डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मागील वर्षभर साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेल्या ‘माझे विद्यार्थी’ या लेखमालेचे पुस्तक आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन 24 डिसेंबर 2015 रोजी, अंमळनेर येथील साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या जागेवर झाले. यावेळी अविनाश पाटील, प्रा. अ. गो. सराफ, गिरीश वाळिंबे, गोपाळ नेवे आणि स्वत: लेखक उपस्थित होते.

परिस्थितीशी झगडणाऱ्या आणि गुरेढोरे हाकून शेतीमातीत राबणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. वडील थोडेसे शिकलेले होते. बाकी सर्व जण निरक्षर. आई आणि आजीकडे गोष्टींचा व लोकगीतांचा मोठा खजिना होता. जात्यावरती गीते, गोष्टी ऐकत वाढलो. वडिलांनी परिस्थितीचे चटके सोशीत शाळेत घातले. गोष्टीची पुस्तके मिळतील तिथून वाचून कविता व गोष्टी लिहिण्याची ऊर्मी लहानपणापासून होती. तसा प्रयत्नही केला होता. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायचो. भाषणे ऐकायला आवडायचे. पुस्तकातील सर्व कविता तोंडपाठ असायच्या. वरच्या वर्गातील मुले कविता म्हणत असतील, तर तिथे मुद्दाम रेंगाळायचो. त्यांच्याही कविता आवडीने ऐकायचो, म्हणायचो.

सोबतचे मित्र एक-एक करून शाळा सोडून गेले. काम- धंदा, उद्योग करू लागले. पण निव्वळ कवितेच्या धंद्यासाठी मी शाळा सोडली नाही. कॉलेजला जाऊ लागलो. इचलकरंजी, कराड, औदुंबर साहित्य संमेलनांतून सहभाग घेतला. आपल्याही गावात असे साहित्य संमेलन घडावे, अशी जिद्द धरली. सन 1976 साली विटा येथे पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविले. आता चौतीस वर्षे हा उपक्रम नियमित सुरू आहे. पदवीधर झालो आणि तहसीलदार कार्यालयात क्लार्क म्हणून नोकरीस लागलो, पण तिथे अनेक कारणांनी मनाला समाधान नव्हते. मनाची तडफड सुरू होती. दुसरी नोकरी शोधू लागलो. चार वर्षांनंतर शिक्षकाच्या नोकरीचे बोलावणे आले. तहसील ऑफिसचा राजीनामा मामलेदार स्वीकारेनात. मग जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलो. ते म्हणाले, ‘‘मेटकरी, तुम्ही तरुण आहात. तुम्हाला या नोकरीत पुढे भरपूर संधी उपलब्ध आहेत. प्रांत ऑफिसरपर्यंत तुमचे प्रमोशन जाईल. मास्तरकीत काय आहे? विचार करा, राजीनामापत्र मागे घ्या.’’ मी सांगितले, ‘‘सर, मी परिपूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. माझा राजीनामा मंजूर करावा.’’ ते म्हणाले, ‘‘ठीक आहे, तुमची मर्जी!’’ त्यांनी राजीनामा मंजूर केला.

शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेत हजर झालो. नोकरीच्या पहिल्याच दिवशी ठरविले- तहसील ऑफिसचा राजीनामा देऊन शिक्षकी पेशा स्वीकारला आहे, जगण्यासाठी पुरेसा पगार आहे; आता विद्यार्थ्यांसाठी झोकून देऊन काम करायचे. मुलांना शिकविण्याबरोबरच त्यांच्या पुस्तकातील प्रसंगांवरून पर्यावरण व ऐतिहासिक प्रसंगांवरून अनेक एकांकिका लिहिल्या; ज्यामध्ये मुलांना काम करायला लावून अनेक वेळा तालुक्याची, जिल्ह्याची बक्षिसे मिळविली. मुलांना आकाशवाणीवरून त्यांची कला दाखवायची संधी प्राप्त करून दिली. मुलांसाठी चित्रकलास्पर्धा  घेतल्या. त्यामध्ये जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले. मुलांसाठी बालवाङ्‌मयाची तीस पुस्तके लिहिली. ती प्रकाशित करून मुलांना वाचायला लावली. यातील देशभक्त शास्त्रज्ञ डॉ.होमी भाभा या पुस्तकाला महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाङ्‌मयाचा पुरस्कार मिळाला.

शनिवार, रविवार व इतर सुटीच्या दिवशी तालुक्यातील सर्व गावांतून फिरून शाळा सोडलेली मुले शोधून काढली. त्यांच्यासाठी अनौपचारिक शिक्षणप्रकल्प राबवून त्यांतील 625 विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीने परीक्षेला बसविले. त्यांना शिक्षणप्रवाहात पुन्हा सामील करून घेतले. पुढे महात्मा फुले शिक्षण हमी योजनेतून हे काम सुरूच ठेवले.

सुप्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे व सुनीता देशपांडे यांच्या सहकार्यातून विटा येथे मुक्तांगण वाचनालयाची स्थापना काही साहित्यप्रेमी मित्रांना एकत्रित करून केली. पु.ल.देशपांडे यांच्याच सांगण्यावरून एका मागासवर्गीय वस्तीत प्राथमिक शाळा सुरू केली, ती चांगल्या प्रकारे चाललेली आहे. पु.ल. भाई व सुनीतावहिनी दोघांनाही काम आवडले. त्यांनी संस्थेला एक लाख रुपयांची देणगी 26 जानेवारी 1990 रोजी दिली.

दररोज शाळेत जाताना मुलांना केव्हा भेटेन, असे मला वाटायचे. मुलेही माझी मनापासून वाट पाहत असायची. शाळा सुटल्यानंतर मला निरोप द्यायला मुले थांबलेली असायची. इतर शिक्षकांनी हेवा करावा एवढा विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक होण्याचे मला भाग्य लाभले. सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या व पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींच्या भेटी अनेक वेळा मुलांना घडविल्या. विद्यार्थ्यांनी साहित्यिकांना प्रश्न विचारले. त्यांच्याच कविता गाऊन दाखविल्या. साहित्यिकांनीही गोष्टी सांगितल्या. लेखनामागच्या प्रेरणा व कहाण्या ऐकवल्या.

प्रत्येक विद्यार्थी हा एक जिवंत कहाणी घेऊन जगतोय याचा अनुभव सतत घेत होतो. कोणाची आई आजारी, त्यामुळे सर्व घरकामे मुलांना उरकून शाळा गाठावी लागे. कोणाचे व्यसनी वडील, सावत्र आई त्रास देई. वडिलांना मुलांचे दु:ख समजूनही पत्नीचीच बाजू घ्यावे लागे. तर, आजोळी राहणाऱ्या भाच्यांना मामी त्रास देई. मुद्दाम जेवण कमी देई, खूप काम लावे. मुलांना दुसऱ्यांकडे मजुरीवर जावे लागे. विद्यार्थी आपली दु:खे, आपल्या वेदना माझ्याजवळ येऊन विश्वासाने सांगायचे. या वेळी मुलांना समजून घेऊन त्यांना मानसिक बळ देऊन अभ्यासाला प्रवृत्त करायचो. त्यांना आईच्या ममतेने समजवायचो. त्यांच्या मनात शिक्षणाबद्दल प्रेम, आत्मीयता निर्माण करायचो. कुणाही विद्यार्थ्यावर राग आणि आकस कधीच धरला नाही. मुलांना नेहमी आनंदी ठेवून शिक्षण द्यावे, त्यांच्या मनात देशप्रेम सदैव निर्माण करावे- हे साने गुरुजींचे विचार मी प्रतिदिवशी आचरणात आणले.

काही सन्मानाचेही योग आले. महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार 1999 मध्ये मिळाला. गजा हा वेश्याव्यवसाय करणाऱ्या माऊलीचा मुलगा शाळा शिकू शकला नाही. शीघ्र बुद्धीचा गोरक्ष पाटील याला श्रीमंत आई-वडिलांनीच शिक्षणापासून पारखे केले. प्राप्त परिस्थितीनेच चांडोलीच्या मुलांची ससेहोलपट केली. शबानासारख्या सुंदर मुलीवर झालेला अत्याचार गुपचूप सहन करावा लागला. सुजीतसारख्या गोड मुलाने पालकांच्या हट्टासाठी आपले जीवन संपवले. या सगळ्याचे जीवघेणे दु:ख माझ्या मनाला आजही छळते आहे. या लिखाणामधून त्याला वाट करून देता आली. मनाची ठसठस थोडीशी थांबविता आली. मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांबाबतीत जे अनुभवले, ते लिहून काढले. त्यात उसनेपणा, दिखाऊपणा, खोटी ऐट मिसळली नाही. आरडाओरडाही नाही. मुलांबद्दल जे वाटले, ते लिहून काढले. आता असंख्य विद्यार्थी माझ्या मनाच्या कोपऱ्यात थांबून लिहिण्यासाठी मला साद घालीत आहेत.

हे लेखन पूर्ण केल्यानंतर साधनाच्या संपादकांना फोन करून ‘साधना’साठी पाठवून दिले. डिसेंबर 2014 मध्ये एक दिवस त्यांचा फोन आला- ‘मेटकरीसर, खूप-खूप छान लेख आहेत. मी काल रात्री सर्व लेखांचे वाचन केले. साधनामध्ये आपण 2015 च्या जानेवारीपासून क्रमश: प्रसिद्ध करू आणि डिसेंबर 2015 मध्ये त्याचे पुस्तकही प्रकाशित करू या.’ महाराष्ट्र भूमीतील प्रत्येक शिक्षकाच्या मनात साने गुरुजींबद्दल नितांत आदर आहे. साने गुरुजींच्या साधनामध्ये ‘माझे विद्यार्थी’ ही लेखमाला प्रसिद्ध करतोय असे संपादक म्हणत होते; आणि माझ्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू आले होते. फोनवरचे त्यांचे हे बोलणे ऐकून खूप आनंद झाला. माझ्यासाठी हा अपूर्व योग, असेच मला वाटते. वाचकांना ‘माझे विद्यार्थी’ हे पुस्तक आवडेल, असा विश्वास बाळगतो.

Tags: शिक्षण रघुराज मेटकरी साधना प्रकाशन माझे विद्यार्थी Education Raghuraj Metakari Sadhana Books Maze Vidyarthi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके