डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

समाजपरिवर्तनाची चळवळ, वाचन-लेखन, व्याख्यान-अध्यापन ही प्रा.अरुण कांबळे यांच्या आवडीची क्षेत्रं होती. फार मन:पूर्वक ते या कामात स्वत:ला झोकून देत. विषयातील सूक्ष्म संदर्भ आणि भिन्न-भिन्न बाजू यांचा त्यांनी बारकाईने विचार केलेला असे. त्यांचा ‘संस्कृत’चा व्यासंगही दांडगा होता,‘रामायणातील संस्कृतिसंघर्ष’ या त्यांच्या पुस्तकात याचे दाखले मिळतात. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारसूत्रांचा प्रगल्भतेने अन्वयार्थ लावला होता आणि वर्तमान व्यवस्थेसंबंधीचे त्यांचे निरीक्षण मार्मिक होते. आत्मशोध आणि आत्मटीका हा त्यांच्यातील संवेदनशील कवी-कार्यकर्त्याचा स्थायीभाव होता.

प्रा. अरुण कांबळे गेल्याची धक्कादाक बातमी आली आणि माझ्यासमोर आठवणींचा पट उलगडत गेला. 1982-83 मध्ये उल्हासनगर येथे ‘अस्मितादर्श साहित्य संमेलन’ (आंबेडकरी विचारांचे संशोधक वसंत मून यांच्या अध्यक्षतेखाली) भरले होते. त्यावेळी तेथील एका दलित युवकाने संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्याचा जाहीर सत्कार त्या दिवशी संध्याकाळी एका ठिकाणी होता. त्या कार्यक्रमात प्रा.कांबळे यांचे भाषण ऐकण्याचा योग आला. त्यांनी केलेल्या आंतरजातीय विवाहाचे थरारक वर्णन ‘पूर्वा’ मासिकात वाचले होते. दया पवार यांनी आपल्या ‘चावडी’ पुस्तकात अंगातील शर्ट काढून गोल गोल भिरकावणारा मोर्चातील तरुण पँथर अरुण कांबळे यांचे चित्रण कोणत्या तरी संदर्भात केले आहे, ते आठवले. ‘रामायणातील संस्कृतिसंघर्ष’ या पुस्तकानिमित्ताने त्यांनी केलेला न्यायालयीन संघर्ष आणि त्याकामी त्यांचे मित्र ॲड. नितीन प्रधान यांनी केलेली मदत आठवली. माधव गडकरींनी ‘लोकसत्ता’तील ‘चौफेर’ सदरात बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘रिडल्स इन हिंदुइझम’वर केलेली टीका आणि त्या टिकेचा त्याच वृत्तपत्रात तातडीने तर्कशुद्ध प्रतिवाद केलेला प्रा.कांबळेंचा लेख डोळ्यांपुढे तरळून गेला. बार्शीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रा. गं. बा. सरदार अध्यक्ष असताना मराठवाडा विद्यापीठ नामांतरवाद्यांचा मोर्चा घेऊन गेलेल्या प्रा. कांबळे यांचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले छायाचित्र आठवले. अशा कितीतरी आठवणी.

मी पुणे विद्यापीठात आल्यानंतर प्रा.कांबळे यांच्याशी घट्ट मैत्री झाली. त्याआधी मी फैजपूरला असताना आमचा संपर्क कमी होता. विद्यापीठीय उपक्रमांमध्ये आम्हा उभयतांचा सहभाग असल्याने संपर्क वाढला. एव्हाना ते मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात चांगलेच रूळले होते. मराठी विभागाचे ते प्रमुख झाले, त्यावेळी त्यांनी आवर्जून फोन करून वृत्तांत कळवला आणि विभागासाठी काय काय करायचे आहे, त्याचे नियोजनही सांगितले. फोनवर बराच वेळ आम्ही बोललो. त्या बोलण्यातील एक वाक्य आजही माझ्या लक्षात आहे. ते म्हणाले, ‘‘आपणविद्यापीठांमध्ये नोकरीला आहोत म्हणून मित्र नाही आहोत, तर चळवळीमधून आपण आलेलो असून तो आपल्या मैत्रीचा खरा धागा आहे.’’ मित्राकडे आणि मैत्रीकडे व्यवहारापलीकडे पाहणारी प्रा.कांबळेंची ही दृष्टी मला खूप मोलाची वाटली.

समाज परिवर्तनाची चळवळ, वाचन, लेखन, व्याख्यान, अध्यापन ही त्यांची अतिशय आवडीची क्षेत्रं होती. फार मन:पूर्वक ते या कार्यात स्वत:ला झोकून देत असत. अनौपचारिक चर्चेतही त्यांच्याकडून अनेक संदर्भ ऐकायला मिळत. व्याख्यानात एखादा विषय अतिशय मुद्देसूदपणे आणि विस्ताराने ते खुलवत नेत. विषयातील सूक्ष्म संदर्भ आणि भिन्न भिन्न बाजू यांचा त्यांनी बारकाईने विचार केलेला असे. स्पष्ट उच्चार, दमदार शब्दफेक, आवेश आणि आक्रमकतेनुसार बदलणारी देहबोली, व्याख्यान ऐन रंगात आले की टाचा किंचित उंचावून बोलण्याची त्यांची धाटणी, नाकाच्या शेंड्यावर ठेवलेला चष्मा. चष्म्याच्या काचेतून आणि काचेबाहेरून वेध घेणारी नजर, योग्य वेळी अनुषंगाने घेतलेला पॉज हे सर्व पाहण्यासारखे असे. म्हणजे प्रा.कांबळे यांचे व्याख्यान श्रवणीय तर असायचे, पण प्रेक्षणीय देखील असायचे. प्रा.कांबळे टापटीपपणे राहत. राहणीमान प्रथमदर्शनी नजरेत भरे. मनिला वा पँट, झब्बा-पायजमा असला तरी व्यवस्थित इस्त्री केलेले कपडे, नीट बसवलेले केस, खिशाला पेन. चालण्यात आणि बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास.

प्रा.कांबळे यांचा संस्कृतचा व्यासंग दांडगा होता. ‘रामायणातील संस्कृतिसंघर्ष’ या त्यांच्या पुस्तकात याचे दाखले   मिळतात. आग्रही परंतु तर्कशुद्ध, संदर्भमुक्त लेखन करणारे प्रा.कांबळे वैचारिक स्पष्टतेच्या संदर्भात अतिशय काटेकोर होते. हे जसे त्यांच्या व्याख्यानात दिसे, तसे लेखनातूनही प्रकट होत असे.दि. 23 ते 25 यार्च 2002 या दरम्यान कल्याण येथे बुद्ध-फुले-आंबेडकर जागतिक साहित्य संमेलन प्रा.कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. त्यावेळी त्यांनी केलेले भाषण छोटेखानी असले तरी अतिशय महत्त्वाचे आहे. परप्रांतातील दलितसाहित्य चळवळीसंबंधी त्यांनी अनेक अज्ञात संदर्भ त्यात उद्‌धृत केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारप्रवाहांचा आणि चळवळीचा अनेक अंगाने त्यांनी बारकाईने अभ्यास केला होता, हे ते भाषण वाचले की लक्षात येते. त्या भाषणात एका ठिकाणी त्यांनी म्हटले आहे, ‘‘डॉ. आंबेडकरांचा लढा दलित सवर्ण समतावाद्यांचा समतेच्या प्राप्तीसाठी सुरू झालेला धर्मसंगर होता. कोणत्याही प्रकारची संकुचितता त्यात नव्हती. म्हणूनच मी आपल्याला असे आवाहन करतो की, सर्व जाती-धर्मातील समतावाद्यांना समाविष्ट करून ही चळवळ पुढे गेली पाहिजे.किंबहुना तरच ती खऱ्या अर्थाने पुढे जाईल, याचे भान सर्वांनी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. दलित साहित्याच्या क्षेत्रात हे भान ठेवले गेले आहे असे दिसते, पण राजकीय-सामाजिक क्षेत्रात त्याचे प्रत्यंतर दिसत नाही.’’ प्रा.कांबळे यांनी बाबासाहेबांच्या विचारसूत्राचा किती प्रगल्भतेने अन्वयार्थ लावला होता आणि सद्य:स्थितीतील वर्तमान व्यवस्थेसंबंधीचे त्यांचे किती मार्मिक निरीक्षण होते, ते त्यांच्या वरील विवेचनावरून लक्षात येते. ‘चळवळीचे दिवस’ हा त्यांचा प्रदीर्घ लेख ‘अस्मितादर्श’मध्ये प्रसिद्ध झाला होता. पुढे त्याची पुस्तिका प्रसिद्ध झाली. त्यात त्यांनी नामांतर आंदोलनाच्या काळातील आपल्या आठवणी नोंदविल्या आहेत. ‘अरुण कृष्णाजी कांबळे’ या स्वत:च्याच नावाने त्यांनी आपला कवितासंग्रह प्रकाशित केला. कवितासंग्रहाच्या शीर्षकाची प्रा.कांबळे यांची कल्पना अफलातून होती. तो संग्रह छोटेखानी आहे, पण त्या कवितेत विद्रोह ठासून भरलेला आहे. त्यातील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या कवितेत त्यांनी बाबासाहेबांशी संवाद साधला आहे.

‘‘एकाचा बाबासाहेब

दुसऱ्याच्या बाबासाहेबांचे पाय ओढताना,

दुसऱ्याचा बाबासाहेब

तिसऱ्याच्या बाबासाहेबांचे पाय ओढताना,

तिसऱ्याचा बाबासाहेब

चवथ्याच्या बाबासाहेबांचे पाय ओढताना,

आणि सगळेच मिळून बाबासाहेब

तुमचे हात-पाय-डोळे-कान-नाक ओढताना,

तुम्हाला कसे होते हो?’’

असा उपरोधिक सवाल कवीने बाबासाहेबांना विचारला आहे आणि बाबासाहेबांच्या तथाकथित निष्ठावान अनुयामांना परखडपणे धारेवर धरले आहे. हा आत्मशोध आणि आत्मटीका, प्रा.कांबळे यांच्यासारख्या संवेदनाशील कवी-कार्मकर्त्याच्या मनाचा स्थायीभाव होता.

प्रा.कांबळे यांनी राष्ट्रीय राजकारणात जनता दलाच्या राजवटीत पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्यासोबत ठळक सहभाग नोंदवला होता. जनता दलाचे राष्ट्रीय चिटणीस, जनता दल पार्लमेंटरी बोर्ड सदस्य, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि बिहार राज्याचे प्रभारी म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले. भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष या नात्याने विविध आंदोलनांचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत काम करणारे दुय्यम-तिय्यम फळीतील कार्यकर्ते पुढे मंत्री झाले, खासदार झाले. अलीकडच्या काही वर्षांत मात्र प्रा.कांबळे सार्वजनिक जीवनात आणि साहित्यक्षेत्रातही फारसे दिसत नव्हते. विद्यापीठातील नोकरीतही अनुषंगाने जी पदे मिळायला हवी होती, ती त्यांना मिळू शकली नाहीत. याचे शल्य त्यांच्या मनात असावे असे त्यांना भेटल्यावर जाणवत असे. पुणे विद्यापीठातील एका अध्यासनावर त्यांच्या नियुक्तीची शक्यता बळावली होती, पण त्यातही अनेक तांत्रिक अडचणी उद्‌भवल्या आणि मुंबई विद्यापीठातच राहणे त्यांनी पसंत केले. काही कामानिमित्त पुणे विद्यापीठात आल्यावर मात्र ते मराठी विभागात आवर्जून येत. माझ्या ऑफिसबाहेर ‘आत येण्यास परवानगीची गरज नाही’ अशी पाटी लावली आहे. ती वाचून, एका हाताने दार ढकलून आणि दारातच उभे राहून हसत म्हणत, ‘‘परवानगीची गरज नसली तरी एटिकेट्‌सचा भाग म्हणून विचारतो, आत येऊ का?’’ मग ऑफिसचा माहोल बदलून जाई. एक चैतन्य निर्माण होई. विभागातील सर्व प्राध्यापकांना भेटत. गप्पा, चर्चेमध्ये रंगून जात. त्यावेळी माझ्या कार्यालयात जे कोणी लेखक, कार्यकर्ते, विद्यार्थी बसलेले असत त्यांच्याशी ओळख करून दिल्यावर महाराष्ट्राच्या त्या त्या भागातून आलेल्या या लोकांना तेथील जुने राजकीय-सामाजिक संदर्भ रंगवून सांगत. घटना-प्रसंग वर्णन करताना टाळी मिळवण्यासाठी हात पुढे करीत, ही मात्र त्यांची खास लकब होती. या निमित्ताने समोरची व्यक्ती बहुश्रुत होत असे आणि कांबळे सरांची अनपेक्षित भेट झाली म्हणून आनंदूनही जात असे.

दि. 20 डिसेंबर रोजी संध्याकाळी ‘अरुण कांबळे इज नो मोअर’ असा मित्राचा एसएमएस आला त्यावेळी मी घरातील माझ्या छोट्या ग्रंथालयातील पुस्तकांची मांडामांड करीत होतो. आदल्या दिवशी एका दूरचित्रवाणी वाहिनीने दिलेले प्रा.कांबळे हैदराबादमधून बेपत्ता असे वृत्त मी पाहिले होते. काही मित्रांशी फोनवर बोलून माहिती घेतली होती. काळजी वाटत होती आणि अचानक एसएमएसचा मजकूर पाहून अस्वस्थ झालो. लगेच टी.व्ही. लावला. कांबळे सर गेल्याचे सविस्तर वृत्तांकन सुरू होते. सर्वच वृत्तांत क्लेशकारक होता. नंतर रॅकमध्ये पुस्तकं लावताना योगायोगाने कांबळे सरांची दोन-तीन पुस्तकं हाती लागली. पहिल्या पानावर पुस्तकभेटीचा मजकूर आणि दिनांकासह स्वाक्षरी. मी त्या स्वाक्षरीवरून हळूवार बोटं फिरवली...

Tags:   प्रा. मनोहर जाधव लेखक चळवळ दलित पँथर   अरुण कृष्णाजी कांबळे तर्कशुद्ध लिखाण प्राध्यापक   पँथर कार्यकर्ता आंबेडकरी विचार प्रा. अरुण कांबळे Poet Writer Ambedkar activist Arun Krushnaji Kamble Proffesor Dalit Pather Prof. Arun Kamble weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मनोहर जाधव,  पुणे
manohar2013@gmail.com

तीन दशके सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक राहिलेले मनोहर जाधव आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख आहेत, त्यांनी कविता व समीक्षा लेखन केले आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके