डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘हनीबॉय’, ‘मारिघ्घेला’ आणि ‘माय नेम इज सारा’ या तीन सिनेमांची जातकुळी निराळी, पार्श्वभूमी वेगळी. हे तीनही चित्रपट सत्यकथांवर आधारलेले होते, हेच काय ते त्यांच्यामधलं साम्य. अर्थात, केवळ गोष्ट खरी आहे म्हणून सिनेमा मोठा ठरतो, असं नाही. तरीही लक्ष वेधून घेणाऱ्या या तीन सिनेमांविषयी.... 

बारा वर्षांचा ओटिस. समोर आपली महत्त्वाकांक्षा मुलाकरवी पूर्ण करायची म्हणून पछाडलेला बाप आणि फोनवर बापापासून घटस्फोट घेतलेली त्याची आई. आई- वडिलांना एकमेकांशी बोलण्याची इच्छा नाहीये. त्यामुळे ते थेट फोनवर येत नाहीत; पण ती नवऱ्याला शिव्या घालतेय, त्या शिव्या मुलगा बापाला सांगतोय, बाप तिला प्रत्युत्तर देतोय, ते मुलगा पुन्हा आईला फोनवर सांगतोय. आई- वडिलांचा हा संवाद म्हणजे नुसतं भांडण नाही, तर एकमेकांचे लचके तोडण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी अतिशय बीभत्स, अश्लील भाषा वापरायलाही दोघे कमी करत नाहीत. या दोन मोठ्यांच्या कात्रीत सापडलेल्या एका लहान मुलाच्या तोंडून आपण ती भाषा, ती शाब्दिक हिंसा अनुभवतोय. 

दिग्दर्शिका आल्मा हॅरेल यांच्या ‘हनीबॉय’ या सिनेमातला हा प्रचंड अंगावर येणारा प्रसंग आहे. आणि ओटिसची भूमिका करणाऱ्या नोहा ज्यूप हा मुलाने तो अक्षरश: जिवंत केलाय. भेदरलेला त्याचा चेहरा, आई- वडिलांच्या भांडणात होणारी रस्सीखेच, त्यांचे संवाद ऐकताना येणारं रडवेलपण... सगळं-सगळं तो आपल्यापर्यंत पोचवतो आणि त्याच्याबरोबर आपणही हताश होऊन जातो. 

सिनेमाचे लेखक आहेत शिआ लाबॉफ. आयुष्यात अपयशी झालेल्या, पैसा कमावू न शकणाऱ्या, एका स्वस्त मोटेलमधल्या खोलीत राहणाऱ्या आणि आपल्या बारा वर्षांच्या मुलाला कामाला लावणाऱ्या बापाची भूमिकाही लाबॉफ यांनीच केलीये. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, ओटिसची ही गोष्ट स्वत: लाबॉफ यांची आहे. रिहॅब सेंटरमध्ये उपचार घेत असतानाच्या काळात त्यांनी आपली ही कहाणी लिहिली आणि त्यानंतर आपल्याला खूप मोकळं  वाटलं, असंही त्यांनी म्हटलंय. स्वत:च्या आयुष्यातला हा काळ लोकांसमोर प्रामाणिकपणे मांडताना त्यांनी कुठेही ‘किती मी गरीब बिचारा!’ अशी भूमिका घेतलेली नाही, हेसुद्धा आवर्जून सांगायला हवं. 

ओटिस हा छोट्या-मोठ्या सिनेमांमध्ये काम करणारा बालकलाकार आहे. आई सोडून गेलीये. बापाने पैशांसाठी कामाला लावलंय. बापाबरोबर एका खोलीत राहताना त्याचं दारू पिणं, त्याचं अमली पदार्थांचं व्यसन, त्याचं बेबंध वागणं या मुलापासून लपून कसं राहणार? बाप- मुलाचं नातं विचित्र आहे. बापाचं मुलावर प्रेम नाही असं नाही, पण त्यापेक्षा पैशांची हाव जास्त आहे. बापाने आपल्याला जवळ घ्यावं, डोक्यावरून हात फिरवावा अशी मुलाची अपेक्षा आहे; पण बाप आपल्यावर अवलंबून आहे, याची जाणीवही. अशा वातावरणात वाढणारा मुलगा नॉर्मल कसा राहील? 

‘हनीबॉय’ (याच नावाने बाप आपल्या मुलाला हाक मारत असतो)ची गोष्ट आपण पाहतो, ती तरुण ओटिसच्या नजरेतून. आपल्या बालपणाशी चाललेल्या त्याच्या झगड्यातून. लहान वयातच लागलेल्या अमली पदार्थांच्या सवयीपासून मुक्तता मिळवायची तर मनातली खळबळ कमी व्हायला हवी, हे त्याला समजतंय; पण वळत आहेच, असं नाही. ओटिसचं हळवेपण आपल्याला पदोपदी जाणवतं आणि ते दिसू नये म्हणून चाललेली त्याची धडपडही. अकाली प्रौढपण आलेला हा मुलगा एकाच वेळी निरागसही वाटतो आणि बनेलही. त्यामुळेच मोटेलमध्ये समोरच्या खोलीत राहणाऱ्या, वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुण मुलीमध्ये तो आधार शोधतो, तिला बापापासून लपवून ठेवलेली आपली बचत देऊ करतो. वडिलांशी भांडताना, ‘मी आहे म्हणून तू आहेस,’ याची जाणीव करून देतो, त्यांच्या अपयशाच्या जखमांवर मीठही चोळतो. 

यातला बापही केविलवाणा आहे. रस्त्यावर जोकरच्या वेषात कॉमेडी करून पैसा मिळवायचा प्रयत्नही त्याने केलाय. आपण आयुष्यात यश मिळवू शकलो नाही, याची सल कायम त्याच्या मनात आहे. आपला मुलगा सिनेमात बालकलाकार म्हणून यश मिळवेल, अशी त्याची अपेक्षा आहे. त्यासाठी मुलाकडून वाट्टेल तेवढे कष्ट करून घ्यायला तो मागे-पुढे पाहत नाही. पण म्हणून त्याला मुलाविषयी ओढ नाही, असंही नाही. शिआ लाबॉफची ही गोष्ट अनेक अर्थांनी आपल्याला भावते. स्वत:च्याच वडिलांची भूमिका करताना त्याच्या मनात कोणतं वादळ उमटलं असेल? ओटिसच्या माध्यमातून आपलं बालपण पुन्हा एकदा जगताना त्याला कोंडल्यासारखं झालं असेल का? जगासमोर आपण नागडे होताहोत, अशी जाणीव होत राहिली असेल का? 

लाबॉफ एक प्रथितयश अभिनेता आहे. त्याचा जन्म  1986 चा. बाराव्या वर्षी बालकलाकार म्हणून तो काम करू लागला होता. वयाच्या सतराव्या वर्षी त्याला ‘यंग आर्टिस्ट ॲवॉर्ड’साठी नामांकन मिळालं होतं आणि एकोणिसाव्या वर्षी ‘डेटाइम एमी’ पारितोषिकही. त्याने काही शॉर्ट फिल्म्सचं दिग्दर्शन केलंय. ‘डिस्टर्बिया’, ‘ट्रान्सफॉर्मर्स’, ‘ट्रान्सफॉर्मर्स : रिव्हेन्ज ऑफ द फॉलन’, ‘ट्रान्सफॉर्मर्स : डार्क ऑफ द मून’, ‘लॉलेस’, ‘निम्फोमेनिॲक’, ‘वॉल स्ट्रीट : मनी नेव्हर स्लीप्स’ (हा 1987 मध्ये आलेल्या ‘वॉल स्ट्रीट’चा सिक्वेल होता), ‘अमेरिकन हनी’, ब्रॉड पिट आणि लोगान लर्मन यांच्याबरोबर केलेला ‘फ्युरी’ हे त्याचे काही गाजलेले सिनेमे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘बोर्ग व्हर्सेस मॅकेन्से’ या सिनेमात त्याने मॅकेन्सेची भूमिका केलीये. आणि आता ‘हनीबॉय’मुळे त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. मुख्य म्हणजे, मनाला कुरतडणाऱ्या आठवणींपासून जणू काही सुटका झाल्याने मोकळा श्वासही घेतला आहे. यानंतरच्या त्याच्या सिनेमांकडे आता अधिक लक्ष द्यायला हवं, हे नक्की. 

हा सिनेमा अजून प्रदर्शितही झालेला नाही. पण देशाच्या अध्यक्षांनी त्यावर सडकून टीका केलीये. आणि सिनेमा न पाहताच त्यांच्या पाठीराख्यांनी सिनेमा कसा वाईट आहे, हे सांगायला सुरुवात केलीये. ‘मारिघ्घेला टेररिस्ट’ असा हॅशटॅग देशातल्या समीक्षकांनी सुरू केला आणि आयएमडीबी (इंटरनेट मूव्ही डेटाबेस) या साईटवर त्याला एक स्टार मिळू लागलाय. 

ही घटना अर्थातच भारतातली नाही, ब्राझीलमधली आहे. दिग्दर्शक वाग्नर मौरा (नेटफ्लिक्सच्या ‘नारकॉस’ या मालिकेतील अभिनेता) यांच्या ‘मारिघ्घेला’ या चित्रपटाच्या संदर्भातली आहे. गेल्या वर्षीच्या बर्लिनाले (बर्लिनचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव)मध्ये ‘मारिघ्घेला’ पहिल्यांदा दाखवण्यात आला; तेव्हाच आपल्या या सिनेमाला आपल्या देशात खूप साऱ्या अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे, याची आपल्याला कल्पना असल्याचं दिग्दर्शकाने पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. हाएर बोल्सेनारो हे ब्राझीलचे अध्यक्ष झाल्यानंतर मौरा यांचा हा सिनेमा पूर्ण झाला. बोल्सेनारो हे कडवे उजव्या विचारसरणीचे आहेत आणि वेळोवेळी आपल्या भाषणांमधून त्यांनी एकाधिकारशाहीचं, हुकूमशाहीचं समर्थन केलंय. ज्या जनरल कार्लोस उस्तराने शेकडो लोकांचा छळ केला, त्यावर देखरेख केली; त्याला बोल्सेनोरा यांनी ‘ब्राझीलचा हीरो’ म्हणून संबोधित केलं होतं. पण, मौरा यांनी एका कम्युनिस्ट नेत्याच्या जीवनावर सिनेमा बनवला आणि त्याला हीरो केला, हे त्यांना अजिबात आवडलेलं नाही. कार्लोस मारिघ्घेलाने पोलीस  आणि लष्कराच्या सैनिकांच्या विरोधात हिंसक बंड करण्याची घोषणा केली होती, त्याला हीरो कसं करता येईल- असा त्यांचा प्रश्न आहे.

‘‘आमचं प्रशासन वर्णद्वेषी आहे. 1960 च्या काळात क्रांतिकारकांवर सरकारने ज्या पद्धतीने जुलूम केले, तसेच आज कृष्णवर्णीयांवर होताहेत,’’ असंही मौरा यांनी बर्लिनमधल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. 

‘मारिघ्घेला’ या वर्षीच्या इफ्फीमध्ये स्पर्धेत होता. दिग्दर्शक मौरा गोव्यात आलेही होते. सिनेमा संपल्यानंतर प्रेक्षकांशी गप्पा मारताना कोणी तरी त्यांना सांगितलं, ‘‘हाएर बोल्सेनोरा या तुमच्या राष्ट्राध्यक्षांना आमच्या प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलंय.’’ 

त्यावर आश्चर्य वाटून मौरा म्हणाले, ‘‘खरंच? हे चूक आहे. आमचे राष्ट्राध्यक्ष फॅसिस्ट आहेत, संकुचित आहेत. त्यांना का बोलावलंय?’’ 

‘‘आमचे पंतप्रधानही तर तसेच आहेत!’’ एक प्रेक्षक हळूच कुजबुजला. त्यांनतर मौरा आपल्या या कथानायकाविषयी बरंच बोलले. 

कार्लोस मारिघ्घेला हा ब्राझीलमधला एक राजकारणी, गुरिला सैनिक आणि लेखक होता. साल्वादोर इथे 1911 मध्ये त्याचा जन्म झाला आणि वयाच्या 58 व्या वर्षी साओ पावलो इथे पोलिसांच्या जाळ्यात सापडून तो मारला गेला. ‘मिनी मॅन्युअल ऑफ अर्बन गुरिला’ ही त्याने लिहिलेली पुस्तिका लष्करी राजवट उलथून पाडण्यासाठी काय करावं, हे सांगणारी आहे. ‘फॉर द लिबरेशन ऑफ ब्राझील’ नावाचं पुस्तकही त्याने लिहिलं. मार्क्सवादी लेनिनवादी विचारसरणीचा प्रभाव त्याच्यावर होता आणि सशस्त्र बंडाला त्याचा विरोध नव्हता. त्याला अनेक वेळा अटक झालेली होती, त्याने तुरुंगवास भोगलेला होता. कार्लोस मारिघ्घेलाच्या आयुष्याची एखाद्या सिनेमा दिग्दर्शकाला भुरळ पडली, तर त्यात नवल नाही. पण हिंसेवर विश्वास असणाऱ्या एका नेत्याची गोष्ट सांगताना आपल्याकडून त्या हिंसेचं समर्थन होणार नाही, याची काळजी दिग्दर्शकाने घ्यायला हवी होती. ‘मारिघ्घेला’मध्ये तसं घडताना दिसत नाही. 

मारिघ्घेलाचं त्याच्या मुलाबरोबरचं नातं, त्याच्यातला हळुवारपणा, आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठीची त्याची धडपड, त्याचं बेदरकार असणं यावरच मौरा यांचं संपूर्ण लक्ष केंद्रित झालंय- असं वाटत राहतं. अडीच तास लांबीच्या या सिनेमामध्ये मारिघ्घेलाचा आणि त्याच्या अगदी जवळच्या पाच-सहा सहकाऱ्यांचा प्रवास आपण पाहतो. त्या चित्रीकरणात सफाई आहे, एडिटिंग खूपच छान आहे, अभिनयाच्या बाबतीतही टीकेला जागा नाही. 

(काही जणांनी मारिघ्घेलाची व्यक्तिरेखा एका कृष्णवर्णीय अभिनेत्याला दिली म्हणून मौरा यांच्यावर टीका केलीये. पण ही टीका करणारे बहुतांश उजव्या विचारसरणीचे गौरवर्णीय आहेत. मारिघ्घेला हा गुन्हेगार होता आणि एका कृष्णवर्णीय नटाला घेऊन ‘मौराने सर्व कृष्णवर्णीय गुन्हेगार असतात, असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय,’ असं या मंडळींचं म्हणणं आहे. त्याला अर्थातच फारसं महत्त्व देण्यात अर्थ नाही.) अडीच तास कसे निघून जातात ते समजत नाही, इतकी प्रेक्षकाला गुंतवण्याची ताकद दिग्दर्शकाने दाखवलीये. पण लष्कराच्या मदतीने प्रशासनाची दडपशाही दाखवताना, दुसऱ्या बाजूने होणाऱ्या हिंसेचं समर्थन कसं करायचं?  स्वतंत्रपणे सिनेमा म्हणून ‘मारिघ्घेला’ एक उत्तम अनुभव देतो, यात शंकाच नाही. 

‘माय नेम इज सारा’ हा या तीनही सिनेमांमध्ये थोडा डावा वाटावा असा सिनेमा. 

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर 1942 मध्ये घडलेली ही सत्यकथा- तेरा वर्षांच्या सारा गोरालनिक या मुलीची. त्या वेळी स्वतंत्र पोलंडमध्ये (आणि आताच्या युक्रेनमध्ये) कोरेट नावाचं एक गाव होतं. गावात बहुसंख्य ज्यूंची वस्ती होती. कोरेटमध्ये ज्यूंबरोबरच पोलिश कॅथॉलिक्स आणि युक्रेनिअन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन्सही होते. या तीनही जमाती एकमेकांबरोबर बऱ्यापैकी गुण्यागोविंदाने राहत होत्या. पण व्यापारी असल्याने आर्थिक नाड्या ज्यूंच्या हातात होत्या. युक्रेनचे शेतकरी त्यामानाने गरीब, अर्धशिक्षित. पोलिश संस्थानिकांकडून त्यांचं शोषण केलं जायचं. रशियाने 1930 च्या दुष्काळात त्यांना अक्षरश: भुके मारलं होतं, असं इतिहास सांगतो. रशिया आणि जर्मनीच्या मधे असलेला हा भाग. भौगोलिक दृष्ट्या कोरेट रशियाच्या अधिक जवळचं. मात्र, युक्रेनच्या शेतकऱ्यांच्या मनात रशियनांप्रमाणेच श्रीमंत ज्यूंविषयीसुद्धा एक तिरस्काराची भावना होती. त्यामुळे जर्मनांच्या आक्रमणाचं त्यांनी स्वागतच केलं. 

मग दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याने कोरेटवर आक्रमण  केलं. युक्रेनच्या शेतकऱ्यांनी अतिशय आनंदाने त्यांचं स्वागत केलं. आपले ज्यू शेजारी मारले जाताहेत याचं फारसं सोयरसुतक या शेतकऱ्यांना नव्हतं. साराचं संपूर्ण कुटुंब नाझींनी मारून टाकलं. आपल्या मोठ्या भावाबरोबर सारा पळून जाण्यात यशस्वी ठरली. नाझी सैनिकांचा डोळा चुकवून दोघांनी युक्रेनच्या दिशेने जायला सुरुवात केली. हा प्रवास अर्थातच अतिशय खडतर होता. आपल्या भावाकडे पाहताक्षणी तो ज्यू आहे हे लक्षात येतं, हे माहीत असल्यामुळे साराने एका टप्प्यावर त्याला सोडून एकटीनेच प्रवास सुरू केला. ‘कोणत्याही परिस्थितीत पकडली जाऊ नकोस’ हे आईचे शेवटचे शब्द तेवढे तिच्या सोबतीला होते. 

एका छोट्या गावातल्या एका शेतकऱ्याने आणि त्याच्या बायकोने साराला आश्रय दिला. त्यांच्या दोन मुलग्यांना सांभाळण्याचं काम तिच्यावर सोपवलं. बदल्यात जेवण आणि राहायला पलंग. मात्र, सारा ज्यू नाही याची खात्री त्यांना करून घ्यावी लागली. सारानेही आपली ओळख लपवली. गावातल्या आपल्या ख्रिश्चन मैत्रिणीचं नाव घेतलं. तिच्याबरोबर खेळताना शिकलेल्या ख्रिश्चन धर्माशी संबंधित गोष्टी तिच्या उपयोगाला आल्या. पण असं स्वत:ची ओळख लपवून जगणं एका तेरा वर्षांच्या मुलीसाठी सोपं कसं असणार? 

दिग्दर्शक स्टीफन ओरिट यांच्या ‘माय नेम इज सारा’मध्ये साराची ही धडपड आपण पाहतो. मुळात कथेमध्येच खूप नाट्य असल्यामुळे सिनेमा बांधून ठेवतो पण साराचा प्रवास दिग्दर्शकाने अगदी सरळसोट पद्धतीने दाखवलाय. त्यामुळे सिनेमा एका ठरावीक उंचीवर जातो आणि त्याच उंचीवर सपाट होऊन संपतो. युक्रेनमधल्या त्या शेतकऱ्याच्या गावातल्या माणसांमध्येही थेट काळी-पांढरी माणसं आपल्याला भेटतात. त्यांच्यात फारशा ग्रे शेड्‌स दिसत नाहीत. या शेतकरी पती-पत्नीचं एक गुपित साराला कळतं. त्या वेळी ती पत्नीची बाजू घेते. का? दिग्दर्शक काही याचं उत्तर देत नाही. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सिनेमात मिळत नाहीत. कदाचित दिग्दर्शकाला फक्त सारावरच लक्ष केंद्रित करायचं असल्यामुळे त्याने बाकीच्या गोष्टी दुय्यम ठरवल्या असाव्यात. सिनेमा व्हिज्युअली अतिशय देखणा आहे; पण त्याला खोली नाही, स्तर नाहीत. जे दिसतं तेवढंच दिग्दर्शकाला सांगायचंय, त्या पलीकडे त्याला जायचंच नाहीये, असं वाटत रहातं. त्यामुळे सिनेमा चांगला वाटतो, उत्कृष्ट बनत नाही.

Tags: IFFI 2019 आल्मा हॅरेल शिआ लाबॉफ मारिघ्घेला स्टीफन ओरिट माय नेम इज सारा हाएर बोल्सेनोरा वाग्नर मौरा हनीबॉय तीन सत्यकथा मीना कर्णिक इफ्फी २०१९ Jair Bolsonaro Cinema Steven Oritt My Name Is Sara Shia LaBeouf Alma Harel Honeyboy Wagner Moura Marighella Teen Satyktha Meena Karnik FFI 2019 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके