डिजिटल अर्काईव्ह

पूज्य भाऊसाहेबांच्या जीवनातील संस्मरणीय उद्बोधक आठवणी

भाऊंच्यामुळे इतका विश्वास आम्हा विद्यार्थ्यांना वाटायचा की, पाण्यात आम्ही सहज विविध क्रीडा करीत असू. तोल घेऊन उड्या टाकायलाही मुले कचरत नसत. परंतु तळेगावला होऊन होऊन किती सोयी होणार? शेवटी पुण्याला सामने झाले. वेगाने पोहणे, पाण्याखालून लांब पल्ला गाठणे, वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या उंचावरून मारणे या सगळ्या बाबतीत आमच्या विद्यार्थ्यांनी वरचे क्रमांक पटकावले.

सेनापती बापट:

भाऊसाहेबांविषयी माझ्या मनात अत्यंत आदर आहे. त्यांची कडक शिस्त, असामान्य कष्टाळूपणा, कोणत्याही कार्यक्रमाचे वेळापत्रक ठरल्यावर त्याप्रमाणे ठरलेल्या वेळी ठरलेले काम करण्याची व करून घेण्याची हातोटी व हट्ट हे त्यांचे स्वभावगुण मला फार आवडतात. त्यांचे राष्ट्र सेवा दलातील काम, साने गुरुजी सेवापथकातील काम, कलापथकातील काम इत्यादी कार्य, त्यांच्या अंगाचा उत्साह व तरुण मुला-मुलींना सेवाविषयक मार्गदर्शन करण्याची त्यांची उत्कट हौस जनतेच्या नजरेस आणून जनतेच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकी व पूज्यबुद्धी निर्माण करतात. भाऊसाहेबांविषयी विचार मनात आला किंवा त्यांच्याविषयी बोलणे निघाले तर दोन-तीन आठवणी माझ्या मनात ताज्या होतात.

संयमी संताप

1931 सालची गोष्ट आहे. काही महत्त्वाच्या प्रश्नांवर श्री. वल्लभभाई (तेव्हाचे काँग्रेस अध्यक्ष) यांचे मत घेण्यासाठी भाऊसाहेब व मी मुंबईस त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. वल्लभभाई काही कामात होते. ते लवकरच बाहेर येतील, बसा असे त्यांच्या मुलीने (सेक्रेटरीने) आम्हास सांगितल्यावरून आम्ही त्यांच्या दिवाणखान्यात एका ठिकाणी बसलो. जवळच श्री. राजगोपाळाचारियर बसले होते. भाऊसाहेबांना काय वाटले कोणास ठाऊक त्यांनी राजगोपाळाचारियर यांची व माझी ओळख करून देण्यासाठी त्यांना सांगितले. “हे सेनापती बापट हे आमच्या महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचे नुकतेच निवडलेले अध्यक्ष आहेत.” राजगोपाळचारियर यावर अर्धवट ‘आकाशे’ अर्धवट भाऊसाहेबांकडे पहात उद्गारले, “निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते” मला हे सुभाषित राजगोळाचारियर यांच्या तोंडून ऐकताच किळसयुक्त कौतुक वाटले. मी स्तब्ध राहिलो. भाऊसाहेबांच्या डोळ्यात व कपाळावर मला संतापाच्या खुणा दिसल्या पण ते त्यावेळी किती संयमाने स्तब्ध राहिले ते शब्दात सांगणे अशक्य.

क्षमाशीलता

1931 सालचीच दुसरी गोष्ट. भाऊसाहेब व मी विदेशी वस्त्र बहिष्काराचा कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रात दौऱ्यावर निघालो होतो. अष्टे (सातारा) या गावी रात्री व्याख्यान व्हावयाच्या अगोदर भाऊसाहेब मला म्हणाले, ‘तात्या, आज वल्लभभाईकडून असा आदेश आला आहे की श्री. वासुदेव बळवंत गोगट याने श्री. हॉटसन याजवर गोळी झाडली या संबंधाने दौऱ्यातील व्याख्यानात तीव्र नापसंती दर्शविणारा काही भाग असावा.” मी भाऊसाहेबांस म्हटले, “भाऊसाहेब तर मग आज पासून प्रत्येक ठिकाणच्या व्याख्यानात गोगटे याच्या कृत्याचे मी समर्थन करणार. गोगटे याच्याऐवजी कोणी काँग्रेसच्या सभासदाने हॉटसनवर गोळी झाडली असती तरी मला त्याचे समर्थन करणे प्राप्त झाले असते. काँग्रेसच्या ज्या क्रीडवर आम्ही सही करतो त्या क्रीडमध्ये स्वराज्य मिळवायचे ते शांततेच्या व न्याय्य मार्गांनी मिळवायचे असे शब्द आहेत. सुराज्य हे स्वराज्याहून अगदी वेगळ. गोगटे याने अंशतः सुराज्य होण्यासाठी जुलमी हॉटसनवर गोळी झाडली. त्याच्या जागी जो कोणी येईल तो हॉटसनपेक्षा अधिक विचाराने राज्य करील. हेच सुराज्य...”

भाऊसाहेबांचे समाधान झाले नाही. मी दौऱ्यात अखेरपर्यंत गोगटेंचे समर्थन प्रत्येक व्याख्यानात केले. भाऊंनी अखेरपर्यंत मला वागवून घेतले ही त्यांची मजवर कृपा. त्यांनी आपले सहकार्य कमी केले नाही. पंढरपूरच्या व्याख्यानात भाऊसाहेब मजवर रागावले आहेत हे सगळ्या जनतेसमोर मी सांगितले व पुढे म्हणालो; “मला अध्यक्षपदापेक्षा मनुष्यपदाची किंमत अधिक वाटते. मी असा प्रचार करीत आहे हे तुम्ही कोणत्याही काँग्रेसश्रेष्ठीकडे कळवू शकतो. माणुसकीच्या दृष्टीने मी गोगटेच्या कृत्याकडे पाहत आहे. व माणुसकीच्या दृष्टीने माझे मत सांगत आहे. माणुसकी बाजूला ठेवून अध्यक्ष राहाण्याची माझी इच्छा नाही... हे सर्व भाऊसाहेबांनी क्षम्य ठरविले व मला शेवटपर्यंत म्हणजे उंबरगावला माझ्या रत्नागिरीतील व्याख्यानाबद्दल वॉरंट घेऊन आलेल्या पोलीस अमलदाराच्या स्वाधीन मी होईपर्यंत सहकार्य दिले ही न विसरण्यासारखी पुन्हा पुन्हा प्रसंगाने जागृत होणारी माझी आठवण आहे.

‘चिठ्ठी आणा’

1942 सालची गोष्ट. माझी मुलगी कमळ ताराचंद रामनाथ हॉस्पिटलमध्ये तिचा आयुर्वेद अभ्यासक्रम संपल्यानंतर काही महिने विशेष अभ्यासासाठी राहिली होती. घरी एक दिवशी बराच अंधार होईपर्यंत राहिली. नंतर हॉस्पिटलमध्ये जाण्यास निघाली. भाऊसाहेबांना मी म्हटले की तिला हॉस्पिटलमध्ये पोचवा व मेट्रनची चिठ्ठी घेऊन या की कमळीला आमच्याजवळ आणून पोचविले आहे. भाऊसाहेब स्वभावतःच चिठ्ठीच्या मुद्यावर रागावले; पण चिठ्ठी घेऊन आले. मला आताही आठवण झाली म्हणजे वाईट वाटते.

मुकुंद शिवराम भिडे:

अचाट शक्ती

सन 1936 साली मी डेक्कन कॉलेजला इंटरचे वर्गात असताना भाऊ कोल्हापूरचे राजाराम कॉलेजमधून ज्युनिअर बी.ए.चे वर्गात दाखल झाले. मलाही भाऊसारखा हिंदी खेळाचा व तालमेचा नाद असलेमुळे पुढील दोन वर्षात आमचेमध्ये दाट स्नेह निर्माण झाला होता. या दोन वर्षांचे सुखी जीवनातील काही आठवणी देत आहे.

कॉलेजला सणानिमित्त सुटी होती व भाऊचे क्लबात आंबरसाची फीस्ट होती. भाऊचा पाहुणा म्हणून मी त्यांचे क्लबात जेवणेस गेलो. खूप आग्रह झाल्यामुळे आम्ही सर्वजण अगदी सपाटून जेवलो. संध्याकाळी आम्ही कॉलेजचे तालमांतील कुस्त्यांच्या हौदातील माती खणणेसाठी गेलो. सकाळी हौदात पाणी घालून माती भिजवून ठेवली होती. 12x12चे हौदातील 114 भाग आम्ही 6 जणांनी खणून काढला. कुस्तीचा हौदा माती मोकळी करताना, फावड्याचे एका कोपऱ्याने खणून काढताना किती श्रम पडतात याची जाणीव पुष्कळांना असेलच. आमचे खणून झाल्यावर भाऊंनी हौदा खणणेस सुरुवात केली व सतत पावणे दोन तास खणून बाकीचा पाऊण हौदा खणून पुरा केला. त्यांच्या अंगातून आपादमस्तक घामाच्या धारा चालल्या होत्या. भाऊचा ‘स्टॅमिना’ पाहून आम्ही तर स्तंभितच झालो. भाऊंना पुन्हा सपाटून भूक लागली असल्यामुळे व सकाळचे फीस्टनंतर त्यांचे क्लबांत नुसते भात पिठले होते म्हणून माझे क्लबात त्यांना मी जेवण्यास नेले.

तालमेतील आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे दंडाचे स्नायू तयार झाले होते. एकाने एकदा सुतळी आणली. हात लांब करून दंडाभोवती सुतळी बांधावयाची व हात एकदम जवळ करून ती तोडायची असे आमचे खेळ चालू होते. भाऊंनी सुतळीची चौपदरी दोरी केली व दंडाभोवती बांधून हात एकदम जवळ घेऊन दंडाचे स्नायूंनी चौपदरी सुतळी ताडकन् तोडून दाखवली.

‘आम्हास तीन डझन केळी पुरेत!’

एकदा काही विद्यार्थी क्रिकेट ग्राऊंडवर गप्पा मारीत बसले होते. एका विद्यार्थ्यांने पैज मारली की ग्राऊंडला धावत जर कोणी 12 पेक्षा जास्त फेऱ्या मारल्या तर फेऱ्याइतकी केळी मी देईन! भाऊ लगेच उठले व त्यांनी धावत क्रिकेट ग्राऊडला फेऱ्या मारणेस सुरुवात केली. 36 फेऱ्या मारून झाल्यावर आम्हास 36 केळी पुरेत असे म्हणून त्यांनी धावणे थाबवले. त्यावेळच्या त्यांच्या स्टॅमिन्यानुसार आणखी पुष्कळ फेऱ्या ते मारू शकले असते. पैजेप्रमाणे आणलेल्या तीन डझन केळ्यांवर आम्ही सर्वांनी ताव मारला.

मला का सोडलेस?

भाऊ मला कुस्ती शिकवीत असत. कुस्ती शिकवणाऱ्या वस्तादाला चेल्याने शिकण्याचे कुस्तीतही पाडलेले आवडत नाही, असा सर्व साधारण अनुभव आहे. शिकत असताना भाऊंना एकदा मी खाली आणून दाबले. भाऊ काही पडेनात व शेवटी भाऊ निसटून गेले. माझ्या ढिलाईमुळे भाऊ निसटून गेले असा त्यांचा समज होऊन ते म्हणाले, ‘मला सोडलेस का?’ असे म्हणून त्यांनी माझे पाठीवर रागाने एक जोराची चापटी लगावली. कुस्तीनंतर मी भाऊंना म्हणालो, ‘भाऊ, पाठ सळसळते आहे. पहा तर किती लागले आहे!” भाऊंनी माझी पाठ पाहिली तर पाठीवर त्यांचा सर्व पंजाच्या पंजा उमटून पाठ लाल झाली होती. भाऊंना अगदी मनापासून वाईट वाटून ते दिलगिरी प्रदर्शित करू लागले.

यज्ञावशिष्ट आहार

पहिल्या महायुद्धाचेवेळी ‘इंडियन डिफेन्स फोर्स’मध्ये आम्ही दाखल झालो होतो. आमचे इन्फन्ट्री यूनिटचा दोन महिन्याचा कँप वानवडी येथे होता. भाऊ, मी, सरदेसाई व जोगळेकर एका तंबूतच होतो. माझेकडे व भाऊकडे ‘मेस’ ची (जेवणेची) व्यवस्था होती. भाऊ सर्वांचे जेवण झाल्याबद्दलची दररोज वैयक्तीक चौकशी करून सर्वांचे झाल्याचे खात्री करूनच जेवायला बसत असत. मी त्यास म्हणत असे, “अरे भाऊ, ही का लहान मुले आहेत? परेडनंतर सर्वांना अशी भूक लागते की कोणी उपाशी रहाणारच नाही.” परंतु भाऊंनी चौकशी करणेचा आपला नियम कधी सोडला नाही. सकाळपासून पी.टी. परेड करून स्वतःला भूक लागली असता आधी सर्वांची व्यवस्था होऊन सर्वांचे जेवण झाल्याशिवाय भाऊंनी कधी अन्न घेतले नाही. गीतेत वर्णन केलेली आत्मौपम्य दृष्टी ती हीच होय.

आज 35 वर्षे आम्ही भिन्न कार्यक्षेत्रामुळे व व्यवसायामुळे वेगळे आहोत. भाऊ आपल्या कामानिमित्त धुळे येथे आले म्हणजे जरी माझी राजकीय मते त्यांचे पेक्षा वेगळी असली तरी ते माझेकडे उतरतात. ज्यांचा ज्यांचा भाऊंशी संबंध आला आहे त्यांना भाऊ आपल्या कुटुंबातलेच वाटतात. खरोखर भाऊचे जीवन म्हणजे ‘वसुधैव कुटुंबकम्’ या उक्ती प्रमाणे आहे. भाऊ आले म्हणजे जे काय थोडे तास अगर दिवस आमचेमध्ये रहातात तो काळ आम्हास अत्यंत सुखाचा वाटतो व त्या वेळेची मी व माझे कुटुंबातील सर्व जण आतुरतेने वाट पहात असत.

*

गो. ना. शहाणे:

संकटात त्राता

एकदा शेजारील पैसाफंड कारखान्यातील एका महिलेने विद्यालयातील विहिरीत उडी टाकली; ती आत्महत्येच्या निमित्तानेच असावी. विद्यार्थिवर्गात ही बातमी निमिषार्धात पसरली. विहिरीचे पाणी बरेच खोल गेलेले होते, आणि त्यामुळे बांका प्रसंग ओढवणार हे जवळ-जवळ ठरल्यासारखे होते. पू. भाऊ या वेळी थोडे आजारी होते. परंतु आम्ही विहिरीपर्यंत पोहोचतो तो निराळेच दृश्य पहावयास मिळाले. भाऊंनी वायुवेगाने जाऊन विहीरीत उडी टाकून त्या महिलेस विहिरीचे काठाकडे नेऊन धरले व वरून पाळणा वगैरे सोडण्यास सांगितले; आणि अशा तऱ्हेने एक मोठाच अपघात टळला.

अभय

आम्ही सर्व भोजनास गेलो असता एका वेडसर पण आडदांड माथेफिरूने हनुमान मंदिरात शिरून मारुतिरायाचे उच्चाटन करण्याचे कार्य चालविले होते. ही बातमी समजताच विद्यार्थी-शिक्षकाचा समुदाय मंदिराशेजारी जमला. परंतु त्या रानदांडग्यापुढे जाण्याचे धारिष्ट कोणास होईना. पाहता-पाहता पू. भाऊ आत शिरले व एकादा वृक्ष खाली पाडावा अशा तऱ्हेने खालील आखाड्यात त्याला लोळवून नंतर हाकलून दिले.

*

खुशाल चौधरी:

सुस्कारे सोडू नका!

साधारणतः प्रौढ मंडळी जुन्या जमान्याचे गोडवे गातात आणि हताशपणे ‘गेला तो जमाना’ असे सुस्कारे सोडताना दिसतात. 1927 साली रायगड किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्सव तात्यासाहेब केळकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. बरीच मंडळी जमली होती. डॉ. मुंजे भाषणाला उठले. त्यांनी सांगितले, “काय हल्लीचे तरुण! आम्ही तीन चार तरुण सायकलवर किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आणि त्याच दमात किल्ला चढलो...” डॉ. मुंजे यांचे हे भाषण भाऊसाहेबांना आवडले नाही. त्यांनी अध्यक्षांना चिट्ठी पाठविली, ते बोलायला उठले. म्हणाले, “डॉ. मुंजे यांनी एक जुनी गोष्ट सांगितली आणि सुस्कारे सोडले! पण मी दुसरी सांगतो. आम्ही तीन चार नव्हे, चांगली पंचवीस-तीस मुले भोर संस्थानातल्या पाली गावाहून पायी, सायकलवर नव्हे, रायगडपर्यंत आलो, त्याच दमात वर चढून आलो. तात्यासाहेब तेव्हा इथेच होते. त्यांना पाणी पाहिजे होते म्हणून त्या मुलांनी डब्यांनी पाणी आणून भरले. गेले ते दिवस म्हणून सुस्कारे सोडण्याचे कारण नाही. आजही त्या निर्धाराचे, तितके कष्ट करणारे तरुण समाजात आहेत, पण त्यांना तयार करायला पाहिजे.” भाऊंच्या ह्या भाषणानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. भाऊंच्या ह्या उत्तरात त्याचे जीवतध्येय व्यक्त होते.

*

बाबू तळेगावकर:

समर्थ विद्यार्थी

तळेगावच्या समर्थ विद्यालयातले विद्यार्थी शारीरिक, मानसिक व बौद्धिकदृष्ट्या ‘समर्थ’ निघावेत असा तिथल्या चालकाचा प्रयत्न असे. भाऊसाहेबांच्याकडे शारीरिक विभाग असे. त्यावेळी पुण्याला पोहोण्याचे सामने होत. भाऊंनी आम्हा विद्यार्थ्यांना पोहोण्याच्या शर्यतीसाठी तयार करण्याला आरंभ केला. तोंडाकडून आणि पाठीकडून उडी घेऊन सरळ पाण्यात उडी मारता यावी म्हणून त्यांनी मुद्दाम उंचवटा तयार करून घेतला होता. भाऊंच्यामुळे इतका विश्वास आम्हा विद्यार्थ्यांना वाटायचा की, पाण्यात आम्ही सहज विविध क्रीडा करीत असू. तोल घेऊन उड्या टाकायलाही मुले कचरत नसत. परंतु तळेगावला होऊन होऊन किती सोयी होणार? शेवटी पुण्याला सामने झाले. वेगाने पोहणे, पाण्याखालून लांब पल्ला गाठणे, वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या उंचावरून मारणे या सगळ्या बाबतीत आमच्या विद्यार्थ्यांनी वरचे क्रमांक पटकावले. बाबूराव गोखले अध्यक्ष होते. ते शेवटी हसत हसत भाऊंना म्हणाले, “समर्थ विद्यालयच सगळी बक्षिस पटकावणार असे दिसते. भाऊसाहेब, इतरांच्या वाट्यालाही थोडी येऊ द्या.”

*

आवाबेन देशपाडे :

‘हुं पण माणसज छु’

एकदा भाऊ आमच्या नारगोळच्या घरी पाहुणे आले होते. प्रातःकर्मे आटोपून आंघोळीच्या अगोदर कपडे धुण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. इतक्यात माझी वहिनी ओरडतच आली, “अरे मरे रे, आ बुट्टो तो पोतेज कपडो धोवा बैठा.” वहिनीच्या बरोबर मीही पुढे झाले. मग वहिनी भाऊंना उद्देशून म्हणाला, “तमे केम धूओ छो? अमारो माणस धोशे ने!” भाऊ तत्काळ उत्तरले, “हुं पण माणसज छु.”

**

डॉ. ज. म. आठवले:

परपक्षीयांच्या श्रद्धेविषयी आदर

“आंधळा संसार” या नाटकांच्या प्रयोगासंबंधी काहीतरी सांगण्यासाठी भाऊ सकाळी सहा-साडेसहाचे सुमारास माझ्याकडे आले होते. बोलता बोलता भाऊ एकदम थांबले आणि त्यांनी मलाही थांबण्याची खूण केली. मला काहीच उलगडा होईना, म्हणून मी इकडे तिकडे पाहू लागलो. आमच्यासमोर आठ दहा हातावर, रा. स्व. संघाच्या शाखेवर प्रार्थना सुरू झाली होती. प्रार्थना संपताच ते मला म्हणाले, “आपल्या बोलण्यामुळे त्यांच्या प्रार्थनेत कदाचित् व्यत्यय आला असता, म्हणून मी बोलणे बंद केले.” नंतर आम्ही बाहेर पडलो. काम संपवून परत येताना भाऊ एका घरात शिरले. त्या कुटुंबाला मी ओळखीत होतो. घरच्या मुली राष्ट्र सेवा दलात असून सर्व वडील माणसे कट्टर हिंदुत्वनिष्ठ आहेत. राजकीय मते विरोधी असूनही भाऊंच्याविषयी त्या मंडळींना पराकाष्ठेचा आदर असल्याचं दिसून येत होतं. बाहेर पडल्यावर मी भाऊंना विचारलं, “ही मंडळी कट्टर आर.एस्.एस्.ची असताना तुमचा यांचा इतका घरोबा कसा?” या मुलीच्यामुळं या घराण्याशी जडलेले माझे संबंध राजकीय मतं वेगळी आहेत म्हणून तोडून टाकावे असं मला कधीच वाटत नाही. मित्र म्हटला की तो जन्माचा असं माझं तत्त्व आहे. मात्र वैरी म्हटला की तो जन्माचा असं मात्र नाही हं!”

घाशितो नाथाघरं चंदन

किर्लोस्करवाडीच्या कार्यक्रमाच्या वेळची गोष्ट. सर्वजण रंगण्यासाठी नाट्यगृहाकडे जाण्याच्या गडबडत होते. नमनाचं गीत म्हणणाऱ्या मुलींच्यासाठी पांढरी साडी हा गणवेष ठरला होता. एक साडी कमी पडत होती आणि ती कशी मिळवावी याच्या काथ्याकुटांत रंगायला जायला उशीर होत होता. भाउंनी शिरस्त्याप्रमाणे आरडाओरड करून सर्वांना नाट्यगृहाकडे पिटाळून दिलं. माझं काम उशिरा असल्यामुळं आणि सामानावर लक्ष रहावं म्हणून मी एकटाच मार्ग राहिलो. सर्वजण गेल्यावर भाऊंनी मुलीच्या वळकट्या उलथ्या-पालथ्या करून त्यातून एक खूप मळलेली पांढरी साडी शोधून काढली. ताबडतोब साबणानं स्वच्छ धुवून काढली. आम्ही दोघांनी दोन टोकं धरून ती वाळवली आणि कार्यक्रम सुरू होण्याच्यापूर्वीच नमन म्हणणाऱ्या मुली आणि पांढऱ्या (स्वच्छ) साड्यांची संख्या सारखी झाली.

डॉ. प्र. का. गणपुले:

व्यवहारचातुर्य!

1947 सालचा प्रसंग आहे. सेवा दल शाखांच्या पहाणीसाठी पू भाऊ सासवडला आले होते. प्रथम स्त्री शाखेला भेट देण्याचे ठरले. शाखेची जागा बंदिस्त होती. पण दाराजवळ एक उकिरडा होता. तो पहाताच भाऊचे पाय तिथेच थबकले सेवादल शाखा अन् इतकी घाण! हे दृश्य त्यांना सहन होईना. शाखेच्या तपासणीचा कार्यक्रम पुढे ढकलून आतील सर्व लहान थोर सैनिकांना सफाईची आयुधे आणण्यास भाऊंनी फर्माविले. अर्ध्या तासात ती जागा स्वच्छ झाली. जागा स्वच्छ झाली. पण अशी साफ किती दिवस रहाणार!” मी भाऊंना विचारले “आहे, त्यालाही युक्ती आहे.” भाऊ म्हणाले, “पलीकडे एका कोपऱ्यात शेंदूर फासलेले दोन तीन दगड पडले होते. ते गोळा करून, त्याला खूपसा शेंदूर लावून त्या देवांची आम्ही त्या जागी प्राणप्रतिष्ठा केली. भाऊंच्या या समय-सूचकतेचा व व्यवहारचातुर्याचा चांगला उपयोग झाला. दोन तीन वर्षे ती जागा स्वच्छ राहिली.

*

बापू काळदाते:

हक्कांचे जतन

गेल्या उन्हाळ्यातील वसमतनगरचे शिबिर आटोपून मी भाई वैद्य व सेलूचे सोमण गुरुजी व औरंगाबादकडे निघालो होतो. अनेक विषयांवर गप्पा-चर्चा चालू होती. संडासात पाणी नाही ही गोष्ट भाऊंच्या लक्षात आली. त्यांनी आमच्या मागे सारखा लकडा लावला की पाणी भरण्याची काही तरी सोय झालीच पाहिजे. अधिकाऱ्यांशी झगडा टाळण्यासाठी आम्ही ‘उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई आहे, पुढे करतीलच, जाऊ द्या. आपल्याला कुठे आवश्यकता आहे?’ अशा काही तरी सबबी सांगून वेळ मारून नेत होतो. परंतु भाऊंनी तो प्रश्न धसास लावायचे ठरवलेले दिसत होते.

जालना स्टेशन आले. भाऊंनी एकदम मला हुकुम दिला, “जा, त्या स्टेशनमास्तरना म्हणावे पाण्याची सोय करा.” आम्ही तिघेही गेलो. असि. स्टेशनमास्तर सज्जन होते बिचारे. त्यांनी पाण्याची चणचण सांगितली. आम्ही भीत भीतच परत आलो. डब्यात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच भाऊंनी जोराने विचारले, “काय आहे? नाही म्हणजे, त्याचं असं आहे....” इत्यादी सांगावयास मी सुरुवात केली. भाऊ एकदम कडाडले, “बापू, पाणी भरल्याशिवाय मी गाडी जाऊ देणार नाही.” आम्ही पटकन् डब्याच्या खाली उतरलो. इकडे आड तिकडे विहीर. काय करावे ह्या पंचायतीत डब्याकडे परत जाण्याची हिंमत नसल्यामुळे पुन्हा असि. स्टेशनमास्तरकडे निघालो. गाडी सुटण्याची घंटा झाली. पण करतो काय? तेवढ्यात गार्डसाहेब धावतच असि. स्टेशनमास्तरकडे आले. त्यांनी इंग्रजीत सांगितले, “तो म्हातारा गृहस्थ पाणी भरल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देत नाही म्हणतो.” आमचे काम आपोआपच झाले. स्टेशन मास्तर व इतर अधिकारी मंडळी जमली. गाडीतील लोकही डब्याभोवती जमा होऊन कौतुकाने पहात होते. पाणी भरण्याचे फर्मान सुटले. भराभर पाणी भरले गेले. 10-15 मिनिटे गाडी सुटण्यास उशीरच झाला. गाडी सुटताना भाऊंनी ‘thank you’ म्हटले व पुढील गप्पाष्टके सुरू केली.

**

वासू देशपाडे:

वात्सल्य

कलापथकाचा दौरा चालू होता. सिन्नर मुक्कामात कुसुमच्या मुलाला दम्याची उबळ आली अन् तीही अगदी कार्यक्रमाच्या वेळेला. त्याचवेळी आवाच्या मुलीने गोंधळ केलेला. तिकडे थियेटरमध्ये कार्यक्रम चालू होता तर भाऊ शेजारच्या घरी या दोन पिल्लांना अंगाई गीत गाऊन थोपटत होते.

‘मी अजून म्हातारा नाही’

डोंबिवलीला मी व भाऊ कलापथक कार्यक्रमाला गेलो. गेल्यावर मी टेकायला सोइस्कर जागा वगैरे पाहून बसले, कार्यकर्ते भाऊंनाही टेकून बसायला जागा देऊ लागले. तेव्हा भाऊ म्हणतात कसे “मी इंदूइतका म्हातारा झालो नाही.”

*

इंदुमती केळकर:

परिवर्तन

धुळ्याला 45 साली मुलींचे शाखानायक शिबिर होते. भाऊ परीक्षा घ्यायला येणार होते. मुलींना हे कळताच घाबरून रडारड सुरू झाली. मी त्यांना खूप समजावले की भाऊंना घाबरू नका; भाऊ फार प्रेमळ आहेत वगैरे वगैरे.... पण काही फारसा उपयोग झाला नाही. भाऊ आले, दोन दिवस राहील. त्यांनी परीक्षा घेतली. पुन्हा जाताना तीच रडारड दोनच दिवसात भाऊंनी मुलींना इतका लळा लावला होता की मुली सारखं माझ्या पाठीमागे लागल्या होत्या की, ‘भाऊंना जाऊ देऊ नका.

**

निंवा ब्राह्मणकर:

“तुम्ही काय करता?”

वाडिया कॉलेजांतील विद्यार्थ्यांकरिता बौद्धिक देण्यासाठी एकदा भाऊंना ह्या वर्षी बोलाविले होते. गुरुवारचा दिवस होता. रात्रीचे जेवण वगैर आटोपून आम्ही सारेजण जमलो होतो. भाऊंचा साधा आणि सरळ पोशाख पाहून आमच्या विद्यार्थी मित्रांना ते खेडूत असावेत असे वाटले. भाऊंनी इंग्रजीत ‘साने गुरुजी व आंतर भारती’ ह्यावर जवळ-जवळ दीड तास भाषण केले. त्यांची रसाळ वाणी, अंत:करणातील तळमळीने निघालेल्या शब्दांनी साऱ्या विद्यार्थ्यांची मने आकर्षिली गेली. भाऊ अगदी साधे आणि सरळ रहातात. पग पोषाखावर काही आपली बुद्धिमत्ता अवलंबून नसते हे आमच्या विद्यार्थी मित्रांना कळले. भाऊंनी वसतिगृहाबाबत काही चौकशी केली. जेवण कोठे घेता? मेसमध्ये उत्तर मिळाले, ‘मेस कोण चालविते?’ विद्यार्थी म्हणाले, ‘कॉलेज अॅथॉरिटी!’ भाऊ चिडले. ‘तुम्ही काय करता? येथे जवळ जवळ तुम्हाला 45 रुपये जेवणाचा खर्च येतो. अनेक विद्यार्थ्यांना पैशाअभावी शिक्षण घेता येत नाही. आणि एकीकडे वाटेल तसा पैसा खर्च होतो. तुम्हाला व्यवहाराचे शिक्षण कसे मिळणार? काय तुम्हाला तुमच्या जेवणाची साधी व्यवस्था करता येऊ नये?

*

परशुराम शहापूरकर:

पेच

1951च्या एप्रिल 26 ते मे 26 पर्यंत चिंचणी, गिरगाव ते शिरगावचा तीन मैलाचा रस्ता ‘पू. साने गुरूजी’ सेवा पथकाने करावयास घेतला होता. या पथकाच्या सुरुवातीपासून पू. भाऊसाहेब रानडे पंधरा दिवस होते. ते स्वत: हिरीरीने काम करीत व सैनिकांना उत्तेजन देत असत. भाऊ कुस्तीमध्ये तरबेज आहेत हे जाणून एक दिवस मी त्यांना काही कुस्तीचे डावपेच व व्यायामपद्धती मला दाखविण्यास विनविले; त्यांनी मान्यही केले. त्याप्रमाणे सायंकाळी आम्ही गिरगावच्या तालमीत गेलो. बरोबर इतर सेवा पथक सैनिक व गावकरी होते. तेथे उपस्थित झालेल्या गावकऱ्यांपैकी माझ्यापेक्षा कितीतरी उंच व धिप्पाड तरुण मल्लांशी माझी अगदी चुरशीची कुस्ती झाली. पहिला दमल्यावर दुसरा आला. पण त्याच्याशी कुस्ती लढताना माझा पवित्रा चुकला. भाऊ माझ्यावर एकदम कडाडले; “ही काय कुस्ती खेळतोस?” असे म्हणून त्यांनी मला आपल्याबरोबर खेळावयास बोलावले. पुन्हा माझा पवित्रा चुकताच त्यांनी गालावर अशी काही थप्पड दिली, आणि पायावर टाच मारून (हा एक पेच आहे) चारी मुंड्या सहजा सहजी चीत केले. हे पाहून गावकरी लोक थक्क झाले.

*

राजा मंगळवेढेकर:

वक्तशीरपणा

भाऊंच्या शिस्तीच्या, वक्तशीरपणाच्या, शीघ्रकोपित्वाच्या अनेक गोष्टी सांगता येतील. त्यांपैकीच एक :

वाघबीळ केंद्राच्या उद्घाटनाचा समारंभ. सर्व प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली होती व सकाळची वेळ असल्यामुळे बराच उशीर झालेला होता. भाऊंना थोडंसे बोलायचे होते म्हणून त्यांनी ‘दोन मिनिटे’ अध्यक्षाकडे मागून घेतली. भाऊ बोलताना अर्धेच वाक्य त्यांच्या तोंडात असताना ‘दोन मिनिटे’ संपली. तात्काळ भाऊ तसेच ते वाक्य असे सोडून खाली बसले.

*

विठ्ठल सि. बन्ने:

‘जा आता दाढी करून ये!’

पुण्याला सेवा दलाचे शिबिर भरले होते. गाण्याचा तास होता. शिट्टी झाली. भाऊ धावत व्यासपीठाकडे आले. सारे पटापट दस्तावार बसले. एकदोन सैनिक अजून खोलीतच दिसत होते. भाऊंनी त्यांच्या खोलीस बाहेरून कडी लावण्याची सूचना केली. त्याबरोबर तेही असल्या स्थितीत धावत आले. पण व्यासपीठावर ढोलकीवाला नव्हता. भाऊ ओरडले, “लीलाधर, अरे लीलाधर...” लीलाधरांना ऐकू गेले नसावे. भाऊ आवाज उंचावून गरजले, “लीलाधर…” समोरील खोलीचे दार बाजूला सारून लिलाधर पुढे आले. त्यांना बघून सारे हसू लागले. त्यांच्या हातात दाढीचे सामान होते. अर्धी दाढी झाली होती. साबणाचा फेस स्पष्ट दिसत होता. लीलाधर म्हणाले, “भाऊ, दाढी करतोय.” “ते काही चालायचे नाही. आता इथे हजर पाहिजे.” भाऊची गर्जना झाली. इतक्यात एकजण उठून म्हणाला “भाऊ, मला ढोलकी वाजवता येते.” लीलाधरकडे बघून हसत भाऊ म्हणाले, “जा आता. दाढी करून लवकर ये.”

मर्यादा ओळखा

“वल्लभभाई काँग्रेसचे आहेत, ते सोशलिस्टांचे द्वेष्टे आहेत, स्वतः बड़े भांडवलदार आहेत...” एक सैनिक वल्लभभाई कोण आहेत, या प्रश्नावर उत्तर देत होता. भाऊ मागे रेलले होते. त्यांचे वाक्य ऐकताच ते ताडकन् उठून बसले आणि गर्जू लागले. “काय अधिकार आहे तुम्हाला थोरा-मोठ्यांवर टीका करण्याचा? तुम्ही कोण? स्वतः तुम्ही देशासाठी काही केलेत का? सेवा दलाने तुम्हाला हेच का शिकवले असे सैनिक सेवा दलाला लांच्छानास्पद होय.” भाऊ प्रत्येक वाक्यागणिक मोठ्याने बोलत होते. सगळे चिडीचिप बसले होते. शेवटी वर्तमानपत्र वाचनाचा तो तास संपला. भाऊ हळूच जाऊन त्या सैनिकांच्या पाठीवर हात टाकून म्हणाले, “थोरा-मोठ्यांवर आपल्यासारख्या अजाणांनी टीका करू नये. थोरांचे चांगले तेवढेच घ्यावे!”

Tags: Vitthal C. Banne Raja Mangalvedhekar Parashuram Shahapurkar Nimva Brahmankar Indumati Kelkar Vasu Deshpade Bapu Kaldate Q. why Ganpule Senapati Bapat Bhausaheb Ranade एकसष्टी विठ्ठल सि. बन्ने राजा मंगळवेढेकर परशुराम शहापूरकर निंवा ब्राह्मणकर इंदुमती केळकर वासू देशपाडे बापू काळदाते प्र. का. गणपुले सेनापती बापट भाऊसाहेब रानडे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी