डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या वर्षी इंडियन पॅनोरामामध्ये थोडेथोडके नव्हे, तब्बल दहा मराठी सिनेमे होते. स्वाभाविकच मराठी कलाकारांची मोठ्या प्रमाणावर हजेरी लागली होती. पण तेवढं पुरेसं होतं का?  

‘कुठला सिनेमा तुम्ही रेकमेंड कराल?’ तिकिटांच्या रांगेत उभ्या असलेल्या एका पत्रकाराने मला विचारलं. मला प्रश्न नीट समजला नाही. तेव्हा ते म्हणाले, ‘या वर्षी खूप मराठी सिनेमे आहेत फेस्टिव्हलमध्ये. खूप ऐकतोय आम्ही त्यांविषयी. तुम्ही बघितले असतील ना यांतले बरेच. मग कुठला सिनेमा रेकमेंड कराल?’ क्षणभर माझा विश्वास बसेना. केरळहून आलेले पत्रकार आपण कुठला मराठी सिनेमा पाहावा, अशी चौकशी माझ्याकडे करत होते. 

तुमचे सिनेमे हल्ली खूप गाजताहेत, अशी पावती देत होते. यापूर्वी दक्षिणेतल्या पत्रकारांनी आपल्या सिनेमाविषयी एवढी उत्सुकता कधी दाखवलेली नव्हती. गेल्या काही वर्षांत मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवरचे खूप चांगले सिनेमे आलेले आहेत. हे वर्षही त्याला अपवाद नाही. पण या वर्षाचं वेगळेपण हे की, इंडियन पॅनोरामामध्ये थोडेथोडके नाही, तर तब्बल दहा सिनेमे होते. 

‘एलिझाबेथ एकादशी’, ‘एक हजाराची नोट’, ‘अ रेनी डे’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘किल्ला’, ‘यलो’, ‘लोकमान्य : एक युगपुरुष’, ‘एक होता काऊ’, ‘मित्रा’ आणि ‘विठ्या’. (मल्याळम सिनेमाचा आकडा आठ होता). पॅनोरामाचं उद्‌घाटनच मुळी ‘एलिझाबेथ एकादशी’ने झालं. शिवाय, ‘एक हजाराची नोट’ हा सिनेमा मुख्य स्पर्धेतल्या सिनेमांमध्ये समाविष्ट केला गेला होता आणि त्याला विशेष ज्युरी पुरस्कारही मिळाला. इफ्फीमध्ये मराठी सिनेमांचे सगळे शो हाऊसफुल्ल गर्दीत सादर केले गेले. अमराठी प्रेक्षकांमध्ये त्याविषयी चर्चा होती. कधी नव्हे एवढी रांग मराठी सिनेमांसाठी दिसत होती. (पुण्याच्या महोत्सवात दर वर्षी ती दिसते. पण त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नसतं). 

सर्वसाधारणपणे महोत्सवाला आलेली मराठी मंडळी ‘मराठी सिनेमे आपल्याला कधीही बघता येतील, इथे परदेशी आणि देशातल्या इतर राज्यांतले सिनेमे पाहून घेऊ,’ असा विचार करून मराठी सिनेमांना जात नाहीत. याचाच दुसरा अर्थ असा की, महोत्सवामध्ये मराठी सिनेमे पाहायला गर्दी करणारे बहुतेक प्रेक्षक हे अमराठी होते. थिएटर्सच्या आवारात या सिनेमांवर चर्चा होत होती. हे दृश्य पाहून स्वाभाविकच बरं वाटत होतं. पण... पण या लेखात मराठी सिनेमांविषयी लिहायचं नाहीये. एवढे सिनेमे महोत्सवात दाखवले जाणार असल्यामुळे स्वाभाविकच त्या सिनेमांचे दिग्दर्शक, लेखक, कलाकार यांची मोठ्या प्रमाणात गोव्यात हजेरी होती. आयनॉक्स (ज्या मल्टिप्लेक्समध्ये महोत्सवातल्या सिनेमांचे शोज होतात)च्या आवारात त्यांचा वावर होता. यापूर्वी एखाद्‌ दोन सिनेमे पॅनोरामामध्ये निवडले जात असल्याने आपापल्या सिनेमांना कलावंत येत, शो झाला की एखादी पत्रकार परिषद व्हायची आणि ते निघून जायचे. 

काही वेळा तर, दुसऱ्या दिवशीच्या इफ्फीच्या बुलेटिनमध्ये त्या पत्रकार परिषदांचे वृत्तांत वाचून, ‘अरेच्चा, हे आले होते का काल?’ असा प्रश्न मनात यायचा. या वर्षी इतके जास्त सिनेमे महोत्सवामध्ये असल्याने परिस्थितीत फरक झाला होता का? दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असंच द्यावं लागेल. मराठी कलावंत आपल्या ग्रुपमध्ये वावरत होते. आपापसात हास्य-विनोद चालले होते. प्रसंगी स्थानिक वृत्तवाहिन्यांना बाइट्‌स देत होते. पण हे सगळं थिएटरच्या बाहेर. त्यांपैकी किती जणांनी इतर देशांमधले किंवा बाहेरच्या राज्यांमधले सिनेमे बघितले, याविषयी माझ्या मनात शंका आहे. 

आपल्या सिनेमासाठी गोव्याला येणं, हा कामाचा एक भाग झाला. पण तिथे आल्यानंतर निदान पाच-सात सिनेमे पाहायला हवेत, कारण तोही आपल्या कामाचा भाग आहे असं किती जणांना वाटलं? त्या सिनेमांवर चर्चा करताना कितीजण दिसले? महोत्सवामध्ये अनेक देशी-विदेशी पाहुणे आलेले असतात. ते सगळे सिनेमाशी संबंधितच असतात. त्यांना आवर्जून भेटावं, त्यांच्या देशातल्या/ राज्यातल्या सिनेमांविषयी जाणून घ्यावं, असा प्रयत्न किती जणांनी केला? अदूर गोपालकृष्णन यांच्यासारखा दिग्गज दिग्दर्शक आजही थिएटरमध्ये बसून सिनेमा पाहताना दिसत होता. त्यांच्याशी जाऊन बोलावं, असं कुणाला तरी वाटलं का? मुळात, याही पलीकडे जाऊन आणखी काही प्रश्न विचारावेसे वाटतात. 

महोत्सवामध्ये आपला सिनेमा दाखवला जातो, म्हणूनच हे कलाकार केवळ गोव्याला हजेरी लावतात का? निव्वळ सिनेमे पाहण्यासाठी- संपूर्ण दहा दिवस नव्हे, पण निदान चार-पाच दिवस तरी- यावं, असं यांच्यापैकी अगदी अपवादात्मक कलावंतांनाच का वाटतं? की अभिनय करण्यासाठी इतर सिनेमे पाहण्याची गरज नाही, असा यांचा समज असतो? हिंदी फिल्मस्टार्स कसे उद्‌घाटनासाठी किंवा समारोपासाठी येतात, स्टेजवर मिरवतात आणि ताबडतोब निघून जातात. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कसे महत्त्वाचे असतात, हे आवर्जून सांगायला विसरत नाहीत. 

या महोत्सवांमधून इतर देशांमधल्या संस्कृतीचं दर्शन होतं, अशा साऊंड बाइट्‌स देणं तर सोपं असतंच. या वर्षी मुंबईच्या ‘मामि’ चित्रपट महोत्सवाला मी गेले नव्हते, पण गेली काही वर्षं रमेश सिप्पी आणि अगदी यश चोप्रा यांना महोत्सवाला हजेरी लावताना मी बघितलेलं आहे. ‘हजेरी लावताना’ म्हणजे, थिएटरमध्ये सिनेमा बघताना. विजय तेंडुलकर तर कायम असायचेच. शिवाय श्याम बेनेगलही. कमल हसन, सारिका, शशी कपूर, अनुपम खेर आणि टेलिव्हिजनवर काम करणारे अनेक कलाकार चित्रपट महोत्सवामध्ये इतर सगळ्या चित्रपटप्रेमींप्रमाणेच वावरताना दिसत. 

या वर्षीही गोव्याला रमेश सिप्पी काही सिनेमे पाहायला आले होते. इफ्फीमध्ये सिनेमे दाखवले जातात, त्या आयनॉक्स आणि कला अकादमीपासून दूर फिल्म बझार भरतो. अर्थातच, इथे सगळा फोकस असतो तो मार्केटिंगवर. हळूहळू तिथलाही मराठी टक्का वाढू लागलाय. परदेशातल्या निर्मात्यांबरोबर को-प्रॉडक्शन्स करता येतील का, याची चाचपणी मराठी दिग्दर्शक आणि निर्माते करू लागले आहेत. बझारमध्ये दिवसभर घालवल्यानंतर त्यांनी पुन्हा सिनेमे पाहायला यावं, अशी अपेक्षा नसतेच. पण इतरांचं काय? मराठी कलावंतांनीही आपली क्षितिजं रुंदावायला हवीत, अशी अपेक्षा केली तर ते गैर ठरेल का? आपल्या परिघाबाहेर डोकावायला हवं असं म्हटलं, तर ते चूक असेल का? मराठी सिनेमांची संख्या जशी वाढतेय तसाच मराठी कलावंतांचाही महोत्सवामधला सहभाग अधिकाधिक असायला हवा, असं वाटतं. 

त्यातून, गोव्यातल्या महोत्सवाच्या तारखा दर वर्षी एकच असतात. त्यामुळे कॅलेंडरमध्ये ते दिवस आधीपासूनच बाजूला काढता येणं या कलावंतांना- निदान त्यांतले जे प्रस्थापित आहेत त्यांना- फारसं अशक्य नाही. यामुळे फायदा झाला तर तो त्यांनाच होणार आहे.
 

Tags: गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मीना कर्णिक इफ्फी २०१४ परिघाबाहेर पडण्याची आवश्यकता cinema film Goa Internationl Film Festival Meena Karnik IFFI 2014 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके