2023 च्या नोव्हेंबर महिन्यात गोव्यात झालेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये बघितलेल्या काही सिनेमांची ओळख करून देणाऱ्या मालिकेमधला हा चौथा व शेवटचा लेख. तीन अतिशय वेगळ्या सिनेमांविषयी. एक ब्रिटिश, एक फ्रेंच आणि एक कोरियन. एक आजच्या जगाशी संबंधित, एक 1894 मधल्या काळातला, तर एक ब्लॅक कॉमेडी.
हाऊ टू हॅव सेक्स? सिनेमाचं नाव ऐकून तो साधारण कशाविषयी असणार याची कल्पना येते. मात्र, हा सिनेमा सेक्स कसा करावा हे सांगत नाही. किंबहुना तो मुळी निव्वळ सेक्सविषयी बोलतच नाही. तरुण मुलामुलींचा सेक्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांना वाटणारं शारीरिक आकर्षण, परस्पर संमती म्हणजे काय अशा अनेक पातळ्यांवर हा सिनेमा प्रेक्षकांशी संवाद साधू पाहतो. पडद्यावर तीन मैत्रिणींच्या बेधुंद पाट्र्त्यांच्या कोलाहलाच्या माध्यमातून काही तरी गंभीर आणि महत्त्वाचं सांगू बघतो.
दिग्दर्शक मॉली मॅनिंग वॉकर हिचा हा पहिलाच पूर्ण लांबीचा सिनेमा. ती मुळातली सिनेमॅटोग्राफर. (इफीमध्येच पाहिलेल्या आणि इथे ओळख करून दिलेल्या 'स्क्रॅपर' या सिनेमाचं छायाचित्रण तिनेच केलंय.) 2020 मध्ये 'गुड थैंक्स, यू?' नावाच्या मायकेल वॉर्डबरोबर तिने केलेल्या तेरा मिनिटांच्या शॉर्ट फिल्मचा समावेश त्या वर्षीच्या कान चित्रपट महोत्सवामध्ये झाला होता. एका तरुण मुलीवर लैंगिक हल्ला झाल्यानंतर ती आपल्या नेहमीच्या आयुष्याकडे परतण्याचा कसा प्रयत्न करते याची ती गोष्ट होती. स्वतः मॉलीवर वयाच्या सोळाव्या वर्षी असा हल्ला झालेला होता आणि तिच्या स्वतःच्या अनुभवाचं प्रतिबिंब त्या शॉर्ट फिल्ममध्ये पडलं होतं. आणि त्यातूनच तिच्या या नव्या, पहिल्या-वहिल्या फीचर फिल्मचा जन्म झाला.
"सेक्सविषयी मला काय समजलंय याचा विचार मी करू लागले, हा विचार नेमका कुठून आला त्याचा शोध घेऊ लागले. समाज म्हणून सेक्स कसा करावा हे आपण कसे शिकतो आणि अनेक बायकांसाठी ते उपयोगाचं का नसतं ?" मॉलीने एका मुलाखतीमध्ये म्हटलंय.
तीन टीनएजर मुली सुट्टी घालवण्यासाठी एका बीचवर येतात. तिघी घट्ट मैत्रिणी आहेत. दारू प्यायची, दिवसरात्र पार्टीत नाचायचं, समुद्रात डुंबायचं आणि बेभान होऊन धमाल करायची. हा आपला 'बेस्ट हॉलिडे एव्हर' असणार याविषयी त्यांच्या मनात कणभरही शंका नाही. त्यांनी तसं आधीच ठरवून टाकलेलं आहे. त्यामुळे हॉटेलच्या रूममधून बाहेर बघितल्यावर, 'बेस्ट व्ह्यू एव्हर' असं त्यांना वाटतं. जे होणार ते बेस्टच होणार आहे. आणि तसं ते व्हावं म्हणून त्यांचा प्रयत्नही असणार आहे.
या तिघींमधली एक आहे तारा. ती अजून व्हर्जिन आहे आणि या सुट्टीमध्ये आपल्यावर असलेला हा 'बट्टा' तिला पुसून टाकायचाय. त्यामुळे सेक्स करणं तिच्या अजेंड्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
त्या जिथे आल्यात ते पार्टी कॅपिटलच असल्यामुळे तिथे त्यांच्यासारखी अनेक मुलं-मुली आहेत. त्यामुळे एकमेकांशी ओळख करून घेणं, एकमेकांबरोबर नाच करणं, या सगळ्या गोष्टी ओघाने येणारच. तरुणांची ही ऊर्जा दिग्दर्शिका पडद्यावर खूप फोर्सने आणते. काही वेळा त्या वातावरणाची, त्या लाऊड संगीताची, त्या नृत्याची सवय नसणाऱ्या माझ्यासारख्या प्रेक्षकाला त्रासही होतो. त्या जागेच्या निसर्गसौंदर्यापेक्षा आपल्याला अधिक काळ दिसत राहतात ते या मुलींचे फॅन्सी कपडे, त्यांचा पार्टी मेकअप, त्यांची विविध रंगांची दारू, त्या दारूचे त्यांनी घेतलेले शॉट्स. पण ते सिनेमासाठी आवश्यक आहे याची जाणीवही असतेच असते. कारण त्या सगळ्या गदारोळात, बेभान होण्यात आनंद शोधणारी ती मुलं तरीही एकटी वाटतात. काही वेळा तर बिचारीही. यातल्या प्रत्येक पार्टीच्या दृश्यामध्ये अंगावर येणाऱ्या त्या संगीताबरोबर हे एकटेपण अधोरेखित होत राहतं. विशेषतः ताराचं.
आणि मग ताराच्या आयुष्यात तो क्षणही येतोच दारूच्या नशेत. शेजारच्या खोलीत राहणाऱ्या मुलाबरोबर. म्हटलं तर ज्याची ती वाट पाहत होती असा, म्हटलं तर पूर्णपणे तिची मर्जी नसताना. म्हणजे, तो मुलगा तिच्यावर जबरदस्ती करत नाही. अजिबातच नाही. त्यामुळे त्या सेक्सला बलात्कार म्हणता येत नाही. पण म्हणून तो तिला आपल्या इच्छेबरोबर खेचत नेतो हेही जाणवत राहतं. आपल्याला आणि नंतर तारालाही.
या अशा अधल्यामधल्या, अर्धवट सेक्सविषयीच दिग्दर्शिकेला आपल्याशी बोलायचं आहे. तरुण मुला- मुलींच्या भाषेत, त्यांच्या भोवतालाचा नेमका वापर करून तिने हे म्हणणं मांडलं आहे. कन्सेन्ट किंवा संमती म्हणजे निव्वळ 'हो' म्हणणं नाही. शरीराबरोबर तुमचं मन, तुमच्या भावना त्यात असणं म्हणजे संमती. मुलगा आणि मुलगी एकाच मानसिक पातळीवर असतील तरच शरीराच्या एकत्र येण्यातली देवाणघेवाण समाधान देणारी असेल, नाही तर तो नुसता सेक्स असेल, ज्यातून आनंद कधीच मिळणार नाही. म्हणून तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या हॉटेलच्या रूमवर परतणारी तारा रिकाम्या रस्त्यातून एकटी चालताना आपल्याला दिसते तेव्हा ती भकास वाटते. ज्याची आपण वाट पहात होतो ते अखेर मिळवलंय याचं समाधान तर सोडाच, पण खेदच तिच्या चेहऱ्यावर दिसतो.
हा सिनेमा सेक्सकडे अतिशय गंभीरपणे पाहतो. काही महत्त्वाचे प्रश्न विचारतो. आणि आजच्या तरुण मुला- मुलींनी त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करावा, असं थेटपणे न सांगताही त्या दिशेने आपल्याला वळवतो. आणि म्हणूनच तो महत्त्वाचा आहे असं वाटतं.
या सिनेमाचा ट्रेलर पाहायचा असेल तर या लिंकवर क्लिक करा.
'पार्टी ऑफ फूल्स' या सिनेमामध्येही एक पार्टीच आहे. पण ती ना तरुण मुलामुलींची आहे, ना सर्वसाधारण पार्टी असते तशी आहे. या पार्टीला काळीकुट्ट किनार आहे. नव्हे, हे सगळं विश्वच काळंकुट्ट आहे. आणि सत्य घटनांवर ते आधारलेलं आहे.
त्या काळात ज्यांना 'हिस्टेरिक्स' म्हणून समाजाने वाळीत टाकलेलं असे अशा बायकांसाठी एक हॉस्पिटलवजा तुरुंग उघडण्यात आलाय. अशा बायकांमध्ये कोणाकोणाचा समावेश केला गेलाय? यात वेश्याव्यवसाय करणाऱ्या बायका आहेत. अपंग म्हणून कुटुंबाला जबाबदारी नको असलेल्या बायका आहेत. मानसिक दृष्ट्या विकलांग आहेत. आणि काही पुरुषांना ज्यांचा कंटाळा आलाय, नव्या बाईसोबत नवीन आयुष्य काढायचंय अशा बायकाही आहेत. या बायकांना वेड लागलंय असं सिद्ध केलं की पुरे. इथल्या वॉर्डनला त्यांच्या परिस्थितीशी काही देणंघेणं नाही. त्यामुळे तिच्या हाताखाली काम करणाऱ्या इतर बायकांनाही नाही. सहानुभूती नावाची भावनाच त्यांच्यापाशी नाही. तुरुंगातल्या बायकांकडे बघण्याचा आणि त्यांच्याशी वागण्याचा या अधिकारी वर्गातल्या सगळ्यांचा दृष्टिकोन अत्यंत कोरडा, दांभिक आणि पराकोटीच्या स्वार्थाने लडबडलेला आहे.
या जगाशी आपली ओळख होते ती फॅनी त्यात प्रवेश करते तेव्हा. ही सिनेमाची नायिका. आजूबाजूला भिरभिरणारी तिची नजर, वॉर्डनच्या प्रश्नांना तिने दिलेली उत्तरं यातून ही मानसिक दृष्ट्या अस्थिर नाही हे आपल्या लक्षात येतं आणि मग ती आपल्या आईचा शोध घ्यायला आलीये हेही कळतं. त्यासाठी लागणारी कागदपत्रं ती कशी तयार करते, आपल्या नवऱ्याला काय सांगते, मुलांना टाकून येताना तिच्या मनात कोणते विचार आलेले असतात, याविषयी बऱ्यापैकी संदिग्धता आहे. मुळात एवढं टोकाचं पाऊल फॅनीने उचलण्याची गरज होती का, हा प्रश्नही मनात आल्यावाचून रहात नाही. पण हे प्रश्न बाजूला सारून आपण सिनेमा पाहू लागतो आणि समोर दिसणारं जग आपल्याला हादरून टाकतं.
यात गरीब घरातली गरोदर मुलगी आहे. आणि वडिलांच्या इस्टेटीमध्ये वाटेकरी नको म्हणून भावाने वेडी ठरवून पाठवलेली संगीतकार बहीणही आहे. वेश्याही आहे आणि खरोखरच मानसिक दृष्ट्या अस्थिर बाईही आहे. त्यांच्यातच फॅनीला आपल्या मैत्रिणी सापडतात. स्वतःचा जीव धोक्यात टाकून तिला मदत करायला तयार होणाऱ्या मैत्रिणी. त्या भयाण अवस्थेतही अजूनही माणुसकी टिकवून असलेल्या मैत्रिणी.
वर्षातून एकदा इथे एक पार्टी होते. हॉस्पिटलमधल्या शंभरेक बायका तिथे मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करतात. आणि या हॉस्पिटलचे देणगीदार, मंडळाचे अध्यक्ष, मंत्री संत्री अशी समाजातली प्रतिष्ठित मंडळी त्याला हजेरी लावतात. त्याच पार्टीतून फॅनी आपल्या आईला घेऊन पळून जायचा प्लॅन करते. पण ते इतकं सोपं थोडंच असणार?
हा सिनेमा आपल्याला एकही क्षण मोकळा श्वास घ्यायला देत नाही. पडद्यावर दिसणाऱ्या वेगवेगळ्या बायकांचं कोंडलेपण अस्वस्थ करत राहतं. त्यांच्या हालचालींमधून आणि त्यांच्या क्लोजअप्समधून. त्यांच्या संवादांपेक्षा त्यांच्यावर हुकूमत आणि दहशत गाजवणाऱ्यांच्या बोलण्यातून ही वेदना दिग्दर्शक आरनॉ दे पॅलिए आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्यांच्या कहाण्या पाहताना अंगावर शहारा येतो. आणि मनात नैराश्य दाटून येतं.
पार्टी ऑफ फूल्स'च्या गडद काळोखातून बाहेर पडण्यासाठी दक्षिण कोरियाचे दिग्दर्शक किम जी वून यांच्या 'कॉबवेब'ने मदत केली. 'ब्लॅक कॉमेडी' असं या सिनेमाचं वर्णन करता येईल.
किम की येओल नावाच्या दिग्दर्शकाची ही गोष्ट आहे. 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला घडणारी. त्याच्या पहिल्याच सिनेमाचं भरभरून कौतुक झालंय (आणि त्यामागेही एक रहस्य आहे) पण त्यानंतरच्या त्याच्या सिनेमांना मात्र समीक्षकांनी फाडून खाल्लंय. आपल्या कारकिर्दीमध्ये एक मास्टरपीस बनवायचाच या वेडाने हा दिग्दर्शक झपाटून गेलाय. त्याच्या नवीन सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालंय, पण त्याला सिनेमाचा शेवट कसा करावा याविषयी रोज नवनवीन स्वप्नं पडताहेत. विचित्र आणि विक्षिप्त. मात्र त्यातच आपल्या सिनेमाचा नवीन शेवट आहे आणि त्याचं चित्रीकरण आपल्याला करता आलं तर आपला सिनेमा म्हणजे एक मास्टरपीस बनेल, याविषयी किम कीच्या मनात कणभरही शंका नाही.
किम की आपल्या निर्मातीला दोन दिवसांचं शूटिंग पुन्हा करायला द्यावं म्हणून विनंती करतो. खर्च वाढेल असं सांगून ती त्याचं म्हणणं धुडकावून लावते. सिनेमाचे नायक आणि नायिकाही त्याच्याशी असहमती दर्शवतात. समाजाची नीतिमत्ता यामुळे भ्रष्ट होईल, असं मत देऊन सरकारी सेन्सॉर त्याच्या बदललेल्या स्क्रिप्टला मंजुरी नाकारतात. कारण त्याने केवळ शेवटच नाही, तर जवळपास सगळंच स्क्रिप्ट बदललंय!
पण किम की आता आपला मास्टरपीस बनवण्याच्या हट्टालाच पेटलाय. स्टुडिओमधल्या बॉसच्या भाचीच्या मदतीने तो आपल्या मुख्य कलाकारांना, सहकलाकारांना दोन दिवसांचं शूटिंग करायचंय असं खोटं सांगून बोलावून घेतो आणि मग थेट स्टुडिओच लॉक करून टाकतो.
आता त्याची लढाई दोन पातळ्यांवर सुरू होते. प्रत्यक्ष शूटिंग करणं, त्यासाठी कलाकारांकडून काम करवून घेणं आणि दुसऱ्या बाजूला सेटला भेट देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला शूटिंग थांबवण्यापासून रोखणं.
याखेरीज स्वतःला सिद्ध करण्यासाठीचा आटापिटा असतोच. समीक्षक म्हणतात त्याप्रमाणे आपण फालतू दिग्दर्शक नाही हे त्याला दाखवून द्यायचं असतंच, पण ज्या दिग्दर्शकाच्या, शिनच्या हाताखाली त्याने बरीच वर्षं काम केलेलं आहे त्याच्यापेक्षाही आपण सरस आहोत असं लोकांनी म्हणावं अशी त्याची अपेक्षा असते. या शिनचा मृत्यू याच स्टुडिओमधल्या सेटवरच एका विचित्र अपघातामध्ये झालाय. त्याचाही या नव्या शेवटाशी संबंध आहेच.
या सगळ्यात अर्थातच प्रचंड गोंधळ होतो. पडझड होते. मारामारी, बाचाबाची, वादावादी सगळं होतं. यात भर म्हणून जमलेल्या लोकांच्या नात्यांमधले ताणतणावही असतातच. सिनेमाचा नायक आणि नायिका यांचं अफेअर असतं. ती गरोदर असते. पण तो आपल्या बायकोला सोडायला तयार नसतो. त्यामुळे त्यांच्यात एक अव्यक्त दडपण आहे. नायिकेचा राग करणारी आणि आपणही चांगली अभिनेत्री होऊ शकतो असा विश्वास बाळगणारी स्टुडिओच्या बॉसची भाची आहे. भूमिकेत शिरण्यासाठी डिटेक्टिव्ह बनून सगळ्यांचं बोलणं चोरून ऐकणारा सिनेमात डिटेक्टिव्हचं काम करणारा नट आहे. आणि 'व्हाय मेक अ मास्टरपीस? डू वॉट यू आर गुड अॅट?' असा बिनतोड सवाल करणारी निर्माती आहे.
या गोंधळात भर टाकण्यासाठी आणखीही खूप काही आहे. दिग्दर्शकाने, म्हणजे सिनेमातल्या नाही, खऱ्याखुऱ्या दिग्दर्शकाने सिनेमातला सिनेमा करताना काही क्लृप्त्या वापरल्या आहेत. म्हणजे, प्रत्यक्ष स्टुडिओत जे घडतं ते आपल्याला रंगीत दिसतं आणि किम की आपला सिनेमा म्हणून ज्याचं शूटिंग करतो ते ब्लॅक अँड व्हाइटमध्ये दिसतं. सिनेमातला सिनेमा 1970 च्या दशकात घडतो, त्यामुळे चित्रीकरण करण्याची पद्धत, कॅमेरे, वातावरण हे सगळं तेव्हाचं असेल याची काळजी दिग्दर्शकाने घेतलेली आहे. किंबहुना, त्या काळातल्या दिग्दर्शकांपासून आपण प्रेरणा घेतली आहे असं किम जी वून यांनी म्हटलंय. त्यामुळेच त्यांच्या या सिनेमाने कोरियामध्ये एक वेगळाच वाद निर्माण केला होता. किम की यंग हे त्या काळातले कोरियाचे खूप मोठे दिग्दर्शक होते. सिनेमामधला दिग्दर्शक प्रत्यक्षातल्या किम की यंग यांच्या व्यक्तिरेखेवर बेतलाय, त्यांची चेष्टा करण्यात आलीये असा आक्षेप यंग यांच्या कुटुंबीयांनी घेतला आणि ते कोर्टात गेले. सिनेमावर बंदी आणावी असं त्यांचं म्हणणं होतं. सिनेमातल्या दिग्दर्शकाचं नावही किम आहे आणि त्याला संपूर्ण सिनेमाभर 'डायरेक्टर किम' असंच संबोधलं गेलंय हेही त्यांना खटकलं होतं.
पण आपला हा सिनेमा म्हणजे कुणा खऱ्या-खुऱ्या व्यक्तीचं चरित्र नाही, तर त्या काळातल्या अनेक दिग्दर्शकांना एकत्र करून आपण ती व्यक्तिरेखा निर्माण केलीये, असं किम जी वून यांनी आपली बाजू मांडताना म्हटलं.
अखेर दोन्ही बाजूंमध्ये समझोता झाला आणि सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमामध्ये दाखवलेला गोंधळ, या सिनेमाच्या निर्मात्यांना प्रत्यक्षातही अनुभवावा लागला. मात्र, या सिनेमामध्ये दिग्दर्शकाला आणखीही काही सांगायचंय हे आपल्या लक्षात येतंच. हसवता हसवता गोंधळाच्या पलीकडे चित्रपटसृष्टीतले हेवेदावे, फसवणूक, माणसामाणसांमधले नातेसंबंध, अपराधी भाव आणि आपल्या मनातल्या या अपराधीपणाला सामोरं जाण्याचा ज्याचा त्याचा प्रयत्न याविषयीही हा सिनेमा बरंच काही सांगून जातो. कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकलं की त्यातून बाहेर पडणं कठीण, नव्हे अशक्य असतं याची जाणीव करून देतो. हे सगळं सांगण्याची त्यांची पद्धत मात्र धमाल आहे. त्यामुळे सिनेमा पाहून बाहेर पडल्यानंतर मनात सिनेमाने निर्माण केलेले प्रश्न असले तरी चेहऱ्यावर मात्र एक भलं थोरलं हसू असतं. आपण एक मस्त सिनेमा बघितलाय असं वाटण्यासाठी आणखी काय हवं?
सिनेमाचं ट्रेलर बघायचं असेल तर या लिंकवर क्लिक करा.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या