डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘महिला केंद्रस्थानी असलेल्या इफ्फीतल्या सिनेमांवर दर वेळी वेगळा लेख लिहायलाच हवा का?’ हा प्रश्न स्वत:च स्वत:ला विचारल्यावर त्याचं उत्तर होकारार्थी आलं. कारण आजही आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला प्रोटॅगॉनिस्ट असलेले सिनेमे तुलनेने कमी असतात. महिलांच्या दृष्टिकोनातून पाहिलेलं जग कमी दिसतं. म्हणूनच, या वेळीही बायकांवरच्या सिनेमांविषयी-

इराण किंवा येमेनसारख्या देशांच्या सिनेमांमधून मुख्य व्यक्तिरेखा बाईची असते, तेव्हा तिथले दिग्दर्शक काही ठाम सामाजिक विधान करू पाहत असतात का? म्हणजे, सिनेमाची कथा पुरोगामी विचार मांडणारी असतेच असं नाही, नायिका स्वतंत्र वृत्तीची असते असंही नाही; पण तरीही त्या बाईचा जगण्यासाठीचा झगडा दाखवताना दिग्दर्शकाला आपल्या देशातल्या बायकांची परिस्थितीच दाखवायची असते. विशेषत: सिनेमा जेव्हा एका महिलेने दिग्दर्शित केलेला असतो, तेव्हा.

दिग्दर्शक इदा पनाहानदे यांचा ‘नाहिद’ हा असाच एक इराणी सिनेमा. नाहिद ही एक तिशीतली बाई. तिला आमीर रेझा हा दहा वर्षांचा मुलगा आहे. अमली पदार्थांचं व्यसन असलेल्या आपल्या नवऱ्यापासून- अहमदपासून ती वेगळी झालीय. अहमद म्हणजे तरुण असतानाचा उनाडपणा, मवालीपणा न गेलेला. अजूनही माऱ्यामाऱ्या कर, जुगार खेळ- असं आयुष्य जगणारा. पण आपलं बायकोवर आजही तितकंच प्रेम आहे, असं नाहिद भेटल्यावर प्रत्येक वेळी काकुळतीला येऊन तिला सांगणारा. न्यायालयाने मुलाचा ताबा नाहिदला दिलाय. पण ती दुसरं लग्न करत नाही, तोवरच.

पैशाची तिला सतत तंगी आहे. नाहिद टायपिस्ट म्हणून एका प्रकाशक महिलेकडे नोकरी करतेय. जेमतेम मिळणाऱ्या पगारातून ती साधं घरभाडंही वेळेवर देऊ शकत नाही. त्यामुळे घरमालकाच्या बायकोकडे आपण कसे गरीब बिचारे आहोत, असं सांगण्याची वेळ तिच्यावर सतत येत असते. मैत्रिणींकडून पैसे वारंवार उसने घेणंही चालूच असतं. आमीर रेझाही काही फार हुशार मुलगा नाही. आठवड्यातले दोन दिवस वडिलांबरोबर घालवायचे आणि उरलेले आईकडे. ट्युशनला दांडी मारून टाइमपास करायचा.

प्रश्न उभा राहतो तो नाहिद जेव्हा मसूदच्या प्रेमात पडते, तेव्हा. मसूद विधुर आहे आणि त्यालाही एक लहान मुलगी आहे. महत्त्वाचं म्हणजे, तो श्रीमंत आहे. खरं तर त्याच्याशी लग्न करून नाहिदच्या सगळ्याच समस्या संपणार आहेत. पण आपला मुलगा आपल्याकडेच राहायला हवा, हा आई म्हणून तिचा हट्ट आहे. यातून मार्ग म्हणून नाहिद आणि मसूद तात्पुरतं लग्न करतात व तसा दाखला न्यायालयाकडून घेतात.

लग्न केल्याचं नाहिद ना आपल्या मुलाला सांगते ना अहमदला. पण अहमदला ते कळतंच. त्यातून निर्माण होणारा गोंधळ, प्रश्न, कसरती आणि त्याला तोंड देणारी नाहिद आपल्याला कधी आपल्यातली एक वाटू लागते, ते कळतही नाही. एका  बाजूला मुलावरचं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला आयुष्याचा जोडीदार सापडल्याचा आनंद यांच्या कात्रीत सापडलेली नाहिद एकाच वेळी आई म्हणून आणि बाई म्हणूनही जवळची वाटते. मसूदच्या मुलीची काळजीही घेते आणि एखाद्या दिवशी, नवऱ्याची मुलगी त्याच्यासोबत आहे आणि आपला मुलगा मात्र नाही, याचा राग त्या मुलीवर काढते. तिचं वागणं चुकीचं असलं, तरी ते खोटं वाटत नाही. मसूदने दिलेली अंगठी घरमालकाकडे गहाण ठेवताना, त्या अंगठीच्या बदल्यात मैत्रिणीच्या बांगड्या घरमालकाला देताना ती लोकांना फसवतेय, हे समजतं; पण त्यातली तिची अगतिकताही जाणवते.

कान चित्रपटमहोत्सवामध्ये इदा पनाहानदेला तिच्या पहिल्या सिनेमासाठी विशेष पुरस्कार दिला गेला. ‘अ सेपरेशन’ या असगर फरहादी यांच्या २०११ मध्ये ऑस्कर मिळवलेल्या सिनेमात एक लहान पण महत्त्वाची भूमिका केलेल्या साराह बायत या अभिनेत्रीने नाहिदची भूमिका केलीये. सगळ्याच कलावंतांचा उत्तम अभिनय हे या साध्या-सरळ-सोप्या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य. यात मेलोड्रामा आहे, तसा तो कमी-अधिक असेल; पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच की! त्यामुळे नाहिदच्या आयुष्यातला मेलोड्रामा पाहताना आपण त्यात गुंतून जातो आणि चांगल्या सिनेमाचा हाच मापदंड असतो.

‘नाहिद’च्या ट्रेलरची ही लिंक- https://www.youtube.com/watch?v=wh7-Tq741Hc

खादिजा अल- सलामी ही येमेनच्या ‘आय ॲम नुजूम, एज १० अँड डिव्होस्‌र्ड’ या सिनेमाची दिग्दर्शक. सध्या ती पॅरिसमध्ये राहत असली तरी मूळची येमेनची. येमेनमधल्याच नुजूद अली या दहा वर्षांच्या मुलीची ही सत्यकथा. त्यावर डेल्फिन मिना या फ्रेंच लेखिकेचं पुस्तकही आलंय. छोट्या नुजूदची गोष्ट २००९ मध्ये जगासमोर आली आणि येमेनमधल्या बालविवाहाच्या विरोधात होणाऱ्या चळवळीचा नुजूद ही चेहरा बनली.

बालविवाहाचे चटके खादिजाने स्वत: अनुभवलेले आहेत. बहुधा त्यामुळेच नुजूदचं आयुष्य पडद्यावर आणावं, असं तिला प्रकर्षाने वाटलं असावं. मात्र, नुजूद (या शब्दाचा अर्थ आहे लपणे) हे नाव बदलून तिने आपल्या छोट्या नायिकेचं नाव नुजूम (म्हणजे चांदण्या) ठेवलं. खादिजाने आजवर पंचवीस डॉक्युमेंटरीज केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या येमेनमधल्या महिलांच्या प्रश्नांवरच्या आहेत. कडव्या इस्लामवाद्यांच्या विरोधात जाणाऱ्या महिला पत्रकारावर तिने ‘किलिंग हर इज अ टिकीट टु पॅरडाईज’ नावाची डॉक्युमेंटरी केलेली आहे.

सिनेमाच्या नावामधूनच खरं तर सिनेमाची गोष्ट कळते. नुजूम ही दहा वर्षांची मुलगी. खेड्यात राहणारं तिचं कुटुंब काही कारणास्तव शहरात येतं. मात्र शहरातलं जगणं काही सोपं नसतं. वडील जेमतेम कमावत असतात. अशातच नुजूमबरोबर लग्न करण्याची इच्छा एक चाळिशीचा पुरुष व्यक्त करतो, त्यासाठी वडिलांना मोठा हुंडा देतो आणि नुजूमला लग्न करून आपल्या गावातल्या घरी घेऊन येतो. लहानग्या नुजूमला सेक्स म्हणजे काय, हेही माहीत नसतं. ती वयात येण्याची वाटही तिचा नवरा पाहत नाही. नुजूम  रडते, आरडाओरडा करते, प्रतिकार करते; पण तिचं काहीएक चालत नाही.

लग्नानंतर नवऱ्याबरोबर ती माहेरी येते आणि संधी साधून थेट पळून जाते. टॅक्सी पकडून न्यायालयापर्यंत पोचते आणि न्यायाधीशांसमोर, ‘आपल्याला घटस्फोट हवा’ म्हणून सांगते. न्यायाधीश अवाक्‌ होतात. या छोटीची कहाणी ऐकल्यावर तिला आपल्या घरी नेतात. तिच्याच वयाच्या आपल्या मुलीबरोबर तिची राहायची व्यवस्था करतात. न्यायालयात आलेल्या तिच्या वडिलांना आणि नवऱ्याला चार खडे बोल सुनावतात. नुजूमला घटस्फोट मिळतो आणि ती शाळेत जाऊ लागते, या दृश्यावर सिनेमा संपतो.

सिनेमा म्हणून हा ढोबळ आणि प्रचारकी होता. पण तरीही त्याविषयी इथे लिहिण्याचं कारण म्हणजे, वेगवेगळ्या देशांमध्ये कोणत्या प्रकारचे सिनेमे बनताहेत याची जाणीव आपल्याला त्यातून होते. खादिजासारखी महिला धोका पत्करून आपल्याला हव्या त्या विषयावर सिनेमा करू पाहते, हे आपल्यापर्यंत पोचावं म्हणून.

‘आय ॲम नुजूम, एज १० अँड डिव्होस्‌र्ड’च्या ट्रेलरची ही लिंक- https://www.youtube.com/watch?v=PW-eDmnBOZo

‘द सेकंड मदर’ या ब्राझीलच्या सिनेमाची दिग्दर्शकही महिला आहे- ॲना म्युलार्ट. सिनेमाची गोष्ट फार वेगळी आहे, अशातला भाग नाही; पण तरीही दिग्दर्शक त्यातून एक महत्त्वाचा मुद्दा मांडू पाहतेय, हे लक्षात येतं. काही गोष्टी आपण अगदी स्वाभाविकपणे गृहीत धरतो, ते योग्य नाही हे ती सांगते. वर्गभेद अनेकदा आपल्यात इतका खोलवर रुजलेला असतो की, आपल्या वागण्यातून तो कधी बाहेर पडतो, हे आपल्या लक्षातही येत नाही याची जाणीव ती करून देते.

व्हॅल ही आपलं घर सोडून साओ पावलो या शहरात काम करायला आलेली बाई. एका श्रीमंत कुटुंबाच्या घरी तिला नोकरी मिळते. नवरा-बायको- कार्लोस आणि बार्बरा दोघेही कामासाठी घराबाहेर असताना त्यांच्या लहान मुलाला सांभाळणं, हे तिचं काम. व्हॅल त्या छोट्या फॅबिनोची दुसरी आईच बनून जाते. मात्र, सिनेमाच्या पहिल्याच दृश्यात आपल्याला व्हॅलची स्वत:ची मुलगी तिच्यापासून दूर, गावात वाढतेय, हे कळतं. तिचं संगोपन नीट व्हावं म्हणून व्हॅल तिचा विरह सहन करत असते, हेही समजतं.

वर्षं जातात... फॅबिनो मोठा होतो, तशी व्हॅलची मुलगी जेसिकाही मोठी होते. गेली दहा वर्षं आई आणि मुलीची भेट नाहीये, त्यांचं फार जमतही नाहीये; कारण मुलगी तुटकपणे वागतेय हे कळतं आणि एक दिवस जेसिका फोन करून आपण शहरात येत असल्याचं सांगते. आता तरी आपल्याला मुलीबरोबर राहायला मिळणार म्हणून व्हॅल खूश होते. शहरातच एखादी छोटी जागा पाहावी असा विचार करते; पण दरम्यान मुलगी आपल्या खोलीत राहू शकेल का, असं बार्बरा आणि कार्लोसला विचारते. ते अर्थातच होकार देतात. व्हॅल म्हणजे आपल्या  कुटुंबातलीच एक आहे असं म्हणतात आणि जेसिका येते.

जेसिकाच्या वागण्यात किंवा घरात वावरण्यात आपण या घराचे आश्रित आहोत किंवा नोकर आहोत, ही कुठेही भावनाच नाही. व्हॅलच्या छोट्याशा खोलीत आपण नीट अभ्यास करू शकणार नाही, असं जेसिकाने म्हटल्यावर कार्लोस तिला पाहुण्यांच्या खोलीत राहण्याची ऑफर देतो. व्हॅल ‘नाही-नाही’ म्हणत असतानाही जेसिका आनंदाने ‘हो’ म्हणते. त्या खोलीत घरातल्या एखाद्या पाहुण्यासारखी राहते. फ्रिजमधलं फक्त कुटुंबासाठी आणि विशेष करून फॅबिनोसाठी असलेलं आइस्क्रीम खाताना तिला आपण काही चुकीचं करतोय, असं वाटत नाही. फॅबिनो आणि त्याचा मित्र तिला आपल्याबरोबर स्विमिंग पूलमध्ये खेचतात, तेव्हा ती त्यांच्या बरोबरीने मस्ती करते; कार्लोसबरोबर त्याच्या चित्रांवर चर्चा करते आणि लायब्ररीतली पुस्तकं वाचू का, असंही विचारते.

या प्रत्येक वेळी व्हॅल शरमेने चूर-चूर होऊन जाते. आपल्या मुलीला वागण्याची रीत नाही म्हणून बार्बरासमोर खजील होते. घरातल्यांच्या ब्रेकफास्ट टेबलवर जेसिकाने बसू नये, म्हणून तिची विनवणी करते. सुरुवातीला आपण मालक आणि व्हॅल आश्रित आहे याची जाणीव ठेवून तिच्याशी चांगलं वागणारी बार्बरा हळूहळू जेसिकाच्या वागण्याने अस्वस्थ होऊ लागते. ही मुलगी तर आपल्याशी बरोबरीच्या नात्याने वागतेय याचा तिला राग येऊ लागतो. एक दिवस जेसिकाला तिच्या वागण्याबद्दल व्हॅल सुनावते, तेव्हा जेसिका तिला विचारते, ‘‘तू त्यांच्याकडे काम करतेस, मी नाही. तू त्यांची नोकर आहेस, मी नाही. मग मी का त्यांच्याशी मान झुकवून वागू? आपण का राहतोय मुळात इथे? दुसरं घर का नाही शोधत आहोत?’’

जेसिकाचे प्रश्न आपण आपल्यातल्या अनेकांना लागू करू शकतो. घरात काम करणाऱ्या बाईच्या मुलांशी आपण अनेकदा ‘चांगलं वागतो’; त्यात एक पेट्रनायझिंग ॲटिट्यूड असतो का? ती मुलं आपल्या मुलांशी बरोबरीने वागली, तर आपल्याला ते चालणार असतं का? किती नकळतपणे आपण हा वर्गभेद स्वत:मध्ये रुजवलेला असतो!

फॅबिनोबरोबर स्विमिंग पूलमध्ये दंगा करणाऱ्या जेसिकाला पाहिल्यानंतर बार्बरा पूल रिकामा करून स्वच्छ करायला लावते आणि जेसिकाची सहनशक्ती संपते. त्याच रात्री ती घरातून बाहेर पडते. दरम्यान, फॅबिनो ज्या परीक्षेत नापास होतो, त्या परीक्षेत जेसिकाला उत्तम मार्क मिळतात.

जेसिकाच्या पाकिटात व्हॅलला एका लहान मुलाचा फोटो दिसतो. तो माझा मुलगा आहे, असं जेसिकाने सांगितल्यावर काही क्षण व्हॅल स्तब्ध होते. फॅबिनो सहा महिन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला जातो आणि व्हॅल नोकरी सोडते. जेसिकाने भाड्याने घेतलेल्या जागेत ती राहायला जाते. आणि जेसिकाला म्हणते, ‘‘आता तुझ्या मुलाला इथे घेऊन ये. मी आहे, आईसारखी त्याची देखभाल करायला!’’

‘द सेकंड मदर’च्या ट्रेलरची ही लिंक- https://www.youtube.com/watch?v=SOrbWcObwR4

‘डिग्रेड’ हा या तीनही सिनेमांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. अरब आणि टारझन नासेर या जुळ्या भावांनी दिग्दर्शित केलेला ‘डिग्रेड’ हा पॅलेस्तिनी सिनेमा. सिनेमाला त्या अर्थाने कथा नाही. एकदा दिग्दर्शकांना काय सांगायचंय, हे कळल्यानंतर पडद्यावर फार वेगळं काही घडत नाही.  गाझामधल्या झूमधून पळवून नेलेला सिंह, हमासच्या सैनिकांनी तो पकडताना केलेला गोळीबार याचे पॅलेस्तिनी संदर्भात काही वेगळे अर्थ आहेत का, याचीही कल्पना येत नाही. सिनेमाचा शेवट त्या सिंहाच्या चेहऱ्यावर होतो, पण त्याचा संदर्भ लागत नाही- निदान मला तरी लागला नाही.

पण सिनेमाचा फोकस म्हणजे काही हा सिंह नाही. गाझापट्टीत सतत होणारा गोळीबार, हिंसाचार तिथल्या नागरिकांसाठी दैनंदिन जीवनाचा भाग झालाय. तिथेच रस्त्यावर आहे एक ब्युटी सलोन. एक संध्याकाळ. वय झालेली एक बाई फेशिअल करण्यासाठी आलीये. आणखी एक तरुण मुलगी लग्न आहे म्हणून केशरचना आणि मेकअप करून घ्यायला आलीये. तिच्याबरोबर तिची होणारी सासू, नणंद आणि आई आहे. नऊ महिन्यांची एक गरोदर बाई नंतर आपल्याला पार्लरमध्ये यायला वेळ मिळणार नाही म्हणून आलीये. सोबत तिची नणंद आहे. आणखी एक नणंद आणि भावजयीची जोडी आहे. पैकी नणंद अमली पदार्थांचं व्यसन असलेली, सतत बडबड करणारी; तर भावजय थंड चेहऱ्याची.

सलोनची मालकीण आहे एक रशियन बाई. तिच्याबरोबर तिची मुलगी आहे. तिची सहायक मुलगी आहे. तिचा प्रियकर सलोनच्या बाहेर सिंह बांधून बसलाय. दोघांचं भांडण झालंय आणि ते एकमेकांशी फोनवर सतत बोलताहेत. अशा तेरा बायका तिथे आहेत. आणि लाईट जाणं, गोळीबार होणं यांसारख्या कारणांमुळे तिथे अडकल्या आहेत.

दरवाजाच्या बाहेर असणारा हिंसाचार आणि आतमध्ये बायकांचा एकमेकींशी होणारा संवाद. त्यात वाद आहे, चर्चा आहे, तिरकस बोलणं आहे. राजकारणाचे उल्लेखही आहेत, 'हमास'विषयी टिप्पणी आहे. सतत असुरक्षिततेच्या वातावरणात जगावं लागत असल्याने दबली गेलेली हिंसाही आहे. जसजसा वेळ जाऊ लागतो तसतशी ही हिंसा बाहेर येऊ लागते. अगदी शारीरिक भांडणात त्याचं परिवर्तन होतं. यातल्या प्रत्येक बाईची स्वत:ची अशी व्यथा आहे. (आणि बहुतेक जणींचं जग हे त्यांच्या आयुष्यात असलेल्या आणि नसलेल्या पुरुषांभोवती फिरतंय). पण म्हणून त्या एकमेकींविषयी आस्थेने विचार करताना दिसत नाहीत, एकमेकींना समजून घेताना दिसत नाहीत. आणि एकदा का त्यांच्यातले तणाव आपल्या लक्षात आले; त्यांचा राग, असहायता, संताप, वैफल्य जाणवलं की- त्यानंतर फार काही वेगळं सांगितलं जात नाही.

गाझामध्ये राजकीय बदल घडायचा असेल तर त्यासाठी महिलांची गरज आहे, असं या जुळ्या भावांचं म्हणणं आहे. ते म्हणतात, ‘‘गाझामधल्या बायका जगभरातल्या इतर बायकांसारख्याच आहेत. पण त्यांना जे सहन करावं लागतंय, ते मात्र खूप वेगळं आहे. बाहेर युद्ध चालू असताना त्या जगण्याचं प्रतिनिधित्व करतात. बाहेर गोळीबार चालू असताना त्या सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत राहतात... आपल्या लग्नाची, प्रेमाची स्वप्न रंगवत राहतात. कोणत्याही परिस्थितीत आशावादी राहतात.’’ मात्र हे दाखवण्यासाठी त्यांनी केलेला हा सिनेमा फसलाय, असं वाटतं. तरीही दिग्दर्शकांनी एक प्रयोग केलाय हे नाकारता येत नाही. म्हणूनच तो महत्त्वाचा वाटतो.

‘डिग्रेड’च्या ट्रेलरची ही लिंक- https://www.youtube.com/watch?v=Nt6pHgmt8Es

Tags: इफ्फी २०१५ चित्रपट फिल्म Cinema Films Anna Muylaert The Second Mother Ida Panahandeh Nahid I Am Nojoom Khadija Al Salami Nasser Degrade नासेर डिग्रेड ॲना म्युलार्ट द सेकंड मदर आय ॲम नुजूम खादिजा अल सलामी इदा पनाहानदे नाहिद सिनेमा IFFI 2015 मीना कर्णिक Meena Karnik Movie २०१६ साप्ताहिक साधना साधना Sadhana Sadhana Saptahik WeeklySadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके