डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या वर्षीच्या कान चित्रपट महोत्सवाला उपस्थित राहून सात लेखांची मालिका मला साधनासाठी लिहिता आली, त्या मालिकेतील हा शेवटचा लेख. या लेखांमधून जागतिक सिनेमातील काही महत्त्वाच्या सिनेमांकडे लक्ष वेधता आले. ब्रिटन, रूमानिया, स्पेन, इराण या देशांनंतर आता रशिया आणि फिनलंडच्या दिग्दर्शकांना भेटू या. मुख्य स्पर्धेत नसलेल्या, अत्यंत भिन्न अशा दोन सिनेमांविषयी-  

‘उचेनिक’चं इंग्लिश भाषांतर ‘द स्टुडंट’ असं केलंय, तर फ्रेंचमध्ये या सिनेमाचं नाव ‘ल डिसायपल’ असं आहे. विद्यार्थी व अनुयायी असे या दोन शब्दांचे दोन अर्थ आहेत आणि हा सिनेमा पाहिल्यानंतर फ्रेंच भाषांतर अधिक योग्य आहे, असं वाटतं. 

दिग्दर्शक किरील सेरेब्रेनिकॉव्ह या रशियन दिग्दर्शकाचा हा सिनेमा अनेक प्रश्न निर्माण करतो. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्यापाशी आहेत, असा दावा अजिबात करत नाही. मात्र, ‘प्रोव्होकेशन फॉर द सेक ऑफ प्रोव्होकेशन इज बोअरिंग अँड यूसलेस, इट शूड बी बॅक्ड बाय सेन्स,’ या त्याच्या म्हणण्याचा प्रत्यय त्याचा सिनेमा पाहताना वारंवार येतो.

व्हेनिआमिन या तरुण विद्यार्थ्याची ही गोष्ट आहे. हा मुलगा अस्वस्थ आहे. वडील नाहीत, आई सतत त्याची काळजी करणारी. आपला मुलगा शामळू आहे का, पोहण्याच्या क्लासमध्ये तो कपडे काढत नाही म्हणजे त्याला सेक्सविषयी काही प्रॉब्लेम आहे का- इथपासून ते तो ड्रग्स घेतोय का इथपर्यंत तिच्या शंका-कुशंका झेप घेताहेत. या मुलाचं काही तरी बिघडलंय. काय, ते दिग्दर्शक आपल्याला थेट सांगत नाही. पण आपल्या प्रश्नांची उत्तरं तो बायबलमध्ये शोधायला लागतो आणि अचानक बायबलमध्ये जे लिहिलंय ते सगळं आजच्या काळातही जसंच्या तसं स्वीकारायला हवं, असा अट्टहास करू लागतो. 

आपल्या आईला, वर्गातल्या मुला-मुलींना, शिक्षकांना प्रश्न विचारू लागतो. पोहताना मुलींनी बिकिनी घालायलाच हवी का? शाळेमध्ये लैंगिक शिक्षण का द्यायचं? सायन्सच्या वर्गात उत्क्रांतीची थिअरी शिकवणं का आवश्यक आहे? बरं, केवळ प्रश्न विचारून तो थांबत नाही; हे सगळं का करू नये याची कारणं बायबलमधले उतारे वाचून सांगू लागतो. समोरच्यांना अनेकदा निरुत्तर करू लागतो. त्याचं हे वेड दिवसेंदिवस वाढत जातं. त्याला तितक्याच समर्थपणे उत्तर देणारी एकच व्यक्ती असते. शाळेतली जीवशास्त्राची शिक्षिका एलेना. 

व्हेनिआमिन आणि एलेना यांच्यातलं हे द्वंद्व आहे. धर्म विरुद्ध सायन्स असा हा वाद आहे. इथे केंद्रस्थानी बायबल असलं, तरी या दोघांमधले संवाद ऐकताना आपल्याला आपण ओळखीचं काही तरी ऐकतोय, असं वाटत राहतं. जगभरातले धर्मांध ज्या पद्धतीने आपल्या धर्मग्रंथांचा आग्रह धरतात, त्यासाठी आधुनिकतेला धि:कारतात, आपल्या विचारांना नव्या शोधांच्या आधारे पारखू इच्छित नाहीत; हे सगळं आपणही आपल्या अवतीभोवती अनुभवत असतोच की! 

धर्माविषयी बोलताना सेरेब्रेनिकॉव्हने आपल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलंय, ‘‘धर्माच्या जोडीने वेदना आणि दु:ख येतंच. कोणे एके काळी धर्म म्हणजे प्रेम होतं. पण आपल्या आयुष्यात, आपल्या जगात आता तसं राहिलेलं नाही. आता धर्म  म्हणजे वेगवेगळ्या देशांविषयी आक्रमकपणे गैरसमज करून घेण्याचा मुद्दा बनलाय. दहशतवाद आणि विभाजनवाद यांचा मुद्दा बनलाय. हे भयानक आहे.’’ 

या अतिरेकीपणाचे काय परिणाम होऊ शकतात, हे दिग्दर्शक या सिनेमातून दाखवतो- कोणताही मुलामा न चढवता. धर्मांधतेला तपासून पाहताना आजच्या रशियन समाजावरही तो झोत टाकतो. एका बाजूला कम्युनिझम आणि दुसऱ्या बाजूला प्रतिगामी समाज. पण हा सिनेमा केवळ दोन व्यक्तींमधल्या संघर्षावरच भाष्य करत नाही; त्याच्याबरोबरीने शाळेतलं राजकारण, वर्गातल्या एका मुलीला असलेलं व्हेनिआमिनविषयीचं आकर्षण, एका अपंग मुलाचं व्हेनिआमिनच्या नादी लागणं आणि या विद्यार्थ्याचा हिंसेकडे होणारा प्रवास अशा अनेक नाट्यमय घटना या सिनेमात आहेत. त्यामुळे दोन आत्यंतिक विरोधी विचारांमधलं द्वंद्व इतकाच हा सिनेमा सीमित राहत नाही, त्यापलीकडे माणसांमधल्या नात्यांचाही वेध घेतो. 

रोजच्या आयुष्यात माणसं एकमेकांना कशी मॅन्युप्युलेट करत असतात याची झलक दाखवतो. माणसामधली गडद बाजू समोर आणत असतानाच व्यक्तिगत जिद्दीची आणि कन्व्हिक्शनचीही गोष्ट सांगतो. हे सगळं इतकं थेट आहे की, दाण्‌कन ते आपल्यावर आदळतं. दिग्दर्शक जणू आपल्याला प्रोव्होक करत असतो. सिनेमातली अनेक दृश्यं ही सर्वसाधारण सिनेमामध्ये असतात त्यापेक्षा मोठी आहेत. परिणामी, त्यात वास्तवता येते. किरील सेरेब्रेनिकॉव्ह हा मूळचा थिएटरचा दिग्दर्शक असल्याचाही कदाचित तो परिणाम असेल. 

‘उचेनिक’ हा सिनेमा जर्मन नाटककार मारियुस वॉन मायेनबर्ग यांच्या ‘मार्टर’ (शहीद) या अलीकडच्याच नाटकावर आधारलेला आहे. वादग्रस्त विषय घेणं सेरेब्रेनिकॉव्हला आवडत असावं. (त्याचं एक नाटक सध्या चालू आहे, ज्यात दोन तास संपूर्ण नग्न असे वीस कलाकार पुरुष आणि स्त्रिया स्टेजवर अभिनय करतात). त्याचं नाव प्रकाशझोतात आलं ते 2000 मध्ये त्याने ‘प्लॅस्टिसिन’ नावाचं व्हॅसिली सिगारेव्ह या लेखकाचं नाटक केलं तेव्हा. एका टीनएज मुलावर गँग रेप होतो, असा तो विषय होता. 

रशियन थिएटरसाठी हा विषयच धक्कादायक होता. सेरेब्रेनिकॉव्हने नाटक, सिनेमा याबरोबरच टेलिव्हिजनवरही काम केलंय. म्युझिक व्हिडिओज दिग्दर्शित केले आहेत  आणि डॉक्युमेंटरीजही बनवल्या आहेत. ‘प्लेइंग द व्हिक्टिम’ किंवा ‘युरीज डे’ हे चित्रपट महोत्सवांमधून गाजलेले त्याचे काही सिनेमे. ‘प्लेइंग द व्हिक्टिम’ त्याने नाटक म्हणूनही केलं आणि सिनेमा म्हणूनही. ‘उचेनिक’ची कथाही पडद्यावर येण्याआधी स्टेजवर आलीये. नाटकातले काही कलाकार सिनेमातही आहेत. सिनेमाचं नाव आधी ‘(म्यु)चेनिक’ असं असणार होतं. म्युचेनिक म्हणजे मार्टर आणि उचेनिक म्हणजे अनुयायी किंवा विद्यार्थी. हा अनुयायी आपल्याला अस्वस्थ करतो, एवढं नक्की. 

हा सिनेमा पाहण्यासाठी https://www.youtube.com/watch?v=toj5lQHgXuQ या लिंकवर क्लिक करा.

‘द हॅपिएस्ट डे इन द लाईफ ऑफ ओली माकी’ हा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा सत्यघटनेवर आधारलेला आहे. फिनलंड म्हणजे अकी करुस्माकी या दिग्गज दिग्दर्शकाचा देश. या सिनेमाचा दिग्दर्शक युहो कुओस्मानेन अर्थातच अगदीच नवोदित दिग्दर्शक आहे. पण तरीही त्याने केलेला प्रयत्न करुस्माकीची थोडीशी आठवण करून देतो. बॉक्सिंगसारख्या विषयावर काही पहिल्यांदाच आलेला हा सिनेमा नाही. या आधी हा विषय हाताळला गेलाय. त्यातले ‘रेजिंग बुल’सारखे काही सिनेमे तर आयुष्यभर लक्षात राहावेत असे आहेत. मात्र, ‘द हॅपिएस्ट डे इन द लाईफ ऑफ ओली माकी’ आजवरच्या या सगळ्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. केवळ मांडणीमध्येच नाही, तर दृष्टिकोनाच्या बाबतीतही. 

बॉक्सिंग आणि या क्रीडाप्रकाराशी जोडलं गेलेलं जग असेल किंवा प्रत्यक्ष हा खेळ खेळणारा बॉक्सर असेल- दिग्दर्शकाला फक्त एका बॉक्सरची गोष्ट सांगायची नाहीये. त्याला बॉक्सिंग करणाऱ्या ओली माकी नावाच्या एका मुलाची व्यक्तिरेखा उलगडून दाखवायची आहे. तीही अत्यंत साधेपणाने, सरळसोट पद्धतीने. ना काही क्लृप्त्या, ना तांत्रिक बाबींना वरचढ होऊ देणं. आता, आजच्या काळात ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा करणं हीच कोणाला क्लृप्ती वाटत असेल, तर गोष्ट वेगळी. पण ज्या काळातली गोष्ट हा सिनेमा सांगतो आणि ज्या पद्धतीने सांगतो, त्यासाठी त्याचं ब्लॅक अँड व्हाईट असणंच योग्य आहे, असं दिग्दर्शकाने का  ठरवलं असावं हे लक्षात येतं. कारण पन्नासहून जास्त वर्षांपूर्वीची घटना सांगताना त्या वेळचं जग, त्या जगातली माणसं ब्लॅक अँड व्हाईटमध्येच अधिक खरी वाटतात. 

यात छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवणारी माणसं आहेत, व्यावसायिक खेळाडू असणं म्हणजे सार्वजनिक आयुष्यात खोटं वागणं असं वाटणारी माणसं आहेत (व्यावसायिक असण्याला मार्केटिंगची जोड देण्यास हळूहळू सुरुवात होत होती, हेही आपल्या या निमित्ताने लक्षात येतं) आणि वर्तमानपत्रवाल्यांची बातमीसाठीची धडपडही आहे. यात प्रेम आहे, स्वच्छंदी वागणं आहे, राग आहे, मारामारी आहे, विनोद आहे, मैत्री आहे आणि हे सगळं साधं, सहज आलेलं आहे. 

ओली माकी या फिनलंडच्या बॉक्सिंग चॅम्पियनला 1962 मध्ये जागतिक विजेता होण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्याला अमेरिकेच्या डेव्ही मूर या व्यावसायिक बॉक्सरशी सामना करावा लागणार होता. मूर आदल्या वर्षीचा विजेता आहे आणि सलग 64 सामने त्याने जिंकलेले आहेत. तुलनेने ओलीच्या नावावर तोपर्यंत केवळ दहा व्यावसायिक सामन्यांमधलं विजेतेपद आहे. कोकोला नावाच्या छोट्याशा गावातून आलेल्या ओलीला शहरात आणलं जातं आणि मग सुरू होते त्याची विजेतेपदाच्या सामन्यासाठीची तयारी. 

पहिला टप्पा असतो वजन घटवण्याचा. ज्या गटात ओलीला ही मॅच खेळायची असते, त्यासाठी ते आवश्यक असतं. शिवाय रोजचं ट्रेनिंग, रोजचा आहार या नेहमीच्या गोष्टी असतातच. मात्र आता त्याच्या जोडीला पत्रकार परिषदा असतात, मॉडेलिंग असतं, डॉक्युमेंटरीसाठी हवेत खोटं-खोटं बॉक्सिंग करणं असतं. ओलीला हे सगळं आवडत असतं असं नाही, पण त्याचा इलाज नसतो. भरीस भर म्हणून ओली चक्क प्रेमात पडतो. ओलीचा मित्र कम मॅनेजर एलिस त्याला म्हणतोही, ‘प्रेमात पडण्यासाठी ही योग्य वेळ नाही.’ रईशा ओलीच्या गावातलीच मुलगी. त्याच्यासारखीच निर्मळ. ओलीबरोबर ती शहरात येते, मात्र ओलीच्या भोवती असलेल्या ग्लॅमरचा तिला जराही सोस नाही. किंबहुना, त्यामुळे ती बुजल्यासारखीच होते. पण आपल्या प्रियकरासमोर केवढी मोठी संधी आली आहे याची जाणीव तिला आहेच. 

ओलीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस त्याच्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस ठरणार का? सिनेमाची मांडणी हलकीफुलकी आहे. यातला संघर्षही त्याच धाटणीचा आहे आणि यातले विनोदी प्रसंगही. ओलीवर डॉक्युमेंटरी करायचं ठरतं आणि दोन माणसं सतत त्याच्या आगेमागे वावरू लागतात. एकदा कॅमेरा घेऊन ती दोघं ओली आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या लॉकर रूममध्ये शिरतात, तेव्हा सगळे मुलगे संपूर्ण नग्नावस्थेत पाण्याने मस्तीत मारामारी करत असतात. 

आणखी एका प्रसंगात ओलीला पुरुषांच्या फॅशनसाठी मॉडेलिंग करावं लागतं आणि कॅमेऱ्यासमोर तो उभा राहतो तेव्हा त्याच्या बाजूला असलेली मॉडेल त्याच्यापेक्षा खूपच उंच असते. आणि ते पाहताना आपल्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू आलेलं असतं. ओलीचं साधेपण दाखवणारा एक प्रसंग आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्याला मूरबरोबरच्या लढतीविषयी प्रश्न विचारतात, तेव्हा तो जे वाटतं ते प्रामाणिकपणे बोलून दाखवतो, ‘मी हरलो तरी एका बलाढ्य बॉक्सरकडून हरेन!’ असं बोलायचं नसतं, हे त्याच्या मनातही येत नाही. ओलीची व्यक्तिरेखा या प्रसंगांमधून अधोरेखित होते. त्यामुळे एक कटलेल्या पतंगाच्या मागे त्याचं धावणं, नागडं होऊन पाण्यात शिरणं, रईशाबरोबर सायकलवरून फिरणं यात तो जितका मोकळा वाटतो तितकाच उच्चभ्रू लोकांच्या पार्टीत अवघडलेला. 

आगामी चॅम्पियन म्हणून त्याच्या आगे-मागे करणाऱ्यांसमोर बिचकून जातो आणि मित्र असलेल्या आपल्या मॅनेजरच्या बायकोबरोबरच्या भांडणाने दु:खी होतो. या सगळ्यातूनच आपल्याला नेमकं कसं आयुष्य जगायचंय, याविषयीच्या त्याच्या कल्पना आकार घेत जातात. माणसाने महत्त्वाकांक्षी असावं, त्याच्यासमोर मोठी ध्येयं असावीत; पण त्यामागे जाताना आयुष्यातले छोटे- छोटे आनंद त्यांनी हरवू नयेत- इतकं छोटं पण थेट मनाला भिडणारं सत्य दिग्दर्शक या सिनेमाच्या निमित्ताने आपल्याला सांगून जातो.

हा सिनेमा पाहण्यासाठी https://www.youtube.com/watch?v=dfGZRD9qtPE या लिंकवर क्लिक करा.

Tags: सेरेब्रेनिकॉव्ह उचेनिक ‘द हॅपिएस्ट डे इन द लाईफ ऑफ ओली माकी’ 'The Student' - (M)uchenik आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चित्रपट परीक्षण फिनलंड द स्टुडंट उचेनिक कान मीना कर्णिक kaan finland the student international film festival meena karnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके