डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

इफ्फीमधल्या काही लक्षवेधी सिनेमांच्या मालिकेतला हा शेवटचा लेख. युद्ध संपलं तरी त्याचे परिणाम नंतरचा बराच काळ रेंगाळत राहतात याची आठवण करून देणारे दोन सिनेमे, महोत्सव संपल्यानंतरही बराच काळ मनात रेंगाळत होते... 

युध्दकथा म्हटलं की,  आपल्याला सर्वसाधारणपणे  शौर्यगाथा आठवतात. आपली बाजू जिंकणारी असली तर  अंगावर रोमांच उभे करणाऱ्या कहाण्या रंगवून सांगितल्या  जातात. त्यातलं साहस आणि जाज्वल्य देशाभिमान काय  तो महत्त्वाचा ठरतो. पण युध्द म्हणजे संहार. युध्द म्हणजे  दु:ख. आणि युध्द म्हणजे भग्न झालेली आयुष्य’ हे आपण, -विशेषत: युध्दाशी केवळ दूरवरून संबंध असणारे आपण- विसरूनच जातो का?  ‘बीनपोल’  पाहताना आपल्याला सतत या भीषण  वास्तवाची आठवण होत राहते. दोन मुलींच्या नजरेतून ही  गोष्ट सांगितलेली असली तरी पार्श्वभूमीला असलेली युध्द  संपल्यानंतरची परिस्थिती क्षणभरही नजरेआड करता येत  नाही. इतकी की काही वेळा एखादं दृश्य पाहताना अचानक  आपल्या लक्षात येतं की, आपल्यालाही कोंडल्यासारखं  वाटतंय. जे घडतंय त्याचा धक्का सहन होत नाहीये. 
    
27 वर्षांळा रशियन दिग्दर्शक कान्तेमिर बालागोव्ह याचा  हा दुसरा सिनेमा. सिनेमाचं रशियन नाव आहे ‘डिल्डा’  म्हणजेच ‘बीनपोल’.  इया नावाच्या तरुण,  पण खूप उंचपुरी  धिप्पाड मुलीला तिच्या अशा दिसण्यामुळेच बीनपोल हे  नाव पडलंय. ही गोष्ट बीनपोल आणि तिची मैत्रीण माशा  यांची आहे. काळ आहे 1945 चा. दुसरं महायुध्द नुकतंच  संपलं असलं,  रशियाने इतर मित्रराष्ट्रांच्या बरोबर हिटलरवर  विजय मिळवला असला तरी,  कोणत्याही युध्दात लागतं तसं  देशाला खूप मोठं नुकसान सहन करावं लागलंय. तरुण  सैनिकांनी हॉस्पिटल्स गच्च भरली आहेत. अशाच एका  हॉस्पिटलमध्ये बीनपोल नर्सचं काम करतेय. काही काळ  सीमेवर घालवल्यानंतर,  आजारपणामुळे तिला परत  पाठवण्यात आलंय आणि आता ती लेनिनग्राडमध्ये  स्थायिक झालीये. मात्र तिला पीटीएसडी (पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस डिसऑर्डर)शी सामना करावा लागतोय. मधेच तिचा  श्वास कोंडला जातो. ती अचानक थिजून जाते आणि मग  काही काळ तिला ना हलता येत,  ना काही करता येत. बीनपोल पाश्का नावाच्या एका मुलाचा सांभाळ करतेय. आजूबाजूच्यांना तो तिचा मुलगा आहे असं वाटत असलं  तरी प्रत्यक्षात तो माशाचा मुलगा आहे. काही काळाने  माशाही लेनिनग्राडला येते आणि बीनपोल ज्या  हॉस्पिटलमध्ये काम करत असते,  तिथेच नोकरीला लागते.
       
माशाच्या बाबतीत बीनपोल अत्यंत पोझेसिव्ह आहे.  एखाद्या पुरुषाशी ती लाडाने बोललेलंही बीनपोलला सहन  होत नाही.  मागे सुटून गेलेली आयुष्य’  जोडण्याचा प्रयत्न केवळ  बीनपोल आणि माशाच नव्हे,  तर तिथला प्रत्येकजण  करतोय. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला सैनिक,  मानेखाली पूर्णपणे अपंग आहे. पण तरीही आपल्या  प्रेयसीची वाट पाहतोय. मात्र असं मधलं सगळं विसरून पुढे  जाणं नेहमी शक्य असतंच असं नाही. किंबहुना युध्दासारखा  अनुभव घेतल्यानंतर तर कठीणच असतं.  बीनपोल आणि माशाची शोकांतिका ही त्या अर्थाने एका  उव्दस्त शहराचीही शोकांतिका आहे. दिग्दर्शक  बालागोव्ह एक क्षणही आपल्याला ते विसरू देत नाही.  दारू पीत असताना,  प्रेम करत असताना, भव्य बंगल्यात  गाडी नेत असताना... दृश्य कोणतंही असो,  पडद्यावरची  गडद छाया आपल्याला सतत जाणवत राहते. वातावरणातलं मळभ आपण आपल्या मनावरूनही दूर करू  शकत नाही. संपूर्ण सिनेमाला एक दु:खाचं आवरण आहे.  दिग्दर्शक आणि छायाचित्रकार सेनिया सेरेदा यांनी आवर्जून  त्याची काळजी घेतली आहे हे लक्षात येतं. काही काही  दृश्यं तर भयंकर अंगावर येणारी आहेत. लहानग्या पाश्काशी  खेळत असताना बीनपोलला अचानक अटॅक येतो आणि ती  निश्चिल होते ते दृश्य असो की,  केवळ मूल होण्यासाठी  सेक्स करायचा असताना मला एकटीला टाकून जाऊ नकोस  असं म्हणून बीनपोल माशाला आपल्या बाजूला झोपून  राहायला सांगते ते दृश्य असो,  प्रेक्षक म्हणून आपल्याला  धक्का तर बसतोच पण सुन्न झालेलं मन नंतरचा बराच काळ  त्या अनुभवातून बाहेर येत नाही. 
      
खरं तर हा सिनेमा काही फक्त इयाचा नाही. तो इया आणि माशा या दोघींचा आहे. तरीही सिनेमाला ‘बीनपोल’ असं शीर्षक का आहे?  दिग्दर्शक बालागोव्ह म्हणतो,  ‘माझ्या सिनेमाचं मूळ रशियन नाव आहे ‘डिल्डा’.  बीनपोल हा त्याचा अनुवाद आहे. मात्र रशियामध्ये  डिल्डामधून वेंधळेपण,  ऑकवर्ड असणं किंवा नजाकत  नसणं या गोष्टीही ध्वनित होतात. माझ्या दोन्ही नायिकांना  युध्दानंतर पुन्हा जगायला सुरुवात करणं जमत नाहीये आणि  म्हणून त्यांना डिल्डामधून सूचित होणाऱ्या तीनही भावनांशी  सामना करावा लागतोय.’  ‘द अनवुमनली फेस ऑफ वॉर’ या स्वेतलाना  ॲलेक्सेविच यांचं पुस्तक ही या सिनेमामागची प्रेरणा आहे.  बालागोव्हला युध्द आणि बायकांवर होणारा त्याचा परिणाम  याविषयी खोलवर जाणीव या पुस्तकाने करून दिली. ‘बीनपोल’ ही या वर्षीची रशियाची ऑस्करची एन्ट्री  आहे. (‘पॅरसाईट’ किंवा ‘बीनपोल’ यासारखे सिनेमे  पाहिल्यानंतर भारताने पाठवलेला ‘गलीबॉय’ हा सिनेमा  किती सुमार आहे हे लक्षात येतं. इथे ‘गलीबॉय’ला कमी  लेखण्याचा उद्देश नाही. उलट,  झोया अख्तरचा हा सिनेमा  चांगला होता,  अनेक स्टिरिओटाईप्स मोडणारा होता,  पण  आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या प्रकारचे आणि ज्या  विषयावरचे सिनेमे बनताहेत आणि पुरस्कारासाठी पाठवले  जाताहेत,  त्यांच्या दर्जाशी तुलना करता तो स्पर्धेत  राहण्याची किंचितही शक्यता नाही हे लक्षात येतं. म्हणूनच  ‘पॅरसाईट’  आणि ‘बीनपोल’ला नामांकन मिळतं, ‘गलीबॉय’ला नाही.) गेल्या वर्षीच्या कान चित्रपट  महोत्सवातल्या अनसर्तन रिगार्द या स्पर्धेत बालागोव्हला  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं पारितोषिक दिलं गेलं तर  ‘बीनपोल’ला फिप्रेसी या समीक्षकांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार दिला. 
     
हंगेरियन दिग्दर्शक क्रिस्टॉफ डॅक याचा ‘फोगल्योक’ किंवा ‘कॅपटिव्हज’ही युध्द संपल्यानंतरच्या काळातला  असला तरी ‘बीनपोल’च्या तुलनेत हलका-फुलका आहे.  या दिग्दर्शकाच्या ‘सिंग’ या लघु चित्रपटाने बेस्ट लाईव्ह  ॲक्शन शॉर्ट फिल्म या विभागात 2016 मध्ये ऑस्कर  मिळवलंय. ‘कॅपटिव्हज’ ही त्याची पहिली फिचर फिल्म  आहे. आणि ती सत्यकथेवर आधारलेली आहे.  काळ आहे 1951 चा. हंगेरीवर आता कम्युनिस्टांचं  राज्य आहे. सरकारी पोलीस सगळ्यांवर लक्ष ठेवून आहेत.  कोणाही संशयित व्यक्तीच्या घरावर धाड घालून तपास  करण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. आणि हाती असलेल्या त्या  सत्तेचा ते पूर्ण वापर करताहेत. बहुतेक वेळा हे पोलीस घरी  येतात,  घरातल्या एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी उचलून  नेतात आणि नंतर ती व्यक्ती घरच्यांना पुन्हा कधीही दिसत  नाही. स्वाभाविकच या पोलिसांची एक दहशत नागरिकांवर  आहे. कोण,  कधी,  कुठे येईल आणि कुणाला उचलून नेईल  याची काहीही श्वाश्वती नसलेल्या वातावरणात राहणं किती  भयंकर असेल! 
        
अशा परिस्थितीतला ब्युडापेस्टमधला एक दिवस. एका सर्वसामान्य कुटुंबाच्या घराचं दार ‘स्टेट सिक्रेट पोलीस’ ठोठावतात. घरात एक स्त्री आहे,  एक पुरुष आहे,  दोन  लहान मुलं आहेत. शिवाय एक खोली भाड्याने दिलीये,  तिथे राहणारी एक बाई आहे. त्यांचं एकमेकांशी असलेलं  नातं हळूहळू आपल्यासमोर येतं.  पोलीस या कुटुंबातल्या कोणालाही ताब्यात घेत नाहीत.  ते घरात शिरतात आणि या कुटुंबाला त्यांच्याच घरात बंदी  बनवतात. इतकंच नाही,  तर त्यानंतर घरी येणाऱ्या  कोणालाही घराबाहेर पडू दिलं जात नाही. घरातल्या बाईची  बहीण ती कामावर का आली नाही म्हणून तिच्या  शेजारणीच्या घरी फोन करते. शेजारीण तिला विचारायला  जाते आणि घरात अडकते. शेजारीण आता फोन उचलत  नाही,  म्हणून बहीण आपल्या प्रियकराबरोबर तिच्या घरी  जाते,  आणि तीही बंदी बनते. असं करत करत घरातली  माणसं वाढू लागतात. त्यांचं जेवणखाण,  झोपण्याची  व्यवस्था करणं इतकं सोपं नसतं. दिवस जातात तसं घरातलं  सामान संपतं. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या भुवया  उंचावू लागतात. हे पोलीस कोणाला त्रास देत नाहीत,  पण  कोणाला घराबाहेरही पडू देत नाहीत. आणि त्यांना काही  सांगतही नाहीत. यातून घरात अडकलेल्या माणसांचं  एकमेकांशी वागणं,  जुने रागलोभ उफाळून येणं,  वाद घालणं असे सगळे प्रकार होतात.  दिग्दर्शक एका गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला  दडपशाहीविषयी काही सांगू पाहतो.  मानवी नात्यांविषयी  बोलू पाहतो. आपण ज्या परिस्थितीत अडकलेलो आहोत  त्यातून सुटण्यासाठी माणसं काय करू शकतात हे दाखवू  मागतो. म्हटलं तर ही परिस्थिती मजेशीरही आहे, आणि दुसऱ्या बाजूने भीतीदायकही.
       
हिटलरच्या जुलूमातून मुक्त  झालेल्या हंगेरीच्या नागरिकांना कम्युनिस्ट रशियाची  एकाधिकारशाही सहन करावी लागतेय,  त्याविरुध्द  अवाक्षरही काढण्याची कोणाची हिंमत नाही. या पोलिसांना  नेमकं काय हवंय,  ते कशाचा शोध घेताहेत हे थेट  विचारण्याची सोय नाही. असं किती दिवस जगावं लागणार  आहे याचा थांगपत्ता नाही. हा विचारही घुसमटून  टाकणाराच आहे. अगदी आपण तुरुंगात नसलो,  घरातच  डांबून पडलेलो असलो तरीही.  सिनेमाचे पटकथालेखक आहेत आन्द्रा व्होरास. त्यांना अचानक ही गोष्ट मिळाली. मग लेखक आणि दिग्दर्शकाने  आर्काईव्हजमधून या घटनेची अधिक माहिती मिळवली,  90 च्या दशकात एका वृध्द बाईने सांगितलेल्या घटना  कोणीतरी व्हीएचएसवर टेप करून ठेवल्या होत्या. ती टेप या  दोघांनी मिळवली आणि त्यावर आपली पटकथा रचली. ‘एका खोलीत एकाच वेळी सोळा व्यक्तिरेखा वावरताना  दाखवणं हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं,’  असं क्रिस्टॉफ  डॅकचं म्हणणं आहे.  ‘बीनपोल’सारखा ‘कॅपटिव्हज’ अंगावर शहारा आणत  नाही. या सिनेमाचा आवाकाही त्या मानाने लहान आहे.  दोन्ही सिनेमे युध्द संपल्यानंतरचे असले तरी त्यांची  जातकुळी वेगळी आहे. एक जळजळीत वास्तव सांगणारा  आहे आणि दुसरा वास्तवच,  पण ते साखरेच्या गोळीत  घोळून तुमच्यासमोर मांडणारा आहे. व्यक्तिश: मला ‘बीनपोल’ अधिक भावला. सर्वच बाबतीत तो जास्त  सकस वाटला. ‘बीनपोल’चा कॅनव्हास आणि ग्राफही  अधिक मोठा होता. दिग्दर्शन,  छायाचित्रण,  अभिनय  सगळ्या पातळ्यांवर या सिनेमाने खूप जास्त परिणाम केला,  प्रभाव पाडला. पण ‘कॅपटिव्हज’ सारखा सिनेमाही दुर्लक्षिता  कामा नये असं वाटलं.  हेच तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचं वैशिष्ट्य  असतं. नाही तर, एकाच व्यासपीठावर इतकं वैविध्य  असणारे सिनेमे दुसरीकडे कुठे पहायला मिळणार?
 

Tags: International Film Festival Beanpole Captives IFFI 2019 meena karnik पीटीएसडी हिटलर सैनिक युध्द हॉस्पिटल इफ्फी mina karnik ptsd hitlar sainik youdhha hospital IFFi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके