डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

1970 पूर्वीचे अनेक गाजलेले मराठी चित्रपट ‘प्रभात’ या चित्रसंस्थेने तयार केले होते. शांताराम आठवले हे प्रभातचे गीतकार होते, त्यांची गीते तत्कालीन लहान-मोठ्यांच्या ओठावर रूळलेली होती. आजही त्यातील अनेक गाणी ‘रेडिओ-टीव्ही’वरून ऐकवली, दाखवली जातात तेव्हा आपले कान, दृष्टी खिळवून ठेवतात; फरक एवढाच आहे की ती गीते शांताराम आठवलेंची आहेत हे बहुतेकांना  माहीत नसते. त्या शांताराम आठवले यांचे जन्मशताब्दी वर्ष 21 जानेवारी 2010 पासून सुरू झाले आहे, त्या निमित्ताने त्यांच्या कन्येने लिहिलेला हा लेख.

मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘प्रभात’चे स्थान असामान्य असेच आहे. या नावाभोवती एक तेजोमय वलय आहे. प्रभातची तुतारी अनेक वर्षे निनादत राहिली- तिचे स्वर अजूनही मनात रुंजी घालतात. या तुतारीबरोबरच केशवराव भोळे, मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेली शांताराम आठवले यांची गीतेही अत्यंत प्रभावी अशीच आहेत. या तिघांनी मिळून हातांतहात घालून चित्रपटांचा साराच प्रवास नादमय, अमृतमय केला. या तिन्ही कलाकारांच्या कलागुणांचा असा काही समन्वय या चित्रपटांतून दिसतो की, चालीमुळे शब्दांची ओढाताण नाही. गीतातील आशयास पोषक अशाच, रंग वाढवणाऱ्या सुरेल चाली आहेत. गीताची चाल प्रथम केली जाई. ते गीत आशयपूर्ण सौंदर्याने नटलेले असणे आवश्यक असे. तरच ते रसिकांच्या पसंतीस उतरे. या दृष्टीने आठवले यांची गीते नक्कीच सरस होती. त्यामुळेच ती प्रेक्षकांच्या जिभेवर घोटाळली आणि नंतर हृदयाच्या कोपऱ्यात जाऊन बसली. विपुल शब्द संपत्ती, कवीची प्रतिभा, अभ्यासू वृत्ती, हातात घेतलेले काम जीव ओतून निष्ठापूर्वक करण्याची वृत्ती; त्याबरोबर विषयाची जाण, आकलन व एकरूपता, प्रसंगाचे भान या आठवले यांच्या गुणांनीच त्यांच्या हातून ही काव्यनिर्मिती झाली. सोन्याच्या बेढब लगडीचे रूपांतर सुवर्णकाराच्या हातांतील सुंदर चंद्रहारात होते, त्याप्रमाणे तर्कसिद्ध तत्त्वाचे रूपांतर कवीच्या अंत:करणातून बाहेर पडले म्हणजे हृदयंगम काव्य होते. दिव्याने दिवा लागतो.  सहजसुंदर, साधी व वास्तववादी कविता चटकन भावते. जीवनातील शाश्वत सत्याचा व सात्त्विक सौंदर्याचा अविष्कार वैश्विक सत्याचा होतो. त्यांची गीते जीवनाचा अर्थ व तत्त्वज्ञान अगदी सहजपणे सांगतात. चित्रपटातील प्रसंग विसरले गेले तरी त्या संदर्भाशिवाय त्या गीतांना अर्थ प्राप्त होतो.

‘प्रभात’चा ‘शेजारी’ हा चित्रपट हिंदू-मुस्लिम ऐक्यावरचा. हिंदू व मुस्लिम या दोन कुटुंबांची मैत्री व स्नेहभाव, गैरसमजाच्या वादळामुळे परस्परांना दुरावतात, संकटाचा सामना करताना पुन्हा एकत्र येतात. ‘सारे प्रवासी घडीचे, नांदू सुखे संगती’ या गीतात कवी शांताराम आठवले यांनी सामाजिक सलोख्याचे व सहजीवनाचे महत्त्व सांगितले आहे. कवी म्हणतो, ‘पाहु संगे सुखसोहळे, साहू संगे विजा वादळे, जीव संगे भाव संगे, प्राण देऊ संगती, प्रीती मैत्रीच्या पावन तीर्थी, न्हाऊ देऊ जिवा सुख शांती।।’ ‘रामशास्त्री’ या चित्रपटातील ‘दोन घडीचा डाव’ या गीतात व्यक्तिगत जीवनात पराजयाचे घावही हसत झेलण्याचा संदेश मिळतो.

प्रभातचे सामाजिक चित्रपट फार महत्त्वाचे होते. जीवन जगण्यासाठी प्रेमापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे तरुण पिढीला दाखवून त्यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम ज्या चित्रपटांनी केले त्यात, ‘कुंकू’, ‘माझा मुलगा’, ‘शेजारी’, ‘माणूस’ हे चित्रपट येतात. या चित्रपटातील गाणीही तशीच तोलामोलाची आहेत. ‘मन सुद्ध तुझं’, ‘मुकी बिचारी कुणी हाका’ या कुंकूमधील गीतांद्वारे झुंजार वृत्तीने जगण्याचा संदेश आठवले यांनी दिला आहे. प्रभातनंतर जे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले, त्या चित्रपटांमधूनही अशाच प्रकारचे गीतलेखन आठवले यांनी केले. ‘वहिनीच्या बांगड्या’मधील ‘तू नसती तर’ या गीताने ‘जीवन म्हणजे अथांग प्रीती’ हे उमगते. ‘भाग्यरेखा’ मधील देवाला केलेल्या प्रार्थनेत ‘देव खरा आधार’ असल्याचा निर्वाळा ते देतात. ‘शेवग्याच्या शेंगा’मधील देवाच्या प्रार्थनेत ‘देव मागेपुढे चोहीकडे’ आहे हे सांगतात. ‘देव प्रेमळ प्रेमळ, देव आरसा निर्मळ आहे’ हे समजावतात. ‘वहिनीच्या बांगड्या’ चित्रपटातील ‘रडू नको रे चिमण्या बाळा’ हे गीत (अंगाईगीत) मोठ्यांनाही ‘जो हसला तो अमृत प्याला’ ही जीवनदृष्टी देते. ‘संत तुकाराम’मधील ‘आधी बीज एकले’ हा अभंग तुकारामांचाच असे सगळ्यांना वाटले होते. अभ्यासकांनी तुकारायाच्या अभंग गाथेत तो शोधला, पण तो तेथे सापडला नाही; कारण त्याचे गीतकार होते आठवले! ‘कुंकू’मधील ‘भारतीसृष्टीचे सौंदर्य खेळे’ या गीतांद्वारे ते सर्व ऋतूंचे दर्शन घडवतात. ‘अहा भारत विराजे’ यामध्ये महाराष्ट्राच्या सणांचे वर्णन आहे. ‘सुभद्राहरण’मधील ‘वसंत ऋतू आला’ या गीतात वसंत ऋतूमधील बहारदार दृश्याचे मनोरम दर्शन घडवतात. ‘बेलभंडार’ या चित्रपटातील ‘नका बोलू असे दूर दूर बसून’, ‘वय माझं सोळा’, ‘भाग्यरेखा’मधील ‘अरे पाटलाच्या पोरा, जरा जपून जपून’ या गीतांवरून या कवीच्या लेखणीला लावणीचे वावडे नव्हते, हेही लक्षात येते. प्रभातच्या ‘माझा मुलगा’ या चित्रपटातील गीते जणू भावगीतेच आहेत. उदा. ‘पाहू रे किती वाट’, ‘उसळत तेज भरे गगनात’. ‘गोपाळकृष्ण’ हा चित्रपट ‘हासच नाचत जाऊ’, ‘भाग्यवती ही कपिला’ इत्यादी गाण्यांमुळेच लोकप्रिय झाला होता. ‘लखलख चंदेरी’ या ‘शेजारी’मधील गाण्याला तोडच नाही. ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटातील ‘आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी’ हे गाणे शेतकऱ्यांच्या जीवनाशी पुरेपूर संबंधित आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या तोंडून हे गाणे ऐकायला मिळते. ‘आई मला क्षमा कर’, ‘पडदा’, ‘संसार करायचाय मला’ हे चित्रपट प्रेक्षकांच्यासमोर आले नाहीत. परंतु त्यातील अनेक गीते-अंगाई गीते-ओव्या-प्रार्थनागीते-भावगीते ही प्रभातच्या कवीच्या मुशीतीलच आहेत. तीही जीवनासाठी सहज संदेश देतात. ‘स्वार्थ जेथे संपतो अन्‌ अर्थ जेथे आटतो, अमृताला जिंकणारा भाव तेथे भेटतो.’ शिखरावरती गेल्यावाचून कुठला साक्षात्कार? याचीही जाणीव कवीला आहे. एका भावगीतात ते सांगतात, ‘खरे प्रेम-हृदय यामध्ये स्वार्थाचा काटेरी पडदा आहे. जीवन आणि मुक्ती यामध्ये अज्ञानाचा काळा पडदा आहे.’

काव्यरूपी भेट

नवीन कविता करून आठवले आपल्या स्नेह्यांच्या भेटीला दिवाळीत जात असत. ती स्नेह्यांसाठी सुवर्ण दीपावली भेट असे. अनेकांनी त्या कविता अजूनही जपून ठेवल्या आहेत.

‘दिक्कालाची चौकट घालुनी अनंत अवकाशाला,

रम्य चित्रपट त्यांत देखिला सृष्टी म्हणती त्याला,

त्या चित्रपटाचे चर्मचक्षुंना रंग दिसावे म्हणुनी

तेज फाकले त्यास दिवाळी म्हणती जन अज्ञानी’

दिवाळीतील मातीची पणती पाहून कवीला भासते-

‘बाळरूप घेऊनी हासते विश्वात्म्याची अनंत प्रीती’

दीपावली म्हणजे, ‘अंधाराच्या भूमीवर होते तेजाचे शिंपण,

प्रकाशाची पिके शेती-ज्योती येती मोहरून

ज्योतीतून उमलती आनंदाचे हिरे मोती

तेजाच्या या ‘सुगी’लाच दीपावली म्हणतात. दीपावलीच्या समयी मिळणाऱ्या या सुश्वर भावनांमुळे अनेक मित्रांच्या मनातील ज्योती पाजळत असत. त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली बालगीतेही पुष्कळ आहेत. स्वत: रचलेली गीते म्हणत लहानमुलांना खेळवण्याचा शांताराम आठवले यांचा आवडता छंदच होता. ‘माणिकबाई माणिक पायलीची कणिक, कणकेच्या केल्या पुऱ्या, माणिकबाई आमच्या गोऱ्या गोऱ्या’ अशा प्रकारच्या गाण्यांनी त्या छोट्यांना ते रिझवत असत. पावसाची बरसात होते आणि आपले मन ताजेतवाने होते, मनाला हुरूप येतो, त्या प्रमाणे या प्रभात कवीच्या ‘लेखणीतून बरसलेल्या शब्दांनी मनाला ताजेपणा येतो, हुरूप येतो. ते शब्द मनाचा ठाव घेतात, मनावर बिंबतात. सहजसोप्या अर्थवाही शब्दांत खूप काही सांगून जातात.

प्रभातच्या मुशीत तयार झालेले बावनकशी सोने म्हणजे शांताराम आठवले. त्यांनी चरितार्थाचे साधन म्हणून चित्रपट व्यवसाय स्वीकारला नव्हता. मनोरंजनामधून प्रेक्षकांच्या मनाला, हृदयाला स्पर्श करायचा आणि त्यांना आनंद द्यायचा, हेच ध्येय त्यांच्या समोर होते. प्रत्येक कलाकृतीला विशिष्ट दर्जा असलाच पाहिजे हा त्यांचा कटाक्ष असे. वेळप्रसंगी तडजोड करणे त्यांना मान्य नसे- पैसा, मानमरातब याचा त्यांनी कधीच विचार केला नाही. प्रसिद्धीसाठी काहीही करणे त्यांना मान्यच नव्हते. ते प्रसिद्धपराङ्‌मुखही होते. साधी रहाणी, सकारात्मक दृष्टिकोन, कष्टाळू स्वभाव व चिकाटी या गुणांमुळे ते खंबीरपणे उभे राहू शकले. दर्जेदार कलाकृती देऊ शकले.

आठवले यांच्या पत्नी सुमती-त्यांचे प्रेरणास्थान होत्या. त्यांनी त्यांच्या जीवनात योग्य साथ केली. चित्रपट व्यवसायातील चढउतारामुळे संसारात अनेक ताण-तणाव निर्माण होत असत. त्यावेळी त्यांच्या पत्नीने-आमच्या आईने- तात्यांना (आठवले यांना सर्वच जण ‘तात्या’म्हणत.) धीर देऊन साथ केली. कवी मनाला फुंकर घातली, आधार दिला. त्यांचा उत्साह कधीच मावळू दिला नाही. आमचे आई-तात्या कधीही निराश झालेले, खचून गेलेले आम्ही भावंडांनी कधीच पाहिले नाही. जीवनातील झंझावाताची झळ तात्याच्या काव्याला पोचू नये याची सतत काळजी घेतली. कवीमनाला आकाशात उडायला आईच्या प्रेरणेने बळ मिळत असे. तात्यांच्या कीर्तीचा डोलारा आईच्या व्यवहारी, करारी, प्रेमळ,घट्ट पायावरच उभा राहू शकला. आकाशात भरारी मारायची पण पुन्हा पाय जमिनीवर आणायचे, यशाने हुरळून जायचे नाही आणि अपयशाने खचूनही जायचे नाही. कामानिमित्ताने तात्या अनेक महिने पुण्याबाहेर असत. त्यावेळी संसाराचा गाडा आईने विलक्षण धैर्याने पुढे नेला. नेहमीच हसतमुखाने, चहुबाजूने चालून आलेल्या दु:खावर, संकटावर मात करून धीरोदात्तपणाने तिने आमचे संगोपन केले. आमच्या घरातील वातावरण खेळीमेळीचे, हसरे, मनमोकळे होते. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी यांमुळे आई-तात्यांनी अनेक स्नेहीसोबत्यांना आपलेसे केले होते. घरातील पुस्तके आणि ही ‘आपली’ माणसे हेच दागदागिने होते. आई-तात्या सर्वांचेच दीपस्तंभ, आधार, मार्गदर्शक. ‘सुखदु:खेसमेकृत्वा’ हा मंत्र उराशी बाळगला तोच वसा आम्ही भावंडांनी आमच्या जीवनात आनंदाने घेतला.

ग्रंथसंपदा

पुढे काही वर्षांनी चित्रपट क्षेत्रातील या बदलत्या परिस्थितीत तरल मनाच्या या मनस्वी गीतकाराची घुसमट होऊ लागली. गीतलेखनासह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन पटकथालेखनही त्यांनी केले. तरी या माध्यमाचा हवा तसा उपयोग आता आपण करू शकणार नाही, या प्रखर जाणिवेतूनच चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ वावरलेल्या या माणसाने निवृत्ती पत्करून अध्यात्म, गूढविद्या इत्यादी विषयांचे आपले आवडते अध्ययन, चिंतन, मनन, संशोधन सुरू केले. व्याख्याने,प्रवचनांचे आणि संशोधनात्मक लेखनाचे नवे क्षेत्र बुद्धिपुरस्सर आवडीने निवडले. ‘नाडी ग्रंथ- एक अभ्यास’, ‘कुंडलिनीजगदंबा’, ‘ज्ञानदेवीची आराधना’, ‘बकुळ-फुले’, ‘साधा विषय मोठा आशय’ यासारख्या पुस्तकांचे लेखन केले. विषय थोडे गूढ, अनाकलनीय, कठीण वाटले तरी पुस्तक वाचताना फार चाचपडावे लागत नाही. ‘हाडाचा कवी’ असलेला हा लेखक आपली कलाकृती सहज सोप्या भाषेत मांडतो. ही पुस्तके कंटाळवाणी होत नाहीत. अशा प्रकारचे लेखन करताना कोठेही मोठेपणाचा आविर्भाव मुळीच नाही. उलट आपली पुस्तके वाचकांना मार्गदर्शक ठरतील असाच प्रयत्न आहे, हे लेखन संशोधक, पंडितांच्या भूमिकेतून नसून जिज्ञासू विद्यार्थ्याच्या भूमिकेतून आहे. सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा पद्धतीने सारे विवेचन करण्याचा त्यांचा कटाक्ष होता.

आजच्या वेग आणि भोगमय अणुयुगात, साऱ्या विश्वात जीवनमूल्यांचा प्रचंड संघर्ष चालू आहे. भारतीय संस्कृतीची मूळ बैठक आणि तिच्यातील चिरंतन मूल्ये संभाव्य विनाशातून विश्वाला वाचवू शकतील, यावर आठवले यांचा विश्वास होता. भारतीय संस्कृती ही ‘सुखाची लिपी’ आहे असे त्यांना वाटे. ‘सुखाची लिपी’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक आचारविचारामागे जीवनकल्याणाची, समृद्धीची बैठक आहेच, पण त्या प्रत्येक आचाराविचारामागे विज्ञानाची निश्चित बैठक आहे अशी आठवले यांची खात्री होती. ओंकाराचे महत्त्व, ज्ञानेश्वरीचे महत्त्व, भारतीय संस्कृतीचे महत्त्व त्यांनी आपल्या लेखनातून, व्याख्यानांतून, प्रवचनांमधून सतत व्यक्त केले. सहज,सोप्या पण रसपूर्ण वाणीने लोकांना पटवले. त्यांच्या व्माख्यान-प्रवचनांची संख्या पाचशे-सहाशेच्या वर गेली होती. सध्याचा काळ विपरीत आहे असे म्हटले जाते, तरीही आठवले यांना प्रवचने-व्याख्याने देण्यासाठी भ्रमण करावे लागले. त्यावेळी मानवतेच्या स्नेहममतेचे, सौजन्यपूर्णतेचे व मांगल्याचे दर्शन घडले असे ते नेहमीच सांगत.

आठवले यांची आणखी एक आगळीवेगळी कलाकृती आहे- ‘प्रभातकाल’ हे पुस्तक. हा प्रभातचा इतिहासच आहे. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला, अनुभवलेला. स्पष्टपणे-प्रांजळपणे,सत्य न लपवता केलेले लिखाण आहे. रसिकांनी प्रत्यक्ष वाचूनच त्याचा अनुभव निश्चितच घ्यावा.

अशी व्याख्याने-प्रवचने करण्यात मग्न असतानाच अचानक आठवले यांना कर्करोगाने गाठले. त्यांच्या जीवनाचे बकुळपुष्प कोमेजले. तो दिवस होता 2 मे 1975. या बकुळफुलाचा सुगंध मात्र अजूनही दरवळतो आहे.

या असामान्य थोर व्यक्तीचे 2010 ते 2011 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे बकुळपुष्प उमलले होते 21 जानेवारी 1910 रोजी. जन्मशताब्दी निमित्ताने त्यांनी केलेल्या कामाला उजाळा देण्याचा हा प्रयत्न आहे. पुढच्या पिढीलाही त्यांचे मोठेपण लक्षात यावे आणि त्यांच्या पिढीतील वाचकांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळावा हीच इच्छा आहे. आठवले कुटुंबीयांनी ‘याला जीवन ऐसे नाव’ या नावाचा एक कार्यक्रम नुकताच सादर केला. या कार्यक्रमातून मिळणारा पुन:प्रत्ययाचा आनंद रसिकांना सतत मिळत राहावा, नवीन पिढीलाही संचिताचा लाभ होत राहावा यासाठी या कार्मक्रमाची व्ही.सी.डी. तयार केली आहे.

या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाने मराठी चित्रपटसृष्टी व मराठीमाणसांना खूप अलौकिक असेच भरभरून दिले. त्यांच्या सहवासात समईसारखा शांत प्रकाश, चंदनासारखा मंद मोहक सुगंध व आनंद मिळत असे!

Tags: प्रभातचा इतिहास प्रभातकाल अध्यात्मिक पुस्तके पुस्तके उत्तम चित्रपट गीते उत्तम कवी गीतकार काव्य प्रतिभासंपन्न प्रभात गीतलेखक प्रभात कंपनी मराठी चित्रपट मंगला काकनूरकर शांताराम आठवले Daughter Writes  Mangala Kaknurkar Famous songs in Prabhat Picturs Marathi film songs Prabhat Cine Company Marathi Lyricist Shantaram Athwale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके