डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मासवणच्या कन्याछात्रालयाची 25 वर्षे

हा सर्व संसार आतापर्यंत ज्या इमारतीत चालत होता ती इमारत 1973साली बांधलेली आता धोक्याची झाली आहे. पालघर जिल्ह्यात वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांचाही परिणाम इमारतीवर होत आहे. यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले आहे. जुनी इमारत पाडली आहे. त्या ठिकाणी सुसज्य प्रोग्राम हॉल, संस्थेचे ऑफिस, वारली पेंटींग विभाग, वाचनालय, स्वयंपाकघर, कार्यकर्ता रूम अशा अद्ययावत सोयींयुक्त अशी इमारत बांधण्यासाठी खर्चाचा प्रश्न आहे. (साधारणत: 40 लाख रुपये खर्च येणार आहे.) त्यासाठी हितचिंतकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे अशी विनंती आहे. सर्वांच्या सहकार्याने अनुताई लिमये व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वप्न या नव्या वास्तूत पूर्ण करू या. त्यासाठी संस्थेला भेट द्या, आर्थिक मदत करा.

बामणाच्या जन्माला जाशी त लिखूलिखू मरशी । पण वारल्याच्या जन्मा येशी तर जंगलचा राजा होशी।। 

अशी समजूत असलेल्या आदिवासीचे वास्तव्य असलेल्या मासवण पाड्यात समाजवादी महिला सभेने प्रकल्प हाती घेतला. वास्तविक हा प्रकल्प आमच्या कामापेक्षा वेगळा होता. आदिवासी जीवन वेगळ्या धाटणीचे होते. निसर्गाच्या सान्निध्यात यांचे जीवन जंगल जमिनीशी जोडलेले, तारफाच्या तलावर नाचून मन रिझवणारे, मिळेल ती कंदमुळे खाऊन, जमेल तेवढे कष्ट करणे, दारू गाळणे, दारू पिणे, मनमोकळे जीवन जगणे.

पण आदिवासी समाजावर स्वार्थी हितचिंतकाचा वेढा नकळत आवळला गेला आणि मग गुलामगिरीची, लाचारीची भित्र्या स्वभावाची परंपरा हाडीमासी रूळली. याचा विचार करून अनुताईं लिमये व त्यांच्या साथींनी या भागात सामाजिक विकासाचे पहिले पाऊल टाकले म्हणजे अज्ञान घालवणे, यासाठी शिक्षणाने कामाचा प्रारंभ 1980 मध्ये केला. 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याचे केंद्र तयार करणे आवश्यक वाटले. त्यांना कपडे, नाश्ता देणेही तेवढेच आवश्यक होते, कारण आर्थिक गरिबी!

या उपक्रमाला समाजवादी विचाराच्या स्त्रीपुरुषांचे असंख्य हात पुढे आले. 1982 ते 1987 या काळात प्रौढ वर्गाचे सायंकाळचे वर्ग सुरू केले, उपस्थिती कमी असली तरी वर्ग चालू ठेवले, असे 25 वर्ग सुरू केले. हळूहळू शिक्षणाचे महत्त्व या समाजाला पटत गेले. आमची मुले शिकली पाहिजेत, ही मागणी वाढत गेली. हाच धागा पकडून ‘आदिवासी सहज शिक्षण परिवारा’च्या संस्थापक अनुताई लिमये यांनी मुलींसाठी वसतिगृह असायला हवे, असा विचार केला. कारण मुलींना पाड्यापासून शाळेत येणे सोईचे नव्हते, त्यात घरची परिस्थिती. याबाबत कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली व योजना अमलात आणली, साल होते 1991. राष्ट्र सेवादलाच्या कार्यकर्त्या इंदूताई नवले, वय वर्षे 70 यांनी ही जबाबदारी स्वीकारली. 25 मुलींचे पहिले वसतिगृह मासवण, जिल्हा पालघर (पूर्वी ठाणे जिल्हा) येथे सुरू झाले. वसतिगृहास कन्याछात्रालय हे नाव आमचे विश्वस्त नवनीतभाई शहा यांच्या प्रेरणेतून मिळाले. वसतिगृह चालवताना आर्थिक प्रश्न होताच, शासनाच्या समाज कल्याण खात्याकडे अनुदानासाठी आमचे हितचिंतक वासुदेव वर्तक यांनी योग्य ती धडपड करून अनुदान मिळवले, या उपक्रमास पालकांचा मोठा सहभाग व प्रोत्साहन मिळत गेले. आता वसतिगृहात 45 मुली इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकण्यासाठी राहतात. समाज कल्याणचे अनुदान मिळेपर्यंत मुख्य संस्थेकडून आर्थिक मदत घ्यावी लागते. वसतिगृहात काम करणाऱ्या आया मुलींच्या पोषण आहारासाठी काम करतात. जेवण चविष्ट, रूचकर व स्वच्छ असते. पहिल्यांदा यांना चपातीची सवय नव्हती, आता रोजच्या जेवणात चपाती असते. जेवणाचे मेनूकार्ड ठरलेले असते. आठवड्यातून दोन वेळेला त्यांच्या आवडीची मासळीची भाजी असते. कडधान्ये, भाजी, आमटी-भात हे रोजच्या जेवणात असतेच.

कन्याछात्रालय म्हणजे मुलींचे व्यक्तिमत्त्व. घडविण्याचे एक केंद्र बनले आहे. हा पाया इंदूताई नवले यांनी घातला. खाद्यपदार्थ बनविणे, भरतकाम, विणकाम, अभिनय, गाणी या उपक्रमातून मुली घडत गेल्या. त्यांची शैक्षणिक प्रगती वाढीस लागण्यासाठी अनुतार्इं लिमये, मीरा भागवत, तंबाखू बाई, सुधा तांबे व अनेक कार्यकर्ते इंग्लिश, गणित, मराठी या विषयांची मांडणी करत. मनोर, पालघर येथूनही श्री.महाजन व प्रा.गढरी इंग्रजी शिकवायचे. पालघरचे सर्वच हितचिंतक, कार्यकर्ते ‘हे छात्रालय आपलेच आहे,’ या भावनेने संपर्कात असतात. एक देखणे असे कन्याछात्रालय व्यवस्थापक चारूताई रत अनेक वर्षे यशस्वीपणे संभाळत आहेत. त्या स्वत:च हरहुन्नरी असल्याने मुलींच्या अंगी विविध गुण साकारण्यासाठी धडपडत असतात.

सामाजिक जाण मुलींना यावी म्हणून राष्ट्र सेवादलाच्या शिबिरात सहभागी होण्यासाठी पाठवले जाते. गटागटाच्या सहभागाने गाणी, गोष्टी, पोवाडे पथनाट्यकला इत्यादी गुण या मुलींनी आत्मसात केले आहेत. त्यांच्यात धीटपणा, लिडरशीप हे गुण वाढीस लागले, शैक्षणिक प्रगतीचा वाढता आढावा पाहता, मुली 75 टक्क्यांपुढे जात आहेत. एकूण निकाल आता 90 ते 100 टक्के लागत आहे. मुलींचे वसतिगृह चालवणे म्हणजे फक्त निवारा, जेवण, शिक्षण एवढेच ध्येय न ठेवता, मुलींचे आरोग्य ही मोठी जबाबदारी असते. मुली पाचवीपासून इथे असतात, सणासुदीला जोडून सुट्टी आली तर घरी जातात. त्यांच्या तब्येतीबाबत काळजी घ्यावी लागते. वयात आलेल्या मुलींमध्ये मासिक पाळीबाबत जागृती करणे, त्यांची मानसिकता जपणे ही जबाबदारी सांभाळावी लागते. या भागात अंधश्रद्धा आहेत, त्यांचीही जाणीव-जागृती, शिबिरे घ्यावी लागतात. डॉ.सुधाताई रणदिवे यांनी दवाखान्याची जबाबदारी केंद्रातच राहून घेतली आहे. त्यांच्या जोडीला सुमन देशपांडे यांनी संस्थेची जबाबदारी सांभाळली. सर्व स्टाफ नेहमी सहकार्य करत असतोच! बालवाडीतून शिकलेली मुले-मुली आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या कला-गुणांना प्रोत्साहन मिळते. यातूनच वारली पेंटींग हा विभाग चालू आहे. या वस्तूंना मागणी आहे. गावातील महिलांचीही जाणीव-जागृती या शिबिरांतून केली जाते. त्याचा परिणाम गावातील महिलांमध्ये आत्मविश्वासातून आलेला बदल दिसतो आहे. पंचायत राजच्या शिबिरांमुळे आदिवासींसाठी पारित कायद्यांचा उपयोग गावपातळीवर करण्यात संस्थेचे कार्यकर्ते अभ्यासू दृष्टीने तयार होत आहेत. आदिवासींसाठी असलेल्या पेसा कायद्यासंदर्भात ग्रामपंचायतीत मिटिंगांमध्ये महिलांचा सहभाग संवादात्मक असतो.

हा सर्व संसार आतापर्यंत ज्या इमारतीत चालत होता ती इमारत 1973साली बांधलेली आता धोक्याची झाली आहे. पालघर जिल्ह्यात वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांचाही परिणाम इमारतीवर होत आहे. यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले आहे. जुनी इमारत पाडली आहे. त्या ठिकाणी सुसज्य प्रोग्राम हॉल, संस्थेचे ऑफिस, वारली पेंटींग विभाग, वाचनालय, स्वयंपाकघर, कार्यकर्ता रूम अशा अद्ययावत सोयींयुक्त अशी इमारत बांधण्यासाठी खर्चाचा प्रश्न आहे. (साधारणत: 40 लाख रुपये खर्च येणार आहे.) त्यासाठी हितचिंतकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे अशी विनंती आहे. सर्वांच्या सहकार्याने अनुताई लिमये व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वप्न या नव्या वास्तूत पूर्ण करू या. त्यासाठी संस्थेला भेट द्या, आर्थिक मदत करा. संपर्कासाठी व्यक्ती आणि त्यांचे मोबा.नंबर.

साधना दधीच, मोबा. 822314992 
वर्षा गुप्ते, मोबा. 9881369837 
प्रभा गोगावले, मोबा. 9922111978 
वर्षा फातरपेकर, मोबा. 9823943072   

Tags: आदिवासी सहज शिक्षण परिवार अनुताई लिमये वर्षा गुप्ते मासवण कन्याछात्रालय मासवणच्या कन्याछात्रालयाची 25 वर्षे varsha gupte maswan kanyachhtra weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके