डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हा राग विचार उगम अशासाठी की- केवळ एक जगद्‌विख्यात व्यक्ती म्हणून त्या रागास गांधींचे नाव दिले नव्हते, तर गांधी हे नाव देण्यामागे कुमारजींनी गांधीवादाचा अथांग विचार जोडला होता. अगदी कुमारजींच्या शब्दांतच म्हणायचे तर ते म्हणतात, ‘‘गांधी रागाची रचना करण्याचे निश्चित झाल्यावर अनेक प्रश्न माझ्या मनात उमटले. जसे- कुठल्या रागाच्या पायावर हा नवा राग उभारावा? कारण त्या रागाची मूळ प्रकृती आणि माझ्या मनात विराजमान झालेली गांधीजींची प्रतिमा यामध्ये मेळ होणे केवळ आवश्यकच नव्हते, तर ती माझी प्रथम अट होती.’’ ज्याप्रमाणे रणरणत्या उन्हात मल्हार रागाचे स्वर पावसाची शीतलता, चंचलता आणि त्यातही लपलेली गंभीरता घेऊन येतात; त्याप्रमाणेच हिंसेने भरलेल्या जगात मोहनदास गांधी अहिंसेचा मल्हार केवळ स्वतः गात नाहीत, तर लाखो-करोडो जणांना त्या सुरांत सूर धरायला लावतात, म्हणून रागाचे नाव ठरले ‘गांधी-मल्हार’- मल्हार रागाचा पंधरावा प्रकार!  

विज्ञान ते अध्यात्म अशा सर्वच क्षेत्रांत महात्मा गांधी हे व्यक्तिमत्त्व आदरणीय ठरले आहे. परंतु शालेय अभ्यासक्रमात संगीत हा सक्तीचा विषय असावा असे म्हणणारे, आपल्या प्रत्येक आंदोलनात संगीताचा अग्रक्रमाने उपयोग करणारे आणि मनुबेनला एका पत्रात संगीत शिकण्याचा आग्रह धरणारे संगीतप्रेमी गांधीजी लोकांच्या नजरेस खूपच अभावाने पडले. परंतु संगीतप्रेमी बापूंचे गारूड प्रा.देवधरांच्या एका गुणी शिष्यावर पडले होते आणि ‘शिवपुत्र कोमकली’ नावाच्या त्या शिष्याने स्वतःची ‘कुमार गंधर्व’ अशी ओळख निर्माण झाल्यावर त्यांच्या नावाच्या एका अभिजात संगीतरचनेने त्या प्रभावाला जिवंत ओळख दिली होती. 

दि.8 ऑगस्ट 1942 रोजी गोवालिया टँक- मुंबई येथे ‘भारत छोडो’ आंदोलनाची सभा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली भरलेली होती. याच सभेत गांधीजींनी ’Quit India’ हे जगप्रसिद्ध भाषण दिले होते. शिवपुत्र कोमकली इतर विद्यार्थ्यांसोबत तिथे भजन गाण्यास गेले होते. गांधीजींचे अजानुबाहू व्यक्तिमत्त्व त्या वेळी त्यांच्या दृष्टीस सर्वप्रथम पडले. भजन चालू असताना वेगवेगळ्या लयीत ताल धरलेल्या जमावास गांधींनी मधेच थांबवले व ते म्हणाले, ‘‘जोवर पूर्ण देश एका लयीत ताल धरू शकत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य येऊ शकत नाही.’’ संगीतातील तालबद्धता देशपातळीवर आणू पाहणारे महात्मा कुमारजींच्या मनात घर करून राहिले ते कायमचेच! त्यांचा दुसरा अनुभव म्हणजे प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ज्या दिवशी ते माळवा प्रांतातील देवासला स्थायिक झाले, तो दिवस होता 30 जानेवारी 1948- महात्माजींच्या हत्येचा दिवस! या दोन दिवसांमुळे कुमारजींच्या मनात या महात्म्याची एक प्रतिमा निवास करू लागली. 

देवासला राहत असताना तेथील लोकसंगीतावर प्रभावित होऊन कुमारजींनी 11 ‘धून-उगम’ (ज्याचा मूलभूत आधार एखाद्या लोकसंगीताची धून आहे) रागांची रचना केली. पुढे ज्या वेळी गांधी जन्मशताब्दी निमित्ताने समितीने कुमारजींकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली, तेव्हा गांधींच्या नावाने राग निर्माण करायचे त्यांनी पक्के केले आणि एका ‘विचार उगम’ रागाचा जन्म झाला. 

हा राग विचार उगम अशासाठी की- केवळ एक जगद्‌विख्यात व्यक्ती म्हणून त्या रागास गांधींचे नाव दिले नव्हते, तर गांधी हे नाव देण्यामागे कुमारजींनी गांधीवादाचा अथांग विचार जोडला होता. अगदी कुमारजींच्या शब्दांतच म्हणायचे तर ते म्हणतात, ‘‘गांधीरागाची रचना करण्याचे निश्चित झाल्यावर अनेक प्रश्न माझ्या मनात उमटले. जसे- कुठल्या रागाच्या पायावर हा नवा राग उभारावा? कारण त्या रागाची मूळ प्रकृती आणि माझ्या मनात विराजमान झालेली गांधीजींची प्रतिमा यामध्ये मेळ होणे केवळ आवश्यकच नव्हते, तर ती माझी प्रथम अट होती.’’ ज्याप्रमाणे रणरणत्या उन्हात मल्हार रागाचे स्वर पावसाची शीतलता, चंचलता आणि त्यातही लपलेली गंभीरता घेऊन येतात; त्याप्रमाणेच हिंसेने भरलेल्या जगात मोहनदास गांधी अहिंसेचा मल्हार केवळ स्वतः गात नाहीत, तर लाखो-करोडो जणांना त्या सुरांत सूर धरायला लावतात, म्हणून रागाचे नाव ठरले ‘गांधी-मल्हार’- मल्हार रागाचा पंधरावा प्रकार! 

ते पुढे म्हणतात, ‘‘महात्माजींना राजकारणात मिळालेले अभूतपूर्व यश आणि त्यांच्या कर्तृत्वाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर घडलेल्या चमत्कारांची जाणीव प्रत्येक सामान्य नागरिकाप्रमाणे मलादेखील आहे. परंतु माझे कर जुळतात त्यांच्या अभय साधनेसमोर! माझे मस्तक झुकते त्यांच्या सर्वंकष करुणेसमोर!’’ अशा प्रकारे गांधींच्या सत्य-साधनेतील अभय आणि करुणा या मूल्यांचा कुमारजींनी समग्र वेध घेतला. त्या विचारांचे संगीताशी गठबंधन करताना त्यांनी ‘ग’ आणि ‘ध’ या दोन स्वरांची चढती व उतरती सुरेल संगती आखली. त्यामुळे ‘ग’ हा या रागाचा वादी स्वर(प्रमुख स्वर) आणि ‘ध’ संवादी स्वर (उपप्रमुख स्वर) ठरला. मल्हारचा प्रकार असल्याने वर्षा ऋतूत हा राग खुलून दिसतो. 

या रागाच्या आरोहात (स्वरांचा चढता क्रम) सर्व शुद्ध स्वर- विशेषतः गंधार (ग) शांत, धीरगंभीर वलय निर्माण करतो. त्यात कुमारजींच्या गळ्यातून हा राग ऐकताना मध्य सप्तकातील धैवतापासून (ध) मिंड घेत इतर स्वरांना चिरत तार सप्तकातील गंधारपर्यंतचा (ग) प्रवास सत्यशोधनाची कास आणि आत्मनिष्ठा अधिक दृढ करून जातो. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर- स्वरांच्या खालून वरपर्यंतच्या प्रवासात कुमारजींनी अभयता हा भाव दाखवला आहे. मात्र अवरोहात (स्वरांचा उतरता प्रवास) कोमल निषाद(नी) व कोमल गंधार (ग) घेऊन ते करुणा अधोरेखित करतात. गांधी-मल्हारसाठी कुमारजींनी बनवलेल्या दोन बंदिशींत त्यांनी जरी गांधीजींच्या माहात्म्यावर भाष्य केले असले, तरीही केवळ व्यक्तिपूजेवर न थांबता भारतात गांधी नावाने प्रकट झालेल्या महानतेला त्यांचा तो दंडवत आहे.  विलंबित(संथ) आणि द्रुत(जलद) लयीत बांधलेल्या या बंदिशींचे शब्द असे आहेत- 

विलंबित एकताल

स्थायी- तुम हो धीर हो रे संजीवन भारत के विराट हो रे 
अंतरा- आहत के आरत के सखा रे पावन आलोक अनोखे हो रे 

द्रुत एकताल 

स्थायी- तुम में सब रूप एकहि पंथ, एक मंत्र समता साकार 
अंतरा- दर्शन के अनुगामी अंतर एकाकी भीतों के आधार 

अशा या एका महानतेने दुसऱ्या महानतेला वाहिलेल्या रागांजलीला हवा तसा लोकाश्रय मिळाला नाही. याचे कारण शोधत असताना कुमारजींचेच एक मत समोर येते. त्यानुसार, ‘राग हे नग्न असतात, तर बंदिशी त्यांना पेहराव चढवण्याचे काम करतात.’ म्हणजे बंदिशींमार्फत रागाला खरी ओळख आणि लोकाश्रय मिळतो. जसे- राग भैरवी तसा सर्वसामान्यांना माहिती नसतो, परंतु ज्या वेळी त्यांना ‘दो हंसों का जोडा’ ते ‘धूम मचाले धूम’ अशी त्या रागात बांधलेली गाणी उदाहरणादाखल दिली जातात; तेव्हा त्यांचा केवळ भैरवीशी परिचयच होत नाही, तर त्या रागाची विभिन्न विशेषता त्यांच्या सहज लक्षात येते. 

गांधी-मल्हारमध्ये कुमारजींवरील दोन बंदिशींपलीकडे आजवर कुठलीच रचना झाली नाही. अशा वेळी 50 वर्षे उपेक्षित राहिलेल्या या रागाला कुमारजींच्या शिष्यांमार्फत वा सहकाऱ्यांमार्फत लोकांपुढे आणण्याचा एकमेव पर्याय शिल्लक राहतो आणि तिथे गांधी हे नाव आड येते. 

राष्ट्रपित्याची हत्या होणाऱ्या या देशात त्यांच्या चारित्र्य- हननाचे जितके प्रकार झाले व चालू आहेत, तितके अभावानेच कुठल्या अन्य थोर व्यक्तीसोबत घडले असतील. म्हणजे- अगदी ‘वैष्णव जन तो’ हे त्यांचे आवडते भजन, म्हणून काही गायक ते भजनदेखील गात नाहीत. अशा वेळी गांधी-मल्हार तरी त्या द्वेषाची शिकार होण्यापासून कसा सुटू शकतो? अगदी माझाच अनुभव घ्यायचा झाला तर- कुमारजींचा निकट सहवास लाभलेले व त्यांचे शिष्यतुल्य असलेल्या एका ज्येष्ठ शास्त्रीय गायकास मी गांधी- मल्हारविषयी विचारले होते. या बुजुर्ग गवयाच्या गप्पांची मैफल बऱ्याच वेळा गांधीद्वेषाने चालू होते व संपतेही गांधींवर गरळ ओकूनच! ते मला बोलले, ‘‘अरे तो गांधी- मल्हार नाही, तर ग आणि ध ची संगती असल्याने गध- मल्हार आहे आणि लोकांनी त्याचा गांधी-मल्हार केला. तुला मी सांगतो, ते गांधी...’’ आणि संगीत सोडून ते गांधींवर थोडेसे बोलले. (अर्थात पुढे गांधीप्रेमी बसलेला असल्याने टीका थोडीशी सौम्य भाषेत होती.) असो. तर, अशा प्रकारे गांधी-मल्हार राग कधी बंदिशींच्या मर्यादेमुळे तर बऱ्याचदा गांधीद्वेषाचा शिकार होऊन उपेक्षितच राहिला. 

परंतु तसे पाहिले तर, या रागाची रचना करताना कुमारजींनी एक डोळस भक्तिभाव पाळला होता. त्यामुळे या रागाला भरभरून ग्लॅमर मिळावे, अशी त्यांचीदेखील कधी अपेक्षा नसावीच! जर गांधी या प्रसिद्ध नावाचा वापर करून त्यांनी व्यक्तिपूजेचे स्तोम या रागात माजवले असते, तर कदाचित या रागाला भरभरून ग्लॅमर आणि राजकीय लाभ मिळाला असतादेखील! मात्र त्यातील आत्मा पार नाहीसा झाला असता- अगदी गांधीटोपी आणि खादीच्या आड झालेल्या गांधीविचारांच्या पायमल्लीप्रमाणेच! 

वर उल्लेखल्याप्रमाणे गांधी-मल्हार हा व्यक्तिउगम नसून विचार उगम राग आहे. नव्हे, गांधींच्या शोशत विचारांची ती एक स्वरमालिका आहे. पन्नास वर्षांच्या दीर्घ कालखंडानंतर गांधी-मल्हार कधी तरी लोकांपर्यंत पोहोचेल की नाही, हे सृजनशीलतेबरोबर नीतीचा ध्यास असलेल्या नव- कलावंतांच्या असण्यावर व येणाऱ्या काळावर अवलंबून आहे. मात्र जोपर्यंत कुमार गंधर्व व महात्मा गांधी यांचे अस्तित्व बहुजनांच्या मनात जिवंत आहे- त्याहीपलीकडे जोवर सत्यसाधनेत अभय आणि करुणा ही मूल्ये तग धरून आहेत, तोपर्यंत ‘गांधी-मल्हार’ अमर राहील. 

संदर्भ- 
1. कुमार गंधर्व यांच्या कन्या व प्रख्यात शास्त्रीय गायिका विदुषी कलापिनी कोमकली यांच्याशी संवाद 
2. अनुपरागविलास भाग 2 - कुमार गंधर्व 
3. गांधी-मल्हार रागाची You Tube वर उपलब्ध प्रस्तुती 
4. The Raza foundation च्या कार्यक्रमातील विदुषी कलापिनी कोमकली व एस.एन. सुब्बराव यांची प्रस्तुती.   

Tags: धूनउगम राग गांधी मल्हार महात्मा गांधी कुमार गंधर्व शास्त्रीय संगीत मॅक्सवेल लोपीस raga Gandhi malhar mahatma Gandhi kumar gandhrva Indian classical music Maxwell lopis weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मॅक्सवेल लोपीस,  वसई
maxwellopes12@gmail.com

नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक, भारतीय संगीत आणि गांधीविचारांचे अभ्यासक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके