डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

समृद्ध करणारा अनुभव (कान चित्रपट महोत्सव)

दि.11 ते 22 मे असा तब्बल बारा दिवस चालणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट- महोत्सवाची सांगता मोठ्या धडाक्यात झाली. आणि या महोत्सवाला इतका मान का आहे? आपला सिनेमा इथे निवडला जावा म्हणून जगभरातले नावाजलेले दिग्दर्शक आसुसलेले का असतात? या आणि अशा अनेक प्रश्नांची थोडी-थोडी उत्तरं मिळाली होती.

रस्त्यावरची गजबज कमी झाली होती. फिल्म बाजार जवळजवळ ओस पडला होता. कानमधल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवाचा शेवट जवळ येऊ लागला होता आणि सगळ्यांना आता उत्सुकता होती ती स्पर्धेत कोणते सिनेमे बाजी मारणार याची. मनात एक रुखरुख होती. गेले दहा- बारा दिवस आपण ज्या जगात राहत होतो ते सोडून आता परत जायची वेळ आली याची. पण तरीही या महोत्सवाने आपल्याला खूप काही दिलंय याची जाणीवही होतीच. का या महोत्सवाला इतका मान आहे? का इथे आपला सिनेमा निवडला जावा म्हणून जगभरातले नावाजलेले दिग्दर्शक आसुसलेले असतात? इतर महोत्सव आणि कान यामध्ये नेमका फरक काय आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची थोडी-थोडी उत्तरं मला या काळात मिळाली होती.

एक म्हणजे कानएवढी प्रसिद्धी जागतिक स्तरावर इतर कोणत्याही महोत्सवाला मिळत नाही. पत्रकारांसाठी असलेल्या सिनेमांच्या शोजच्या वेळेस रांगेत उभ्या असलेल्या पत्रकारांवर नुसती नजर टाकली किंवा त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या, तरी किती विविध देशांमधून हा महोत्सव कव्हर करायला पत्रकार आलेले आहेत, हे लक्षात येत होतं. आणि त्यांची संख्या दोन  हजारांवर होती, हे कळल्यावर तर धक्का बसायचा तेवढा बाकी होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पत्रकारांना हा महोत्सव आकर्षित करतो, त्याची काही कारणं आहेत. एक म्हणजे, अर्थातच कानला मिळालेलं ग्लॅमर आणि इथलं रेड कार्पेट. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते इथे निवडले जाणारे सिनेमे. कानचे आर्टिस्टिक डिरेक्टर थिअरी फ्रेमॉ यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटलंय त्याप्रमाणे- ‘आम्ही जे 50 सिनेमे निवडतो, त्यामधून सिनेमाचे सगळे पैलू दिसतील याची काळजी आम्ही घेतो. त्यात तरुण दिग्दर्शक असतात, जुने असतात, पुरुष असतात, स्त्रिया असतात; पाश्चात्त्य दिग्दर्शकांबरोबरच आशियाई, लॅटिनो असतात. इथे सिनेमांमधले प्रयोग पाहायला मिळतात आणि जुन्या पद्धतीने बनवलेले चांगले सिनेमेही निवडले जातात. या सगळ्याचं मिळून एक पॅकेज असतं. आणि ते जास्तीत जास्त परिपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असतो.’ त्यामुळे कानमधल्या अनेक सिनेमांवर नंतरचे कित्येक महिने चर्चा होत राहते.

नोव्हेंबर महिन्यात गोव्याला होणाऱ्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवामध्येही ‘ही फिल्म बघायला हवी, कानमध्ये खूप गाजलीये ती’ किंवा ‘कानमध्ये या सिनेमाला दोन अगदी टोकाच्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या,’ अशा प्रकारची विधानं  हमखास ऐकायला मिळतात. कानमध्ये हॉलीवुडचे सिनेमे मोठ्या प्रमाणावर येऊ लागलेले असले, तरी प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये त्यांतले फारच थोडे शिरकाव करू शकतात. बाकीचे ‘आऊट ऑफ कॉम्पिटिशन’च असतात. म्हणूनच कानमधल्या विविध स्पर्धांमध्ये केवळ निवड झाली तरी निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला आपण काही तरी मिळवलंय, असं वाटतं. (ज्याप्रमाणे ऑस्करचं नॉमिनेशन मिळणं हे हॉलीवुडसाठी मानाचं मानलं जातं, तसंच). ही गुणवत्ता कानला तिची प्रतिष्ठा मिळवून देते. मे महिन्यात होणारा हा महोत्सव मग पुढे वर्षभर जगभरात होणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी पायंडा पाडून ठेवतो.

कानचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, पण ते सिनेमाबाह्य आहे. फ्रान्समधल्या समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या या टुमदार शहरात होणारा हा महोत्सव आपण फ्रेंच लोकांच्या सहवासात आहोत याची जाणीव आपल्याला जराही विसरू देत नाही. उदाहरणार्थ- महोत्सवामधल्या सगळ्या बिगरफ्रेंच सिनेमांची मुख्य सबटायटल्स ही फ्रेंच भाषेत असतात. पडद्याच्या खाली एक आयत असतो, ज्यावर इंग्लिश भाषेतली सबटायटल्स येतात. (बर्लिन महोत्सवामध्येही जर्मन सबटायटल्स यायची, पण एरवी सगळीकडे केवळ इंग्लिश सबटायटल्सच असतात) आपल्याकडे हिंदीमध्ये सबटायटल्स असावीत, असा विचारही कोणी केलेला नसेल. जागतिक सिनेमा बघणाऱ्या सगळ्यांना इंग्लिश येतच असणार, असं आपण अगदी गृहीत धरलंय. हिंदीमुळे किंवा स्थानिक भाषांमुळे हा सिनेमा जास्त लोकांपर्यंत नाही का पोचू शकणार? (अर्थात, यातलं आर्थिक गणित मला माहीत नाही, हे इथे कबूल करायलाच हवं.)

आणखी एक गंमत. महत्त्वाच्या सिनेमांच्या स्क्रीनिंगच्या आधी त्या सिनेमाची ओळख करून दिली जाते, दिग्दर्शक-कलावंत व तंत्रज्ञ स्टेजवर येतात, आपल्या सिनेमाविषयी बोलतात. आजवर मी जेवढ्या महोत्सवांना गेले आहे तिथे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला हे काम दिलेलं असतं आणि सिनेमाविषयी फारसं काहीही माहीत नसलेली तरुण मुलं-मुली ते करतात (इफ्फी असेल किंवा मामि असेल किंवा अगदी पिफ असेल; ही मुलं ज्या काही आंग्लाळलेल्या ॲक्सेंटमध्ये बोलतात, ते अगदी नको वाटतं). कानला ही ओळख स्वत: थिअरी फ्रेमॉ करून देतात. ते स्टेजवर येताक्षणी टाळ्यांचा कडकडाट होतो. त्यावरूनच लक्षात येतं की, हा माणूस फ्रान्समधल्या सिनेरसिकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मग ते बोलायला सुरुवात करतात. प्रेक्षकांमधून हास्याचे फवारे येतात. त्यावरून लक्षात येतं की, हा माणूस विनोद करतोय. आपल्याला समजत काहीच नाही, कारण तो फ्रेंचमध्ये बोलत असतो.

बरं, तो जे बोलतो ते इंग्लिशमध्ये भाषांतरित होतच नाही. इतकंच नाही, एखाद्या रशियन दिग्दर्शकाशी तो फ्रेंचमध्ये बोलतो. ते रशियनमध्ये भाषांतरित होतं. मग रशियन दिग्दर्शक रशियनमध्ये उत्तर देतो. ते फ्रेंचमध्ये भाषांतरित होतं. प्रेक्षक टाळ्या वाजवतात. आपणही वाजवतो. आणि मग मनात येतं, हा कुठला माज या फ्रेंच लोकांना? आंतरराष्ट्रीय महोत्सव तुम्ही आयोजित करता, अनेक भाषिक दिग्दर्शकांबरोबरच मुख्य प्रवाहातल्या हॉलीवुडचा ग्लॅमरसाठी उपयोग करून घेता, जगातून या महोत्सवाला लोक हजेरी लावतात याचा अभिमान बाळगता; पण बाकीचे व्यवहार केवळ आपल्या स्वत:च्या भाषेत करता!

कानचं फिल्म मार्केटही विशेष आहे. या वर्षी मार्केटचे 11,900 बॅजेस वाटले गेले. अनेक सिनेमांचे शोज इथे केले गेले. आंतरराष्ट्रीय स्तरावर वितरणाविषयी चर्चा झाल्या. एवढं मोठं मार्केट दुसऱ्या कोणत्याही महोत्सवामध्ये बघायला मिळत नाही, असं जगभरातल्या अनेक महोत्सवांना जाणाऱ्या काही तज्ज्ञांनी सांगितलं. याच मार्केटमध्ये एक अख्खाच्या अख्खा बूथ होता शॉर्ट फिल्म सेंटरचा. या भल्या मोठ्या बूथमध्ये तरुण मुलांची ये-जा सतत चालू होती. जवळपास दोन हजार शॉर्ट फिल्म्स या वेळी कानमध्ये आल्या होत्या. त्यांपैकी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या स्पर्धेमध्ये होत्या, पण म्हणून बाकीच्या फिल्म्स बघण्याची सोय आयोजकांनी केलेली होती.

या शॉर्ट फिल्म सेंटरवर पन्नासहून जास्त उघड्या केबिन्स होत्या, ज्यात टीव्ही आणि इयर फोन्स होते. तुम्ही जायचं, तुमच्या बॅजवर असलेल्या नंबरने लॉग ऑन करायचं आणि तुम्हाला हवी ती फिल्म पहायची. छोट्या-छोट्या पाच मिनिटांच्या फिल्म्स पाहा, नाही तर अर्ध्या तासाच्या दोन पहा. तासभर कुणीही तुम्हाला त्रास देत नाही. मग मात्र रांगेत उभ्या असलेल्या इतरांसाठी तुम्हाला जागा रिकामी करून द्यावी लागत होती. सत्यजित रे टेलिव्हिजन अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधल्या सौरव रायची 28 मिनिटांची स्पर्धेत निवडली गेलेली ‘गुँड’ ही फिल्म मी अशीच पाहिली. लहानपणीच्या तुटक-तुटक आठवणींवर आधारलेली आसामी भाषेतली ही फिल्म आपल्याला  अजय या दहा-बारा वर्षांच्या मुलाच्या जगात घेऊन जाते. कधी त्याला आईबरोबर शेतात घालवलेला दिवस आठवतो, कधी आईने शिट्टी वाजवायला शिकवायचा केलेला प्रयत्न, कधी वडिलांचं वस्सकन अंगावर ओरडणं, कधी आजीबरोबरचा नाच, कधी शाळेत मिळालेली शिक्षा, तर कधी गोठ्यातल्या गाईला आईची काळजी घेण्याची केलेली विनंती, गावात असलेलं लष्कराचं वास्तव्य आणि त्या अशांततेचा भाग बनलेले गावकरी... अशा अनेक आठवणींमधून आपण अजयच्या बालपणात डोकावतो.

आणि आता, पारितोषिकांविषयी. कोणत्याही स्पर्धेत होतो त्याप्रमाणे इथेही अर्थातच ज्या सिनेमांना बक्षिसं मिळाली, त्यांविषयी काहींनी नाराजीचे सूर काढले आहेत. कानसारख्या महोत्सवामध्ये स्पर्धेत इतके चांगले-चांगले सिनेमे असताना ज्युरींनी नेमका त्यातला सर्वसाधारण सिनेमाच का निवडला, असे वाद महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पारितोषिकं जाहीर होत असताना प्रेस रूममध्ये तावातावाने होत होते. ब्रिटिश दिग्दर्शक केन लोआच यांच्या ‘आय, डॅनिअल ब्लेक’ या सिनेमाला प्रतिष्ठेचा पाम ए दोअ (गोल्डन पाम) पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जर्मनीच्या ‘टोन एर्डमन’चा विचार होणं आवश्यक होतं, असं काहींचं मत होतं. कुणाला ‘ॲक्वेरियस’ नावाचा ब्राझीलचा सिनेमा खूप आवडला होता, तर कुणी ‘एल’ या डच सिनेमाविषयी बोलत होतं. केन लोआच यांचं हे दुसरं पाम ए दोअ. त्यांना 2006 मध्ये ‘द विंड दॅट शेक्स द बार्ले’ या सिनेमासाठी हा सन्मान मिळाला होता. यामुळे लोआच आता मायकेल हॅनेके, बिली ऑगस्ट, डार्डेन बंधू आणि फ्रान्सिस फोर्ड कपोला या दिग्दर्शकांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.

झेवियर दोलान यांना ‘इट्‌स ओन्ली द एन्ड ऑफ द वर्ल्ड’ या सिनेमासाठी ग्रां प्री जाहीर झाल्यावर तर प्रेस रूममध्ये ‘बूऽऽऽ’ असा आवाज घुमला. जाँ- पिअरे लेऑ यांना ऑनररी पाम ए दोअ देण्यात आलं. आज 72 वर्षांचे असलेले लेऑ फ्रान्समधले प्रसिद्ध अभिनेते आहेत. फ्रॉन्सवॉ त्रुफाँचा ‘द 400 ब्लोज’ हा त्यांचा पहिला सिनेमा. त्या वेळी ते 14 वर्षांचे होते. हा सन्मान स्वीकारताना ते म्हणाले, ‘‘58 वर्षांपूर्वी त्रुफाँने मला ‘ले 400 कू’चं स्क्रिप्ट दिलं तेव्हा जेवढा आनंद झाला होता, तितकाच आनंद आज झालाय.’’

मोरोक्कोच्या दिग्दर्शिका हौदा बेनयामिना यांच्या ‘डिव्हाइन्स’ या सिनेमासाठी त्यांना कॅमेरा ए दोअ (गोल्डन कॅमेरा) हा पुरस्कार मिळाला. पहिल्या सिनेमासाठी हे बक्षीस दिलं जातं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं पारितोषिक विभागून देण्यात आलं, ज्यावरही अनेक पत्रकार आश्चर्य व्यक्त करत होते. कानमध्ये सहसा असं होत नाही, असं म्हणत होते. ‘ग्रॅज्युएशन’ या फिनलंडच्या सिनेमाकरता दिग्दर्शक क्रिस्तियान मुन्गुई यांच्याबरोबर फ्रेंच दिग्दर्शक ऑलिव्हिए असायास यांना ‘पर्सनल शॉपर’ या इंग्लिश सिनेमासाठी हा पुरस्कार दिला गेला. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला असगर फरहादी यांच्या ‘द सेल्समन’चा नायक शाहाब होसेनी, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली ‘मा रोझा’ या फिलिपिनो सिनेमाची नायिका जॅकलीन योसे. सर्वोत्कृष्ट पटकथेचं पारितोषिक असगर फरहादी यांना ‘द सेल्समन’साठी मिळालं. ज्युरींनी अँड्रिआ अर्नोल्डला ‘अमेरिकन हनी’साठी पुरस्कार दिला, तर सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म ठरली ‘टाइमकोड’.

कानहून परत येताना या आणि अशा आणखी काही सिनेमांची शिदोरी माझ्यासोबत होती. त्याखेरीज तिथे भेटलेल्या विविध देशांमधल्या माणसांशी झालेल्या गप्पांचा साठाही होता. महोत्सवाच्या आयोजनामध्ये असलेली सफाई लक्षात राहिली होती. लोकांमध्ये असलेल्या शिस्तीचं कौतुक वाटत होतं. एवढा प्रचंड समुदाय जमलेला पण कधीही कोणताही अनुचित प्रकार नाही, की ताणाताणी नाही, की वादावादी नाही. पोलिसांनी सांगितलं- या रस्त्याने जायचं नाही, की एकही माणूस तिथे फिरकायचा नाही. थिएटर फुल्ल झालं असं सांगितलं गेलं की, तासभर रांगेत उभे राहिलेले सगळे निमूट आपापल्या मार्गाने निघून जायचे. कुणी हुज्जत घालताना दिसलं नाही. सिक्युरिटीवाले प्रत्येकाला हसून ‘बॉनज्युं’ म्हणत, चेकिंग केल्यानंतर ‘मेर्सी’ म्हणून आत जायला सांगत, पण नियमाच्या विरुद्ध वागताना कुणीही दिसलं नाही. बरोबरच्या सहकाऱ्यांशी याबाबत गप्पा मारताना मी पुढच्या वर्षी कसं प्लॅनिंग करायचं, हे बोलू लागले आणि लक्षात आलं- अरेच्चा, पुढच्या वर्षी पुन्हा कानला यायचं आपण मनातल्या मनात पक्कं करून टाकलंय!

Tags: लघुपट फिम्स चित्रपट सिनेमा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कान फिल्म फेस्टिवल कान चित्रपट महोत्सव मीना कर्णिक Short Films France French Films Cinema International Film Festivals Kaan Film Festival Meena Karnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके