डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याच्या ‘कोर्ट’ या पहिल्याच सिनेमाला 2014चा सर्वोत्तम सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर उलगडणाऱ्या या कोर्टरूम ड्रामाविषयी...

‘‘तू ‘कोर्ट’ बघितलास का?’’

‘‘तू अजून ‘कोर्ट’ नाही बघितलास?’’

‘‘तू ‘कोर्ट’ नक्की बघ.’’

वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांनी दिलेला हा सल्ला पुण्याच्या चित्रपट महोत्सवाला जाण्यापूर्वी मला मिळालेला होता. माझ्याप्रमाणे तो अनेकांना मिळालेला असणार, हे माहीत असल्यामुळे ‘कोर्ट’ला तुफान गर्दी होणार याची अपेक्षा होतीच. सिनेमा सुरू होण्याच्या दोन तास आधीपासून थिएटरच्या बाहेर लोकांनी रांग लावलेली होती. आधीचा सिनेमा पाहून बाहेर पडल्यानंतर ती रांग बघून आपल्याला आत जाता येणं शक्यच नाही, हे लक्षात आलं आणि कधी नव्हे ते मी ओळख काढून स्वत:साठी जागा मिळवली. आजवर कोणत्याही सिनेमासाठी कोणत्याही महोत्सवामध्ये मी हे केलेलं नव्हतं; पुढे कधी करेन, अशी शक्यताही नाही.

हे सगळं सांगायचं कारण एवढंच की, ‘कोर्ट’ने अपेक्षा भलत्याच वाढवून ठेवलेल्या होत्या. माझ्यासकट तिथे आलेल्या सगळ्यांच्याच. आणि महत्त्वाचं म्हणजे, आमच्यापैकी कुणाचाच अपेक्षाभंग झाला नाही.

सिनेमाच्या नावावरून हा कोर्टरूम ड्रामा असणार, हे उघड होतं. तसा तो आहेही. पण त्यातला ‘ड्रामा’ अत्यंत थंडपणे सांगितलेला आहे. आपल्यासमोर पडद्यावर जे घडतं, ते इतक्या अनड्रॅमॅटिक पद्धतीने आणि मॅटर ऑफ फॅक्टली घडतं की, सिनेमा संपतो तेव्हा त्या वास्तवाने आपल्याला हादरवून सोडलेलं असतं.

नारायण कांबळे (वीरा साथीदार) हे दलित शाहीर आणि कार्यकर्ता. पोवाडे गाऊन वस्ती-वस्तीत आपल्या समाजाला अन्यायाची जाणीव करून देणं, हे त्यांचं काम. पोटापाण्यासाठी आपल्या चाळीतल्या मुलांच्या ट्युशन्सही ते घेत असतात. एक दिवस पोलीस त्यांना पकडतात आणि त्यांच्यावर एका कामगाराला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला जातो. ही आत्महत्या केलेली असते एका सफाई कामगाराने. नारायण कांबळे यांचं गाणं ऐकून हा सफाई कामगार सुरक्षिततेचं कोणतंही साधन न वापरता गटारात उतरला आणि त्याने आत्महत्या केली, असं पोलिसांनी त्यांच्या आरोपपत्रात म्हटलेलं असतं.

न्यायमूर्ती सदावर्ते (प्रदीप जोशी) यांच्या सेशन्स कोर्टात खटला सुरू होतो. कांबळेंच्या बाजूने विनय व्होरा (विवेक गोंबर, जो या सिनेमाचा निर्माताही आहे) उभा राहतो, तर सरकारी वकील असते नूतन (गीतांजली कुलकर्णी). खटला म्हटलं की, आपल्यासमोर काही उत्तम सिनेमे येतात. ‘अ फ्यू गुड मेन’मधली टॉम क्रूझ आणि जॅक निकल्सनची जुगलबंदी आठवते. हिंदीतला ‘कानून’ किंवा अलीकडचा ‘जॉली एलएलबी’सारखा सिनेमा आठवतो. किंवा काही वेळा अतिशयोक्तीने भरलेली सिनेमांमधली किंवा आता टीव्हीमधून पाहिलेली दृश्यंही आठवतात. जोरदार भाषणं, अभिनय, तावातावाने केलेली आर्ग्युमेंट्‌स इत्यादी. पण इथे तसं काहीच होताना दिसत नाही. अगदी संथपणे, कायद्याच्या पुस्तकांमधली जड-जड वाक्यं वाचली जातात. त्यात ना कोणता अभिनिवेश आहे, ना अभिनय. असलाच तर एकसुरीपणा तेवढा आहे.

एका बाजूला सदावर्ते, विनय आणि नूतन यांची कोर्टातली इंटरॲक्शन; तर कांबळेंना अगदी अलिप्तपणे विचारले जाणारे प्रश्न आपण ऐकत असतो, मृत सफाई कामगाराच्या बायकोची जबानी ऐकत असतो आणि दुसऱ्या पातळीवर हा सिनेमा या तीन मुख्य व्यक्तिरेखांच्या व्यक्तिगत आयुष्यातही डोकावत राहतो. विनय नेहमीच चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे खटले लढणारा वकील आहे, हे आपल्याला कळतं. त्याचं गुजराती कुटुंब अत्यंत सधन आहे. तो स्वत: उच्चभ्रू आयुष्य जगणारा मुलगा आहे. कधीमधी पब्समध्ये जाणं, उंची दारू पिणं हा त्याच्या लाईफस्टाईलचा भाग आहे.

नूतन एक मध्यमवर्गीय गृहिणी आहे. कोर्टातलं काम आटोपलं की घरी जायचं, स्वैपाक करायचा, मुलाचा अभ्यास घ्यायचा, नवऱ्याला आणि मुलाला वाढायचं, मग मागचं सगळं आवरायचं- असा सर्वसाधारण बाईसारखाच तिचा दिनक्रम. सुट्टीच्या दिवशी मराठी नाटक बघायचं, एखाद्या साध्याशा रेस्टॉरन्टमध्ये जेवण करायचं, ही तिची एन्जॉयमेंटची कल्पना. प्रसंगी फोनवरून ती आपल्या मैत्रिणीला अत्यंत प्रेमाने वकिली सल्लाही देताना दिसते. पण तीच नूतन कोर्टात मात्र कांबळेंना प्रश्न विचारताना, त्यांच्यावर आरोप करताना त्यात किंचितही गुंतलेली असत नाही. ही आपली नोकरी आहे आणि ती अशीच अलिप्तपणे करायची असते, हे आपल्याकडच्या तमाम चाकरमान्यांप्रमाणे तिनेही ठरवून टाकलेलं आहे. इथे विचार करायचा तो केवळ पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर, बाकी काही नाही.

विनयचं तसं नाही. त्याला सामाजिक भान आहे. इथला वर्गभेद, जातिभेद यांची जाणीव आहे. परिवर्तनाचा प्रयत्न करणाऱ्यांचं इथली व्यवस्था कसं खच्चीकरण करते, हेही त्याला माहीत आहे. आणि आपल्या परीने तो त्या सगळ्या लढ्यात सामील झालेला आहे. सदावर्तेही मध्यमवर्गीय कुटुंबातले आहेत. न्यायाधीश असले तरी त्यांच्या जाणिवाही त्यांच्या भोवतालामधून आलेल्या आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा त्यांच्यावरही स्वाभाविकपणे आहे.

या तिघांच्या स्वतंत्र अशा व्यक्तिगत आयुष्याचा आणि कामाच्या ठिकाणी बांधल्या गेलेल्या आयुष्याचा उत्तम गोफ चैतन्य ताम्हाणेने बांधला आहे. आणि तो बांधताना त्याने आपल्याला जणू एक आरसा दाखवला आहे. इथली न्यायव्यवस्था, पोलीसव्यवस्था, समाज-व्यवस्था यांच्यावर झगझगीत प्रकाश टाकला आहे.

या सिनेमाला अनेक स्तर आहेत, ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. मध्यमवर्गीय आपल्या आयुष्यात इतके मग्न आहेत की, आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर जगणाऱ्यांविषयीची सहानुभूती कुठे तरी लुप्त झालीये. आयुष्याच्या रोजच्या धबडग्यात बहुधा दुसऱ्यासाठीच्या संवेदनशीलतेला जागाच उरलेली नाही. त्याउलट, विनयसारखी उच्चभ्रू समाजातून आलेली माणसं सामाजिकदृष्ट्या अधिक जागरूक आहेत. आर्थिक विवंचना नसल्यामुळे असेल; पण समाजाचं आपण काही देणं लागतो, असं त्यांना वाटतंय.

पुन्हा हे सरसकट खरं आहे, असंही म्हणता येणार नाही किंवा प्रातिनिधिक आहे, असंही नाही. विनयचे आई-वडील किंवा परदेशात राहणारी बहीण काही विनयसारखी नाही. पण तरीही या मुख्य व्यक्तिरेखांमधून दिग्दर्शक आपल्याला काही सांगू पाहतोय. इथल्या विषम व्यवस्थेकडे आपलं लक्ष वेधू पाहतोय. आणि त्यासाठी त्याने निवडलेली गोष्ट किंवा ती गोष्ट सांगायची पद्धत एकाच वेळेला साधी-सरळ आणि गुंतागुंतीचीही आहे. न्यायालयात चालणाऱ्या कामामधला रटाळपणा या कोर्टरूम ‘ड्रामा’मध्ये आपण पाहतो. पण तो आपल्यासाठी कंटाळवाणा होत नाही. दिग्दर्शकाचं हे मोठं कसब म्हणायला हवं.

या सिनेमातली प्रत्येक व्यक्तिरेखा खरी वाटते. त्यांतल्या काही अभिनेत्यांनी साकारल्या आहेत, तर काही आजवर कॅमेऱ्यासमोर कधीही उभ्या न राहिलेल्या कलाकारांनी. पण सिनेमा पाहताना आपण त्यांना वेगळं काढू शकत नाही, इतके हे सर्व कलावंत आपापल्या व्यक्तिरेखांमध्ये खरे वाटतात. दिग्दर्शकाने निवडलेली लोकेशन्सही अशीच. कॅमेराही जणू सहजी फिरल्यासारखा एक व्यक्तिरेखा बनून वावरतो. कुठे सॉलिड शॉट घेतल्याचा आविर्भाव नाही, की कोणत्याही क्लृप्त्या नाहीत. सगळं कसं जसं आहे तसं, जेवढं आहे तसं. शंभर टक्के खरंखुरं. आणि म्हणूनच अस्वस्थ करणारं. मनात बराच काळ रेंगाळणारं. विचार करायला लावणारं.‘डिअर सिनेमा’ या वेबसाईटवर दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेची मुलाखत बिकास मिश्रा यांनी 6 सप्टेंबर 2014 या दिवशी छापलेली आहे. त्यातला हा काही भाग-

‘कोर्ट’चा प्रवास कसा सुरू झाला?

-माझी ‘सिक्स स्ट्रँड्‌स’ ही शॉर्ट फिल्म नुकतीच संपली होती आणि विविध महोत्सवांमध्ये दाखवली जात होती. त्यावेळी, 2011मध्ये, माझ्या मनात ‘कोर्ट’चा विषय आला. मी जॉनर फिल्म्सचा त्या अर्थाने काही फॅन नाही. भारतीय वातावरणात कोर्ट केस कशी चालते हे एक्सप्लोअर करावं असं मला वाटलं. सुरुवातीला आम्ही भारतीय संदर्भात अत्यंत खरा असेल असा कोर्टरूम ड्रामा करणार होतो. त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि अधिकाधिक खोलात शिरू लागलो. प्रत्यक्ष कथेपेक्षा मला त्याचं सेटिंग अधिक भावलं कारण मुळातच मला रिसर्च करायला, वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घ्यायला आवडतं. त्यावेळी मी 24 वर्षांचा होतो. दलित चळवळीची काहीही माहिती मला नव्हती. आणि कोर्टाचा अनुभवही कधी घेतलेला नव्हता. त्यामुळे माझ्यासाठी आजवर ठाऊक नसलेल्या गोष्टींना सामोरं जाणं होतं.

मुंबईत एक कोर्ट दुसऱ्यासारखं चालत नाही हे आमच्या लक्षात आलं. सिनेमांमधून आपण एकाच प्रकारचं कोर्ट पाहत असतो. प्रत्यक्ष आयुष्यात प्रत्येक कोर्ट वेगळं असतं. बऱ्याच नंतर आमच्या लक्षात आलं की, शूटिंगसाठी योग्य वातावरण हवं असेल, तर आपल्याला सेट तयार करायला हवा. त्यामुळे असं झालं की आमची इतर सगळी लोकेशन्स खरी होती आणि कोर्ट वेगळं वाटू नये असा आमचा प्रयत्न होता.

सिनेमा लिहिण्याची तुझी प्रोसेस कशी होती?

-मी खूप नोट्‌स काढतो. व्हिडिओ रेफरन्सेस, फोटो, डॉक्युमेंटरींचे संदर्भ खूप काही जमवतो. मी घेतलेल्या मुलाखतींच्या नोट्‌स माझ्या मीच काढतो. मग हळूहळू व्यक्तिरेखा आणि घटना मनात आकार घ्यायला लागतात. मग घटनाक्रम लिहायला घेतो. स्क्रिप्ट माझ्या मनात अगदी शेवटी आकार घेतं. ही वेळ येईपर्यंत आपण आता लिहू शकतो अशी माझी मलाच खात्री पटलेली असणं आवश्यक असतं.

‘कोर्ट’च्या बाबतीत असं घडलं की माझ्यापाशी वकील, न्यायमूर्ती यांच्या व्यक्तिगत आयुष्याची माहिती बराच काळ जमा झालेली होती. आजुबाजूच्या गोष्टी तयार झाल्या होत्या. पण मुळात कोर्टातली केसच माझ्यापाशी नव्हती. आणि ते खूप महत्त्वाचं होतं. कारण कोणत्या प्रकारची कोर्ट केस आपल्याला नकोय हे मला माहीत होतं. मग एक दिवस हे कोडं सुटलं. गटार साफ करणाऱ्या एका सफाई कामगारावर आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून केस केली जाते. मूळ केस ही होती. पण मग त्यात अनेक गोष्टींची भर पडत गेली. सफाई कामगारांबद्दल मी एक लेख वाचला होता डॉ.बिनायक सेन यांच्यावर झालेल्या खटल्याविषयी लेख वाचलेला होता. कबीर कला मंचवरच्या खटल्याचं वाचन झालेलं होतं. या सगळ्या गोष्टी मग त्यात हळूहळू आल्या.

स्क्रिप्ट लिहिताना पडद्यावर ही गोष्ट कशी दिसेल, ती दाखवण्याची आपली स्टाईल कशी असेल याविषयी तुझ्या मनात काही विचार होता?

-मला लांब टेक्स आणि वाईड शॉट्‌स घ्यायचे आहेत, हे मला नक्की माहीत होतं. माझा कॅमेरा निरीक्षण करणारा आहे आणि तो संथ गतीने वावरतोय, हे मला हवं होतं. आपण ऑब्जेक्टिव्ह आहोत, असा आभास निर्माण करायचा होता. खरं तर ऑब्जेक्टिव्ह असं काही नसतं, पण आपण थोडे तटस्थ आणि दूर राहून घडणाऱ्या गोष्टींकडे पाहू शकतो.

वास्तववादाला मर्यादा नसते. सिनेमाच्या स्क्रिप्टवरचा माझा रिसर्च झाल्यानंतर प्री-प्रॉडक्शनवर मी आणखी सहा महिने घालवले. मग सहा महिने कलावंत नक्की करण्यासाठी आणि आठ महिने लोकेशनची रेकी करण्यासाठी. आमची सगळी टीम प्रत्यक्ष शूटिंग करण्याआधीपासून कामाला लागली होती. ‘जय भीम कॉम्रेड’सारखी डॉक्युमेंटरी बघणं, चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणं, राजकीय गटांबरोबर बोलणं, त्यांच्या घरी जाणं, फोटो काढणं, त्यांच्या घरातल्या सामानाचे फोटो काढणं, त्यांच्याबरोबर विविध कार्यक्रमांना जाणं इत्यादी गोष्टी आम्ही करत होतो.

तुला तुझा निर्माता विवेक गोंबर कसा सापडला?

‘विवेकने माझ्या एका नाटकात काम केलं होतं. ग्रे एलिफन्ट्‌स इन डेनमार्क नावाचं एक नाटक मी लिहिलं आणि दिग्दर्शित केलं होतं. तो बॉस्टनहून अभिनयाचं प्रशिक्षण घेऊन आलेला आहे आणि मुंबईत गेली आठ नऊ वर्षं थिएटर करतोय. मी त्याचं काम आधी बघितलेलं होतं आणि मला ते आवडलंही होतं. शॉर्ट फिल्म केल्यानंतर आणि एक नाटक दिग्दर्शित केल्यानंतर मी पूर्ण खंक झालो होतो आणि पुढे काय करायचं कळत नव्हतं.

नोकरी शोधायच्या प्रयत्नात होतो. खूप वाईट काळ होता. आणि त्यावेळी मला विवेक भेटला. गप्पांमध्ये त्याने मला ‘तू लिहीत का नाहीस’ असं विचारलं. मी त्याला म्हटलं, ‘माझ्या डोक्यात एक कल्पना आहे, पण मला स्वत:चा खर्च भागवण्यासाठी महिन्याला पंधरा हजार रुपये लागतील त्याचं काय?’ त्याने मला ते देण्याचं मान्य केलं. पण असे उपकार कसे स्वीकारणार? तरीही त्याने आग्रहच केला. ‘तू लिहितोस ते मला आवडतं’ असं म्हणाला. मी वर्षभर काम केलं आणि स्क्रिप्ट लिहिलं. ते त्याला आवडलं. त्याने निर्माता व्हायचं ठरवलं. आणि नट म्हणून मला तो आवडत असल्याने मी त्याला मुख्य भूमिका ऑफर केली. कोणाचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही, पण खरंच जे घडलं ते नेमकं असंच आहे.’  

Tags: कोर्ट बिकास मिश्रा चैतन्य ताम्हाणे मीना कर्णिक कोर्ट: शंभर टक्के खरा सिनेमा सिनेमा film cinema court Bikas Mishra Chaitany Tamhane Meena Karnik Court: Shambhar take khara cinema Nava cinema weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके