डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रश्नचिन्ह आश्रमशाळा बुलडोझर फिरवून जमीनदोस्त!

‘प्रश्नचिन्ह’मध्ये 436 विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. यांना एकत्र आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. पोलीस स्टेशनच्या, कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. पण हे सारं ‘बुडती हे जन देखवेना डोळा’ म्हणोन चाललं होतं. पण समृद्धी महामार्ग ‘प्रश्नचिन्ह’ शाळेवरून जात असल्यामुळे समृद्धी महामार्गाच्या वाटेत येणारी ही शाळा कडेलोट करण्यात आली. समृद्धी महामार्गाचा रोलर या शाळेच्या स्वप्नावरून फिरला आणि पार चुराडा करून गेला. समृद्धी महामार्गाचे यंत्र-मशिनरी ‘प्रश्नचिन्ह’ला ‘नामोनिशान’ करायला लागल्या. त्यांनी आमच्या स्वप्नाचा पार चुराडा करून टाकला होता. 436 मुलांचा संसार आता उघडा पडला आहे. मोठ्या मेहनतीने गोळा केलेली ही मुले जर वेळीच आटोक्यात नाही आली तर भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना त्याचे काय? आता आशेचा किरण आहे तो समाजाकडून.

नागपूरवरून मुंबईला जोडणारा द्रुतगती समृद्धी महामार्ग काही लोकांचे घर भरत गेला, पण मी मोठ्या कष्टाने हाडाचे पाणी करून उभारलेल्या ‘प्रश्नचिन्ह’ या फासेपारधी मुलांसाठी बांधलेल्या शाळेला चिरतच गेला. गेल्या अनेक वर्षांपासून अहोरात्र मेहनत घेऊन उभारलेली शाळा जमीनदोस्त होताना पाहून काळजाचे तुकडे होत होते. पण जे.सी.बी. पोकलॅण्डला व ते चालविणाऱ्या व्यक्तीला आणि आदेश देणाऱ्या कंत्राटदाराला हे आईचे हृदय कसं कळणार? हो खरंच- मी त्या लेकरांची आई होतो, आहे व राहीलही. समृद्धी महामार्ग व प्रश्नचिन्ह फासेपारधी यांची शाळा हा खरं तर एका प्रबंधाचा विषय आहे. त्यावर एक स्वतंत्र पुस्तक तयार झाले आहे. माझी कहाणी महाराष्ट्रातील तळागाळातील समाजकार्य करणाऱ्या माणसांपर्यंत पोहोचावी यासाठी ही नुसती तोंडओळख आहे. एवढा मोठा अन्याय होऊन शासन, प्रशासन, अधिकारी- सारं कसं सामसूम. ‘तरंग नाही तलावात’ याच तालात चालत आहेत. ‘उगवला जर सूर्य मग हा अंध:कार का? म्हणविता जर राम तुम्ही तर मग हा रावणी दरबार का?’ असेच म्हणायची वेळ आली आहे.

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील यवतमाळ रोडवरील मंगरूळ चव्हाळा येथील फासेपारधी बेड्याची ही कहाणी आहे. या बेड्यातील प्रश्नचिन्ह या शाळेच्या बरोबर मध्यातून जाऊन माझ्या स्वप्नावर या समृद्धी हायवेने वरवंटा फिरवला आहे. समृद्धी महामार्गामध्ये ‘बडे लोक बडी सोच.’ सोसाट्याच्या या चक्रीवादळाने फासेपारध्यांना पाला-पाचोळ्यासारखे ‘नामोनिशान’ करून टाकले आहे. साध्या पिण्याच्या पाण्यालाही मोताद करून टाकले आहे. आजच्या कॉम्प्युटरच्या युगात आमचं दुःख कळणार तरी कुणाला? ऐकणार तरी कोण? पण तुम्ही सज्जनहो! तुमच्या हृदयाचा एक कप्पा माणुसकीसाठी राखून ठेवला आहे.

मी मतीन भोसले. फासेपारधी. मुक्काम पोस्ट मंगरूळ चव्हाळा, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. फासेपारधी म्हणजे रानावनांत राहणारा. फासा लावून जंगली जनावरांची, पक्ष्यांची शिकार करणारा व त्यावर आपला उदरनिर्वाह करणारा. गावात आम्हांला स्थान नाही. गावकुसाबाहेर पाल (कापडाची झोपडी) टाकून राहणारा आमचा हा समाज. आम्ही सदैव पोलिसांच्या हिटलिस्टवर. गावात किंवा परिसरात चोरी झाली की पोलिसांची पहिली वारी पारधी बेड्यावर. दोन-चार जणांना पकडणार. गाडीत बसविणार. पोलीस स्टेशनमध्ये मारझोड करणार. ही नित्याचीच बाब. जेवायची नेहमी बोंबाबोंब. लग्नसमारंभातील उष्ट्या पत्रावळ्या उकिरड्यावर फेकल्या जातात. त्या उष्ट्या अन्नावर गुजराण करणारा माझा समाज. शिक्षणाचा-स्वच्छतेचा पत्ता नाही. मिळेल त्या मार्गाने उदरनिर्वाह करणे हे आमचे ध्येय. जातीचा दाखला नाही. रहिवासाचा दाखला नाही. मतदारयादीत नाव नाही म्हणून कोणतीही सवलत नाही. काय न्याय आहे बघा!

आमच्यावर एवढा अन्याय? पण आमची मागणी काय? राहायला छोटेसे घर, खायला अन्न आणि प्यायला पाणी व मुलांना शिक्षण. जिल्हा परिषदेच्या शाळेतील चालेल. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ना. मी शिकलो. मास्तर झालो म्हणूनच फासेपारधी लोकांसाठी काही तरी करतो ना. नाही तर ही जमात अजूनही अंधाराच्या पखाली वाहत बसली असती. मला शिक्षणाची आवड नव्हतीच. बाबा शाळेत टाकायचे व मी शाळेतून परत यायचो. शाळेतही पारध्याचा पोर म्हणून मुलं वाळीत टाकायची. अंगावर कपडे नाहीत. पाटी-दप्तराचा तर पत्ताच नाही. पण या वादळी वाऱ्यातही माझं शिक्षण कसंबसं होत गेलं.

माझ्या फासेपारधी बांधवांना मिळणारी वागणूक, पोलिसांचा ससेमिरा, समाजाची अवहेलना, दारिद्र्य; भूक शमवण्यासाठी चाललेली धडपड- हे सारं काही डोक्यात साठवत होतो. मास्तरकी मिळाली. पगार सुरू झाला. पण मन काही रमत नव्हतं. फासेपारधी लोकांवर होणारे अन्याय काही सहन होत नव्हते. शनिवार-रविवार सुट्टीचा दिवस सारे काही समाजबांधवांसाठी देत होतो. कधी मोर्चा, तर कधी अर्ज-निवेदन, तर कधी ठिय्या आंदोलन करीत होतो.

या स्वतंत्र भारतात आमच्या समाजाला मुलांना पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर भीक मागवी लागत होती आणि तीही सहजासहजी मिळत नव्हती. या ना त्या निमित्ताने महाराष्ट्रात फिरत होतो. समाजाची वाईट व्यवस्था पाहत होतो. मायबापांनी तर पोरांना वाऱ्यावर सोडले होते. मेला काय अन जित्ता काय? कुठं थांगपत्ता नव्हता. काही मुलांचे आई-वडील मरण पावले होते. तर काहींचे आईवडील तुरुंगात होते. त्या मुलांना तर कोणीच नव्हतं. कुठेही राहायचे. कुठेही झोपायचे. काहीही खायचे. मन पेटून उठत होते.

या मुलांना शिक्षण दिलं तर काही तरी बदल होऊ शकेल असं वाटलं आणि त्यातून जन्म झाला तो ‘आदिवासी फासेपारधी सुधार समिती’चा आणि त्यातूनच निर्मिती झाली ती ‘प्रश्नचिन्ह’ या फासेपारधी आदिवासी शाळेची. मी चांगल्या पगाराची नोकरी सोडून ‘प्रश्नचिन्ह’चे इंद्रधनुष्य पेलण्याचे ठरवले. काहींनी मला मूर्खात काढले. फासेपारधी मुलांना गोळा करून त्यांना एका ठिकाणी बसविणे सोपे काम नव्हते. शिवाय मुलांना वेगवेगळ्या सवयी जडलेल्या. शिक्षण हा विषय त्यांना माहीत नव्हता. शाळा कुडाची. सुरुवात तर केली. ‘प्रश्नचिन्ह’समोर प्रश्नच प्रश्न होते. शिक्षण-निवास-भोजन-कपडेलत्ते हे सारेच करायचे. याचा प्रचंड खर्च. शाळेची नोंदणी. अनुदानासाठी पायपीट. येरझारा. कुठे मंगरूळ चव्हाळा आणि कुठे मुंबई. अनुदान आले नाही. मंत्री, अधिकारी, मुख्यमंत्री सगळ्यांकडे चकरांवर चकरा झाल्या.

शाळेच्या मुलांचा खर्च भागवण्यासाठी ‘भीक मांगो आंदोलन’ सुरू केले. फक्त एक रुपया मागितला. लोक मदत करायला तयार झाले. मी, मुले व माझे सवंगडी शिक्षणासाठी भीक मागू लागलो. पण तेथेही कायदा आडवा आला. अशी भीक मागता येत नाही. तक्रारी झाल्या. अटक तर कितीदा झाली. पोलिस स्टेशन, जेल, कोर्टकचेऱ्या व मी हे समीकरणच जणू ठरून गेलं होतं. पण पुढचे भवितव्य दिसत होते. मी नाही करणार तर कोण करणार, हा ‘प्रश्नचिन्ह’चा प्रश्न सोडविता सोडविता नाकीनऊ यायला लागले.

पण पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, माणुसकीचे लोक, डॉ.प्रकाश बाबा आमटे, मंदाकिनी आमटे मदतीला आल्या. जालन्याचा मित्र परिवार- त्याने तर मनापासून साथ दिली. किती किती नावं घ्यायची. सगळे मदत करायला लागले. शाळा उभारली गेली. होस्टेल झाले. ग्रंथालय झाले. ‘प्रश्नचिन्हा’मध्ये मला आता पहाटेचा उजेड दिसायला लागला होता. माझ्या प्रयत्नांना यश येत होते. विनाअनुदानित तत्त्वावर शाळा अन्‌ तीही फासेपारधी यांची? चालविणे किती कठीण, हे ज्याचे त्यालाच माहीत. पण ‘कौन कहता है कि आसमान में सुराख नही होता, एक तो पत्थर तो तबीयत से उछालो यारों।’ या नात्याने माझी लढाई सुरू होती. या नात्यानं मी पुढे पुढे जात होतो. एक एक वर्ष असेच जात होते. एक एक मार्ग निघत होता. मित्रपरिवार मदत करीत होता. आता कुठे गाडी रुळावर यायला लागली होती. थोडा जम बसायला लागला होता. उकिरड्याचे दिवस बदलतात. आपण तर माणसे आहोत, याचा प्रत्यय यायला लागला होता. आणि यातच वज्राघात झाला.

महाराष्ट्र शासनानं समृद्धी महामार्गाची घोषणा केली. प्रकल्प सर्वांनी डोक्यावर उचलून घेतला. पण आमच्या मात्र तो मुळावरच उठला. कारण नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ‘प्रश्नचिन्ह’ शाळेला चिरतच गेला. एका देशाचे दोन तुकडे करावे तसे झाले. लिखापढी केली. आंदोलने केली. पण पाषाणाला घाम थोडाच फुटणार आहे! ‘प्रश्नचिन्ह’च्या प्रगतीवर बुलडोझर फिरले. होत्याचे नव्हते झाले. ज्ञानाची गंगा फासेपारधी समाजात आणणाऱ्या ‘प्रश्नचिन्ह’चे ग्रंथालय उद्‌ध्वस्त करण्यात आले. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बुजविण्यात आल्या. वर्गखोल्यांवरून बुलडोझर-जेसीबी -पोकलँड फिरले. फासेपारध्यांच्या आयुष्याचे वासेच फिरले. पिण्यासाठी पाणीही उरलं नाही. अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री सारे आश्वासन देत राहिले. पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही.

‘प्रश्नचिन्ह’मध्ये 436 विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. यांना एकत्र आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली आहे. हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. पोलिस स्टेशनच्या, कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या आहेत. पण हे सारं ‘बुडती हे जन देखवेना डोळा’ म्हणोन चाललं होतं. पण समृद्धी महामार्ग ‘प्रश्नचिन्ह’ शाळेवरून जात असल्यामुळे समृद्धी महामार्गाच्या वाटेत येणारी ही शाळा कडेलोट करण्यात आली. समृद्धी महामार्गाचा रोलर या शाळेच्या स्वप्नावरून फिरला आणि पार चुराडा करून गेला. समृद्धी महामार्गाचे यंत्र-मशिनरी ‘प्रश्नचिन्ह’ला ‘नामोनिशान’ करायला लागल्या. त्यांनी आमच्या स्वप्नाचा पार चुराडा करून टाकला होता.

436 मुलांचा संसार आता उघडा पडला आहे. मोठ्या मेहनतीने गोळा केलेली ही मुले जर वेळीच आटोक्यात नाही आली तर भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना त्याचे काय? आता आशेचा किरण आहे तो समाजाकडून. माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या मानवतेकडून. मदतीचे हात पुढे येत आहेत. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,’ या नात्याने ते सोबत आहेत. पण मित्रहो, हा प्रकल्प साधा नाही. 436 मुलांचा सांभाळ करायचा आहे. तेही फासेपारधी मुलांचा. ही 100 टक्के अशक्य गोष्ट आहे. पण मी तो विडा उचलला आहे. अनेकांची घरे भरणाऱ्या व कोट्यवधी रुपयांचा मलिदा देणाऱ्या समृद्धी महामार्गाने ‘प्रश्नचिन्ह’ शाळेच्या तोंडाला पानं पुसली. आता त्यांच्यात भर पडली ती मेट्रोची. नागपूर-मुंबई मेट्रो. समृद्धी महामार्गाने आधीच आमची स्वप्नं भंग केली. आमचं उरलंसुरलं स्वप्नही ही मेट्रो  देशोधडीला लावणार आहे. ‘आम्ही आधीच मेलेले पुन्हा गळफास कशाला?’ याप्रमाणे मेट्रो मुंबईकरांच्या जीवनात प्रकाश टाकेल, पण ‘प्रश्नचिन्ह’चे प्रश्न मात्र अजून गडद करून धावणार आहे.

फासेपारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही धडपड सुरू आहे. त्याच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार करण्यात 12 वर्षे गेली. कशीबशी शाळा सुरू झाली. पण समृद्धी महामार्गाचे चक्रीवादळ आले आणि हे कमी की काय, म्हणून आता मेट्रोची त्सुनामी लाट येणार आहे. ती किती वाटोळं करेल ते देव जाणे!  हे सारं नव्याने उभारायचे आहे. विस्कळीत झालेले स्वप्न जोडायचे आहे. फिनिक्स पक्ष्यासारखं पुन्हा राखेतून उभं राहायचं आहे. और बच गया मैं तो जला ही क्या है! या उक्तीतून जायचे आहे. हे सारं होत असताना माझे मन लाही-लाही होत आहे. पण इलाज नव्हता. करणार तरी काय? किती? ‘हे असे आहे, परंतु हे असे असणार नाही. दिवस आमचा आहे तोवर घरी बसणार नाही’ या आशावादावर आमचे मार्गक्रमण सुरू आहे. व राहणारही आहे.

या धरणीकंपातून सावरण्यासाठी आपण सारे माझ्यासोबत आहात याची मला जाणीव आहे. तुमच्या बळावर तर मी ही लढाई लढत आहे. हा प्रश्न इतका लवकर सुटणार नाही. संघर्ष तर  सुरूच ठेवला पाहिजे. अंधार फार झाला, पणती जपून ठेवा; या न्यायानं दाद मागितली पाहिजे. मी जिवाचे रान केले आहे. माझी एकच विनंती आहे. तुम्हांला जमेल तशी मला मदत करा. माझ्या पाठीशी उभे राहा. ‘साथी हाथ बढाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना!’ या न्यायाने तुम्ही मला साथ दिली तर संकटांचा हा गोवर्धन पर्वत उचलणे मला सोयीचे होईल. एका उपेक्षित गावकुसाबाहेरील समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मित्रांनो, या माझ्या ‘प्रश्नचिन्ह’चे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचे मनोबल मला हवे आहे. ते होते. आहे व राहीलही!

(शब्दांकन : प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे)

मतीन भोसले

मु.पो.मंगरूळ चव्हाळा ता.नांदगाव खंडेश्वर जि.अमरावती.
Mob. 90963  64529                    

प्रश्नचिन्ह शाळेचा अकाउंट नंबर

SBI A/C 36174604565
IFC code - SBIN0008252
ACCOUNT Name - AADIWASI FASE PARADHI
SUDHAR SAMITI MANGRUL CHAWALA

किंवा Mob. 9096364529 या नंबरवर paytm/google pay/phone pe  द्वारेही जमा करू शकता.

प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा

Mob. 9096364529 (श्री. मतीन भोसले)

-------------

आवाहन : प्रश्नचिन्ह’ समोरील प्रश्न सुसह्य व्हावा यासाठी...

2011 मध्ये ‘अखेर पारसंता पवारला पारधीत्व बहाल’ या शीर्षकाचा अशोक पवारने लिहिलेला लेख साधनात प्रसिद्ध झाला होता. अमरावती जिल्ह्यात एका महिलेला परपुरुषाचा स्पर्श झाला म्हणून जातपंचायतीने बहिष्कृत केले होते. तिला पुन्हा जातीत घेण्यासाठी तिच्या नवऱ्याने 25 हजार रुपये दंड भरला होता. तो लेख वाचून पुणे जिल्ह्यातील तळेगाव-दाभाडे येथील स्वतःला पुरोगामी मानणाऱ्या वसंतराव भेगडे या निवृत्त शिक्षकाने (तो दंड पुरोगामी चळवळीला झालेला आहे, असे मानून) 25 हजार रुपये साधना साप्ताहिकाकडे पाठवले होते. तेव्हाचे संपादक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या सूचनेनुसार ती रक्कम नागपूर येथे पारसंता पवारला माध्यमांच्या उपस्थितीत सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते देण्यासाठी आम्ही गेलो होतो. तेव्हा पाहिले, ते संपूर्ण प्रकरण चव्हाट्यावर आणणारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एक शिक्षक आहे - त्याचे नाव मतीन भोसले.

त्यानंतर चार वर्षांनी, झी-24 तास या वृत्तवाहिनीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील ‘आठ अन्‌संग हीरो’ निवडण्यासाठी दहा सदस्यांची एक समिती नियुक्त केली होती. तेव्हा पाहिले, त्या समितीने शिक्षणक्षेत्रातील अन्‌संग हीरो म्हणून दोन मिनिटांत ज्याची निवड निश्चित केली, तो होता प्रश्नचिन्ह आश्रमशाळा चालवणारा मतीन भोसले. त्यानंतर तीन वर्षांनी समन्वयक या नात्याने पाहिले, महाराष्ट्र फाऊंडेशनचा संघर्ष विभागातील कार्यकर्ता पुरस्कार देण्यासाठी ज्याच्या नावावर भारतातील व अमेरिकेतील निवडसमितीने पटकन शिक्कामोर्तब केले, तो आहे मतीन भोसले.

अशा या मतीन भोसलेने 2012 मध्ये प्रश्नचिन्ह आश्रमशाळा सुरू केली. अमरावती जिल्ह्यातील एका रान-शिवारात ती अनेक अडथळ्यांवर मात करीत प्रयत्नपूर्वक उभारली. सध्या पहिली ते दहावी या वर्गातील मिळून 192 मुली व 218 मुले त्या शाळेत आहेत. मागील तीन वर्षांपासून समृद्धी महामार्गाच्या आड येत असल्याने ती शाळा संकटात सापडली. पर्यायी जागा मिळावी म्हणून आणि नुकसान भरपाई मिळावी म्हणून मतीन भोसलेने सरकार दरबारी अनेक उंबरठे झिजवले, अनेक आश्वासने मिळवली. पण उपयोग झाला नाही. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्ग निर्माणप्रक्रियेत त्या आश्रमशाळेवर बुलडोझर फिरवण्यात आला. शाळेची दहा खोल्यांची इमारत (रात्रीचा मुलांचा मुक्काम तिथेच असायचा), वाचनालय, अभ्यासिका, पारधी समाजाचे वस्तूसंग्रहालय हे सर्व पाडण्यात आले. भरपूर पाणी असलेली मोठी विहीर बुजवण्यात आली.

शाळेचा साडेतीन एकर परिसर महामार्गाने ताब्यात घेतला, दोन एकर जागा संस्थेकडे शिल्लक आहे, आणखी तीन एकर जागा शेजारी आहे पण शासन निर्णय प्रलंबित आहे. त्या दोन एकर जागेत तात्पुरता निवारा करून ही मुले सध्या राहताहेत. काही मुले-मुली आपापल्या नातलगाकडे गेली आणि भीक मागू लागली आहेत, त्यांना परत आणायचे आहे. काही मुले-मुली तिथे आहेत, त्यांना टिकवून ठेवायचे आहे. प्रश्नचिन्ह आश्रमशाळेसमोर प्रश्न खूप आहेत. ते पूर्णतः कधीही सुटणार नाहीत, पण ते सुसह्य होऊ शकतात. त्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे येणे आवश्यक आहे. म्हणून आम्ही वाचकांना आवाहन करतो, शक्य त्या मार्गाने पुढे या... मतीन भोसलेशी संपर्क करा...!

- संपादक, साधना

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मतीन भोसले,  अमरावती, महाराष्ट्र

समाजसेवक, संस्थापक- प्रश्नचिन्ह शाळा, अमरावती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके