डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वर्गात न मावणारा प्राध्यापक

वसंत बापट यांची श्रेष्ठ संवेदनशीलता आणि शिक्षणाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन यातून लक्षात येतो.  त्यांच्या, मराठीच्या अध्यापनात भाषा, तत्त्वज्ञान, संस्कृती, समीक्षा, संस्कृत भाषेचा अभिजात डौल, लावणीचा नखरा, नव्या साहित्याविषयी आस्था व प्रेम हे सारे असे. त्यातून विद्यार्थ्यांवर कलाप्रेमाचे संस्कार झाले, त्यांचे सांस्कृतिक पोषण झाले. त्यांची रसिकता व अभिरुची साध्या साध्या गोष्टींतूनही जाणवायची. विविध रंगांच्या शाईने भरलेली सुंदर पेने, रंगीबेरंगी कागद अशी सारी सामग्री त्यांच्या खोलीत सज्ज असायची. मंडळाच्या कार्यक्रमासाठी जिमखाना हॉलमध्ये सतरंजी घालण्यापासून तयारी व मदत करणारे सर, मी पाहिले आहेत. त्यांचा उत्साह व ऊर्जा सर्वांनाच स्फूर्ती देणारी होती- मलाही! मी माझ्या लयीत आरंभ केला- शिकवायला, रुईयाच्या वास्तूत वावरायला, अभ्यासपूरक उपक्रमांची जबाबदारी घ्यायला, सहकारी आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधायला- एकूणच सर्व गोष्टींत जीव ओतून जगायला!

 

प्रा.वसंत बापट यांची एम.ए. मराठीची विद्यार्थिनी आणि रुईया महाविद्यालयातील त्यांची सहकारी म्हणून त्यांचा सलग सहवास मला तीनेक वर्षांचाच मिळाला, तरी त्यावेळच्या अनेक आठवणी आजही मनात आहेत! त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते तर अखेरपर्यंत कायम राहिले.

बापटसरांशी व्यक्तिगत परिचय, बी.ए.च्या आसपासच झाला होता. माझी शाळेपासूनची जिवलग मैत्रीण सुनीता कुलकर्णी (जोशी) हिचे (प्रशासनक्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर कार्य करणारे) वडील ना.श्री. कुलकर्णी यांचा सरांशी स्नेह होता. त्यामुळे सुनीताबरोबर माझीही त्यांच्याशी ओळख झाली. त्यावेळची एक गंमतीदार आठवण सांगण्यासारखी आहे. आम्ही दोघी एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होतो. बी.ए.ला मराठी-संस्कृत या विषयांची  निवड करायचे ठरवले होते. तेव्हा सर सुनीताला म्हणाले, ‘निर्णय उत्तमच आहे, पण विशेष यश मिळवण्यासाठी महाविद्यालय बदलले पाहिजे!’ आम्ही, सरांच्या रामनारायण रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला पाहिजे, असे त्यांना सुचवायचे होते! बापटसर आणि सरोजिनीबाई वैद्य या दोघांना प्राध्यापक म्हणून मोठी प्रतिष्ठा होती, त्यांच्या मार्गदर्शनामुळे रुईयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी बी.ए.ला सुवर्णपदके व इतरही अनेक पारितोषिके सतत पटकावली होती. मात्र आम्ही, म.वा. धोंड आणि विजया राजाध्यक्ष या तितकाच समर्थ व व्यासंगी प्राध्यापकांच्या विद्यार्थिनी होतो. त्यामुळे सुनीता म्हणाली, ‘सर, महाविद्यालय बदलायची अजिबात आवश्यकता नाही.’ नंतर 1971 मध्ये बी.ए.चा निकाल जाहीर झाला; मला सुवर्णपदक मिळाले आणि सुनीतानेही उत्तम गुण मिळवून प्रथम वर्ग पटकावला! सुनीता म्हणाली, ‘सर, महाविद्यालय न बदलता विशेष यश मिळाले!’ सरांनी अगदी मनापासून आमचे अभिनंदन केले आणि आम्हाला शाबासकी दिली!

1971-72 हे एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या ‘महाराष्ट्र वाङ्‌मय मंडळाचे’ सुवर्णमहोत्सवी वर्ष होते, पूर्ण एक आठवडा महोत्सव साजरा झाला. सुनीता आणि मी ‘महोत्सव समिती’च्या संयुक्त कार्यवाह होतो. आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांत, अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ कवींचा समावेश होता. त्यावेळी, विलक्षण प्रभावी सादरीकरण करणाऱ्या कविवर्य वसंत बापट यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी आमच्या एकूण कामाचे आणि आभाराच्या भाषणाचे कौतुक केले.

वसंत बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत, याची जाणीव आम्हाला झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळातील एक महत्त्वाचे कवी, गीतकार, प्रभावी वक्ते, अभिनेते, अनेक सांस्कृतिक (विशेषतः साहित्य व संगीत या क्षेत्रांतील) कार्यक्रमांचे अनन्यसाधारण सूत्रसंचालक आणि निवेदक, तसेच राष्ट्र सेवादलाच्या कलापथकातर्फे, ‘महाराष्ट्र दर्शन’, ‘भारत दर्शन’ इत्यादी उपक्रमांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती करणारे कलावंत म्हणून त्यांच्याविषयी कुतूहल आणि आदर निर्माण झाला होता.

एम.ए.ला सरांनी साहित्यशास्त्र आणि लेखकाभ्यासासाठी नेमलेले राम गणेश गडकरी यांचे अप्रतिम अध्यापन केले. त्यांचा भाषेचा डौल आणि त्यांचे अद्‌भुत वाटावे असे पाठांतर यांचा विलक्षण परिणाम होत असे. त्यांची रसिकता आणि सौंदर्यदृष्टी असाधारण आणि सर्वांगीण होती. आपल्या पोशाखाबद्दलही ते अतिशय चोखंदळ होते. एकदा मी त्यांना म्हटले, ‘सर, आजचा तुमचा बुशशर्ट विशेष सुंदर आहे!’ त्यावर ते मिस्किलपणे म्हणाले, ‘तू शर्टाबद्दल बोलतीयस म्हणजे आजचे व्याख्यान तितकेसे आवडले नाही का?’ या त्यांच्या मोकळ्या स्वभावामुळे छान खेळीमेळीचे वातावरण निर्माण होत असे. कित्येकदा त्यांच्या गाडीतून मला माझ्या घराजवळ ताडदेवला आणि सुनीताला तिच्या घराजवळ हाजीअलीला सोडत असत, प्रवासात दिलखुलास गप्पा होत असत! सर्व दृष्टींनी मोठ्या असणाऱ्या त्यांचा, हा उमदेपणा व आमच्याविषयीची माया भारावून टाकणारी होती!

हा माझ्याविषयीचा जिव्हाळा नंतर एका वेगळ्या निमित्ताने प्रत्ययाला आला. एम.ए.चा निकाल लागण्याआधी आणि अनेक महाविद्यालयांतील, ‘मराठीचा प्राध्यापक’ या पदासाठी वृत्तपत्रांत जाहिराती आलेल्या होत्या. मी सगळीकडे अर्जही केले होते. माझी एकूण शैक्षणिक गुणवत्ता उत्तम असल्याने आणि बी.ए.ला सुवर्णपदक मिळाल्यामुळे, मुलाखतीच्या वेळीच, माझी निवड होईल असे अनौपचारिकरीत्या सांगण्यात येत होते. उदाहरणार्थ, एस.आय.इ.एस. आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) विद्यापीठाचे विलेपार्ले येथील महाविद्यालय तसेच, माझ्याच एल्फिन्स्टन महाविद्यालयात, अर्धवेळ व्याख्यात्याचे पद होते, त्याचे आकर्षण असणे साहजिकच होते. त्यावेळी रामनारायण रुईया महाविद्यालयात मराठीच्या अध्यापकाचे पद असल्याची माहिती देऊन, बापटसरांनी मला फोन करून रुईयात भेटायला बोलावले. मराठीचे महत्त्व असणाऱ्या आणि विविध विचारप्रणालींचे स्वातंत्र्य अनुभवणाऱ्या प्राध्यापकांच्या शैक्षणिक संस्थेत येणे कसे हितकारक आहे ते मला पटवून दिले.

मी रुईयात यावे अशी सरांची (आणि सहकारी प्राध्यापक पुष्पा भावे यांची) उत्कट इच्छा होती. सरांची ही आस्था व माझ्याविषयीचा विश्वास त्यांची गुणग्राहकता जाणवून देणारा तर होताच हे मी, आत्मस्तुतीचा दोष पत्करून म्हणतीय! शिवाय माझा आत्मविश्वास वाढवणाराही होता! त्या काळात, एम.ए.चा निकाल लागण्यापूर्वी नेमणूक करून, निकालानंतर ती निश्चित करण्याची सोय होती. प्रा.मं.वि. राजाध्यक्ष आणि प्रा.विजया राजाध्यक्ष या माझ्या गुरूंचे मार्गदर्शन घेऊन मी, जून 1973 मध्ये रुईयात शिकवायला लागले. पाठोपाठ माझा निकाल जाहीर झाला; मला (बी.ए.प्रमाणे) एम.ए.लाही सुवर्णपदक व इतर काही पारितोषिके मिळाली आणि मी रुईयाच्या मराठी विभागात स्थिर झाले. बापटसरांमुळे रुईयात झालेला प्रवेश, माझ्या अध्यापकीय कारकिर्दीच्या दृष्टीने मोलाचा व आनंददायक ठरला! 1973 ते 2007 (स्वेच्छानिवृत्ती) पर्यंत 34 वर्षे मी रुईयात रमून गेले. सरांनी मला दिलेल्या या सुंदर संधीसाठी, त्यांच्याविषयीची कृतज्ञता व ऋणभावना, जन्मशताब्दीच्या निमित्ताने व्यक्त करावीशी वाटते!

रुईया महाविद्यालयात, मराठी विभागाला सुरुवातीपासून (स्थापना 1937) विशेष प्रतिष्ठेचे व सन्मानाचे स्थान प्राप्त झालेले होते, याची मला कल्पना होती. न.र. फाटक, द.के. केळकर, रा.शं. वाळिंबे, श्री.पु. भागवत आणि शांता शेळके यांच्यासारख्या असाधारण अध्यापकांची आणि त्यांच्या शिष्योत्तमांचीही इथे परंपरा होती. सरोजिनी वैद्य आणि वसंत बापट यांनी ही प्रतिष्ठा वृद्धिंगत केली. बार्इंचे अध्यापन, वक्तृत्व आणि एकूण व्यक्तिमत्त्व यामुळे त्या विद्यार्थीप्रिय होत्या. मी रुईयात आले तेव्हा बाई, एक वर्षापूर्वी (1972 मध्ये) रुईयातून, मुंबई विद्यापीठाच्या पदत्युत्तर मराठी विभागात नियुक्त झाल्या होत्या. मला, त्याही एम.ए.ला शिकवायला होत्या. अर्वाचीन मराठी वाङ्‌मयाचा इतिहास आणि महात्मा फुले समग्र वाङ्‌मय. त्यांची शोधक विवेचनशैली अंतर्मुख करणारी होती. सरोजिनीबार्इंच्या जागी प्रा. पुष्पा भावे आलेल्या होत्या. त्या, नाट्यसमीक्षक म्हणून नेमक्या, परखड प्रतिपादनासाठी प्रसिद्ध! विभागप्रमुख होते प्रा.वसंत बापट. स्वतः कवी आणि अप्रतिम Performer असणारे! त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला एक निराळीच शान होती आणि त्याभोवती चक्क ‘ग्लॅमर’च होते. या त्रिमूर्तीपुढे मी सर्वच दृष्टींनी लहान होते, पण मला फार दडपण किंवा ताण जाणवला नाही, कारण त्या सर्वच प्राध्यापकांना माझ्याविषयी आस्था होती. माझा मित्र ॲडव्होकेट हेमंत गोखले, रुईयाचा बी.ए.पर्यंत विद्यार्थी होता. अनेक वाद आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्याने पारितोषिके पटकावली होती. ‘युवक क्रांती दला’सारख्या परिवर्तननिष्ठ संघटनेशी तो संबंधित होता. सरोजिनीबाई आणि बापटसर यांना त्याचे कौतुक व प्रोत्साहन होते. आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळेही रुईयातील अनेक प्राध्यापकांना माझ्याविषयी विशेष जिव्हाळा वाटत होता.

धारवाडच्या महाविद्यालयात एकच वर्ष अध्यापन केल्यानंतर 1949 ते 1964 अशी 15 वर्षे, सर जरी नॅशनल कॉलेजमध्ये प्राध्यापक होते तरी त्यांची ओळख ‘रुईया’चे प्राध्यापक अशीच आहे. 1964 ते 1974 या दशकात त्यांनी केवळ मराठी विभागावरच नव्हे तर एकूण महाविद्यालयावरच स्वतःची तेजस्वी मुद्रा उमटवली. सर्जनशील व्यक्तीमुळे महाविद्यालयाच्या आणि विभागाच्या वातावरणात आगळेवेगळे चैतन्य कसे निर्माण होते याचा आनंददायक अनुभव मी, एलफिन्स्टनमध्ये विजया राजाध्यक्ष यांच्या बाबतीत घेतला होता. रुईयातही, सरांची प्रतिभा, रसिकता व सौंदर्यदृष्टी यामुळे अध्यापन आणि अभ्यासपूरक अनेक उपक्रम यांतून अपूर्व असे चैतन्य विलसत होते. वाङ्‌मय मंडळ, अभ्यास मंडळ, भित्तीपत्रिका, संगीताच्या मैफिली, (प्रवासाचे विलक्षण प्रेम असल्यामुळे) आयोजित केलेल्या सुंदर, वैशिष्ट्यपूर्ण सहली; वार्षिक स्नेहसंमेलनात ढंगदार शैलीत सादर केलेले फिशपॉन्डस्‌ इत्यादी कार्यक्रमांनी रंगत आणावी तर ती सरांनीच!

सरांची एक गुणी, प्रतिभासंपन्न विद्यार्थिनी ज्योती पागनीस (ओझरकर) हिने एका लेखात ‘वर्गात न मावणारा प्राध्यापक’ असे त्यांचे वर्णन केले आहे ते अगदी समर्पक आहे. तिने एक हृद्य आठवण सांगितली आहे. ‘एकदा व्याख्यान चालू असताना माझे लक्ष वर्गातून बाहेर दिसणाऱ्या एका विलक्षण चित्रदर्शी दृश्याने खेचून घेतलेले होते. खिडकीतून पलीकडच्या वर्गाची खिडकी, त्यातून पुढच्या रस्त्यावरच्या पळसाच्या लालभडक फुलांची फांदी. त्यावर असंख्य ‘काळे काळे कोतवाल पक्षी. ते चौकटबद्ध तरीही जीवनोत्साहाने, रंगसंगतीने ओसंडून जाणारे चित्र मी भान हरपून पाहत होते...’ नंतर सर चक्क खाली उतरले, ज्योतीच्या बसण्याच्या जागेवरून त्यांनीही ते विलक्षण दृश्य पाहिले, म्हणाले, ‘सुंदर! इथे काळ्या कोतवालांची गर्दी आहे. कालिदासाने कोरांटीच्या फुलांभोवती गुंजारव करणारे भ्रमर पाहिले, ऐकले आणि अमर केले!’

वसंत बापट यांची श्रेष्ठ संवेदनशीलता आणि शिक्षणाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन यातून लक्षात येतो. त्यांच्या, मराठीच्या अध्यापनात भाषा, तत्त्वज्ञान, संस्कृती, समीक्षा, संस्कृत भाषेचा अभिजात डौल, लावणीचा नखरा, नव्या साहित्याविषयी आस्था व प्रेम हे सारे असे. त्यातून विद्यार्थ्यांवर कलाप्रेमाचे संस्कार झाले, त्यांचे सांस्कृतिक पोषण झाले. त्यांची रसिकता व अभिरुची साध्या साध्या गोष्टींतूनही जाणवायची. विविध रंगांच्या शाईने भरलेली सुंदर पेने, रंगीबेरंगी कागद अशी सारी सामग्री त्यांच्या खोलीत सज्ज असायची. मंडळाच्या कार्यक्रमासाठी जिमखाना हॉलमध्ये सतरंजी घालण्यापासून तयारी व मदत करणारे सर, मी पाहिले आहेत. त्यांचा उत्साह व ऊर्जा सर्वांनाच स्फूर्ती देणारी होती- मलाही! मी माझ्या लयीत आरंभ केला- शिकवायला, रुईयाच्या वास्तूत वावरायला, अभ्यासपूरक उपक्रमांची जबाबदारी घ्यायला, सहकारी आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधायला- एकूणच सर्व गोष्टींत जीव ओतून जगायला!

‘विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमालें’ची मूळ योजनाही सरांचीच होती. 1974 मध्ये महाराष्ट्राने ‘निबंधमाले’ची शताब्दी साजरी केली. शिक्षण प्रसारक मंडळी ही रुईयाची मातृसंस्था. तिने शिक्षण प्रसाराच्या कार्याची मूलप्रेरणा, विष्णुशास्त्री चिपळूणकरांकडून घेतली होती. ज्ञान ही निष्ठा आणि ज्ञानप्रसार हे कर्तव्य मानणाऱ्या विचारवंताची स्मृती केवळ उत्सवाने साजरी न करता; 23, 24, 25 जानेवारी रोजी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करावी आणि 25 जानेवारी 1874 हा ‘निबंधमाले’चा पहिला अंक प्रकाशित होण्याचा दिवस साजरा करावा असे ठरले. या जाहीर स्वरूपाच्या मालेच्या रौप्यमहोत्सवी वर्षी (1998), विशेष अतिथी या नात्याने सर आवर्जून उपस्थित होते. आणखी दोन वर्षांनी या मालेचा सुवर्णमहोत्सव साजरा होईल. कला व ज्ञान या क्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तींच्या व्याख्यानांमुळे, मुंबईच्या वैचारिक व सांस्कृतिक विश्वात या व्याख्यानमालेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

1974-1982 या कालावधीत, त्यांनी मुंबई विद्यापीठात, ‘गुरुदेव रवींद्रनाथ टागोर तौलनिक साहित्याभ्यास’ या केंद्राचे पहिले प्राध्यापक म्हणून काम केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि अध्यापन करत असताना ‘तौलनिक साहित्याभ्यास: मूलतत्त्वे आणि दिशा’ (1980) या पुस्तकाची निर्मितीही केली.

मुंबईतील 1999 मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले तेव्हा प्रकृतिअस्वाथ्य असूनही अतिशय रोखठोक, प्रेरक व तेजस्वी असे भाषण त्यांनी केले. त्यांचे अनेक विद्यार्थी व सहकारी आवर्जून उपस्थित होते. आपल्या जीवननिष्ठा; विचार, उच्चार व आविष्कार यांचे स्वातंत्र्य, मराठीचे तसेच इतर भारतीय भाषांचे स्थान व भवितव्य याविषयीचे चिंतन त्यांनी प्रकट केले. स्वतःला ते ‘पसायदान’वादी म्हणत असत. ‘ज्ञानेश्वरीतील पसायदान म्हणजे विश्वककल्याणाचे महावाक्य आहे’ ही त्यांची धारणा होती. प्रेम, शांती, करुणा आणि विधायक मूल्यांचा हार्दिक स्वीकार यांवर त्यांचा अखेरपर्यंत विश्वास होता!

Tags: विशेषांक वसंत बापट जन्मशताब्दी मीना गोखले weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके