डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एकटा आवाज, प्रेमप्रकरणं आणि निव्वळ वेडेपणा!

कदाचित, बहुसंख्याकांनी थोडं समजून घेतलं तर ते अल्पसंख्याकांना आपल्यात सामावून घेऊ शकतात, एवढंच दिग्दर्शकाला सांगायचं असावं. कदाचित, दोन विरोधी विचारांच्या लोकांनी नेहमी हातघाईवरच यायची गरज नसते, असं त्याला सुचवायचं असावं. कदाचित, आपल्या विरोधी विचारांचा आदर करून आपण एकत्र जगायला शिकलो तर हे जग आज आहे त्यापेक्षा खूप जास्त चांगलं होईल, शांत होईल- अहिंसक होईल हे त्याला अधोरेखित करायचं असावं. किंवा मग एखादा आवाज एकटा असेल, पण तरीही तो दाबून टाकण्याचा हक्क इतरांना नाही, असंही मांडायचं असावं. सिनेमा म्हणून हा सिनेमा खूप महान नव्हता. पण मला त्यातला विचार महत्त्वाचा वाटला. यात घटना नव्हत्या, फारसे संवाद नव्हते, गोरानविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा  प्रयत्न नव्हता; पण तरीही दिग्दर्शक जे सांगू पाहत होता, ते कुठे तरी आपल्या आजच्या परिस्थितीशी नातं सांगणारं होतं. 

सोळा वर्षांचा गोरान आपल्या नव्या शाळेत येतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची अनिश्चितता लपलेली नसते. आईला एका क्रूझवर काम मिळतं आणि तिच्यासमोर गोरानला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवण्यावाचून पर्यायही नसतो. शाळा असते चकचकीत. नुकतीच नावारूपाला आलेली. मुलांसाठी इंटरनेट, प्रेयर रूम, खेळाचं मैदान आणि बरंच काही. शिवाय गरज पडलीच तर खास मानसोपचारतज्ज्ञांची सेवाही. दोष काढण्यासारखं काय असणार या शाळेत?

म्हटलं तर एकच. ती शाळा असते कॅथॉलिक विचारांवर चालणारी. शाळेतले शिक्षक धार्मिक दृष्ट्या अत्यंत कडवे असतात. आपल्या विद्यार्थ्यांवर तसेच संस्कार करायला हवेत, असं ठामपणे मानणारे असतात.

अर्थात, गोरान काही आक्रमक, भांडणारा मुलगा नाही. पण न पटणाऱ्या गोष्टींविषयी प्रश्न उपस्थित करणारा निश्चितच आहे. आणि विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालं नाही, तर ती गोष्ट न करण्याचा आग्रहही त्याच्यापाशी आहे. इतर कुणाला कसं वागायचं ते आपण सांगत नाही, मी कसं वागावं हे इतर कुणी सांगू नये- एवढीच त्याची माफक अपेक्षा आहे.

पण बहुसंख्यांकाच्या मधोमध एखादा अल्पसंख्याक- मग तो त्याच धर्माचा असला तरी विचारांनी अल्पसंख्याकच- सापडला की काय होतं, त्याची गोष्ट म्हणजे क्रोएशिएन दिग्दर्शक ऑगहेन स्विलीसिक यांचा ‘द व्हॉईस’ नावाचा सिनेमा.

या सिनेमाचं वैशिष्ट्य हे की, तो बाजू घेत नाही. अर्थात, गोरान या सिनेमाचा प्रोटॅगोनिस्ट आहे, तेव्हा सिनेमा आपण त्याच्या दृष्टिकोनातून पाहतो. त्याची घालमेल, त्याची कोंडी आणि त्याचं एकटं पडणं आपण अनुभवतो. तेवढ्यापुरती दिग्दर्शकाने भूमिका घेतलेली आहे, असं फार तर म्हणता येईल.

गोरानचा झगडा पहिल्याच दिवशी सुरू होतो. सकाळी ब्रेकफास्टसाठी सगळे विद्यार्थी एकत्र जमतात आणि मुख्याध्यापिका आल्यानंतर येशू ख्रिस्ताची प्रार्थना म्हणू लागतात. आपल्याला मिळालेलं अन्न ही त्याची कृपा आहे आणि ती तशीच कायम राहावी, असं सांगणारी. गोरान दोन्ही हात एकत्र जोडून येशूची आळवणी करत नाही. इतर मुलांची प्रार्थना होईपर्यंत तो शांतपणे बसून राहतो आणि मग त्यांच्याबरोबर खायला सुरुवात करतो.

हळूहळू गोरानचं हे वागणं त्याच्या बाजूला बसणाऱ्या मुलांना समजू लागतं. शिक्षकांना जाणवू लागतं. कधी तरी त्यांच्यात संघर्षाची ठिणगी उडणार, हे आपल्या लक्षात येऊ लागतं.

या सिनेमात फारशा घटना नाहीत. रोज सकाळी ब्रेकफास्टसाठी जमणारी मुलं, रोज सकाळी होणारी प्रार्थना, रोज रात्री आपल्या रूमवर धिंगाणा घालणारे विद्यार्थी... सगळंच रुटीन. पण शाळेत येशूच्या जन्माच्या कथेवर आधारित नाटक करायचं घाटतं. गोरान त्यात सहभागी व्हायला तयार होतो आणि या अशास्त्रीय गोष्टींवर आपण कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न करतो. मुख्याध्यापिका त्याला समजवायचा प्रयत्न करतात. ‘आजवर जे चालत आलंय’ त्याला प्रश्न करणारे आपण कोण, असा सवाल इतर मुलं करतात. पण गोरानचं समाधान होत नाही. शाळा जितका आपला विचार त्याच्यावर लादू पाहते तितका तो अधिक प्रश्न विचारू लागतो.

इतर मुलांबरोबर झालेली मारामारी, रागाच्या भरात गोराने भिरकावलेल्या दगडामुळे मदर मेरीच्या पुतळ्याचं डोकं फुटणं, त्याच्यामुळे संपूर्ण शाळेला उपाशी राहावं लागतं म्हणून त्याचं कासावीस होणं, स्टडी टूरवर गेलेलं असताना भर समुद्रात एकट्यानेच दूरवर पोहत जाणं आणि या सगळ्यातून गोरानची तगमग आपल्याला जाणवत राहते. त्याचं कोंडलेपण आपल्यापर्यंत पोचत राहतं. पण त्यावर ना गोरान काही उपाय करत, ना दिग्दर्शक काही उपाय सुचवत. अगदी सिनेमा संपल्यानंतरही आपली संदिग्ध अवस्था कायम असते. काही तरी घडायला हवं होतं, असं मनात येत राहतं.

कदाचित, बहुसंख्याकांनी थोडं समजून घेतलं तर ते अल्पसंख्याकांना आपल्यात सामावून घेऊ शकतात, एवढंच दिग्दर्शकाला सांगायचं असावं. कदाचित, दोन विरोधी विचारांच्या लोकांनी नेहमी हातघाईवरच यायची गरज नसते, असं त्याला सुचवायचं असावं. कदाचित, आपल्या विरोधी विचारांचा आदर करून आपण एकत्र जगायला शिकलो तर हे जग आज आहे त्यापेक्षा खूप जास्त चांगलं होईल, शांत होईल- अहिंसक होईल हे त्याला अधोरेखित करायचं असावं. किंवा मग एखादा आवाज एकटा असेल, पण तरीही तो दाबून टाकण्याचा हक्क इतरांना नाही, असंही मांडायचं असावं.

सिनेमा म्हणून हा सिनेमा खूप महान नव्हता. पण मला त्यातला विचार महत्त्वाचा वाटला. यात घटना नव्हत्या, फारसे संवाद नव्हते, गोरानविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न नव्हता; पण तरीही दिग्दर्शक जे सांगू पाहत होता, ते कुठे तरी आपल्या आजच्या परिस्थितीशी नातं सांगणारं होतं. जगभरात बहुसंख्याकांची निर्माण झालेली असहिष्णुता हिंसक रूप घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं वाटलं. म्हणूनच या सिनेमाची आवर्जून दखल घ्यायला हवी, असंही वाटलं.

0

‘द व्हॉईस’सारख्या गंभीर विषयानंतर ‘लव्ह अफेअर्स’ (मूळ फ्रेंच नावाचं भाषांतर ‘थिंग्ज वुइ से, थिंग्ज वुई डू’- ‘आपण ज्या गोष्टी बोलतो, आपण ज्या गोष्टी बोलतो’ असं आहे) नावाचा हलकाफुलका फ्रेंच सिनेमा पाहताना मजा वाटली. सिनेमाच्या शीर्षकावरून त्याची जातकुळी समजत असली, तरी दिग्दर्शक इमॅन्युअल मॉरेने ही गोष्ट थिल्लर होणार नाही याची अर्थातच काळजी घेतलेली आहे. प्रेम म्हणजे काय? दोन व्यक्तींमधलं शारीरिक आकर्षण? दोन व्यक्तींचं एकमेकांच्या सहवासात आनंदी असणं? एकमेकांबरोबर मनसोक्त गप्पा मारता येणं? दुसऱ्याच्या आनंदासाठी त्याच्या आयुष्यातून निघून जाणं? आणि हे सगळं एकाच व्यक्तीकडून मिळेल, अशी अपेक्षा करणं?

मॉरे अशा अनेक प्रश्नांना स्पर्श करतो; तेही अनेक प्रेमप्रकरणांविषयी आपल्याला सांगताना. सुरुवात होते डॅफ्ने आणि मॅक्झिमपासून. पॅरिसमध्ये राहणारा मॅक्झिम नुकताच एका प्रेमभंगाच्या दु:खातून बाहेर आलेला आहे. भाषांतराचं काम करणाऱ्या या तरुण मुलाला स्वतंत्रपणे कथा-कादंबऱ्या लिहिण्याची आकांक्षा आहे. पॅरिसपासून चार दिवस दूर जावं, म्हणून तो त्याच्या आते/मामे/चुलत भावाकडे- फ्रान्सवॉकडे येतो. पण फ्रान्सवॉला आयत्या वेळी कामाच्या निमित्ताने बाहेर जावं लागतं आणि मॅक्झिमची काळजी घ्यायची जबाबदारी तो आपल्या गरोदर प्रेयसीवर- डॅफ्नेवर सोपवतो.

डॅफ्ने आणि मॅक्झिम भेटतात. ती त्याला आपला निसर्गाने नटलेला गाव दाखवायला नेते आणि गप्पांच्या ओघात त्याच्या प्रेमभंगाविषयी विचारते. मॅक्झिमलाही बहुधा मन मोकळं करायचं असतं. तो भडाभडा बोलू लागतो.

मॅक्झिम आणि व्हिक्तोरी यांचं अफेअर असतं. व्हिक्तोरीचं लग्न झालंय. तिचा नवरा परदेशात आहे. तिचीही तिकडे बदली होणारेय. त्यामुळे या नात्यामधून सेक्स वगळता तिच्या फारशा अपेक्षा नाहीत. मॅक्झिमच्याही नाहीत. व्हिक्तोरीची बदली होते आणि त्यासाठी दिलेल्या पार्टीत मॅक्झिमला तिची बहीण- सॅन्ड्रा भेटते. या सॅन्ड्रावर कॉलेजात असताना मॅक्झिम कमालीचा फिदा असतो. पण तो तिला ते कधी बोलून दाखवत नाही. मात्र आता तिला बघून त्याच्या जुन्या भावना उंचबळून येतात. सॅन्ड्रा मात्र मॅक्झिमचा रूममेट गॅसपार्डच्या जवळ येते. गॅसपार्ड आणि सॅन्ड्रा एकत्र राहू लागतात आणि त्यांच्या भल्या मोठ्या घरात मॅक्झिमलाही राहायला बोलावतात. नकार देता न आल्याने मॅक्झिम तिथे जातो खरा, पण आता त्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. त्या जोडप्याला एकमेकांच्या प्रेमात पाहणं, सॅन्ड्राचं कमी कपड्यांत वावरणं, यातून बाहेर कसं पडायचं हे त्याला समजत नाही.

आपली गोष्ट सांगता-सांगता मॅक्झिम थांबतो. डॅफ्नेला तिच्या प्रेमकथेविषयी विचारतो. आणि मग सुरू होते डॅफ्ने आणि फ्रान्सवॉची गोष्ट. डॅफ्ने एका डॉक्युमेंटरी बनवणाऱ्या दिग्दर्शकाकडे काम करत असते. वयाने मोठ्या असलेल्या या दिग्दर्शकाच्या ती प्रेमात असते. पण त्याला दुसरीच कुणी मुलगी आवडतेय, हे कळल्यावर ती निराश होते. त्याच अवस्थेत तिला फ्रान्सवॉ भेटतो. त्याचं लग्न झालंय, पण त्याला डॅफ्नेविषयी प्रचंड आकर्षण वाटतं आणि तो तिला डेटवर घेऊन जातो. ‘खरं म्हणजे, आमच्या दोघांमध्ये काहीच समान नव्हतं, पण तरीही मी त्याला होकार दिला आणि त्याच्याबरोबर गेले,’ डॅफ्ने सांगते.

डॅफ्ने आणि मॅक्झिम आपली गोष्ट एकमेकांना सांगत असताना अर्थातच आपल्याला फ्रान्सवॉ आणि त्याच्या बायकोची- लुईची गोष्ट कळते. लुई आणि तिच्या तथाकथित प्रियकराविषयी समजतं. त्या प्रियकराच्या पत्नीलाही आपण पाहतो. मॅक्झिम आणि सॅन्ड्रा कसे जवळ येतात, ते आपल्याला कळतं. सॅन्ड्रा आणि गॅसपार्डच्या भांडणानंतर गॅसपार्ड दुसऱ्या मुलीबरोबर जातो, पण त्याच वेळी सॅन्ड्राविषयीही त्याला ओढ वाटत राहतेच; तेही आपल्याला दिसतं. आणि मग अर्थातच, मॅक्झिम आणि डॅफ्नेही एकमेकांजवळ येणार, हे आपल्या लक्षात येतं.

हे सगळं पाहताना प्रेमाच्या नवनवीन व्याख्या आपल्या लक्षात येतात. त्यातले कंगोरे दिसू लागतात. यातल्या प्रत्येक व्यक्तिरेख;ला आपण समजून घेऊ शकतो. ती तशी का वागते, त्यामागच्या भावना काय असतात, कारणं काय असतात; हे आपल्याला अगदी शंभर टक्के पटलं नाही, तरी कळतं. एकाच वेळी दिग्दर्शक गंभीर काही तरी सांगू पाहतोय, पण ते सांगण्यासाठी त्याने निवडलेला मार्ग मात्र हलकाफुलका आहे याची प्रचिती येते आणि गंमत वाटते. वाटतं, अशा प्रकारेही प्रेमाची गोष्ट सांगता येते तर!

0

ज्या तिसऱ्या सिनेमाविषयी लिहायचं आहे, त्याचं दोन शब्दांत वर्णन करायचं तर- निव्वळ वेडेपणा, असं करता येईल. कॉमेडी आणि हॉरर यांच्या मिश्रणातून बनलेले अशा प्रकारचे सिनेमे हॉलीवुडमध्ये खूप झालेले आहेत, पण ‘स्विटी, यू वोन्ट बिलिव्ह इट’ या याच पठडीतल्या कझाकिस्तानातल्या सिनेमामध्ये खास स्थानिक फ्लेवरही आहेच आहे. दिग्दर्शक येरनार नुरगॅलियेव्ह यांचा हा पहिलाच पूर्ण लांबीचा सिनेमा आहे.

सिनेमाची जातकुळी पहिल्या फ्रेमपासून आपल्या लक्षात येते. सुपरमार्केटमध्ये खूप सारी खरेदी करणारा नवरा एकाच वेळी फोनवर बायकोशीही बोलतोय आणि कर्जाचा हप्ता वेळेवर देता न आल्यामुळे बँकेतून आलेल्या फोनचाही सामना करतोय. दास्तान याचं नाव. त्याची बायको नऊ महिन्यांची गरोदर आहे आणि आता ते मोठं पोट घेऊन कंटाळली आहे. नवऱ्याच्या मागे तिची कटकट सतत चालू आहे. इतकी की, सुपरमार्केटमधून पार्किंगपर्यंत तो तिचं बोलणं ऐकत चालत राहतो आणि गाडीत बसलेल्या तिच्याकडे पोचल्यावर फोन ठेवून ऐकू लागतो. बायकोच्या या कटकटीला कंटाळून दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी तो आपल्या मित्रांबरोबर मासेमारीला जायचा प्लॅन बनवतो आणि त्याप्रमाणे जातोही- बायकोच्या नकाराला आणि भांडणाला न जुमानता.

यातला एक मित्र पोलिसांत असतो, तर दुसऱ्याचं मोबाईल सेक्स शॉप असतं. एका टेम्पोमध्ये विविध सेक्स टॉईज ठेवून ती विकायची आणि पैसे कमवायचे. हाच टेम्पो घेऊन तो आता आलेला असतो. गाडीत त्यांच्या सीटच्या मागे भल्या मोठ्या प्लॅस्टिकच्या सेक्सी बाहुल्या, पुरुषांची लिंगं आणि असे अनेक प्रकार आपल्याला दिसतात. एक दिवस मजा करायची, मोकळा श्वास घ्यायचा आणि ताजंतवानं होऊन घरी परतायचं- असा विचार करून तिघे मित्र निघतात आणि सुरू होतो एक अविश्वनीय प्रवास.

वाटेत गॅस भरण्यासाठी ते थांबतात, त्या जागी एक विचित्र पुरुष आणि त्याची तितकीच विचित्र मुलगी त्यांना भेटते. त्यांच्यापासून पळ काढून ते पुढे जातात आणि थेट एका गँगस्टरने केलेला खून बघतात. त्यांच्यापासून पळ काढतात आणि त्या गँगस्टर्सच्या मागे लागलेल्या खुन्याच्या जाळ्यात सापडतात. यात अनेक खून, माना कापणं, डोळे बाहेर काढणं, माणसं जाळणं, घशात चाकू खुपसणं, रक्ताचे पाट वाहणं... असं खूप काही घडतं. एकाच वेळी भीती वाटायला लावणारं आणि त्यातल्या अवास्तववादी हिंसेमुळे हसूही आणणारं.

असं म्हणतात की, कझाकिस्तानच्या सिनेमांमध्ये दुष्ट माणसं नेहमी विनोदी कपडे घातलेली असतात आणि नायक नेहमी आपल्या मानसिक शक्तीच्या शोधात. पण सर्व प्रकारच्या कझाकी पुरुषांमध्ये वेंधळेपणा कॉमन असतो. त्यांच्यात ना गुन्हे करण्याचं टॅलन्ट असतं, ना रोजच्या आयुष्यातल्या प्रश्नांना सामोरं जायचं. या सिनेमांमधल्या बायकाही कजाग असतात. ज्यांच्यापासून पुरुषांना काही काळ सुटका हवी वाटावी, अशा. दिग्दर्शकाने या सगळ्या टिपिकल स्वभावगुणांचा उपयोग आपल्या सिनेमात केलेला आहे. मूर्खपणा करणारे फक्त हे तीन मित्र नाहीत, तर गँगस्टर्समधलेही काही आहेत. फक्त ते जोडीला दुष्टही आहेत, इतकंच.

अखेर, घरी परतेपर्यंत दास्तानची बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेली असते, तिला मुलगी होते आणि अशा महत्त्वाच्या क्षणी नवरा आपल्यासोबत नव्हता म्हणून ती चिडलेली असते. मात्र, नवऱ्याला समोर बघून ती आपला राग विसरते. क्षणभर आपल्या बाळाच्या येण्याने आनंदलेले दोघे एकमेकांच्या जवळ येतात आणि ती त्याला विचारते, ‘होतास कुठे तू दिवसभर? तुझा फोनही लागत नव्हता...’

आणि तो उत्तरतो, ‘काय सांगू तुला स्विटी, तुझा विश्वासच नाही बसणार...’

पुढे काय होणार, या कल्पनेने आपण हसतो आणि थिएटरमधून बाहेर पडतो.

(‘इफ्फी 2021’वरील आणखी एक लेख पुढील अंकात)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके