डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जिआंगझी येथील विजनवासात डेंग एकटे  होते खरे;  परंतु कोंडी झालेल्या, पुढील मार्ग  धूसर असलेल्या आणि चांगले काही  करावयाची इच्छा असणाऱ्या मुत्सद्दी  राजकारण्यांना असे एकलेपण महत्त्वाचे वाटते. अशा शांततेत अस्तित्वाबद्दल व पुढील  वाटचालीबद्दल चिंतन होऊ शकते आणि  पुढील पावले कशी टाकायची,  याचे भान येऊ  शकते. जिआंगझी येथील विजनवासातील डेंग  यांचे चिंतन महत्त्वाचे होते. चीनचे महत्त्वाचे  प्रश्न हे केवळ माओंच्या सैध्दांतिक व क्रांतिकारी मार्गाने, झुंडशाहीने वा अधिक  साम्यवादी विचाराने सुटणार नाहीत;  तर  त्यासाठी अनेक वेगळे उपाय योजिले पाहिजेत, या विचारापर्यंत ते आले. शिवाय केवळ  माओंना विरोध करूनही हा प्रश्न सुटणार नाही,  हेही त्यांना मनोमन उमगले होते. माओ  अतिशय लोकप्रिय तर होतेच, परंतु त्यांची  जनमानसावरील मोहिनी ओसरलेली नव्हती. 

चीनमधील पहिल्या पंचवार्षिक योजनेची आखणी व  समाजवादी पध्दतीची पुनर्बांधणी यात डेंग यांचा मोठा वाटा  होता. उद्योगाचे राष्ट्रीयीकरण,  सामूहिक शेती योजना,  छोट्या उद्योगधंद्याचे सामूहिकीकरण इत्यादी अनेक मूलभूत  रचनात्मक कार्यक्रमांत ते गढून गेले. तत्कालीन वित्तमंत्री बो  यिबो हे भांडवलशाहीधार्जिणे असून ते अनावश्यक कर  सवलती देत आहेत,  असे माओंचे 1953 मध्ये मत झाले. त्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आले आणि त्यांच्या जागी  डेंग यांची नेमणूक करण्यात आली. त्याच वर्षी पंचवार्षिक  योजनेची सुरुवात होऊन प्रत्येक प्रांतात प्रत्यक्ष  करआकारणी किती करावी,  अन्नधान्य उत्पादन किती घ्यावे  यासंबंधीची व इतर उद्दिष्टे ठरविण्याचे काम सुरू झाले. पंचवार्षिक योजनेत सामूहिक निर्णयप्रक्रियेने उद्दिष्टे ठरविली  जात असली आणि माओ व झाओ यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतले जात असले, तरी डेंग यांना या प्रक्रियेची  चांगली माहिती झाली.  

माओ व झाऊ यांच्याकडून डेंग यांना बरेच काही शिकावयास मिळाले. आर्थिक प्रश्न सोडविताना प्रामुख्याने  मूलभूत राजकीय चौकट कशी विचारात घ्यावी, सर्व आर्थिक  उद्दिष्टे व सामाजिक अजेंड्याशेवटी राजकीय अजेंड्याबरोबर  व पार्टीच्या धोरणाबरोबर कशी निगडित करावीत,  सैध्दांतिक बाबतीत कम्युनिस्ट पक्षाच्या चौकटीत राहताना कोणत्या मूळ  गोष्टीबाबत कितपत तडजोड करावी, कोणत्या बाबतीत अशी  तडजोड करणे धोक्याचे आहे- अशा अनेक बाबींचे प्रत्यक्ष  प्रशिक्षण या काळात झाले. मोठे निर्णय कसे घेतले जातात  याचे प्रशिक्षण त्यांना प्रत्यक्ष माओ व झाओ यांच्याकडून  मिळाले. डेंग यांनी 1980 नंतर अनेक आर्थिक सुधारणा  केल्या,  त्या वेळी हा अनुभव कामी आला. पुढे झाऊ एन्‌ लाय  यांच्या मार्गदर्शनाखाली ते परराष्ट्र मंत्रालयाचेही काम पाहू  लागले. शिवाय पार्टीचे जनरल सेक्रेटरी म्हणून 1956 ते 1966 या दहा वर्षांत इतर कम्युनिस्ट देशांशी त्यांचे घनिष्ठ  संबंध आले. चीनमधील अत्युच्च राजकीय वर्तुळात ते  लीलया वावरू लागले. सप्टेंबर 1956 मध्ये अत्यंत  महत्त्वाची आठवी पार्टी काँग्रेस भरली होती. तिच्यात राष्ट्रउभारणीबाबतच्या अनेक धोरणांचा, ध्येयांचा व   भविष्यकाळाचा वेध घेणाऱ्या व्हिजनचा समावेश होता.

पार्टीचे जनरल सेक्रेटरी म्हणून डेंग यांचा या काँग्रेसमधील  सहभाग मोठा होता. माओ,  लिऊ शाओची, झाऊ एन्‌ लाय,  झु डे आणि चेन युन यांच्याबरोबरच डेंग यांनाही पॉलिट  ब्युरोचे सदस्य करून घेतले गेले. डेंग 1957 मध्ये  माओंबरोबर सोव्हिएत युनियनमध्ये गेले होते,  तेव्हा माओंनी  त्यांचे बरेच कौतुक केले. रशियाचे महत्त्वाचे सिध्दांतकार  मिखाईल सुस्लाव्ह यांना माओ म्हणाले- See, that little man there? He is highly intelligent and has a great future ahead.  क्रुश्चेव्ह यांनीही नमूद करून ठेवले आहे की, वरिष्ठ नेतृत्वापैकी डेंग यांच्याबाबत माओ यांना फार मोठ्या  अपेक्षा होत्या. Let a hundred flowers bloom and a hundred schools of thought contend  या मोहिमेत 1957 मध्ये  अनेक बुध्दीमंत व इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी माओंवर  कडवट टीका करणे सुरू केले. या मोहिमेत कम्युनिस्ट  पक्षावर व सरकारवर इतकी टीका होईल याची कल्पना  माओंना नव्हती. त्यावर प्रत्युत्तर म्हणून माओंनी बुध्दिमंत व उजवे विचारवंत यांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली  आणि या सर्व विचारवंत व बुध्दिमंतांचा समाचार घेण्यासाठी  डेंग यांनाच नेमले. या मोहिमेत पाच लाखांहून अधिक  बुध्दिमंत व विचारवंतांना क्रांतीचे शत्रू ठरविले गेले.  सुरुवातीला डेंग यांनी पक्ष कार्यकर्त्यांना या टीकेकडे दुर्लक्ष  करावयास सांगितले होते. मात्र त्यांचा समाचार घेण्याची  जबाबदारी माओंनी डेंग यांच्यावर टाकल्याने डेंग यांनीही या  विचारवंत-बुध्दिमंतांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली,  अनेकांना तुरुंगात डांबले व देशोधडीला लावले. या  मोहिमेत चीनमधील अनेक शास्त्रज्ञ,  वैज्ञानिक,  प्राध्यापक, संशोधक व लेखक यांचे करिअर नुसते उध्वस्तच झाले नाही; तर ते ज्या संस्थांमध्ये काम करीत होते, त्या  संस्थांचेही अपरिमित नुकसान झाले. 

जे मूठभर बुध्दिमंत  राहिले,  ते कम्युनिस्ट पक्षापासून व नेत्यांपासून दूर गेले.  माओंच्या काळातील बुध्दिमंतांची पिछेहाट व त्यांची  ससेहोलपट ही आधुनिक चीनमधील सगळ्यात मोठी दुर्दैवी  घटना होती. पुढे माओंनी ग्रेट लीप फॉरवर्ड कार्यक्रमांतर्गत  जलद आर्थिक विकास साधण्यासाठी अनेक अर्थहीन धोरणे जुलमी पध्दतीने राबविली. त्यावर टीका करण्यासाठी,  अथवा जाब विचारण्यासाठी बुध्दिमंतवर्गच शिल्लक राहिला  नाही. माओंच्या या धोरणामुळे मोठी मनुष्यहानी झाली.  माओंनी डेंग यांच्या मदतीने बुध्दिमंतांची छळवणूक केली,  याची मोठी जबाबदारी डेंग यांच्यावरही येते. चीनमधील  विचारवंतांनी व बुध्दिमंतांनी डेंग यांना याबद्दल कधीही माफ  केले नाही. पुढे 1978 मध्ये हातात सत्ता आल्यानंतर डेंग  यांनी अर्थव्यवस्था खुली करून माओंच्या सांस्कृतिक  क्रांतीत भरडल्या गेलेल्या चिनी जनतेला थोडासा दिलासा  दिलाही; मात्र स्वातंत्र्य,  लोकशाही व राजकीय सुधारणा या  मुद्यांवर त्यांनी चिनी जनतेची निराशाच केली. पुढे तिआनमेन प्रकरणात 1989 मध्ये वयाच्या 84 वर्षीही  विद्यार्थ्यांची निदर्शने लष्करी बळाने निष्ठुरपणे मोडून काढीत  त्यांनी बुध्दिमंतांची त्यांच्याबद्दलची टीका खरी होती,  हेच  दाखविले!  

पुढे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून माओंनी जलद, ग्रामीण व औद्योगिक विकास साध्य करण्यासाठी ‘ग्रेट लीप  फॉरवर्ड’, ही सामाजिक व आर्थिक चळवळ एखाद्या  राजकीय क्रांतीच्या आवेशात सुरू केली. यात अनेक  बाबींचा समावेश होता. मोठे उद्योग, व्यापार व शेती यांचे  राष्ट्रीयीकरण झालेले होतेच; ते चालविण्यासाठी मोठ्या  को-ऑपरेटिव्ह संस्था निर्माण केल्या गेल्या. सामूहिक  शेतीच्या प्रयोगासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून धेण्यात  आल्या आणि त्या सामूहिकरीत्या कसण्यासाठी कम्युन्सची निर्मिती करण्यात आली. या सर्वांमुळे प्रचंड सामाजिक व  आर्थिक उलथापालथ झाली व जुन्या संस्था नष्ट होऊन सामूहिक वा सहकारी तत्त्वावर नव्या संस्था सुरू करण्याचा  प्रयत्न झाला. त्यात अनेक प्रश्न निर्माण झाले. खासगी  मालमत्ता ही संकल्पनाच नाहीशी झाल्याने उत्पादकतेवर  विपरीत परिणाम झाला, कारण जास्त उत्पादन झाले तरीही  ते उत्पादकाला मिळणार नव्हतेच;  मग उत्पादन जास्त का  करा, असा प्रश्न होता! 

ग्रामीण भागात शेतीचे अधिक  उत्पादन घेऊन,  त्यात बरीच बचत करून उर्वरित उत्पादन  निर्यात करून वा विकून आलेला निधी  औद्योगिकीकरणासाठी भांडवल म्हणून वापरायचा- अशी  ही संकल्पना होती. उत्पादनच मुळातच कमी झाल्याने व  अन्नधान्याचा वापर मोठा असल्याने तसे झाले नाही. मात्र अन्नधान्याच्या विक्रीवरच मर्यादा आल्याने अन्नधान्याचा  मोठा तुटवडा निर्माण झाला. या मोहिमेदरम्यान औद्योगिकीकरणासाठी आवश्यक असणारे लोखंड व  पोलाद हे ग्रामीण भागात लहान-लहान फाउंड्रीज (किंवा भट्‌ट्यां)मधून निर्माण करण्याची संकल्पनाही शेवटी  प्रत्यक्षात आली नाही. गावातल्या अशा फाउंड्रीजमध्ये  वितळविण्यासाठी कच्चे लोखंड उपलब्ध नसल्याने नांगर व  शेतीच्या इतर लोखंडी अवजारांचा वापर करून भट्ट्या सुरू  ठेवल्या. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या  अवजारांची प्रचंड कमतरता भासू लागली. त्याचा शेती  उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. शिवाय सिंचनव्यवस्था उभारण्यात आलेल्या अपयशामुळे शेतीसाठी पाण्याची  कमतरता भासू लागली व अन्नधान्याचे उत्पादन खूप कमी  झाले.

या दुष्काळात उपासमारीने 1.8 कोटी लोक मृत्युमुखी पडले,  असे आकडेवारी सांगते. काही पाश्चिमात्य अभ्यासकांच्या मते- ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ कार्यक्रमातील  अपयशामुळे आलेला दुष्काळ व उपासमारीत जवळजवळ  4.5 कोटी लोक मृत्युमुखी पडले.  माओंवर टीका करणाऱ्या बुध्देमंतांना व विचारवंतांना देशोधडीला लावले असल्याने माओंवर व त्यांच्या या  योजनांवर टीका करण्यासाठी बुध्दिमंत वा विरोधक कोणीही  नव्हते. डेंग यांना माओंची धोरणे व निर्णय चुकीचे वाटत  होते. मात्र त्यांनी ते माओंच्या नजरेस आणण्याचे वा विरोध  करण्याचे टाळले. क्रांती मोर्चा व नागरी युध्दादरम्यान माओ  यांचे बरेचसे निर्णय योग्य ठरले होते,  त्यामुळेही असेल  किंवा माओच्या निर्णयांना विरोध करण्याचे धाडसही तेव्हा  त्यांना झाले नसेल. मात्र हे खरे की,  अतिशय वरिष्ठ व  जबाबदार पदावर असूनही डेंग यांनी माओ यांच्या नजरेस हे  भयाण वास्तव आणले नाही की, विरोधही केला नाही. 1959 च्या उन्हाळी सुट्टीत ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’  कार्यक्रम  सुरू केल्यानंतर एका वर्षाने डेंग बिलियर्ड्‌स खेळताना पडले  आणि पायाला झालेल्या दुखापतीमुळे काही महिने त्यांनी  कामावर जाणे टाळले. काहींना असे वाटते की,  अशा  गोंधळाच्या व चुकीच्या निर्णयांच्या कालावधीत डेंग यांनी  कामापासून लांब राहून या निर्णयाचा भागीदार होण्याचे टाळले! 

रजेहून परतल्यानंतर मात्र डेंग यांच्या कामाच्या  पध्दतीमध्ये फरक दिसून आला. माओंकडे जाणे, त्यांच्याकडून आदेश घेणे त्यांनी कमी केले. स्वत:च्या  स्तरावरच निर्णय घेऊन होणारे नुकसान ते टाळू लागले.  उद्योग, शेती, व्यापार अशा अनेक क्षेत्रांत 1960-61 पासून डेंग हे वास्तववादी निर्णय घेऊ लागले आणि ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ कार्यक्रमातून होणारे नुकसान व मनुष्यहानी  टाळण्याचा ते प्रयत्न करू लागले. महत्त्वाचे म्हणजे, या  वेळेपासून डेंग हे माओंपासून दूर होऊ लागले. बैठकीतही ते  माओंपासून लांब अंतरावर,  मागे बसत व त्यांच्याकडे  फारसे लक्ष देत नसत.  आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीत रशियाकडून चीनला  फारसे स्वातंत्र्य मिळत नाही,  ही चीनची तक्रार या काळात  वाढीस लागली. पुढील दहा वर्षांत तर चीनला रशियाकडून  त्यांच्या उत्तर सीमेवर खूपच असुरक्षित वाटू लागले. या  काळात डेंग यांनी आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीत  रशियाबरोबर रोखठोक भूमिका घेऊन,  रशियाच्या  प्रभावापासून दूर राहून स्वतंत्र भूमिका घेण्यास सुरुवात  केली. याबाबत डेंग यांच्यावर माओ खूष असत,  कारण रशियातील साम्यवादी सिध्दांताचे प्रवक्ते मिखाईल सुस्लाव्ह  यांच्याशी डेंग रोखठोक बोलत व त्यांना सडेतोड उत्तर देत.

 डेंग यांच्या रशियाविरोधी भूमिकेचे माओ यांना इतके  कौतुक होते की, जुलै 1963 मध्ये रशियाच्या मिखाईल  सुस्लाव्ह यांच्याशी दोन हात करून मॉस्कोहून बीजिंगला  परतणाऱ्या डेंग यांचे स्वागत व कौतुक करण्यासाठी ते  एअरपोर्टवर गेले होते. ऑक्टोबर 1964 मध्ये रशियाचे  अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतर्गत  उठाव करून पदच्युत केले. या घटनेने अस्वस्थ झालेल्या  माओंना अधिकच असुरक्षित वाटू लागले. आपले सहकारी  आपले ऐकत नाहीत,  ही माओ यांची तक्रार होतीच.  त्यापूर्वी ग्रेट लीप फॉरवर्ड या फसलेल्या कार्यक्रमामुळे  माओ यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका होत असे. माओंचे महत्त्वाचे सहकारी ली शाओकी यांनी 1962 मध्ये एका  प्रसंगी सात हजार अधिकाऱ्यांसमोर ग्रेट लीप फॉरवर्डच्या  अपयशाबद्दल माओंना दोष दिला होता. वास्तविक या  कार्यक्रमात सुरुवातीला ली शाओकी हेही माओंबरोबर  होतेच. या प्रसंगापासूनच ली शाओकी यांना डच्चू देण्याचे  माओ यांच्या मनात होते. माओ अस्वस्थ अशासाठीही होते  की,  डेंग हेही या काळात ली शाओकी यांच्याबरोबरच  असत. अस्वस्थ झालेल्या माओंना इतके असुरक्षित वाटू  लागले की,  आपल्या विरोधात उभे राहणाऱ्या व  बोलणाऱ्या नेत्यांना ते पक्षविरोधी, राष्ट्रविरोधी, भांडवलशाहीचे हस्तक व क्रांतीचे शत्रू मानू लागले. त्यांनी 1965 मध्ये त्यांच्या पत्नीला- जियांग शिंगला आपल्या  विरोधात जाणाऱ्या नेत्यांवर तीव्र टीका करण्याचे संकेतच  दिले. त्यानंतर माओंविरोधात थोडेही बोलणाऱ्या, विरोध  करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी सुरू झाली. 

माओंनी 1966 मध्ये कल्चरल रेव्होल्युशन वा  सांस्कृतिक क्रांतीची सुरुवात केली. पार्टीच्या अधिकारपदी असणाऱ्या ज्या व्यक्ती भांडवलशाहीवादी आहेत,  त्यांना  त्रस्त करून धडा शिकवायचा आणि माओंशी वैयक्तिक  निष्ठा वाहावयास लावयाच्या असे सांस्कृतिक क्रांतीचे ध्येय  होते. यात ‘भांडवलशाहीविरोधी वा क्रांतीविरोधी नेते  म्हणजे स्वतंत्रपणे वागणारे व माओंना विरोध करणारे नेते असा सरळ अर्थ होता. जे यानंतरही माओंशी जमवून घेत  नसत,  त्यांना माओंच्या विचारांचे प्रशिक्षण देण्यासाठी वा  शिक्षा म्हणून ग्रामीण भागात सक्त मजुरी करण्यास  पाठविण्यात येत असे. ली शाओकी आणि डेंग या दोघांवर 1966 मध्ये प्रथम  वर्तमानपत्रांतून हल्ले सुरू झाले. पुढे रेड गाडर्‌सचेही तीव्र हल्ले  या नेत्यांवर व त्यांच्या कुटुंबीयांवरही सुरू झाले. त्या वेळी  डेंग यांनाही लक्ष्य करण्यात आले. ली शाओकी हे पक्षाचे  उपाध्यक्ष होते व माओंचे वारसदार म्हणून ओळखले जात.  मात्र या काळात त्यांना सर्व पदांवरून हटविण्यात आले. रेड गाडर्‌सकडून त्यांना नुसतीच अपमानास्पद वागणूक मिळाली  नाही,  तर त्यांना मारहाणीपर्यंत व दुखापत होईपर्यंत गोष्टी  गेल्या. घरी नजरकैदेत असताना व तब्येत गंभीर असतानाही  हल्ले सुरू राहिले आणि त्यांना औषधोपचार मिळाले नाहीत.  त्यांची पत्नी तुरुंगात असताना अशाच अवस्थेत त्यांचा  मृत्यू झाला. डेंग यांनाही लक्ष्य करणे सुरू झाले. त्यांना लक्ष्य  करण्याचे माओंचे उद्दिष्ट हे त्यांना केवळ आपल्या बाजूला  वळवून त्यांचे समर्थन प्राप्त करणे एवढेच होते. डेंग व त्यांची  पत्नी यांनाही 1967 मध्ये बीजिंगमधील झौंगनहाई येथील  घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले. झौंगनहाईमध्ये पक्षातील व सरकारमधील वरिष्ठ नेते-अधिकारी यांची निवासस्थाने  होती. त्यांच्या मुलांनाही त्यांच्यापासून लांब, ग्रामीण भागात काम करण्यासाठी पाठवून देण्यात आले. 

माओ  अशा रीतीने डेंग यांना जणू आपल्याशी एकनिष्ठ  राहण्यासाठी दबाव आणून धडाच शिकवीत होते, असे  दिसते. डेंग यांच्या पूर्वीच्या क्रांती काळातील व  पोलिटिकल कॉमिसार असलेल्या काळातील काही घटनांची चौकशी करण्यासाठी खास पथक 1968 मध्ये  निर्माण करण्यात आले. कुओमिंग टांगबरोबरच्या युद्धाच्या  वेळी डेंग हे सैन्यदलापासून लांब गेले आणि नंतर सैन्यदल  सोडून शांघायला परत आले होते. त्यांचे तेव्हाचे साथीदार  पेंग देहुआई यांनाही माओंनी टीकेचे लक्ष्य केले होते.  त्यांचीही खोलवर चौकशी सुरू केली होती. या चौकशीचा  भाग म्हणून डेंग यांना वयाच्या आठव्या वर्षांपासूनच्या सर्व  आठवणी लिहून काढावयास सांगितले गेले. माओंना  विरोध करणाऱ्या इतर पक्षनेत्यांना व उच्चस्तरीय  अधिकाऱ्यांना शिक्षा म्हणून ग्रामीण भागात पाठविण्यात  आले. झु डे आणि डाँग बिऊ यांना ग्वांडुगला,  ये जिनयिंग  यांना यांना हुनानला तर चेन युन,  वँग झेन व डेंग जिआंगझी  प्रांतातील विविध भागांत पाठविण्यात आले.  ऑक्टोबर 1969 मध्ये डेंग,  त्यांची पत्नी झुओ लिन  आणि डेंग त्यांची सावत्र आई झिया बोगेन या तिघांना  बीजिंगहून जिआंगझी प्रांतातील नाचांग या महत्त्वाच्या  शहरात आणण्यात आले.

हे शहर चिनी साम्यवादी  चळवळीच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे, कारण तेथे 1926 मध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीचा (झङअ) जन्म झाला. हे  शहर पीएलएचे मोठे लष्करी केंद्र होते. येथे रेड गाडर्‌सचा  प्रभाव चालत नसल्याने डेंग बऱ्यापैकी सुरक्षित होते. या  विजनवासानंतर डेंग यांच्यात सुधारणा होऊन त्यांच्या निष्ठा माओंच्या चरणी राहतील, अशी खात्री माओ व त्यांच्या  जवळच्या सहकाऱ्यांना होती. नांचांग येथे डेंग एकूण साडेतीन वर्षे होते. हा काळ डेंग  यांच्या आयुष्यात महत्त्वाचा ठरला. कुटुंबीयांबरोबर सुखदु: खाचे क्षण तर त्यांनी घालविलेच; शिवाय पुढील  वाटचालीबाबत त्यांचे चिंतनही झाले. रेड गाडर्‌स व  सांस्कृतिक क्रांतीच्या ओंगळवाण्या झुंडशाहीपासून दूर व  सैन्यदलाच्या सुरक्षित वातावरणात राहायला मिळाले,  हीही  जमेची एक बाजू होती. नांचांग येथे डेंग पती-पत्नींचा  दिवस सकाळी 6.30 ला सुरू होत असे. तंदुरुस्त  राहण्यासाठी डेंग मुद्दाम थंड पाण्याने अंघोळ करीत. सकाळी  एक-दीड तास दोघा पती-पत्नींना स्थानिक पक्षाच्या देखरेखीखाली माओंच्या विचारांचा व साहित्याचा सक्तीने  अभ्यास करावा लागे. सकाळच्या नाश्त्यानंतर डेंग पतीपत्नी  घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या  ट्रॅक्टरदुरुस्तीच्या वर्कशॉपमध्ये तीन-चार तासांच्या कामासाठी जात. डेंग यांना तिथे मशिनिस्टचे काम दिले  होते. ते काम ते दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत करीत. घरी  त्यांची सावत्र आई झिया बोगेन स्वयंपाक व घरकाम करीत  असे. दुपारचे जेवण झाल्यानंतर डेंग व त्यांची पत्नी  वाचनात वेळ घालवीत असत. चिनी दर्जेदार पुस्तके,  कादंबऱ्या, त्याचप्रमाणे रशियन व फ्रेंच अनुवादित साहित्य  हे दोघांच्या आवडीचे विषय होते. याशिवाय रेडिओवरून बातम्या व इतर कार्यक्रम ऐकण्याची सोय होती. रात्री डेंग  झोपी जाण्यापूर्वीही वाचन करीत असत. पुढे त्यांची मुलेही  तिथे रहावयास आली आणि डेंग कुटुंबीय नांचांगमध्ये  बऱ्यापैकी स्थिरावले. 

ट्रॅक्टर वर्कशॉपमधील कामाव्यतिरिक्त  डेंग व त्यांची पत्नी हे घराच्या सभोवती असणाऱ्या बागेतही  काम करीत. तिथे भाज्यांचे उत्पादन घेत. खर्च आटोक्यात  ठेवण्यासाठी डेंग कुटुंबीय अनेक प्रकारची काटकसर करीत.  भरपूर धूम्रपान करणारे व चवीने वाईन घेणारे डेंग यांनी या  चैनीवरील खर्च आटोक्यात ठेवला. डेंग कुटुंबीय एकत्र जरी आले तरी अजूनही दुर्दैवाने  त्यांची पाठ सोडली नव्हती. ज्याप्रमाणे डेंग यांच्याविरूध्द  रेड गाडर्‌सनी सातत्याने टीका करून व इतर मार्गाने त्यांना  त्रास दिला,  त्याहीपेक्षा जास्त त्रास त्यांच्या मुलांना दिला.  धाकदपटशा,  गुंडगिरी व झुंडशाही आणि अनेकदा मारहाण  व इजा पोहोचविणे या मार्गांनी रेड गाडर्‌स डेंग यांच्या मुलांना  सातत्याने त्रास देत व वडिलांविरुध्द माहिती काढण्याचा  प्रयत्न करीत. पुफांग हा डेंग यांचा सगळ्यात धाकटा  मुलगा. त्याच्यावर तर रेड गार्ड्‌सनी जीवघेणा हल्लाही केला.  अशाच एका प्रसंगी अशा हल्ल्यापासून स्वत:चा बचाव  करीत असताना तो घराच्या वरच्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडला आणि जबर जखमी झाला.  त्याच्या पाठीच्या कण्याला जबरदस्त दुखापत होऊन त्याचा  कमरेखालील भाग कायमचा अधू झाला. तो डेंग यांचा  मुलगा असल्याने आणि डेंग व त्यांचे कुटुंबीय रेड  गाडर्‌सच्या हिट लिस्टवर असल्याने पुफांगवर इस्पितळातील  डॉक्टरांनी इलाज करण्यात हयगय केली. पुढे पुफांगची  काळजी डेंग यांची मुले आळीपाळीने घेत. अखेर डेंग  यांच्या इतर मुलांनी इस्पितळात काळजी घेतल्यामुळे पुफांग  कसा तरी बचावला. 

अनेक विनंत्या व मिनतवाऱ्या  केल्यानंतर त्याला जखमी व विकलांग अवस्थेत जिआंगझी  येथे डेंग यांच्याकडे जाऊ देण्यात आले. तेथे डेंग स्वत: मुलाची काळजी घेत. त्याला बिछान्यावर हलताही येत नसल्याने त्याची पूर्ण शुश्रूषा,  स्वच्छता व इतर कामे डेंग  स्वत: करीत. हळूहळू डेंग यांची सारी मुले जिआंगझी येथे  किंवा तेथील आजूबाजूच्या परिसरात आली. त्या मुलांनाही  ग्रामीण भागात शेतीसंबंधीच्या कार्यक्रमात काम करावे  लागे. मात्र त्याच प्रांतात असल्याने महिन्यात वा  आठवड्यातही मुले घरी परतू शकत.  जिआंगझी येथील विजनवासात डेंग एकटे होते खरे;  परंतु कोंडी झालेल्या,  पुढील मार्ग धूसर असलेल्या आणि  चांगले काही करावयाची इच्छा असणाऱ्या मुत्सद्दी  राजकारण्यांना असे एकलेपण महत्त्वाचे वाटते. अशा  शांततेत अस्तित्वाबद्दल व पुढील वाटचालीबद्दल चिंतन  होऊ शकते आणि पुढील पावले कशी टाकायची,  याचे भान  येऊ शकते. जिआंगझी येथील विजनवासातील डेंग यांचे  चिंतन महत्त्वाचे होते. चीनचे महत्त्वाचे प्रश्न हे केवळ  माओंच्या सैध्दांतिक व क्रांतिकारी मार्गाने,  झुंडशाहीने वा अधिक साम्यवादी विचाराने सुटणार नाहीत;  तर त्यासाठी  अनेक वेगळे उपाय योजिले पाहिजेत, या विचारापर्यंत ते  आले. 

शिवाय केवळ माओंना विरोध करूनही हा प्रश्न  सुटणार नाही,  हेही त्यांना मनोमन उमगले होते. माओ अतिशय लोकप्रिय तर होतेच, परंतु त्यांची जनमानसावरील  मोहिनी ओसरलेली नव्हती. शिवाय प्रशासनावर त्यांची घट्ट  पकड होती. क्रुश्चेव्ह यांनी स्टालिनवर 1956 मध्ये कडवट  टीका केल्याने कम्युनिस्ट पक्षात व शासनव्यवस्थेत  उडालेला गोंधळ त्यांनी पाहिला होता. तेव्हापासून रशियन  राज्यव्यवस्था कमकुवत झालेलीही त्यांनी पाहिली होती.  अशा परिस्थितीत माओंच्या विचारांच्या चौकटीतच, परंतु  त्या विचारांचा थोडा वेगळा अर्थ लावून काही सुधारणा  राबवून लोकांचे राहणीमान उंचावणे शक्य आहे का,  याची ते सातत्याने चाचपणी करीत. पंचवार्षिक योजनेंतर्गत  कार्यक्रमांसाठी झाऊ एन्‌ लाय यांनी चार प्रमुख क्षेत्रांमध्ये शेती,  उद्योगधंदे,  संरक्षण आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान,  आधुनिकीकरण करण्याचे ठरविले होते. झाऊ एन्‌ लाय  यांच्या सनदशीर मार्गाने जाऊन चार महत्त्वाच्या क्षेत्रांत  आधुनिकीकरण करून चीनची कोंडी फोडली पाहिजे  इथपर्यंत हे चिंतन चाले. डेंग हे भावनाप्रधान व संवेदनशील  असले,  तरी आपल्या भावना ते सहजपणे प्रदर्शित करत  नसत. खडतर आयुष्य व प्रमाणाबाहेर काम यामुळे अनेक  वर्षे ते झोपेच्या गोळ्या घेत. जिआंगझी येथे आल्यानंतर  त्यांच्या झोपेच्या गोळ्या बंद झाल्या,  शिवाय त्यांची प्रकृती  सुधारली व वजनही कमी झाले.  आपण लवकरच बीजिंगला जाऊ व जोमाने काम सुरू  करू,  अशी आशा डेंग यांच्या मनात मूळ धरू लागली. 

Tags: cultural revolution डेंग माओ गुंडगीरी झुंडशाही चीन क्रांती महासत्ता rise of china as superpower chini mahasattecha uday deng mao gundagiri jhundshahi chin kranti mahasatta weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके