डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गोव्यात 2015 च्या झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाहिलेल्या सिनेमांवरचा हा शेवटचा लेख. पैकी पहिल्या सिनेमाला स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा सुवर्णमयूर पुरस्कार मिळाला, दुसरा सिनेमा त्यातल्या विषयासाठी वेगळा वाटला आणि तिसरा भन्नाट गोष्टींची मालिका दाखवणारा म्हणून आगळा ठरला. हा शेवटचा लेख त्या तीन सिनेमांविषयी-

ॲमेझॉनचं घनदाट जंगल. त्यातून वाहणारी नदी. भोवताली उंच-उंच डोंगर आणि एका बेटावर उभा असणारा करामाकाते. सिनेमा सुरू होतो तेव्हा गर्द जंगलातल्या नदीमधून ॲमेझॉनमधल्या अनेक जमातींपैकी पांढरपेशा कपड्यांमधला एक जण एक छोटीशी नाव वल्हवत आणताना दिसतो. नावेमध्ये एक गोरा पुरुष- थिओ जवळजवळ बेशुद्धावस्थेत आहे आणि त्याला बरं करणं केवळ करामाकातेला शक्य आहे. मात्र आपली सगळी जमात नष्ट करणाऱ्या गोऱ्यांविषयी मनात तिडीक असलेला करामाकाते थिओवर उपचार करायला तयार नाही. मात्र करामाकातेच्या जमातीमधले काही जण जिवंत आहेत आणि थिओला त्यांचा पत्ता माहीत आहे, असं थिओच्या सहकाऱ्याने सांगितल्यानंतर करामाकाते आपलं मन बदलतो.

ही गोष्ट आहे थिओसाठी एक खास झाड आणि त्याचं फूल याकुर्ना शोधण्यासाठी घेतल्या गेलेल्या प्रवासाची. करामाकाते आणि ॲमेझॉनचं जंगल एक्सप्लोअर करायला आलेला संशोधक थिओ यांच्या नात्याची. पण केवळ तेवढीच नाही. थिओचं पुस्तक वाचून चाळीस वर्षांनी इव्हान नावाचा संशोधकही ॲमेझॉनच्या जंगलात येतो आणि याकुर्नाच्या   ओढीने करामाकातेला भेटतो. ही गोष्ट आहे करामाकाते आणि इव्हानच्या याकुर्ना शोधण्यासाठी घेतल्या गेलेल्या प्रवासाची अन्‌ त्या दोघांच्या नात्याचीही. फक्त चाळीस वर्षांनी वय वाढलेला करामाकाते जंगल आणि जंगलातल्या आदिवासींचं शोषण करण्यासाठी वारंवार येणाऱ्या गोऱ्यांच्या आक्रमणामुळे हताश झालाय. भकास झालाय. स्वप्न पाहायला विसरलाय. एका परीने आपला भूतकाळच हरवून बसलाय.

‘एम्ब्रेस ऑफ द सर्पन्ट’ या दिग्दर्शक सिरो गेरा यांच्या सिनेमाला 2015च्या इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. ऑस्करच्या परदेशी भाषेतील चित्रपटांच्या पुरस्कारांमध्ये शेवटच्या नऊ सिनेमांमध्ये या सिनेमाची निवड झालेली आहे. (तशी ती लॅबिरिन्थ ऑफ लाईजचीही झालेली आहे). कोलंबिया, व्हेनेझुअेला आणि अर्जेंटिना या दक्षिण अमेरिकेतल्या तीन देशांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘एम्ब्रेस ऑफ द सर्पन्ट’ ब्लॅक अँड व्हाईट आहे. थिओडोर कोक ग्रुनबर्ग आणि रिचर्ड इव्हान्स शुल्ट या दोन वनस्पतितज्ज्ञांनी ॲमेझॉनचा प्रवास केल्यानंतर लिहिलेल्या पुस्तकांवरून सिनेमाची कथा बेतलेली आहे. करामाकाते आणि थिओ, तसंच करामाकाते  आणि इव्हान यांची गोष्ट दिग्दर्शक आपल्याला सरळ सांगत नाही. दोन्ही गोष्टी आलटून-पालटून आपल्यासमोर उलगडत जातात. पहिल्या गोष्टीचा काळ आहे 1900 चा, तर दुसरीचा 1940 चा. दिग्दर्शकाचा संपूर्ण फोकस हा करामाकाते आहे. सिनेमाचा प्रोटॅगॉनिस्ट तो आहे. या दोन्ही गोष्टी त्याच्या नजरेतून आपल्यासमोर उलगडलेल्या आहेत. जंगलातली रबरासारखी संपत्ती ओरबाडून घेण्यासाठी शहरी गोऱ्यांनी केलेली आक्रमणं, स्थानिकांना त्यांचं गुलाम करणं, मूळ रहिवाशांचं केलेलं शोषण, कत्तली या सगळ्या गोष्टी आपण अनुभवतो करामाकातेच्या दृष्टिकोनातून.

दिग्दर्शक एकाच वेळी आपल्याला अनेक गोष्टी सांगू पाहतो. शहरी विरुद्ध आदिवासी, विकास म्हणजे काय, धर्माच्या नावावर होणारे अत्याचार अशा अनेक मुद्यांना स्पर्श करतो. ॲमेझॉनला पडलेला सापाचा विळखा हे जंगल आणि तिथला निसर्ग नष्ट करणार का, हा प्रश्न सिनेमा संपल्यानंतर आपल्या मनात रेंगाळत राहतो. एका प्रसंगात स्थानिक आदिवासी थिओचा दिशादर्शक चोरतात. थिओ त्यांच्यावर चिडतो आणि करामाकातेला म्हणतो, ‘‘या असल्या शहरी उपकरणांमुळे ही माणसं त्यांच्यात दिशा समजण्याची असलेली अंगभूत हुशारी विसरून जातील.’’ करामाकाते त्याला म्हणतो, ‘‘याचा अर्थ त्यांनी आधुनिक गोष्टी शिकूच नयेत का? आणि त्यांना त्या माहीत नसणं हेच जणू त्यांच्या पावित्र्याचं चिन्ह आहे का?’’ हा झगडा तर वैश्विकच आहे. आपल्याकडेही आपण आदिवासींचा विकास म्हणजे त्यांचं शहरीकरण का, असा प्रश्न उपस्थित करतोच की!

कथेच्या सादरीकरणात वेगळेपण आहेच आणि त्याला जोड मिळाली आहे अप्रतिम छायाचित्रणाची. सिनेमाची प्रत्येक फ्रेम म्हणजे एक चित्र आहे, तेही ब्लॅक अँड व्हाईट. आणि कदाचित म्हणूनच ॲमेझॉनची भव्यता अंगावर आणणारं. (सिनेमात दोष नाहीत असं नाही; पण इथे काही सिनेमाचं परीक्षण करणं हा हेतू नाही). सिनेमाला स्वत:ची एक लय आहे. ॲमेझॉनच्या निसर्गाशी कॅमेरा जणू एकरूप झालाय. त्यामुळे सिनेमा संपल्यानंतर, ‘आपण हे आत्ता काय बघितलं? बाप रे!’ अशी भावना मनात निर्माण होते आणि महोत्सव कशासाठी- तर अशा प्रकारचे वेगळे, प्रयोग असणारे सिनेमे पाहण्यासाठी, याची प्रचितीही येते.

‘एम्ब्रेस ऑफ द सर्पन्ट’चा ट्रेलर यू-ट्यूबवर नक्की पहा. मोठ्या पडद्यावर मिळतो तो अनुभव कॉम्प्युटरवर मिळणार नाही, पण एक झलक तर निश्चित मिळेल.

त्याची लिंक आहे-https://www.youtube.com/watch?v=4ff7TcnqHUc

रोमानियाचा ‘आफ्रेम’ हाही असाच एक वेगळा सिनेमा. मुळात अशा एखाद्या विषयावर असा एखादा सिनेमा करावा असं वाटणं, हेच सरधोपट वाट सोडून आडवाट  निवडण्यासारखं. दिग्दर्शक आहेत रादू युड. हा सिनेमाही ब्लॅक अँड व्हाईट आहे. कथेचा काळ आहे 1835. टर्की, रशिया आणि ऑस्ट्रिया या राज्यांमधल्या लढायांमध्ये रोमानिया भरडलं जात असतानाचा काळ. आफ्रेम हा ऑटोमन काळातल्या तुर्कस्तानातला शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे- ब्राव्हो किंवा शाब्बास!

वालाहिया नावाच्या गावात ही गोष्ट घडते. रोमानियामधलं हे ऐतिहासिक महत्त्वाचं गाव. ऑस्ट्रियामधल्या डॅन्युब नदीच्या उत्तरेकडे वसलेलं. सन 1768 ते 1854 या काळात मधेमधे इथे रशियाचं राज्य होतं. वालाहियाने 1859 मध्ये संयुक्तपणे मोल्दाविया- बरोबर युनायटेड प्रिन्सिपॅलिटिजची स्थापना केली, ज्यांनी पुढे रोमानिया हे नाव स्वीकारलं. पण हा झाला इतिहास. गोष्ट त्याची नाही. पण गुलाम असणं, हा जमीनदारांचा अधिकार असतानाचा काळ. आम्हाला विकत घ्या, असं म्हणत बाजारात उभे असलेले गुलाम आपल्याला या सिनेमात दिसतात. गुलाम होणं हेच आपलं काम आणि कर्तव्य आहे, अशी त्यांची ठाम समजूत. त्यामुळे जमीनदार किंवा एकूणच बाकी सगळे जण आपल्याला वाईट वागवतात यात काही चूक आहे, असं त्यांच्या मनातही येत नाही.

एका जमीनदाराच्या बायकोशी अतिप्रसंग करून पळून गेलेल्या कारफिन नावाच्या एका गुलामाला पकडून आणायचं काम कॉन्स्टेबल कॉस्टॅनडिनवर सोपवलं जातं. सोबत असतो त्याचा टीनएजर मुलगा इओनिता. कॉस्टॅनडिन आणि इओनिता आपल्या घोड्यांवरून निघतात. त्यांचा हा प्रवासही फार रोचक आहे. बाप सतत आपल्या मुलाला अनुभवाचे बोल सुनावत असतो. चर्चवर भाष्य करत असतो. आपण- म्हणजे आपला देश कसा सगळ्या बाजूने भरडला जातोय, हे सांगत असतो. त्याची भाषा अत्यंत रांगडी आणि प्रसंगी अश्लील आहे. आपल्या नाजुक मुलाने आपल्यासारखंच तगडं, दणकट व्हायला हवं- ही या बापाची इच्छा. कारफिनला पकडून परत आणताना हे तिघे एका धर्मशाळेत थांबतात. तिथे दारू वाहतेय, माणसं गाणी म्हणताहेत. कारफिनचे हात-पाय बांधलेले आहेत. मस्ती म्हणून काही लोक पेटत्या मेणबत्तीवर ठेवलेलं नाणं त्याला तोंडाने उचलायला सांगतात. कारफिनचे असफल प्रयत्न पाहून सगळे हसतात. कारफिनलाही काही अपमानास्पद वाटत नाही; उलट आपण या सगळ्यांचं मनोरंजन करतोय याचा अभिमानच त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. दरम्यान, कॉस्टॅनडिन तिथल्या एका बाईला पैसे देऊन आपल्या मुलाबरोबर झोपायला पाठवतो. जाताना इओनिताला सांगतो- पुरुषासारखा वाग; पहिल्यांदाच हे सुख अनुभवतो आहेस, नापास होऊ नकोस. आणि नंतर, त्या बाईकडे आपल्या मुलाची कामगिरी कशी झाली याचीही चौकशी करतो आणि स्वत:ही तिच्याबरोबर जातो. सगळं कसं खुल्लमखुल्ला. नॉर्मल जगण्यातला जणू काही हा भाग असावा.

कारफिन सुरुवातीला कॉस्टॅनडिनला आणि इओनिताला वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांचं मन आपल्या बाजूने   वळवण्याचा प्रयत्न करतो. पण कॉस्टॅनडिनवर त्याचा काही परिणाम होत नाही. मग तो आपण कसे निर्दोष आहोत, हे पटवून द्यायचा प्रयत्न करतो. वस्तुस्थिती अशी असते की, जमीनदाराच्या बायकोनेच त्याला आपल्याबरोबर सेक्स करायला प्रवृत्त केलेलं असतं. हे आजूबाजूच्या सगळ्यांना माहीत असतं. पण शिक्षा अर्थातच गुलामालाच होणं अपेक्षित असतं. कॉस्टॅनडिन त्याला समजावतो. जमीनदार फार मोठी शिक्षा करणार नाही, असं सांगतो. मुळात कॉस्टॅनडिन दुष्ट नाही. त्यामुळे कारफिनला तो कुणी पाहणार नाही अशा प्रदेशातून प्रवास करताना घोड्यावर आडवं टाकून आणतो आणि शहराच्या जवळ आल्यावर त्याला खाली उतरवून दोराने फरफटत नेऊ लागतो.

जमीनदाराकडे पोचल्यावर मात्र भलतंच घडतं. कारफिनला फार मोठी शिक्षा होते. ‘त्याला वाचव’ असं इओनिता बापाला सांगतो; ज्यावर, ‘ते आपलं काम नाही; आपलं काम होतं कारफिनला इथवर आणणं, ते आपण केलं... आता पुढे काय होतं, ही आपली जबाबदारी नाही, आपण आपलं काम करावं आणि चांगलं वागावं’ असा उपदेश कॉस्टॅनडिन करतो. ज्या काळातला हा सिनेमा आहे, त्या काळातल्या उपलब्ध गोष्टींचा आधार घेऊन त्यावरून एक स्वतंत्र कथा तयार झाली आणि हा सिनेमा बनला. पण दिग्दर्शकाला केवळ तो काळ आपल्यासमोर उभा करायचा नाहीये; या गोष्टीच्या माध्यमातून तो आपल्या देशाच्या प्राचीन संस्कृतीविषयीसुद्धा काही बोलू पाहतो. आपल्याला त्यातले बारकावे कळत नाहीत, कळणारही नाहीत.

रादू युडच्या या आधीच्या दोन सिनेमांमध्ये भर होता तो माणसा-माणसांमधलं अमानवी वागणं, सत्तेचे खेळ यावर. इथे दिग्दर्शकाने वर्गभेदावर थेट भाष्य केलंय. कधी किंचित विनोदी पद्धतीने, तर बऱ्याचदा रागावूनही.

या सिनेमाच्या ट्रेलरची ही लिंक-https://www.youtube.com/watch?v=mmTYOY_jQWc

अर्जेंटिनाचा ‘वाइल्ड टेल्स’ म्हणजे आजच्या काळातल्या सहा वेगवेगळ्या कथा आहेत. सिनेमाचा सहनिर्माता आहे प्रख्यात दिग्दर्शक पेद्रो आल्मादोवर आणि दिग्दर्शक आहे डेमियन झिफ्रॉन. गेल्या वर्षीच्या ऑस्करसाठी परदेशी सिनेमांच्या विभागात या सिनेमाला नॉमिनेशन मिळालं होतं. बदला घेणं हा या सहाही कथांचा केंद्रबिंदू. सिनेमाच्या सुरुवातीला नामावली येते तेव्हा पडद्यावर अनेक जंगली जनावरं आपल्याला दिसतात. वाघ दिसतो, अस्वल दिसतं. सगळी वाइल्ड जनावरं. सिनेमाचा सूर कोणता असणार आहे याची जाणीव करून देणारी ही नामावली.

पण बदला घेणं हा खास माणसाचा गुण. माणसातल्या जनावराविषयी आपल्याला दिग्दर्शक सांगणार आहे का, असा विचार मनात येतोच. आणि तसं तो या गोष्टींमधून आपल्याला सांगतोही, पण ते विनोदाच्या साह्याने. ब्लॅक कॉमेडी म्हणजे काय आणि ती कशी पेश करायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘वाइल्ड टेल्स’.

मला सर्वांत आवडली ती सिनेमातली पहिलीच कथा. आणि तिचा शेवट. विमानाच्या प्रवासात एक बाई व एक पुरुष सहज गप्पा मारू लागतात आणि दोघांच्या ओळखीचं एका मुलाचं नाव गप्पांमध्ये येतं. तो पुरुष या मुलाचा शिक्षक असतो, त्याने मुलाला त्रास दिलेला असतो. बाई त्याची प्रेयसी असते आणि तिने त्याला प्रेमभंगाचं दु:ख दिलेलं असतं. अचानक, समोरच्या सीटवरची बाई वळते आणि म्हणते, ‘अरेच्चा, या मुलाला मीसुद्धा ओळखते!’ आणि लक्षात येतं की, विमानातले सगळेच त्याला ओळखताहेत. याला योगायोग कसं म्हणावं? मुख्य म्हणजे यातल्या प्रत्येकाने त्या मुलाच्या आयुष्यात काही ना काही वाईट केलंय. तेवढ्यात, विमानाची एअरहोस्टेस बाहेर येऊन माहिती देते की, या विमानाचा पायलट तोच आहे आणि त्याने कॉकपिटचं दार लावून घेतलंय. सगळे जण घाबरतात.

विमान आता हेलकावे खाऊ लागलंय. त्या मुलाचा मानसोपचारतज्ज्ञ कॉकपिटच्या दारावर थापा मारून म्हणतो, ‘अरे, तुझं भयंकर वागणं हा तुझा दोष नव्हता, नाही. दोष आहे तो तुझ्या आई-वडिलांचा.’ पुढच्या दृश्यात आपल्याला घरासमोरच्या अंगणात चहा घेत बसलेलं एक वयस्क जोडपं दिसतं. काही तरी आवाज जवळजवळ येतोय का, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर येतात आणि मागून त्यांच्या दिशेने झेपावणारं विमान आपल्याला दिसतं. झपकन्‌ पडद्यावर काळोख होतो आणि आपल्या तोंडून, ‘अरे...!’ असा चीत्कार बाहेर पडतो!

रेस्तराँमध्ये काम करणाऱ्या एका वेट्रेसची एक गोष्ट आहे, तर स्फोटकांमध्ये काम करणाऱ्या एका इंजिनिअरच्या मनातला स्फोट दाखवणारी आणखी एक. मुलाने गाडीचा अपघात करून माणसं मारल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका जोडप्याची गोष्ट आहे. मुलाचा बाप आपल्याकडे काम करणाऱ्या म्हाताऱ्या नोकराला पैशाची लालुच दाखवून आरोप स्वत:वर घ्यायला लावतो. वकील   व पोलीस बापाकडून पैसे काढण्याचे प्रयत्न करू लागतात आणि आई आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत वाचवायला हवं म्हणून कामाला लागते.

आणखी एक गोष्ट आहे ती दोन ड्रायव्हर्सची. एक अत्यंत श्रीमंत माणूस चालवत असलेली श्रीमंती गाडी आणि दुसरा निम्न मध्यमवर्गीय चालवत असलेली त्याची गाडी- यांच्यातलं द्वंद्व. ज्याचा शेवट भयानक होतो आणि अपघाताची तपासणी करणाऱ्या पोलिसांना काही तरी भलतंच वाटतं.

शेवटची गोष्ट आहे लग्नाची. एका मोठ्या हॉटेलमध्ये खूप माणसं लग्नासाठी जमलेली असताना नवरा-बायकोमध्ये कशी रस्सीखेच होते त्याची. नवऱ्याचं अफेअर आहे आणि ती मुलगी लग्नाला आलीये हे कळल्यानंतर अस्वस्थ झालेली नवरी, तिचं नवऱ्याला खिजवण्यासाठी हॉटेलमधल्या एका कर्मचाऱ्याबरोबर सेक्स करणं, माफी मागूनही ही ऐकत नाही म्हटल्यावर त्याचं चिडणं, दोघांचं एकमेकांना घालून-पाडून बोलणं आणि मनातला राग व्यक्त करता-करता लोकांसमोर, लग्नासाठी आणलेल्या केकच्या टेबलवरच दोघांनी अत्यंत हिंस्रपणे एकमेकांच्या शरीरांवर तुटून पडणं...

माणसाच्या मनातली हिंसा, द्वेष, तिरस्कार, वैफल्य, हताश होणं, एकमेकांवर सतत मात करण्याचा प्रयत्न करणं अशा वेगवेगळ्या नकारात्मक भावनांशी दिग्दर्शक अक्षरश: खेळतो. हसवता-हसवता आपल्याला अंतर्मुख करतो. सगळ्याच कथांची भट्टी जमलीये असं जरी नाही वाटलं, तरी या सगळ्या कथांमधून जे व्यक्त झालंय ते अस्वस्थ करणारं निश्चितच आहे.

‘वाइल्ड टेल्स’चं ट्रेलर या लिंकवर बघायला मिळेल- https://www.youtube.com/watch?v=Utq0aDEp084

वेगवेगळ्या देशांतल्या वेगवेगळ्या सिनेमांवर पाच अंकांमधून मी लिहिलं. जागतिक सिनेमामध्ये सध्या काय चाललंय याची ही एक छोटीशी झलक होती. हे सिनेमे एरवी बघायला मिळण्याची शक्यता नसल्याने कथा थोड्या विस्ताराने सांगितली. पण तरीही आपल्या शहरात एखादी फिल्म सोसायटी असेल, एखादा चित्रपट महोत्सव भरवला जात असेल; तर तिथे जावंसं वाटावं एवढी इच्छा वाचकांच्या मनात निर्माण व्हावी, हा यामागची हेतू होता, आहे. पुण्यात राहणाऱ्यांना तर पुणे चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने यातले काही किंवा आणखी वेगळे सिनेमे पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

सिनेमा हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही. जगभरचे सिनेमे पाहायला मिळणं हा अनुभव माणूस म्हणून आपल्याला समृद्ध करून जातो. आपल्या कक्षा रुंदावतो. आपलं अवकाश विस्तारतो. जगाचं भान देतो. तेव्हा, सिनेमे पाहत राहू या.

Tags: International Film Oscar ऑस्कर इफ्फी 2015 इफ्फी सिनेमा वाइल्ड टेल्स आफ्रेम एम्ब्रेस ऑफ द सर्पन्ट मीना कर्णिक Wild Tales Aferim Embrace Of The Serpent आंतरराष्ट्रीय चित्रपट Films IFFI IFFI 2015 Meena Karnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके