डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जनमानसात धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व रुजायच्या प्रक्रियेला क्रांतिपासूनच सुरुवात झाली. अनेक सामाजिक संस्थांच्या पाळामुळांपर्यंत ते तत्त्व झिरपत जाऊ लागले. सन 1881 मध्ये ज्युल फेरीने (Jules Ferry) केलेल्या कायद्यामुळे, शिक्षणक्षेत्रावर असलेल्या धर्मसत्तेच्या दबावाला आळा बसला. सन 1905च्या कायद्यानंतर तर फ्रेंच जनता या तत्त्वाची फार निष्ठेने जपणूक करू लागली.

फ्रान्समध्ये धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व लागू करण्यात आले त्याला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत देशातील राजसत्ता आणि कॅथॉलिक चर्चची धर्मसत्ता यांची फारकत करणारा कायदा फ्रान्समध्ये सन 1905 मध्ये अमलात आला. त्या घटनेची शताब्दी फ्रान्समध्ये यावर्षी साजरी होत आहे.

फ्रान्समधील 'राज्यशास्त्र व नीतीशास्त्र अकादमी' तर्फे या सोहळ्याचे आयोजन होत आहे. अनेक चर्चासत्रे आयोजित केली असून विविध मतप्रवाहांचे प्रतिनिधी त्यात आपले विचार मांडत आहेत. इंटरनेटवर एक खास वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. राजसत्ता व धर्मसत्ता यांचे प्राचीन काळापासून ते आजतागायत घडत गेलेले आपसातले नातेसंबंध, आम समाजाला कळावेत या हेतूने एका अतिशय अभ्यासपूर्ण ग्रंथाची निर्मिती करण्यात येत आहे.

फ्रान्समधील समाजवादी पक्षाचा एक नेता आरीस्तीद ब्रिआँ (Aristide Briand) याने 9 डिसेंबर 1905 रोजी या कायद्याचे विधेयक मांडले आणि शतकानुशतके चालत आलेल्या सत्तासंघर्षाला पायबंद घातला.

मध्ययुगीन काळात फ्रान्समध्ये कॅथॉलिक चर्चचा जबरदस्त पगडा होता, तो केवळ तत्कालीन राजसत्ताधाऱ्यांवरच नव्हे तर आम जनतेच्या विचारसरणीवर, नीतीसंकेतांवर व कलानिर्मितीवरही! त्यानंतर 16व्या शतकापासून मानवतावादी विचारांच्या पुनरुज्जीवनाचे वारे वाहू लागले. 18व्या शतकात [ siecle de Lumieres = प्रकाशमय शतक] मानवी संबंधांना नवे वळण लावणाऱ्या तत्त्वज्ञानाचा फ्रान्समध्ये उदय झाला आणि त्याबरोबर राज्यक्रांतीचे निशाण फडफडले आणि त्यापाठोपाठच समाजमनात एक इच्छा बळावू लागली, ती म्हणजे राजकारण, ज्ञानसाधना, व्यक्तिगत जीवन या सर्व क्षेत्रांत धर्मसत्तेचे जे वर्चस्व बळावले होते त्याला आळा घालण्याची!

इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे सन 1789 या फ्रेंच राज्यक्रांतीच्या वर्षापासून ते 20व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत कॅथॉलिक चर्चने फ्रान्सच्या गणतांत्रिक राजसत्तेला नेहमीच कडाडून विरोध केला होता. क्रांतिकाळात 'मानवी व नागरी हक्कांचा जाहीरनामा फ्रान्समध्ये घोषित झाला त्यातील 10वे कलम असे होते - "व्यक्तिगत विचार वा मते [धार्मिक वा अन्य] बाळगायला व व्यक्त करायला कोणीही संकोच करू नये, केवळ एवढीच खबरदारी घ्यावी की त्या अभिव्यक्तीमुळे, कायद्यावर आधारलेल्या सार्वजनिक सुव्यवस्थेला धका पोचणार नाही."

याप्रमाणे जनमानसात धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व रुजायच्या प्रक्रियेला क्रांतिपासूनच सुरुवात झाली. अनेक सामाजिक संस्थांच्या पाळामुळांपर्यंत ते तत्त्व झिरपत जाऊ लागले. सन 1881 मध्ये ज्युल फेरीने (Jules Ferry) केलेल्या कायद्यामुळे, शिक्षणक्षेत्रावर असलेल्या धर्मसत्तेच्या दबावाला आळा बसला. सन 1905 च्या कायद्यानंतर तर फ्रेंच जनता या तत्त्वाची फार निष्ठेने जपणूक करू लागली.

स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व' या मूल्यत्रयीवर अधिष्ठित असे समाजजीवन फ्रान्समध्ये उदयाला येत होते. धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाची त्यात भर पडल्यानंतर सर्वधर्मसमभाव जोपासला जाऊ लागला. तसेच प्रत्येक व्यक्तीला आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर 'स्वतंत्र’पणे करण्याची प्रेरणाही मिळत गेली.

पुढील काळात, सन 1946 व सन 1958 मध्ये अनुक्रमे जेव्हा 4थ्या व 5व्या गणतंत्राची स्थापना फ्रान्समध्ये झाली तेव्हा ही त्यांच्या संविधानामध्ये असे कलम होते -"हे गणतंत्र सर्व नागरिकांना कायद्यासमोर समान वागणूक देण्यासाठी वचनबद्ध आहे. नागरिकांचे वांशिक मूळ, त्यांचा धर्म व त्यांचा मूळदेश या मुद्यांवरून त्यांच्यात भेदभाव केला जाणार नाही. हे गणतंत्र सर्व धार्मिक भावनांचा आदर करते."

फ्रान्समधील धर्मनिरपेक्षतेचा मुख्य रोख होता तो न्यायक्षेत्रातील समतेवर! कोणत्याही व्यक्तीचे श्रद्धाळू असणे, अश्रद्ध, नास्तिक वा अधार्मिक असणे याला कायद्याच्या दृष्टीने काही महत्त्व नाही. फ्रान्समधील राजपद्धती ही धर्मविरोधी आहे, असा जो सार्वत्रिक समज आहे ते खरे नसून फ्रान्समध्ये सर्व नागरिकांना त्यांचा जसा कल असेल त्याप्रमाणे कोणतीही धार्मिक भावना बाळगायची पूर्ण मुभा आहे. 

या धर्मनिरपेक्षतेत, धार्मिक वैविध्याचे आश्वासन आहे. सन 1905च्या कायातील 2रे कलम असे आहे - "कोणत्याही संप्रदायाची शासनाकडून दखल घेतली जाणार नाही वा त्याला आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही. शासनाच्या दृष्टीने सर्व धर्म समान आहेत. शासनाचा अधिकृत धर्म कोणताच नाही व शासन धर्मांच्या परस्परसंबंधांमध्ये मध्यस्थी करणार नाही वा कुणाही एकाला विशेष आश्रय देणार नाही. शासन नेहमी तटस्थ भूमिकेत राहणार. धार्मिक संस्थांना शासनाच्या कार्यपद्धतीवर मत व्यक्त करण्याचा अधिकार राहील. मात्र, कायद्याच्या अंमलबजावणीत धार्मिक मुद्दे उभे करून, ढवळाढवळ करण्याचा अधिकार त्यांना असणार नाही.' 

ज्या देशाने अनेक शतकांपासून देव आणि धर्माच्या नावाखाली अनेक युद्धे पाहिली होती व अपार मनुष्यहानी सोसली होती, त्या देशात या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाने 'शांततापूर्व सहजीवना'चा एक नवीन लोकशाही मार्ग दाखवला होता. प्रत्येक नागरिकाला एका मूलभूत संरक्षणाची ग्वाही मिळाली होती. स्वतःच्या व्यक्तिगत धार्मिक भावना जोपासण्याचे स्वातंत्र्य व परका धर्म इच्छेविरुद्ध लादला न जाण्याची हमी त्याला मिळाली होती. जाती, जमाती, संप्रदाय यांच्या पार्श्वभूमीवर आधारित असे जे अस्तित्व व्यक्तीला समाजात असते आणि ज्यामुळे व्यक्ती- व्यक्तीत दुरावा निर्माण होतो ज्याला पुढील काळात "Communautarisme = जमातवाद" असे नाव मिळाले.] अशा जमातवादाला आळा घालण्याचे काम या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाने होईल असे 1905मध्ये फ्रेंच विधिकर्त्यांना वाटले असावे.

व्यक्तीचे समाजातील स्थान, हे त्याच्या विशिष्ट संप्रदायाशी असलेल्या बांधिलकीशी सापेक्ष न राहता, स्वतंत्रपणे निश्चित होऊ शकत होते. सार्वजनिक शाळांतून, 'समता, स्वातंत्र्य व बंधुत्व' या मानवतावादी मूल्यांची शिकवण दिली जात होती व व्यक्तिगत सारासार विचारशक्ती विकसित करण्यावर भर दिला जात होता.

प्रसिद्ध तत्त्वज्ञ ऑन्री पेना-रुईझ (Henri Pena-Ruiz) यांनी म्हटल्याप्रमाणे धर्मनिरपेक्षतेचे हे तत्व वैश्विक स्तरावरचे जीवनमूल्य होते, कारण प्रत्येक व्यक्तिमात्राचे हित त्यात दडले होते.

[क्रमशः]

Tags: व्यक्तीची प्रतिष्ठा बंधुता समता स्वातंत्र्य फ्रेंच राज्यक्रांती फ्रांस Equality Fraternity Freedom Liberty Human Dignity French Revolution French Secularism France weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माणिक कोतवाल
vijayykotwal@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके