डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सआदत हसन मंटो (११ मे १९१२ ते १८ जानेवारी १९५५) यांची ओळख अत्यंत प्रतिभावान आणि तितकाच वादग्रस्त साहित्यिक अशी करून दिली जाते. चित्रपटांचे पटकथा-लेखन आणि पत्रकारिता या क्षेत्रांतील त्यांची मुशाफिरी महत्त्वाची असली तरी उर्दू लघुकथेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते. जेमतेम ४४ वर्षांच्या आयुष्यात २२ कथासंग्रह, एक कादंबरी, रेडिओ नाटिकांचे पाच संग्रह, तीन निबंधसंग्रह आणि दोन व्यक्तिचित्रांचे संग्रह इतकी विपुल साहित्यसंपदा नावावर असलेल्या मंटो यांनी स्वत:विषयी लिहिलेला एक लेख त्यांच्या ६० व्या स्मृतिदिनानिमित्त अनुवाद करून प्रसिद्ध करीत आहोत- संपादक

मंटोविषयी आत्तापर्यंत खूप काही लिहिलं आणि बोललं गेलेलं आहे. त्याच्या बाजूने कमी आणि विरुद्ध जास्त. ही मतं व्यक्तिगत आहेत असं जरी मानलं, तरी कुणीही बुद्धिमान माणूस मंटोविषयीच्या आपल्या मतावर ठाम राहू शकणार नाही. मी हा लेख लिहायला बसलो आहे खरं; पण मंटोविषयी आपले विचार प्रकट करणं ही खूप अवघड गोष्ट आहे, याची मला जाणीव आहे. पण एका दृष्टीने ते काम सोपंदेखील आहे. कारण मला मंटोच्या जवळ राहण्याचं भाग्य लाभलेलं आहे आणि खरं म्हणजे मी मंटोचा सहोदर आहे. 

आत्तापर्यंत या व्यक्तीविषयी जे लिहिलं गेलंय, त्याविषयी माझी काही तक्रार नाही. पण मला इतकंच माहिती आहे की, या लेखांमधून जे काही म्हटलंय ते वास्तविकतेला सोडून आहे. काही जण त्याला सैतान म्हणतात, काही जण देवदूत म्हणतात. जरा थांबा; तो नालायक माणूस हे सगळं ऐकत तर नाहीये ना, हे मला पाहू द्या. नाही... नाही... तो ऐकत नाहीये. मग हरकत नाही. मला आठवलं की, या वेळी तो पीत बसलेला असतो. त्याला संध्याकाळी सहा वाजता कडू सरबत पिण्याची सवय आहे. 

आम्ही एकाच वेळी जन्मलो आणि एकाच वेळी मरू. कदाचित असंही घडेल की, सआदत हसन मरून जाईल आणि मंटो मरणार नाही. हे दु:ख मला नेहमीच भिववीत असतं. म्हणूनच मी त्याच्याबरोबर मैत्री करताना कोणतीही कसूर ठेवलेली नाही. जर तो जिवंत राहिला आणि मी मेलो तर असं होईल की, अंड्याचं कवच शिल्लक राहिलं आणि आतला बलक नष्ट झाला. आता मी अधिक कोड्यात बोलणार नाही. तुम्हाला मी स्पष्टच सांगतो की, मंटोसारखा माणूस मी आयुष्यात बघितलेला नाही. त्याला जर गोळा केलं, तर त्याच्यात एक-दोन नाही तर तीन व्यक्तिमत्त्वं असलेली आढळतील. 

त्रिकोणाविषयीचं त्याचं ज्ञान अगाध आहे. पण मला माहिती आहे की, याची आता गरज नाहीये. हे संकेत केवळ सुविद्य लोकांनाच समजण्यासारखे आहेत. तसं मी मंटोला त्याच्या जन्मापासूनच ओळखतो. आम्ही दोघं एकाच वेळी म्हणजे ११ मे १९१२ रोजी जन्मलो. त्याचा असा प्रयत्न नेहमीच राहिला आहे की- तो कुणीही बनलेला असो; पण त्याने आपली मान एकदा लपवली, तर लाख प्रयत्न करूनही तुम्ही त्याला शोधू शकणार नाही. पण शेवटी मीदेखील त्याचाच एक हिस्सा आहे ना! मी त्याच्या प्रत्येक हालचालीचं निरीक्षण केलेलं आहे. तर या, मी तुम्हाला हा वैशाखनंदन कथाकार कसा जन्मला ते आता सांगतो. लेखक, साहित्यिक मोठमोठे लेख लिहितात. आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे ते तुमचं ध्यान आकर्षित करून घेतात. ते आपल्या बोलण्यातून शोपेनहावर, फ्रॉईड, हेगेल, नीत्शे, मार्क्स यांचा सतत उल्लेख करतात. पण वास्तविकतेपासून ते कोसभर दूर राहतात. 

मंटोचे कथानक हे दोन विरोधी तत्त्वांच्या संघर्षाचा परिणाम आहे. त्याचे वडील- खुदा त्यांना माफ करो- खूप कठोर होते. आणि त्याची आई अत्यंत दयाळू होती. या दोन्ही पाळ्यांच्या मध्ये दळला जाऊन हा गव्हाचा दाणा कोणत्या स्वरूपात बाहेर पडला असेल, याचा अंदाज तुम्ही लावू शकता. आता मी त्याच्या शालेय जीवनाकडे येतो. तो अत्यंत बुद्धिमान मुलगा होता, पण तेवढाच खोड्या करणाराही होता. त्या वेळी त्याची उंची जास्तीत जास्त ३ फूट ६ इंच असावी. ते आपल्या वडिलांचं शेवटचं अपत्य होतं. त्याला त्याच्या आई-वडिलांचं प्रेम मिळालं, पण त्याचे तीन मोठे भाऊ- जे वयाने त्याच्यापेक्षा जास्त होते आणि परदेशात शिकत होते- त्यांच्याशी त्याला भेटण्याचा योग कधीही आला नाही. कारण ते भाऊ सावत्र होते. ते भेटावेत, त्यांनी आपल्याशी मोठ्या भावाप्रमाणे वागावे, असंच त्याला वाटे. पण ही संधी त्याला साहित्याच्या क्षेत्रात लोक मोठा कथाकार मानायला लागले होते त्यानंतर मिळाली. 

अच्छा, आता त्याच्या कथाकार असण्याबद्दल तुम्हाला सांगतो. तो अव्वल दर्जाचा फ्रॉड आहे. पहिली कथा त्याने ‘तमाशा’ या नावाने लिहिली. ती जालियनवाला बागतील रक्तरंजित घटनेवर आधारित होती. ही कथा त्याने त्याच्या नावावर छापली नाही, म्हणूनच केवळ तो पोलिसांच्या तावडीतून वाचला. मग त्याच्या सुपीक डोक्यात आपण खूप शिकावं असं वारं आलं. इथेच हे सांगणं गमतीशीर ठरेल की, तो इंटरच्या परीक्षेत दोनदा नापास झाला होता. नंतर पास झाला, तोही थर्ड क्लासमध्ये आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, तो उर्दूच्या पेपरमध्ये नापास झाला होता. आता लोक म्हणतात की, तो उर्दूमधला खूप मोठा साहित्यिक आहे आणि हे ऐकून मलाही हसू येतं. कारण त्याला उर्दू आजही नीट येत नाही. 

तो शब्दांच्या मागे असा धावतो की, एखादा खोटा शिकारी फुलपाखरांच्या मागे धावावा. पण ती त्याच्या हातात सापडत नाहीत. म्हणूनच त्याच्या लेखनात सुंदर शब्दांची कमतरता असते. तो लाठी चालवणारा आहे; पण जितक्या लाठ्या त्याने खाल्ल्या आहेत, त्या त्याने आनंदाने स्वीकारल्या आहेत. त्याची लठ्ठेबाजी ही शब्दश: जाट लोकांची लठ्ठेबाजी नाहीये. तो जादूगार आहे. तो असा माणूस आहे की, तो सरळ रस्त्याने चालतच नाही. त्याला वेड्यावाकड्या रस्त्यानेच वाटचाल करायला आवडते. लोकांना तो आत्ता पडेल, मग पडेल- असं वाटत राहतं. पण तो नालायक माणूस आजपर्यंत कधीही पडला नाही. कदाचित तो कधी तरी तोंडावर पडेल आणि मग कधीच उठणार नाही. पण मला माहिती आहे की, मरताना तो लोकांना सांगेल की, पतनातलं दु:ख नाहीसं व्हावं म्हणून मी पडलो होतो. 

मी पूर्वीच तुम्हाला सांगितलंय की, मंटो अव्वल दर्जाचा फ्रॉड आहे. याचं प्रमाण हेच की, तो नेहमी म्हणतो की, तो कथेचा कधीही विचार करीत नाही; तर कथाच त्याची निवड करते. हाही एक फ्रॉडच आहे. पण जेव्हा त्याला कथा लिहायची असते; तेव्हा कोंबडीला अंडे देताना जो त्रास होतो, तोच त्याला होतो, हे त्याला माहिती आहे. तो अंडं गुपचूप देत नाही, सर्वांसमोर देतो. त्याचे मित्र बसलेले असतात, त्याच्या तीन मुली धिंगाणा करीत असतात आणि तो आपल्या विशिष्ट खुर्चीवर उकिडवा बसून अंडे देतो. नंतर त्यातूनच चूं चूं करीत कथा बनतात. 

त्याची बायको त्याच्यावर खूप नाराज आहे. ती त्याला नेहमी म्हणते की, त्याने कथालेखन सोडून कसलं तरी दुकान काढावं. पण मस्तकात जे दुकान उघडलेलं आहे, त्यात सुंदर वस्तूंचा भरणा आहे. म्हणून त्याला नेहमी वाटतं की, जिथे त्याचे विचार आणि भावना गोठतील असं आपलं मस्तक स्टोरेज अर्थात शीतगृह बनू नये. मी हा लेख लिहितोय खरं, पण मंटो माझ्यावर नाराज होईल अशी मला भीती वाटतेय. त्याची प्रत्येक गोष्ट सहन केली जाऊ शकते, पण नाराजी सहन केली जाऊ शकत नाही. नाराज झाल्यावर तो राक्षस बनतो, पण काही मिनिटांसाठीच. आणि ही काही मिनिटं अल्लाच्या आश्रयाला जाण्याशिवाय पर्याय नसतो. 

कथा लिहिण्याच्या बाबतीत तो नखरे करतो, हे मला  माहितीय; पण हेही माहितीय की, तो फ्रॉड करतोय. त्याने एकदा स्वत: लिहिलं होतं की, त्याच्या खिशात असंख्य कथाकल्पना पडलेल्या असतात, पण वास्तविकता यापेक्षा वेगळीच आहे. जेव्हा त्याला कथा लिहायची असेल, तेव्हा तो रात्री विचार करतो. त्याच्या लक्षात काहीही येत नाही. मग तो सकाळी पाच वाजता उठेल आणि एखाद्या वर्तमानपत्रात कथा शोधण्याचा प्रयत्न करेल. पण त्यातही त्याला यश मिळणार नाही. मग तो बाथरूममध्ये जाईल. तिथे तो आपलं डोकं विचार करण्यायोग्य बनावं म्हणून आपल्या डोक्याला थंड करायचा प्रयत्न करेल. पण त्यातही त्याला यश मिळणार नाही. मग तो वैतागून बायकोबरोबर उगीचंच भांडण उकरून काढेल. तिथेही त्याला यश मिळालं नाही, तर तो पान आणण्यासाठी निघून जाईल. पान त्याच्या टेबलावर पडून राहील, पण तरीही कथा त्याच्या डोक्यात येणार नाही. शेवटी तो या सगळ्याविरुद्ध जाण्यासाठी लेखणी हातात घेईल. ‘७८६’ लिहून जे पहिलं वाक्य त्याच्या डोक्यात येईल, त्याने तो कथेची सुरुवात करेल. ‘बाबू गोपीनाथ’, ‘टोबा टेकसिंह’, ‘हतक’, ‘मम्मी’ या सगळ्या कथा त्याने अशाच फ्रॉड पद्धतीने लिहिल्या आहेत. 

लोक त्याला अश्लील माणूस समजतात. आणि माझ्या मते, ते काही प्रमाणात तरी खरंच आहे. त्यामुळेच तो नेहमी घाणेरड्या विषयावर लिहिण्यासाठी लेखणी उचलतो. आणि अशा शब्दांचा वापर आपल्या लेखनात करतो की, ज्यावर आक्षेप घेतला जाण्याचीच शक्यता अधिक असते. पण मला माहिती आहे की- जेव्हा केव्हा तो लिहायला सुरुवात करतो, तेव्हा पहिल्या पानावर वरच्या बाजूला ‘७८६’ असं लिहिल्याशिवाय तो सुरुवातच करीत नाही. याचा अर्थ ‘बिस्मिल्ला’ असा आहे. आणि जो माणूस खुदा मानत नाही, असं वाटत असतं; तो कागदावर मात्र धर्मनिष्ठ मुसलमान बनलेला असतो. पण तो कागदी मंटो आहे. ज्याला तुम्ही कागदाच्या बदामाप्रमाणे बोटांनी तोडू शकता. मात्र इतर वेळेस तो लोखंडी हातोड्यानेसुद्धा तुटणारा माणूस नाही. 

आता मी मंटोच्या व्यक्तित्वाकडे येतो. त्याचं व्यक्तित्व शब्दांत वर्णन करायचं असेल तर- तो चोर आहे, खोटारडा आहे, विश्वासघातकी आहे आणि गर्दी जमा करणारा आहे- असंच करावं लागेल. त्याने नेहमी पत्नीच्या भोळेपणाचा फायदा उठवत किती तरी पैसे उडवलेले आहेत. इकडे ८०० रुपये आणून द्यायचे आणि तिची नजर चुकवून दुसऱ्या दिवशी त्यातून १०० रुपये गायब करायचे, असा त्याचा शिरस्ता राहिलेला आहे. त्या बिचारीला आपल्या नुकसानीची जाणीव होते, ती नोकरांनाच रागावू लागते. मंटो सगळं काही स्पष्ट-स्पष्ट सांगणारा आहे- असं म्हटलं जातं. मी याच्याशी सहमत नाही. तो अव्वल दर्जाचा खोटारडा आहे. 

सुरुवातीला त्याचं खोटारडेपण घरापुरतंच चालून जात असे. कारण त्याला एक मंटो ‘टच’ असायचा. पण नंतर त्याच्या बायकोच्या लक्षात आलं की, काही विशेष बाबतीत तो जे काही सांगत असे ते सगळं खोटं आहे. मंटो खोटं अगदी सहजपणे बोलत असे. पण अडचणीची गोष्ट अशी की, घरातल्या लोकांना तो सांगतो ती प्रत्येक गोष्ट खोटी असते, हे कळू लागलं आहे. तो अशिक्षित आहे. त्याने मार्क्सचा अभ्यास कधीही केलेला नाही, फ्रॉईडचं पुस्तक आजपर्यंत त्याच्या नजरेखालून गेलेलं नाही. हेगेल याचं तो केवळ नावच ऐकून आहे. पण गमतीची गोष्ट अशी की, लोक... म्हणजे मला असं म्हणायचेय की, टीकाकार असं म्हणतात की, तो या सगळ्या विचारवंतांच्या प्रभावाखाली आहे. मला माहितीय की, तो कुणाच्याही विचाराने कधीही प्रभावित होत नाही. 

दुसऱ्यांना उपदेश करणारे सगळे वेडे आहेत, असंच त्याला वाटतं. हे लोकांना समजावून सांगण्यात अर्थ नाही, तर ते त्यांना स्वत:लाच समजून घ्यायला हवं. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, ज्या अश्लील लेखनासाठी त्याच्यावर खटले चालले, ते लेखन अश्लील नाहीये. पण मला हेही सांगितल्याशिवाय राहावत नाही की, तो असं पायपुसणं आहे की, स्वत:ला झटकत राहिल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही.
 

Tags: सआदत हसन मंटो मंटो चंद्रकांत भोंजाळ sadaat hasan manto manto chandrakant bhonjal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके