डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तीन सिनेमे : असामान्य व्यक्तिमत्त्व, दारू, विस्मरण

दिग्दर्शक ख्रिस्टॉस निको यांनी हा सिनेमा केला तेव्हा तो एका महामारी अनुभवत असलेल्या जगात प्रदर्शित होणार आहे, याची त्यांना कल्पना होती की नाही माहीत नाही; पण ‘ॲपल्स’मध्येही एक महामारी आहे. इथे कुठल्या तरी रोगामुळे लोकांना विस्मरण होऊ लागलंय. म्हणजे एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर आपण कोण आहोत, कुठे आहोत, काय करतोय- हे सगळं ते विसरून जातात. स्वत:ची पूर्ण ओळख पुसून गेलेली असते. अशा वेळी शहरांमध्ये त्यांच्या पुनर्वसनासाठी हॉस्पिटल्स उघडली जातात, काही ठोस कार्यक्रम आखले जातात. म्हणजे, काही ठरावीक दिवसांमध्ये आपलं जवळचं कुणी हरवलंय म्हणून शोधत येणाऱ्या नातेवाइकांची वाट बघितली जाते. पण तसं कुणीच आलं नाही तर या लोकांना नवी ओळख दिली जाते. 

‘एल ऑलव्हिदो के सेरेमॉस’ हे पुस्तक 2006 मध्ये प्रसिद्ध झालं. त्याच्या इंग्लिश भाषांतराचं नाव होतं, ‘ऑब्लिव्हियॉन : अ मेमॉर’. हेक्टर अबाद या कोलंबोमधल्या लेखकाचं हे पुस्तक म्हणजे त्याने आपल्या वडिलांना वाहिलेली आदरांजली आहे. या पुस्तकामधला एक प्रसंग आवर्जून सांगण्यासारखा आहे. हेक्टर अबाद यांना 1987 मध्ये एका पत्रकाराचा फोन आला, ‘तुझा खून झालाय, असं म्हणताहेत सगळे!’ हा पत्रकार आपल्या वडिलांविषयी बोलतोय, हे अबाद यांना क्षणार्धात समजलं. कारण त्याच वेळी त्यांच्यापासून काही अंतरावर त्यांचे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.

अबाद यांच्या वडिलांचं नावही हेक्टर अबाद (सिनिअर) असं होतं. त्यामुळे त्या पत्रकाराचा गैरसमज झाला होता. सिनिअर अबाद हे डॉक्टर होते, शिक्षक होते आणि सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे एक कार्यकर्ताही. उजव्या विचारसरणीच्या निमलष्करी ताकदींनी त्यांचा खून केला, तेव्हा ते 65 वर्षांचे होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या एका सहकाऱ्याचा खून झाला होता आणि त्याच्या श्रद्धांजली सभेसाठी डॉ.अबाद जात असताना ही घटना घडली. त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या एका माजी विद्यार्थ्याचाही खून करण्यात आला आणि डॉक्टरांना श्रद्धांजली वाहणाऱ्या त्यांच्या तीन सहकाऱ्यांच्या बाबतीतही काही दिवसांनी तेच घडलं. लेखक अबाद विजनवासात गेले म्हणून बचावले. त्यानंतर सुमारे पंधराएक वर्षांनी त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केल्या.

याच पुस्तकावर आधारलेला ‘फरगॉटन वुई विल बी’ हा सिनेमा या वेळच्या इफ्फीमध्ये दाखवण्यात आला. दिग्दर्शक फरनॅन्डो त्रुबा यांच्याबरोबर डेव्हिड त्रुबा (हे स्वत: लेखक व दिग्दर्शक आहेत आणि फरनॅन्डो यांचे बंधूही) आणि स्वत: हेक्टर अबाद यांनी सिनेमाची पटकथा लिहिलीये. पुस्तकात अबाद लिहितात, ‘मी माझ्या वडिलांवर वेड्यासारखं प्रेम करायचो. त्यांच्या अंगाला येणारा गंध मला आवडायचा. ते बाहेरगावी गेले की, त्यांच्या पलंगाला येणाऱ्या त्या गंधाची आठवण मला आवडायची. मला त्यांचा आवाज आवडायचा, त्यांचे हात आवडायचे, त्यांचे कपडे आवडायचे आणि त्यांचं टापटीप असणंही आवडायचं.’ थोडक्यात, अबाद आपल्या वडिलांची अक्षरश: पूजा करत असे.

वडील निवृत्त होताहेत आणि त्यांच्या सन्मानार्थ आम्ही एक कार्यक्रम ठेवलाय, असं सांगणारा एक फोन आल्याने तरुण अबाद आपल्या घरी येतो. वडिलांच्या कौतुकाचे शब्द ऐकता-ऐकता त्याचं मन भूतकाळात जातं आणि छोट्या अबादचं अन्‌ त्याच्या वडिलांचं नातं हळुवारपणे आपल्यासमोर उलगडत जातं. डॉ.अबाद यांचं घर, त्यांची प्रेमळ बायको, त्यांच्या चार मुली आणि एक मुलगा यांच्या जगात आपण शिरतो. छोट्या अबादला वडिलांविषयी असलेलं प्रेम आपल्यालाही जाणवू लागतं.

पण थोडा वेळ जातो आणि हे सगळं फार गोड-गोड चाललंय, असं वाटायला लागतं. डॉ.अबाद हे नास्तिक आहेत. मात्र आईच्या आग्रहामुळे मुलांना कॅथॉलिक धर्माचं शिक्षण दिलं जातंय. अबादच्या मनात याविषयी असंख्य प्रश्न आहेत. वडील सांगत असलेला मानवतेचा धर्मच कसा मोठा आहे, हे त्याला पटतंय.

पण वडिलांच्या ज्या संघर्षाविषयी मुलाने बोलायला हवं, त्याविषयी सिनेमात फारसं काही येतच नाही. डॉ.अबाद हे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जातात म्हणजे नेमकं काय करतात? ते मानवी अधिकारासाठी लढतात, असा उल्लेख आहे. त्याबद्दलही सिनेमात फार प्रकर्षाने काही दाखवलं जात नाही. त्या वेळची कोलंबियामधली राजकीय-सामाजिक परिस्थिती काय होती, हे नीट उलगडत नाही. मग ही नुसतीच एका गोड मुलाच्या गोड वडिलांची गोष्ट बनून राहते. संस्कार म्हणजे केवळ अमुक करावं आणि तमुक करू नये असं सांगणं नाही; तर आपल्या वागण्यातून आपल्या मुलांवर ते घडवायचे असतात, हे तत्त्व डॉ. आबाद आपल्या आयुष्यात पाळतात त्याची गोष्ट वाटते. आपल्या तत्त्वांसाठी मृत्यूला सामोरं जाण्याची तयारी असलेल्या तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्याची गोष्ट बनत नाही. किंबहुना, ही दोन्ही वैशिष्ट्यं ज्याच्या ठायी आहेत, त्या असामान्य व्यक्तिमत्त्वावरचा सिनेमा आपण पाहतोय असं वाटतच नाही.

मधल्या काळात वडील आणि मुलामध्ये दुरावा निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. त्यामागचं कारणही स्पष्टपणे समोर येत नाही. वडिलांवर जीवापाड प्रेम करणारा, त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकणारा, त्यांच्यासारखं बनू पाहणारा मुलगा त्यांच्याशी फटकून का वागू लागलाय याची संगती लागत नाही. तरुण अबादच्या हातून अपघात होतो, तेव्हाचं त्याच्या वडिलांचं वागणं तर त्यांच्या आदर्शवादी स्वभावाला छेद देणारं वाटतं. एक चांगला सिनेमा बनता-बनता राहून गेला, हीच भावना मग मनात घर करून राहते. आपल्यासाठी प्राण देणाऱ्या आपल्या नायकांना आपण विसरता कामा नये, हे दिग्दर्शकाचं म्हणणं मात्र पटल्याशिवाय राहत नाही.

0

‘अनदर राऊंड’ ही तीन मध्यमवयीन मित्रांची गोष्ट आहे. दिग्दर्शक आहेत थॉमस व्हिंटरबर्ग. या सिनेमाचं डॅनिश शीर्षक आहे ‘ड्रक’- ज्याचा अर्थ सतत दारू पिणं असा होतो. स्वाभाविकच हा सिनेमा या मित्रांच्या दारू पिण्याविषयी आहे, त्या बाबतीतल्या त्यांनी केलेल्या प्रयोगाविषयी आहे, त्यामुळे त्यांच्यात घडलेल्या बदलाविषयी आहे. त्यातला फोलपणा जाणवण्याविषयी आहे आणि एकूणच मद्यपानाच्या डॅनिश संस्कृतीविषयीही आहे.

मार्टिन, टॉमी, पीटर आणि निकोलाज हे चौघे शाळेत शिक्षक आहेत. इतिहास, खेळ, संगीत आणि सायकॉलॉजी असे चार विषय ते शिकवताहेत. मार्टिनच्या इतिहासाच्या तासाला विद्यार्थी अत्यंत कंटाळून जात असतात. तीच गोष्ट इतर तिघांची. आपण वयस्क होऊ लागलो आहोत, आपल्यातला जोश आणि ताकद कमी होऊ लागलीये, या विचाराने मार्टिन अस्वस्थ आहे. बायकोबरोबरचं त्याचं नातं तुटतंय, पालकांनी तक्रार केल्यामुळे शाळेतली नोकरी धोक्यात आलीये. कोणे एके काळी आपण जॅझ नर्तक होतो, हे तर तो पूर्णपणे विसरलाय. पाठीच्या दुखण्यामुळे ते आठवूनही काय करणार म्हणा!

अशातच निकोलाज एक दिवस एक वेगळीच थिअरी मांडतो. आवश्यकतेपेक्षा कमी दारू आपल्या शरीरात जात असल्यामुळे हे घडतंय, असा त्याचा दावा असतो. त्याच्या मनात एक प्रयोग करायचा असतो. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळात ठरावीक प्रमाणात दारू प्यायची. रात्री आठनंतर मात्र दारूला स्पर्शही करायचा नाही. हो-नाही म्हणत इतर तिघेही या प्रयोगात सहभागी व्हायला होकार देतात आणि थेट शाळेत वर्ग घेण्याआधी दारूचे घुटके मारू लागतात.

आपली कामगिरी सुधारते आहे, असं अचानक चौघांच्याही लक्षात येतं. विन्स्टन चर्चिलच्या दारूबाजपणाचे आणि ॲडॉल्फ हिटलर कसा दारूला स्पर्शही करत नसे याचे किस्से सांगून मार्टिन आपल्या विद्यार्थ्यांना इतिहासामध्ये रमवू लागतो.

पण अमुक इतक्या प्रमाणात दारू प्यायची, हा निश्चय हळूहळू ढासळू लागतो. दारूमुळे आपण अधिक चांगलं काम करू लागलोय, हे लक्षात आल्याने दारूचं प्रमाण आपोआप वाढू लागतं. चौघेही मित्र शाळेत दारू पिऊन येऊ लागतात. एखादा चालताना अडखळू लागतो. इतर शिक्षकांना लपवून ठेवलेल्या दारूच्या बाटल्या मिळू लागतात. आणि एक जण तर थेट आपल्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी आत्मविश्वास यावा म्हणून दारू पिऊन तोंडी परीक्षेला जाण्याचा सल्ला देतो. परिस्थिती स्वाभाविकच हाताबाहेर जाऊ लागते आणि एका मोठ्या शोकांतिकेने या मित्रांचं आयुष्य हादरतं.

दिग्दर्शकाने छोट्या-छोट्या प्रसंगांमधून विविध नात्यांविषयी भाष्य केलंय. खेळात गती नसलेला एक मुलगा आपल्या शिक्षकाचा हात हळूच पकडून आधार मिळवू पाहतो, वेगळ्या झालेल्या बायकोला परत बोलावण्यासाठी मार्टिन कसे प्रयत्न करतो, आपल्या तीन लहान मुलांना सांभाळताना निकोलाजची कशी त्रेधा उडते- हे पाहताना आपण कधी हसतो, तर कधी या चार नायकांविषयी कणवही वाटते. मात्र इतर कोणत्याही नात्यापेक्षा इथे महत्त्वाचं आहे मैत्रीचं नातं. एकमेकांच्या सुख-दु:खात एकमेकांना साथ देणाऱ्या चार मित्रांचं नातं.

सिनेमा पाहताना काही प्रश्न मनात येतात, नाही असं नाही. दारू प्यायला लागताक्षणी चौघांच्याही शिकवण्यात इतका फरक कसा पडतो, असं अगदी स्वाभाविकपणे वाटतं. पण या चारही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नटांच्या अभिनयाची ताकद एवढी आहे की, हे प्रश्न तुम्हाला सिनेमात गुंतण्यापासून दूर ठेवू शकत नाहीत. या चौघांचं दारूत बुडत जाणं आणि त्यामुळे आयुष्य बरबाद होऊ लागणं हेही किंचित भडकपणे आल्यासारखं वाटतं. पण पुन्हा त्यामुळे गोष्टीत रमणं कमी होत नाही. आणखी एक गोष्ट जाणवते. इथे कोणी दारू पिणं सोडत नाही किंवा एक मोठी शोकांतिका घडूनही दारू कशी वाईट हे सांगत नाही. जे घडतं ते आपल्यामुळे घडतं, आपण घेत असलेल्या निर्णयांमुळे घडतं याची स्पष्टता दिग्दर्शकाच्या मनात आहे, हे नक्की जाणवतं. ‘अनदर राऊंड’ एक चांगला सिनेमा पाहिल्याचं समाधान निश्चितच देतो.

0

‘ॲपल्स’ या ग्रीसच्या सिनेमानेही हे समाधान दिलं. इथेही एका किंचित वयस्क पुरुषाची गोष्ट आहे. पण त्याला कुणी मित्र नाहीत- किंबहुना, त्याच्या एकटेपणाचीच ही गोष्ट आहे.

दिग्दर्शक ख्रिस्टॉस निको यांनी हा सिनेमा केला तेव्हा तो एका महामारी अनुभवत असलेल्या जगात प्रदर्शित होणार आहे, याची त्यांना कल्पना होती की नाही माहीत नाही; पण ‘ॲपल्स’मध्येही एक महामारी आहे. इथे कुठल्या तरी रोगामुळे लोकांना विस्मरण होऊ लागलंय. म्हणजे एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर आपण कोण आहोत, कुठे आहोत, काय करतोय- हे सगळं ते विसरून जातात. स्वत:ची पूर्ण ओळख पुसून गेलेली असते. अशा वेळी शहरांमध्ये त्यांच्या पुनर्वसनासाठी हॉस्पिटल्स उघडली जातात, काही ठोस कार्यक्रम आखले जातात. म्हणजे, काही ठरावीक दिवसांमध्ये आपलं जवळचं कुणी हरवलंय म्हणून शोधत येणाऱ्या नातेवाइकांची वाट बघितली जाते. पण तसं कुणीच आलं नाही तर या लोकांना नवी ओळख दिली जाते. काही टास्क्स करायला सांगितलं जातं. उदाहरणार्थ- नायकाला एक दिवस सायकल चालवायला सांगितलं जातं. एक दिवस कॉस्च्युम पार्टीला जायची सूचना असते. अपरिचितांशी मैत्री करण्याचा सल्ला दिला जातो. या सगळ्याचे फोटोही काढून ठेवायचे असतात- नव्या आठवणी निर्माण करण्यासाठी. इतकंच नाही, तर आज बारमध्ये एका मुलीला भेट, बाथरूममध्ये तिच्याबरोबर सेक्स कर आणि तिचा निरोपही न घेता निघून ये- अशा प्रकारचा टास्कही असतो. थोडक्यात, हळूहळू एक संपूर्णपणे वेगळी व्यक्ती म्हणून त्यांना जगायला शिकवलं जातं.

हे घडतं ते आजच्या काळातलं नसावं, कारण सिनेमातल्या व्यक्तिरेखांकडे सर्रास सेलफोन्स दिसत नाहीत. सोशल मीडियाचा संदर्भ येत नाही. आपला भूतकाळ विसरलेल्या या माणसांना ‘उद्या तुम्ही अमुक गोष्ट करणार आहात,’ असं सांगणाऱ्या चिठ्ठ्या दिल्या जातात किंवा टेप्स असतात. घरात लँडलाइन्स दिसतात आणि त्यांचा वापरही होताना दिसतो. फोटो काढताना पोलरॉईड कॅमेऱ्याचा उपयोग केला जातो, फोनचा नाही.

सिनेमाचा नायकही आपली ओळख विसरलाय. म्हणजे एका सकाळी तो फुलांचा गुच्छ घेऊन घरातून बाहेर पडतो आणि बसमध्ये बसतो. बसचा शेवटचा स्टॉप येतो तेव्हा तो आपल्याला कुठे जायचंय, ही फुलं आपल्या हातात का आहेत आणि मुळात आपलं नाव काय आहे, आपण कोण आहोत- हेच विसरून गेलेला असतो. त्याला हॉस्पिटलमध्ये आणतात, त्याच्यावर उपचार होऊ लागतात. पण त्याला काहीही आठवत नाही. त्यातून त्याला घेऊन जाण्यासाठी कुणी नातेवाईकही येत नाही. हॉस्पिटलमधले एक न्युरो सर्जन आणि त्यांची सहकारी डॉक्टर त्याला मग एका घरी घेऊन जातात. आता त्याने तिथेच राहायचं असतं, तिथेच जगायचं असतं आणि सांगितलेले टास्क पूर्ण करायचे असतात.

त्याच्याचसारखी आणखी एक बाई त्याला भेटते. दोघांमध्ये मैत्री होऊ लागते. आपले टास्क्स पूर्ण करण्यासाठी ती त्याची मदत घेते. पण ही मैत्री सांगितलेल्या टास्कनुसार होतेय, हे त्याच्या लक्षात येतं आणि त्यातला फोलपणा त्याला जाणवतो. आपल्या या नायकाला सफरचंदं खूप आवडत असतात. भूतकाळामधली तेवढी एकच गोष्ट त्याच्या आयुष्यात राहिलेली असते. मात्र, सफरचंदामुळे मेंदू तल्लख होतो, स्मरणशक्ती चांगली होते हे कळल्यावर तो ताबडतोब सफरचंद खाणं थांबवतो आणि बाजारातून संत्री आणू लागतो. 

या नायकाच्या मनात नेमकं काय चाललंय, हे आपल्याला कधीच कळत नाही. दिग्दर्शक केवळ त्याच्या बाह्य स्वरूपावर लक्ष केंद्रित करतो. पुरावा म्हणून या सगळ्यांना ते जे-जे करतात त्याचा फोटो काढून ठेवणं आवश्यक असतं. आज सोशल मीडियाच्या काळात फोटो काढण्यासाठी बहुधा आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. किंबहुना, फोटो काढून तो पोस्ट केला नाही तर तो अनुभव जणू काही आपण जगलोच नाही, अशी आपली भावना असते.

‘ॲपल्स’ हा काही वास्तववादी सिनेमा अजिबातच नाही. पण तो पाहताना आजच्या जगण्यातल्या किती तरी गोष्टींशी त्याचं नातं असल्याचं लक्षात येतं. चांगल्या सिनेमाचं हेही एक वैशिष्ट्य म्हणायला हवं.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके