डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये येणाऱ्या सिनेमांमधून काही नवे प्रयोग, नेहमीच्या सिनेमांपेक्षा हटके सिनेमे बघायला मिळावेत, अशी अपेक्षा असते. मात्र, काही वेळा एखादा हळुवार सिनेमा मनाचा ठाव घेतो. हलकाफुलका असूनही नवं काही सांगून जातो. अशाच काही ‘फील गुड’ सिनेमांविषयी... 

हिरोकाझू कोरिडा या जपानी दिग्दर्शकाचा ‘लाईक फादर लाईक सन’ हा सिनेमा दोन वर्षांपूर्वी गोव्याच्या चित्रपट महोत्सवामध्ये पाहिला होता (त्यावर ‘साधना’मध्ये लिहिलंही होतं). याच दिग्दर्शकाचा नवा सिनेमा ‘अवर लिट्‌ल सिस्टर’ या वर्षी दाखवला गेला. विषय वेगळा, पण ट्रीटमेंट तशीच. दोन्ही सिनेमे कुटुंबाविषयी बोलणारे, नातेसंबंधांची उकल करणारे. ‘लाईक फादर लाईक सन’ला एक थेट गोष्ट होती. ‘अवर लिट्‌ल सिस्टर’ला अशी गोष्ट नाही. घटना घडतात, त्याही आपल्या रोजच्या आयुष्यातल्या. फार नाट्यपूर्ण नाही आणि तरीही हा सिनेमा आपल्या मनाचा ठाव घेतो. त्यातल्या व्यक्तिरेखांमध्ये आपण पार गुंतून जातो. कॅमेरा कधीच वेगाने हलत नाही. सिनेमातल्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यातला संथपणा टिपायचा, तर त्याची गरजही नाही. पण म्हणून एक क्षणभरही तो कुठे कंटाळवाणा होत नाही. किंबहुना, सिनेमा संपतो तेव्हा लक्षात येतं की- एवढा सगळा वेळ आपल्या चेहऱ्यावर एक बारीकसं स्मित आहे. मी पाहिलेल्या 2015मधल्या गोव्यातल्या महोत्सवातील सिनेमांमधला मला आवडलेल्या पहिल्या तीन सिनेमांमध्ये मी ‘अवर लिट्‌ल सिस्टर’चा समावेश करेन.

ही गोष्ट आहे तीन- नव्हे, चार बहिणींची. यातल्या तिघी सख्ख्या बहिणी आहेत. जपानमधल्या कामाकुरा शहरात त्या राहताहेत- आईकडून वारसाहक्काने मिळालेल्या मोठ्या बंगलीवजा घरात. वडील पंधरा वर्षांपूर्वी घर सोडून दुसऱ्या बाईबरोबर निघून गेलेत. आईनेही मग मुलींना आजीच्या भरवशावर टाकून बाहेरची वाट पत्करलीये. सिनेमा सुरू होतो ती या मुलींना आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळते तिथपासून. दूर, एका गावात ते राहत असतात आणि त्यांनी तिसरं लग्न केलेलं असतं. तिन्ही मुली वडिलांच्या अंत्ययात्रेसाठी जातात आणि तिथे त्यांना भेटते वडिलांच्या दुसऱ्या बायकोची मुलगी- या तीन बहिणींची चौथी, पण सावत्र बहीण. मोठ्या बहिणीला या धाकटीचं एकटेपण जाणवतं. तिचं प्रौढासारखं वागणं दिसतं आणि आपल्या घरी परतताना ती या धाकटीला शहरात यायचं आमंत्रण देते. गाडी सुटतासुटता धाकटीही ‘मी येईन’, असं म्हणून मोकळी होते. आणि एक दिवस येतेही.

तीन बहिणींची ही छोटी बहीण त्यांच्या घरात कशी रमते, त्यांच्यातलीच एक कशी होते, त्यांचं नातं कसं फुलतं- हे सिनेमा आपल्याला सांगतो. अतिशय तरलपणे. लहान-लहान, रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांमधून. कधी हसवत, कधी गंभीर करत. उदाहरणार्थ- आपल्या आईमुळे या बहिणींपासून त्यांचे  वडील दुरावले, अशी अपराधी भावना धाकटीच्या मनात असते. माझी आई चांगली नव्हती, दुसऱ्याचा नवरा पळवणं चांगलं नाही, असं ती आपल्या मोठ्या बहिणीला सांगते, तेव्हा लग्न झालेल्या पुरुषाबरोबर अफेअर असणारी बहीण दचकते...

एक दिवस तिसरी बहीण धाकटीला विचारते- ‘मला आपले वडील आठवतच नाहीत. तू त्यांच्याबरोबर बराच वेळ घालवलास, शेवटच्या काळात त्यांची देखभाल केलीस. मला सांग ना थोडं आपल्या वडिलांविषयी...’ दुसरी एकदा दारू पिऊन टाईट होऊन घरी येते. तिसरी आपल्या धाकट्या बहिणीला म्हणते, ‘हिचा ब्रेकअप झालाय. दर वेळी ब्रेकअप झाला की ही अशीच येते...’

आपल्या वडिलांचं आवडतं ठिकाण दाखवण्यासाठी धाकटी मोठ्या बहिणीला डोंगरावर घेऊन जाते. समोर दरीत वसलेलं इटुकलं गाव. श्वास रोखून धरावं असं निसर्गाने उधळलेलं सौंदर्य. मोठी म्हणते, ‘आमच्या शहरातसुद्धा एक डोंगर आहे, तिथून साधारण असंच दृश्य दिसतं. फक्त आमच्याकडे नदीसुद्धा आहे.’ आणि मग दरीच्या दिशेने तोंड करून मोठी जोरात ओरडते, ‘आमचे वडील मूर्ख होतेऽ’. धाकटी या बहिणींकडे राहायला आल्यावर एक दिवस मोठी तिला आपल्याकडच्या डोंगरावर घेऊन जाते. या वेळी धाकटी ओरडते, ‘माझी आई मूर्ख होतीऽ’

छोट्या-छोट्या नेहमीच्या कामांमधून आपण या बहिणींच्या आयुष्यात डोकावतो, त्यांच्याशी ओळख करून घेतो आणि पाहता-पाहता त्यांच्यात अगदी गुंतून जातो. मग ते वाईन बनवणं असेल, आळीपाळीने स्वयंपाक करणं असेल, कपडे वाळत घालणं असेल, मोठी बहीण आणि आई यांच्यातला दुरावा असेल... किंवा मावशी-आजीबरोबरचं लाडाने वागणं असेल, इथे अशी कुठलीच गोष्ट घडत नाही, जी सर्वसाधारण लोकांच्या आयुष्यात घडणार नाही. कुणी व्हिलन नाही, की कुणी हीरो नाही. (या मुली तरुण आहेत, त्यांच्या आयुष्यात पुरुष आहेत; पण म्हणून या पुरुषांभोवती त्यांचं आयुष्य फिरताना दिसत नाही की त्यांचे निर्णय या पुरुषांच्या मर्जीनुसार होताना दिसत नाहीत, हे या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणायला हवं). या चारही बहिणी आपल्याला आपल्या वाटतात. सिनेमा संपल्यानंतरही खूप वेळ आपल्याबरोबर राहतात आणि मधूनच त्यांची आठवण आली की, चेहऱ्यावर हसू आणतात.

या सिनेमाच्या ट्रेलरची लिंक इथे दिलीये. वेळ मिळाला तर या चार बहिणींच्या आयुष्यात नक्की डोकवा.  

अर्जेंटिनाचा ‘एल सिंको’ (cinco असं स्पेलिंग आहे, उच्चार आपला आपण करायचा) ही एका फुटबॉलपटूची गोष्ट आहे. पॅटनला राष्ट्रीय पातळीवर खेळता आलेलं नाही, पण तो व्यावसायिक फुटबॉलपटू आहे. भडक माथ्याचा, पण उत्तम खेळाडू. त्याच्या क्लबसाठी जीव ओतून खेळणारा. स्थानिक लोकांचा लाडका. क्लब्जमधल्या स्पर्धेतल्या एका सामन्यात पॅटनच्या भडकूपणामुळे त्याला रेड कार्ड मिळतं आणि सलग आठ सामन्यांसाठी त्याच्यावर बंदी येते. हा निर्णय पचवणं अवघड असतं, पण त्याच वेळी हा आपल्या कारकिर्दीचा शेवट आहे याचीही जाणीव पॅटनला होते. तो निवृत्तीचा निर्णय घेतो. आपल्या बायकोला, आई- वडिलांना सांगतो.

खरा प्रश्न पुढेच असतो. निवृत्त झाल्यानंतर करायचं काय? फुटबॉल सोडून काहीही न येणाऱ्या पॅटनला पैसे कमावण्यासाठी आपण काय करावं, हे समजत नाही. शाळाही ज्याने पूर्ण केलेली नाही, त्याला कोणतं काम जमणार? आपण काही तरी व्यवसाय करूया, असं बायको सुचवते. मग सुरू होते चर्चा. वाटत असतं त्यापेक्षा ही निवड करणं खूप जास्त कठीण असतं. हा सिनेमा या निवडीपर्यंतच्या प्रवासाचा आहे. दिग्दर्शक एड्रियन बिनीयेझने एक साधी-सरळ गोष्ट सांगितली आहे. या सिनेमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सिनेमा पाहताना आपल्याला कधीही, कुठेही कॅमेऱ्याचं अस्तित्वच जाणवत नाही. आपली नजर म्हणजेच कॅमेरा- इतका तो गैरहजर आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणी आपण पॅटनच्या आजुबाजूला वावरत आहोत, त्याच्यासमोर बसून त्याचं आयुष्य पाहत आहोत, असं वाटत राहतं.

पॅटन आणि त्याची बायको, पॅटन आणि त्याचे आई-वडील, पॅटन आणि त्याचे सहकारी यांच्यातलं नातं मनाला भावतं. बायको त्याच्या निर्णयामध्ये पूर्णपणे त्याच्या सोबत असते; तर वडिलांना त्याने आणखी तीन-चार वर्षं तरी खेळत राहावं, असं वाटत असतं. पॅटनचा निर्णय कळल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांची प्रतिक्रिया आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावतात, तर गणित आणि इंग्लिश शिकण्याची पॅटनची धडपड पाहून आपल्याला गंमत वाटते. आणि शेवटी ज्या साधेपणाने तो आपला व्यवसाय निवडतो, ते पाहून आश्चर्यही वाटतं. खेळातला हा हीरो हे काम करणार? आणि त्याचे फॅन्स त्याला सहजपणे ते करू देणार? 

पॅटनच्या बायकोची व्यक्तिरेखा ही या सिनेमाची आणखी एक जमेची बाजू. नवऱ्यावर अतिशय प्रेम, पण म्हणून लोकांसाठी हिरो असलेला हा नवरा लाडावलेला नाही. त्यांचं नातं हे दोन समान पातळीवरच्या व्यक्तींचं नातं आहे. एवढंच नव्हे, तर तिचं आपल्या सासू-सासऱ्यांशी असलेलं नातंही खूप छान आहे. पॅटन निवृत्त होतोय, हे कळल्यावर त्याचे वडील नर्व्हस होऊन गच्चीवर जाऊन बसतात, तेव्हा ती त्यांची समजूत काढते, त्यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना धीर देते.

 या सिनेमाचं ट्रेलरही यू-ट्यूबवर (लिंक) उपलब्ध आहे.

पुढचे दोन सिनेमे आहेत- पोलंडचा ‘कार्ते ब्लान्श’ आणि न्यूझीलंडचा ‘द डार्क हॉर्स.’ या दोन्ही सत्यकथा आहेत. पैकी ‘कार्ते ब्लान्श’ ही एका शिक्षकाची गोष्ट आहे. दिग्दर्शक आहेत याशेक लुझिन्स्की. कॅस्पर इतिहासाचे शिक्षक आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत अगदी वेगळी, विद्यार्थ्यांना आवडणारी. आणि एका अपघाताच्या निमित्ताने आपली दृष्टी हळूहळू जात चालली आहे, हे कॅस्परला कळतं. शिक्षकासाठी डोळे नाहीत म्हणजे काहीच नाही. वाचायचं कसं? वर्गात शिकवायचं कसं? पण दुसरं काही करताही येत नाही. कॅस्पर मग ही गोष्ट केवळ आपल्या अगदी जवळच्या मित्राला सांगतो; तेही त्याने कुणालाही सांगायचं नाही- अगदी त्याच्या बायकोलाही नाही, या अटीवर.

सुरुवातीला कॅस्पर छोट्या-छोट्या गोष्टी करताना अडखळतो. वर्गाला लावलेलं कुलूप उघडताना, हजेरी घेताना, कॉरिडॉअरमधून चालताना, जिना उतरताना... त्यातून तो मार्ग काढू लागतो. हजेरी घेण्याची जबाबदारी वर्गातल्या एका मुलीवर देतो. आपल्या किल्लीचा आकार बदलून घेतो, कुणाला जाणवणार नाही अशा बेताने भिंतीच्या आधाराने चालतो. याच काळात त्याच्याचबरोबर शाळेत शिकवणाऱ्या बाईच्या प्रेमात पडतो. तिच्या मुलाशी कॅस्परची चांगली गट्टी होते. दोघे लग्न करायचं ठरवतात. मग मात्र तिला सत्य सांगणं भाग असतं. परिणाम? लग्न मोडतं. शाळेतल्या शिक्षकांच्या शारीरिक तपासणीतून निसटण्यासाठी कॅस्परची विद्यार्थिनी त्याला मदत करते. आपल्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेपर्यंत आपण तग धरायला हवा, या एका जिद्दीने कॅस्पर सगळ्या अडचणींवर मात करतो.

याही गोष्टीचा जीव फार मोठा नाही. पण कॅस्परची भूमिका करणाऱ्या आंद्रे शायरा या नटाच्या अभिनयामुळे सिनेमा एक वेगळीच उंची गाठतो. या कथेतही कुठे धक्के नाहीत की अनपेक्षित काही घडत नाही. काही काही गोष्टी तर अगदी टिपिकल आहेत. म्हणजे वर्गात एक उनाड मुलगा असणं, त्याने सुरुवातीला कॅस्परला त्रास देणं आणि नंतर त्याचं निवळणं किंवा एक बंडखोर मुलगी असणं आणि कॅस्परमुळे तिला परीक्षेला बसता येणं, वगैरे वगैरे. कॅस्परचं व त्याच्या मित्राचं नातंही विशेष आणि तरीही आपल्या ओळखीचं. म्हणजे हे मित्र एकत्र दारू पितात, पूल खेळतात, भांडतात. पण मैत्री इतकी घट्ट की, घटस्फोटाची वेळ आली तरी मित्र कॅस्परच्या आंधळेपणाविषयी बायकोला एका शब्दानेही सांगत नाही.

छोट्या-छोट्या घटना, लहान-लहान प्रसंग, इटुकली गोष्ट आणि खूप मोठा अनुभव. सत्यकथा असल्यामुळे अधिकच भावणारा. नेहमीच्या (सिनेमातल्या) पोलंडपेक्षा एक अगदी वेगळं वातावरण या सिनेमात पाहायला मिळालं, हेही महत्त्वाचं. ट्रेलर पाहायचाय? इथे पाहा.

न्यूझीलंडचा ‘द डार्क हॉर्स’ ही एका बुद्धिबळपटूची कहाणी आहे. जेम्स नेपिअे रॉबर्टसन हा याचा लेखक आणि दिग्दर्शक. नायकाची भूमिका केलीये क्लिफ कर्टिस या न्यूझीलंडमधल्या मोठ्या नटाने. जेनेसिस पोटिनी हा न्यूझीलंडचा हिरो आणि बुद्धिबळातला चॅम्पियन. माओरी जमातीमधला. दि. 5 सप्टेंबर, 1963 या दिवशी त्याचा जन्म झाला आणि मृत्यू 15 ऑगस्ट, 2011 रोजी. त्याला बायपोलार डिसऑर्डर होती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये वारंवार भरती करावं लागायचं. भरमसाट औषधं घ्यावी लागायची. पण म्हणून या पठ्ठ्याने हार मानली नाही.

सिनेमा सुरू होतो तो जेनेसिसच्या वेडसर वागण्यानेच. हॉस्पिटलमधून त्याला घरी जायची परवानगी मिळते ती  त्याच्या मोठ्या भावाच्या जबाबदारीवर. या भावाला हॉस्पिटलला जेनेसिसच्या प्रकृतीविषयी वेळोवेळी कळवायचं असतं. लहानपणी एकत्र राहिलेले, एकमेकांना आधार दिलेले हे भाऊ आज मात्र खूप दुरावले आहेत. जेनेसिसच्या भावाचा पब आहे, छोटे-मोठे गुन्हे करणाऱ्या गँगचं नेतृत्व तो करतोय. आपल्या पंधरा वर्षांच्या मुलालाही हेच काम करायला लावायचं, असं त्यानं ठरवूनही टाकलंय. अशात जेनेसिस त्याच्या घरी येतो. खरं तर, जेनेसिसने कुठेही राहावं, आपण हॉस्पिटलला काहीही सांगणार नाही- असं भावाचं म्हणणं असतं. पण जाण्यासारखी जागाच जेनेसिसपाशी नसते. काही काळ भावाबरोबर, काही काळ रस्त्यावर असा जेनेसिस राहतो. त्याचा एक मित्र त्यांच्या भागातल्या गरीब मुलांसाठी एक छोटासा क्लब चालवत असतो, तो जेनेसिसला आसरा देतो. जेनेसिसला जणू आपल्या आयुष्याचं ध्येयच सापडतं. स्वत:मध्ये असलेलं टॅलन्ट या लहान मुलांपर्यंत पोचवण्याचं आव्हान तो स्वीकारतो.

या मुलांना जेनेसिस बुद्धिबळ शिकवू लागतो. ‘द ईस्टर्न नाइट्‌स’ नावाचा त्यांचा एक क्लब स्थापन करतो. आपल्या पुतण्याला गुन्हेगारीच्या जगात जाण्यापासून परावृत्त करतो आणि त्याच्यातही बुद्धिबळाची आवड निर्माण करतो. द ईस्टर्न क्लब मग शहरातल्या एका चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होतो आणि त्यांच्यातला एक चुणचुणीत मुलगा चक्क जिंकतो! शहरी, टापटीप, नीटनेटक्या, उच्चभ्रू मुलांमध्ये विजोड वाटणारी ही मुलं आपला ठसा उमटवतात. जेनेसिसची भूमिका क्लिफ कर्टिस अक्षरश: जगलाय. आजवर आपण फोटोंमधून पाहिलेल्या न्यूझीलंडपेक्षा एक अगदी वेगळं जग दिग्दर्शकाने आपल्यासमोर उभं केलंय. यातली भाषा इंग्लिशच आहे, पण तरीही सिनेमाला सबटायटल्स आहेत; कारण या इंग्लिशचे उच्चार माओरी जमातीचे आहेत. हे जग चकचकीत नाही, असलंच तर काळोखं आहे. आणि या काळोख्या जगातला जेनेसिस सूर्यासारखा चमकतोय. इथेही, जेनेसिसची मुलं जिंकणार, हे आपल्याला माहीत आहे; पण तरीही जेनेसिसची उत्सुकता, उत्कंठा, धडधड आपणही अनुभवतो. बुद्धिबळातला हा डार्क हॉर्स आपल्याला जिंकून घेतो- अगदी सर्वार्थाने!

ट्रेलर पाहा आणि तुम्हीही जेनेसिसच्या कौतुकात सामील व्हा.

पृथ्वीच्या चार खंडांवर असलेल्या चार देशांमधल्या या चार सिनेमांनी प्रेक्षक म्हणून खूप समृद्ध केलं. वेगवेगळ्या संस्कृतींमधली पण आपल्यासारखीच सामान्य माणसं भेटली, त्यांच्या सुख-दु:खात रमायला झालं आणि पुन्हा एकदा सिनेमा वैश्विक असणं म्हणजे काय, हे समजलं. (पुढच्या वेळी इफ्फीमधल्या आणखी काही वेगळ्या सिनेमांविषयी)

Tags: द डार्क हॉर्स कार्ते ब्लान्श एल सिंको अवर लिट्ल सिस्टर मीना कर्णिक चार सिनेमे चार देश चार खंड 2015 इफ्फी The dark horse Carte Blanche el cinco Our little sister Meena Karnik cineme IFFI 2015 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके