डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जाफर पनाहींचा मास्टरपीस आणि असत्याचा चक्रव्यूह

दि. 20 ते 30 नोव्हेंबर (2015) दरम्यान गोव्यामध्ये पार पडलेल्या 46व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मास्टरपीस म्हणावा असा सिनेमा अजून सापडलेला नाही, असं मागच्या अंकातल्या लेखात लिहिल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक जाफर पनाही यांचा ‘टॅक्सी’ हा सिनेमा पाहिला आणि तमाम प्रेक्षकांना भरून पावल्याची भावना झाली. त्या आणि ‘लॅबिरिन्थ ऑफ लाईज’ या दुसऱ्या एका सिनेमांविषयी-

पडद्यावर रस्ता दिसतोय. क्रॉस करणारी माणसं. लाल सिग्नल. सिग्नलचा रंग बदलतो आणि कॅमेऱ्याबरोबर आपण पुढे सरकू लागतो. क्षणात लक्षात येतं की, एवढा वेळ दिसणारं दृश्य हे सिग्नलला थांबलेल्या वाहनातून आपल्याला दिसत होतं. आता आपणही डॅशबोर्डवर ठेवलेल्या कॅमेऱ्याच्या साह्याने त्या वाहनाबरोबर प्रवास करू लागतो. रस्त्यावरचा एक जण हाक मारून गाडी थांबवतो आणि ती टॅक्सी असल्याचं लक्षात येतं. झट्‌कन ड्रायव्हर कॅमेऱ्याचा अँगल बदलतो. आता टॅक्सीच्या आत बसलेल्या प्रवाशाचा चेहरा आपल्याला दिसू लागतो. हा एक टिपिकल इराणी पुरुष. मग आणखी एक प्रवासी टॅक्सीत शिरतो. ही बाई. वर्तमानपत्रातल्या बातमीवरून दोघांमध्ये बोलणं सुरू होतं. लहानसहान चोरीसाठीसुद्धा फाशीची शिक्षा द्यायला हवी म्हणजे चोरांना दहशत वाटेल- असं पुरुषाचं मत; तर बाईला वाटतंय; छोट्या-मोठ्या चोऱ्या करणाऱ्यांची परिस्थितीही समजून घ्यायला हवी- कठोर शिक्षेमुळे गुन्हे कमी झाल्याचं आकडेवारी सांगत नाही...

टॅक्सीचा प्रवास तेहरानभर चालू राहतो. वेगवेगळे प्रवासी टॅक्सीत चढतात आणि उतरतात. त्यांच्या बोलण्यातून-वागण्यातून दिग्दर्शक आपल्याला खूप काही सांगू लागतो. आणि मधेच चढलेला एक प्रवासी (हा पायरटेड डीव्हीडीजचा विक्रेता आहे आणि प्रसिद्ध अमेरिकन मालिका आणि परदेशी सिनेमे पुरवणं, हा त्याचा व्यवसाय आहे.) ड्रायव्हरला ओळखतो. ‘मिस्टर पनाही?’ होय, टॅक्सी चालवणारा चक्क जाफर पनाही आहे. (पनाहींनी याआधीही स्वत:च्या सिनेमांमध्ये भूमिका केलेल्या आहेत).

जाफर पनाही हे इराणच्या न्यू वेव्ह सिनेमाच्या प्रणेत्यांपैकी एक. इस्लामी देश असल्याने इराणमध्ये सिनेमे बनवण्यावर प्रचंड प्रतिबंध आहेत. त्याचे चटके किंचितही राजकीय भाष्य करणाऱ्या अनेक दिग्दर्शकांना बसलेले आहेत. मोहसेन मख्मलबाफ आणि असगर फरहादी यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकांनी देश सोडून जायचा निर्णय घेतला. आज ते फ्रान्समध्ये राहताहेत आणि आपल्याला हवा तो सिनेमा बनवताहेत.

पनाहींची गोष्ट थोडी वेगळी आहे. सन 1995 मध्ये जाफर पनाहींनी ‘द व्हाईट बलून’ हा आपला पहिला सिनेमा बनवला. एका लहान मुलीची ती गोष्ट होती. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांचा ‘द मिरर’ हा सिनेमा आला. या दोन्ही सिनेमांमधून लहान मुलींची गोष्ट सांगितलेली होती. मात्र, 2000 मध्ये ‘द सर्कल’ हा सिनेमा केला आणि त्यांनी सरकारी नाराजी ओढवून घेतली. सिनेमाच्या नायिका होत्या चार बायका आणि इस्लामी राजवटीमध्ये त्यांच्यावर होणारा अन्याय. जगभरातल्या विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या सिनेमाने पारितोषिकं मिळवली, तरी इराणमध्ये स्वाभाविकच या सिनेमावर बंदी घातली गेली. पनाहींनी 2003 मध्ये ‘क्रिमसन गोल्ड’ नावाचा सिनेमा केला. एक गरीब मुलगा दागिन्यांच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न करतो, फसतो आणि असं कृत्य करण्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली, हे आपल्याला या सिनेमातून दिसतं. सरकारने या सिनेमातल्या अनेक दृश्यांना आक्षेप घेतला, कात्री लावायला सांगितली. पनाहींनी अर्थातच ते मान्य केलं नाही.

‘ऑफसाईड’ हा त्यांचा 2006 मध्ये आलेला सिनेमा इराणमध्ये प्रदर्शितच झाला नाही. चार मुली पुरुषाचा वेष करून फुटबॉलचा सामना पाहायला जातात, त्याची ही गोष्ट. इराणमध्ये मुलींना फुटबॉलचे सामने पाहण्यास बंदी होती. पुरुषांचे उघडे पाय आणि घट्ट टी-शर्टस, रांगडी भाषा त्यांनी पाहणं अयोग्य आहे- असा फतवा सरकारने काढला होता. खुद्द पनाहींच्या मुलीला फुटबॉल सामना बघण्यासाठी गेलेली असताना स्टेडियममध्ये प्रवेश मिळालेला नव्हता आणि तिने चोरून तो सामना बघितला होता. एक प्रकारे ही सत्यकथाही होती आणि पनाहींच्याच म्हणण्यानुसार, ‘फुटबॉलचा सामना म्हणजे एक प्रतीक होतं. महिलांना  सरकारकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी वापरण्यात आलेलं प्रतीक.’ या सिनेमाच्या असंख्य पायरटेड कॉपीज इराणभर विकल्या गेल्या. इराणच्या वतीने हा सिनेमा ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट परदेशी सिनेमाच्या विभागाकरता पाठवला जावा, आणि त्यासाठी किमान आठवडाभर तो इराणमध्ये प्रदर्शित केला जावा अशी विनंती या सिनेमाच्या अमेरिकतेल्या वितरकांनी इराण सरकारला केली होती; जी अर्थातच धुडकावून लावण्यात आली.

पनाहींनी ‘द अकॉर्डियन’ नावाची एक डॉक्युमेंटरी 2010 मध्ये केली. इराणमध्ये चित्रपटनिर्मितीसाठीचा काळा काळ दाखवण्याकरता आपण ही डॉक्युमेंटरी केली, असं त्यांनी म्हटलंय. याच सुमारास, म्हणजे 1 मार्च, 2010 या दिवशी इराण सरकारने जाफर पनाही, त्यांची पत्नी, मुलगी आणि त्यांचे पंधरा सहकारी यांना अटक केली. त्यांच्यावर कोणती कलमं लावण्यात आली आहेत, याचा कोणताही खुलासा सरकारने केला नाही. दीडेक महिन्यानंतर सरकारने माहिती दिली की, पनाही 2009 मधल्या अहमदेनिजाद यांच्या वादग्रस्त पुनर्विजयानंतर झालेल्या विरोधावर डॉक्युमेंटरी करत असल्यामुळे ही अटक झालेली आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या विरोधात गुन्हा आणि देशाची प्रतिमा मलिन करणे या आरोपांखाली पनाहींवर खटला भरण्यात आला आणि त्यांना दोषीही ठरवलं गेलं.

सहा वर्षांचा तुरुंगवास आणि सिनेमा करण्यावर 20 वर्षांसाठी बंदी, असं त्यांच्या शिक्षेचं स्वरुप होतं. मात्र, आंतरराष्ट्रीय दबावामुळे असेल बहुधा- पण तुरुंगवासाची त्यांची शिक्षा कमी करण्यात आली. घरकैदेत त्यांना ठेवलं गेलं. आज ते आपल्या देशात फिरू शकत असले तरी; त्यांच्यावर पोलिसांचं लक्ष असतं, सिनेमे करायची परवानगी त्यांना नाही आणि ते परदेशी प्रवासही करू शकत नाहीत. अपवाद फक्त हजला जायचं असेल तर किंवा उपचारांसाठी जावं लागलं तर. खरं म्हणजे, देश सोडून निघून जाणं पनाहींसाठी अशक्य होतं, असं नाही. पण आपण इथेच राहून आपल्याला जे हवं ते करणार, ही त्यांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी अत्यंत प्रामाणिक राहून ते आपलं काम करताहेत. म्हणजेच, सिनेमे करताहेत. पण कसे?

सन 2011 मध्ये खटला चालू असताना पनाहींनी ‘धिस इज नॉट अ फिल्म’ नावाचा डॉक्युमेंटरीवजा सिनेमा केला. आपल्या फोनवरून त्यांनी एक व्हिडिओ डायरी केली, ज्यात ते सरकारने त्यांना दिलेल्या धमक्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात. कधी आपल्या शेजाऱ्यांशी फोनवर बोलताना दिसतात, कधी टीव्हीवर बातम्या पाहताना दिसतात. त्या वर्षीच्या कान चित्रपट महोत्सवामध्ये अचानक सरप्राईज एन्ट्री म्हणून या सिनेमाच्या नावाची घोषणा करण्यात आली. इराणमधून तो बाहेर कसा पोचला? सिनेमा असलेला एक पेनड्राइव्ह एका केकमध्ये लपवून इराणमधून चक्क तो स्मगल करण्यात आला. पनाहींची पत्नी आणि मुलगी कानच्या त्या महोत्सवाला हजर होत्या.

त्यानंतर दोन वर्षांपूर्वी आला ‘क्लोज्ड कर्टन्स’. एक लेखक आपल्या सुनसान बीच हाऊसवर राहतोय. सरकारने फतवा काढलाय की, यापुढे कुणालाही कुत्रे पाळता येणार नाहीत. आपल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी हा लेखक लपून राहतोय. घराचे पडदे कायम बंद. अशातच पोलिसांपासून पळणारे दोघे या घरात आसरा मागतात. शेवटी खुद्द पनाहीसुद्धा आपल्याला दिसतात. इथेही कुत्रा प्रतीकात्मकच आहे. याही सिनेमावर इराण सरकारने बंदी घातलेली आहे. त्या वर्षीच्या बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये ‘क्लोज्ड कर्टन्स’चा प्रिमिअर होईल, असं जाहीर केलं गेलं. बर्लिनला येण्याचं आमंत्रणही पनाहींना मिळालं; पण सरकारने त्यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली नाही.

आणि मग, या वर्षीच्या सुरुवातीला पुन्हा एकदा बर्लिनमध्ये पनाहींच्या नव्या सिनेमाचा प्रिमिअर होईल, अशी घोषणा झाली- तोच हा ‘टॅक्सी’. या वर्षीच्या स्पर्धेत ‘टॅक्सी’ला सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी गोल्डन बेअर पुरस्कारही मिळाला. तो घेण्यासाठी पनाहींची छोटी भाची गेली होती. तिने सिनेमात कामही केलंय. किंबहुना, या छोटीला आपल्या प्रोजेक्टचा भाग म्हणून सिनेमा करायचाय. त्यासाठी पनाहींचं मार्गदर्शन हवंय. टॅक्सीतली तीही एक प्रवासीच आहे. पण ते नंतर. त्या आधी अनेक जण टॅक्सीत चढतात आणि उतरतात. दोन म्हाताऱ्या बायका आहेत. त्यांच्या हातातल्या काचेच्या जारमध्ये एक गोल्ड फिश आहे. दुपारचे बारा वाजायच्या आत तो गोल्ड फिश अमुक एका ठिकाणी नेला नाही तर आपण मरणार, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या निमित्ताने समाजातल्या अंधश्रद्धांवर दिग्दर्शकाने टिप्पणी केलीये.

मग एक जोडपंही आहे. रस्त्यावर अपघात होतो, नवऱ्याला मार लागतो आणि माणसं पनाहींच्या टॅक्सीत या दोघांना बसवतात... टॅक्सी हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागते. आपण आता मरणार, असं नवऱ्याला वाटतं आणि आपल्या भावांनी बायकोवर अन्याय करू नये म्हणून तो आपली शेवटची इच्छा मोबाईलवर चित्रित करायला सांगतो.

पनाहींचा एक मित्र त्यांना भेटायला बोलावतो. टॅक्सीत बसतो आणि आपल्याला एका चोराने कसं लुटलं, ते सांगतो. मुख्य म्हणजे, चोराला आपण ओळखलंय; तो गरीब आहे म्हणून आपण पोलिसात जाणार नाही, असंही तो सांगतो.

पनाहींची भाची टॅक्सीत बसते ती तिच्याजवळचा हँडिकॅम चालू करूनच. एका नवरदेवाच्या खिशातून पडलेले रस्त्यातले पैसे उचलणाऱ्या एका मुलाचं चित्रीकरण ती आपल्या या कॅमेऱ्यावर करते आणि माणसं कशी चांगली असतात हे दाखवायचं, तर तुला ते पैसे परत करायला हवेत, असंही त्याला सुनावते. सर्वांत महत्त्वाचं आहे ते शॉर्ट फिल्म करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याची टीचरने दिलेली यादी, ही छोटी मुलगी वाचते ते. यात अनेक सूचना आहेत. पुरुषाची व्यक्तिरेखा सज्जन असेल तर तिला टाय लावलेला दाखवायचा नाही. पुरुषांची नावं ही धार्मिक संतांचीच असायला हवीत. राजकारण, अर्थकारण  आणि समाजकारण यावर कोणतंही भाष्य करायचं नाही. आणि मुख्य म्हणजे, सिनेमा वास्तववादी असता कामा नये. या सगळ्याचं पालन केलं तर सिनेमा ‘डिस्ट्रिब्युटेबल’ होतो, असं टीचरचं म्हणणं असतं!

इराणमधल्या दिग्दर्शकांचा सामना नेमका कोणत्या गोष्टींशी आहे, हे पनाही आपल्याला अगदी सहजपणे सांगतात. तेवढंच नाही- तर, जे दिग्दर्शक हे मान्य करतात त्यांचेच सिनेमे प्रदर्शित होऊ शकतात, हेही आपल्याला कळतं. अनेक दिग्दर्शकांनी सरकारपुढे शरणागती पत्करलीय याचीही मग जाणीव होते. आणि शेवटी पनाही आपल्या एका वकील मैत्रिणीला टॅक्सीत लिफ्ट देतात. फुटबॉलचा सामना पाहायला गेलेल्या मुलींना पोलिसांनी पकडलंय, त्यावर या दोघांची चर्चा होते. आपल्याला जमेल तसं मानवी हक्कांसाठी आपण काम करत राहायला हवं, असं ही मैत्रीण सांगते.

या सगळ्या व्यक्तिरेखांना- त्या अगदी खऱ्याखुऱ्या आहेत- भेटताना आणि त्यांचं बोलणं ऐकताना अचानक लक्षात येतं की, त्यांच्या चर्चेतले सगळे विषय आपल्या ओळखीचे आहेत. कारण पनाहींच्या वेगवेगळ्या सिनेमांमधून ते आपण बघितलेले आहेत. जाफर पनाही नावाच्या थोर दिग्दर्शकाला मग आपण पुन्हा एकदा सलाम करतो. सिनेमाचा शेवटही अफलातून आहे. टॅक्सीचा प्रवास संपतो तो शेवट आणि त्यानंतरचा क्रेडिट्‌सचा शेवटही. या सिनेमाला क्रेडिट्‌सच नाहीत. ती का नाहीत, हे सांगणारं विधान तेवढं शेवटी आपल्यासमोर येतं.

‘टॅक्सी’मधून पनाहींनी पुन्हा एकदा आपल्या देशातल्या सेन्सॉरशिपवर भाष्य केलंय आणि त्याच वेळी आपण या दडपणांना बळी पडणार नाही, हेही दाखवून दिलंय, देशातच राहून, देशातच सिनेमे बनवून. किती जणांमध्ये असेल हे धैर्य? आणि त्याचे परिणाम भोगायची तयारी?

पनाहींचा हा सिनेमा इराणची बदनामी करणारा आहे का? त्या देशाच्या सरकारला तरी तसं ठामपणे वाटतंय. आपल्याकडे नाही का, पुरस्कार परत करणारे लेखक जगभरात भारताची बदनामी करताहेत, असं अनुपम खेरसकट अनेक उजव्या विचारसरणीच्या मंडळींचं म्हणणं आहे. देशाची बदनामी ही सरकारच्या दडपशाहीमुळे होतेय, हे इराण सरकारला जसं कळत नाही; तसंच भारताची मान खाली जाते ती अखलाखच्या खुनासारख्या घटनांनी- त्या घटनांचा निषेध करण्यामुळे नाही हे आपल्याला खरंच  कळत नाही का? की कळतंय, पण वळत नाहीये?

लॅबिरिन्थ ऑफ लाईज- जर्मनीचं पापक्षालन

देशातल्या मोठ्या अधिकाऱ्यांनी केलेले गुन्हे चव्हाट्यावर आणणं, त्यांच्यावर खटला चालवणं आणि त्यांना शिक्षा होईल, असे प्रयत्न करणं म्हणजे देशाच्या विरोधात काम करणं नाही- असं सांगणारा आणखी एक सिनेमा या महोत्सवामध्ये बघितला. सिनेमाचं नाव होतं, ‘लॅबिरिन्थ ऑफ लाईज’. किंचित फिल्मी, व्यावसायिक सिनेमाच्या अंगाने जाणारा, पण अत्यंत ताकदीचा असा हा सिनेमा. ‘टॅक्सी’च्या तुलनेत किती तरी कमी, पण तरीही महत्त्वाचा वाटावा असा.

दुसऱ्या महायुद्धात हिटलरचा पराभव झाला की आपण थांबतो. मित्रपक्ष जिंकले, जर्मनी हरली, हिटलरने आत्महत्या केली... पण याचा अर्थ जर्मनीतला नाझीवाद लगेच संपला का? हिटलरबरोबर असलेल्या अधिकाऱ्यांचं लगेच मनपरिवर्तन झालं का? ज्यूंबद्दल त्यांच्या मनात असलेल्या तिरस्काराचं रूपांतर प्रेमात झालं का? मानवी पातळीवर त्या वेळी जर्मनीत कोणती उलथापालथ झाली असेल? कोण कोणाकडे मित्र म्हणून आणि शत्रू म्हणून पाहत असेल? असे अनेक प्रश्न आपण कधी विचारलेलेच नसतात. आपणच नव्हे, तर युद्धातल्या पराभवातून सावरलेल्या जर्मनीनेही सुरुवातीला हे सगळे प्रश्न दडवून टाकले होते. जणू काही त्याविषयी बोललं नाही तर ते घडलंच नव्हतं, असं वाटेल!

जर्मनीतील न्युरेनबर्ग इथे 1945 ते 49 या दरम्यान युद्धातल्या नाझी गुन्हेगारांवर 13 खटल्यांची मालिका चालवली गेली. नाझी पक्षातले अधिकारी, वकील, डॉक्टर्स, उद्योगपती यांच्यावर मानवतेविरुद्ध गुन्हे केल्याचे आरोप दाखल करण्यात आले. हिटलरने आत्महत्या केल्यामुळे त्याच्यावर खटला दाखलच झाला नाही. पण न्युरेनबर्ग ट्रायल झाली ती मित्र राष्ट्रांच्या पुढाकारातून. इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका यांनी असा खटला चालवणं आवश्यक आहे असं ठरवल्यामुळे. (खटला न चालवता शिक्षा ठोठावण्याचा प्रस्ताव आला होता, पण तो फेटाळला गेला). अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेला हा पहिलाच खटला. मात्र न्युरेनबर्गच्या खटल्यात देश म्हणून स्वत: जर्मनीचा कोणताही सहभाग नव्हता.

‘लॅबिरिन्थ ऑफ लाईज’ची गोष्ट न्युरेनबर्ग ट्रायल्सची नाही; ती आहे जर्मनीने स्वत: चालवलेल्या एका खटल्याची. सत्यकथेवर आधारलेली. वर्ष आहे 1958. एक वयस्क पुरुष रस्त्यातून चाललाय. कुंपणाच्या पलीकडे एक शाळा आहे आणि काही शिक्षक बाहेरच्या मैदानात गप्पा मारत उभे आहेत. या पुरुषाकडे सिगारेट आहे, पण माचीस नाही. शिक्षकांमधला एक जण पुढे होतो आणि ‘लाईट हवा का?’ असं विचारतो. पुरुष ‘हो’ म्हणण्यासाठी मान वर करतो आणि शिक्षकाचा चेहरा पाहून पांढराफट्टक पडतो.

शहरातलं न्यायालय. एक पत्रकार काही वकिलांसमोर रागारागाने बोलतोय. ‘‘आजही आपल्याकडे नाझी अधिकारी शिक्षक म्हणून काम करताहेत. ऑश्विट्‌झसारख्या छळछावणीमध्ये काम केलेले. त्यांना शोधून काढावं आणि त्यांच्यावर खटले दाखल करावेत, असं तुम्हाला वाटत नाही?’’ बहुतेक वकील पत्रकाराकडे दुर्लक्ष करून निघून जातात. त्यांच्यातच आहे नुकताच कामाला लागलेला तरुण जोहानन रॅडमन (ॲलेक्झांडर फ्लेहिंग)- ऑश्विट्‌झविषयी फारशी माहिती नसलेला. (हे पचवणं थोडं कठीण जातं. पण असो). तो आपल्या सहकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो; पण प्रत्येकाकडून एकच उत्तर येतं, ‘‘आम्ही ऑश्विट्‌झविषयी काहीच ऐकलेलं नाही.’’

रॅडमनचा शोध सुरू होतो. ऑश्विट्‌झमध्ये नाझींनी केलेल्या छळाच्या एकेक कहाण्या त्याच्यासमोर उलगडू लागतात. कुणाच्या लहान मुलीचा जीव गेलेला असतो, कुणी आपल्या कुणा जिवलगाची भिंतीवर डोकं आपटून हत्या केल्याचं सांगतं... अंगावर शहारे आणणाऱ्या कहाण्या. त्याचा बॉस फ्रिट्‌झ बॉअर त्याच्या पाठीशी ठाम उभा राहतो. वाटेत अनेक अडचणी येतात. कारण अजूनही नाझी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे खूप जण समाजात असतातच. एक वेळ तर अशी येते की, हताश रॅडमन दारू पिऊन रस्त्यातल्या येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला, ‘तू होतास का नाझी, तू केलेस का अत्याचार?’ असं वेड्यासारखं विचारू लागतो.

रॅडमनच्या बरोबर असतो त्याचा पत्रकार मित्र आणि त्या मित्राचा मित्र- जो ज्यू असतो आणि ऑश्विट्‌झच्या छळछावणीत काही काळ त्याने घालवलेला असतो. नाझी अत्याचारांना बळी पडलेले आणि त्यातून बचावलेले असे अनेक जण रॅडमन शोधून काढतो. त्यांच्या जबान्या घेतो. नाझी अधिकाऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी अनेक कागदपत्रं उलथीपालथी घालतो. ‘ऑलवेज डू द राईट थिंग’ असं सांगणारे वडील हे रॅडमनचे आदर्श असतात. मात्र, तेही नाझी होते हे एके दिवशी कळल्यावर रॅडमन पार कोसळतो. हार मानतो. काम सोडतो. भरपूर पैसे देणारी नोकरी स्वीकारतो. अपराधीपण आणि असत्य यांच्या चक्रव्यूहात हरवून जातो.

या नव्या नोकरीत आपण ज्या वकिलाबरोबर काम करणार आहोत, त्याने एका माजी नाझी अधिकाऱ्याचं वकीलपत्र घेतलेलं होतं, हे रॅडमनला कळतं आणि तो पुन्हा पेटून उठतो. आपलं काम पूर्णत्वाला नेतो. ऑश्विट्‌झमध्ये ज्यूंचा असह्य छळ केलेल्या 8000 लोकांपैकी शेकडो अधिकाऱ्यांवरचे खटले जर्मनीमध्ये सुरू होतात आणि सिनेमा संपतो.

यांतल्या फार कमी लोकांना प्रत्यक्ष शिक्षा झाली; त्याहीपेक्षा कमी लोकांनी आपण जी कृत्यं केली, त्याविषयी पश्चात्ताप होत असल्याचं म्हटलं. पण मुद्दा तो नाही. एका जर्मन माणसाला आपल्या देशाने केलेल्या गुन्ह्यांचा शोध घ्यावासा वाटला, तसा तो त्याने घेतला आणि त्या देशाने गुन्हेगारांवर खटले दाखल केले, ही घटनाही त्या देशाविषयी खूप काही सांगून जाते. देशात घडलेल्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात उभं राहणं म्हणजे देशाच्या विरोधात उभं राहणं होत नाही; देशाची बदनामी करणं होत नाही. किंबहुना, अशा चुका स्वीकारूनच कोणताही देश पुढे जाऊ शकतो; त्या चुका लपवून नाही. जर्मनीकडे ते धाडस होतं.

आज आपल्या देशात सरकारच्या विरोधात एखादा शब्द काढला, तरी तुमच्यावर देशविरोधी असल्याचा ठपका ताबडतोब ठेवला जातोय. परदेशात देशाची बदनामी होत असल्याची हाकाटी पिटली जातेय. इथे भारताची तुलना नाझी जर्मनीशी करण्याचा हेतू अजिबातच नाही किंवा इराणमध्ये पनाहींना जे सोसावं लागतंय त्याची व्याप्तीही किती तरी मोठी आहे. ती असहिष्णुता किंवा तशी सेन्सॉरशिप आपल्याकडे नाही. पण आपण त्या दिशेने हळूहळू का होईना- प्रवास करू लागलोय का, हा प्रश्न मात्र विचारायची गरज भासू लागलीये. (पुढच्या अंकात काही हळुवार आणि सुखावणाऱ्या सिनेमांविषयी)

Tags: मीना कर्णिक इफ्फी लॅबिरिन्थ ऑफ लाईज टॅक्सी जाफर पनाही चित्रपट महोत्सव इराण गोवा जर्मनी जाफर पनाहींचा मास्टरपीस आणि असत्याचा चक्रव्यूह Labyrinth of Lies Germany Taxi Iran Jafar Panahi Film Festival Goa Meena Karnik Jafar Panahincha Masterpeice Aani Asatyacha Chakravyuh IFFI:2015 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके