डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या सिनेमाच्या निमित्ताने मिशेल हिजनॅविशसची एक मुलाखत वाचनात आली. तो म्हणतो, ‘‘गोदारच्या व्यक्तिरेखेची चेष्टा करण्याचा प्रयत्न करत असतानाच मी प्रेक्षकांच्या मनात त्याच्याविषयी करुणा निर्माण होईल, हेही बघितलंय. माझा नायक हा महान जाँ लु गोदार असल्यामुळे काही वेळा आपण त्याच्याकडे एक संकल्पना म्हणून बघतो, माणूस म्हणून नाही. मात्र, हा सिनेमा केवळ गोदारवर नाही, तर त्यात काही गंभीर विषयांवरही भाष्य आहे. माझ्या मते, ‘रिडाऊटेबल’चा खरा विषय आहे रॅडिकॅलिझम. आणि तो आजच्या काळाशी संबंधित आहे. हल्ली खूप हुशार लोकांशी बोलताना लक्षात येतं की- त्यांच्याबरोबर चर्चा होत नाहीये, ते बोलताहेत आणि आपण ऐकतोय असं होऊ लागलंय.

‘अ स्टुपिड आयडिया!’ जाँ लु गोदारची ही प्रतिक्रिया त्याच्यावर सिनेमा निघतोय हे कळल्यावरची होती.

गोदार म्हणजे दिग्दर्शकांचा दिग्दर्शक. फ्रेंच न्यू वेव्ह सिनेमाच्या जनकांपैकी एक. सुरुवातीला चित्रपट समीक्षक असलेल्या गोदारने 1960 मध्ये ‘ब्रेथलेस’ हा आपला पहिला पूर्ण लांबीचा सिनेमा बनवला. त्यानंतर तब्बल 54 वर्षं गोदारने सिनेमे केले. त्याचा शेवटचा सिनेमा ‘गुडबाय टु लँग्वेज’ हा 2014 मध्ये प्रदर्शित झाला आणि कान चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धेत त्याचा समावेश होता. गोदारने थ्रीडीमध्ये केलेल्या या सिनेमाचं समीक्षकांनी खूप कौतुक केलं, मात्र त्या वर्षीचं कानचं प्रसिद्ध ‘पाम अ दोर’ काही या सिनेमाला मिळालं नव्हतं. पण महत्त्वाचं हे की, 84 वय असतानाही या दिग्दर्शकाची सिनेमा बनवण्याची ओढ कमी झालेली नव्हती. अजूनही त्याने आपली निवृत्ती जाहीर केलेली नाही. आपल्या दीर्घ कारकिर्दीत गोदारने आजवर 43 सिनेमे दिग्दर्शित केलेले आहेत. अशा महान दिग्दर्शकावरच सिनेमा करावा, असं एखाद्या दिग्दर्शकाला वाटलं तर त्यात आश्चर्य काहीच नाही.

‘रिडाऊटेबल’ हा सिनेमा गोदारवर असला, तरी तो काही त्याचा जीवनपट नाही. 1967 च्या अखेरीपासून ते 1968 पर्यंतचाच काळ इथे आपल्याला दिसतो. गोदारची दुसरी पत्नी ॲन विएझेमस्काय हिने लिहिलेल्या आठवणींच्या पुस्तकावर दिग्दर्शक मिशेल हिजनॅविशसचा (2011 मध्ये ‘द आर्टिस्ट’ या त्याच्या ब्लॅक अँड व्हाईट मूकपटाला सर्वोत्कृष्ट ऑस्करचा पुरस्कार मिळाला होता. याच दिग्दर्शकाने चेचन्यामधील तणावावर ‘द सर्च’ नावाचा सिनेमा 2014 मध्ये केला होता, ज्यावर मी ‘साधना’मध्ये लिहिलंही होतं) हा सिनेमा आधारलेला आहे. पण म्हणून ती गोदार आणि ॲन यांची प्रेमकथाही नाही. ॲन ज्या काळात गोदारच्या आयुष्यात आली तो आणि त्यानंतरचा काळ दिग्दर्शक व माणूस म्हणूनही गोदार कसा बदलला, हे दाखवणारा आहे.

सिनेमा सुरू होतो तेव्हा गोदारने ‘ला शिनुआस’ (1967) पूर्ण केलेला आहे. त्यातली नायिका ॲन विएझेमस्काय हिच्या तो प्रेमात आहे. गोदार 37 वर्षांचा आणि ॲन 19 वर्षांची आहे. ती अर्थातच गोदारच्या व्यक्तिमत्वाने, त्याच्या दिग्दर्शक म्हणून असलेल्या लौकिकाने भारावलेली आहे. त्यांच्यातले सुरुवातीचे बहुतेक संवाद हे ‘तो बोलतोय आणि ती ऐकतेय’ अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे गोदार लग्नाची मागणी घालतो  तेव्हा ॲनच्या नकाराचा प्रश्नच नसतो.

‘ला शिनुआस’ या आपल्या नव्या सिनेमाविषयी गोदारच्या खूप अपेक्षा आहेत. कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रचार करणाऱ्या सिनेमाचं चीनमध्ये नक्कीच कौतुक होईल, याची खात्रीही त्याला आहे. दुर्दैवाने तसं होत नाही. खुद्द फ्रान्समध्ये सिनेमाच्या प्रिमिअरला गोदारला पेंगणारे प्रेक्षक दिसतात. वर्तमानपत्रांमधून येणारी परीक्षणं टीकेची चांगलीच झोड उडवतात. पण गोदारला त्याची फिकीर नसते. किंबहुना, त्याच्यातल्या दिग्दर्शकापेक्षा त्याच्यातला ॲक्टिव्हिस्ट अधिक प्रबळ होताना आपल्याला दिसतो. फ्रान्समध्ये 1968 च्या मे महिन्यात पराकोटीची अशांतता निर्माण झाली होती. राष्ट्राध्यक्ष चालर्‌स द गॉल यांच्या विरोधातला असंतोष शिगेला पोचला होता. तरुण मुला-मुलींनी रस्त्यावर येऊन निदर्शनं करायला सुरुवात केली होती. जिकडे-तिकडे लाल झेंडे फडकत होते आणि क्रांतीच्या घोषणा ऐकू येऊ लागल्या होत्या. राजकीय पक्षांना नागरी युद्ध किंवा थेट क्रांती होईल की काय, अशी भीती वाटू लागली होती. या घटनांनी फ्रान्समध्ये राजकीय उलथापालथ झाली नाही; तरी त्यातून फ्रान्सची सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक वीण बदलली, असं मानलं जातं.

गोदारला कम्युनिस्ट विचारसरणी जवळची होतीच. स्वाभाविकच तरुणांच्या या बंडामध्ये तो सामील झाला. आपणच केलेले आधीचे सिनेमे त्याला भंकस वाटू लागले. आपला सगळा भूतकाळच तो नाकारू लागला होता. लोकांना आपला सिनेमा आवडेनासा झालाय, हे त्याला पचवता येत नव्हतं आणि मग त्या सगळ्याचा दोष तो प्रेक्षकांच्या माथी मारू लागला होता. तरुणांच्या मोर्च्यांमध्ये सामील होत असताना ‘तुम्ही पूर्वीसारखे सिनेमे का बनवत नाही?’ या प्रश्नाने चिडू लागला होता. ज्या गोदारला फ्रान्सने आणि जगाने डोक्यावर घेतलं होतं, तो चळवळीच्या गदारोळात हरवू लागला होता. सिनेमावरची त्याची पकड सुटू लागली होती आणि दृष्टी धूसर होऊ लागली होती.

‘रिडाऊटेबल’मध्ये गोदारच्या चष्म्यावर म्हणूनच भाष्य आहे, विनोदी पद्धतीने. गोदार आपला चष्मा कधीच उतरवत नाही. अपवाद फक्त संभोग करतानाचा. मात्र, मोर्च्यात सामील झालेला असताना पोलिसांचा लाठीमार सुरू होतो आणि ॲनबरोबर पळताना त्याचा चष्मा खाली पडतो. धावणाऱ्या लोकांच्या पायाखाली त्याचा चक्काचूर होतो. मग समोरचं सगळं जग धूसर दिसू लागल्याने त्याला ॲनचा आधार घ्यावा लागतो. हे असं नंतर दोन-तीन वेळा घडतं आणि प्रत्येक वेळी आपण हसतो. पोलिसांनी मदत केल्यानंतर त्यांना ॲन धन्यवाद देते तेव्हा तो ताबडतोब, ‘पोलिसांना कधीच थँक यू म्हणायचं नसतं. ते शोषणाचं प्रतिनिधित्व करतात,’ अशी तंबी देतो, तेव्हाही आपल्याला मजा वाटते.

हा सगळा सिनेमाच विनोदाच्या आधाराने पेश केला गेलाय. एका बाजूला कम्युनिझमवर निष्ठा सांगणारा गोदार आपल्या वैयक्तिक आयुष्यात स्वत:चं मोठेपण सतत अधोरेखित करत असतो, गोदार म्हणून मिळणारा मानसन्मान ऐषोआराम त्याला हवासा वाटत असतो. यातला दुटप्पीपणा असेल किंवा त्याच्या विचारसरणीमधला विरोधाभास असेल- दिग्दर्शक हलक्या-फुलक्या पद्धतीने तो आपल्याला दाखवतो. इथे गोदारला कमी लेखण्याचा तो प्रयत्न करतोय, असं कुठेही वाटत नाही. मात्र, एका महान दिग्दर्शकाच्या आयुष्यातल्या अतिशय महत्त्वाच्या काळाची मांडणी करताना तो गोदार या नावाने दबूनही गेलेला नाही. हिजनॅविशस कधीही गोदारला भेटलेला नाही, हेही कदाचित त्यामागचं कारण असू शकेल. म्हटलं तर ही गोदारची शोकांतिका आहे. त्याचा हट्टीपणा, त्याला वाटणारा मत्सर, त्याचा दुराग्रहीपणा अशा सगळ्या भावना  आपल्याला पाहायला मिळतात. कान चित्रपट महोत्सव बंद पाडल्यानंतर आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर पॅरिसला परत येत असताना गाडीत त्यांना घालून-पाडून बोलणारा गोदार... स्वत:सकट सुरुवातीच्या काळात ज्यांना आदर्श मानलं अशा रेनॉ, लँग सारख्या दिग्दर्शकांना झिडकारणारा गोदार... ‘कलावंतांनी म्हातारं होण्याआधी पस्तिशीमध्येच मरून जायला हवं’ असं विधान करणारा गोदार... कम्युनिस्ट तरुणांच्या बैठकीला गेलेला आणि गच्च भरलेल्या हॉलमध्ये अपमान झाल्यानंतर बावचळून जाणारा गोदार... आपल्याच चाहत्यांशी उद्धटपणे वागणारा गोदार... ॲन तीन महिने दुसऱ्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला इटलीला जाणार, हे कळल्यावर दुखावणारा गोदार, तिला भेटायला गेल्यावर मत्सरापोटी तिच्या नायकाशी वाईट वागणारा गोदार... ॲनला खिजवणारा आणि मग त्याचा पश्चात्ताप होणारा गोदार... या दिग्दर्शकाची विविध रूपं इथे आपल्याला पाहायला मिळतात. एक माणूस म्हणून गोदार आपल्यासमोर उभा राहतो. आपल्या देशात बायोपिक करताना त्या व्यक्तीला जवळपास देवत्व दिलं जातं. कितीही मोठा असला तरी माणूस म्हटलं की ,त्याच्यात गुणांबरोबर दोषही येणार. पण गुणांबरोबरच हे दोष किंवा आपल्या नायकाची नकारात्मक बाजू दाखवण्याचं धाडस फार कमी दिग्दर्शकांमध्ये असतं.

या सिनेमाच्या निमित्ताने मिशेल हिजनॅविशसची एक मुलाखत वाचनात आली. तो म्हणतो, ‘‘गोदारच्या व्यक्तिरेखेची चेष्टा करण्याचा प्रयत्न करत असतानाच मी प्रेक्षकांच्या मनात त्याच्याविषयी करुणा निर्माण होईल, हेही बघितलंय. माझा नायक हा महान जाँ लु गोदार असल्यामुळे काही वेळा आपण त्याच्याकडे एक संकल्पना म्हणून बघतो, माणूस म्हणून नाही. मात्र, हा सिनेमा केवळ गोदारवर नाही, तर त्यात काही गंभीर विषयांवरही भाष्य आहे. माझ्या मते, ‘रिडाऊटेबल’चा खरा विषय आहे रॅडिकॅलिझम. आणि तो आजच्या काळाशी संबंधित आहे. हल्ली खूप हुशार लोकांशी बोलताना लक्षात येतं की त्यांच्या बरोबर चर्चा होत नाहीये, ते बोलताहेत आणि आपण ऐकतोय असं होऊ लागलंय. त्यांची विचारसरणी टोकाची होऊ लागलीये. पारंपरिक अर्थाने मी डाव्या विचारांच्या बाजूने झुकलेला माणूस आहे. जगभरात उजवी विचारसरणी वाढत चाललेली आहे याची काळजी मलाही वाटते. पण दुसऱ्या बाजूला डाव्या विचारांचे माझे अनेक मित्रही आता खुल्या मनाने काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाहीयेत, असं माझ्या लक्षात येऊ लागलंय. विएझेमस्कायच्या पुस्तकातला मला सर्वांत विनोदी वाटलेला भाग म्हणजे, ‘ला शिनुआस’ पाहून चिनी लोकही गोदारला ‘तुला आमची विचारसरणी समजलेली नाही’ असं सांगतात! माझा सिनेमा मी त्यावरच बेतलेला आहे.’’

लुई गॅरेल या नटाने गोदारची व्यक्तिरेखा भन्नाट साकारलीये आणि ॲनची भूमिका केलीये स्टेसी मार्टिनने. हिजनॅविशसच्या प्रत्येक सिनेमात बेरेनिस बेजो ही अभिनेत्री असतेच. ‘द आर्टिस्ट’ आणि ‘द सर्च’ची ती नायिकाच होती. इथे त्या मानाने तिची भूमिका दुय्यम असली तरी महत्त्वाची आहेच. (एक माहिती म्हणून, हिजनॅविशस आणि बेजो हे नवरा-बायको आहेत). लुई गॅरेल आणि तरुण गोदारमधलं साम्य जसं आपल्याला जाणवतं, तसंच स्टेसी मार्टिनला ॲन म्हणून बघताना ‘ला शिनुआस’मधली खरी ॲन आठवत राहते.

मगाशी म्हटल्याप्रमाणे ही हलकी-फुलकी शोकांतिकाच आहे. सिनेमाचा शेवट तर ही जाणीव अधिकच तीव्र करतो. गोदारने झिगा व्हेरतॉव नावाचा एक ग्रुप स्थापन केल्यानंतर सिनेमाच्या निर्मितीमध्येही साम्यवादी विचारसरणी हवी, सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायला हवेत- असं ठरतं. गोदारसारख्या दिग्दर्शकाला एखादा शॉट कसा घ्यायचा यासाठी बहुमताने होणारा निर्णय मान्य करावा लागणं, ही शोकांतिका नाही म्हणायची तर काय? एका परदेशी समीक्षकाने लिहिल्याप्रमाणे, रिडाऊटेबल इज द स्टोरी ऑफ अ फिल्ममेकर हू फेल आऊट ऑफ लव्ह विथ द वर्ल्ड. जगाशी प्रेमभंग झालेल्या एका दिग्दर्शकाची ही गोष्ट आहे. हसवणारी, मनोरंजन करणारी, रिझवणारी आणि मनाला किंचित वेदना देत अंतर्मुख करणारीही.

यु-ट्यूबवर असलेल्या ‘रिडाऊटेबल’च्या ट्रेलर  इथे पहा. 

Tags: ॲन विएझेमस्काय मीना कर्णिक रिडाऊटेबल बाप दिग्दर्शकाचं माणूसपण! इफ्फी 2017 रिडाऊटेबल मिशेल हिजनॅविशस जाँ लु गोदार Redoubtable baap digdarshkache manuspan! Meena Karnik IFFI 2017 Redoubtable Michel Hazanavicius Jean-Luc Godard Anne Wiazemsky weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात