तीन दशकांपूर्वीच्या एका प्रसंगातून उद्भवलेला संघर्ष...
निर्धार...
प्रवाहाच्या विरुध्द दिशेने
मी पोहत निघालो
तेव्हा काठावर नेहमीच उभे राहणाऱ्यांनी
एकच गिल्ला केला,
यथेच्छ टिंगलटवाळीही केली
लाटांच्या तडाख्यात मला गुदमरताना पाहून
त्यांनी परस्परांना अलिंगने दिली आणि
मी बुडणारच अशी भाकितेही वर्तवली.
अपेक्षित टप्पा नजरेत आल्यावर
मी सहज मागे वळून पाहिले
तर अनेक कोवळे हात
पुढे सरसावून पाणी कापताना दिसले.
- मनोहर जाधव
1998-99 मध्ये केव्हातरी, कोणत्या तरी वृत्तपत्रात ‘निर्धार’ या शीर्षकाची कविता नजरेला पडली आणि ती इतकी आवडली की मी तिचे कात्रण करून ठेवले. कॉलेजमध्ये, होस्टेलवर मित्रांशी राजकीय-सामाजिक विषयांवर चर्चा/वाद-संवाद करताना मी त्या कवितेचा इतक्या वेळा वापर केला की माझ्या सर्व मित्रांना व ओळखीच्या अनेक लोकांना ती कविता माहीत झाली होती. पण ती कविता लिहिणारे मनोहर जाधव कोण, कुठले, काय करतात हे मला 2006 पर्यंत माहीत नव्हते. (दरम्यानच्या काळात त्यांचा ‘कधी कधी’ हा एकमेव काव्यसंग्रह मिळाला होता, त्यात ती कविता होती.) त्यानंतर कळले, ते मनोहर जाधव पुणे विद्यापीठातील मराठी विभागात प्राध्यापक आहेत.
त्यामुळे 2007 च्या साधना दिवाळी अंकासाठी कविता मागवणारे पत्र त्यांनाही पाठवले. त्यांची कविता आली, छापली, पण पुढील वर्षभरही त्यांची ओळख करून घ्यायचे राहूनच गेले. मागील तीन वर्षांत पुणे विद्यापीठातील मराठी विभागाच्या काही विद्यार्थ्यांशी अधूनमधून संवाद व्हायचा, तेव्हा मी जाधव सरांची चौकशी करायचो आणि त्या कवितेविषयी सांगायचो. त्यावेळी लक्षात यायचे, जाधव सरांविषयी त्यांना वाटत असलेल्या आदरात वाढ झालीय आणि ती कविता मला पाठ आहे याचे त्यांना आश्चर्य वाटलेय. गेल्या दोन वर्षांत जाधव सरांशी चांगला परिचय झाला, अधूनमधून भेटीगाठीही झाल्या, पण निवांत गप्पा झाल्या नाहीत. मात्र गेल्या 14 सप्टेंबरला लोणंद (जि. सातारा) येथे होणाऱ्या ‘मराठी भाषेचे उपयोजन व सर्जन’ या विषयावरील परिसंवादात ते अध्यक्ष आणि मी (चारपैकी) एक वक्ता असल्याने, दोघांना एकत्र प्रवास करण्याची संधी मिळाली. गाडीत दोघेच होतो, त्यामुळे लोणंदपर्यंतच्या प्रवासात अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा झाल्या.
लोणंदला उतरताना मी विचारले, ‘सर, त्या निर्धार कवितेची बॅकग्राऊंड काय आहे हो?’ जाधव सर क्षणभर चमकले आणि म्हणाले, ‘फारच डेंजर बॅकग्राऊंड आहे, जाताना सांगतो.’ परतीच्या प्रवासात अडीच तास त्यांनी मला जे काही सांगितलं ती त्या कवितेची पार्श्वभूमी होती. प्रवास संपत असताना ते प्रकरण संपलं तेव्हा मी म्हणालो, ‘‘सर, आता तुम्ही हे जे सांगितलंत ना, ते जसंच्या तसं साधना दिवाळी अंकासाठी लिहा. आणि आता तुम्ही म्हणालात ती आत्मसन्मानाची लढाई होती, तर त्या लेखाचं शीर्षक ‘आत्मसन्मानाची लढाई’ असं करा.’’ जाधव सरांनी आनंदाने होकार दिला, मात्र चार दिवस, दोन दिवस असे करत महिना उलटला. नंतर सर म्हणाले, ‘मी आता आठ दिवस विद्यापीठाच्या कामासाठी मॉरिशसला चाललोय, आल्यावर लिहितो.’ त्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, ‘ते महिनाभरासाठी मॉरिशसला गेलेत, आता दिवाळीच्या दिवशीच येणार आहेत.’ मग मी मेलवरून रोज पाठपुरावा करत राहिलो आणि दुसऱ्या बाजूला हरेश शेळके व संदीप कांबळे हे त्यांचे दोन विद्यार्थी मेल व फोन करून त्यांचा पिच्छा पुरवत राहिले.
अखेर दिवाळी अंक छापायला जाण्याच्या दोन दिवस आधी त्यांनी हस्तलिखिताची 60 पाने (11,000 शब्द) स्कॅन करून पाठवली.... लेख वाचून झाल्यावर मी जाधव सरांना एका ओळीचा मेल केला, संपादकाला अतीव समाधान देणारे लेख फार थोडे असतात, हा लेख त्या प्रकारातील आहे.
- कार्यकारी संपादक.
1–
15 जुलै 1987 रोजी मी फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात मराठी विषयाचा अधिव्याख्याता म्हणून रुजू झालो. त्या आधी एक वर्ष मी चाळीसगावच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नोकरी केली. मी फैजपूर कॉलेजचाच विद्यार्थी. बी.ए. आणि एम.ए. तिथेच पूर्ण केलेलं. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत त्यावेळी पुणे, नाशिक, नगर, धुळे, जळगाव असे पाच जिल्हे होते. मी एम.ए. मराठीला पुणे विद्यापीठाचे कविवर्य भा. रा. तांबे पारिताषिक मिळवले होते. त्याचा माझे शिक्षक श.रा.राणे आणि भानु चौधरी यांना विशेष आनंद झाला होता. प्राचार्य बी. एन. पाटील यांनाही ते विशेष वाटले होते. ते नुकतेच रयत शिक्षण संस्थेतून फैजपूर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झाले होते. शासकीय नियमानुसार त्यांना बॅकलॉग भरायचा होता. ते चांगल्या मागासवर्गीय शिक्षकांच्या शोधात होते. आपण बॅकलॉग भरला पाहिजे हे त्यांनी व्यवस्थापनाला पटवून दिले होते. तोपर्यंत फैजपूर महाविद्यालयात एकाही मागासवर्गीय प्राध्यापकाची नियुक्ती झालेली नव्हती.
संस्थेचे अध्यक्ष ना.मधुकरराव चौधरी यांचा त्यांना पाठिंबाच होता. मागासवर्गीय प्राध्यापक नियुक्त करा, पण ते चांगले शिक्षक असले पाहिजेत एवढंच त्यांचं म्हणणं होतं. त्यावर प्राचार्य बी. एन. पाटील यांनी तोडगा काढला होता. आपल्याच महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या व इतरत्र प्राध्यापक म्हणून नोकरी करणाऱ्या मुलांना त्यांनी फैजपूर महाविद्यालयात नोकरीची संधी देऊ केली. माझ्या आधी माझा मित्र किशोर मेढे याला त्यांनी रुजू करून घेतले होते. तो फत्तेपूर ता. जामनेर येथे ज्युनियरला कॉर्स शिकवत होता. तो फैजपूरला रुजू झाला, त्याच्या पाठोपाठ मी रुजू झालो. चाळीसगाव कॉलेजचे प्राचार्य चित्ते सर मला म्हणाले, ‘‘तिकडे कशाला जाता? त्या कॉलेजमध्ये फार राजकारण आहे. इकडे तुम्हाला काही त्रास आहे का?’’ मी म्हणालो, ‘‘काही त्रास नाही सर, पण मी त्या कॉलेजचा विद्यार्थी आणि तेथील प्राचार्यांनी मला नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माझे गाव पण तिकडेच आहे.’’ त्यांनी माझा राजीनामा मंजूर केला.
फैजपूरला रुजू झाल्यावर सगळी जुनी मित्र मंडळी नव्याने भेटली. माझे शिक्षक होते, त्यांचा मी आता सहकारी झालो होतो. ग्रंथपाल जी.एस.पाटील यांनी मला विद्यार्थी दशेत खूप ग्रंथ उपलब्ध करून देऊन मदत केली होती. प्रा.जी.पी. पाटील, प्रा.नंदू भंगाळे, प्रा.सी.डी. दिवाण, प्रा.एस.जे. पाटील यांच्यासोबत माझे चांगले संबंध निर्माण झाले. संजय मराठे, बागडे, राजेंद्र पाटील असे आम्ही प्राध्यापक मित्र भुसावळ रस्त्याला एक खोली घेऊन राहू लागलो. किशोरचे फैजपूरलाच घर होते. वडील जवळच असलेल्या निंभोरा रेल्वे स्टेशनवर स्टेशनमास्तर होते.
प्राचार्य बी.एन. पाटील यांनी आम्हा मित्रांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. तास झाल्यावर आम्ही दुपारपर्यंत ग्रंथालयात बसत होतो. आम्ही नवनवीन उपक्रम सुरू केले. त्या उपक्रमांचा एक भाग म्हणून स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही कॉलेजमध्ये सुरू केले. किशोर आणि मी मुलांना दुपारी मार्गदर्शन करत होतो. किशोर आणि माझा भाऊ चंद्रकांत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. दिवसभर अभ्यास करायचे. मला स्पर्धा परीक्षेत रुची नव्हती, म्हणजे ती परीक्षा देऊन अधिकारी व्हावे असे वाटत नव्हते. मला प्राध्यापकाच्याच नोकरीत रस होता. आपला शिक्षकाचा पिंड आहे हे मला माहीत होते. पण परिसरातील आदिवासी तडवी, दलित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले तर ते वेगवेगळ्या क्षेत्रात जातील आणि शिक्षक म्हणून त्यांना मार्गदर्शन करणे हे आपले काम आहे असे मला वाटत होते. प्राचार्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला होता. ते म्हणाले, ‘‘या उपक्रमाला बजेट नाही. लागतील तेवढे पैसे देईन. पण जोमाने काम करा.’’
त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही उत्साहात होतो. मुंबईच्या व्ही.टी. येथील शासकीय संस्थेचे श्री. वर्मा, पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.देशपांडे यांची व्याख्याने आम्ही ठेवली. एक चांगले वातावरण तयार झाले. गरीब, अभावग्रस्त कुटुंबांतील विद्यार्थ्यांना नवी माहिती मिळू लागली. त्यातच आम्ही विद्यार्थी असताना सिध्दार्थ विद्यार्थी मंडळाची जी चळवळ उभी केली होती, ती पुन्हा बांधली. त्या मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करू लागलो. गंगाधर पानतावणे, केशव मेश्राम, प्र. ई. सोनकांबळे, त्र्यंबक सपकाळे, श्रीपाल सबनीस या मान्यवर लेखकांना निमंत्रित करून त्यांची व्याख्याने आयोजित केली.
ह्याचा एक परिणाम दिसू लागला. मुलं बहुश्रुत होऊ लागली होती. नवीन नवीन ग्रंथ वाचत होती. चर्चा करीत होती. आम्ही शिक्षक मुलांमध्ये मित्रांसारखे मिसळलो होतो. त्यांचे खाजगी प्रश्न सोडवत होतो. त्यांना मानसिक-भावनिक आधार देत होतो. मुलं आपापल्या गावी छोटे-मोठे कार्यक्रम आयोजित करीत असत. आम्ही मित्रमंडळी त्या कार्यक्रमांत सहभागी होत होतो. किशोर मेढे, राजेंद्र ठाकरे, दिलीप तायडे यांच्यासोबत मी देखील व्याख्याने देत फिरत होतो. वर्तानपत्रात सामाजिक प्रश्नांवर लेख लिहीत होतो. गावोगावी मुलांच्या घरी जाणं, त्याच्या आईवडिलांना भेटणं, त्यांच्या घरी जेवण करणं, त्यांच्यामध्ये वावरणं यामुळे मुलांना एक आत्मविश्वास येत होता. विशेषत: गावोगावी आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम जोरात होत असत आणि त्या कार्यक्रमांना आम्ही आवर्जून जात होतो. एका अर्थाने विद्यार्थ्यांची चळवळ उभी राहिली होती.
मुलं संघटित होत होती, त्यांच्या मनात नवे अंकुर निर्माण होत होते. वातावरणात एक सळसळता उत्साह होता. आमच्या क्रियाशीलतेमुळे प्राचार्य समाधानी होते. परंतु शिक्षकवर्गात हळूहळू आमच्याविषयी दुरावा निर्माण होऊ लागला होता. ही कालची पोरं नव्या जोमानं काम करताहेत हे त्यांना खटकत होतं आणि कुठेतरी असूयेची भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ लागली होती. आम्हांला खरं तर याची जाणीव नव्हती. आम्ही आमच्या कामात मस्त बुडालो होतो. दरम्यान घरच्या लोकांचा लग्नाचा आग्रह सुरू झाला होता. मला लग्नाची घाई नव्हती. पण मला आंतरजातीय लग्न नोंदणी पध्दतीने करायचं होतं. त्यासाठी मी प्रयत्नशील होतो, पण दिशा गवसत नव्हती. आंतरजातीय लग्न करण्यास माझ्याबरोबर कोण तयार होईल? कळत नव्हतं. आपली इच्छा काहीही असली तरी ती पूर्ण होतेच असं नाही. तसंच माझंही झालं.
आंतरजातीय विवाहाची शक्यता नसल्यानं मी नाइलाजानं तडजोड स्वीकारली. मित्राने त्याच्या भाचीसोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मुलगी पुण्याची होती. मी पाहिली पण तिला आणि घरच्या लोकांना खबर नव्हती. मुलगी गोड होती. मला आवडली. पण मुलीला मान्य असेल तरच हे लग्न होईल, असं मी मित्राला सांगितलं. पुढं 28 मे 1989 रोजी लग्न झालं. आनंदाचे दिवस होते. पण लग्नानंतर चार महिन्यांतच आई आजारी पडली. तिला जळगावला नेलं. दवाखान्यात ॲडमिट केलं. तिला सतत उलट्या होत होत्या. खाल्लेलं पचत नव्हतं. कधी कधी तिचा तोल जायचा. डॉक्टरांनी ब्रेनट्यूमर असं निदान केलं आणि मुंबईला जायला सांगितलं. बायको आणि मी तिला मुंबईला घेऊन आलो. अँटॉप हिलला काकांकडे काही दिवस राहिलो.
भायखळ्याच्या डॉ. आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केलं. त्यांनी सायनच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये पाठवलं. तिथं मी आणि बायको आईसोबत वार्डमध्ये राहू लागलो. इकडे काकूंचं सहकार्य मिळत नव्हतं. त्यांच्या वागण्यात नाराजी दिसू लागली, म्हणून आम्ही Paying ward मध्ये आईला ठेवलं. तिथेच तिच्यासोबत राहू लागलो. मी बाहेर व्हरांड्यात झोपत असे आणि बायको आईच्या पलंगाजवळ खाली झोपत असे. रात्री शांतता असायची. ती घाबरायची. मग एखादी दोरी हाताला बांधून ती दोरी पलंगाला बांधायची आणि झोपी जायची. दिवस त्रासदायक होते. संघर्षाचे होते. आईची तीन ऑपरेशन्स झाली, पुढं तिला टाटा हॉस्पिटलला दाखल करावं लागलं. क्रमाक्रमानं तिची प्रकृती ढासळत गेली. ती त्या आजारातून उठलीच नाही. चार महिन्यांतच आम्ही आईला घेऊन घरी आलो. या काळात प्राचार्य बी.एन. पाटील यांनी खूप सहकार्य केलं. मला मेडिकल रजा दिली. आईची काळजी घे, बाकी काळजी करू नको. या त्यांच्या आश्वासक शब्दांनी मला धीर दिला.
पुढच्याच दोन-तीन महिन्यांत वडील रिटायर झाले. सरकारी क्वार्टर सोडावं लागलं. आम्ही फैजपूरला दोन खोल्यांचं घर भाड्यानं घेतलं. आजारी आई, रिटायर्ड वडील आणि तीन धाकटे भाऊ यांच्या सोबत आम्ही नवरा-बायको राहू लागलो. दरम्यान ज्योतीनं-बायकोनं- कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं. काही झालं तरी हिचं शिक्षण बंद पडू द्यायचं नाही असं मी ठरवलं होतं. तिच्यावर कामाचा खूप ताण यायचा. आईला पॅरालिसीस झाला होता. त्यामुळं आईचं तिला सगळं करावं लागायचं. आईची आंघोळ, जेवण, नैसर्गिक विधी आम्ही दोघं नवरा-बायको काळजीनं आणि न कंटाळता करत होतो. ज्योती मला फारसं करू देत नव्हती, पण मी तिला जमेल तशी मदत करत होतो. धाकट्या तिघा भावांना अद्याप नोकरी नव्हती. ते संघर्ष करत होते.
दरम्यान 24 डिसेंबर 1990 रोजी अभिरुचीचा जन्म झाला. घरात मुलगी नव्हती. त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झाला. तान्ह्या अभिरुचीची सगळे काळजी घ्यायचे. कोणी ना कोणी तिला कडेवर घेऊन फिरायचं, सगळे लाड करायचे. धाकटा चंद्रकांत ती झोपलेली असताना तिच्या झोळीला झोका देताना पुस्तक वाचत उभा राहायचा. खूप अभ्यास करत होता. त्यानं एमपीएससीची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाला. मिलिंदने एव्हाना बी.एड. केलं होतं. त्याला मराठा विद्या प्रसारक संस्थेत किनगाव येथे हायस्कूल टीचरची नोकरी मिळाली. सुनीलने बी.ए. करण्यापूर्वी जळगावला आयटीआय संस्थेत डिझेल मॅकेनिकचा कोर्स पूर्ण केला होता. त्यानं रेल्वे सर्व्हिस कमिशनची परीक्षा दिली होती. त्याला रेल्वेत नोकरी मिळाली. हे सगळं वर्ष-दीड वर्षात वेगानं घडत गेलं. एक पैसा कोणाला न देता तिघा भावांना नोकऱ्या मिळाल्या.
शेजारचे म्हणायचे, अभिरुचीचा पायगुण चांगला आहे. सगळ्या काकांना नोकऱ्या मिळाल्या. असल्या गोष्टींवर आमचा विश्वास नव्हता, पण कोणाला काय बोलणार? एक-दीड वर्षापूर्वी भुसावळ रोडवर प्लॉट घेतला होता. घर बांधण्यासाठी आईचा तगादा चालला होता, दादांजवळ रिटायर्ड झाल्यामुळे रक्कम आली होती. आम्ही घर बांधायला घेतलं. सात-आठ महिन्यांत स्वत:च्या घरात राहायला गेलो. भाऊ आपापल्या दिशेने गेले होते. आई-दादा, ज्योती, मी आणि अभिरुची आनंदात राहात होतो. आई-दादा नातीमध्ये रमून गेले होते. ज्योतीचा अभ्यास आणि घरकाम सुरू होतं. तिनं घरासमोर चांगली बाग लावली होती. त्यात भाजीपाला आणि काय काय लावलं होतं. मी नोकरीत चांगलाच रुळलो होतो. आईची प्रकृती मात्र साथ देत नव्हती.
2-
1990-91 हे वर्ष म. फुले स्मृतिशताब्दी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीचे वर्ष होते. प्राचार्यांनी कॉलेजच्या ‘धनाश्री’ या नियतकालिकाच्या संपादनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. मी देखील अंक देखणा आणि संदर्भमूल्य असणारा असायला हवा या दृष्टीने कामाला लागलो. एक दिवस प्राचार्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. मला म्हणाले, ‘‘बघ, हे म.फुले स्मृतिशताब्दी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीचे वर्ष आहे. शासनाचा जी.आर. आलेला आहे. प्रत्येक शिक्षण संस्थेत म.फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे लावण्याचे निर्देश आहेत. आपल्या संस्थेत तर ही छायाचित्रे आधीपासून आहेत, पण कॉलेजच्या नियतकालिकात देखील ही छायाचित्रे छापण्याचे निर्देश आहेत. त्या दृष्टीने तयारी कर. अंक चांगला झाला पाहिजे. बजेटची काळजी करू नको’’ मी उत्साहाने कामाला लागलो.
विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. कविता, कथा, लेख तर होतेच, पण संस्थेचा तपशीलवार अहवाल तयार केला. म.फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे आर्टपेपरवर घेतली. संस्थेचे अध्यक्ष ना. मधुकरराव चौधरी हे विधानसभेचे अध्यक्ष झाले होते, भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली होती. म्हणून त्या दोघांची पण छायाचित्रे आर्टपेपरवर घेतली होती. ज्ञानेश्वरीची सप्तशताब्दी साजरी होत होती, म्हणून त्याचीही आवर्जून दखल घेतली होती. एक-दोन विद्यार्थी-विद्यार्थिनींचे निधन झाले होते, त्यांची छायाचित्रे टाकली होती. विस्तृत आणि नेटके संपादकीय तयार केले होते, ते प्राचार्यांना दाखवले होते. त्या खाली संपादक म्हणून माझे नाव आणि सही टाकली होती. कोणाचाही नजरचुकीने उल्लेख राहू नये याची खबरदारी घेत होतो. मित्रांशी, वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलत होतो. प्रुफं काळजीपूर्वक तपासत होतो. अंकाची मांडणी आकर्षक होईल इकडे लक्ष देत होतो. जवळपास एक महिना हे काम चाललं होतं. शेवटी एकदाचा अंक तयार झाला आणि अंकाचे गठ्ठे वितरणासाठी कॉलेजच्या ग्रंथालयात दाखल झाले.
३-
सकाळी साडेदहाची वेळ, मी वर्गात शिकवत होतो. तेवढ्यात बाहेर मोठा गोंगाट, गोंधळ चालू असल्याचे जाणवले. खिडकीतून बाहेर पाहिलं तर ग्रंथालयाच्या दिशेने मुलांच्या झुंडी धावत होत्या. बाहेर आलो. ग्रंथालयाजवळ विद्यार्थ्यांची गर्दी दिसली. काही मुलं आपापसात झोंबाझोंबी करीत होती, तर बरीचशी मुलं त्यांच्याभोवती आरडाओरडा करीत होती. कॉलेजच्या आवारात मुलांची एकच धावपळ. अनेक शिक्षक वर्गातून बाहेर येऊन व्हरांड्यात उभे राहून ते दृश्य पाहत होते. मी ग्रंथालयाच्या दिशेने झपाझप निघालो. आता विद्यार्थ्यांच्या आरडाओरडीने जोर पकडला होता आणि मुलांची झोंबाझोंबी मारामारीत परावर्तित झाली होती. धावतच मी मुलांच्या घोळक्यात शिरलो. पाहतो तर सिध्दार्थ विद्यार्थी मंडळाचे सभासद विद्यार्थी आणि इतर विद्यार्थ्यांत चांगली जुंपली होती.
मी मुलांना मोठ्या मुश्किलीने शांत केलं. विद्यार्थ्यांत शिवीगाळ, आरडाओरडा चालूच होता. सिध्दार्थ विद्यार्थी मंडळाचे विद्यार्थी जाम भडकले होते. मध्येच उसळून इतर विद्यार्थ्यांच्या अंगावर जात होते. कशीतरी विद्यार्थ्यांची समजूत घातली आणि त्यांना पांगवलं. विद्यार्थी लवकर हलत नव्हते म्हणून मी त्यांच्यावर ओरडलो आणि हळूहळू गर्दी पांगली. पण विद्यार्थ्यांच्या देहबोलीतून राग प्रकट होत होता. आजूबाजूला पाहिलं तर मला धक्काच बसला. ‘धनाश्री’ नियतकालिकातील म.फुले आणि डॉ.आंबेडकर यांची छायाचित्रे फाडून इतस्तत: फेकण्यात आली होती. ती छायाचित्रे वाऱ्याने उडत होती आणि ग्रंथालयाच्या आवारात भिरभिरत होती. घडलं असं होतं : सकाळी ग्रंथालयात ‘धनाश्री’ नियतकालिकाचं वितरण सुरू झालं. विद्यार्थी अंक घेण्यासाठी गोळा झाले. विद्यार्थ्यांनी अंक घेतले आणि ते ग्रंथालय परिसरात गटागटाने अंक पाहू लागले. त्यातील फुले-आंबेडकरांची छायाचित्रे पाहून काही विद्यार्थ्यांनी तिरसट कॉमेंट केली. तर काहींनी अंकातून ती छायाचित्रे फाडून हवेत भिरकावली.
या विद्यार्थ्यांमध्ये अंक घेण्यासाठी आलेले सिध्दार्थ विद्यार्थी मंडळाचे विद्यार्थीही होते. त्यांनी हे पाहिले आणि त्यांचा संताप अनावर झाला. आणि विद्यार्थ्यांत बाचाबाची सुरू झाली. ग्रंथालयाबाहेर पडणाऱ्या मुलांच्या हातून अंक घेऊन, त्यातील फुले आंबेडकरांची छायाचित्रे फाडून फेकणाऱ्या मुलांचा आणखी एक गट कोपऱ्यात होता. त्या गटाची आणि सिध्दार्थ विद्यार्थी मंडळातील काही विद्यार्थ्यांची पुन्हा हमरी-तुमरी झाली, प्रकरण हातघाईवर आले आणि मारामारी सुरू झाली. गोंगाट वाढला आणि दरम्यान मी तिथे येऊन पोचलो. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना तूर्त वितरण बंद करण्याची मी विनंती केली आणि विमनस्क मन:स्थितीत पुन्हा वर्गात आलो. वर्गातून बाहेर पडलो आणि स्टाफरूममध्ये आलो.
वातावरणात ताण वाढत चालला होता. स्टाफरूम समोरील मैदानात विद्यार्थी चेकाळत ओरडत फिरत होते. त्यांच्या अशा प्रतिक्रिया का येत होत्या, हे मला कळत नव्हते. सहकारी प्राध्यापक पण माझ्याकडे अशा पध्दतीने पाहत होते की जणू काही मी विचित्र अशी गोष्ट केली होती. मी प्राचार्यांकडे गेलो पण ते केबिनमध्ये नव्हते. चौकशी केली तेव्हा कळले की ते परगावी गेले आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांचा मोठा जमाव स्टाफरूम समोरच्या आवारात जमला होता. जमावाची मन:स्थिती चांगली दिसत नव्हती. उपप्राचार्य एस.एम. भिरुड आणि प्रा.लाड स्टाफरूममध्ये आले. त्यांनी काय झालं म्हणून विचारलं, मी ग्रंथालयाजवळ घडलेला वृत्तांत सांगितला. पण प्रा.भिरुड आणि प्रा.लाड यांच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दल तीव्र नाराजी दिसत होती. दरम्यान अनेक प्राध्यापक गोळा झाले. विद्यार्थी आणि प्राध्यापक सगळेच मला अशांत, अस्वस्थ दिसत होते.
प्रा.भिरुड म्हणाले, ‘‘तुम्ही मुलांध्ये जायला नको होतं. त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करायचं कारण नव्हतं. काय झालं असतं ते आपण मिटवलं असतं. ‘‘पण सर मुलं मारामारी करीत होती, आपण तसंच पाहत राहणं बरोबर नाही असं मला वाटलं.’’ ‘‘हो, पण तिथं जाऊन तुम्ही मुलांवर का ओरडलात?’’ ‘‘मुलं पांगत नव्हती म्हणून ओरडलो आणि तिथे आवारात मुलांनी फुले-आंबेडकरांची छायाचित्रे फाडून फेकली होती. मुलांनी असं का...’’ ‘‘आपण बाहेर विद्यार्थी आणि शिक्षकांची बैठक घेऊ. चर्चा करू. चला सगळे बाहेर’’ असं म्हणून भिरुड सर बाहेर पडले. स्टाफरूमसमोर खुर्च्या ठेवण्यात आल्या. तिथे प्रा. भिरुड, प्रा. लाड आणि आणखी एक-दोघं प्राध्यापक बसले. विद्यार्थ्यांचा जमाव समोर आणि आम्ही प्राध्यापक आजूबाजूला उभे. विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढत होता. प्रा.भिरुड म्हणाले, ‘‘जाधव सर, निवेदन करा.’’ मी काय झालं ते सगळ्यांना शांतपणे सांगितलं, पण माझ्या बोलण्याचा आणि कृतीचा विपर्यास करण्यात आला होता.
माझ्या अतिसक्रियतेुळे प्राध्यापक दुखावले होते. मुलांच्या मनात गैरसमज दिसत होता. मीच सिध्दार्थ विद्यार्थी मंडळाच्या विद्यार्थ्यांना भडकावून वातावरण तापवले, विनाकारण हस्तक्षेप केला आणि या सगळ्या प्रकरणात मीच दोषी आहे असे चित्र रंगवण्यात आले. मी जरा जास्तच रुची या घटनाक्रमात दाखवली असं प्राध्यापकांच्या व विद्यार्थ्यांच्या बोलण्यात आलं आणि माझ्याबद्दल तीव्र नापसंतीची भावना त्यांच्या चेहऱ्यांवर पसरली. हे जे चाललेलं आहे ते चांगलं नाही असं काही प्राध्यापकांना वाटत होतं. ते दबक्या आवाजात तसं बोलतही होते, पण उघडपणे कोणी ठाम भूमिका घेऊन स्पष्ट बोलत नव्हतं. सगळी सूत्रे प्रा.भिरुड आणि प्रा.लाड यांनी हातात घेतली होती. मी अस्वस्थ होतो आणि अचानक गर्दीत एका कोपऱ्यात मला दादा दिसले.
मी चमकलो. हे इथं कसे काय आले? यांना कोणी सांगितलं? मी जास्तच अस्वस्थ झालो. नंतर कळलं की, ‘कॉलेजमध्ये काहीतरी भानगड झाली आणि मी त्या सगळ्या भानगडीत अडकलोय’ हे त्यांना कोणीतरी सांगितलं होतं. कोणी सांगितलं हे मला माहीत नव्हतं. काळजीनं ते कॉलेजमध्ये आले होते आणि एका बाजूला उभं राहून हे सगळं बघत होते. आता प्रा.भिरुड आणि प्रा.लाड यांनी वेगळीच मूव्ह घेतली. प्रा.भिरुड म्हणाले, ‘‘सर, तुम्ही विनाकारण हस्तक्षेप केला. तुम्ही मुलांची माफी मागा म्हणजे प्रकरण मिटेल.’’ मी म्हटलं, ‘‘माफीचा प्रश्नच नाही. मी हस्तक्षेप केलेला नाहीय आणि माझा काही दोष नाहीय.’’ पण प्रा.भिरुड बोलल्यानंतर विद्यार्थ्यांत एकच गलका झाला आणि ‘जाधव सरांनी माफी मागितली पाहिजे’’ असा आरडाओरडा सुरू झाला.
गोंधळ इतका वाढला की कोणाचं बोलणं कोणाला ऐकू येईना. प्रा.नंदू भंगाळे बाजूलाच उभे होते. भिरुड सरांचं बोलणं ऐकून ते तत्काळ संतापाने उद्गारले, ‘‘हट्, काय चाललंय् हे.’’ हे कोणाला ऐकू गेलं नाही पण मी ऐकलं. म्हणजे माझ्या बाजूने, मला समजून घेणारं कोणीतरी होतं. पण उघडपणे बोलायला कोणी तयार नव्हतं. प्रा.भिरुड, प्रा.लाड आणि विद्यार्थ्यांचा दबाव माझ्यावर वाढत चालला. तरीही मी शांत होतो, सगळ्या जमावाला निरखून पाहत होतो. अंदाज घेत होतो. प्रा.भिरुड आणि प्रा.लाड मला हाताने खूण करून ‘आटपा, आटपा’ म्हणत होते, म्हणजे मी माफी मागावी असा आग्रह करीत होते. मी एकटा पडलो होतो. प्राचार्य नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत हे सगळं चाललं होतं. क्षणाक्षणाला जमाव बिथरत होता. प्रा.भिरुड आणि प्रा.लाड आक्रमक झाले होते.
विद्यार्थ्यांच्या जमावाचं नेतृत्व जणू तेच करत होते. इतर प्राध्यापक तटस्थ होते. सिध्दार्थ विद्यार्थी मंडळाचे विद्यार्थी माझ्याकडे पाहून अस्वस्थ होत होते. पण त्यांची संख्या कमी होती. या जमावापुढे ते निष्प्रभ होते. वातावरणात कमालीचा तणाव होता. प्रसंगावधान राखून मी हात वर करून सर्वांना शांत राहण्याची खूण केली. हळूहळू शांतता पसरली. मी बोलायला सुरुवात केली. ‘‘मित्रांनो, माझ्याबद्दल तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. पण मी कोणताही हस्तक्षेप केलेला नाही आणि कोणाच्या भावना पण दुखावलेल्या नाहीत. मुलांची मारामारी मिटावी म्हणून मी प्रयत्न केला. पण जे झालं ते चांगलं झालेलं नाही, त्याचं मला दु:ख होतंय आणि तुम्ही म्हणता म्हणून तुमच्या समाधानासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो.’’ माझं बोलणं थांबलं. क्षणभर शांतता पसरली. पण लगेचच एक-दोन विद्यार्थी ओरडले, ‘‘दिलगिरी नाही, माफी मागा, माफी मागा...’’ आणि पुन्हा मोठा गोंधळ सुरू झाला. मी म्हणालो, ‘‘दिलगिरी याचाच अर्थ माफी होतो.’’ मुलं ओरडली, ‘‘माफी शब्द म्हणा, माफी मागा...’’ मग मी पुन्हा म्हणालो, ‘‘ठीकंय... तुम्ही म्हणता तर माफी मागतो.’’ लगेचच वातावरण निवळायला सुरुवात झाली. मुलं पांगायला लागली. हळूहळू गर्दी कमी होत गेली.
मी स्टाफरूममध्ये आलो. काही सहकारी प्राध्यापकांना वाईट वाटलं होतं. काही तटस्थ होते तर काहींना झालं ते बरं झालं, असं वाटत होतं. जरा वेळ मी स्टाफरूममध्ये बसलो. जवळचे माझ्या बॅचचे सहकारी तरुण प्राध्यापक खूप बेचैन होते. माझ्यापासून नजर चुकवत होते. संजय मराठे, राजेंद्र पाटील, किशोर मेढे, नंदू भंगाळे, एस.जे. पाटील हे प्राध्यापक बोलत काही नव्हते, पण त्यांचं मौन खूप काही बोलत होतं. थोडा वेळ गेला आणि उपप्राचार्य भिरुड यांनी स्टाफरूमच्या शेजारच्या वर्गात प्राध्यापकांची तातडीची बैठक बोलावली. बैठकीची सगळी सूत्रं प्रा.भिरुड आणि प्रा.लाड यांनीच सांभाळली होती. आता ही बैठक कशासाठी आयोजित केली असेल, असा माझ्यासकट अनेकांना प्रश्न पडला होता. बैठक सुरू झाली, एकेक प्राध्यापक उठून बोलू लागले. त्यांचा सूर माझ्या विरोधी तर होताच, पण कॉलेजमध्ये अत्यंत सक्रिय असलेल्या माझ्यासोबत प्रा.राजेंद्र ठाकरे, प्रा.संदानशिव, प्रा.मेढे, प्रा.तायडे यांच्यासंबंधीही होता.
आम्ही जे वेगवेगळे उपक्रम आयोजित करतो, विद्यार्थी चळवळ चालवतो, स्पर्धापरीक्षा केंद्र चालवतो आणि व्याख्यानं आयोजित करतो त्याबाबत काही प्राध्यापकांमध्ये नाराजी होती. म्हणजे असं की, आम्ही सक्रिय असल्यामुळे ते किती निष्क्रिय आहेत हे आपोआप उघड होत होतं, म्हणून आम्हीदेखील त्यांच्यासारखं निष्क्रिय असणं त्यांना सोयीचं होतं. या चर्चेत प्रा.भिरुड, प्रा.लाड, प्रा.एस.के.चौधरी, प्रा.पी.एन. नारखेडे, प्रा.श.रा.राठी सहभागी होते. इतरांचं मला काही वाटलं नाही, पण राणे सरांनी अशा चर्चेत सहभाग घ्यावा हे मला खटकलं होतं. कारण ते माझे शिक्षक होते आणि मी फैजपूर महाविद्यालयात नोकरी करावी असं त्यांनाही वाटत होतं. तरीही गेल्या तीन-चार वर्षांत माझ्याबद्दल त्यांचं बदलत गेलेलं मत इथे प्रकट होताना दिसत होतं. या बैठकीमुळे माझ्या हळूहळू लक्षात आलं की, हे सगळं कटकारस्थान प्रा.भिरुड आणि प्रा.लाड यांच्यासोबतच काही प्राध्यापकांनी रचलेलं आहे. फक्त समोर पडद्यावर प्रा.भिरुड आणि प्रा.लाड होते आणि पडद्यामागे बरेच अस्वस्थ आत्मे होते. मुलांच्या चेकाळण्यामागे, आणि छायाचित्रांची विटंबना करण्यामागे असाच ब्रेन होता. विटंबना झाली. आम्ही मागासवर्गीय प्राध्यापक तीव्र प्रतिक्रिया देणार आणि त्या प्रतिक्रियेुळे हे आम्हांला छाटणार असा डाव होता. पण आम्ही कोणी प्राध्यापक याला बळी पडलो नाही.
मात्र मी जी उत्स्फूर्त कृती केली, तिचं भांडवल करून कुभांड रचण्यात आलं आणि लक्ष्य करून माझा बळी घेण्यात आला. हे त्या बैठकीमुळं कळलं. एवढा मनस्ताप होऊनही मी बैठकीत बोलण्याची परवानगी मागितली आणि दहा मिनिटं सगळ्यांना ठणकावून सांगितलं की ‘‘आम्ही आमचं काम इमाने-इतबारे करतो आहोत. कोणतं राजकारण करीत नाही आणि आमच्या उपक्रमांना कोणी घाबरू नये. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. ‘धनाश्री’ अंक हा प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला आहे. आणि शासकीय निर्णयानुसार फुले-आंबेडकरांची छायाचित्रे त्यात छापली आहेत.’’ एवढं होऊनही मी जुमानत नाही हे लक्षात आल्यामुळं मंडळी आणखी अस्वस्थ झाली आणि मग त्यांनी बैठक गुंडाळली. पण या बैठकीमुळेच मला असंतुष्ट आत्म्यांची आणि त्यांनी केलेल्या कारवायांची ओळख पटली. बैठकीतून बाहेर पडलो. शबनम खांद्यावर घेतली. सायकलस्टँडवर लावलेली सायकल मी काढली. माझ्या दिशेने जतीन मेढे, भालेराव आणि सिध्दार्थ विद्यार्थी मंडळाचे काही विद्यार्थी हळूहळू चालत आले. म्हणजे आतापर्यंत विद्यार्थी थांबूनच होते. त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं. भालेराव तर रडतच होता. मी त्यांच्या खांद्यावर थोपटलं आणि सायकलला टांग मारली. एकटाच घराच्या दिशेने निघालो. दादा नंतर दिसले नाहीत. ते एव्हाना घरी गेले होते.
4 –
फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात म. फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या छायाचित्रांची विटंबना, अशा आशयाची बातमी दुसऱ्या दिवशी सर्वच स्थानिक वर्तानपत्रांनी पहिल्या पानावर दिली. या बातमीमुळे जिल्हाभर खळबळ माजली. अनेक कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी संताप व्यक्त केला. भारिपचे एक स्थानिक नेते आणि माझे मित्र मुकुंद सपकाळे, जळगाव येथील प्रशिक विद्यार्थी संघटनेचे वसंत सपकाळ आणि इतर कार्यकर्त्यांनी फैजपूर महाविद्यालयात धाव घेतली. लोकांची रीघ लागली. पेपरमध्ये तपशीलवार वृत्तांत होता. त्यामुळे येणारे लोक माझी पण चौकशी करीत होते. कॉलेजच्या प्रशासनाला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागत होतं. मी रजा टाकून किशोर मेढेसह जळगावला आलो होतो.
तिथे माझे अनेक मित्र होते. त्यांना भेटलो. चंद्रमणी लभाने याने मला त्याच्या घरी थांबवून घेतलं. असुरक्षिततेची भावना सर्वांच्याच मनात निर्माण झाली होती. मी फैजपूरमध्ये नाही हे कळल्यामुळे दुसऱ्या दिवशी ‘‘प्रा.मनोहर जाधव भूमिगत’’ अशी बातमी पेपरमध्ये आली. सर्वत्र संभ्रम होता. आणि संतापाची भावना पण होती. तिसऱ्या दिवशी घरी आलो. घरातील लोक बेचैन होते. पोलिस घरी चौकशीला येऊन गेल्याचे कळले. सावदा येथील पीएसआयने स्वत: तक्रार नोंदवून अज्ञात व्यक्तीविरोधात छायाचित्र विटंबना प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा आले होते, पण घरी न येता रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून साध्या वेषातल्या पोलिसाला त्यांनी घरी पाठवलं. तो मला त्यांच्याकडे घेऊन गेला. त्यांची भेट झाल्यावर ते म्हणाले, ‘‘सर घाबरू नका. प्रकरण गंभीर आहे. वरून चौकशी सुरू झाली आहे. पोलिस संरक्षण हवे असेल तर सांगा.”
विधानसभेच्या अध्यक्षांचं कॉलेज असल्यामुळं आम्हांला खबरदारी घ्यावी लागत आहे. मी म्हणालो, ‘‘संरक्षणाची गरज नाही. पण कधी तुमच्या मदतीची गरज लागली तर जरूर कळवीन.’’ त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आलं की, त्यांनी काही ठिकाणी माझी भाषणं ऐकली होती आणि त्यामुळं त्यांच्या मनात माझ्याबद्दल सहानुभूती होती. रात्री जेवताना घरात विषय निघाला. माझ्या चेहऱ्यावरील अस्वस्थता आणि काळजी घरातल्या सर्वच लोकांना काळजीत टाकत होती. आई आणि बायकोच्या डोळ्यांत पाणी होतं. घडलेली घटना वडिलांनी समक्ष पाहिली होती. आपल्या पोराचा काही दोष नसताना त्याला बळी दिलं गेलंय हे शल्य त्यांना डाचत होतं. अभी तिच्या आईला बिलगून होती. तिला सोडतच नव्हती.
वडील मग शांतपणे म्हणाले, ‘‘हे बघ भाऊ (सर्व धाकटे भाऊ मला भाऊ म्हणत असल्यामुळे आई-वडील पण मला भाऊ म्हणूनच हाक मारत असत), कॉलेजमध्ये जे प्रकरण घडलं ते तर मी पाहिलंच आहे आणि ते मला पण लागलं आहे. आपला काही दोष नसताना आपण अपमान सहन करायचा नाही. याच्या विरोधात तू आवाज उठव. काय होईल ते पाहून घेऊ, पण आयुष्यभर ज्या ठिकाणी नोकरी करायची आहे तिथं ती ताठ मानेनं करायला हवी. या झगड्यात तू मेला तरी चालेल. तुझी बायको आणि मुलगी आम्ही सांभाळू. मला अजून तीन मुलं आहेत. काळजीची गरज नाही, पण यांना धडा शिकव.’’ वडिलांच्या शब्दामुळं मला बळ मिळालं. माझं मनोधैर्य खचलं आहे, हे त्यांना कळलं होतं. ते भावनिक झाले होते. त्यांचं म्हणणं किती बरोबर किती चूक यापेक्षा आत्मसन्मान जपण्यात त्यांचा मला पाठिंबा आहे हे माझ्या लक्षात आलं.
रात्री बायकोनं समजूत काढली ‘‘अस्वस्थ राहू नका. आमची काळजी करू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत.’’ आई मात्र घाबरलेली होती. आधीच ती आजारी होती. या घटनेुळं ती बावरून गेली होती. तिला सारखी माझी काळजी लागून राहिली होती. प्रशिक (प्रज्ञा शील करुणा) विद्यार्थी संघटनेने चार दिवसांनी जळगावमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं. वर्तानपत्रात तशा बातम्या प्रसिध्द झाल्या. सर्वच संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला. आंबेडकरवादी, डावे समाजवादी पक्ष, विविध विद्यार्थी संघटना मोर्चात उतरल्या होत्या. मोर्चाच्या दिवशीच मला पुणे विद्यापीठात ओरिएंटेशन कोर्सला जायचं होतं. आधी प्राचार्यांनी परवानगी दिली होती, पण या प्रकरणामुळे आपण नंतर ठरवू असं ते म्हणाले होते. खरं तर मला ओरिएंटेशन कोर्स करणं गरजेचं होतं, पण काय ठरतं ते माहीत नव्हतं.
जळगावच्या रेल्वे स्टेशनवरील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली आणि तो कलेक्टर कचेरीवर तासाभरात जाऊन धडकला. मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि कार्यकर्ते, महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. विटंबना करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांना भडकावणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई झाली पाहिजे, अशा आशयाच्या घोषणा तावातावाने दिल्या जात होत्या. पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. प्रशिकचे विद्यार्थी अग्रभागी होते. योगायोगाने त्याच दिवशी मधुकरराव ऊर्फ बाळासाहेब चौधरी जळगाव शहरात होते. ते सरकारी डाक बंगल्यावर थांबले होते. मोर्चातील कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी संध्याकाळची वेळ घेतली होती. फैजपूरहून अनेक विद्यार्थी मोर्चात सहभागी होण्यासाठी आले होते.
अरुण पिंजारी आणि शेख अब्दुल्ला त्यांच्या राजदूत मोटारसायकलवरून जळगावला पोचले होते. संध्याकाळी सगळे कार्यकर्ते डाकबंगल्यावर दाखल झाले. माझ्यासोबत ज्योती आणि इतर मित्रपण होते. अभी सारखी रडत होती. त्यांना डाकबंगल्यावर एका बाजूला अरुण पिंजारी आणि मित्रांनी बसवलं होतं. कार्यकर्त्यांची संख्या वाढत होती. वसंत सपकाळे, विश्वास सपकाळे, राजन भालेराव, मुकुंद सपकाळे, छात्र युवा संघर्ष वाहिनीचे शेखर सोनाळकर आणि अनेक कार्यकर्ते ठरलेल्या वेळी बाळासाहेबांच्या दालनात शिरले. लोकांच्या मनात संतापाची भावना होती. रेटारेटी चालली होती. महिलांचा मोठा कलकलाट होता. मध्ये शिरल्याबरोबर बाळासाहेब जिथं बसले होते, त्या ठिकाणी त्यांच्यासमोर जाऊन वसंत सपकाळे याने जोरजोरात निषेधाच्या घोषणा दिल्या. बाळासाहेब शांत होते. त्यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं. पण लोक ऐकायला तयार नव्हते.
कॉलेजचं मॅनेजमेंट आणि प्राचार्य पण आलेले होते. महिला संतापाने अव्दातव्दा बोलत होत्या. विद्यार्थी चिडून बोलत होते. सर्वांच्याच भावनेचा स्फोट झाला होता. मला तर बोलता येत नव्हतं, इतका मी गलबलून गेलो होतो. डोळ्यांत पाणी होतं. कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांना घेराव घातला होता. दोषी विद्यार्थ्यांवर आणि त्यांना भडकावणाऱ्या प्राध्यापकांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मोर्चेकऱ्यांची आग्रही मागणी होती. या सर्व प्रकारामुळे प्राचार्य आणि मॅनेजमेंट बावरून गेलं होतं. पण बाळासाहेब शांत होते. त्यांना अशा प्रसंगांना सामोरं जाण्याचा अनुभव नवीन नव्हता. प्रदीर्घ काळ ते मंत्री राहिले होते. शेवटी हळूहळू लोकांचा त्रागा कमी झाला. शेखर सोनाळकर आणि इतर ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सर्वांना शांत केलं.
सोनाळकरांनी बाळासाहेब यांच्यासमोर अतिशय संयमानं भूमिका मांडली. कार्यकर्त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. कॉलेजमध्ये घडलेला घटनाक्रम सुसंगतपणे बाळासाहेबांसमोर ठेवला. राष्ट्रपुरुषांच्या छायाचित्रांची विटंबना आणि दलित प्राध्यापक-विद्यार्थ्यांची जाणीवपूर्वक केलेली मानहानी त्यांनी तर्कशुध्दपणे समोर ठेवली. प्राचार्य आणि मॅनेजमेंट तर हतबल होते. बाळासाहेब काय म्हणतात, काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. बाळासाहेबांनी सगळे वास्तव समजून घेतले. ते प्राचार्य आणि मॅनेजमेंटशीपण बोलले. सर्व कार्यकर्त्यांचे ऐकून घेतले. आणि त्यांनी सोनाळकरांनाच या सगळ्या प्रकरणाची नीट चौकशी करून त्यांच्या सोयीने अहवाल द्यायला सांगितला. म्हणजे शेखर सोनाळकरांची एक सदस्यीय चौकशी समिती त्यांनी नेली. त्या समितीला प्राचार्यांनी सहकार्य करायचे होते. सोनाळकरांनी त्यांना हव्या असलेल्या सर्वांचे स्टेटमेंट घेऊन अहवाल तयार करायचा होता. अहवाल तयार करून तो सोनाळकरांनी व्यवस्थापनाला सादर करायचा आणि अहवालाच्या शिफारशींची अंलबजावणी व्यवस्थापनाने करायची असे सर्वानुमते ठरले.
सर्वांनी सहमती दर्शवली. मला ओरिएंटेशन कोर्सला जाण्याची परवानगी देण्यात आली. पण आवश्यकता वाटली तर चौकशी समितीच्या बैठकीला हजर राहिले पाहिजे असे सांगण्यात आले. कार्यकर्त्यांचे समाधान झाले. हळूहळू सर्वजण डाक बंगल्यातून बाहेर पडू लागले. आम्हांला पुण्याला जायला आता गाडी नव्हती. महाराष्ट्र एक्सप्रेसचे रिझर्वेशन होते, पण ती गाडी निघून गेली होती. बी.डी. इंगळे या मित्रासोबत मी, ज्योती आणि अभी भुसावळला आलो. तिथं रात्री हॉटेलवर राहिलो आणि सकाळच्या गोवा-निजामुद्दीनने पुण्याला रवाना झालो. कालच्या भव्य मोर्चाची आणि चौकशी समिती नेमली गेल्याची बातमी सर्वच वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावर दिली होती.
५ -
मी पुणे विद्यापीठात ओरिएंटेशन कोर्सला रुजू झालो. वातावरण बदलल्यामुळे आणि वेळापत्रक खूपच व्यस्त झाल्यामुळे रिलॅक्स वाटत होतं. कॉलेजमध्ये झालेल्या प्रकरणाचा ताण कमी झाला होता. इथं विद्यापीठात प्राध्यापकांच्या सहवासात होतो. नवीन नवीन बरंच कळत होतं. येणारे Resource person होते, त्यांच्याशी बोलत होतो. इथं सासुरवाडीच होती. सोबत ज्योती आणि अभी होत्या. फैजपूरला आता यापुढे कधीच जाऊ नये असं वाटत होतं. इतकं या गावातून आणि कॉलेजमधून मन उडालं होतं. पण तिथं नोकरी होती, आणि नोकरी तर महत्त्वाची होती. पण त्यापेक्षाही आत्मसन्मान महत्त्वाचा होता. तिकडे फैजपूरला चौकशी समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या.
मला एक-दोन रजिस्टर्ड पत्रं आली, पण कोऑर्डिनेटर वाणी म्हणाले की, ‘‘सर ओरिएंटेशन कोर्समध्ये अशी रजा देता येत नाही.’’ मग मी त्यांना सांगितलं की, ‘‘प्लीज, तुम्ही तसं कॉलेजला कळवाल का?’’ ते ‘हो’ म्हणाले आणि त्यांनी तसं कळवलं देखील. मी पुणे विद्यापीठात ओरिएंटेशन कोर्सला असतानाच ‘लोकमत’चे वृत्तसंपादक धों.न.गुरव यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय पानावर क्रमश: दोन लेख लिहिले. माझ्या घरी माणूस पाठवून त्यांनी माझा फोटो मागवून घेतला होता. बाळासाहेब आणि माझा फोटो समोरासमोर टाकून त्यांनी ‘फुले- आंबेडकर छायाचित्र विटंबनेचा अन्वयार्थ’ या शीर्षकाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन लेख लिहिले. बाळासाहेब आणि कॉलेजच्या व्यवस्थापनावर त्यांनी हल्ला चढवला होता, माझ्याबद्दल आणि एकूण घटनेबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. एकूण ‘लोकमत’ने हे प्रकरण लावून धरलं होतं.
जळगावच्या मोर्चानंतर धुळ्याला श्रीपाल सबनीस, दामोदरे, किशोर ढमाले यांनी मोर्चा काढला होता. त्या मोर्चालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. एकूण खानदेशात या प्रकरणामुळे वातावरण तप्त झाले होते आणि तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत होत्या. जिल्ह्याभरातील कोणी ना कोणी कार्यकर्ते कॉलेजमध्ये येत असत आणि प्राचार्यांना भेटत असत. त्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य प्राचार्य आणि व्यवस्थापनातील इतर मंडळींना हळूहळू उमगत गेलं. पण वेळ हातातून गेली होती, पेपरमध्ये, विशेषत: ‘लोकमत’मध्ये सतत बातम्या येत होत्या. पण ‘आपल्याला बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. आपण चिंता करायची गरज नाही’ असाही आविर्भाव त्यांच्या वागण्यात होता. कॉलेजच्या रीडिंगरूममध्ये ‘लोकमत’ पेपर टाकण्यास प्राचार्यांनी मनाई केली होती. ‘लोकमत’ने प्रकरण ज्या पध्दतीने लावून धरलं होतं त्यामुळे ते नाराज होते, कारण ‘लोकमत’ हे खानदेशातील सर्वांत जास्त खपाचे दैनिक होते.
‘लोकमत’चा स्थानिक वार्ताहर अरुण पिंजारी होता आणि आम्ही खूप जुने मित्र होतो. त्यामुळे या प्रकरणात तो भावनिकदृष्ट्या गुंतलेला होता. सारखा पाठपुरावा करत होता आणि ‘लोकमत’चे व्यवस्थापन त्याला प्रतिसाद देत होते. मी ओरिएंटेशन कोर्स पूर्ण करून कॉलेजात रुजू झालो. पण मन रमत नव्हतं. आधीसारखा कामाचा उत्साह राहिला नव्हता, पण मनातली खदखद स्वस्थ बसू देत नव्हती. या प्रकरणामुळे जवळचे प्राध्यापक मित्र दूर गेले. माझ्याशी बोलणं, माझ्या संपर्कात राहणं त्यांना असुरक्षित वाटू लागलं. सोनाळकर सरांनी आठ-दहा बैठका घेतल्या. काही बैठका तर त्यांनी आठ-आठ तास घेतल्या. सर्वांचेच, अगदी प्राचार्यांपासून जे जे संबंधित होते त्या सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले. माझेही सविस्तर स्टेटमेंट घेतले. मला तर प्रत्येक बैठकीला हजर रहावे लागत होते. कारण मी महत्त्वाचा साक्षीदार होतो.
सिध्दार्थ विद्यार्थी मंडळाचे विद्यार्थी आणि संशयित आरोपी विद्यार्थी यांना पण त्यांनी बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. प्रा.भिरुडे आणि प्रा.लाड यांची त्यांनी अगदी तपशीलवार जबानी घेतली. माझ्यासमोर प्रा.सोनाळकर ज्या पध्दतीनं त्यांची उलटतपासणी घेत होते, त्यामुळे त्यांचा इगो दुखावत होता. पण प्रा.सोनाळकर खमके होते. प्रा.भिरुड आणि प्रा.लाड यांचा मुजोर approach त्यांनी खपवून घेतला नाही आणि पध्दतशीर त्यांचे स्टेटमेंट घेतले. प्रा.शेखर सोनाळकर हे सचोटीचे प्राध्यापक आणि निष्ठावंत कार्यकर्ते होते. ते स्वखर्चाने जळगावहून बसने फैजपूरला वेळ काढून येत होते. एक बैठक संपताना पुढच्या बैठकीची तारीख निश्चित करीत होते आणि न चुकता येत होते. त्यांनी एकही नियोजित बैठक चुकवली नाही.
त्यांचं व्यक्तिमत्त्वच संयमी, समजूतदार होतं आणि मुख्य म्हणजे ते पूर्वग्रहदूषित नव्हते. त्यांनी सगळ्या बैठकांच्या आधारे महिनाभरात कॉलेज व्यवस्थापनाला अहवाल सादर केला. पेपरमध्ये बातम्या येत होत्या. अहवाल काय होता त्याचा तपशील आम्हांला माहीत नव्हता. तो फक्त प्रा.सोनाळकर आणि कॉलेज व्यवस्थापनाला माहीत होता. पण बैठकांना मी नियमित हजर होतो. त्यामुळे अहवाल आपल्याला न्याय देणारा असेल अशी मला खात्री वाटत होती. प्रा.सोनाळकर यांनी अहवाल सादर करून पंधरा दिवस उलटून गेले होते तरी कॉलेज व्यवस्थापन ढिम्म होतं. दुर्लक्ष करत होतं.
6 –
अशातच एक दिवशी समाजकल्याण मंत्री ना. रामदास आठवलेंचा दौरा वर्तानपत्रात प्रसिध्द झाला. ते मध्य प्रदेशातील धारणी येथे काही कार्यक्रमानिमित्त जाणार होते. धारणीला जाण्यासाठी कॉलेजच्या समोरचाच रस्ता होता. भुसावळ, फैजपूर, रावेर, बऱ्हाणपूर, धारणी या मार्गाने ते जाणार होते. आम्ही काही प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी ठरवले की, कॉलेजसमोर उभे राहून ना.आठवलेंचे स्वागत करायचे, त्यांच्याशी बोलायचे. त्यांना फुले- आंबेडकर छायाचित्र विटंबना प्रकरणाची माहिती द्यायची आणि जमले तर त्यांनी पाच मिनिटे महाविद्यालयात थांबून प्राचार्यांची भेट घेऊन पुढे निघायचे. आठवलेंची आणि प्राचार्यांची भेट झाल्यास या प्रकरणाचा तिढा सुटेल अशी आम्हांला अपेक्षा होती. ठरल्याप्रमाणे आठवले कॉलेजसमोरून जाणार त्या दिवशी आणि नियोजित वेळेला आम्ही काही जण कॉलेजसमोरच्या रस्त्यावर थांबलो होतो.
आठवले पहिल्यांदाच मंत्री झाले होते. जिल्ह्यात ते येण्याच्या मार्गावर त्यांचे ठिकठिकाणी स्वागत होणे स्वाभाविक होते. आम्हीही तशी तयारी केली होती. आठवलेंची गाडी आली. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांच्या आणखी एक दोन गाड्या होत्या. आम्हांला पाहताच गाड्या हळू झाल्या. आम्हांला वाटले, आता गाड्या थांबणार. विद्यार्थ्यांच्या हातात पुष्पहार होते आणि ते उत्साहातही होते. विद्यार्थी पुढे झाले, पण झाले निराळेच. गाड्या थांबण्याऐवजी त्यांनी वेग घेतला आणि त्या सुसाट निघाल्या. विद्यार्थी आणि आम्ही गडबडलो. आता लगेच काय करायचे हे सुचेना. काही विद्यार्थी हिरमुसले झाले. तर काहींनी तातडीने मोटारसायकली सुरू केल्या आणि ते आठवलेंच्या गाडीमागे निघाले. त्यांना माहीत होते की पुढे सावद्याला काही कार्यकर्ते आठवलेंचे स्वागत रस्त्यावर करणार आहेत, तिथे आठवले थांबतील. तिथे त्यांना भेटून काही कल्पना देता येईल या हेतूने मुले निघाली. हे सगळं काही इतक्या वेगानं घडलं की कुणाच्या काही लक्षात आलं नाही.
नंतर कळलं की, मुलं सावद्याला पोचली तेव्हा आठवले सावद्यामध्ये थांबून पुष्पहार स्वीकारून पुढं रवाना झाले होते. मुलं नाराज झाली. संध्याकाळी काही मुलं घरी आली. दुपारच्या या घटनेनं ती काहीशी नाराज होती. पण आठवले कॉलेजसमोर का थांबले नाहीत, याची माहिती त्यांनी घेतली होती. आठवले ज्या गाडीत होते त्याच गाडीत त्यांचे जिल्ह्यातील कार्यकर्ते रमेश मकासरे, रमेश इंगळे आणि मोहन निकम हे होते. त्यांनी आम्हांला पाहताच आठवलेंची काही तरी दिशाभूल केली होती. एक तर विटंबना प्रकरण धुमसत होतं. रोज पेपरमध्ये त्याच्या बातम्या येत होत्या. ज्या कॉलेजमध्ये हे प्रकरण घडलं होतं. त्या कॉलेजच्या व्यवस्थापनाचे अध्यक्ष ना. मधुकरराव चौधरी हे होते. ते विधानसभेचे अध्यक्षही होते. ना. चौधरी हे काँग्रेसचे नेते आणि ना. आठवले हे भारिपचे नेते, आणि त्या वेळी काँग्रेस आणि भारिप (आठवले गट) यांची युती होती. या युतीमुळेच आठवले यांना मंत्रिपद मिळाले होते. म्हणजे काँग्रेसशी आठवलेंचे सख्य होते. इथे थांबले तर आपल्या राजकीय संबंधांवर काही परिणाम होईल की काय, अशी शंका त्या कार्यकर्त्यांनी आठवलेंजवळ बोलून दाखवली आणि क्षणात इथे थांबणे गैरसोयीचे आहे असा विचार करून पुढे जाण्याचा निर्णय यांनी घेतला होता.
हा सगळा जो घोळ झाला होता त्याला जिल्ह्यातील कार्यकर्ते जबाबदार होते. आम्ही तर असा विचारही करू शकत नव्हतो. पण कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे मुलांच्या मनात चीड निर्माण झाली होती. कॉलेजमधल्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमागे उभे राहण्याऐवजी त्यांनी त्यांच्या सोयीचा विचार केला होता. एकूण वातावरण असे होते की त्यामुळे ते निवळण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या मनात अधिकच धुमसायला लागले होते. आपल्या विचारांचा मंत्री, सोबत आपल्याच विचारांचे लोक, ज्या फुले-आंबेडकरांच्या कर्तबगारीमुळे आठवलेंसारख्या मास लीडरला मंत्रिपद मिळाले होते, ते आठवले आणि त्यांचे कार्यकर्ते फुले-आंबेडकर छायाचित्र विटंबना प्रकरण आपल्या सोयीने विचारात घेत होते. विद्यार्थी अशाच आशयाची चर्चा करीत होते.
शेवटी सर्वांच्या चर्चेतून एक निष्कर्ष असा निघाला की, पुढच्या वेळी जेव्हा आठवले जळगाव जिल्ह्यात येतील तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करायचा. म्हणजे मग त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आपण जे केले ते ठीक केले नाही याची जाणीव होईल. पुढे आठवलेंचा जिल्हा दौरा कधी असेल हे माहीत नव्हतं, पण मुलांनी निर्णय घेतला होता.
७
एका संध्याकाळी केदारे आणि त्यांचे काही कार्यकर्ते मित्र बामणोदहून आले. त्यांनी डॉ.आंबेडकर नगरात लोकवर्गणी गोळा करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला होता. त्या पुतळ्याचं अनावरण रामदास आठवले यांच्या हस्ते होणार होतं. आठवले मंत्री असल्यामुळे साहजिकच त्यांच्या हस्ते अनावरण व्हावं असं स्थानिक कार्यकर्त्यांना वाटत होतं. मी केदारे आणि त्यांच्या मित्रांना सांगितलं, मी आणि माझे इतर मित्र, विद्यार्थी कार्यकर्ते कार्यक्रमाला येतो. पण मागच्या पंधरवड्यात जे झालं त्यामुळं मुलांच्या मनात संताप आहे. पुतळ्याचं अनावरण झालं की आम्ही मंत्रिमहोदयांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करू. आम्हांला कार्यक्रम उधळायचा नाही. कार्यक्रम व्हावा असं आम्हालाही वाटतं. पण जे झालं ते ठीक झालं नाही, हे आठवलेंच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात यायला हवं. आणि ते लक्षात आणून देण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.
कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक गेल्या एक-दीड महिन्यापासून अस्वस्थ आहेत. त्यांची अस्वस्थता पण समजून घ्यायला हवी आहे. केदारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आमचे म्हणणे पटले होते. कॉलेजसमोरून आठवले आपल्या कार्यकर्त्यांसोबत गेले आणि विद्यार्थ्यांनी विनंती करूनही ते थांबले नाहीत याचे त्यांनाही वाईट वाटले होते. उलट त्यांनी निदर्शनाला सहमती दर्शविली. एका अर्थाने त्यांचा आम्हांला छुपा पाठिंबा मिळाला. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी अरुण पिंजारीने मोठे काळे कापड दुकानातून विकत घेतले. त्याने बायकोला त्याचे तुकडे करून छोटे छोटे झेंडे शिवायला सांगितले. त्याच्या बायकोनं घरी मशीनवर बसून 20/22 झेंडे तयार केले. रुमालाच्या आकाराचे ते झेंडे होते. खिशात सहज एक झेंडा मावू शकत होता. झेंड्यात हातभर काडी खुपसली की सहज झेंडा फडकत होता. दरम्यान मुलांना गावोगावी निरोप पोचवले होते. त्या वेळी मोबाईलची सोय नव्हती. पण एस. टी. स्टँडवर गेलं की त्या त्या गावाचं कुणी ना कुणी भेटत असे किंवा हातोहात निरोप पोचवले जात असत.
मुलांमध्ये उत्साह होता. एक एक करून बामणोदला कार्यक्रमाच्या ठिकाणी मुलं येऊ लागली. मी, अरुण पिंजारी आणि शेख अब्दुल्ला असे तिघे अब्दुल्लाच्या राजदूत मोटारसायकलवरून बामणोदला पोचलो. या आंदोलनात अब्दुल्लाची मोटारसायकल खूप कामाला येत होती. एक तर ती राजदूत म्हणजे दणकट गाडी आणि ती, तो रॉकेल टाकून चालवत असे. त्यामुळं फारसा खर्चही येत नव्हता. या निदर्शनाच्या कार्यक्रमामुळे अब्दुल्ला आणि अरुण पिंजारी खूपच उत्साहात होते. आम्ही केदारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटलो. परिस्थितीचा अंदाज घेतला. निदर्शनांची बातमी फुटू नये, ही काळजी आम्ही घेतली होती. तरीही काही सांगता येत नाही, म्हणून चाचपणी करत होतो.
बामणोदच्या लोकांनी आम्हांला खरोखर पाठिंबा द्यायचा असं ठरवलं होतं हे लक्षात आलं. अरुण पिंजारीने मुलांजवळ झेंडे वाटले. त्यांनी ते आपापल्या खिशात ठेवले आणि हातात एक काडी घेऊन, काडीशी चाळा करत ते कार्यक्रमाठिकाणी वावरू लागले. लोकांची गर्दी वाढत होती. गावातील सरपंच आणि इतर मंडळी जमली होती. मी पोलिसांचा अंदाज घेतला. पोलिस फक्त दोन-तीन होते, आणि ते फैजपूर पोलिस स्टेशनचे होते. साहजिकच ते मला ओळखत होते. बामणोद हे गाव फैजपूर पासून अवघे आठ-दहा कि.मी. अंतरावर असल्यामुळे ते फैजपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी किशोर मेढे आणि आणखी दोन-तीन प्राध्यापक आले. ते आल्यामुळं मला बरं वाटलं. म्हणता म्हणता कार्यक्रमाचा उत्साह शिगेला पोचला आणि आले आले असा गलका होऊन मंत्रिमहोदयांचे आगमन झाले. त्यांच्यासोबत अर्थातच जिल्ह्यातील त्यांचे जवळचे कार्यकर्ते होते. त्यात रमेश मकासरे, रमेश इंगळे आणि निकम व त्याबरोबरच कार्यकर्त्यांचे मोठे लेंढार होते.
मंत्रिमहोदयांचे स्वागत वगैरे झाले आणि सगळी मंडळी बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे निघाली. सगळीच घाई. कार्यकर्त्यांची रेलचेल. दाटीवाटी खूप झालेली होती. या गर्दीतही जतीन मेढे, किशोर मेढे, भारत तायडे, महेंद्र तायडे असे अनेक विद्यार्थी नजरेनं माझ्याशी संपर्क ठेवून होते. आम्ही डोळ्यांनीच आणि प्रसंगी हातवारे करून बोलत होतो. आठवलेंनी पुतळ्याचे अनावरण केले. टाळ्या वाजल्या. लोक आनंदात होते. तिथेच बाजूला टेबल खुर्च्या मांडून पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था केली होती. आंबेडकर नगरात पुतळ्यासमोरच लोक जमिनीवर दाटीवाटीनं बसले होते. आम्ही काही मित्र बाहेरच्या वर्तुळात उभे होतो. तिथून एकूण परिस्थितीचा मला अंदाज येत होता. स्थानिक लोक प्रास्ताविकपर, स्वागतपर काही बोलत होते. त्या दरम्यान मी जमेल तसं पुढं सरकून आठवलेंच्या समोर लोकांच्या गर्दीत खाली जमिनीवर बसलो. रमेश इंगळे, रमेश मकासरे आणि इतर कार्यकर्त्यांचे माझ्याकडे लक्ष होते पण त्यांनी फारशी दखल घेतली नव्हती.
दरम्यान आठवले बोलायला उभे राहिले. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक आतुर होते. आपल्या गावात मंत्री आले, त्यांनी पुतळ्याचे अनावरण केले याचेच अप्रूप लोकांना होते. गावातील इतर ज्येष्ठ आणि मान्यवर लोकांमध्येही आनंदाची भावना होती. एवढ्या छोट्या कार्यक्रमासाठी कॅबिनेट मंत्र्याने वेळ काढावा याचे त्यांनाही नवल वाटत होते. आम्ही मंत्रिमहोदयांना आणू शकतो, अशी भावना आठवलेंच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर होती. ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता त्या बामणोद गावातील दलित कार्यकर्त्यांच्या बद्दलही गावातील लोकांचे मत एकूण चांगले दिसत होते. म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. आठवले उभे राहिले. त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी जमाव आतुर झाला होता. आठवले चार पाच वाक्यं बोलले असतील त्या क्षणी मी गर्दीतून उठून त्यांच्यासमोर उभा राहिलो. खिशातून काळा झेंडा काढून तत्काळ त्यात काडी खुपसून हात वर करून मी फडकावला आणि जोरात ओरडलो. ‘‘निषेध... निषेध... रामदास आठवले यांचा निषेध’’.
मी ओरडत असताना चारी बाजूंनी विद्यार्थी फटाफट उठून, सरसावत झेंडे काढून निषेध... निषेध ओरडू लागले. क्षणभर, काय झाले हे कोणालाच कळले नाही. मात्र या प्रकारामुळे आंबेडकर नगरमधील नागरिक एकदम गोंधळले. उठून उभे राहिले आणि पळापळ करू लागले. बायाबापड्या आपल्या लेकरांना घेऊन धावू लागल्या. विद्यार्थी अधिकच चेकाळून ओरडू लागले. लोक पळू लागले. खुर्च्यांवर बसलेले मान्यवर, इतर लोक, विद्यार्थी यांच्यात धुमश्चक्री सुरू झाली. एकच पळापळ, धावाधाव सुरू झाली. आठवले हिरमूढ होऊन पाहत उभे राहिले. त्यांचे कार्यकर्तेही गोंधळून गेले. दोन-तीन पोलीस होते त्यांना तर काहीच कळेना. ते फक्त लोकांची धावाधाव पाहत होते. धावपळीमुळं परिसरातील धूळ उडत होती. सगळीकडे धुराळा झाला आणि जेव्हा वातावरण निवळले, तेव्हा आठवलेंचे कार्यकर्ते आणि माझी झोंबाझोंबी सुरू झाली.
ते माझ्या अंगावर चालून आले, त्यांच्या दृष्टीने त्यांची खूप मोठी बेअब्रू झाली होती. मी पण त्यांच्या अंगावर चालून गेलो. विद्यार्थ्यांनी माझ्याभोवती कडे केले. समोर आठवले, बाजूला त्यांचे कार्यकर्ते आणि आम्ही अशी बाचाबाची सुरू झाली. दरम्यान आठवलेंना माझी माहिती कोणीतरी पुरवली होती. आठवले म्हणाले, ‘‘सर हे तुम्ही चांगलं केलं नाही. मी मंत्र्यांच्या सभा उधळल्या आहेत. पण आतापर्यंत माझी सभा कोणी उधळली नाही.’’ मी म्हणालो, ‘‘मग आता कळले ना? की तुमची पण सभा कोणीतरी उधळू शकतो?’’ आठवलेंना वाटले होते, आम्ही अभाविपचे कार्यकर्ते असून नामांतरासंबंधी भूमिका मांडण्यासाठी हे सगळं कारस्थान रचलेलं आहे. कारण त्या वेळी नामांतराची मागणी जोर धरत होती. आठवले मंत्रिमंडळात असल्यामुळे विद्यापीठ नामांतर होईलच अशी खात्री बाळगली जात होती आणि अभाविपने नामांतराच्या मागणीचे समर्थन केले होते. शिवसेनेने विरोध नोंदवलेला होता.
आठवले म्हणाले, ‘‘मला वाटलं, अभाविपचे पोरं दिसताहेत. एकेकाला धरून हाणलं असतं मी, पण मला कळलं की हे बाळासाहेबांच्या कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक आहेत त्यामुळं आम्ही शांत आहोत.’’ पुढं ते मला म्हणाले, ‘‘सर तुम्ही आधी संपर्क केला असता तर गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसवर मी तुम्हाला अर्धा तास दिला असता.’’ मी म्हणालो, ‘‘मग तुमची सभा पण कोणीतरी उधळू शकतो हे तुम्हाला कसं कळलं असतं? आणि जिल्ह्यातील या तुमच्या कार्यकर्त्यांची काय लायकी आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं असतं? हे कार्यकर्ते तुमची दिशाभूल करतात आणि तुम्ही पण त्यांच्यावर विसंबून निर्णय घेता.
गेला महिना-दीड महिना फैजपूरची मुलं आंदोलन करताहेत... त्या दिवशी जर तुम्ही कॉलेजमध्ये दहा मिनिटांसाठी आला असता तर फरक पडला असता. प्राचार्य आणि मॅनेजमेंट यांनी काहीतरी दखल घेतली असती. फुले-आंबेडकरांच्या छायाचित्र विटंबना प्रकरणी कॅबिनेट मिनिस्टर कॉलेजला भेट देऊन जातात असा संदेश गेला असता आणि प्राध्यापकांचे-विद्यार्थ्यांचे मनोधैर्य उंचावले असते.’’ एकूण प्रकरणाचा रागरंग आठवलेंच्या लक्षात आला होता. विद्यार्थ्यांची आणि प्राध्यापकांची चीड त्यांना जाणवली होती. स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन मग आम्हांला सगळ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात नेलं. तिथे आणखी चर्चा झाली. ही निदर्शने आठवलेंच्या मनाला लागली होती. ते दुखावले गेले होते. आपल्या कार्यकर्त्यांनी खरोखर काही गोष्टी लपवल्या आहेत, हेही त्यांना कळून चुकले होते.
मधुकरराव चौधरी हे विधानसभेचे अध्यक्ष, कॉलेजच्या व्यवस्थापनाचे अध्यक्ष, पुरोगामी विचारसरणीचा माणूस आणि त्यांच्या कॉलेजमध्ये हे सगळं चाललेलं आणि आपल्यापर्यंत पोचलं नाही, याचं आठवलेंना नवल वाटलं होतं. ते कार्यकर्त्यांवर ओरडले. त्यांना आठवलेंनी चक्क शिव्या दिल्या. ‘‘माझ्या गाडीत, माझ्या बाजूला बसता, माझ्यासोबत हिंडता, मग अशा गोष्टी का सांगत नाही?’’ कार्यकर्त्यांची बोबडी वळत होती. आठवले धुमसत होते. दरम्यान पोलिसांची गाडी बामणोदला दाखल झाली होती. पोलीस इन्स्पेक्टरने परिस्थितीची पाहणी सुरू केली. आठवले इन्स्पेक्टरना म्हणाले, ‘‘आत्ताच्या आता एस.पींना फोन लावा. त्यांना इकडे बोलवा. मला त्यांच्याशी बोलायचंय.’’ पण दरम्यान एस.पी. बामणोदकडे निघाले होते. पोलिसांचा फौजफाटा वाढला होता. वातावरणात अस्वस्थता होती. पोलीस मारक्या म्हशीसारखे माझ्याकडे पाहत होते. विद्यार्थी तर आंदोलन यशस्वी म्हणून जाम खूश होते. बामणोदचे दलित कार्यकर्ते भेटले. डोळ्यांनीच बोलत होते. त्यांचा पाठिंबा यशस्वी ठरला होता.
पंधरा-वीस मिनिटांत एस.पी. दाखल झाले. त्यांचे नाव राज खिलनानी. त्यांची आणि आठवलेंची चर्चा झाली. आठवले म्हणाले, ‘‘मला आठ दिवसांत अहवाल पाहिजे. हे सगळं प्रकरण कोणी केलं आहे? यामागे कोण सूत्रधार आहे? कॉलेजचे प्राध्यापक आणि विद्यार्थी दहशतीखाली आहेत, त्यांचे मनोधैर्य खचले आहे. मी मुंबईत बाळासाहेबांशी बोलतो. हे प्रकरण मिटलं पाहिजे.’’ चर्चा संपली. आठवलेंचा ताफा निघून गेला. आम्ही फैजपूरकडे निघालो. अरुण पिंजारी आणि शेख अब्दुल्लाच्या चेहऱ्यावर हसू होतं. विद्यार्थी खुशीत होते. एकूण निदर्शने यशस्वी झाली होती. अर्ध्या तासात सगळे पंचवीस-तीस विद्यार्थी घरी दाखल झाले. दुपार झाली होती. सगळ्यांना भूक लागली होती. बायकोनं अंगणात चूल पेटवली. पिठलं, भाकरी केल्या. मुलं तिच्या मदतीला होतीच. टप्प्याटप्प्याने सगळे जेवले. वडिलांच्या चेहऱ्यावर काळजी होती, पण माझ्या लढाऊपणामुळे ते समाधानी होते.
आई विकलांग होऊन खाटेवर बसली होती. दोन वर्षांपासून आजार तिला खंगवत होता. तिच्या डोळ्यांत पाणी होतं. लहान अभीला मुलं लाडानं खेळवत होती, घेऊन फिरत होती. मुलं संध्याकाळी घरोघरी गेली. मुलांनी इत्थंभूत वृत्तांत बायकोला सांगितला होता. तिच्या मनात भीती दाटून आली होती. तिची अस्वस्थता माझ्या लक्षात येत होती. दुसऱ्या दिवशी लोकमतने ठळक बातमी दिली. ‘‘आठवलेंच्या सभेत विद्यार्थ्यांची उग्र निदर्शने’’ ही बातमी अरुण पिंजारीनेच दिली होती. या बातमीची जिल्हाभर चर्चा झाली. दुपारी मला पोलिस स्टेशनला बोलावण्यात आलं. इन्स्पेक्टर आणि पोलिस अस्वस्थ दिसत होते. मी इन्स्पेक्टरच्या समोर जाऊन बसलो. त्यांनी पाणी मागवलं. नंतर चहा आला. ते बेचैन होते. बहुधा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना विचारणा केली असावी. त्यांची स्थानिक गुप्तचर यंत्रणा सपशेल अयशस्वी ठरली होती.
इन्स्पेक्टर म्हणाले, ‘‘सर, कॅबिनेट मिनिस्टरची सभा तुम्ही उधळली आणि त्याची चौकशी वरून सुरू झाली आहे. आम्हांला तर काहीच कल्पना आली नाही. ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. यापुढे असं आंदोलन करताना काळजी घ्या. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतो, आणि असे प्रश्न चिघळू शकतात. नशीब परिस्थिती हाताबाहेर गेली नाही... वगैरे वगैरे...’’ मी पोलिस स्टेशनमधून बाहेर पडलो. घराच्या दिशेने निघालो. बायको, आई-वडिलांची काळजी मला स्वस्थ बसू देत नव्हती. लहानग्या अभीचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा. विद्यार्थ्यांच्या सहकार्याबद्दल अभिमान वाटायचा. विद्यार्थीदेखील माझ्यासारखेच जिद्दीला पेटले होते. रात्री झोप यायची नाही. तासन् तास मी नुसता विचार करीत बसायचो. मनातली खदखद शांत बसू देत नव्हती.
8 -
प्रा.सोनाळकर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी होत नाहीये असं दिसताच ‘प्रशिक’ संघटनेने आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. त्यांनी मला विश्वासात घेऊन चर्चा केली, उपोषणाला किती प्रतिसाद मिळेल याचा अंदाज घेतला. आपले आंदोलन हायजॅक होऊ नये याची काळजी जळगावच्या ‘प्रशिक’ विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी कार्यकर्ते घेत होते. विशेषत: राजाराम गाढे या सीनियर राजकीय कार्यकर्त्याला ते दूर ठेवत होते. त्याची लुडबूड चालू देत नव्हते, कारण गाढे हे संधिसाधू आणि प्रस्थापितांशी नेहमी तडजोड करणारे कार्यकर्ते आहेत असे त्यांचे ठाम मत होते. ते आपापली व्यूहरचना ठरवत होते. माझ्या संपर्कात होते. ‘प्रशिक’च्या आमरण उपोषणाला आम्ही सहमती दर्शवली. सिध्दार्थ विद्यार्थी मंडळाचे विद्यार्थी या आमरण उपोषण आंदोलनात सहभागी होण्यास तयार होते, नव्हे त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या आंदोलनामुळे ते थ्रिल अनुभवत होते आणि पुस्तकाबाहेरचं संघर्षाचं जीवन वाचत होते, अनुभवत होते.
उपोषणाची तारीख ठरली. जिल्हाधिकारी विद्याधर कानडे यांना निवेदन देण्यात आले आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर मंडप टाकून विद्यार्थी उपोषणाला बसले. पहिला दिवस तर कसा गेला कोणाला काही कळले नाही. मला विद्यार्थी मंडपात उशिरापर्यंत थांबू देत नव्हते. मी रात्री फैजपूरला जाऊन सकाळी कॉलेजचे तास आटपून येत होतो. कधी अरुण पिंजारी तर कधी अब्दुल्ला तर कधी दोघंही बरोबर असायचे. विद्यार्थ्यांचे उपोषण आंदोलन वर्तमानपत्रांनी उचलून धरले, पण ‘लोकमत’मध्ये बातमीला जागा मोठी मिळत होती. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सिध्दार्थ विद्यार्थी मंडळाचे विद्यार्थी कावरे- बावरे झाले. त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. महेंद्र तायडे हा विद्यार्थी तर रडू लागला. त्याला विश्वासात घेऊन विचारलं, तर आईची आठवण येतेय असं सांगू लागला. पण तो उपोषणातून माघार घ्यायला तयार नव्हता. मुलं जिद्दीला पेटली होती. त्यांचे चेहरे उतरले होते. काही तर सतरंजीवर पडून होते. काही मुलं अशक्तपणा वाटू लागला अशी तक्रार करीत होते.
पोलिस आजूबाजूला फिरत असायचे, त्यांच्या लक्षात परिस्थिती आली. त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांना पाचारण केलं. डॉक्टरांनी मुलांना तपासलं आणि तातडीने त्यांना ॲडमिट करण्याचा निर्णय घेतला. मुलं ॲडमिट व्हायला तयार नव्हती. शेवटी बळाचा वापर करून पोलिसांनी चार-पाच मुलांना सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलं. भरत तायडे, महेंद्र तायडे यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना सलाईन लावण्यात आलं. दुसऱ्या दिवशी ॲडमिट झालेल्या, सलाईन लावलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो ‘लोकमत’ने प्रसिध्द केले. जिल्हाभर उपोषण आंदोलनाची चर्चा सुरू झाली आणि कॉलेजच्या व्यवस्थापनाच्या अडेलपणावर टीका होऊ लागली. दबाव वाढू लागला. बाळासाहेबांपर्यंत बातमी पोचली. त्यांनी कॉलेज मॅनेजमेंटला लक्ष घालायला सांगितलं. सहाव्या दिवशी कॉलेजचे चेअरमन आणि प्राचार्य उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत घातली. प्रा. सोनाळकर यांच्या अहवालाची अंलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या उपोषणाची सांगता झाली. या सर्व प्रकरणात माझ्या बाजूने आणि सिध्दार्थ विद्यार्थी मंडळाच्या बाजूने अनेक संघटना बोलत होत्या, कृती आणि आंदोलन करत होत्या. आमच्या बाजूने रान उठवत होत्या. पण संशयित विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना भडकावणाऱ्या प्राध्यापकांच्या बाजूने कोणी बोलायला तयार नव्हतं. त्यांच्या वतीने कोणी भूमिका घ्यावी असं वातावरण नव्हतं आणि वास्तवही तसं नव्हतं, पण अचानक तथाकथित लेवा युवासंघाने माझ्या विरोधात ‘लोकमत’मध्ये पत्रक प्रसिध्द केलं.
‘प्रा.जाधव यांना हटवा’ अशी मागणी त्यांनी केली होती. मी विद्यार्थ्यांना कसं भडकावतो आहे आणि आंदोलन धुमसत ठेवतो आहे, याचं वर्णन करून त्यांनी, कॉलेज व्यवस्थापनाने जाधव सरांना नोकरीवरून काढावं असं आवाहन केलं होतं. एव्हाना पुलाखालून इतकं पाणी वाहून गेलं होतं की, मी जर माझ्या चुकीमुळे रस्त्यात अपघातात सापडून ठार झालो असतो तर माझा कोणीतरी घातपात केला असा संशय लोकांना आला असता. इतकी परिस्थिती चमत्कारिक झाली होती. त्यामुळं व्यवस्थापन मला नोकरीवरून काढण्याचा धोका पत्करू इच्छित नव्हतं. कारण जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असत्या आणि प्रकरण आणखी हाताबाहेर गेले असते. लेवा युवासंघाच्या पत्रकाला मी माझ्या नावाने आणि माझ्या जबाबदारीवर दुसऱ्या दिवशी ‘लोकमत’मधून सडेतोड उत्तर दिलं होतं.
‘लेवा युवासंघा’ने बुध्दिदारिद्य्राचे प्रदर्शन करू नये’ या हेडिंगखाली बातमी प्रसिध्द झाली. चौकशी समितीच्या बैठका, घडलेला घटनाक्रम आणि आमची आंदोलनामागची भूमिका मी त्यात मांडली होती. या पत्रकाचा व्हायचा तोच अपेक्षित परिणाम झाला. नंतर लेवा युवा संघाने पत्रकबाजी केली नाही. पण प्राचार्यदेखील माझ्या पत्रकाने आणि त्यातील निर्भीड तर्कशुध्द व्यक्तिवादाने हादरले होते. मला त्यांनी खाजगीत विनंती करून अशी आक्रमक पत्रकबाजी करू नका असं सांगितलं. खरं तर मी विधायक मार्गाने आत्मसन्मानाची लढाई लढत होतो. लेवा युवासंघाने खोडसाळपणा केला, म्हणून मी आक्रमक प्रत्युत्तर दिले होते.
9 –
दिवस जात होते. पण छायाचित्रांची विटंबना करणारी मुलं आणि मुलांना भडकावणारी प्राध्यापक मंडळी यांना व्यवस्थापन पाठीशी घालत होतं. प्रशिक आणि इतर विद्यार्थी संघटना वारंवार वर्तानपत्रात पत्रकं प्रसिध्दीला देऊन या मागणीचा पाठपुरावा करत होत्या. पण कॉलेजचं व्यवस्थापन ढिम्म होतं. कारण उघड होतं, ज्या मुलांनी हे सगळं केलं होतं आणि ज्या प्राध्यापकांनी त्यांना भडकावलं होतं ते व्यवस्थापनाशी संबंधित होते. त्यांचे आपसात हितसंबंध होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल असं वाटत नव्हतं, पण हातावर हात ठेवून चालणार नव्हतं. ही आत्मसन्मानाची लढाई होती. ज्या फुले-आंबेडकरांना आपण आदर्श मानत आहोत, ज्यांच्या विचारांमुळेच आपल्याला आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग आणि दिशा सापडली होती, तिच्याशी तडजोड करून चालणार नव्हतं. पण विद्यार्थ्यांची ताकद कमी पडत होती. कोणताही आततायीपणा करायचा नाही, कारण त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी तो चिघळेल अशा सूचना मुलांना दिलेल्या होत्या. त्यामुळं मुलं शांत होती. दोषी विद्यार्थी कोण आहेत हे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत होतं. पण त्यांना हात लावायचा नाही, कायदा हातात घ्यायचा नाही, असं ठाम ठरवल्यामुळं विद्यार्थी शांत बसून होते.
एका बैठकीत हा मुद्दा निघालाच. विद्यार्थी म्हणाले, ‘‘सर हे असं किती दिवस चालणार? अशाने या प्रकरणाचा निकाल लागेल असं वाटत नाही, आणि तुम्ही तर आम्हांला कोणतीही मोकळीक पण देत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी हे सगळं केलं आहे ते कॉलेजच्या आवारात आमच्यासमोर दिमाखानं फिरताहेत आणि ‘तुम्ही काय करून घ्याल’ असा त्यांचा आव आहे. या परिस्थितीत आम्ही काय करायचं?’’ काहीतरी ठरवलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं म्हणणं बरोबर होतं आणि ते मला मान्यही होतं. पण कोणत्याही प्रकारे भावनेच्या भरात बेजबाबदारीनं वागणं मला पटत नव्हतं. बाळासाहेबांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कानावर हे सगळं टाकायला हवं एवढाच एक मार्ग होता. पण माझ्याविषयी व्यवस्थापनाने बाळासाहेबांचा गैरसमज करून दिला होता. या सगळ्या प्रकरणात प्रा.जाधव यांच्यामागे पडद्याआड सुरेश जैन आणि जि.तु.महाजन आहेत असं काहीतरी चुकीचं त्यांच्यापर्यंत पोचवण्यात आलं होतं.
सुरेश जैन आणि जि. तु. महाजन हे बाळासाहेबांचे राजकीय विरोधक होते. आणि ‘लोकमत’ने हे प्रकरण पहिल्यापासून उचलून धरलं होतं. ‘लोकमत’ ज्या दर्डांचे आहे त्यांचे जवळचे नातेवाईक सुरेश जैन असा काहीतरी तो तर्क होता. तर्क म्हणून तो बरोबर असेलही, पण या प्रकरणात जैन आणि महाजन यांचा काडीचाही संबंध नव्हता. मी त्या काळात आणि नंतरही कधी त्यांना भेटलेलो नाही. तशी त्यांना मी भेटावं अशी परिस्थिती नव्हती आणि जरुरीही नव्हती. एक मात्र खरं होतं की, धों. ज. गुरव हे जळगाव लोकमतचे वृत्तसंपादक होते आणि ते माझे मित्रही होते. पण आमची मैत्री या प्रकरणाआधीपासूनच होती. त्यांना माझ्याविषयी सहानुभूती आणि प्रेम वाटणं स्वाभाविक होतं. माझा जाणीवपूर्वक कॉलेजच्या आवारात शेकडो विद्यार्थ्यांसमोर आणि प्राध्यापकांसमोर झालेला अपमान त्यांनाही अस्वस्थ करत होता.
बाळासाहेब चौधरी हे फुले-आंबेडकरी विचारांना मानणारे पुरोगामी नेते असूनही फुले- आंबेडकरांच्या छायाचित्र विटंबना प्रकरणी ते काहीच भूमिका घेत नाहीत, हे त्यांनाही न पटण्यासारखे होते. जैन आणि बाळासाहेब यांचे सख्य नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन गुरव मग या प्रकरणाचा पिच्छा ‘लोकमत’मधून करत होते. म्हणजे या प्रकरणाचा काही फायदा झालाच तर जैनांना होऊ शकतो आणि तोटा झालाच तर बाळासाहेबांना होऊ शकतो असे हे गणित असावे. या गणिताविषयी आम्हांला काही घेणं-देणं नव्हतं. उलटपक्षी, ही राजकीय परिस्थिती अशी नसती तर ‘लोकमत’ आमच्यामागे किती उभं राहिलं असतं हे पण सांगता येण्यासारखं नव्हतं. बाळासाहेबांना भेटून त्यांच्याशी सविस्तर बोलावं असा निर्णय विद्यार्थ्यांच्या बैठकीत झाला. पण बाळासाहेबांचे कार्यकर्ते तर आम्हांला त्यांना भेटू देणं शक्य नव्हतं. कारण बाळासाहेबांचा दौरा असायचा त्या वेळी त्यांच्या आगेमागे कार्यकर्त्यांचा मोठाच घोळका असायचा आणि आम्ही तर बाळासाहेबांची प्रतिमा मलिन करणारे खोडकर प्राध्यापक अशी काही तरी आमच्याबद्दल त्यांची समजूत होती. त्यामुळं जिल्हा दौऱ्यात बाळासाहेबांना कुठं भेटावं असा मोठाच प्रश्न आमच्यासमोर होता. आणि त्यांना भेटल्याशिवाय तर मार्ग निघणार नाही असंही आम्हांला वाटत होतं.
१० –
याच दरम्यान बाळासाहेबांचा जिल्हा दौरा वर्तानपत्रात जाहीर झाला. ते साकेगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका बैठकीसाठी येणार होते. साकेगाव येथील आयुर्वेद महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे बाळासाहेब अध्यक्ष होते. साकेगाव येथे जाऊन त्यांना भेटावे असे विद्यार्थ्यांसोबत ठरले. साकेगाव हे जळगाव आणि भुसावळ या दोन शहरांच्यामध्ये असलेलं छोटं गाव आहे. जळगाव-भुसावळ हा राष्ट्रीय महामार्ग आहे. आम्ही साकेगावला पोचलो. पंधरा-वीस विद्यार्थी माझ्यासोबत होते. साकेगाव येथील वैद्यकिय महाविद्यालयात जावं असं ठरवून निघालो, पण मुलांना कॉलेजच्या आवारात बाळासाहेबांचे कार्यकर्ते दिसले. त्यांनी शंका उपस्थित केली, हे कार्यकर्ते असताना ते आपल्याला बाळासाहेबांना भेटू देतील का? कार्यकर्ते आम्हांला बाळासाहेबांना भेटू देणं शक्यच नव्हतं. हे आम्हांला पक्कं ठाऊक होतं.
काय करावं... काय करावं... असा विचार चालू होता आणि मी एक धाडसी निर्णय घेतला. अरुण पिंजारी आणि शेख अब्दुल्ला सोबत होतेच. त्यांच्याशी बोललो. साकेगावच्या रस्त्यावरच्या बारक्या बस थांब्यावर विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन समजावून सांगितलं. सर्वांनी निमूट ऐकून घेतलं आणि आम्ही सगळे विखरून दोन-तीनच्या गटाने जळगावच्या दिशेने हायवे वरून निघालो. विधानसभेच्या अध्यक्षांच्या गाडीचा ताफा येण्याची एव्हाना वेळ झाली होती. आम्ही ज्या दिशेने चाललो होतो, त्याच्या उलट दिशेने म्हणजे आमच्या समोरून गाड्या येणार होत्या. थोड्याच वेळात महामार्गावर ताफा दिसू लागला. लाल दिव्याची ॲम्बॅसॅडर गाडी, त्याच्या पुढे पोलिसांची जीप, ॲम्बॅसॅडरमागे दोन-तीन गाड्या असा ताफा नजरेच्या टप्प्यात आला. आणि मी पुढे धावत हात वर करत निघालो. माझ्या मागे अरुण, अब्दुल्ला आणि त्यांच्यामागे विद्यार्थी. आम्ही रस्त्याच्या मधोमध हातवारे करत ताफ्याच्या दिशेने धावत होतो. अर्ध्या मिनिटात ताफ्याचा वेग कमी झाला. कचाकच गाड्यांचे ब्रेक दाबले जाऊ लागले आणि काही वेळातच रस्त्याच्या मधोमध आमच्यासमोर गाड्या थांबल्या.
पोलीस व्हॅनमधून फटाफट पोलिसांनी उड्या टाकल्या, इन्स्पेक्टरही होते. क्षणात त्यांनी मला गराडा घातला आणि ओरडून विचारलं, ‘‘ही काय भानगड आहे? काय चाललंय हे?’’ मी आणि विद्यार्थी शांत होतो. मी शांतपणे पोलिसांना सांगितलं, ‘‘मला बाळासाहेबांना भेटायचंय... मी फैजपूर कॉलेजला प्राध्यापक आहे, माझं नाव मनोहर जाधव आणि हे माझे मित्र आणि विद्यार्थी आहेत.’’ एक इन्स्पेक्टर वैतागून म्हणाला, ‘‘अहो, ही काय पध्दत आहे का?’’ दरम्यान पोलिसांनी बाळासाहेबांपर्यंत आमची बातमी पोचवली होती. त्यांनी काच खाली घेऊन एक नजर आमच्याकडे टाकली, आणि आम्हांला त्यांच्याकडे घेऊन यायला पोलिसांना सांगितलं. आम्ही पुढं गेलो. मी नमस्कार केला. त्यांनी ओळखलं. हसून मला म्हणाले, ‘‘काय जाधव सर, घेराव घातला का मला?’’ मी म्हटलं, ‘‘बाळासाहेब काहीही समजा, पण मला तुम्हाला भेटायचंय आणि तुमच्याशी बोलायचंय...’’ ते म्हणाले, ‘‘अहो मी कुठे नाही म्हणतोय? कॉलेजवर आता आपण भेटलो असतो ना! मी तिकडेच चाललोय.’’ ‘‘तीच तर अडचण आहे बाळासाहेब, तुमचे कार्यकर्ते आम्हांला भेटू देत नाहीत.’’ ‘‘म्हणून तुम्ही रस्त्यात गाडी रोखली का?’’ ‘‘गैरसमज करू नका, पण आमचा नाइलाज होता.’’
बाळासाहेबांच्या एव्हाना लक्षात आलं होतं, प्राध्यापक आणि मुलं अस्वस्थ आहेत. बाळासाहेब आणि आम्ही एकमेकांकडे पाहतोय. पोलीस आमच्याकडे पाहताहेत. हळूहळू रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढू लागली. लगेचच बाळासाहेब म्हणाले, ‘‘चला बसा गाडीत. आपण कॉलेजवर जाऊन बोलू.’’ मी म्हणालो, ‘‘थँक्यू... पण तुमच्या गाडीत बसत नाही. विद्यार्थ्यांसोबत पोलिसांच्या गाडीत बसतो.’’ त्यांनी पोलिसांना आम्हांला गाडीत घ्यायला सांगितलं आणि ताफा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात येऊन थांबला. बाळासाहेब तिथे असणाऱ्या त्यांच्या नेहमीच्या खोलीत घाईघाईने गेले आणि कार्यकर्त्यांना मला घेऊन यायला सांगितलं. मला आणि विद्यार्थ्यांना पाहताच नेहमीचे कार्यकर्ते हबकले. हे पोलिसांच्या गाडीतून बाळासाहेबांच्या ताफ्यात कसे आले, असा आश्चर्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यांवर होता. कार्यकर्ते मला घेऊन बाळासाहेबांच्या खोलीत आले.
बाळासाहेबांनी मला बसायला सांगितलं. मला पाणी दिलं आणि कार्यकर्त्यांना बाहेर जायला सांगितलं. बाळासाहेबांची धारदार नजर मला रोखून पाहत होती, पण त्या नजरेत विखार नव्हता तर कुतूहल होतं. मला म्हणाले, ‘‘हां, सांगा आता.’’ एव्हाना मी सावरलो होतो. काय बोलायचं आहे याची जुळवाजुळव करत होतो. मी म्हणालो, ‘‘बाळासाहेब अशा पध्दतीनं गाडी रोखून आम्ही तुम्हाला अडचणीत आणलं, पण आम्हांला समजून घ्या. आमचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. माझा आणि तुमचा संवाद या विषयावर अद्याप कधीही झाला नाही. छायाचित्र विटंबना प्रकरण होऊन तीन महिने उलटून गेले आहेत. शेखर सोनाळकर यांच्या समितीने महिनाभरापूर्वीच कॉलेजच्या व्यवस्थापनाला अहवाल दिला आहे. त्या अहवालाची अंलबजावणी झाली पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे.
माझ्याबद्दल तुमच्या मनात कार्यकर्त्यांनी गैरसमज निर्माण करून दिला असण्याची शक्यता आहे. तुम्हाला माझ्याबद्दल नेमकं काय सांगण्यात आलं आहे मला माहीत नाही. पण मला राजकारणाशी काहीही घेणं देणं नाही. तुमचे कोणतेही विरोधक आमच्या पाठीशी नाहीत. त्यांची आम्ही कधीही मदत घेतली नाही. हे आंदोलन दलित विद्यार्थ्यांचे आहे आणि मी त्यात सक्रिय आहे. माझा काही दोष नसताना मला अपमानित केलं गेलं आणि राष्ट्रीय पुरुषांच्या छायाचित्रांची विटंबना केली गेली. सोनाळकर समितीच्या अहवालाची अंलबजावणी प्राचार्य आणि व्यवस्थापन करत नाहीय. त्यामुळे आपल्याला कोणीच विचारत नाही अशी भावना विद्यार्थ्यांत निर्माण झाली आहे. प्रकरण धुमसतं आहे. हे प्रकरण भिजत पडल्यामुळं प्राचार्य आणि व्यवस्थापनापेक्षा तुमच्या प्रतिमेला तडा जातो आहे. तुमची प्रतिमा जपणं हे त्यांचं काम आहे, त्यांची जबाबदारी आहे. तुमच्यापर्यंत नीट माहिती कोणी पोचवत नाही, म्हणून तुमच्या कानावर टाकण्यासाठी मला तुम्हाला भेटावं लागलं.”
मी जरा सविस्तर, तपशिलानं आणि धीटपणानं बोलत होतो. मनात जे साचलं आहे आणि जी वस्तुस्थिती आहे ती सांगणं हा माझा हेतू होता. मी बोलत असताना बाळासाहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. चष्म्यातून त्यांची नजर बोलत होती. पांढरे स्वच्छ धोतर, कुर्ता आणि डोक्यावर गांधी टोपी, गोरा वर्ण असलेले बाळासाहेब मला बोलू देत होते. त्यांनी मला मध्ये कुठेही थांबवलं नाही. माझं बोलणं संपल्यावर ते म्हणाले, ‘‘असं करा, तुम्ही जरा वेळ थांबा. मी प्राचार्य, चेअरमन, सेक्रेटरी यांना लगेच बोलावतो. मग चर्चा करू आणि निर्णय घेऊ.’’ मी बाहेर आलो. रिलॅक्स वाटत होतं. पुढं काय निर्णय होईल माहीत नाही, पण बाळासाहेबांशी चर्चा झाली हे समाधान होतं. तासाभरानं कॉलेजचे चेअरमन डॉ.डी.एच.पाटील, सेक्रेटरी चावरसशेठ चौधरी आणि प्राचार्य बी.एन. पाटील बाळासाहेबांच्या खोलीत दाखल झाले. मला आणि विद्यार्थ्यांना पाहून ते चमकले. कार्यकर्त्यांशी बोलले. एकूण परिस्थितीची त्यांना कल्पना आली असावी. बाळासाहेबांनी मला आत बोलावले. मी गेलो. खुर्चीवर बसलो. तिघांनी माझ्याकडे एकवार पाहून घेतलं आणि मग ते बाळासाहेबांकडे बघायला लागले. बाळासाहेबांनी एकदम विषयाला हात घातला.
त्यांनी विचारलं, ‘‘छायाचित्र विटंबना प्रकरणाच्या अहवालाचं काय झालं? तुम्ही तर म्हणाला होता की ते मार्गी लागलंय. पण ते अजून मार्गी लागलेलं दिसत नाहीय. ते तातडीनं मनावर घ्या... त्यात वेळ घालवू नका. मुंबईच्या वर्तानपत्रांनी चर्चा केली तर बरं दिसणार नाही. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घ्या. संस्थेची बदनामी होतेय. ती आणखी व्हायला नको. आठ दिवसांत कार्यवाही करा आणि मला तसं कळवा.’’ बाळासाहेब शेवटचं वाक्य अशा रीतीनं बोलले की, प्राचार्य आणि इतर मंडळी फारशी बोलण्याच्या फेरात न पडता दाराकडे वळली. मी उठलो. बाळासाहेबांना नमस्कार केला, आणि बाहेर पडलो.
पुढं काहीतरी हालचाल होईल अशी आशा निर्माण झाली होती. कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांना काय झालं ते सांगितलं. त्यांच्याही आशा पल्लवित झाल्या. मग आम्ही सगळे बसस्टँडच्या दिशेने निघालो. जाताना आम्ही सगळे चर्चा करत होतो. शेवटी ज्या पध्दतीनं बाळासाहेबांशी भेट झाली, त्या अनुभवामुळं विद्यार्थी हरखून गेले होते. समाधान तर मलाही होतंच. पण आपण फार मोठी रिस्क घेतली होती हे आता नंतर उमगायला लागंल होतं.
11 -
पुढच्याच आठवड्यात प्राचार्यांनी एका मोठ्या वर्गात ‘धनाश्री’चा प्रकाशन समारंभ आयोजित केला. ‘धनाश्री’ या नियतकालिकाचा पुन्हा सन्मानाने प्रकाशन समारंभ करावा आणि त्या समारंभात प्रा. मनोहर जाधव यांना सन्मानाने पाचारण करण्यात यावं असं अहवालात म्हटलं होतं. त्याप्रमाणे मला बोलावलं गेलं. प्राचार्य, चेअरमन, प्राध्यापक, विद्यार्थी होते. प्रकाशन समारंभानंतर मला बोलण्याची संधी दिली. मी निवेदन करताना म्हणालो, ‘‘मित्रहो, झालं ते फार क्लेशकारक होतं. पण कोणाचा आत्मसन्मान दुखावू नका. फुले-आंबेडकरांचे विचार समजावून घ्या. त्यांना जातीच्या परिघात पाहू नका. संस्था म्हणजे भव्य इमारती, सोयी सुविधा असं काही नसतं तर याच्याबरोबरीनं माणसं महत्त्वाची असतात. संस्था लहान किंवा मोठ्या माणसांमुळेच होत असतात. या भूमीवर काँग्रेसचं खेड्यातलं पहिलं अधिवेशन भरलं होतं. थोर पुरुषांचा पदस्पर्श या भूमीला झाला आहे. ही थोर परंपरा समजावून घेऊ आणि ती सांभाळण्याचा आपण प्रयत्न करू.’’ माझ्या बोलण्यावर कोणी काही भाष्य केलं नाही, पण मी बोललो ते ठीकच होतं असा भाव उपस्थितांच्या चेहऱ्यांवर होता.
दुसऱ्या दिवशी ‘धनाश्री’ नियतकालिकाचे सन्मानपूर्वक प्रकाशन’ अशी बातमी वर्तानपत्रात झळकली. काही दिवसांनी दोषी विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्यात आले. त्यांना फैजपूर कॉलेज सोडावे लागले. इतरत्र सोय व्हावी, अशी विनंती कॉलेजच्या प्रशासनानेच केली होती. त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही. मात्र, त्यांना इतरत्र जावे लागले. उपप्राचार्य भिरुड आणि प्रा.लाड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. अशी नोटीस बजावल्यामुळे त्यांना वाईट वाटले. असे काही होईल असे त्यांना वाटले नव्हते. त्यांचे चेहरे उतरले होते. वरील सगळी कार्यवाही सोनाळकर समितीच्या अहवालाच्या आधारेच झाली होती. कॉलेजमधील दलित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी कोणतीही चर्चा न करता, कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता, जणू काही झालेच नाही अशा पध्दतीने ही गोष्ट सहजपणे घेतली.
12 -
या आंदोलनामुळे एक समाजवास्तव माझ्या लक्षात आलं होतं. ते म्हणजे समाजातील बुध्दिजीवी म्हटल्या जाणाऱ्या, ज्ञानक्षेत्रात वावरणाऱ्या मंडळींची मानसिकता ही जातीयवादीच आहे. भलेही व्यवहार वरून सरळ दिसत असले तरी जात- मानसिकता ही बदललेली नाही. शिक्षणक्षेत्रातील मागासवर्गीय शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचे स्वरूप वेगळे आहे. जरी सर्व शिक्षकांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचे स्वरूप वेगळे असले तरी त्यांना स्वीकारण्याची आणि त्यांच्या गुणग्राहकतेची वृत्ती समाजात दुरापास्तच आहे. मी बी.ए.च्या प्रथम वर्षापासूनच कविता लिहायला लागलो होतो. जमेल तसं, सुचेल तसं लिहीत होतो. अस्मितादर्श, विशाखा, साधना, पारिजात, समुचित यांसारख्या वाङ्मयीन नियतकालिकांतून कविता प्रसिध्द होत होत्या. या आंदोलनामुळे मी अंतर्बाह्य ढवळून निघालो होतो. मुळातच असलेला सामाजिक दृष्टिकोन आणि बांधिलकी अधिक घट्ट झाली होती. परिवर्तनाच्या चळवळीत अधिकच सक्रिय झालो होतो. खूप वाचत होतो. जमेल तसे कविता, समीक्षा लिहीत होतो.
अधूनमधून आंदोलनाचा पट मनात डोकवायचा. नेणिवेत रुतून बसलेलं बरंच काही उसळी मारून वर यायचं. याच काळात कधीतरी निर्धार, संघर्ष, एका वळणावर, सावज या कविता लिहिल्या. त्यात या आंदोलनाचे संदर्भ होते. या काळातच उल्हासनगर येथील सुरेश सावंत या निष्ठावंत कार्यकर्त्याचा परिचय झाला. ते मुंबई परिसरात ‘मागासवर्गीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संसद’ ही संघटना चालवत होते. त्यांच्यासोबत चर्चा, बैठका झाल्या आणि त्यांच्या संघटनेची शाखा जळगाव जिल्ह्यात आम्ही स्थापन केली. पाचोऱ्याला भव्य उद्घाटन समारंभ झाला आणि माझी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली.
बी. डी. इंगळे या माझ्या जुन्या मित्राला सरचिटणीसपद मिळाले. जळगाव जिल्ह्यात आम्ही तालुकानिहाय शाखा बांधल्या. के.जी.टु.पी.जी. असे संघटनेचे कार्यक्षेत्र ठेवले. कार्यकर्त्यांचे मोहोळ उभे केले. वेगवेगळी आंदोलने उभारली. अन्यायग्रस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या भयावह स्वरूपाने चीड मनात निर्माण होत होती. बॅकलॉगचा प्रश्न हाती घेऊन दबाव निर्माण केला होता. दरम्यान, मी पीएच.डी.च्या कामाची जुळवाजुळव करत होतो. संघटनेच्या कामात फार वेळ जात होता. पण कर्तव्यबुध्दीने ते काम अंगिकारले होते. दुसऱ्या फळीची निर्मिती केली होती. आपण पूर्ण पाच वर्षे काम करायचे आणि दुसऱ्या फळीकडे नेतृत्व देऊन नंतर आपले ॲकॅडेमिक काम करायचे असे मी ठरवले होते.
एका दिवशी स्टाफरूममध्ये स्टाफ फाईल चाळताना मला युजीसीचे परिपत्रक दिसले. प्राचार्यांनी ते स्टाफ फाईलला लावले होते. मागासवर्गीय प्राध्यापकांसाठी विशेष फेलोशिपची योजना होती. दोन दिवसांत मी प्राचार्यांची सही घेऊन अर्ज दिल्लीला पाठवून दिला आणि संघटनेच्या कामात पुन्हा झोकून दिलं. वेळ मिळेल तसा रात्री उशिरा किंवा पहाटे उठून मी पीएच.डी.च्या संदर्भ नोंदी करत होतो. नावनोंदणी कुठे केली नव्हती, पण मी विषय (दलित स्त्रियांची आत्मकथने) निश्चित केला होता आणि त्या दिशेने जमेल तसे संदर्भ गोळा करत होतो. दोन-तीन महिन्यांतच युजीसीकडून पत्र आले. त्यांनी डायरेक्ट फेलोशिप ॲवॉर्ड केली होती. प्राचार्यांशी बोललो. त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली आणि प्राचार्यांनी मला डेप्युटेशनवर जाण्याची परवानगी दिली.
1 जून 1995 रोजी मी पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात टीचर फेलो म्हणून रुजू झालो. फेलोशिप दोन वर्षांची होती, पण एक वर्ष मुदतवाढ मिळू शकत होती. अभ्यास जोमाने सुरू केला होता. ज्योती आणि अभीला पुण्यात घेऊन आलो होतो. येरवडा येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्डात एक ब्लॉक भाड्याने घेऊन राहात होतो. त्याच परिसरात सासरे राहत असल्यामुळे त्यांचे सहकार्य मिळत होते. अभीचे नाव मोझे संस्थेतील शाळेत दाखल केले होते. एव्हाना ज्योतीचे एम.ए. पूर्ण झाले होते आणि तिने रानडे इन्स्टिट्यूटमध्ये वृत्तपत्र पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. सगळ्या भावंडांची लग्नं झालेली होती. ती आपापल्या नोकरीत स्थिरावली होती. 1992 च्या 28 ऑगस्टला आई आम्हांला सोडून गेली. ती आजारातून पूर्ण बरी झालीच नाही. मी पुण्याला आलो आणि दादा जळगावला मिलिंदकडे राहू लागले.
1996 मध्ये डॉ.नागनाथ कोत्तापल्ले पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुख म्हणून रुजू झाले आणि विभागाने कात टाकायला सुरुवात केली. अंग आकसून बसलेला मराठी विभाग कोत्तापल्ले सरांमुळे मोकळा ढाकळा वावरू लागला. मला पुन्हा फैजपूरला जाऊ नये असे वाटू लागले. इथे पुण्यातच कुठे नोकरी मिळाली तर पाहावं असं ठरवून मी प्रयत्न करू लागलो, पण नोकरी सहजासहजी उपलब्ध होईल असं वाटत नव्हतं. फैजपूरचा अनुभव जिव्हारी लागला होता. ती जखम भळभळत होती. पुन्हा त्या गावाचं तोंड पाहू नये असं राहून राहून वाटत होतं. प्रा.नंदू भंगाळे हे दर महिन्याला माझा पगार बँकेतून काढून त्याचा डी.डी. मला न चुकता पाठवत होते. माझा पीएच.डी.चा प्रबंध मी दोन वर्षांत पूर्ण केला होता. पण प्रबंध सादर करून परत फैजपूरला जावे लागले असते, म्हणून मी एक वर्ष मुदतवाढ घेतली आणि माझे मार्गदर्शक डॉ.रमेश आवलगावकर यांच्या सल्ल्याने इतर कामं करू लागलो.
मुदतवाढीसाठी कोत्तापल्ले सरांनी शिफारस केली होती. वेगवेगळ्या कामांत त्यांचे सहकार्य आणि मदत मिळत होती. मधल्या काळात पुणे विद्यापीठाची जाहिरात येऊन गेली होती. मराठी विभागात अधिव्याख्याता पदाची एस.सी. संवर्गासाठी एक जागा रिक्त होती. मी अर्ज केला होता. 1997 मध्ये मुलाखती झाल्या आणि माझी निवड झाली. 1998 च्या प्रारंभी मी मराठी विभागात रीतसर अधिव्याख्याता म्हणून रुजू झालो. कॉलेजने लीन दिली नाही. कोत्तापल्ले सर म्हणाले, ‘‘कॉलेजला राजीनाम्याची नोटीस द्या. एक महिन्याचा पगार भरून टाका. काळजी करू नका. मी सांभाळून घेईन.’’ त्याप्रमाणे मी केलं आणि फैजपूर सोडलं. फैजपूर सोडताना माझ्या मनात संमिश्र भावना होत्या, पण ऊर्वरित आयुष्यात फैजपूरला नोकरी करायची नाही ही माझी इच्छा पूर्ण झाली होती आणि त्याचा मला विशेष आनंद झाला होता.
मी बी.ए. आणि एम.ए.च्या वर्गात असताना शिकवायला प्रा.भानु चौधरी होते. भानु सर या नावाने ते ओळखले जायचे. ते खादीचे झब्बे घालत असत. गोल चेहरा, मध्यम उंचीचे भानु सर साहित्यविचार, समीक्षा, सौंदर्यशास्त्र फार उत्तम शिकवत. ते स्वत: कवी होते आणि शिल्प, चित्र, संगीत, नृत्य, अभिनय या विषयांतले जाणकार होते. त्यांच्या शिकवण्यामुळे मी प्रभावित झालो होतो. वेळोवेळी ते स्फुटलेखन करीत असत, पण या लेखनाचे पुस्तक मात्र त्यांनी केलेले नव्हते. विशेष म्हणजे भानु सर बाळासाहेबांच्या अत्यंत अंतर्गत निकट वर्तुळातले होते. कदाचित ते त्यांचे नातेवाईकही असावेत, पण बाळासाहेबांच्या राजकीय सत्तेचा वापर त्यांनी कधी व्यक्तिगत लाभासाठी केला नाही. उलट बाळासाहेब आणि इतर कार्यकर्त्यांना ते कलाक्षेत्राबाबत चर्चा करून माहिती देत असत. बाळासाहेबांच्या वडिलांचे म्हणजे धनाजीनाना चौधरी यांचे ‘कर्मयोगी’ या नावाचे चरित्र त्यांनी लिहिले होते आणि स्वत: त्यांचा ‘अंधारयोगी’ या शीर्षकाचा काव्यसंग्रह प्रसिध्द होता. हे भानु सर फैजपूरच्या व्यतिरिक्त अन्यत्र मोठ्या शहरात नोकरीला असते तर त्यांना फार नाव मिळाले असते. पण बाळासाहेबांशी बांधिलकी असल्यामुळे ते फैजपूर-खिरोदा परिसरात शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहिले. अशा या भानु सरांचे लेखन संकलित करून त्याचे संपादन करावे असे मला अनेकदा वाटत होते पण तो योग येत नव्हता.
नंतर एका भेटीत मी हा विषय काढला आणि त्यांनी आनंदाने परवानगी दिली. स्वत: जवळचे प्रकाशित-अप्रकाशित लेख माझ्याकडे सोपवले. मी त्याची नीट वर्गवारी करून, त्याचे नेटके संपादन ‘अनुबंध’ या शीर्षकाने ग्रंथरूपात प्रसिध्द केले. पुस्तक तीनशे पृष्ठांचे झाले होते आणि पुण्याच्या सुविद्या प्रकाशनाने ते प्रसिध्द केले होते. या कामी पुण्यात असलेल्या दिलीप चौधरी या भानु सरांच्या चिरंजीवाने बरीच मदत केली. मी ग्रंथाला जवळपास चाळीस पृष्ठांची विवेचक प्रस्तावना लिहिली. ती प्रस्तावना आणि पुस्तक भानु सरांना तर आवडलेच पण त्यांनी ते आवर्जून बाळासाहेबांना दाखवले. बाळासाहेबांनी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ खिरोद्याला आयोजित करण्याचे निश्चित केले आणि त्या दृष्टीने तयारी करण्याचे निर्देश भानु सरांना आणि कार्यकर्त्यांना दिले. बाळासाहेबांना पुस्तक आणि त्यातील प्रस्तावना खूपच आवडली होती, म्हणून पुस्तकाचा मोठा प्रकाशन समारंभ करावा असे त्यांच्या मनाने घेतले. प्रस्तावनेसंबंधी आनंद व्यक्त करणारे पत्र भानु सरांनी मला पाठवले आणि बाळासाहेब खिरोद्याला प्रकाशन समारंभ घेऊ इच्छितात, कोत्तापल्ले सरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे ठरले आहे असे कळवले. सोयीसाठी एक-दोन तारखा दिल्या. कोत्तापल्ले सरांनी येण्यासाठी होकार दिला.
कार्यक्रमाच्या दिवशी कोत्तापल्ले सर आणि मी सकाळी खाजगी ट्रॅव्हल्सने सावद्याला पोचलो. तिथे कार्यकर्ते घ्यायला आले होते. खिरोद्याला पोचलो. सगळं आवरून बाळासाहेबांच्या भेटीला त्यांच्या बंगल्यावर गेलो. सर्वच जुन्या परिचित मंडळींची खूप वर्षांनी भेट होत होती. प्रा.जी. पी. पाटील, संजय चौधरी, प्रभात चौधरी, बाळासाहेबांचे चिरंजीव शिरीष चौधरी असे सगळे भेटले. चहापाणी झालं. बाळासाहेबांनी मला जवळ घेऊन पुस्तक आणि प्रस्तावनेसंबंधी आनंद व्यक्त केला. त्यांनी स्वत: जातीने सगळा परिसर, शैक्षणिक संस्था कोत्तापल्ले सरांना फिरून दाखवल्या. अकरा वाजता कार्यक्रम सुरू झाला. सभागृहात प्रचंड गर्दी होती. भानु सरांचा चाहता वर्ग गोळा झाला होता. बी.एड.डी.,एड., चित्रकला महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय, इतर कॉलेजांधील शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.
प्रा.प्र. श्रा. चौधरी या जळगाव येथील बी.एड. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ‘अनुबंध’वर लिहिलेले विस्तृत परीक्षण ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाले होते. स्वत: प्र. श्रा. ही कार्यक्रमाला हजर होते. एवढा मोठा प्रकाशन सोहळा पाहून माझ्यावर विचित्र दडपण आले होते. आपल्या शिक्षकासंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी पुस्तकाचे संपादन केले होते, पण त्याची एवढी मोठी दखल बाळासाहेब प्रभृती घेतील असे वाटले नव्हते. कार्यक्रम सुरू झाला. स्वागत गीत,पाहुण्यांचे स्वागत असा सोपस्कार पार पडला. भानु सर यांच्या शिक्षक असलेल्या भावाने प्रास्ताविक केले. आणि मी बोलायला उभा राहिलो. स्टेजवर एक नजर टाकली आणि श्रोत्यांकडे पाहिले. सभागृहात शांतता होती. सावकाश बोलायला सुरुवात केली. भानु सरांसंबंधी कृतज्ञता, त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य, वैविध्य, त्यांचं योगदान, हा भव्य प्रकाशन समारंभ, बाळासाहेबांनी जाणीवपूर्वक घडवून आणलेला हा कार्यक्रम, त्यांच्याविषयीची ऋणाची भावना अशा आशयाचं वीस-पंचवीस मिनिटं विवेचन केलं.
नंतर कोत्तापल्ले सर बोलायला उभे राहिले. त्यांनी जवळपास तीस-चाळीस मिनिटं पुस्तकातील वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने तपशीलवार विश्लेषण केले. पुस्तकाची काय काय बलस्थानं आहेत ते साधार सांगितलं. लोक शांतपणे ऐकत होते. कार्यक्रम एका उंचीवर पोचला होता. आणि शेवटी बाळासाहेब अध्यक्षीय समारोपासाठी उभे राहिले. बाळासाहेबांची विव्दत्ता, व्यासंग आणि वक्तृत्व हे मला चांगलं माहीत होतं. त्यांची भाषणं मी अनेकदा ऐकली होती, पण आजचा प्रसंग आणि संदर्भ वेगळा होता. त्यांनी माझ्या आणि कोत्तापल्ले सरांच्या भाषणांची प्रशंसा केली. ‘अनुबंध’ या पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखविले. आमच्या भाषणात जे मुद्दे आले नाहीत त्या मुद्यांचे त्यांच्या पध्दतीने विवरण केले. भानु सरांबद्दल नितांत जिव्हाळा व्यक्त केला आणि माझ्याकडे निर्देश करून म्हणाले, ‘‘आपल्या शिक्षकासंबंधी जाधव यांनी ग्रंथरूपाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. असे विद्यार्थी शिक्षकाला लाभणे हे आता दुर्मिळ झालंय. जाधव यांनी ज्या पध्दतीने या ग्रंथाची मांडणी आणि संपादन केले आहे त्यातून त्यांच्या शिक्षकासंबंधी त्यांनी आदर तर व्यक्त केलेला आहेच, पण आपल्या समीक्षा दृष्टीचाही परिचय करून दिला आहे. त्यांनी लिहिलेली प्रस्तावना म्हणजे सव्यसाची व्यासंगाचा नमुना आहे.’’
बाळासाहेब बोलत होते. मी संकोचून गेलो होतो. हाताची घडी घालून मान खाली करून ऐकत होतो. कार्यक्रमात सभेचा, शिष्टाचाराचा भाग असतो, ते आपण समजून घेतलं पाहिजे असे विचार मनात येत होते. आणि बोलता बोलता मध्येच थांबून बाळासाहेब माझ्याकडे पाहत म्हणाले, ‘‘पुणे विद्यापीठात तुमची नियुक्ती झाली हे चांगलंच झालं, म्हणजे तुम्ही योग्य ठिकाणी गेलात. फक्त आमच्या मंडळींना त्या वेळी ते कळले नाही. काही गोष्टी काही मंडळींच्या उशिरा लक्षात येतात, पण वेळ गेलेली असते. तुम्हाला त्या वेळी संस्थेत फार त्रास झाला. जे होऊ नये ते झालं. तुमच्या मनात जर त्यासंबंधी काही असेल तर विसरून जा. मनात गैरसमज ठेवू नका. माझ्या मनात काही नाही. तुमच्या पण मनात ठेवू नका. जो प्रकार झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.’’ बाळासाहेब पुढंही बोलत होते, पण मी सर्द झालो होतो. अंतर्मुख झालो होतो, पुढचं काही मला नीट ऐकता आलं नाही.
बाळासाहेब भाषण संपवून खुर्चीवर बसले. टाळ्यांचा कडकडाट झाला. आभार प्रदर्शन झाले आणि आम्ही जेवणाची व्यवस्था होती, त्या मंडपाकडे निघालो. बाळासाहेबांचे बोलणे ऐकून कोत्तापल्ले सरांनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. आपण नंतर बोलू असे मी सरांना सांगितले. कार्यक्रम चांगला झाला होता. भानु सरांना गलबलून आले होते. त्यांचा हात पकडून मी हळूहळू त्यांच्या सोबत चालू लागलो. आम्ही जेवणाच्या मंडपात दाखल झालो. वांग्याची भाजी, चपाती, मसाला भात असा बेत होता. बुफे पध्दतीने लोक जेवत होते. आमच्यापर्यंत ताटं आली. आमच्या जेवणाच्या व्यवस्थेकडे बाळासाहेबांचं लक्ष होतं. ते आपलं जेवणाचं ताट घेऊन आमच्या दिशेने आले. चर्चा सुरू झाली. मी बाळासाहेबांना हळूच म्हटलं, ‘‘बाळासाहेब, माझ्या मनात तर काही नाही. झालं गेलं मी कधीच विसरून गेलो आहे. मग तुम्ही तो विषय का काढला?’’ बाळासाहेब माझ्याकडे पाहत हसून म्हणाले, ‘‘अहो, माझ्या पण मनात काही नाही... पण उपस्थित लोकांपैकी जर कोणाच्या मनात काही असेल तर निघून जावं या हेतूनं मी बोललो. कोणाच्याही मनात कुठलं किल्मिष राहू नये असं मला वाटतं.’’
मी बाळासाहेबांकडे पाहतच राहिलो. मी त्यांच्या जवळ फारसा कधी गेलो नव्हतो. वावरलो नव्हतो. पण त्यांच्याबद्दल खूप चांगलं ऐकून होतो. त्यांचे विरोधक काय टीका करतात ते पण मला माहीत होतं. एका अंतरावर उभं राहूनच मी त्यांच्याबद्दल माझी काही मतं तयार केली होती. पण आज मी स्तिमित झालो होतो. काही लोकं मूलत: मोठी असतात, काही हळू हळू मोठी होत जातात. बाळासाहेब ही पहिल्या प्रकारात मोडणारी व्यक्ती होती.
Tags: फैजपूर मराठी नागनाथ कोतापल्ले रामदास आठवले पोलीस आंबेडकर फुले शाहू महाविद्यालय बाळासाहेब faijpur Marathi nagnath kothapalle ramdas athawale police ambedkar phule shahu mahavidhyalay shala bebasaheb weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
Tukaram Khillare- 01 Jan 2021
संघर्षमय बखर. सतत ऊर्जा देणारी.
save