डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ढाले यांचा पिंड कार्यकर्त्याचा तसाच लेखक- संशोधकाचाही. सार्वजनिक जीवनातून वेळ काढून त्यांनी लेखन-संशोधन केलं असतं तर ते अधिक मूलगामी स्वरूपाचं काम झालं असतं.

हायस्कूलमध्ये असताना मी राजा ढालेंना पाहिलं आणि ऐकलं. नावाप्रमाणेच ढाले यांचे व्यक्तिमत्त्व राजबिंडे होते. आत्मविश्वासानं मुद्देसूद बोलणारी त्यांची छबी माझ्या लक्षात आहे. त्यावेळी ते कलकत्ता पान खात असत. पान खाण्याची पद्धत मोहवणारी. त्यांचं अनुकरण म्हणून असेल, नंतरच्या काळात आम्ही मित्रमंडळीही कलकत्ता पान खायला लागलो होतो. अगदी अलीकडे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आले होते, तेव्हा हा किस्सा मी त्यांना सांगितला. ते हसले. म्हणाले, ‘‘मी पान खाणं कधीच सोडलं.’’

हायस्कूलमध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात मी शिकलो. तिथं त्यांचं चळवळीनिमित्त जाणं येणं होतं. माझे वडील रेल्वेत अधिकारी होते आणि भुसावळ डिव्हिजनच्या एस. सी.एस.टी. असोशिएशनचे जनरल सेक्रेटरी होते. ते अनेक कार्यक्रमाचं आयोजन करीत. आंबेडकर जयंती तर जोरात असायची. जणू एक आनंद सोहळा. त्याच काळात ढालेंचं भाषण ऐकलेलं. तेव्हा दलित पँथरमधून बाहेर पडून त्यांनी ‘मास मुव्हमेंट’ ही संघटना स्थापन केलेली. परंतु संघटनेला महाराष्ट्रभर स्वीकृती लाभली नाही. मुंबईत काही ठिकाणी, नाशिक शहर, नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा अशा काही ठिकाणी या संघटनेची मजबूत पॉकेटस्‌ होती. नंतर वडिलांची बदली भुसावळच्या पुढे सावदा रेल्वे स्टेशनवर झाली. तेव्हा मी  नुकताच कॉलेजला जाऊ लागलो होतो. मी त्या परिसरात ‘मास मुव्हमेंट’ची शाखा सुरू केली. त्याची बरीच चर्चा त्यावेळी झाली. त्या परिसरातील पोलीस स्टेशनने मला एकदा बोलावून माझी चौकशीही केली होती. ‘काही गडबड गोंधळ करू नका’ असं तिथल्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं होतं. मी कॉलेजमधला मुलगा. मला त्यावेळी फार काही समजलं नाही. पण नंतरच्या काळात ते अधिकारी असं का बोलले असावेत, तेही ध्यानात आलं.

राजा ढाले उत्तम चित्रकार आणि कवी होते. ‘सत्यकथा’ आणि ‘भगवद्‌गीता’ त्यांनी जाळली हे जाणकारांना ठावूकच आहे. त्यामागे त्यांची निश्चित अशी भूमिका होती. काहींना त्यात विसंगती वाटते. भुसावळला रत्नाकर गणवीर नावाचे रेल्वेत अधिकारी होते. ते माझ्या वडिलांचे मित्र. त्यांनी प्रॉव्हिडंड फंडाच्या रकमेचे कर्ज काढून ‘बहिष्कृत भारतातील अग्रलेख’, ‘बहिष्कृत भारतातील स्फुट लेख’, ‘महाड चवदार तळ्याचा संग्राम’ अशी पुस्तके स्वतः संपादित करून स्वखर्चाने प्रसिद्ध केली होती. ‘अग्रलेखा’च्या पुस्तकाचं मुखपृष्ठ राजा ढालेंनी केलं होतं, हे मला लख्ख आठवतं. ढालेंचं अक्षर अतिशय वळणदार आणि सुरेख होतं. साधं पत्रं जरी त्यांनी लिहिलं तरी त्यात देखणी कलात्मकता असे. डॉ.गंगाधर पानतावणेंना त्यांनी लिहिलेली अनेक पत्र पानतावणेसरांनी मला दाखवली होती.  

सार्वजनिक जीवनातील राजकीय-सामाजिक चळवळीत सक्रीय आणि स्वतंत्र भूमिका असलेल्या राजा ढालेंकडे वाङ्‌मयीन संशोधनाची विलक्षण जाण होती. अलिकडे त्यांचा विठ्ठलासंबंधीचा संशोधनपर लेख प्रसिद्ध झाल्यावर मी फोन करून त्यांना म्हटलं, ‘‘मराठीत संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध होऊ शकला असता.’’ त्यावेळी ते उद्‌गारले, ‘‘आपण कायम प्रस्थापितांच्या विरोधात आहोत. त्यामुळे आपण आपली भूमिका वेगळ्या व्यासपीठावर मांडली पाहिजे.’’ ढाले यांनी अनेक पुस्तकांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या आहेत. या प्रस्तावनांमुळे त्या त्या पुस्तकांचे मोल वाढले हे खरेच आहे, पण त्या पुस्तकांना प्रस्तावना ढालेंनी का लिहिल्या असाव्यात, हेही आपल्या लक्षात येतं. म्हणजे मुळात पुस्तकांमध्ये गुणवत्ता होती हे चाणाक्ष ढालेंना पक्के ठाऊक होते. योगीराज वाघमारे यांच्या ‘गुडदाणी’ या कथासंग्रहाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना जिज्ञासूंनी आवर्जून वाचावी. बाबुराव बागूल यांची ‘विद्रोह’ आणि योगीराज वाघमारे यांची ‘उद्रेक’ या दोन कथांचे तुलनात्मक विश्लेषण नवे मूलभूत आकलन मांडणारे आहे.

‘खेळ’ नियतकालिकाचे संपादक प्रसिद्ध कवी मंगेश नारायणराव काळे हे माझे जुने मित्र. त्यांनी ‘खेळ’च्या राजा ढाले विशेषांकाचं संपादन करण्याचा प्रस्ताव ठेवला. अर्थातच मी होकार दिला. राजा ढालेंनी यासाठी आनंदाने संमती दिली. प्रत्यक्ष बोलताना माझ्या लक्षात आलं की, या विशेषांकामुळे त्यांना समाधान लाभलं होतं. दोन दिवस ढाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अतिथीगृहात मुक्कामाला होते. या संधीचा फायदा घेऊन मराठी विभागात त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं. त्याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. दोन्ही दिवस मी आणि मंगेशराव काही सत्रं ठरवून त्यांच्याशी केलेल्या गप्पा ध्वनिमुद्रित करीत होतो. यातूनच त्यांची मुलाखत आकाराला आली. ती ‘खेळ’च्या विशेषांकात छापली. अनेक मान्यवरांनी ढाले यांच्या लेखनासंबंधी आणि कार्यासंबंधी त्या अंकात लेखन केलं.

राजा ढाले यांच्यासोबत मला काही चर्चासत्रांत, प्रकाशन समारंभात सहभागी होता आले. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात ते अध्यक्ष होते. आधीच्या वक्त्यांनी केलेली भाषणे ते काळजीपूर्वक ऐकत. नंतर आपल्या भाषणात ते त्याबद्दल तिखट टिप्पणी करत. बोलताना निर्भिडपणे मांडणी करत. स्पष्टवक्तेपणा असा की ज्याचा मुद्दा खोडला त्या व्यक्तीला तो फटकळपणा वाटत असे. माणसं दुखावत, पण ढालेंना त्याची तमा नव्हती. तो त्यांचा स्वभावच होता. लेखन असो वा भाषण ते तुटून पडत, तर्काधिष्ठित विश्लेषण करीत. त्यात व्यक्तिद्वेष नसायचा, चर्चेला घेतलेल्या विषयाचा नवा पैलू असायचा. महाराष्ट्रातील भल्याभल्यांना याचा अनुभव आलेला आहे.

1995 मध्ये खडकी (पुणे) येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘दलित साहित्य’ या संज्ञेला नाकारून ‘फुले-आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य’ या पर्यायी संज्ञेचा पुरस्कार केला होता. त्यांच्या या भूमिकेबद्दल अनेक मान्यवरांनी त्या काळात मतभिन्नता नोंदवली होती. याचा परिणाम दलित साहित्य प्रवाहाबद्दलची चर्चा नव्यानं ऐरणीवर आली होती.

ढाले यांचा पिंड कार्यकर्त्याचा तसाच लेखक- संशोधकाचाही. सार्वजनिक जीवनातून वेळ काढून त्यांनी लेखन-संशोधन केलं असतं तर ते अधिक मूलगामी स्वरूपाचं काम झालं असतं.

प्रसिद्ध कवी त्र्यंबक सपकाळे एकदा गप्पा मारताना सहज बोलून गेले. ‘‘ढालेंविषयी तुमचे काही बरे वाईट मत असेल ते असो, पण तो माणूस विकला गेला नाही. चळवळीला बाधा येईल अशा तडजोडी त्यांनी केल्या नाहीत.’’ सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या किती लोकांबद्दल असा अभिप्राय आज ऐकायला मिळेल? चळवळीतील लहान-मोठे कार्यकर्ते राजा ढाले यांना ढालेसाहेब म्हणत असत. आता तर राजकीय-सामाजिक चळवळीतील सर्वच ज्येष्ठांना ‘साहेब’ म्हणण्याची पद्धत आहे. विशेषतः राजकीय सत्तेत जे असतात ते तर ‘साहेब’च असतात. पण कधीही राजकीय सत्तेत नसणाऱ्या ढालेंना लोकं जेव्हा साहेब म्हणत, तेव्हा रूढार्थाने साहेब नसलेला हा राजामाणूस आहे असं मला वाटत असे.

Tags: दलित साहित्य मंगेश काळे खेळ नियतकालिक सत्यकथा अभिवादन राजा ढाले डॉ. मनोहर जाधव Mangesh Kale Khel Niyatkalik Satykatha Abhivadan Raja Dhale Manohar Jadhav weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मनोहर जाधव,  पुणे
manohar2013@gmail.com

तीन दशके सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक राहिलेले मनोहर जाधव आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख आहेत, त्यांनी कविता व समीक्षा लेखन केले आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके