डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दिग्दर्शक टिम मेलान्ट यांचा हा पहिलाच सिनेमा. लहान असताना आई-वडिलांनी त्यांना एका न्यूडिस्ट कॅम्पला नेलं होतं. एक मुलगा आणि त्याची अंध आई तो कॅम्प चालवत होते. ती आठवण मनाच्या एका कोपऱ्यात कायम राहिली आणि मग त्याची गोष्ट बनली. आपल्या नटांना नग्न वावरायला तयार करणं कठीण होईल, असं मेलान्टना वाटत होतं. पण तसं घडलं नाही. ‘‘आपल्याला कपड्यांशिवाय काम करायचंय म्हणून कोणीही मला नकार दिला नाही,’’ एका मुलाखतीत त्यांनी सांगितलंय. ‘‘कारण त्या  रहस्यमय वातावरणाचा ही नग्नता एक  महत्त्वाचा भाग आहे याची जाणीव त्यांना होती.  पण म्हणून हा सिनेमा नग्नतेविषयी नाही,  हेही त्यांना समजलं. आम्ही त्याकडे एक कॉस्च्युम  ड्रामा म्हणून बघितलं. कपडे न घालणं हीसुद्धा एक वेशभूषाच आहे, असं म्हटल्यानंतर त्यात खटकण्यासारखं काही राहतच नाही.’’ आयुष्यात दु:खाला सामोरं जाण्याविषयीचा हा सिनेमा म्हणूनच आगळा ठरतो.

‘पॅट्रिक’  आणि ‘द वीझल्स टेल’  हे इफ्फीमधले  लक्ष वेधून घेणारे दोन सिनेमे होते. खूप उच्च दर्जाचे  नसले,  तरी खास होते. त्यांच्याविषयी- 

दिग्दर्शक टिम मेलान्ट यांचा ‘पॅट्रिक’ हा बेल्जियम सिनेमा अर्थातच पॅट्रिकची गोष्ट सांगतो.  पॅट्रिक आपल्या वडिलांच्या नेचरिस्ट कॅम्पसाईटची  देखभाल करणारा 38 वर्षांचा पुरुष. किंचित मंद. शांत. कोणत्याही गोष्टीविषयी पट्‌कन प्रतिक्रिया न देणारा. आपल्या विश्वात रमणारा. त्याचं विश्व म्हणजे त्याचं वर्कशॉप. तिथे लाकडापासून विविध प्रकारचं फर्निचर तो  बनवतो. पण ते शहरात विकावं,  त्यातून एखादा नवा व्यवसाय उभा करावा,  असा विचारही त्याच्या मनात येत  नाही. 
     
आणि मग एक दिवस पॅट्रिकचे वडील आजारी पडतात. त्याच वेळी त्याचा खास हातोडा चोरीला जातो. पॅट्रिक अतिशय अस्वस्थ होतो. आयुष्यात पहिल्यांदाच वडिलांचा मृत्यूही त्याला या चोरीसमोर दुय्यम वाटत असतो. चोर  शोधून काढायचा आणि हातोडा परत मिळवायचा,  एवढा एकच ध्यास तो घेतो. 
       
हा सिनेमा त्याच्या या ध्यासाचीही गोष्ट आहे. आता यात वेगळेपण काय आहे, असा प्रश्न आपल्या मनात येतो. खरंच, असं काय आगळं आहे या सिनेमात? पॅट्रिकच्या वडिलांचा नेचरिस्ट कॅम्प आहे. म्हणजे, निसर्गाच्या सान्निध्यात एक कॅम्पसाईट विकत घेऊन त्यांनी  छोटी-छोटी कॉटेजेस बांधलेली आहेत. अनेक जोडपी तिथे  महिनोन्‌महिने राहतात. काही जोडपी एखाद्या आठवड्यासाठी येतात. यातली बहुतेक वयस्क आहेत. उरलेलं आयुष्य निसर्गाच्या सान्निध्यात घालवायचं म्हणून त्यांनी ही जागा निवडली आहे. 
        
मात्र, या जागेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. नेचरिस्ट कॅम्पमध्ये राहणारे सगळे संपूर्ण नग्नावस्थेत वावरत असतात. अर्थात,  नग्न राहणं हा इथला नियम नाही,  पण जीवनपद्धती आहे. पॅट्रिक आणि त्याचे वडील तसे वावरत असले तरी आई नाही. (ही आई अंध आहे आणि आपल्या  भोवती सगळे नग्नावस्थेत वावरताहेत याची तिला कल्पनाही नाही). बहुतेक जोडप्यांनी मात्र ही जीवनपद्धती अवलंबलेली आहे. त्यामुळे समोर पडद्यावर आपल्याला  बहुतेक माणसं नागड्याने फिरताना दिसतात. महत्त्वाचं म्हणजे,  त्यांचं नग्न असणं हा मुळी मुद्दाच नाही. निसर्गाच्या कुशीत, नैसर्गिक अवस्थेत जगणं इतकंच त्यांचं म्हणणं आहे.  
       
हे सगळं जरी असलं तरी सिनेमे सुरू झाल्यानंतर  सुरुवातीची काही मिनिटं आपण अस्वस्थ होतो. जागतिक  सिनेमा पाहण्याची सवय असणाऱ्यांना नग्नता खटकायचं  कारण नाही. पण तरीही एकाच वेळी, कोणतंही कारण  नसताना अशी नग्न फिरणारी माणसं पाहण्याची आपल्याला  सवय नसते. एरवी सिनेमाच्या पडद्यावर नग्नता येते ती काही ठोस कारणासाठी. मग ते कारण सेक्स दाखवणं असो किंवा क्रौर्य दाखवण्यासाठी असो. इथे तसं काहीच नाही. नेचरिस्ट कॅम्पमध्ये राहणारी माणसं- इतकंच त्यांच्या नग्नतेमागचं  कारण आहे. त्यामुळे,  अंगावर एकही कपडा नसलेली,  खुर्चीवर बसून कॉफी पिणारी जोडपी आपल्याला दिसतात.  कॅम्पसाईटच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी आलेली माणसं,  स्वयंपाक करणारी माणसं, भांडणारी माणसं,  एकमेकांना  आधार देणारी माणसं,  प्रेम करणारी माणसं,  काम करणारी  माणसं... सगळी नग्न. त्यांची नग्नता सोडली,  तर बाकी  सगळं नेहमीचं जगणं. 
         
पण होतं असं की,  दहा-पंधरा मिनिटांनंतर आपल्याला  प्रेक्षक म्हणून ही नग्नता जाणवत राहणं बंद होतं. आपणही  त्या जगाला एक नॉर्मल जग म्हणून स्वीकारतो. जंगलात आपलं आयुष्य शांतपणे जगणारे प्राणी पाहताना कुठे कधी ऑकवर्ड व्हायला होतं?  तसंच इथेही ती नग्नता आपल्या  अंगवळणी पडते किंवा आपण ती त्या निसर्गाचा भाग म्हणून स्वीकारतो आणि पॅट्रिकच्या गोष्टीत रमून जातो.  शेवटी आपण जोखायचा तो बाहेरच्या कपड्यांवरून नाही;  तर त्याच्या अंतरंगावरून,  त्याच्या वागण्यावरून, त्याच्या प्रामाणिकपणावरून. 
        
या सिनेमात विनोद आहे,  दु:खही आहे. आपल्या  प्रसिद्ध प्रियकराबरोबर वेळ घालवण्यासाठी म्हणून एक  तरुण मुलगी कॅम्पमध्ये येते. हा प्रियकरही काही  दिवसांपूर्वीच तिथे आलाय. ऑफिसच्या रजिस्टरमध्ये  पॅट्रिक तिचं नाव नोंदवून घेतो आणि तिची सूटकेस  घेण्यासाठी आपल्या काऊंटरवरून बाहेर येतो,  कोणाही  मॅनेजरने यावं,  तसा. पण त्याला त्या संपूर्ण नग्नावस्थेत  बघून त्या मुलीला मात्र धक्का बसतो.
        
‘‘तुझ्या अंगावर कपडे नाहीयेत!’’  ती त्याला म्हणते.  ‘‘हो.’’  असं उत्तर देत पॅट्रिक तिची बॅग उचलून शांतपणे  चालू लागतो. तिचे विस्फारलेले डोळे त्याच्या  खिजगणतीतही नसतात. आणखी एका प्रसंगात, कॅम्पमध्ये आलेला रॉकस्टार  अत्यंत गंभीरपणे पॅट्रिकला सल्ला देतो,  ‘‘तू एखादी गोष्ट जितकी जास्त शोधतोस तितकी ती सापडण्याची शक्यता  कमी होते. मला खूप मोठं व्हायचं होतं,  म्हणून मी खूप  प्रयत्न केले. पण मला यश मिळालं नाही. मग मी प्रयत्न  करणं थांबवलं आणि मला यश मिळालं. तेव्हा तुला जर  एखादी गोष्ट मनापासून हवी असेल,  तर ती आपल्याला  नकोय असं स्वत:ला सांगण्याचा प्रयत्न कर.’’ 
        
दुसऱ्या बाजूला, आपला हातोडा हरवला म्हणून प्रचंड  अस्वस्थ झालेला पॅट्रिक वडिलांच्या मृत्यूने एकट्या पडलेल्या आईचं सांत्वनही करत नाही. किंबहुना,  तसा  विचारही त्याच्या डोक्यात येत नाही. त्या बाबतीत तो अत्यंत अलिप्तपणे वागतो. मुळात पॅट्रिकच्या चेहऱ्यावर आपल्याला कोणत्याच भावना फार तीव्रतेने दिसत नाहीत. कॅम्पसाईटवरच्या एका वयस्क जोडप्यामधली बाई जॅमची एक्स्ट्रा बाटली मिळावी म्हणून पॅट्रिकबरोबर सेक्स करायला येते,  तेव्हाही तो  निर्विकार चेहऱ्याने तिची मागणी पूर्ण करतो. त्यावर ना  आनंद दिसतं,  ना समाधान. अगदी त्याला पोलीस अटक  करतात तेव्हाही त्याचा चेहरा तसाच, कोणत्याही भावना न  दाखवणारा.  
   
दिग्दर्शक टिम मेलान्ट यांचा हा पहिलाच सिनेमा. लहान असताना आई-वडिलांनी त्यांना एका न्यूडिस्ट कॅम्पला  नेलं होतं. एक मुलगा आणि त्याची अंध आई तो कॅम्प चालवत होते. ती आठवण मनाच्या एका कोपऱ्यात कायम  राहिली आणि मग त्याची गोष्ट बनली. आपल्या नटांना  नग्न वावरायला तयार करणं कठीण होईल,  असं मेलान्टना  वाटत होतं. पण तसं घडलं नाही. ‘‘आपल्याला कपड्यांशिवाय काम करायचंय म्हणून  कोणीही मला नकार दिला नाही,’’  एका मुलाखतीत त्यांनी  सांगितलंय. ‘‘कारण त्या रहस्यमय वातावरणाचा ही नग्नता  एक महत्त्वाचा भाग आहे याची जाणीव त्यांना होती. पण  म्हणून हा सिनेमा नग्नतेविषयी नाही,  हेही त्यांना समजलं.  आम्ही त्याकडे एक कॉस्च्युम ड्रामा म्हणून बघितलं. कपडे  न घालणं हीसुद्धा एक वेशभूषाच आहे,  असं म्हटल्यानंतर  त्यात खटकण्यासारखं काही राहतच नाही.’’ 
     
आयुष्यात दु:खाला सामोरं जाण्याविषयीचा हा सिनेमा म्हणूनच आगळा ठरतो. ‘द वीझल्स टेल’  हा अर्जेन्टिनाचा सिनेमा. दिग्दर्शक आहेत हुआन होसे काम्पानेला. गेल्या वर्षी इफ्फीमध्येच अर्जेन्टिनाचा दिग्दर्शक गॅस्तन द्युपार्त यांचा ‘माय मास्टरपीस’  नावाचा एक उत्तम सिनेमा बघितला होता. विनोदी, पण तरीही खूप काही सांगून जाणारा. ‘द वीझल्स टेल’  पाहायचं ठरवलं ते केवळ तो अर्जेन्टिनाचा होता आणि त्याचं कथासार विनोदी वाटलं म्हणून. या देशाच्या विनोदाच्या जातकुळीविषयी काही समजतंय का, असाही एक विचार मनात होताच. शिवाय,  2010 मध्ये दिग्दर्शक काम्पानेला यांच्या ‘द सीक्रेट इन  देअर आईज’ या सिनेमाला सर्वोत्तम परदेशी सिनेमाचं ऑस्कर मिळालं होतं. त्यानंतर इतक्या वर्षांनी त्यांनी हा नवा सिनेमा केला, ही माहितीसुद्धा महत्त्वाची होतीच. 
       
‘द वीझल्स टेल’  हा 1976 च्या मार्टिनेझ सुआरेझ या  नामवंत दिग्दर्शकाच्या ‘यस्टरडेज गाईज युज्ड नो आर्सेनिक’  या अतिशय गाजलेल्या सिनेमाचा रिमेक आहे. मात्र,  त्या सिनेमाची सर या सिनेमाला नाही, असं तो बघितलेल्यांचं  मत आहे. कोणे एके काळी सुपरस्टारपद अनुभवलेली उतारवयातली मारा. तिचा व्हीलचेअरवर असलेला, कोणे एके काळी छोट्या-मोठ्या भूमिका केलेला पती पेद्रो. जुन्या जमान्यातला  पटकथालेखक मार्टिन. आणि माराच्या काही सुपरहिट सिनेमांचा दिग्दर्शक नॉरबेर्तो. हे चार म्हातारे एका भल्या-मोठ्या बंगल्यात एकत्र राहताहेत. निवृत्तीनंतरचं आयुष्य शांततेत घालवणं ही सर्वसाधारणपणे निवृत्त लोकांची इच्छा असली, तरी इथे सगळं इतकं सोपं  नाही. सिनेमाच्या सुरुवातीलाच नॉरबेर्तो आपल्याला बंदुकीने वीझल्स मारताना दिसतो. हा कोंबड्या खाणारा  एक हिंस्र प्राणी. रात्रीच्या त्या शांत, अंधाऱ्या वातावरणात बंदुकीचा आवाज मारालाच नव्हे, आपल्यालाही  दचकवतो.
        
एकमेकांबरोबर काम केलेलं असल्यामुळे, एकमेकांचे गुण-दुर्गुण माहीत असल्यामुळे आणि एकमेकांना अंतर्बाह्य ओळखत असल्यामुळे या मैत्रीत गोडव्याबरोबर कडूपणाही आहे. एकमेकांना उपहासाने बोलणं आहे. एकमेकांच्या कमकुवतपणाविषयी बोचकारणं आहे. एकमेकांना त्रास देणं आहे. मार्टिन आणि नॉरबेर्तो यांच्या बायका त्यांच्याबरोबर का नाहीत, असा प्रश्न आपल्याला पडतो;  पण कालांतराने त्याचं उत्तरही मिळतं. पेद्रोने त्याच्या मते अतिशय देखणी, पण भीषण अशी त्यांची  काढलेली पोर्ट्रेट्‌स आपल्याला दिसतात. आपलं आयुष्य अगदी संथ चाललंय आणि त्यात आता एका व्हिलनची गरज आहे,  असं मार्टिन म्हणतो आणि बंगल्याच्या  आवारात एक गाडी शिरते. एक तरुण मुलगी बार्बरा आणि मुलगा फ्रॅन्सिस्को, ‘रस्ता  चुकलोय’ असं म्हणून या बंगल्यात येतात. (कोणती  व्यक्तिरेखा कोणत्या प्रकारे वागणार,  हे दिग्दर्शक आपल्यापासून जराही लपवू मागत नाही.) बंगला पाहून माराला तो विकण्यासाठी राजी करू बघतात. तिने पुन्हा  आपलं करिअर सुरू करावं,  म्हणून तिला भरीला घालू लागतात. माराचं मन तिथे झुकतंय हे दिसू लागल्यावर तिघे  मित्र एकत्र येतात आणि मग जणू काही सिनेमाची कथा लिहावी, दिग्दर्शित करावी आणि अभिनित करावी,  अशा जोमाने बार्बरा आणि फ्रॅन्सिस्कोला हरवण्याच्या तयारीला लागतात. त्यासाठी कोणत्याही स्तराला जायची त्यांची  तयारी असते. 
         
या सिनेमाची हाताळणी विनोदी पद्धतीने तर केलेली आहेच, पण पडद्यावर घडलेली गोष्ट ही नाटकासारखी पेश  केलीये असं वाटत राहतं. त्यातली दृश्यं,  संवाद,  बदलणारी लोकेशन्स नाटकातल्यासारखी आहेत. बंगल्यातल्या खोल्यांमध्ये जुन्या सामानाची गर्दी आहे. त्यामुळे आपण नाटकाच्या सेटवर असल्याची भावना होते. संवाद अतिशय धारदार आहेत. एकूणच, या चार म्हाताऱ्यांच्या करामती इतक्या ‘ओव्हर द टॉप’  म्हणाव्यात अशा आहेत की, आपल्याला त्या पाहताना मजा येत राहते. सिनेमाच्या सुरुवातीलाच आपलेच जुने सिनेमे पाहून रडणारी मारा असो,  की आपला मित्र वाईट ॲक्टर आहे  म्हणून आपल्या कथेतला क्लायमॅक्स त्याला न सांगणारे  मार्टिन आणि नॉरबेर्तो असोत- त्यांचं तिरकस वागणं कथेला टोक आणतं. ‘वय झालं म्हणून आम्हाला मोडीत काढू नका’ हे ठासून सांगतं. ‘पॅट्रिक’ काय किंवा ‘द वीझल्स टेल’  काय,  रोज चार-चार सिनेमे पाहताना थोडं रिलॅक्स करतात. थिएटरमधून बाहेर पडताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक छोटं हसू असतं.  एक चांगला अनुभव मिळाल्याचं समाधान असतं. 

Tags: IFFI 2019 the weasel's tale patrick नग्नता नचरिस्च कॅम्पस हातोडा मीना कर्णिक पॅट्रिक बेल्जियम सिनेमा nagnta hatoda pyatrick Belgium film weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके