डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गांधीजींचे बलिदान- सत्य काय आणि असत्य काय?

30 जानेवारी. एका माथेफिरूच्या गोळीने महात्मा गांधी या दिवशी हुतात्मा झाले. या शतकातील जगातील सर्व देशातील सर्वात महान माणूस असा जागतिक स्तरावरील प्रचंड बहुमताने म. गांधीचा गीरव नुकताच करण्यात आला. पण अशा महात्म्यावर गोळ्या झाडल्याचे घृणास्पद कृत्य राष्ट्रहिताचे म्हणून काही जणांच्या कडून सातत्याने गौरवले गेले. या देशातील अनेकांच्या दिशाभूल करण्यात हे गोबेल्सचे प्रचारतंत्र काही प्रमाणात यशस्वीही झाले. याबाबत सतत व सर्वत्र विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना गुजरातमधील ज्येष्ठ सर्वोदयवादी श्री. चुनीभाई वैद्य यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत. याबरोबरच ही मानसिकता निर्माण करणाच्या गोडसेवाद्यांना काही मर्मभेदी सवाल. पूज्य महात्मा गांधींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

गोडसेने म्हटले होते की त्याने दोन कारणांसाठी गांधींची हत्या केली. 

1. गांधीजींनी देशाच्या विभाजनाला मंजुरी दिली आणि 

2. जे पाकिस्तान आपल्यासमोर युद्धासाठी उभे ठाकले होते त्याला भारत सरकारकडून 55 कोटी रुपये द्यावयास लावले. हे दोन मुद्दे असे होते की कुणालाही खुन्नस चढावा. याबाबत काय?

:गांधीजींच्या हत्येचे एकूण आठ वेळा प्रयत्न झाले हा इतिहास आहे. मात्र त्यांतील सहा प्रकारांची लिखित नोंद आम्ही मिळवू शकलो आहोत. त्यांचा आरंभ खूप पूर्वी 1934 पासून झाला आहे. त्यांतील तीन प्रसंगांत नथूराम गोडसे सामील होता. आणि दोन प्रयत्नांत पुण्यातील कट्टर रुढिवादी होते. या सहा पैकी चार प्रसंग घडले तेव्हा देशाचे विभाजन आणि 55 कोटी रुपयांची गोष्ट कुणाच्या स्वप्नातसुद्धा नव्हती. तर मग त्यावेळी हत्येचा प्रयत्न का करण्यात आला? थोडक्यात सांगायचे तर... पाप करण्यासाठी काहीतरी निमित्त हवे असते आणि ते तर हवे तेव्हा त्याला मिळतच असते. 

1934 साली पुणे म्युनिसिपालिटीने गांधीजींचा सम्मान करण्याचे ठरविले होते. समारंभाच्या स्थानी जात असताना त्यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आला. परंतु चुकीमुळे बाँब पुढच्या गाडीवर पडला, गांधीजी मागल्या गाडीत होते. या हल्ल्यात म्युनिसिपालिटीचे मुख्य अधिकारी दोन पोलिस आणि अन्य मिळून एकूण सात जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्याच्या वेळी 55 कोटी रुपयांची गोष्ट तरी होती का? पण तरीही हा जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.

जुलै 1944 मध्ये गांधींजी पांचगणीमध्ये होते. तेव्हा एक माणूस हातात सुरा घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेला होता. हा माणूस अन्य कुणी नसून नथूराम गोडसेच होता अशी साक्ष पुण्याच्या सूरती लॉजचे मालक मणिशंकर पुरोहित यांनी दिली होती.

तिसरा प्रयत्न याच वर्षी सप्टेंबरमध्ये झाला. महंमद अली जिनांसोबत वाटाघाटी करण्यासाठी गांधी मुंबईस जात होते. या प्रसंगाचा गैरफायदा घेण्यासाठी पुण्याहून टोळके वर्ध्याला गेले होते. त्यापैकी एक ग.ल. थत्ते नावाच्या माणसाकडून पोलिसांनी एक सुरा जप्त केला होता. थत्तेने आपल्या बचावात सांगितले होते की त्याला गांधीजी ज्या मोटारीत बसणार होते त्या मोटारीचे टायर फोडायचे होते. परंतु प्यारेलालजींनी लिहून ठेवले आहे की त्यांना त्या दिवशी सकाळीच पोलिस अधिकारी डी.सी.पी. चा फोन आला होता की निदर्शक काही अमंगल घटना घडविण्याचा कट शिजवूनच येणार आहेत. 

29 जून 1946 रोजी चौथा प्रयत्न करण्यात आला. खास ट्रेनने गांधीजी मुंबईहून पुण्याला जात होते, तेव्हा नगर आणि कर्जतच्या मध्ये रुळावर मोठे दगड ठेवून ट्रेन उलटून टाकण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते. रात्रीची वेळ असूनही मोटरमनच्या सावधानतेमुळेच केवळ गंभीर अपघात टळला. इंजिनाचे मात्र नुकसान झाल्याची नोंद आहे. यावेळी भारत पाकिस्तान विभाजनाची चर्चा होती हे खरे पण गांधीजी त्या घटनेस प्राणपणाने विरोध करीत होते हेसुद्धा तितकेच खरे. त्यांनी म्हटले होते की देशाचे विभाजन माझा मुडदा पडल्यावरच शक्य होईल. मी तर 125 वर्षे जगणार आहे या गांधीच्या वाक्यांचा उल्लेख नथुराम गोडसेने त्याच्या ‘अग्रणी’ नावाच्या अंकात केला होता व पुढे म्हटले होते, ‘पण जगू कोण देतो?’ म्हणजे त्यांना जिवंत कोण ठेवणार? गांधीजींच्या हत्येचा त्याचा निर्धार तेव्हापासूनच ठरलेला होता. 

20 जानेवारी रोजी मदनलाल पहवा याने बाँम्ब फेकून गांधीजींच्या हत्येचा निष्फळ प्रयत्न केला आणि 30 जानेवारी रोजी नधुराम गोडसेने गांधीजींचा खून केला. 12 जानेवारी 1948 नंतरच्या या हत्येच्या प्रयत्नांच्या वेळीच देशाचे विभाजन आणि 55 कोटी रुपयांचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यापूर्वी तर हे प्रश्नच नव्हते. 

मुसलमानांना गांधीजींनी लाडावून ठेवले होते त्यामुळेच पाकिस्तानची निर्मिती झाली का? 

:माणसा-माणसांतले मतभेद तीन टण्प्यांमध्ये होत असतात. प्रथम मनामध्ये आपपरभाव उभा राहतो. ही मतभेदाची बीज स्वरूपी प्रथमावस्था. दुसरा टप्पा दोघांमधल्या ताणतणावांचा आणि शाब्दिक बोलाचालीचा, आणि शेवटी तिसरा टप्पा म्हणजे दोघांमधली भिंतीचा म्हणजेच मतभिन्नतेचा. भारत अखंड राखण्यासाठी हिंदुत्ववादी जितके आग्रही होते तितकेच गांधीजी आणि त्यांच्या सोबतचे राष्ट्रवादी नेतेसुद्धा होते. देशाचे विघटन होऊ नये, देश अखंड राहावा असे दोहोंनाही वाटत होते. परंतु दोघांच्या पद्धती मात्र देगळ्या होत्या. हिंदुत्ववादी लोक मुसलमानांना सांगत होते की तुम्ही म्लेंच्छ आणि यवन आहात. आपण एकत्र राहू शकू हे खरे, पण हा देश आमचा आहे. हा भारतवर्ष आहे, इथे तुम्ही परके असलात तरी तुम्ही इतरत्रही राहता नये. आमच्या सोबतच राहावयास हवे . आम्ही या देशाचे पहिले हक्कदार आहोत, आम्ही तुम्हाला ठेवू तसेच राहायला हवे. गांधीजी आणि त्यांच्या विचाराचे अन्य राष्ट्रवादी मानत होते की मुसलमानांना ‘तुम्ही परके आहात, परके आहात’ असे हिणवण्यामुळे त्यांच्यात परकेपणाची भावना निर्माण होईल आणखी त्यात सातत्याने वाढ होत राहील. हृदयापासून आपुलकी दाखविली तरच ती निर्माण होईल आणि परकेपणाची भावना दूर होईल.

हिंदू समाजातल्या जात-पात, उच्च-नीच या भेदभावानेसुद्धा यात महत्वाचा वाटा उचलता आहे. या देशात मुसलमानांची संख्या एवढी वाढती कशी? हिंदू समाजातल्या जाती-पातींच्या व उच्च-नीचतेच्या राजकारणाला कंटाळून पूर्वीच्या काळी अनेकजणांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. आज आपल्या देशात , पाकिस्तानात आणि बांगला देशात जे मुसलमान आहेत ते एकेकाळी हिंदूच होते. त्यातले अगदी थोडे मूळ अरबस्तानातले असतील, अगदी निवडून कढावे इतकेच. म्हणजे मूळ रक्त हिंदूंचेच आहे. परंतु विघटनवादी हिंदूंनी त्यांच्या दुफळीच्या व्यवहाराने मुसलमानांमध्ये परकेपणाची भावना निर्माण केली. इतिहासात पुरावे सापडतील की काश्मिरमधील मुस्लिम एकेकाळी हिंदू धर्मात परत येऊ इच्छीत होता पण काशीच्या पंडितांनी लंबाचौडा शास्त्राधाराचा बडगा दाखवून त्यास विरोध केला.

ही परकेपणाची दरी पिढीगणीक रुंदावत गेली. इंग्रज राज्यकर्त्यांनी आपल्या स्वार्थासाठी ही दरी अधिक रुंद करण्याचे आणि एकमेकांविषयी व्देष भावना अधिकाधिक भडकावण्याचे, एकमेकांना झगडत ठेवण्याचे आणि कटूता वाढविण्याचे काम केले. शेवटी जीना आणि त्यांच्या साथीदारांनी त्या भावनेला खतपाणी घालण्याचे काम केले. त्यांच्या मदतीने इंग्रजांनी पाकिस्तानची निर्मिती केली. 

गांधीजी मुसलमानधार्जिणे आणि मुसलमानांना जवळ करण्यासाठी प्रयत्नशील असायचे?

:गांधीजी मुस्लिमांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्नशील होते असा आक्षेप त्यांच्यावर करण्यात येतो, असाही समज आहे की त्यांच्या संतुष्टीकरण्याच्या नीतीमुळेच देशाची फाळणी झाली, परंतु मुसलमानांना मुख्य प्रवाहात ओढण्याचे प्रयत्न गांधीजींचे भारतात येण्यापूर्वीच चालू होते. 1957 च्या उठावाच्या 50 व्या वर्धापनदिनी 1907 साली इंग्लंडमधील एका सभेत वीर सावरकर यांनी मुसलमानांचा उल्लेख इंद्रधनुष्याचा एक रंग असा केला होता. 

1909 साली धर्मनिहाय मतदारसंघाची निर्मिती झाली. 1916 साली लखनौ करार झाला त्यांत मुस्लिमांच्या संख्येच्या प्रमाणापेक्षा अधिक प्रतिनिधित्व त्यांना देण्याच्या मागणीचा स्वीकार करण्यात आला . लखनौ कराराच्या वाटाघाटीमागील सूत्रधार कोण होते? त्यात दोन व्यक्ती मुख्य होत्या. लोकमान्य टिळक आणि महमद अली जीना. श्यामाप्रसाद मुखर्जींनीसुद्धा स्वतंत्र भारतातल्या पहिल्या मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यावर हिंदू महासभेमध्ये प्रवेश केला नाही. स्वतंत्र भारतात मुसलमान अथवा अन्य धर्माच्या लोकांना एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश नाकारणे योग्य नाही अशा मताचे ते होते. सुभाषवाबूंची तर तक्रार होती की कॉँग्रेसमध्ये मुसलमानांना अधिक प्रतिनिधित्व मिळावयास हवे. त्यांना त्यांच्या सहभागापेक्षा कमी हिस्सेवारी दिली जाते अशा मताचे ते होते. यावरून मुसलमानांना जवळ आणण्यासाठी केवळ गांधीजींनीच नव्हे तर हिंदुत्ववादी आणि अन्य नेत्यांनीसुद्धा सतत प्रयत्न केले होते हे स्पष्ट होते.

पाकिस्तानची मागणी काँग्रेस आणि गांधीजींनी स्वीकारली. त्यांनी मान्यता दिली नसती तर पाकिस्तान थोडाच बनणार होता? 

:‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे सुप्रसिद्ध गीत लिहिणारे, कवी इक्बालदेखील 1930 साली अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात भाषण करताना म्हणाले, ‘माझी इच्छा आहे की पंजाब नॉर्थ वेस्ट फ्रंटियर, सिंध आणि बलुचिस्तान या सर्वांचे एकत्रीकरण करून एका राज्याची निर्मिती केली जावी. भारतालगतचे पश्चिम उत्तर मुस्लिम राज्य, मग ते ब्रिटिश साम्राज्याचा हिस्सा असो वा स्वतंत्र असो. निर्माण झाले, तरच मुसलमानांचे भाग्य उजळेल असे मला वाटते. 

इक्बालच्या या वक्तव्यावर 1937 साली मंजुरीची मोहर लागली. हे वाचा : ‘आज हिंदुस्तान एकजीव एकात्म राष्ट्र आहे असे मानण्याची चूक आपण करता कामा नये, उलट या देशात मुख्यतः हिंदू व मुस्लिम अशी दोन राष्ट्रे आहेत, हे मान्य करावयास हवे.’ हे वक्तव्य महम्मद अली जिनांचे वाटते नाही का? याच्यावर कुणी मंजुरीची मोहर मारली आणि कुठे? जाणू इच्छिता? ऐका तर, 1937 साली, अहमदाबादमध्ये वीर सावरकरांच्या अध्यक्षते- खालील हिंदू महासभेच्या अधिवेशनात ही मंजुरीची मोहर मारली गेली. 1943 मध्ये वीर सावरकरांच्या एका वाक्याची नोंद मिळते. ‘माझा मि. जिनांच्या दोन राष्ट्रांच्या सिद्धांताला विरोध नाही. आम्ही हिंदू स्वतः एक राष्ट्र आहोतच ते तर एक ऐतिहासिक तथ्य आहे. हिंदू आणि मुसलमान दोन वेगवेगळी राष्ट्र आहेत.’ (संदर्भ : इंडियन अ‍ॅन्युअल रजिस्टर 1943, भाग-2 पान-10) मुस्लिम लीगच्या अधिवेशनात इक्बाल म्हणतात की त्यांचे वेगळे राज्य हवे. तसे झाले तरच बेडा पार होईल, आणि हिंदु-महासभेच्या मंचावरून वीर सावरकर हेच सांगतात. मग आता काय बाकी राहिले? पाकिस्तानच्या सिद्धांताला कुणी पुष्टी दिली? त्याचा उद्धार प्रथम कुणी केला? स्वीकार प्रथम कुणी केला? ते सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे.

गांधीजी आणि काँग्रेस हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी चळवळ करीत होते. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असल्यापासून त्यांच्या प्रार्थना सभामध्ये हिंदू, बौद्ध, मुस्लिम, पारसी , इसाई वगैरे धर्माच्या प्रार्थना आणि भजने म्हटली जायची. एकाच ईश्वराची आपण लेकरे असल्याची गोष्ट ठसविली जायची. गळी उतरविली जायची. साबरमती आश्रमात कुरेशी साहेबांसारखे मुस्लिमसुदा राहात होते. धार्मिक ऐक्य हे संपूर्ण स्वराज्य चळवळीचे महत्त्वाचे अंग होते. त्यासाठी समान प्रयत्न झाले होते याला इतिहास साक्ष आहे. काँग्रेसमध्ये अखिल भारतीय स्तरावरचे कितीतरी मुसलमान पुढारी होते. 

तर मग काँग्रेस आणि गांधीजींनी पाकिस्तानला पाठिंबा दिला असे म्हटले जाते त्याचे काय?

:हिटलरचा साधीदार गोवेल्स याचा एक लाडका सिद्धांत होता की हवे तेवढे खोटे असू दे, ते पुन्हा पुन्हा लोकांच्या माथी मारले म्हणजे कालांतराने त्यांना ते खरे वाटू लागते. हिंदुत्ववादी राजकारण्यांनी राजकारणात आपल्या सोयीप्रमाणे कोलांटउड्या मारून मिरवणुका जिंकण्यास कमी केले नाही, निवडणुका जिंकण्यासाठी सातत्यपूर्वक आणि व्यवस्थितपणाने त्यांनी देशव्यापी स्तरावर असत्याचा प्रचार केला. लोक भुलले आणि लाभ मात्र त्या राजकारण्यांचा झाला हे आता जगजाहीर झाले आहे. अन्यथा देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांचा एक टक्कासुद्धा हिस्सा नव्हता असे लोक आज राज्यात आणि देशात उच्च स्थानावर आहेत याचे कारण काय? अर्थात लोकांचा भोळा स्वभाव. 

जोपर्यंत काँग्रेस गांधीजींच्या मार्गाने चालली होती तोवरचा इतिहास पाहण्यासारखा आहे. एक प्रसंग पहा . लॉर्ड बावेल यांनी जिनांना मुसलमानांचे प्रतिनिधी आणि गांधीजींना हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून चर्चा करण्यासाठी बोलावले, गांधीजींनी त्यांची चलाखी जाणली. त्यांनी त्याला प्रत्युत्तर पाठविले की जिनांना मुस्लिम लीगचे (तमाम मुसलमानांचे नव्हे) आणि मौलाना आबुल कलाम आझाद यांना काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून बोलावणे पाठवा. स्थिती अशी झाली की बावेलच्या डावीकडेही मुसलमान अन् उजवीकडेसुद्धा मुसलमान. दोन धर्म, दोन राष्ट्रे या गोष्टी काँग्रेसला मान्य नव्हत्या आणि गांधीजींची तर गोष्टच सोडा. 

पण जिना भारतातल्या मुसलमानांना गुमराह करण्यात यशस्वी झाले होते. अर्थात राष्ट्रवादी मुस्लिमांची संख्यासुद्धा लक्षणीय होती. सुहरावर्दी, हयातखान, बंगालचे फझलुल हक, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोवीन्समध्ये अब्दुल गफारखान वगैरे पाकिस्तानच्या निर्मितीच्या विरोधात होते. परंतु जिना आणि त्यांच्या साथीदारांच्या चिथावणीमुळे वर्णनही न करता यावी अशी भीषण परिस्थिती आणि खून-हत्याकांड सुरू झाले. माऊंटबॅटनने तर साफ साफ सांगितले होते की नेमून दिलेल्या वेळेत निवाडा करा अन्यथा इंग्रज आहे ती स्थिती ठेवून निघून जातील याचा अर्थ असा होता की लहान-मोठे शेकडो राजे राजवाडे स्वतंत्र होतील, इंग्रजांच्या शासनाखालील प्रांतसुद्धा स्वतंत्र होतील. कापाकापी केवळ हिंदु मुस्लिमांमध्येच नव्हे तर राजे-रजवाडेसुद्धा एकमेकांविरुद्ध आणि ब्रिटिश अंमलाखालील प्रांतावर ताबा मिळविण्यासाठी शस्त्रे उपसतील. अशी एक कल्पनातीत भयंकर अराजकाची स्थिती राष्ट्राच्या नेत्यांसमोर येऊन ठाकली होती. काय करावे  अशा परिस्थितीत काँग्रेसने ‘अर्धम् त्यजति पंडितः’ या न्यायाचा स्वीकार केला. 

पण गांधीजींचे काय? ते तर मानतच नव्हते. ते शेवटपर्यंत सांगत होते की जिनांना देशाच्या प्रधानमंत्रीपदी बसवून इंग्रजांनी चालते व्हावे परंतु माऊंटबॅटन आणि त्यांच्या बहकाव्यांत आलेल्या काँग्रेसला गांधीजींची गोष्ट अव्यवहार्य वाटत होती. शेवटी गांधींना बाजूला सारूनच निर्णय घेतला गेला. पण तरीही गांधींनी तो आघात खिलाडू वृत्तीने सहन केला. ते समजून चुकले होते की सद्य:परिस्थितीत काँग्रेस दुबळी झाली तर देशाचे अकल्पित नुकसान होईल. देशाला तारू शकणारी आणखी दुसरी शक्ती तेव्हा देशात अस्तित्वात नव्हती. 

तर मग देशाची फाळणी रोखण्यासाठी आमरण उपोषण का सुरू केले नाही त्यांनी? आणि 55 कोटी रुपये देण्याचे मान्य का केले?  

:गांधीजींनी स्वतःच याचे उत्तर दिले आहे. त्यांना आलेल्या एका पत्राचे उत्तर देताना त्यांनी म्हटलेय...मी म्हणजे कोण ? एक व्यक्ती म्हणून माझे काहीच मूल्य नाही. ज्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून मी बोलत होतो. ते लोक तर आज मला सोडून गेले आहेत. त्यांना माझे सांगणे रुचत नाही, त्यांना फाळणी मंजूर आहे, त्यांची मजबुरी आहे. माझी मात्र माझ्या विचारांवर पूर्ण श्रद्धा आहे. ज्यांच्यासाठी मी लढत आहे , ते फाळणीसाठी तयार झाले आहेत , त्यांचाच जर माझ्यावर विश्वास राहिला नसेल तर मी लढू तरी कुणासाठी? संपूर्ण देशात हिंसेचा आगडोंब आणि रक्तपात होत आहे. मी बंधुत्वभावाची, शांतीची, प्रेमाची गोष्ट करू लागलो तर ते कुणाला मानवत नाही. हिंदू मुसलमानांना या देशातून हाकलून लावू पाहत आहेत. संपूर्ण परिस्थिती बदलली आहे. देशाच्या अखंडत्वासाठी लढू म्हटले तरी कुणासाठी लढू? फाळणीसाठी इन्कार करू म्हटले तरी ती लहान-सहान गोष्ट नाही. 

भौतिक तुकडे तर झाले, पण हृदय तरी जोडण्याचे काम शक्य होते खान अब्दुल गफारखान यांना भेटण्यासाठी आणि जिनांनी अल्पसंख्यांकांसाठी जे वायदे केले होते त्यांची अंमलबजावणी कशी केली आहे हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी पाकिस्तानात जायची इच्छा गांधीजींनी अनेकवार केली होती. पाकिस्तान हा माझाच देश आहे. तिथे जायला मला व्हिसा घेण्याची जरुरी नाही असेसुद्धा ते म्हणत असत. ते जगले असते तर दुनियेने पाहिले असते की दक्षिण आफ्रिकेत जाताना प्रतिबंधाचा भंग करून नाताळची सरहद्द त्यांनी ओलांडली होती. तशीच पाकिस्तानची सरहद्दसुद्धा सत्याग्रह करून फाळणीचा इन्कार करण्याची त्यांची ती सत्याग्रही रीत होती.

स्वतः शहीद होण्याची त्यांची भावना जरूर होती, पण ज्यांनी त्यांना जन्मभर साथ दिली त्यांची अडचणसुद्धा ते जाणत होते. जे झाले त्याला त्यांनी प्रकट विरोध केला नाही. मात्र अंतःकरणापासून त्यांना ते मान्य नव्हते हेच वरील घटनांवरून सिद्ध होते. आणखी एक घटना घडली होती. कित्येक लोक फाळणीच्या विरोधात गांधीजींची साथ करण्यास तयार झाले होते. कोण होते हे लोक? त्या दिवसापर्यंत गांधीजींना शिव्या-शाप देणारेच ते लोक होते. हिंदू आणि मुसलमान दोन धर्म, दोन राष्ट्रे ही भाषा बोलणारे ते लोक होते. मुसलमानांनी येथे दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून राहावे अशा गोष्टी ते करत होते. 

कुणालाही आकलन न झालेल्या आणखी एका गोष्टीचे स्पष्टीकरण आम्हाला हवे. गांधीजींनी उपवास करावयास हवा होता असे हिंदुत्ववादीच म्हणत होते. आणि हेच लोक गांधीजींना देशद्रोही हिंदू द्रोही आणि वध करण्यालायक समजत होते तर मग त्यांची लढाई गांधीजींनी करावयास हवी होती असे ते कसे मानतात? त्यांचे हिंदुत्ववादी पुढारी, भोपटकर, गोलवलकर, मुखर्जी, मुंजे, खरे वगैरे नव्हते काय? त्यांच्या नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नव्हता. बलिदान दिले नव्हते. दुःख आणि कष्ट उपसले नव्हते हे ते पुरते जाणून होते. ज्यांचे नावदेखील ठाऊक नव्हते अशांनी उपवास केला असता तर त्याचा काहीच परिणाम झाला नसता. ती शक्ती तर केवळ गांधीजीजवळच होती. गांधीजी भारतात आले तेव्हा सावरकर गांधीजीहून दहा वर्षांनी लहान आणि तरुण होते. आणखीही काही नेते होते. ते गांधीजींसारखे भक्कम नेतृत्व का देऊ शकले नाहीत? त्याचे कारण हे होते की त्या नेत्यांना जनतेच्या हृदयात स्थान नव्हते. खऱ्या-खोट्या इतिहासाचा दाखला देऊन लोकांच्या हृदयात एकमेकांविषयी वैरभाव आणि विषाची पेरणी करून हिंसा भकावण्याच्या प्रयत्नाशिवाय त्यांच्याकडे अन्य कार्यक्रमच नव्हता.

55 कोटी रुपयांच्याबाबत गांधीजींनी पाकिस्तानची म्हणजेच मुस्लिमधार्जिणी बाजू घेतली नव्हती काय?

: 55 कोटी रुपयांच्या मुध्यावरून गांधीजींना मुस्लिमधार्जिणे मानणे बरोबर होणार नाही. गांधीजी खूप पुढचा विचार करत असत. पैसे चुकते करणे ही भारताची नैतिक जबाबदारी होती आणि त्यात भारताने माघार घेता कामा नये असा त्यांचा पक्का निर्धार होता. ज्या महापुरुषाने आपले सारे आयुष्य ‘शठं प्रति शाठ्य’ जशास तसे ऐवजी ‘शठं प्रति सत्यम्’ गुंडगिरीचा सामनासुद्धा सत्याच्या सहाय्यानेच लढण्यात घालविले. तो सत्याचा आग्रही महापुरुष कसोटीच्या क्षणी माघार कशी बरे घेईल? धर्मासाठी स्वतःचे प्राण पणास लावणारा महापुरुष पंचावन्न कोटींच्या मोहाने माघार घेईल असे कसे बरे होईल? महत्त्वाचे कारण म्हणजे भारताच्या उदार धोरणाचा चांगला परिणाम अखिल जगतावर आणि मुख्यतः पाकिस्तान आणि तिथल्या जनतेवर निश्चितच होईल असे त्यांना वाटत होते. त्यांना तर असे वाटत होते व त्यांची इच्छासुद्धा होती की भविष्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एक होतील. जरी एक झाले नाहीत तरी चांगल्या शेजारधर्माने, बंधुत्व भावनेने नांदतील. 

टिळक आणि सावरकरांचा एवढा प्रभाव का पडला नाही? ते गांधीजीसारखे आंदोलन उभारू शकले नाहीत असे आपण म्हटले आहे ते जरा सविस्तरपणे समजवा. 

लोकमान्य टिळक, सावरकर वगैरे महापुरुषांची वीरता, देशप्रेम, त्याग वगैरेंचा इन्कार कुणीही करू शकणार नाही. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांची एक भूमिका होतीच होती. त्यांना शत-शत प्रणाम. देश त्यांचा ऋणी होता आणि राहील‌ गांधीजी आणि या महापुरुषांमध्ये जो फरक होता तो खालीलप्रमाणे. 

विज्ञानाचे पंख लावून अहिंसा आणि सत्याचे युग अवतरत होते. देशभक्तीच्या प्रेरणेने आणि भावनेने भारलेल्या टिळकांनी आणि वीर सावरकरांनी जो लढा दिला होता त्यासाठी त्यांना ब्रिटिशांनी अटक केली. त्यांच्यावर सरकारतर्फे राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. त्या दोघांनीही आपण तसे केले नसल्याचे निवेदन सादर करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांत ते निष्फळ ठरले आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. गांधीजीवरसुद्धा सरकारने राजद्रोहाचे खटले भरले. गांधीजींनी निवेदन देऊन स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांनी सांगितले की याला जर आपण राजद्रोह म्हणत असाल तर तो मी केला आहे आणि आपण जर माझी सुटका कराल तर तो मी पुन्हा करीन. यासाठी मला शिक्षा करावयाची असेल तर जरूर करा. त्या वेळी जो इंग्रज न्यायाधीश होता तो गांधीजींच्या चरित्राने प्रभावित झाला होता. त्याने गांधीजींचा संत म्हणून उल्लेख केला आणि अधिकाधिक असलेली म्हणजे सहा वर्षाची सजा त्यांना फर्माविली. आपल्या या निर्णयासाठी तो अत्यंत दुःखी झाला होता. 

गांधीजी कोणत्याही गोष्टीसाठी हिंदूंना ज्याप्रमाणे धारेवर धरत असत तसे मुसलमानांना धरत नसत असा एक आक्षेप आहे. 

:गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू समजत असत आणि स्वकीयांशी बोलावे तसे सर्वांशी आत्मीयतेने बोलत असत. कुणाला धारेवर धरण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. 1947 च्या डिसेंबरातल्या शेवटच्या आठवड्यात प्रार्थना प्रवचनात गांधीजी म्हणाले, ‘मुस्लिम अल्पसंख्यांना माझे सांगणे आहे की त्यांनी जहालपणा सोडून दिला पाहिजे, तुमच्याबद्दल अन्य धर्मीय लोकांच्या मनात जी अढी आहे ती खोटी पाडा आणि जगाला दाखवून द्या की, तुमचे हृदय साफ आहे. हिंदुस्थानचा वफादार नागरिक बनणे हाच हिंदूंच्या राज्यसंघात इज्जत आणि अब्रुने राहण्याचा सरळ रस्ता आहे…’

‘माझ्याकडे कित्येक मुसलमानांनी तक्रार केली आहे की ते हिंदुविरोधी आहेत अशा केवळ शंकेने त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. या लोकांबद्दल मला सहानुभूती वाटते, मात्र त्यांच्यावर संशय धरला जात असला तरी त्यांनी मनात कटुता धरता कामा नये असे माझे त्यांना सांगणे आहे.’ 

कित्येक मौलवींनी पोलिसांबाबत ते पक्षपात करत असल्याची तक्रार केली असून, आपल्याशिवाय आणखी कुणाचा आधार नसल्याचे म्हटले आहे. त्यांना गांधीजींनी सांगितले; ‘राष्ट्रवादी मुसलमानांच्या वतीने मी लढत आहे. तेव्हा तुम्ही मला मदत करावयास हवी. हिंदुस्थानातल्या मुस्लिम जनतेला सरळपणाने वागविण्याचे आपण आवाहन कराल तर त्याच्या परिणामी हिंदू आणि शीख जनतासुद्धा सरळ रस्त्यावर येईल . पाकिस्तानला युद्धाची धमकी देत असताना तुम्ही त्याचा विचार करावयास हवा. पाकिस्तान करतेय ते बरोबर आहे असे जर आपणांस वाटत असेल तर मला काहीच म्हणावयाचे नाही. परंतु ते चूक करते आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचा निषेध निःसंदिग्ध शब्दांत तुम्ही करावयास हवा.’

त्याच दिवशी वृत्त आले की हिंदू आणि शीख निराश्रितांना घेऊन येणाऱ्या ट्रेनवर मुसलमानांनी हल्ला करून मोठ्या प्रमाणात कत्तल केली. या वृत्ताने दुःखी झालेल्या गांधीजींनी सायंकाळच्या प्रार्थना प्रवचनात सांगितले : ‘संघ (भारत) सरकार हे कोठवर सहन करू शकेल? मी उपवास करीत असलो तरी हिंदू आणि शीख जनता कोठवर धीर धरू शकेल? पाकिस्तानने या गोष्टींना पायबंद घातलाच पाहिजे.’ अशा अनेक गोष्टी गांधीजींनी भारत आणि पाकिस्तानात चालू असलेल्या रक्तपाताविषयी त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत सांगितल्या आहेत. ज्यांना या गोष्टीचे प्रामाण्य हवे त्यांनी प्यारेलालजी कृत ‘महात्मा गांधी पूर्णाहुति’ अवश्य पाहावा.

----------

गोडसेवाद्यांनो.... या प्रश्नांची उत्तरे द्या

1. 1925 साली काँग्रेसची स्वातंत्र्य चळवळ ऐन भरात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का स्थापण्यात आला या रा. स्व. संघाचे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान शून्य का आहे?

2. 1942 च्या चलेजाव चळवळीत हिंदुत्ववादी ब्रिटिशांच्या विरुद्ध का लढले नाहीत?

3. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी या हिंदुमहासभेच्या नेत्याने ते ब्रिटिशांच्या काळातील बंगालमधील मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असताना 26 जुलै 1942 रोजी गव्हर्नरला पत्र लिहून ब्रिटिशांच्या युद्ध प्रयत्नांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे असे कळवून, बंगालमधील काँग्रेसची चळवळ कशी दडपायची आहे, बंगालमध्ये काँग्रेसची चळवळ मूळ धरून वाढणार नाही आणि ती चळवळ अपयशी होईल यासाठी मी उपाय सुचवत आहे असे पत्र सर. जॉन हर्बट यांना का पाठविले?

4. फाळणी रोखण्यासाठी राष्ट्रवादी हिंदुत्ववाद्यांनी काय केले, कुठे कुठे व कसे कसे लढे दिले त्याचा तपशील देता येईल का?

5. 1940 साली लाहोर येथे मुस्लिम लीगने द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. परंतु त्याहीपूर्वी 1937 साली अहमदाबाद येथे हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडून हिंदू-मुस्लिम समाजात फूट पाडणारे फाळणीला जबाबदार आहेत की महात्मा गांधी जबाबदार आहेत? 

6. लखनौ करार- ज्या कराराने मुस्लीमांना 50 टक्केपर्यंत राखीव जागा दिल्या त्या कराराचे समर्थन करताना केलेल्या भाषणात लोकमान्य टिळक म्हणाले की, परकीय सरकारशी भांडायचे आहे. हे भांडण यशस्वी करायचे असेल तर आपापसांतील भांडणे कसेही करून मिटविली पाहिजेत. आणि सर्व जातीभेद, धर्मभेद व मतभेद मिटवून आपण एकमुखी मागणी केली पाहिजे. असे करताना मुसलमानांना अधिक हक्क मिळाले किंबहुना सर्व राज्य ब्रिटिशांनी मुसलमानांना किंवा हिंदुस्थानातील कोणत्याही जमातीला दिले तरी हरकत नाही . पण हिंदुस्थानातून परकीय सत्ता जाऊन हे राष्ट्र स्वतंत्र होऊ दे, या वृत्तीने हा करार (लेखन करार) केला गेला . लोकमान्यांना मुस्लिमधार्जिणे म्हणायचे का? 

7. म. गांधींचा राजकीय उदय होण्याच्या कितीतरी अगोदर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणाले होते की, हिंदु-मुस्लीम दोघेही एक झाल्याशिवाय या विस्तृत देशाची प्रगती होणार नाही. हा धडा आपण पूर्वीच्या इतिहासातून शिकला पाहिजे. अकबर आणि त्याचे सल्लागार यांनी जो मार्ग दाखवून दिला त्याच मार्गाने जाण्याचा आपण निर्धार केला पाहिजे. आणि त्याचा पणतू औरंगजेब याने ज्या चुका केल्या त्या आपण टाळल्या पाहिजेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ह्यांना मुस्लिमधार्जिणे म्हणायचे काय?

8. त्याच्या कितीतरी आधी स्वामी विवेकानंद म्हणतात की मुसलमानांनी मिळविलेला विजय हा गरिबांच्या आणि दलितांच्या उन्नतीला कारणीभूत झाला. म्हणूनच आपल्यापैकी एक पंचमांश लोक मुसलमान बनले. केवळ तलवारींनी हे घडले नाही. तलवार आणि बंदुका यांमुळे हे सर्व (धर्मांतर) घडले असे समजणे कमालीचा वेडेपणा ठरेल, याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात की वेदांती आत्मा आणि इस्लामी देह धारण करूनच आधुनिक भारताची उन्नती होईल. स्वामी विवेकानंदांना मुस्लिमधार्जिणे म्हणायचे काय? 

9. 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यावेत असा आग्रह गांधीजींनी धरला म्हणून त्यांचा खून करण्यात आला असे त्यांच्या खुनाचे समर्थन केले जाते. असाच आग्रह लॉर्ड माऊंट बॅटन, राजगोपालाचारी व तेव्हाचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर चिंतामणराव देशमुख, यांनी धरला होता. मग एकट्या गांधींचाच खून का?

अनु. : मेघश्याम तु. आजगावकर

Tags: पाकिस्तान सावरकर जिना फाळणी चुनिभाई वैद्य नथुराम गोडसे महात्मा गांधी Pakisthhan Savarkar Jina Partition Chunibhai Vaidya Nathuram Godse Mahatma Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके