डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

खुद्द उस्तादजींचे चिरंजीव अमानखाँ यांनी गांधीजींबद्दल म्हटलेले आहे, ‘‘ज्या-ज्या वेळी भारतात आणि भारताबाहेर मला विचारले जाते की गांधी तुझ्यासाठी कोण आहेत; त्या त्या वेळी माझे हृदय आनंद आणि अभिमानाने भरून जातेच. परंतु त्याचवेळी त्याचा एक कोपरा दुःखीदेखील होतो. आनंद आणि अभिमान अशासाठी की गांधी खरोखरच लोकोत्तर होते आणि आज ते पूर्ण जगात चांगुलपणा, सत्य, प्रेम, अहिंसा आणि शांतीचे प्रतीक बनलेले आहेत. दुःख अशासाठी की त्यांच्याच एका अत्यंत भरकटलेल्या देशबांधवाकडून त्यांची हत्या झाली; ज्याची द्वेष भावनेवर आधारलेली विचारधारा आजही देशात आणि राजकारणात जिवंत आहे. महात्मा गांधींनी स्वतःला संगीत साधनेपासून परावृत्त करूनही ते भारतातील चार दिग्गज संगीतकारांचे आदर्श ठरले होते. यातील खरा अर्थ इतकाच की गांधीजींना मानवतेची वैश्विक भाषा समजलेली होती. संगीत हीदेखील एक वैश्विक भाषाच आहे.

आमरण गरिबीचे व्रत घेतलेल्या महात्मा गांधी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात स्वतःला संगीत, चित्रकला अशा कला जोपासण्यापासून थोडेसे दूरच ठेवलेले होते. अर्थात गांधीजी संगीतकलेचे आस्वादक मात्र नक्कीच होते. बाल गंधर्वांनादेखील त्यांनी त्यांचं गाणं ऐकण्यासाठी निमंत्रित केलेले होते. एम.एस. सुब्बलक्ष्मी तर गांधींना गाणं ऐकवण्यासाठी नेहमी जात. याचा अजून एक गमतीदार किस्सा म्हणजे 1924 मध्ये पुणे येथे दिलीपकुमार राय नावाच्या एका गायकाच्या गायनाने गांधी मंत्रमुग्ध झालेले होते. काही महिन्यांनी राय गांधींना कोलकत्यात भेटले तेव्हा गांधींनी त्यांना गमतीत विचारले, 'Where is your instrument of torture?'  यातील गमतीचा भाग बाजूला ठेवला तर सदैव संगीतकलेबद्दल आस्था असूनही देशसेवेच्या कार्यात अहोरात्र झोकून दिलेल्या महात्म्याच्या संगीतकलेपासून दूर असल्याच्या त्या भावना असाव्यात!     

अशा या गांधींचे जीवन हे कलासाधनेपासून दूर राहूनही  कलेच्या भावनांनी असे काही चमत्कारिकरीत्या भरलेले होते की कित्येक महान कलाकारासांठी ते नवनिर्मितीचे एक प्रेरणास्थान बनले आणि त्यातून त्यांच्या कलेला नवनवीन आयाम मिळून गेले. कुणी त्यांची वेगवेगळ्या शैलींत चित्रे रंगवली तर कुणी त्यांच्यावर काव्ये रचली. अगदी थोर समाजसेवक बाबा आमटे यांनादेखील गांधीजींवर कविता सुचल्या. 

संगीतकलेबाबत विचार झाला तर गायनात कुमार गंधर्वांनी बांधलेल्या गांधी मल्हार रागावर मी माझ्या मागील एका लेखात विस्तृतपणे लिहिलेले होते. कुमार गंधर्वांचा तो राग-विचार प्रधान होता आणि एखाद्या व्यक्तीच्या अंगी असलेल्या नैतिक मूल्यांच्या भांडारावर इतका सखोल विचार करून राग बांधणारे कुमारजी बहुधा एकमेव शास्त्रकार असावेत. परंतु कुमारजींव्यतिरिक्तदेखील अजून तीन महान कलाकारांनी गांधींच्या व्यक्तिमत्त्वाला मध्यवर्ती ठेवून तीन रागांची रचना केलेली होती. हे इतर तिन्हीही राग कुमारजींच्या गांधी मल्हारइतके विचारप्रवण नसले तरीही ते त्या कलाकारांना सहजपणे सुचलेले असल्याने त्या रागांना ‘उत्स्फूर्त राग’ अशा नवीन प्रकारातून पाहायला हरकत नसावी. त्याच वेळी अजून एक विस्मयाची गोष्ट म्हणजे संगीतक्षेत्राशी थेट संबंध नसूनही एकाच वेळी ज्यांच्यावर चार चार राग निर्माण केले जातात असे राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्त्वदेखील गांधींखेरीज अन्य कोणी असेल असे अजूनतरी पाहिल्याचे वा ऐकल्याचे स्मरणात नाही. 

यातील पहिला राग ठरतो तो प्रख्यात सतारवादक भारतरत्न पं. रविशंकर यांची निर्मिती असलेला राग ‘मोहन कंस’.  1949 मध्ये ऑल इंडिया रेडिओने पं.रविशंकर यांना गांधीजींना सतारवादनाद्वारे श्रद्धांजली वाहण्यासाठी आमंत्रित केलेले होते. अगदी वर्षभरापूर्वी झालेल्या गांधीजींच्या हत्येने पंडितजी इतके व्यथित झालेले होते की आपल्या भावनांना मुक्त करीत त्यांनी सतारीवर सूर छेडले आणि तिथल्या तिथे एका नवीन रागाचा जन्म झाला. याच रागाला त्यांनी पुढे जाऊन ‘मोहन कंस’ असे नाव दिले. या रागाच्या चलनात राग जोग आणि राग मालकंस या दोन रागांचा संगम होता. रागाच्या चढत्या क्रमात (आरोहात) शुद्ध ‘ग’ स्वर लावून पंडितजींनी अतीव वेदना आणि दुःख या भावनांना अभिव्यक्त केलेले होते, तर उतरत्या क्रमात (अवरोहात) कोमल ‘ग’ या स्वराद्वारे राग मालकंसचे रूप दाखवून जणू त्या वेदनेवर हळुवारपणे फुंकर मारलेली होती. या रागाची खुबी अशी की या रागाच्या मुख्य सुरावटीत (ज्याला संगीतात पकड़ असे म्हटले जाते) ग, नी आणि ध असा तीन स्वरांचा क्रम लावून गांधी या शब्दाला वाहिलेल्या सदर आदरांजलीला पूर्णत्व दिले गेले आहे. 

यानंतर गांधीजींवर अगदी अलीकडेच प्रस्तुत झालेला राग म्हणजे दक्षिण भारतीय संगीतातील महान चित्रवीणा वादक एन. रविकिरण यांनी निर्माण केलेला ‘राग मोहिनी’. साधारणतः 90 च्या दशकात या रागाची निर्मिती रविकिरण यांनी केलेली होती. त्याची पहिली गायनातून प्रस्तुती 2 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांच्या अनहिता आणि अपूर्वा या दोन शिष्यांनी दिल्ली येथे IGNCA ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केलेली होती. हा राग म्हणजे कर्नाटकी संगीतातील राग मोहनम (उत्तर भारतीय परंपरेतील राग भूप) या रागाचेच एक विस्तारित स्वरूप. यात कोमल रे, कोमल ग आणि कोमल ध असे एरवी भूपमध्ये न येणारे स्वरदेखील घेतले जातात. या रागात रविकिरण यांनी महात्मा गांधींचे वर्णन असलेली दक्षिणी संगीतातील सात मात्रांच्या ‘छापू’ या तालात एक संस्कृत बंदीश बांधलेली आहे ज्याचे बोल आहेत, 
महात्मा गांधीम्‌ आश्रये सदाम्‌।
सुहासं मोहिनी सम कस्तुरी देवी सहात्मम्‌।
मोहनकरम करमचन्द्रजाम्‌,
सत्यधर्म सुरक्षानाम्‌,
असत्यहीनां सुरक्षानाम्‌ असत्यहीनां मार्गदम्‌
अत्याहिंसां मार्गदम्‌, अतिधीरं नीतिसारम्‌
 प्रत्यारि गर्वनाशकम्‌, परभृत्य भारत मुक्तीकारकं
 नित्य रविशशीसम्‌, प्रभावं मम देवम्‌॥

(आम्ही सदैव महात्मा गांधीचा आश्रय घेतो. सतत मोहिनीप्रमाणे हसणारी कस्तुरीदेवी त्यांच्या बरोबर असते. सत्य धर्माच्या सुरक्षेकरता, असत्याच्या नाशाकरता मार्ग बनलेले महात्मा गांधी अहिंसेच्या मार्गावर चालणारे अति धैर्यवान आणि नीतीचे सार आहेत. प्रत्येक गर्वरूपी शत्रूचा नाश करणारे, परसत्तेपासून भारताला मुक्त करणारे, नेहमी सूर्य-चंद्राप्रमाणे प्रभाव असलेले महात्मा हे माझे देव आहेत.)

मालकंस हा उत्तर भारतीय संगीतातील एक प्रधान राग मानला जातो. रात्रीच्या अंतिम प्रहरी गायला जाणारा हा राग शांतता आणि शुद्धता दर्शवतो. क्रोधित झालेल्या शंकराला शांत करण्यासाठी देवी पार्वतीने या रागाची रचना केलेली होती अशी पौराणिक कथा आहे. कथा काहीही असो. परंतु शांती आणि शुद्धतेचा हा राग महात्माजींच्या व्यक्तिमत्त्वाशी खूपच मेळ खातो. याचे ठोस प्रमाण म्हणजे प्रख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँसाहेब यांनाही जेव्हा महात्मा गांधींवर राग सुचला तेव्हा तो रागदेखील रविशंकर यांच्या ‘मोहन कंस’ याप्रमाणेच मालकंस या रागामधूनच निर्माण झालेला होता. उस्तादजींनी 1990 मध्ये या रागाला ‘बापू कंस’ या नावाने ओळख दिली. त्याच वर्षी UNESCO तर्फे त्यांना ‘गांधी मेडल’ मिळाले होते. त्या कार्यक्रमात या रागाचे पहिले सादरीकरण केले गेले. त्यानंतर 2006 मध्ये साउथ आफ्रिकेत गांधीजींच्या सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका महोत्सवात त्यांनी पुन्हा या रागाची प्रस्तुती दिली. 

इथे उ.अमजद अली खाँ साहेबांना हा राग सुचला असे म्हणण्यामागे एक विशेष कारण आहे. उस्तादजींचे असे प्रांजळ मत आहे की ते राग निर्माण करीत नाहीत; तर राग त्यांच्याकडे स्वतःहून येतात आणि एखाद्या लहान बालकांप्रमाणे ‘मला नाव द्या’ असे त्यांना विनवू लागतात. ‘बापू कंस’ हा राग भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या सर्व क्रांतिकारकांबद्दल वाटणाऱ्या आदरातून उस्तादजींना सुचला होता. या पुढाऱ्यांत गांधीजी हे अग्रस्थानी होते. तसेच या रागातून प्रकट होणारी मूल्ये जसे प्रेमळपणा, दयाभावना आणि अहिंसा उस्तादजींना गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या खूप जवळ जाणारी वाटल्याने त्यांनी या रागाला बापूजींचे नाव सुचवले. 

या रागासंबंधाने मी उस्तादजींकडे अधिक विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘ज्या एका व्यक्तीचे आपण खूप मोठे देणे लागतो ती व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी आहेत. हे एक असे लोकोत्तर पुरुष होते जे आध्यात्मिक दृष्टीने खूप वरचे होतेच; परंतु त्यांच्याकडे एक (संसारातील) ध्येयदृष्टीदेखील होती. मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे आणि ते खरोखरच महान आत्मा होते अशी माझी धारणा आहे. त्यांना प्रेमाने ‘बापू’ म्हटले जाते म्हणून मीदेखील या रागाला ‘बापू कंस’ असेच नाव दिले.’’ 

या रागाच्या बांधणीबद्दल अधिक विचारले असता उस्तादजींनी त्या माहितीसोबतच दिलेले स्पष्टीकरण संगीत अभ्यासकांसाठी खूपच महत्त्वाचे ठरते- मला असे वाटते की, काही राग केवळ त्यांची स्वरस्थाने सांगून स्पष्ट होऊ शकत नाहीत. आपली परंपरा ही मौखिक असल्याने या रागांची वैशिष्ट्ये आणि त्यांची अवस्था समजून घ्यावी लागते. त्यासाठी खडतर साधनाच करावी लागते. 

संगीतातील रागरागिण्या या मानवी मनाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. यामुळेच उस्तादजी संगीताच्या पायाभूत व्याकरणातील सिद्धान्तांना बाजूला ठेवत रागावर भाष्य करतात. अगदी पं. भातखंडे यांनी दिलेली थाटांची (रागांच्या उत्पत्तीची वर्गवारी) कल्पनाही त्यांना मान्य नाही. 

इथे उस्तादजींच्या मताचा आदर ठेवून या रागाची रचना मुद्दामहून दिलेली नाही. त्यापेक्षा हे सर्व राग गांधींच्या डोळे बंद करून ध्यानस्थ बसलेल्या प्रतिमेला डोळ्यांसमोर ठेवून जर ऐकले गेले तर त्या रागांमागील खरा विचार अधिक समर्थपणे प्रकट होऊ शकतो असे माझे मत आहे.

उस्ताद अमजद अली खाँ यांनी आपल्या शिष्यांना सरोदवादनासोबतच त्यांना आकळलेला गांधीवादाचा वारसादेखील दिलेला आहे. त्यांचे एक शिष्य पं. विश्वजीत राय चौधरी यांनी या रागाबद्दल म्हणताना असे म्हटले आहे की या रागात ‘प’ या स्वराला विशेष स्थान आहे. महात्म्याने अध्यात्मसाधनेत आकाश गाठलेले होते. परंतु त्यांचे पाय हे व्यावहारिक जीवनातही त्यांनी घट्ट रोवून ठेवलेले होते. अध्यात्म आणि लौकिक  जीवनात समन्वय साधणारे गांधी म्हणूनच पं. राय यांना रागाच्या उत्तर अंग आणि पूर्व अंगात मेळ साधणा़ऱ्या पंचम स्वराप्रमाणे वाटले असावेत. 

खुद्द उस्तादजींचे चिरंजीव अमानखाँ यांनी गांधीजींबद्दल म्हटलेले आहे, ‘‘ज्या ज्या वेळी भारतात आणि भारताबाहेर मला विचारले जाते की गांधी तुझ्यासाठी कोण आहेत; त्या त्या वेळी माझे हृदय आनंद आणि अभिमानाने भरून जातेच. परंतु त्याच वेळी त्याचा एक कोपरा दुःखीदेखील होतो. आनंद आणि अभिमान अशासाठी की गांंधी खरोखरच लोकोत्तर होते आणि आज ते पूर्ण जगात चांगुलपणा, सत्य, प्रेम, अहिंसा आणि शांतीचे प्रतीक बनलेले आहेत. दुःख अशासाठी की त्यांच्याच एका अत्यंत भरकटलेल्या देशबांधवाकडून त्यांची हत्या झाली; ज्याची द्वेषभावनेवर आधारलेली विचारधारा आजही देशात आणि राजकारणात जिवंत आहे.

महात्मा गांधींनी स्वतःला संगीत साधनेपासून परावृत्त करूनही ते भारतातील चार दिग्गज संगीतकारांचे आदर्श ठरले होते. यातील खरा अर्थ इतकाच की गांधीजींना मानवतेची वैश्विक भाषा समजलेली होती. संगीत हीदेखील एक वैश्विक भाषाच आहे. या दोन वैश्विक भाषांचा मिलाप हा गांधीजींच्या महान व्यक्तिमत्त्वात घडून आलेला होता. आणि त्यामुळेच गांधीजी हे आज विश्वशांतीचा एक विजयी स्वर बनून अमर आहेत. अमर राहतील..

Tags: गांधी मॅक्सवेल लोपीस weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मॅक्सवेल लोपीस,  वसई
maxwellopes12@gmail.com

नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक, भारतीय संगीत आणि गांधीविचारांचे अभ्यासक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके