डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मराठी नाट्यसृष्टीची दोन दर्शने

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ लिहिल्यानंतर मग ‘तुझा तू वाढवी राजा’ लिहिले आणि नंतर आले ‘इथे ओशाळला मृत्यू’. या तीन नाटकांना मिळून कानेटकरांनी ‘शल्य’ हे नाव दिले. ही वस्तुतः मराठी रंगभूमीवरील पहिली त्रिनाट्यधारा म्हणता येईल. कानेटकर तिथेच यांबले नाहीत. ‘जिये गवताला भाले फुटतात’ हे राजाराम महाराजांच्या कारकिर्दीबद्दलचे नाटक लिहून त्यांनी चतुष्टक पूर्ण केले. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ऐतिहासिक-पौराणिक नाटकाचा बाजच कानेटकरांनी बदलून टाकला. ‘जय भवानी जय’ 

अथकपणे लिहीत गेलेल्या नाटककार कानेटकरांनी मराठी रंगभूमीवरील अनुभवांची जी क्षितिजे विस्तारली. ती विस्तारताना, ते खोलही उतरले असते तर पाहिजे होते - तरीही आधुनिकतेची ओळख त्या नाटकांनी करून दिली. मराठी रंगभूमी अधिक प्रौढ, अधिक प्रगल्भ झाली. भावविवशतेचा कोल्हटकरी- कालेलकरी असर त्यांनी नाहीसा केला आणि त्याचबरोबर मराठी नाट्यव्यवसायाला स्थैर्य आले, ते मुख्यतः कानेटकरांच्या नाटकांमुळे. 
 

मराठी रंगभूमीवरील कानेटकर पर्व संपले आहे. ‘वेड्याचं घर उन्हात’ या 1957 मध्ये रंगभूमीवर आलेल्या नाटकापासून ‘तू तर चाफेकळी’ या दोन वर्षांपूर्वी रंगमंचावर आलेल्या नाटकापर्यंतचा कानेटकरांचा नाट्यलेखन प्रवास स्तिमित करणारा आहे. जवळजवळ 35-40 वर्षे अव्याहतपणे ते नाटके लिहीत आले. ‘वेडयाचे घर उन्हात’मध्ये जे मनोविश्लेषण आले, ते या ना त्या स्वरूपात, कमी-अधिक प्रमाणात कानेटकरांच्या महत्त्वाच्या नाटकांमध्ये आलेले आपल्याला दिसते. सामान्य व असामान्य व्यक्तींच्या आयुष्यात डोकावून पाहताना, कानेटकरांचे लक्ष राहिले त्या त्या माणसांच्या मनाच्या खेळांकडे. ते मनाचे खेळ कधी कधी औचित्याचा विवेक बाजूला ठेवून, कानेटकरांनी नाटकांमध्ये येऊ दिले. ‘मीरा-मधुरा’ नाटकातील मीरा श्रीकृष्णाला आपला पती आणि प्रियकर मानते. एक विवाहित स्त्री आणि तीही एक महाराणी असताना तिने ‘श्रीकृष्णाबद्दल भक्ती वाटते असे न म्हणता प्रीती वाटते’, असे म्हटले. कानेटकरांनी भोजराजा, मीरा आणि श्रीकृष्ण यांना एक त्रिकोण असेच नाटकाच्या निवेदनामध्ये म्हटले आहे. ‘शिवाजीला दुसरा शिवाजी निर्माण करता आला नाही’, हे रायगडाच्या हृदयांतरीचे शल्य तरी एका पित्याच्या मनातली खंतच आहे ना? आणि एक संगीतक होऊन आलेल्या ‘लेकुरे उदंड जाहल’मध्ये अपत्य नसलेल्या पतीपत्नींच्या मनातले दुःख हळुवारपणे समोर येते. असाध्य आजाराने ग्रासलेली एक विशीतली मुलगी, मृत्यूला हसत हसत सामोरी जाते ते ‘अखेरचा सवाल’ नाटकामध्ये. माणसाच्या असंख्य मनोवस्थांचे भावपूर्ण चित्रण कानेटकरांनी समर्थपणे केले असले, तरी ‘वेड्याचं घर उन्हा’ चे निराळेपण व वैशिष्ट्य असे की सुप्त मनाचा वेध, सुप्त मनातील सत्याचा वेध कानेटकरांनी त्या नाटकात घेतला. कानेटकर त्याच वाटेने आणखी खोलवर जाते. तर त्यांचे नाट्यलेखनच फक्त नाही, तर एकूणच मराठी रंगभूमी, त्यांच्या इतर नाटकांमुळे झाली त्याहीपेक्षा अधिक सार्थ, प्रगल्भ, सकस ठरली असती.
कानेटकर खरे तर नाटक' या प्रकाराशी सदैव खेळत राहिले, किती त-हेत-हेची नाटके त्यांनी लिहिली. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ लिहिल्यानंतर मग ‘तुझा तू वाढवी राजा’ लिहिले आणि नंतर आले ‘इथे ओशाळला मृत्यू’. या तीन नाटकांना मिळून कानेटकरांनी ‘शल्य’ हे नाव दिले. ही वस्तुतः मराठी रंगभूमीवरील पहिली त्रिनाट्यधारा म्हणता येईल. कानेटकर तिथेच यांबले नाहीत. ‘जिये गवताला भाले फुटतात’ हे राजाराम महाराजांच्या कारकिर्दीबद्दलचे नाटक लिहून त्यांनी चतुष्टक पूर्ण केले. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ऐतिहासिक-पौराणिक नाटकाचा बाजच कानेटकरांनी बदलून टाकला. ‘जय भवानी जय  शिवाजी!’ अशा आरोळ्या देणारे आणि शिवशाहीच्या उदात्तीकरणामध्ये रमणारे तरुण आता रस्तोरस्ती दिसत असले, तरी कानेटकरांच्या नाटकांमध्ये ते तसे दिसत नाहीत. कारण ऐतिहासिक नाटक म्हणजे मूर्तिपूजा हे परंपरेने स्वीकारलेले समीकरण त्यांना मान्य नसते. त्यांनी शिवाजी व संभाजी महाराजांच्या मनांमध्ये प्रवेश केला. इतिहासालाही ऐकू आले नव्हते असे सत्य कानेटकरांना ऐकू आले. ‘इथे ओशाळला मृत्यू’ हे शीर्षक आहे संभाजीच्या संदर्भात. पण नाटकाचा नायक आहे औरंगजेब. नाटकाचे रचनातंत्र त्यांनी एकंदरीने परंपरेशी सुसंगतसे ठेवले; नाटकाच्या आशयाला मात्र त्यांनी समकालीनतेचे, आधुनिकतेचे परिमाण मिळवून दिले.

ऐतिहासिक-पौराणिक नाटके लिहिलेल्या कानेटकरांनी ‘प्रेमा तुझा रंग, कसा?’ ही नितान्तसुंदर सुखांतिका रंगभूमीला दिली. अस्सल सुखात्मिकेला कारुण्याचा निसटता तरी स्पर्श झालेला असतो, असे म्हणतात, त्याचा प्रत्यय ‘प्रेमा तुझा’ देते. त्या नाटकाचे शेकडो प्रयोग, कोणी कोणी केले असले, तरी कानेटकरांनीच नोंदविले आहे की, या नाटकाने कित्येकांना चकविले. एक फार्स म्हणून अनेकांनी ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ केले. त्याला झालेला तात्त्विकतेचा स्पर्श, दिग्दर्शक व कलाकारांच्या आवाक्याबाहेर राहिला. शेक्सपिअरच्या प्रमुख चार शोकांतिकांच्या नायकाची स्वभाववैशिष्ट्ये एकाच नाटकात गुंफण्याचा अचाट प्रयत्न त्यांनी केला ‘गगनभेदी’ या  नाटकात. तो असफल झाला हे खरे- पण त्यामुळे कानेटकरांच्या शोधवृत्तीचे, प्रायोगिकतेचे महत्त्व कमी होत नाही. 19 व्या शतकाच्या अखेरीला आणि 20 व्या शतकाच्या उंबरठ्यावर महाराष्ट्रामध्ये गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे कार्यकर्त्यांचे मोहोळ होते. एकेका क्षेत्रात उभे आयुष्य झोकून देणाऱ्या विलक्षण व लौकिकार्थाने विक्षिप्त व्यक्तींनी गजबजलेला काळ. त्या काळातील प्रमुख व्यक्तींच्या वृत्तीतले अनेक धागेदोरे एकत्र आणून कानेटकरांनी ‘हिमालयाची सावली’ हे नाटक लिहिले. स्त्री-पुरुष संबंधाची निरनिराळी रूपे पुढे आणणारी ‘पंखांना ओढ पावलांची’, ‘कस्तूरीमृग’ ही नाटके त्यांनी रंगभूमीला दिली. ‘अश्रूंची झाली फुले’, ’घरात फुलला पारिजात’, ‘मला काही सांगायचंय’ ही नाटके समाजातील भ्रष्टाचाराचा, हीन वृत्तीचा निषेध करणारी, नाटकांची बांधेसूद संरचना, आशयानुसार भाषेला दिलेले रूप, संवादांमधील नाट्यमयता व सहजता, चमकदार वाक्यांची बेतशीर पेरणी, माफक विनोद तोही अनेकदा उपहास, उपरोधाच्या अंगाने येणारा आणि नाट्यविषयांची विविधता व व्यक्तिरेखांची प्रभावळ- कानेटकर नाटककार म्हणून यशस्वी झाले. अशा काही वैशिष्ट्यांमुळे आणि भरभरून लिहीत राहण्याचा उत्साह होता, तशी शक्तीही होती. म्हणूनच तर कानेटकरांची निरनिराळी नाटके, एकाच वेळी निरनिराळ्या संस्था करीत आल्या. मास्टर दत्ताराम, चित्तरंजन कोल्हटकर यांच्यापासून दिलीप कोल्हटकर, प्रभाकर पाटणकर यांच्यापर्यंत मराठी रंगभूमीवरील मातब्बर अभिनेते-अभिनेत्रींनी कानेटकरांच्या नाटकांमध्ये भूमिका केल्या. त्यांमध्ये भालबा केळकर, श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, श्रीकांत मोघे, विजया मेहता, काशीनाथ घाणेकर, भक्ती बर्वे, रोहिणी हट्टंगडी, अशोक सराफ, दया डोंगरे, मधुकर तोरडमल, मोहन गोखले. असे कितीतरी होते. 

मराठी रंगभूमी वर्षानुवर्षे गजबजती राहिली ती कानेटकरी पर्वामुळे. ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वामध्ये अनेकदा पुरवठ्याच्या दर्जाबद्दल तडजोड करण्याची वेळ येते. कानेटकरांचे तसेच काहीसे झाले. एखाद्या प्रत्यक्ष घटनेवर नाटक लिहिण्याचे, कादंबरीवरून नाटक करण्याचे किंवा नाटकासाठी विषय सुचताच त्यावर पुरेसे चिंतन झालेले नसताना ते लिहून मोकळे होण्याचे कानेटकरांनी केव्हा केव्हा ठरविले ते मागणीचा रेटा वाटत गेल्यामुळे. कसबी नाटककार असल्यामुळे कानेटकरांनी डाव्या हाताने लिहिलेली नाटकेही यशस्वी झाली हे खरे. पण केवळ लोकप्रियता व लौकिक यश हे महत्ततेचे निकष नसतील, तर कानेटकरांची काही लोकप्रिय नाटके सामान्यच होती असे म्हणावे लागते. तरीही रायगडाला जेव्हा जाग येते, कस्तूरीमृग, मत्स्यगंधा, हिमालयाची सावली, मीरा-मधुरा, ही नाटके आपल्या मोठेपणाने मराठी रंगभूमीच्या इतिहासात आपले स्थान कायम करतील. अथकपणे लिहीत गेलेल्या नाटककार कानेटकरांनी मराठी रंगभूमीवरील अनुभवांची क्षितिजे विस्तारली. ती विस्तारताना ते खोलही उतरले असते तर पाहिजे होते- तरीही आधुनिकतेची ओळख त्या नाटकांनी करून दिली. मराठी रंगभूमी अधिक पौढ, अधिक प्रगल्भ झाली. भावविवशतेचा कोल्हटकरी-कालेलकरी असर त्यांनी नाहीसा केला आणि त्याचबरोबर मराठी नाट्यव्यवसायाला स्थैर्य आले, ते मुख्यतः कानेटकरांच्या नाटकांमुळे. ते पर्व संपले आहे. शब्दप्रधान नाटकांची प्रदीर्घ परंपरा असणारी आपली रंगभूमी आता प्रतीक्षा करेल ती अनुभवांची क्षितिजे विस्तारतानाच, अनुभवांच्या खोलीचा वेध घेऊ पाहणा-या  नाटककाराची.

मराठी रंगभूमीवरील सध्या अत्यंत लोकप्रिय अभिनेता असलेला प्रशांत दामले यांनी एकाच दिवशी, एकाच नाट्यगृहात सलग पाच नाट्यप्रयोगांमध्ये भूमिका करून जागतिक विक्रम एवढ्यातच केला. त्याचा बराच बोलबाला झाला. ते पाचही नाट्यप्रयोग तिकिटे काढून सलगपणे पाहणारे प्रेक्षकही निघाले. तोही त्या प्रेक्षकांनी केलेला जागतिक विक्रम होता किंवा काय, ते अजून जाहीर झालेले नाही. त्या प्रेक्षकांच्या उत्साहाला उद्देशून साप्ताहिक सकाळमध्ये एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आहे. पाच प्रयोगांचा तो विक्रम नाट्यगृहातील  एकाच खुर्चीवर बसून आपल्याला पाहायचा असल्याने, तसेच तिकीट आपल्याला मिळावे, अशी विनंती एक प्रेक्षक तिकीट विक्रीच्या खिडकीपाशी करीत आहे, असे त्यामध्ये दाखविले होते. त्या विशिष्ट खुर्चीवर बसून आपण पाचही प्रयोग पाहिले असल्याने, यापुढे त्या खुर्चीला आपले नाव देण्यात यावे, तसे त्या खुर्चीवर कोरले जावे; अशी त्या प्रेक्षकाची मागणी असल्याचे बोलले जाते. ज्या दिवशी प्रशांत दामले यांनी तो पाच नाट्यप्रयोगांत सलग भूमिका करण्याचा विक्रम केला, तो दिवस यापुढे मराठी रंगभूमीवर ‘प्रशांत दामले विक्रम दिन’ म्हणून साजरा व्हावा असा ठराव पुढील मराठी नाट्य संमेलनात (संमेलन झालेच तर) पुण्याच्या नाट्य परिषदेने मांडावा, अशीही एक सूचना कोणीतरी केल्याचे कळते.

हा विक्रम होत असताना, जोग या अभिनेत्रीने आपण यापूर्वी केव्हाच एका दिवशी पाच प्रयोग केल्याचा दावा केल्यामुळे प्रशांत दामले यांनी आता एकाच दिवसात सहा किंवा सात नाट्यप्रयोग करून, हा प्रश्न एकदाचा निकालात काढावा, अशी कळकळीची विनंती प्रशांत दामले यांचे हितचिंतक त्यांना करणार असल्पाचे हितचिंतकांचे म्हणणे आहे. एका उत्साही हितचिंतकाने तर आपण यापुढे दामले यांना विक्रम दामले म्हणणार असल्याचे सांगूनही टाकले. निरनिराळ्या नाटकांचे मिळून असे पाच नाट्यप्रयोग करण्यापेक्षा, दामले यांना सोयीचे जावे म्हणून खास पंचनाट्यधारा - त्यांच्यासाठी एक  त्रिनाट्यधारेच्या चालीवर  लिहिण्याचा संकल्प उमेदीच्या एका नाटककाराने सोडला आहे असेही बोलले जात आहे. (अशा विक्रमामुळे तरुण मुलेमुली नाटकाकडे वळतील ही) प्रशांत दामले यांची अटकळ खरी ठरविण्यासाठी, पाच मुलामुलींनी प्रशांत दामले यांच्या भूमिका असलेले नाट्यप्रयोग, पाच-पाचदा पाहण्याच्या आणाभाका घेतल्याचे तिकीट विक्रीच्या खिडकीपाशी तिकिटे मिळविण्यासाठी ताटकळत उभे असलेले प्रेक्षक एकमेकांना सांगत होते. एका विक्रमाने केवढे चैतन्य आपल्या मराठी रंगभूमीवर निर्माण होऊ पाहात आहे! जोग यांनी पाच नाट्यप्रयोगांत एकाच दिवशी भूमिका केल्या असल्या, तरी त्या काही मध्यवर्ती भूमिका नव्हत्या, असे प्रशांत दामले यांनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. असे त्यांनी म्हटले असेलच, तर ते काही ठीक नाही. कारण प्रशांत दामले यांनाही मग प्रश्न करता येतो. नटसम्राटसारख्या नाट्यप्रयोगात गणपतराव बेलवलकरांची भूमिका सलग पाच प्रयोगात? किंवा हॅम्लेट, मॅक्वेथ, ऑथेल्लो, लियर यांपैकी एखादी भूमिका? निदान कानेटकरांचे गगनभेदी नाटक? जिथे त्या चारही व्यक्तिरेखांची वैशिष्ट्ये घेऊन कानेटकरांनी एक स्वतंत्र रसायन निर्माण केले आहे - अशी भूमिका? तुम्ही करीत आलेल्या नाटकांची नावे आम्हांला माहीत आहेत. पण त्या नाटकातील तुमच्या भूमिकांची नावे सांगू शकणा-या अमिताभ बच्चनपुढे कोणताच प्रश्न न विचारता, क्षणभरात एक कोटी रुपये देऊ करतील, हे तुम्हांला माहीत आहे काय? सामान्य कुवतीचे नाटककार एकच नाटक जन्मभर लिहीत असतात असे म्हटले जाते. म्हणजे त्याने कितीही नाटके लिहिली, तरी ती पहिल्या नाटकाचीच आवर्तने असतात. त्याप्रमाणे, तुमच्या एका भूमिकेचीच आवर्तने भूमिकेचे नाव व तिचे रंगरूप बदलून तुम्ही करीत आला आहात, असे कोणी म्हटले, तर त्यात वावगे काय आहे? नटराचाच्या कृपेने व तुम्ही घेत असलेल्या काळजीमुळे तुमच्या देहयष्टीत, चेह-यामोह-यात व एकूणच लोभस व्यक्तिमत्त्वात इतक्या वर्षांत कोणताच फरक पडलेला नाही. तर मग येणा-या काही वर्षांमध्येही तुम्ही तुमचे हे ‘पेटंट’ सांभाळू शकाल. एकाच प्रकारची भूमिका, केवळ नावे व वेशभूषा बदलून, पाच-दहा-पंधरा वर्षे करीत राहण्याचा आणखी एक विक्रम आत्ताच तुमच्यासमोर तुम्ही पाहू शकता. तर त्या दृष्टीने तसा प्रयत्न करायला काय हरकत आहे? तशाही विक्रमानंतर तरुण पिढी नाटकाकडे आकृष्ट होईल अशी आशा करायलाही हरकत नाही. 

आधुनिक जागतिक रंगभूमीवर अभिनयकलेचे स्वतंत्र तत्त्वज्ञान ज्याने सिद्ध केले, त्या स्तानिस्लावस्कीने दिलेला इशारा येथे आठवतो. त्याने म्हटले आहे की, अभिनयाच्या स्टेन्सिल्सच्या सापळ्यात अनेक नट सापडतात. आपण जे करतो आहोत, ते प्रेक्षकांना खूपच आवडते आहे असे लक्षात येताच, अनेक नट मग तेच तेच करीत राहतात. अभिनयाचे साचेच जसे काही ठरून जातात. ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वाचा स्वीकार केला, तर कलाक्षेत्रामध्ये आपली वाढ खुंटण्याची मोठीच शक्यता असते आणि नट-नटींच्या भोवतालची माणसे निर्माते, दिग्दर्शक, नाटकांचे कंत्राटदार व प्रेक्षकदेखील नटनटींकडून ‘यशस्वी’ अभिनयाची मागणी करीत राहतात. कोणी गल्ला भरण्यासाठी, कोणी त्याच त्याच प्रकारचा आनंद पुन्हा पुन्हा मिळविण्यासाठी. काशिनाथ घाणेकर हे अलीकडच्या काळातले त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. विश्राम बेडेकर यांच्या ‘नरो वा कुंजरो वा’ या नाटकातले किंवा ‘रायगड’ च्या पहिल्या पाचपन्नास प्रयोगांतले काशिनाथ घाणेकर पुढे हरवले ते हरवलेच. त्यांना भरीला पाडणाऱ्यांचा दोष अगदीच नव्हता असे नाही. तरीही, शेवटी ज्याने त्याने आपापली काळजी घ्यायची असते हेच खरे.
तुम्ही गुणी नट आहात, हे नव्याने सांगायला नको. शिवाय ‘गाता गळा’ तुम्हांला लाभला आहे. निरागस, हजरजवाबी, काहीसा वेंधळा, असा नाटकातला नायक तुम्ही फार छान उभा केलात. पण आता तरी तुम्ही तशा भूमिकांचा प्रस्ताव कोणी घेऊन आले, तर त्याला ‘नाही’ म्हणण्याचे धाडस केले पाहिजे. निराळ्या प्रकारच्या भूमिकांचा आग्रह धरला पाहिजे. एक नट किंवा नटी, विविध प्रकारच्या भूमिका सहजपणे तोलून धरतो/ धरते तेव्हा ते खरे रंगभूमीचे चैतन्य असते. विक्रम मोडण्यासाठीच असतात अखेर. पण तोलामोलाच्या भूमिका करणाऱ्या नटनटींची जी प्रतिमा प्रेक्षकांच्या स्मरणात राहते, ती काळही पुसून टाकू शकत नाही, हे तुम्हांला काय सांगायला पाहिजे? उपहासाचा जरा चढा सूर इथे लागला असेल.. अशा प्रकारच्या विक्रमांनी होणाऱ्या वेदनेचेच ते रूप आहे एवढेच… शुभेच्छा!
 

Tags: प्रशांत दामले मागणी तसा पुरवठा कानेटकर नाट्यसमीक्षा नाटक सामाजिक supply as demand kanetkar drama review drama social weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव वझे
vazemadhav@hotmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके