डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुलांच्या नजरेतून जगाकडे पाहण्याची भुरळ अनेक दिग्दर्शकांना पडलेली आहे. गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये बघितलेले अशाच काही दिग्दर्शकांचे सिनेमे. मुलं वेगवेगळ्या देशांतील, त्यांचा भोवतालही निरनिराळा; पण त्यांतला निरागसपणा मनाला भावणारा 

आपण मोठे झालो की लहानपणी काय विचार करत होतो, कसे वागत होतो- हे सगळं विसरून जातो का? त्या जगाशी आपला संबंध पार संपूनच जातो का? नाही तर मग, मुलांच्या क्रिकेटचा त्रास होतो म्हणून त्यांना रागावणारी मोठी माणसं आपण का बनलो आहोत? शाळेतून घरी आल्यानंतर मैत्रिणींशी लगेच पुन्हा बोलणाऱ्या मुलीवर का चिडतो? मारामारी करणाऱ्या मुलांना उपदेशाचे डोस का पाजतो? नाही, मोठ्यांनी हे करू नये, असं माझं म्हणणं नाही; पण मुलांशी बोलताना आपण आपल्या बालपणात अजिबातच डोकावायचं नाही का? त्यांच्या बाजूने विचार करायचाच नाही का? मुळात लहान मुलांकडे माणूस म्हणून बघायचंच नाही का? हे सगळे प्रश्न मनात यायचं कारण अर्थातच, गोव्यात इफ्फिमध्ये पाहिलेले काही सिनेमे. ते लहान मुलांच्या दृष्टिकोनातून बनवलेले आहेत आणि जे बघताना मनाला भावलेले आहेत, त्या सिनेमांविषयीच फक्त इथे मी सांगणार आहे.

लिओनार्दो या अंध टीनएजर मुलाची गोष्ट सांगितली आहे दिग्दर्शक डॅनिएल रिबेरिओ यांनी. सिनेमाचं नाव आहे ‘द वे ही लूक्स’ (ब्राझील/ पोर्तुगीज). लिओनार्दो आणि जिओव्हाना एकाच शाळेत आहेत. एकाच वर्गात. एकमेकांचे घट्ट मित्र. आपल्या या मित्राविषयी जिओव्हाना  थोडी पझेसिव्हसुद्धा आहे. त्याला रोज घरी सोडायचं, वर्गातल्या मस्तीखोर मुलांपासून त्याचं संरक्षण करायचं. घरी आई-वडील आहेत आणि वेगळी राहणारी प्रेमळ आजीही. हे सगळे लिओनार्दोला नॉर्मल मुलासारखं वागवण्याचा प्रयत्न करताहेत. पण आई-वडिलांना ते नेहमी शक्य होतंच आहे, असं नाही. स्वाभाविक आहे. घरी अंध मुलगा एकटा आहे याचं टेन्शन येणं, मुलाने एक्सचेंज प्रोग्राममार्फत दुसऱ्या  देशात जाण्याची इच्छा व्यक्त करणं- हे त्या आईसाठी अगदीच स्वाभाविक आहे.

पण काही वेळा लिओनार्दोला त्याचा त्रास होतो. तुझी आई तुझ्याबाबतीत एवढी हळवी आहे ते तू आंधळा आहेस म्हणून नाही; तर ती आई आहे म्हणून, हे वडिलांना त्याला समजावून सांगावं लागतं. लिओनार्दोचा स्वत:शीही झगडा चालू आहे. आपल्याबरोबर डेट करायला कुणी मुलगी तयार होणार नाही; आपण अजून कुणा मुलीचं चुंबन घेतलेलं नाही, असे प्रश्न त्याच्या वयानुसार त्याला पडताहेत. आणि एक दिवस लिओच्या वर्गात नवा मुलगा येतो. गॅब्रिएल. तो लिओ आणि जिओव्हानाच्या आयुष्यात अगदी सहजपणे प्रवेश करतो. त्यांचा मित्र बनतो. आणि या मित्राकडे आपण आकर्षित होतोय याची जाणीव लिओला होऊ लागते. दोघांच्या या हळुवार नात्यामधले पदर दिग्दर्शक तेवढ्याच हळुवारपणे आपल्याला उलगडून दाखवतो आणि शेवट तर या सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन सोडतो.

लिओ आणि जिओव्हानाची मैत्री, जिओव्हानालाही गॅब्रिएलविषयी वाटणारं आकर्षण, त्यातून होणारी भांडणं, वर्गातल्या इतर मुलांच्या व्यक्तिरेखा- अशा छोट्या- छोट्या गोष्टींमधून टीनएजर मुलांचं जग दिग्दर्शक आपल्यासमोर उलगडतो. पण हे करताना आपल्याला लिओनार्दो नावाच्या एका आंधळ्या मुलाची गोष्ट सांगायची आहे, त्याचं जग प्रेक्षकांसमोर आणायचं आहे, त्याच्या मनातली अस्वस्थता किंवा राग-लोभ किंवा भावना आपल्याला केंद्रस्थानी ठेवायच्या आहेत हे भान दिग्दर्शक आपल्याला सतत देत राहतो. मग सिनेमाचं शीर्षक अधिकच अर्थगर्भ वाटू लागतं.

‘सिवास’ हा तुर्कस्तानचा सिनेमा. दिग्दर्शक आहेत कान मुझदेकी. ही गोष्ट आहे ११ वर्षांच्या अस्लनची आणि सिवास नावाच्या कुत्र्याची. अस्लन अतिशय हट्टी आहे. जिद्दी आहे. रागावला की, वडिलांना आणि भावाला शिव्याही घालतो. वर्गातल्या एका मुलीवर लाईन मारतो. तिला सिंड्रेलाची भूमिका दिल्यानंतर शाळेतल्या टीचरनी राजपुत्राची भूमिका दिली नाही म्हणून शाळेत जाणं थांबवतो. सिवास हा फायटर कुत्रा आहे- दोन गावांमध्ये होणाऱ्या कुत्र्यांच्या झुंजीत आपल्या मालकासाठी भाग घेणारा. एका झुंजीत तो घायाळ होतो. तो मेला, असं मालकाला वाटतं म्हणून सिवासला तसंच सोडून मालक निघून जातो आणि अस्लन त्याला आपल्याबरोबर घेऊन येतो.

सिवासची काळजी घेतो. त्याला पुन्हा झुंज करण्याएवढी ताकद येईलसं बघतो. राजपुत्राची भूमिका मिळालेल्या ओस्मानच्या कुत्र्याबरोबर त्याला झुंजवतो आणि सिवास जिंकतोही. त्यानंतर मग अर्थातच, आणखी मोठ्या झुंजीसाठी गाववाले सिवासला तयार करतात. कुत्र्यांची झुंज पाहताना आपल्याला ते क्रौर्य सहन होत नाही, पण गावातली मुलं टाळ्या पिटत आरडाओरडा करताना दिसतात. इतक्या लहान वयात अशी हिंसा एन्जॉय करणाऱ्या या जगात निरागसतेची व्याख्या कशी करणार? पण तरीही ज्या सिवासवर आपण जिवापाड प्रेम करतोय, त्याला रक्तबंबाळ अवस्थेत बघितल्यावर अस्लनची जी अवस्था होते; ती त्याच्या बरोबर आलेल्या एकाही मोठ्या  माणसाची होत नाही.

हिंसा, मारामारी, रक्त, लढाई या सगळ्याविषयी अस्लनच्या मनात निर्माण झालेले प्रश्न मोठं होईपर्यंत बहुधा इतरांसाठी बोथट झालेले असतात. अस्लन आणि सिवास या दोन मित्रांच्या नात्याबरोबरच असे अनेक प्रश्न दिग्दर्शक आपल्यासमोर उभे करतो. हसत-खेळत, नर्म विनोद करत. सिनेमातली अनेक दृश्यं आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात. अस्लन आणि त्याच्या मैत्रिणीमधले संवाद असतील किंवा अस्लन आणि त्याच्या तरुण भावाचं नातं असेल; आपण अस्लनच्या भावविश्वात पूर्णपणे रमून जातो. तुर्कस्तानातल्या एका दुर्गम भागात असलेलं हे गाव जसं मनात ठसतं, त्याहून जास्त तिथला अस्लन आपलासा होतो. ते जग पूर्णपणे अपरिचित वाटलं तरी अस्लनचं जग परकं वाटत नाही; खोटं तर नाहीच नाही. थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर खूप वेळ हा अस्लन आणि त्याचा सिवास मनात घर करून राहतो.

‘बिहेविअर’ हा क्युबाचे दिग्दर्शक अर्नेस्टो दारानास यांचा सिनेमा. म्हटलं तर हा सिनेमा एका शिक्षिकेचा आहे; म्हटलं तर ११ वर्षांच्या चाला या मुलाचा. चालाची गोष्ट सांगताना आपण क्युबातलं दारिद्र्य अनुभवतो. दुसऱ्या देशातून बेकायदा मार्गाने स्थायिक झालेल्या बापाची भीती पाहतो. चाला लहान असला तरी इतर मुलांपेक्षा वेगळा आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या आईला सांभाळतोय. घरात पैसे आणण्याची जबाबदारीही त्याने स्वत:वर घेतलीय. त्यामुळे कबुतरं पकडून ती विकणं, झुंजीसाठी कुत्रे पुरवणं, जुगार खेळणं- अशी मोठ्यांची, तीही वाया गेलेल्या मोठ्यांची कामं तो करतोय. स्वाभाविकच स्वभावाने तापट आहे. पट्‌कन हमरी-तुमरीवर उतरणारा आहे.

त्यामुळेच त्याला प्रॉब्लेम असणाऱ्या मुलांच्या शाळेत पाठवलं जातं. त्याच्या शिक्षिका कार्मेला यांना हे अजिबात मान्य नाही. त्यांचं आता वय झालंय. शाळेतल्या तरुण शिक्षकांच्या व्यवस्थापनाच्या नियमांमध्ये त्या बसत नाहीयेत. तरीही विद्यार्थ्यांच्या प्रेमामुळे त्या टिकून आहेत. चालावर आपण चांगले संस्कार करू शकतो, यावर त्यांचा विश्वास आहे आणि त्यासाठी मेहनत घ्यायची तयारी. शिक्षक- विद्यार्थ्याचं हे नातं फार लोभस आहे. कार्मेला प्रसंगी चालाची आई बनतात, प्रसंगी रागे भरणारी शिक्षिका, काही वेळा त्याची मदत मागणारी थकलेली बाई, तर कधी कधी त्याचं दु:ख ऐकून घेणारी मैत्रीण.

चालाच्या निमित्ताने आपण त्याच्या वर्गातल्या वेगवेगळ्या मुलांना भेटतो. बहुतेक सगळी निम्नस्तरातून आलेली आहेत. वेगवेगळ्या वर्णांची आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या मुलांच्या निमित्ताने दिग्दर्शक काही राजकीय भाष्यही करू पाहतो. कार्मेलाच्या आजारी नातवाचा मृत्यू होतो, हे कळल्यावर वर्गातली सगळी मुलं आपापल्या परीने आपल्या टीचरचं सांत्वन करू पाहतात. हे करताना त्यांना स्वत:ला रडू येत असतंच. एक मुलगी येशूचा फोटो असलेलं कार्ड वर्गातल्या बोर्डवर चिकटवते आणि शाळेच्या तरुण शिक्षिकेला ते खटकतं. सुपरव्हिजनसाठी काही मंडळी येणार आहेत, त्या आधी ते कार्ड तिथून काढून टाकायला हवं, असं फर्मान ती सोडते. कार्मेला त्याला विरोध करते. कम्युनिस्ट  देश आहे म्हणून लहान मुलांच्या भावनांवर असं अतिक्रमण करण्याचा अधिकार तुला नाही, असं त्या तरुण शिक्षिकेला सुनावते.

जुन्या-नव्यातला वाद, कम्युनिझम विरुद्ध समाजात आवश्यक असणारा मोकळेपणा अशा विषयांनाही सिनेमा सहज स्पर्श करून जातो. आपल्या कार्डमुळे टीचरची नोकरी जाणार, हे कळल्यावर मुलांची होणारी प्रतिक्रियाही महत्त्वाची असते. चालाची ही गोष्ट म्हणूनच एका परीने क्युबामधल्या आजच्या परिस्थितीवर भाष्य करते. पण हे सगळं आपल्याला दिसतं ते चालाच्याच नजरेतून. आणि म्हणूनच बहुधा लहानांच्या आणि मोठ्यांच्या जगण्यातला विरोधाभास प्रखरपणे जाणवतो. कार्मेलाने स्वत:मध्ये ही लहान मुलांची दृष्टी जपलीये आणि म्हणून ती या मुलांशी नातं सांगू शकते, असंही दिग्दर्शक सांगू पाहतो का?

‘द लॅम्ब’ हा तुर्कस्तानचा आणखी एक सिनेमा. गावामध्येच घडणारा. तुर्कस्तानमधील गावांचं देखणेपण आपल्याला अवाक्‌ करतं. त्यामुळे या सिनेमाची दृश्यात्मकता आपोआप एका वेगळ्या पातळीवर जाते. अर्थात, सिनेमा चांगला किंवा वाईट असणं त्यावर अवलंबून नसतंच; त्यासाठी लागतो तो कथेचा भक्कम पाया. दिग्दर्शक कुटलुग आटामॅन यांच्या या सिनेमाची कथा तशी छोटीशीच आहे. त्यातून दिग्दर्शक फार काही जीवनाचं सार वगैरे सांगण्याचाही प्रयत्न करत नाही. मात्र त्यात खूप गोडवा आहे.

एका कुटुंबातल्या चार लोकांच्या परस्परसंबंधांची ही गोष्ट आहे. इस्माईल हा गरीब गावकरी. घरात बायको- मेदिन, एक मुलगा आणि एक मुलगी. गोष्ट आपल्यासमोर घडते ती मुख्यत: छोट्या मर्टच्या नजरेतून. जोडीला आहे त्याची बहीण विकदान. मर्ट वयात आलाय, तेव्हा रीतीनुसार त्याची सुन्ता करणं आवश्यक असतं आणि ती झाल्यावर गावजेवण घालणंही तितकंच गरजेचं. पंचाईत इथेच असते. इस्माईलकडे एवढे पैसे नाहीत की, गावाला तो बकऱ्याचं जेवण घालू शकेल. त्यावरून घरात नवरा-बायकोचं रोज भांडण चालू आहे. विकदान आहे वडिलांच्या बाजूची आणि मर्ट आईचा लाडका. विकदान थोडी मोठीही आहे. अभिनय, नृत्य यांत रस असणारी. पण घरातली सगळी कामं आई आपल्यालाच करायला सांगते, म्हणून रागावणारी. त्याचा सूड म्हणून धाकट्या भावाला छळणारी. बकरा घ्यायला वडिलांकडे पैसे नाहीत, पण गावजेवण तर घालायलाच हवं, तेव्हा इलाज उरला नाही तर तुलाच मारावं लागणार, अशी भीती ती मर्टला घालते. वर, ‘आई नाही का सारखी तुला कोकरू-कोकरू म्हणून हाक मारत असते; त्याचा अर्थ काय?’ असा सवालही करते. पोरगं घाबरतं आणि बहीण सांगेल ती सगळी कामं करू लागतं.

इथे इस्माईल शहरात नोकरीला जाऊ लागलाय. पण मित्रांच्या मदतीने एका बाईच्या नादालाही लागलाय. त्यामुळे मिळालेले सगळे पैसे तो उधळतोय आणि मेदिन हताश होतेय. मेदिन शेवटी एकदाचा मार्ग काढते. आपल्याला दिसतं ते इस्माईल आणि मेदिनने घातलेलं गावजेवण. पण त्या सगळ्या समारंभात मर्ट आणि विकदान मात्र कुठेच नसतात. प्रेक्षकांच्या मनात पाल चुकचुकते... दिग्दर्शकाने भावा-बहिणीचं नातं खूप छान रेखाटलंय. दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. पण त्याच वेळी आपलं भलं समजायचा स्वार्थही आहे. प्रत्येक मुलामध्ये तो असतोच. प्रसंगी लहान मुलं दाखवू शकतात असं क्रौर्यही या मुलांमध्ये दिसतं आणि निरागसताही. ज्या बाईच्या नादी आपला नवरा लागलाय, तिच्याकडे मेदिन आपल्या दोन्ही मुलांना घेऊन जाते. तिथेही विकदान त्या बाईला ‘तू स्टेजवर कशी नाचतेस’ असा प्रश्न करते. किंवा, आपला जीव वाचवायचा तर कोणत्याही परिस्थितीत बकरा मिळवायला हवा, म्हणून मर्ट करत असलेले प्रयत्न चेहऱ्यावर हसूही आणतात आणि त्याच्याविषयी सहानुभूतीही निर्माण करतात.

एक साधी-सोपी छोटीशी गोष्ट त्यातल्या व्यक्तिरेखांमुळे, त्यांच्यातल्या नात्यामुळे एकदम आपलीशी होऊन जाते. फार थोर सिनेमा पाहिल्याचा अनुभव जरी या सिनेमाने दिला नाही, तरी एक छोटंसं हसू चेहऱ्यावर त्याने आणलं, एवढं नक्की. गोव्याला बघितलेल्या काही चांगल्या, वेगळ्या सिनेमांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न होता. पुढच्या महिन्यात ८ जानेवारीपासून पुण्याचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होतोय. यांतले काही सिनेमे तिथे कदाचित दाखवले जात असतील. या लेखांच्या निमित्ताने त्यांतले काही तुम्हाला बघावेसे वाटावेत, एवढंच.

Tags: द वे ही लूक्स इफ्फी मीना कर्णिक ‘द लॅम्ब’ ‘बिहेविअर’ ‘सिवास’ लिओनार्दो iffi meena karnik the lamb behavior sivas Leonardo weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके