वेळेला ग्राउंडवर श्रमदान करायचे आपण. तुझ्या कॉलेजमधल्या एन.एस.एस.मधल्या कामापेक्षा त्याला खरंतर जास्त महत्त्व होतं. आता आपलं ग्राउंड एकदम टॉप झालंय.' चुनाभट्टीतलाच अनिल बागवे म्हणाला, 'शाळेमुळे चुनाभट्टी खूप सुधारली आहे असं म्हणता येणार नाही. अजून इथं छुपा वेश्याव्यवसाय चालतो. हातभट्ट्या चालतात-खरंतर शाळेकडून या अपेक्षा करणंही बरोबर नाही. शेवटी ते एक विद्यामंदिर आहे.' शाळेच्या इमारतीविषयी बोलताना तो म्हणाला, 'आवारात छत्रपती शिवाजी, टिळक वगैरेंचे पुतळे जसे आहेत तसा शाळेच्या गेटवर साने गुरुजींचा एक मोठा पुतळा असायला हवा, असं वाटतं!' जवळच्याच जीवनशांती कॉलनीतला सखाराम सुपल शाळेतल्या शिक्षकवर्गाविषयी फारच आपुलकीनं बोलला. काही शिक्षकांच्या नावांचा उल्लेख करून ते रस्त्यात भेटले तरी प्रेमानं विचारपूस करतात असं त्यानं सांगितलं. शेवटी माझ्यावर घसरलाच, तू इथं तिथं लिहितोस ते शाळेची काही ओळख ठेव हं.'

मी या वास्तूला पवित्र म्हणतो त्याचं आणखी एक कारण म्हणजे इथं येऊन गेलेल्या नंदनीय व्यक्ती-खान अब्दुल गफारखान उर्फ सरहद्द गांधी, साने गुरुजींचे बंधू कै.आप्पा, सध्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राम जोशी, बाबा बामटे, भाऊसाहेब रानडे, दयानंद बांदोडकर... किती नावे घ्यावीत! बरं या साऱ्यांच्या भेटीही कशा अगदी अनौपचारिक. मला आठवतं, आम्ही मुलं मधल्या सुट्टीत गॅलरीत उंडारत असू. हेडगेसर कुणा पाहुण्याला घेऊन वर येत. सर्व शाळा त्या पाहुण्याला (?) दाखवत. आम्हाला हे काही नवीन नसायचं. त्यापूर्वीही कित्येक पाहुणे आले गेलेले आम्ही पाहिलेले असत. त्यामुळे आम्ही खेळण्यात मग्न. माझ्यासारखा कुणी मुलगा जिन्यावरून धाडधाड खाली धावत असे. जिना चढणाऱ्या ना.ग.गोऱ्यांना धक्का मारून पुढे पळणाऱ्या मुलाच्या पाठीत 'ठप्पा' मारीत असे. सुट्टी संपली की आम्ही वर्गात शिक्षकांची वाट पहात बसत असू. अचानक स्पीकरचा फुरफुर असा आवाज येत असे. हॉलमध्ये आम्ही जमत असू. मधल्या सुट्टीतली ही व्यक्ती म्हणजे कधी असत अप्पा साने, कधी वसंत बापट, माधव गडकरी, परीट गुरुजी तर कधी चक्क निळू फुले! 

आज शाळा मोठी झाली आहे. मनात येतं, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, शोभा गुर्टू, प्रभाकर कारेकर, जितेंद्र अभिषेकी, पं. भीमसेन जोशी यांच्या स्वरांनी उमललेलं कमळ म्हणजे ही वास्तू आहे. मराठी काव्यशारदेचे मुकुटमणी कविवर्य वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विं. दा. करंदीकर यांनी कविता वाचनाचे कार्यक्रम करुन शक्य तितका निधी जमा करून दिला. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकाने 'गल्ली ते दिल्ली', 'भारतदर्शन', 'आजादी की जंग'सारखी नाटके सादर करून पैसा उभारला. या सुंदर, डौलदार इमारतीकडे मी पाहतो तेव्हा वाटतं आजवर जे काही थोडंफार लिखाण केलं आहे, त्याचं श्रेय या इथल्या प्रेमळ शिक्षकांना बहुतांशी जातं. भोवतालच्या परिसराच्या सुखदुःखाशी एकरूप झालेली ही वास्तू पाहून आपण या शाळेत शिकलो, याचा किती अभिमान वाटतो!

Tags: निळू फुले. गटारे वेश्याव्यवसाय वसंत बापट सेवादल सानेगुरुजी चुनाभट्टी सांताक्रूझ मुंबई मंगेश विश्वासराव Nilu Phule. #शाळा Gutters Prostitution Vasant Bapat Sevadal Sane Guruji Chunabhatti Santacruz Mumbai Mangesh Vishwasrav #School weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके