डिजिटल अर्काईव्ह

म्हसवड ते म्हसवड व्हाया जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी

मी अमेरिकेची अर्थव्यवस्था बघतो, त्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन आहे, ते शेतकऱ्यांना मदत करतात. तेच माझ्या मते गरजेचं होतं... म्हणून परत आल्यावर मी तेच करायला लागलो. Political management, agriculture management, policy management आणि policy implementation. पहिली पायरी म्हणून मी माती आणि जल परीक्षण शाळा सुरू केली. आपल्या मातीमध्ये काय आहे, हे आपल्या शेतकऱ्यांना माहितीच नाहीये. म्हणजे मी अमेरिकेत असताना माझ्या वडिलांनी 22 एकर ऊस लावला. 18 लाख रुपयांचा तोटा झाला. खडकाळ जमिनीत ऊस कसा उगवणार?
 

 

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड या गावात चेतना गाला सिन्हा आणि विजय सिन्हा यांनी स्थापन केलेल्या 'माणदेशी फाउंडेशन'च्या वतीने स्थानिक पातळीवरील महिला, शेतकरी आणि तरुण वर्ग यांच्यासाठी विविध पथदर्शी प्रकल्प मागील तीन दशकांपासून राबवले जात आहेत. त्या कार्याची दखल केवळ राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात आहे. चेतना व विजय सिन्हा यांची तिन्ही मुले आपल्या पद्धतीने अनोखे व सर्जनशील काम करीत आले आहेत, कर्तबगारी गाजवत आहेत. मोठा मुलगा प्रभात याच्या वाटचालीचा वेध घेणारी मुलाखत, साधनाच्या युवा दिवाळी अंक 2022 मध्ये प्रसिद्ध झाली होती. आता या युवा अंकासाठी त्यांचा दुसरा मुलगा करण याच्या वाटचालीचा वेध घेणारी मुलाखत घेतली आहे.

प्रश्न : तुझं लहानपण कसं होतं?

- माझं लहानपण सातारा जिल्ह्यातील म्हसवड गावात गेलं... जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणं आणि ज्यांना दुपारचं जेवणही मिळत नव्हतं अशा पोरांच्या आजूबाजूला राहणं. आमच्या शाळेत, मध्यान्ह भोजन योजनेनुसार फक्त भात मिळायचा आणि त्यामध्ये बरेचदा मीठही नसायचं. सगळ्या गावातली मुलं आमच्या वर्गात होती. आमच्या शाळेत शेतमजुरांची, दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायला जाणाऱ्या महिलांची किंवा नगरपालिकेमधल्या गटार सफाई कामगारांची, अशी सर्व स्तरांतून आलेली मुलं होती. त्यामुळे मोठं होताना आम्हाला वाटायचं की, भारत देश हा असाच आहे. 

माझी आई जैन कच्छी. तिच्याकडचे नातेवाईक यायचे, त्या वेळेस जाणवायचं की हे जरा वेगळं आहे. आपल्या आणि त्यांच्या राहणीमानात फरक आहे. पण लहानपणी असं समजलं नाही.

प्रश्न : मोठं होऊन आपण काय करायचं,असा तेव्हा विचार केला होता का?

- मला वाटतं, लहानपणीच काय... अगदी मागच्या वर्षी किंवा आजसुद्धा कुणी विचारलं की, What do you want to do, तर I don't know! म्हणजे, त्या वेळेस पण असं काहीच नव्हतं. शाळेतल्या विषयांमध्ये मला अजिबात रस नव्हता, खासकरून गणित, विज्ञान, वगैरेंमध्ये. पण एकच होतं, की मला संवाद चांगला करता येत होता. आम्ही मुलांचा गट बनवला, वेगवेगळे कार्यक्रम शाळेमध्येच घ्यायला लागलो.

मात्र मी तिसरीत असताना एक मोठा बदल झाला. तो म्हणजे आईला अमेरिकेमध्ये Yale Fellowship मिळाली. त्यामुळे सहा महिने मला आणि माझ्या भावांना तिथे राहता आलं आणि तिथल्या शाळेत जाता आलं. त्यानंतर, परत गावात आल्यावर त्याच मुलांबरोबर, त्याच वर्गात, त्याच जिल्हा परिषद शाळेत आलो, आणि तेव्हा फरक जाणवायला लागला. आमची घरची परिस्थिती जरा बरी किंवा वेगळी होती, म्हणून बाकीच्या मुलांना आमच्याबद्दल कुतूहल वाटायचं. कारण, आमच्याकडे कॉम्प्युटर होता. तेव्हा शाळेमध्ये, कुठल्याही शिक्षक किंवा मुलाकडे नव्हता. त्यात लोकं म्हणायला लागले की, अमेरिकेतून आलेत. तिथे आम्ही सहा महिनेच होतो, पण शिक्षकांना फरक लक्षात आला. कारण, माझ्या English मध्ये सुधारणा झाली. आमच्या आई-वडिलांना आमच्या शाळेमध्ये काही रस नव्हता. कुठल्याही पालक सभेला आई-वडील कधीच आले नाहीत. अर्थात, आईकडून जे privilege आलं, ते शंभर टक्के आलंच. पण त्याच वेळेला वडिलांची गावातली जी पार्श्वभूमी होती, त्याचे काही अडथळेही होते.

प्रश्न : तुझ्या लक्षात असलेली अशी तुझी पहिली आठवण काय आहे रे?

- माझी पहिली आठवण नागाची आहे. मी साडेतीन-चार वर्षांचा असेन. आमच्या शेतामध्ये काम करणारा कामगार होता, त्याचं नाव लाल्या होतं. तो तब्येतीने तगडा होता. तो कुठल्याही झाडावर चढायचा. तो मला कुठेतरी घेऊन गेलेला आणि मला आठवतं... आमच्यापुढे चार-पाच फुटांवरच नाग होता. आम्ही पुढे जाऊ शकत नव्हतो आणि मागेही नाही. तो नाग व्यवस्थित फणा काढून उभा होता. तेव्हा मला लक्षातच आलं नाही की, मी पळून जाऊ, थांबू इथे, का अजून काय करू? तो संभ्रम माझी पहिली आठवण आहे.

दुसरी आठवण आहे की, हा लाल्याच मला सिनेमा बघायला घेऊन जायचा. त्या वेळी तंबू लागायचे आणि त्या तंबूमध्येच सिनेमे असायचे. तिकीट पाच रुपये किंवा अडीच रुपये असायचं, आणि 10 वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना फुकट बघू देत. लाल्याला त्याच्या रोजंदारीचे 20-25 रुपये मिळायचे. त्यातले पाच रुपये देऊन तो दररोज रात्री नऊ वाजता पिक्चर बघायचा. त्याच्याबरोबर मी दररोज सिनेमा बघायला जायचो. तेव्हा मला धड बोलतासुद्धा येत नव्हतं. तो एक-दीड वर्ष होता आमच्याकडे काम करायला. तेवढे दिवस रोज मी त्याच्याबरोबर सिनेमा बघायला जायचो.

लहानपणी भरपूर सिनेमे बघितल्यामुळे, संजय दत्त हा माझा आयकॉन होता. परत त्याचं कारण असं की, आई-वडील बातम्या खूप पाहायचे, आम्ही घरामध्ये सिनेमे वगैरे कधीच एकत्र बसून नाही पाहिले. बातम्या बघायचो, त्या वेळेस संजय दत्त जेलमध्ये गेलेला की जेलमधून आलेला, असं काहीतरी होतं. त्याचे ते लांब केस आणि मला सगळं आठवतं. आपण असं म्हणू शकतो की, राजकीय जाणीव मला संजय दत्तमुळे यायला लागली.

प्रश्न : म्हणजे, तू मला हे सांगतोयस की, साडेचार-पाच वर्षांच्या करणला जर कोणी विचारलं असतं, की, तुला काय व्हायचं आहे, तर तो 'मला संजय दत्त व्हायचंय', असं म्हटला असता ?

- शंभर टक्के. त्या वेळेस, त्या वर्षासाठी, साडेपाच वर्षांचा असताना, ते होतं माझ्या डोक्यात... अर्थातच नंतर नाही.

प्रश्न : तू अमेरिकेला गेलास तेव्हा दुसरी-तिसरीतच असशील. तिकडे गेल्यानंतर असं वेगळं काय जाणवलं ? हो. मी तिसरीतच होतो. तिथल्या शाळेतला पहिला दिवस मला अजून आठवतो, कारण, अमेरिकन पद्धतीप्रमाणे, एका कुठल्यातरी मुलाला, ते सांगतात की, नवीन येणाऱ्या मुलाला शाळा दाखव. क्रिस नावाच्या मुलाने मला सगळी शाळा दाखवली. तो पुढील महिन्याभरातच शिकागोला जाणार होता. आम्ही न्यू हेवनला होतो. त्या शहरामध्ये छोटं पब्लिक स्कूल होतं, जिथे आम्ही जायचो. त्या शाळेमधले सगळे म्हणजे शिक्षक, इतर स्टाफ I think they were very nice and warm. आणि ते माझ्यासाठी खूप आश्चर्यजनक होतं, कारण की, आमच्या म्हसवडच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये, वर्गात आल्या आल्या, शिक्षक मारायलाच सुरुवात करायचे, आणि बरेचसे पिऊनपण यायचे...

म्हसवडमध्ये मी शाळेत आणि घरीही खूप खोडकर होतो. पण अमेरिकेला गेलो, ते सहा महिन्यांसाठी, तेव्हा I was very calm and quiet, कारण तिथे लक्षात आलं की मला मला ताप देणारे कोणी नाहीत, मग मी कशाला ताप देऊ? गणितात मी इथे नापास व्हायचो, पण तिथे मी पहिला नंबर काढला. कदाचित तिथल्या मुलांचं गणित खूपच खराब होतं. म्हणजे तिथल्या तिसरी-चौथीतल्या मुलांना तीन-चार आकडी बेरीज येतच नव्हती.

प्रश्न : मग, तुला परत येताना त्रास झाला असेल ना?

- मला नाही. पण पार्थ माझा जुळा भाऊ त्याला परत नव्हतं यायचं. तेव्हा आई अशी आश्वासनं द्यायची, 'तू परत येणारच आहे, वगैरे.' पण मला माहीत होतं, आपण काही परत येणार नाही. म्हसवडलाच राहणार.

प्रश्न : याचा अर्थ, तुझा sense of reality म्हणतात ना, तो तेव्हाही पक्का होता. तर अमेरिकेतून परतल्यानंतर, म्हसवडमध्ये शाळा केलीस, आणि नंतर कॉलेजला पुण्याला गेलास ना?

- हो, हो.

प्रश्न : मग तू शिक्षण नेमकं काय काय घेतलेलं आहे, आणि कसं कसं ते होत गेलं, हे सांग ना.

- रेसिझम हा प्रकार अमेरिकेत आहे. शिक्षकांमध्येही जाणवला, आणि काही मुलांमध्येही. पण, जातिवाद आणि धर्मवाद हा तोपर्यंत माहिती नव्हता. मी अमेरिकेहून परत आलो तेव्हा किंवा त्याही आधी मला दोन-तीन वेळा आजीबरोबर असताना जाणवलं होतं. आई जैन समाजातली होती, त्यामुळे ती गावातली नसली तरी तिला गावात respect होता. आई बरोबर असेल तर नाही जाणवायचं, पण वडिलांबरोबर, आजीबरोबर मी असेल तर जाणवायचं.

दहावीच्या परीक्षेत किती मार्क पडले त्याच्यावरती तुमचं कॉलेज ठरतं. मला 66 टक्के होते दहावीत आणि पार्थला (जुळा भाऊ) काहीतरी 80 टक्के होते. मला सायन्स घ्यायचं नव्हतं, जरी मला 90 टक्के पडले असते, तरी मी नसतं घेतलं. आणि, कॉमर्सही नव्हतं घ्यायचं, कारण त्यात गणित आहे. मला काय हवं आहे यापेक्षा मला काय नको आहे याचा मी विचार करत होतो. पण, मला काहीच माहीत नव्हतं, की मी करणार काय? पण दहावीपर्यंत बातम्या सतत बघायचो, त्यामुळे हे लक्षात यायचं की, सरकारशी संबंधित बातम्या असतील, तर लोक खूप लक्ष देऊन ऐकतात, आणि म्हणून मला नागरिकशास्त्रात रस वाटायला लागला होता. मी फर्ग्युसनला आर्ट्ससाठी फॉर्म भरला. तिथे 85-88 टक्क्यांना प्रवेश बंद व्हायचे. पण मी OBC असल्यामुळे मला तिथे प्रवेश घेता आला.

प्रभात (मोठा भाऊ) सोडला, तर मला वाटतं कुटुंबातले सगळे जण आर्ट्सच्या थोडं विरोधातच होते.

मी पुण्याला गेल्यावर, दररोज सात-सात तास डान्सची प्रॅक्टीस करायचो. आणि फर्ग्युसनमध्ये मला डान्स किंवा इतर जे काही उपक्रम करायचे होते, ते करता आले. पळशीकर म्हणून प्राचार्य होत्या आणि राज्यशास्त्राच्या प्राध्यापकही होत्या. त्यांच्यामुळे मला राज्यशास्त्रात गोडी वाटू लागली. त्या वयात सगळंच आशावादी वाटतं, पण ते खरं नसतं... फर्ग्युसनमध्ये मी चांगला विद्यार्थी बनलो. मला मार्क चांगले मिळत गेले. म्हणजे पार्थपेक्षाही चांगले मार्क पडले. त्यामुळे सगळे shocked होते. अर्थात, माझं आर्ट्स होतं आणि त्याचं सायन्स होतं.

प्रश्न : पुढे राज्यशास्त्रात तू पदवी शिक्षण घेतलंस का?

- बारावीनंतर मला पुण्यात राहायचं नाही असं मी ठरवलेलं होतं. त्याची काही कारणं होती. एक तर भाषेचा वाद खूप मोठा होता. म्हणजे, आता आपण म्हणतो की, पुण्यामध्ये जास्त मराठी चालते, मराठी शिकावं, बोलावं लागतं, पण तसं नाही. सातारा शहराची भाषा अशी आहे की, ती मुंबईचीही नाहीये, पुण्याचीही नाहीये आणि ती कोल्हापूरचीही नाहीये, या तिन्हींच्या कुठेतरी मध्ये आहे. आणि आमची भाषा तर पूर्णपणे माणदेशी आहे. त्यामुळे माझा अनुभव असा आहे की, मुंबईमध्ये मला लोकांनी सहजासहजी लगेच अॅक्सेप्ट केलं, पण पुण्यामध्ये नाही.

प्रश्न : मुंबईत तू कुठे शिक्षण घेतलंस?

- फर्ग्युसनपेक्षा चांगलं कॉलेज कुठलं असेल, तर ते सेंट झेवियर्स आहे. पण, मला तिथे रिझर्वेशन, स्पोर्ट कोटा, कल्चरल कोटा, कशातूनही प्रवेश मिळणं शक्य नव्हतं. मुंबईला आल्यावर मी मिठीबाईला प्रवेश घेतला, कारण मी असं ऐकलं होतं की, सगळे फिल्म अॅक्टर, डान्सर्स यांचे ऑडिशन आणि वावर त्याच भागात असतो, त्यामुळे तिथे मला स्कोप मिळेल. ते एक मिथच ठरलं. तिथे गुजराथी विद्यार्थी जास्त होते. आणि माझं आडनाव सिन्हा होतं, त्यामुळे लोकांना वाटायचं की, मी उत्तर भारतीय आहे. पण मी फोनवर किंवा कुठल्या मुलांबरोबर मराठीत बोलायचो, तर ते लोक शॉक व्हायचे. पण मला असं कधीच वाटलं नाही की मुंबई सोडावी. I really like Mumbai.

दुसऱ्या वर्षापर्यंत माझा निर्णय झाला की, अभ्यास वगैरे नाही करायचा. मुंबई पूर्ण समजून घ्यायची. मी बेफिकीर होतो. मी किती वाजता उठतोय. मित्रांबरोबर कुठे जातोय, काय करतोय. कितीतरी वेळा I have come with hangover in class. सकाळी साडेसातचं लेक्चर असो की परीक्षा... माझी हुकली म्हणूनच समजा. चेंबूरवरून मिठीबाईला जायला मला दीड तास लागायचा. पण तिसऱ्या वर्षी मी गांभीर्याने अभ्यास केला आणि वर्गात अव्वल आलो. प्राध्यापक चक्रावले. कारण लोकांना असं वाटायचं, 'अरे, हा तर डान्सच करत असतो दिवसभर. ह्याला कसे काय चांगले मार्क मिळाले ?'

लोक विचारायचे, 'तुझे वडील काय करतात, आई काय करतात?' मी स्वच्छपणे सांगायचो, 'माझे वडील शेतकरी आहेत.' मग ते विचारायचे, 'तुला काय करायचं?' तर मी आवर्जून म्हणायचो की, 'मी शेतीमध्ये कधी काम करणार नाही. I will do anything else, but not farming.'

माझी राज्यशास्त्रात पदवी झाली. आणि माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आला. पार्थ संगीतात काम करत होता. त्याला युरोपमध्ये काही गिग्स मिळाल्या होत्या. डान्समध्ये पुढे काही होणार नाही म्हणून मी तो सोडून दिला आणि पूर्णपणे राज्यशास्त्रात शिरलो. पार्थचं काम होतं, त्याला सगळं फ्री मिळालं होतं. तो मला म्हणाला की, 'मला plus one आहे, तर तू ये माझ्याबरोबर.' कारण त्याला bore होईल एकट्याला. त्याला बोर व्हायच्या ऐवजी मीच बोर झालो तिथे. परत आल्यावर भाऊंनी विचारलं, 'काय, कुठं होतास तू दहा दिवस ? दिसलाच नाहीस.' मी युरोपला गेलोय ते त्यांना माहीतच नव्हतं. मी त्यांना सांगितलं की, मी युरोपला स्पेनला, जर्मनीला होतो. हे पाहिलं, ते पाहिलं, महायुद्धावरचं म्युझियम पाहिलं, युरोपियन आर्किटेक्चर पाहिलं, वगैरे... तर भाऊ म्हणाले, 'बरं, पुढच्या सुट्टीत काय करणार?' तेव्हा मी 19 वर्षांचा होतो. म्हटलं, 'मला अॅमस्टरडॅम बघायचंय. भाऊंनी विचारलं, 'तिथे जाऊन काय करणार? अॅमस्टरडॅममध्ये?' मी म्हटलं, 'मला खाऊगल्लल्या बघायच्यात तिथल्या. कॉफी ट्राय करायची आहे, कशी बनते ते. त्यावर फिल्म्स बनवायच्या आहेत...' मी त्यांना सांगत होतो आणि ते हसायला लागले. 'तू तुझा महाराष्ट्र बघितला आहेस का? हे करण्यापेक्षा, आधी तुझा महाराष्ट्र बघ, काय आहे तुझ्या महाराष्ट्राची परिस्थिती? तुला जे युरोपमध्ये करायचंय, तेच तू महाराष्ट्रात करू शकतोस.' यामुळे मला अगदी मनापासून नाही वाटलं, पण हे म्हणतात, तर काहीतरी असेलच त्यात असं वाटलं.

मुंबई विद्यापीठात Masters in Political Science चं वर्ष सुरू व्हायला अजून 15 दिवस होते. गांधी आणि गांधींच्या चळवळी, असा माझा Mastersचा विषय होता. एक महिना मी extra घेतला, कारण विद्यापीठाचे वर्ग सुरू व्हायला वेळ लागणार होता. दुसऱ्याच दिवशी मी ठरवलं की, I will go all across Maharashtra. आता महाराष्ट्र पूर्ण पिंजून काढायचा. 45 दिवस आणि एक बॅग. मी मुंबईवरून ट्रेन पकडली, औरंगाबादला आलो. तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पाहिलं होतं. पण मराठवाडा बघितला नव्हता. लहानपणी अजिंठा, वेरूळ पाहिलं होतं. पण जालना, उस्मानाबाद, बीड, या जिल्ह्यांची काय परिस्थिती आहे किंवा विदर्भातली काय परिस्थिती आहे, हे मला माहीत नव्हतं. तर, ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मला जायचं होतं. माझी राहायची काही सोय नव्हती. मी शेतकऱ्यांना भेटलो, शाळांना भेटी दिल्या. महाराष्ट्रातल्या शाळांची परिस्थिती काय ? महाराष्ट्रातली नगरपरिषद, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत, 73 व 74 वी घटनादुरुस्ती आणि विकेंद्रीकरण हे मी फक्त अभ्यासात वाचलेलं होतं. वर्ष होतं 2014. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. मला लोकांचा perspective जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती. मी माझा कॅमेरा आणि फोन घेऊन फिरत होतो. औरंगाबादला गंगापूर नावाचं गाव आहे. मी तिथे उतरलो आणि मला शोएब नावाचा एक भूमिहीन शेतकरी भेटला. तो बैल घेऊन, नांगरणी करत होता. तो उंचीने कमी, एकदम हाडकुळा होता. त्याने फाटका बनियन घातला होता. तो नांगरणी करत होता आणि त्याचा आठ-नऊ वर्षांचा मुलगा त्याच्याबरोबर होता. मी त्याला म्हटलं, "मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत? तू तुझ्या आयुष्याबद्दल मला सांग, शेतीत काय करतोस?" तो म्हणाला, "कापूस करतो.” मी विचारलं, "काय आहे कापसामध्ये ?" तो म्हणाला, "मी तर फक्त मजूर आहे." म्हटलं, "तुला आठवड्याचे किती रुपये मिळतात?" तर तो म्हणाला, "मला 700 रुपये मिळतात." म्हणजे तो महिना 2800 रुपयांवर जगणारा माणूस होता. माझी त्या वेळेसची पॉकेटमनी 4000 रुपये होती. म्हणजे I was spending more than he was earning. मी पुढे विचारलं, "किती मुलं आहेत?" तर तो म्हणाला, "मला पाच मुली आणि सहावा मुलगा आहे." सगळं आयुष्य त्याने वयाच्या आठ वर्षांपासून ह्या शेतामध्येच काम केलं होतं. त्या मालकांकडे 20-25 वर्ष काम करत होता. तो आधी तर फुकटच काम करत होता, जेवणासाठीच. हे ऐकून I was in shock. उतरल्या उतरल्या मला हा पहिला माणूस भेटला. त्याच्या घरात लाईट नाही, गॅसही नाही. मी म्हटलं, "किती वेळा जेवतो?" तर तो म्हणाला, "सकाळी चहा पितो आणि संध्याकाळी जेवायला येतो." ही सगळी परिस्थिती ऐकल्यानंतर माझ्या मनात अजूनच पक्कं झालं की, शेतीमध्ये मी कधीही येणार नाही. मग मी त्याला म्हटलं, "हे 500 रुपये घे, आणि तुला जसं आवडतं ना तसं तू non-veg बनव." त्याने दोन किलो चिकन आणलं, मसाले आणले आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर मी त्या रात्री जेवलो. साधारण साडेदहा वाजता त्याने बैलगाडीवर वाकळ टाकली, ती हाताने शिवलेली, रंगीबेरंगी वाकळ होती, तिथे त्याची बायको होती, मुलं होती, आणि तो ताडी पीत निवांत बसलेला. मी माझ्या आयुष्यातलं पहिलं रामायण त्याच्याकडून ऐकलं. आणि त्या शोएबने जसं रामायण मला सांगितलं, ते त्याच्या perspective चं रामायण होतं. म्हणजे तो स्वतः आणि मराठवाडा त्यात गोवलेला होता. राम, लक्ष्मण, इथेच वावरत होते, हरीण इथूनच गेलेलं, वगैरे वगैरे. त्याने ते त्याच्या perspective ने सांगितलं, and I had not heard this Ramayana... त्याने ज्या पद्धतीने मला रामायण सांगितलं... it was just amazing. दुसऱ्या दिवशी मी त्याला भेटलो आणि त्याला अजून 500 रुपये देऊन तिथून निघालो.

मी 28 जिल्ह्यांत फिरलो. अशा अनेक कथा व व्यथा ऐकल्या. शेवटी मी गडचिरोलीला आलो. तिथे मी नक्षलवाद्यांना भेटलो. गंमत म्हणजे, they were following me. T-shirt, jeans, goggle घालून हा मुलगा आलाय, सगळ्यांचे व्हिडिओ घेतोय. भामरागडच्या शेवटच्या गावामध्ये जाऊनसुद्धा लोकांशी बोलतोय. मी जवळ जवळ छत्तीसगढ़पर्यंत पोहोचलो. आणि मग जिथे जिथे लाल झेंडे होते, तिथून पुढे गावकऱ्यांनी मला जाऊ दिलं नाही. काही नक्षलवाद्यांशी मी बोललो. एकाला basic प्रश्न विचारले, "तू का ह्याच्यामध्ये आहेस?" तर तो म्हणाला, "मी परवाच सरपंचाला मारलंय." म्हणजे त्याच्या गटाने गावाच्या कमानीलाच बांधून त्या सरपंचाला मारून टाकलं, कारण तो त्यांच्या प्लॅनची माहिती पोलिसांना देत होता. मी त्याला विचारलं, "तो नक्षलवादात का आला?" तर तो म्हणाला, "मला काय माहितीच नाही नक्षलवाद काय आहे, नक्षलवादी गाव काय आहे, सुरुवात कशी झाली, वगैरे..." तो माझ्यापेक्षा एखादाच वर्ष मोठा असेल. त्याने मला माझा t-shirt, toothbrush आणि माझा goggle मागितला. मी म्हणालो, "मी तुला सगळं देतो.. पण मला एक सांग कि तू ह्याच्यामध्ये का आला? तू काही व्यवसाय वगैरे करू शकतो." तर तो म्हटला, "नाही ना, आदिवासींना असं नाही ना जमत. हे सगळं तुमच्या लोकांसाठी आहे व्यवसाय, नोकरी, वगैरे... आमच्यासाठी जंगल, जमीन, जानवर आणि जल हे चार 'ज'च आहेत... ते आम्ही कधीच विसरत नाही आणि त्याच्यावरतीच राहतो. कारण शहरांमध्ये तुम्ही आम्हाला हमाल बनवता. आमच्याकडे, आमच्या डोळ्यांकडे, नाकाकडे बघून, तुम्ही आम्हाला हमालच बनवणार." त्याने पुढे सांगितलं की, त्याच्या बहिणीवर आणि आईवर बलात्कार झाला होता, म्हणून तो नक्षलवाद्यांबरोबर मिळाला. बलात्कार करणारे तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक आणि असेच तिथले सरकारी अधिकारी होते. आणि पोलिसांनी काहीच दखल घेतली नाही. त्या क्षणी दुःखाच्या कहाण्या ऐकायची माझी क्षमता संपून गेली.

माझ्याकडून तो सगळं घेऊन गेला. माझ्याकडे जे पैसे होते, तेपण मी त्याला देऊ केले. पण तो म्हणाला की, पैशांचा त्याला काही उपयोगच नाही. कारण तिथे विकत घेण्यासारखं काही मिळतच नाही. आणि मग मी कॅमेरा बंद केला आणि 24 तास प्रवास करून पुण्याला पोहोचलो.

मग मी मुंबईला मास्टर्स करायला गेलो. मास्टर्स करता करता खूप शोधत होतो की मला काय आवडतंय, काय आवडत नाही. शिक्षणात रस वाटत नव्हता. पण प्रवेश घेतला होता, तर मी मास्टर्स पूर्ण करायचं ठरवलं. मग मी जागृती यात्रामधून भारत दौरा केला. तिथेही नवीन नवीन गोष्टी पाहिल्या, पण महाराष्ट्राची माझी सफर आणि हा दौरा वेगळा होता. तिथे मी मला जे जाणून घ्यायचं होतं, ते एक्स्प्लोर करत होतो... आणि जागृती यात्रेत, त्यांना जे दाखवायचंय, तेच तुम्ही बघता.

थर्ड सेमेस्टर संपेपर्यंत मला मुंबई विद्यापीठात राहायची इच्छा उरली नाही. चौथी सेमिस्टर मी दिलीच नाही, अजूनही नाही दिलेली. थर्ड सेमिस्टरमध्ये मला डिस्टिंक्शन मिळालं. म्हणजे अभ्यास न करता, because it was too easy for me. आता लक्षात येतंय की ते सोपं होतं माझ्यासाठी, कारण मी लहानपणापासूनच समाजकारण, राजकारण पाहिलेलं आहे.

मग मी ब्रुकिंग्ज इंडिया मध्ये काम करण्यासाठी प्रयत्न करू लागलो. तिथे मला internship मिळाली. बुकिंग्ज इंडिया ही एक अमेरिकन थिंक टैंक आहे, जी policy वर काम करते. आता भारताच्या पंतप्रधानांच्या सल्लागार आहेत, शमिका रवी, त्या माझ्या बॉस होत्या. जयशंकर यांचा मुलगाही माझा बॉस होता.

त्या दरम्यान मी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत होतो. कॉफीची आवड होती, म्हणून मग म्हटलं कॉफीच सर्व्ह करूयात आणि स्टारबक्समध्ये काम केलं. choreographer म्हणून काम केलं, एक photographer म्हणूनसुद्धा काम करायला लागलो. मी random jobs करत होतो, पण बुकिंग्ज नंतर लक्षात आलं की, आता मला काहीतरी महत्त्वाचं करायला पाहिजे. मी GRE ची तयारी करायला लागलो. मला अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाला. माझा program होता राजकीय व्यवस्थापनामार्फत योजना कशा राबवायच्या. एक प्रकारे, तुम्ही राजकारण्यांना सल्लागार म्हणून काम करता. मला पाच हजार डॉलर्सची स्कॉलरशिप मिळाली. पण मला ती सोडावी लागली, कारण माझ्याकडे फीचे पैसे नव्हते भरायला. मी पुढच्या वर्षी admission घ्यायचा निर्णय घेतला. जवळजवळ 60 लाख रुपये भरायचे होते आणि कुठून आणणार काही कळत नव्हतं. भाऊ मला म्हणाले, "मी आणतो तुझ्यासाठी, तू घे प्रवेश." भाऊ एवढे पैसे उभं करणं शक्य नव्हतं हे मला माहिती होतं. मी बँकेतून कर्ज घ्यायचं ठरवलं. मी स्टेट बँकेमध्ये गेलो, फेऱ्या मारल्या. स्टेट बँक शेतीच्या जमिनीला कर्ज देत नाही. पण जर ती शेतीची जमीन नसेल, तर ते कर्ज देतात. म्हणजे तुमची 100 एकर शेतजमीन असेल, तर काहीच कामाची नाहीये. पण जर तुमच्याकडे एक हजार चौरस फूट जागा NA मध्ये असेल तर रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या कायद्यानुसार, ते जास्त महत्त्वाचं आहे. आमची एक NA plotting ची जमीन होती. ती जामीन दिली आणि मग मी 30 लाख रुपयांचं कर्ज घेतलं.

माझा प्रवेश पुढच्या वर्षीच्या जानेवारीत ठरला. माझ्याकडे आठ-नऊ महिने होते, ह्या वेळात काय करायचं? मी दुसऱ्या दिवशी LinkedIn वर गेलो आणि जॉब्स शोधायला लागलो. लोकं म्हणतात, की आई-वडिलांचं नाव मोठं असेल, तर लगेच जॉब उपलब्ध होतात, पण हे खूप चुकीचं आहे. मला finance मध्ये, agriculture मध्ये रस नव्हता. बुकिंग्जचा अनुभव होता. पॉलिसी बनवण्यातही रस नव्हता. एक दिवस प्रशांत किशोरची मोठी जाहिरात आली होती Political Management संदर्भात... मला त्यांच्याबद्दल माहीत होतं. माझे वैचारिक मतभेद नक्कीच होते, पण मी म्हटलं, 'ओके, त्याने कंपनी सुरू केली आहे, जर त्याने एवढी मेहनत केलीये तर मला प्रयत्न करायला हवेत.' मी Linkedin वरून एक इमेल लिहिला आणि मला लगेचच Senior Executive म्हणून जॉब मिळाला, मी माझा रेझ्यूमेसुद्धा धड अपडेट केला नव्हता. मुलाखतीला गेलो, तेव्हाच त्यांनी सांगितलं की, आम्ही शिवसेनेसाठी प्रचार मोहीम चालवतोय, खासकरून आदित्य ठाकरेसाठी.

वर्ष होतं 2019. लोकसभा, विधानसभा दोन्ही निवडणुकांचं वर्ष. जानेवारीमध्ये मी काम सुरू केलं. वरळी मतदार संघासाठी तर योजना तयार केल्याच, पण शेतकऱ्यांसाठी योजना तयार करायला मदत केली. उदा., महाराष्ट्रात कर्जमाफी झाली, तर ती कशी व्हायला पाहिजे, कुठल्या शेतकऱ्याला व्हायला पाहिजे, त्याच्या अटी काय पाहिजेत ? वगैरे. निवडणुकीची आश्वासने नक्की करायच्या आधी आमची खूप सखोल चर्चा व्हायची. ती राबवायची कशी याचीही चर्चा व्हायची, आणि मग ती आश्वासने जाहीर व्हायची. मी आखलेला आराखडा मला सत्यात उतरताना दिसला, आणि मला शेतीत रस वाटायला लागला. मग आम्ही 'मी महाराष्ट्र, मी शेतकरी' नावाची मोहीम सुरू केली. agricultureच्या policiesमध्ये काम करायचं, पण शेतीमध्ये नाही यायचं. मी माझ्या वडिलांना पाहिलंय. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं, जमिनी विकल्या, जेलमध्ये गेले. मला ते नाही करायचं, असं माझ्या डोक्यात होतं. आठ महिन्यांनी मी I-PAC सोडलं.

प्रश्न : मग I-PAC नंतर काय केलंस?

- मी अमेरिकेला गेलो आणि माझ्यासाठी ते game changer ठरलं. मी वर्गात सर्वांसाठीच महत्त्वाचा ठरलो. कारण माझी जी पार्श्वभूमी होती, ती कोणाचीच नव्हती. अगदी तिथल्या काळ्यांचीसुद्धा नव्हती. मी काळे का म्हणतो, कारण की, तिथे गेल्यावर मला समजलं, to call black people 'black' is what they want. ते म्हणतात की, आम्हाला African American म्हणायला आमचा आणि आफ्रिकेचा काय संबंध? ते 400-500 वर्षांपूर्वी अमेरिकेत आले, गुलाम म्हणून. आफ्रिकेशी त्यांचा काही संबंध नाही राहिला, त्याचं racism मला समजायला लागलं. LGBTQ+ rights मला समजायला लागले. हे सगळं समजून घेत असताना माझ्या डोक्यात सतत agricultureचा विषय घोळत असायचा. मी बोलायचो पण त्याबद्दलच. माझ्या जेवढ्या सगळ्या assignments होत्या, त्या सगळ्या भारत आणि भारतातली शेती, भारतातला शेतकरी, आणि भारतातला तरुण शेतकरी, मुलगा किंवा मुलगी यांच्यावरती होत्या.

दरम्यान योगायोगाने मी Farmers for Free Trade या संस्थेमध्ये काम करायला लागलो होतो. American लोकांना त्यांच्या शेतकऱ्यांबद्दल एवढं प्रेम आहे. तिथे शेतकरी 2 टक्क्यांपेक्षाही कमी आहेत. पण त्यांच्यासाठी खूप जास्त subsidies दिल्या जातात, त्यांना खूप मदत केली जाते. आणि त्या शेतकऱ्यांसाठी माझ्यासारखी मुलं त्यांनी मॅनेजर म्हणून घेतली आहेत. उदा., 'माझा सफरचंद आहे, तो तू भारतात विक.' आता गंमत बघा हां... मी काय करत होतो? तर मी अमेरिकन शेतकऱ्यांसाठी काम करत होतो. It was a learning experience for me. मला पगारही चांगला मिळत होता, म्हणून मिळालेलं काम पूर्ण करायचं ठरवलं. आम्ही नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांच्याबरोबर बैठका ठेवल्या. त्या वेळी आदित्य इथे मंत्री होता. त्याच्याबरोबर बैठका ठेवल्या. मी ज्या संस्थेत काम करत होतो, ती शेतकऱ्यांनीच सुरू केलेली होती. दर महिन्याला एक शेतकरी 2 हजार डॉलर्सची गुंतवणूक करायचा, फी म्हणून. आणि जे शेतकरी त्यात आहेत, त्या शेतकऱ्यांचे सफरचंद, पिस्ते, बदाम, पीच, डाळी, हे सगळं भारतामध्ये विकलं जात होतं. ते काम आम्ही करायचो. आम्हाला 2 हजार डॉलर्स त्यांची फी म्हणून यायची. माझ्या लक्षात आलं की, भारतात हे नाहीच आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी नांगरायचं, जमिनी नीट करायच्या, दुसरीकडून माती आणायची, बियाणं विकत घ्यायचं, ड्रीप लावायचे, विहिरी खोदायच्या, पाट तयार करायचे, शेततलाव तयार करायचे, नदीतलं पाणी शेतापर्यंत आणायला दहा-बारा कि.मी.च्या पाईपलाईन लावायच्या. म्हणजे शेतकरी स्वतःच्या जिवावर गाव तयार करतो आणि पीक आल्यानंतर फवारणी करा, त्याच्यावरती खतं टाका, पाऊस आला, तर त्याच्यावरती shed net टाका, जास्त ऊन आलं तर डाळिंबासारखं फळ वाचवण्यासाठी पूर्ण पांढरा shed net पांघरायचा. म्हणजे विज्ञान शिका, तंत्रज्ञान आणि त्याचा वापर शिका, जीवशास्त्र शिका, दुसऱ्या आळ्यांना मारायसाठी आपल्या आळ्या तयार करा. म्हणजे शेतकऱ्यांनी काय काय करायचं? आणि शेवटी पीक विकायचं शेतकऱ्यांनीच. म्हणजे जमीन निवडण्यापासून ते माल विकण्यापर्यंत सगळं शेतकऱ्यांनीच करायचं. आतापर्यंत मी अशीच शेती बघत होतो, आणि ते मला नव्हतं करायचं.

अमेरिकेला गेलो आणि तिथे Universities होत्या, ज्या शेतकऱ्यांना शेती कशी करायची, हे बांधावरती येऊन शिकवत होत्या. Farmers for Free Trade सारख्या संस्था शेतकऱ्यांना जगाच्या टूरवर घेऊन जात होत्या की, कुठल्या देशामध्ये कुठल्या पिकासाठी सगळ्यात चांगलं market आहे. market शेतकरी स्वतः बघतात. दर बघतात. मग अमेरिकन सरकार त्यांना सांगतं, तुम्ही फक्त 10 रुपये किलोला सफरचंद विका, कारण की काश्मीरमधला शेतकरी 15 रुपयाला विकतोय ! आम्ही तुम्हाला subsidize करू.

म्हणून आजही अमेरिकेमध्ये फळं भारताएवढीच स्वस्त आहेत. आपल्या इथल्या माणसाचा सरासरी पगार महिन्याला 22 ते 25 हजार रुपये आहे. त्यांचे सरासरी पगार महिन्याला 5.5 लाख रुपये. तिथली अंडी, दूध, हे आपल्या भारताएवढेच स्वस्त का आहेत ? मग मला या अर्थकारणात रस वाटायला लागला. हे फक्त हमीभावासाठी केलेल्या आंदोलनाबद्दल नाहीये. आपल्याकडे ती सिस्टीमच नाहीये. सरकारने केली नाही आणि शेतकऱ्यांना तर माहितीच नाही.

आम्ही गडकरी, सुरेश प्रभू, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे या सगळ्यांबरोबर या संस्थेचे conference calls केले. तेव्हा महाराष्ट्रातले आणि केंद्र सरकारचे, दोन वेगळी सरकारं होती, भिन्न विचारधारा होती. तरीही we came to a pact. जवळजवळ ठरलं की, आता भारतातून आपण काय पाठवणार. अमेरिकन सेनेटर फक्त पाच मिनिटे बोलला. कारण मी त्याला पाचच मिनिटे दिली होती. मी त्याला सांगत होतो. पण त्याच्यातून साध्य काय करायचं, ही चर्चा शेवटपर्यंत नेलीच नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, आपल्या नेत्यांना electoral relations व्यतिरिक्त शेतकऱ्यांशी कसे संबंध ठेवायचे, हेच माहिती नव्हतं. आपण शेतकऱ्यांसाठी जमलो, पण आपण काय विकणार हे सांगितलेच नाही. ते त्यांचे सफरचंद व्यवस्थित प्रमोट करत होते. त्यांनी त्या शेतकऱ्यांची व्यवस्थित लॉबी तयार केली होती. तिथं अडीच हजार शेतकरी हजर होते आणि बघत होते की, गडकरी आमचे सफरचंद घेणार की नाही? फक्त एकच विचार की, 'माझा सफरचंद हा भारतातल्या गावोगावच्या बाजारात आला पाहिजे.' इतक्या शेवटपर्यंत त्यांनी विचार केला होता. मी अमेरिकेतून परत आलो तेव्हा अमेरिकन अॅपल असोसिएशनचे सफरचंद मला बाजारात दिसले. पण आपलं एकही प्रोडक्ट आपण अमेरिकेमध्ये प्रमोट करू शकलो नाही.

प्रश्न : आपली डाळिंबं आता अमेरिकेला जायला लागलीत. माणचा ड्रॅगन फ्रूट आता लंडनमध्ये पोहोचतोय. म्हणजे तू नेमकं काय करायला लागलास? 

- आम्ही केलेल्या ट्रेड डीलमध्ये त्यांनी सफरचंद पाठवली, पण आपण भारतीय डाळिंब आणि आंबे आपण पाठवू शकलो नाही ही खंत मला होती... अजूनही आहे. पण माझं शिक्षण अजून सुरूच होतं. कर्जपण होतं. काम करावंच लागणार होतं. कोरोनाच्या काळात मी एका pig farmer कडे त्याचे मटण farmers market मध्ये विकायचं काम करायचो. त्याला माल विकायला, अशी बोलकी, चांगली, हुशार मुलं हवी होती. People of color जास्त हुशार असतात, आणि ते खूप कष्ट करतात, बारा-बारा तास काम करतात. मी त्याच्याकडे काम करायला लागलो. सकाळी सहा वाजता सायकल घेऊन मी तिथपर्यंत पोहोचायचो. मला कॉलेजने सायकल घ्यायला पाचशेचं कर्ज दिलं. कोविड होता, त्यामुळे सगळे transportation ठप्प होते अमेरिकेत. ते कर्ज मी महिन्याभरातच फेडलं, कारण हा job मला मिळाला. मला चार-पाच तासांच्या कामाचे शंभर-दीडशे डॉलर्स मिळायचे. त्यावर दररोजचा खर्च चालवायचो, आणि माझं शैक्षणिक कर्ज होतं, फी वगैरे ते भरायचो. आणि बाकीचा खर्च मी कुठे, security guard म्हणून काम करून, restaurant मध्ये, bar servant म्हणून काम करून चालवायचो. ही कामं मी शनिवार-रविवारी करायचो. असे पैसे गोळा करत करत मी बचत करायला लागलो. I paid my rent आणि नंतर मी माझ्या कॉलेजची फीपण भरली. थोडक्यात मी डुकराचं मटण विकायचो, हॉटेलात काम करायचो. त्याच्यावर मला चांगल्या टिप्स मिळायच्या.

मी अमेरिकेची अर्थव्यवस्था बघतो, त्यांचा व्यवसायिक दृष्टीकोन आहे, ते शेतकऱ्यांना मदत करतात. तेच माझ्या मते गरजेचं होतं... म्हणून परत आल्यावर मी तेच करायला लागलो. Political management, agriculture management, policy management आणि policy implementation. पहिली पायरी म्हणून मी माती आणि जल परीक्षण शाळा सुरू केली. आपल्या मातीमध्ये काय आहे, हे आपल्या शेतकऱ्यांना माहितीच नाहीये. म्हणजे मी अमेरिकेत असताना माझ्या वडिलांनी 22 एकर ऊस लावला. 18 लाख रुपयांचा तोटा झाला. खडकाळ जमिनीत ऊस कसा उगवणार? शक्यच नाही. म्हणजे माझ्या वडिलांसारख्या हुशार, श्रीमंत शेतकऱ्यांनासुद्धा हे समजत नाही की काय पीक घ्यावं. म्हणून मी गावागावांत मीटिंग लावायला लागलो. शेतकऱ्यांमध्ये माती, पाणी याच्याबद्दल जागृती करायला सुरुवात केली. (आत्तापर्यंत साडेतीन हजार शेतकऱ्यांचे माती, पाणी, देठ आणि पान यांचं परीक्षण केलंय.) सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, जिथे सगळ्यात जास्त पाऊस आहे आणि माण तालुका, जिथे बिलकुल पाऊस नाहीये. इथे मागासवर्गीय लोकसंख्या जास्त आहे. त्याचबरोबर, गरिबी आणि शहराकडे स्थलांतर जास्त आहे. हे सगळं लक्षात घेता, माती आणि पाणी परीक्षण शाळा सुरू करणं, आणि त्यात सत्तर लाख रुपये घालणं, ही कधी न झालेली मोठी रिस्क होती... पण ती घ्यायलाच हवी होती... वेगवेगळ्या संस्थांनी CSR program मधून आम्हाला मदत केली... ज्या शेतकऱ्यांनी soil testing केली आहे, ते इतके खूश आहेत की, आम्ही आता विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून शेती करतोय.

प्रश्न: असं म्हणतात की, भारतामधल्या शेतकऱ्याचं परंपरेनंच specialization झालेलं आहे. त्यांना मातीकडे बघून कळतं की आता आपण हे पीक घेऊ असं. जेव्हा आपण वैज्ञानिक दृष्टीकोन घेऊन त्यांच्याकडे जातो, आणि त्यांची माती आणि पाणी तपासायला सांगतो, त्या वेळेला त्यांचा सुरुवातीला प्रतिसाद कसा होता?

- मी इथे आलो, तेव्हा मला लक्षात आलं की, शेतकऱ्यांना काहीच माहीत नाहीये. पंतप्रधानांनी 'मेरा देश, मेरी मिट्टी' ही योजना सुरू केली. अधिकारी आले, soil, water testing lab, ट्रक भरून मातींचे नमुने घेतले. प्रत्येक शेतकऱ्याकडून पन्नास रुपये घेतले... ना ती माती परत आली, ना त्याचे निकाल. विचार करा, एकट्या माण तालुक्यातून समजा एक लाख शेतकऱ्यांनी माती दिली. म्हणजे किमान 50 लाख रुपये माण तालुक्याच्या शेतकऱ्यांकडून घेऊन मातीचं काय झालं ते पुढे काहीच माहीत नाही... आणि मुख्य म्हणजे तेवढ्या पैशात माती परीक्षण होऊच शकत नाही. मातीचं संपूर्ण परीक्षण करायला nuclear technology सारखे तंत्रज्ञान वापरणारे सहा प्रकारचे मशीन लागतात. तर तुम्ही 16 parameters तपासू शकता.

आम्ही सुरुवात केली, तेव्हा आधीच्या अनुभवामुळे शेतकऱ्यांना विश्वासच नव्हता की असं काही मशीन वगैरे आहे. आणि प्रतिसाद अजिबात नव्हता. पहिल्या वर्षी आम्ही फक्त 300 शेतकऱ्यांची माती टेस्ट कली आणि मला वाटायला लागलं की, हे पुढे चालवणं शक्यच नाही, इतकं महागडं होतं सगळं... आणि तुम्ही technician आणणार कुठून? मग मी Cornell University, George Washington University यांच्या agriculture departmentशी संपर्क साधला. आणि इथल्या, संस्थेमध्येच काम करणाऱ्या, chemistry झालेल्या मुला-मुलींना प्रशिक्षण दिलं. वर्षभर आमचं फक्त ट्रेनिंगमध्ये आणि शेतकऱ्यांना समजावण्यात गेलं. मग आम्ही 600 रुपये फी लावली. शेतकरी ती भरायलाच तयार नाही. सगळं थकबाकीत जात होतं. सगळे म्हणायचे, 'विजय सिन्हांनी सांगितलंय फुकट होणार... भाभीचं (चेतना सिन्हा) नाव आहे. तुम्ही फुकटच करायला पाहिजे.' आम्हाला program कसा चालवायचा हे कळेना. पण, results यायला लागले... एका शेतकऱ्याने एका वर्षात फक्त अडीच एकरामध्ये 55 लाख रुपयांचं डाळिंब विकलं. श्रेय सगळं माझ्या टीमचं आहे. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींनी लॅब सुरू केली, चालवली, गावागावात जाऊन, रात्री दोन वाजेपर्यंत शेतकऱ्यांबरोबर वाद घालून त्यांची व्यवस्था बदलली... जसं अमेरिकेमध्ये माझ्यासारख्या मुलांना घेऊन त्यांनी शेतकऱ्यांचं association चालवलं, त्याच पद्धतीने मी हे काम करतोय. शेतकऱ्याच्या बांधावरती आम्ही शास्त्रज्ञ पोहोचवला. सोलापूरची NRCP सारखी संस्था आहे, ते अख्ख्या भारतातलं डाळिंबाचं संशोधन केंद्र आहे, 2009 मध्ये सुरू झालेलं. पण त्याचा काही वापर नाही झाला. तिथे 17 शास्त्रज्ञ आहेत, they are among the brightest minds in India. दर आठवड्याला आम्ही त्यांना भिंगरीसारखं फिरवलं. नंतर आम्ही डाळिंब निर्यात करायला सुरुवात केली. आतापर्यंत आम्ही अमेरिकेला 10 टन आंबा, डाळिंब व अन्य फळे पाठवली आहेत. त्याच्यामध्ये अख्खं गाव तयार झालं डाळिंबाचं. आम्ही एका-एका गावाला 'डाळिंबाचे गाव' म्हणून घोषित करायला लागलो. तसंच हे आंब्याचं गाव, हे द्राक्षाचं गाव. आम्ही आता युरोपला द्राक्ष पाठवतोय. फक्त मार्केटिंगने हे साध्य होत नाही, तर शेतकऱ्याला शेती कशी करायची, हे शिकवणं महत्त्वाचं आहे. मग, फवारणीमुक्त फळ असेल, तर त्याचा दर किलोमागे वीस रुपयांनी वाढतो, हे शेतकऱ्यांना समजावून दिलं. आता आम्ही जमिनीपासून रोपाच्या शेंड्यापर्यंत, सगळ्याचं testing करतो. आणि आमचे शेतकरी 100 टक्के पैसे भरतात.

मला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. माझ्या शाळेतील वर्गामध्ये जी मुलं होती, त्यांच्या आया-बहिणी रोजंदारीवर खणायचं किंवा खुरपण्याचं काम करत होत्या, किंवा साफसफाईचं काम करत होत्या. त्यांना आम्ही डाळिंबाच्या झाडाच्या कापणीचं प्रशिक्षण दिलं आहे. डाळिंब किंवा द्राक्ष कापणं, it is complete geometry and physics. अमेरिकेत हजार हजार एकरची शेतं असतात. त्यांना ती सांभाळणं अशक्य आहे. तर अमेरिकेने मेक्सिकोमध्ये द्राक्ष कशी कापायची, त्यांची फवारणी कशी करायची याचे ट्रेनिंग सेंटर सुरू केले, तुम्हाला विसा हवाय? अमेरिकेत यायचंय? मग शिका द्राक्ष कसे कापायचे. जर तुम्ही ते क्लास पास झालात, तर तुम्हाला विसा मिळतो.

तसंच आंब्याला जांभळी पानं लागली की ती लगेच काढली पाहिजेत. या सगळ्याची ट्रेनिंग आम्ही महिलांना देतो. त्या जाऊन शेतकऱ्यांना शिकवतात. शेतकऱ्यांना आम्ही, आमच्याच उपक्रमांतर्गत कर्ज पुरवायला लागलोय. So, right now we are financing farmers on cutting edge technology. म्हणजे AI वरती आम्ही शेतकऱ्यांना आणलंय. आम्ही महाराष्ट्रातील पहिली संस्था आहोत, जी मातीपासून मार्केटपर्यंत शेतकऱ्यांना सर्व मदत करतो. माती, पाणी, पानं, देठ, सगळ्यांचा वेगवेगळा रिपोर्ट येतो. त्या रिपोर्टनुसार काय पावलं उचलली पाहिजेत, याचा वेगळा रिपोर्ट तयार होतो. संपूर्ण बारकाव्यांसहित रिपोर्ट यायला दोन आठवडे लागतात.

आमच्या टीमला सुट्ट्या मिळत नाहीत. कारण शेतकऱ्यांना सुट्ट्या नाहीत. शेतकऱ्यांच्या कार्यशाळा (workshop) होतात, शास्त्रज्ञ येऊन शिकवतात. प्रत्येक फळानुसार (द्राक्ष, डाळिंब, आंबा) संघ सुरू केले आहेत. त्यांच्या कार्यशाळा घेतो, महिन्याचे चार आणि वर्षाचे जवळजवळ 40 कार्यक्रम घेतो. आणि आता आम्ही AI वर येतोय. इथं AI चे weather forecast stations आहेत. मोठमोठ्या संस्थांनी, शास्त्रज्ञांनी तयार केलेले products आहेत, आम्ही ते तंत्रज्ञान विकत नाही, तर त्याचा वापर कसा करायचा हे शेतकऱ्यांना शिकवतो.

आमचा माणदेशीचा 10 एकरांचा डाळिंबाचा research plot आहे. शरद किंग नावाची नवीन व्हरायटी आहे डाळिंबाची, तिथे त्यावर प्रयोग करतोय. नवीन व्हरायटी लावायला शेतकरी घाबरतात... मग जबाबदारी कोण घेणार? सरकार तर त्यात काही कामच करत नाहीये. म्हणून मी नेहमी म्हणतो, आमचं हे मिनी सरकारच आहे. आम्ही आमचं स्वतःचं सरकार तयार केलंय, जे शेतकऱ्यांचं आहे. आमच्या 15 सॉईल सखी आहेत. ज्या गावोगावी जाऊन मातीचे सँपल वैज्ञानिक पद्धतीने गोळा करतात. एकेकाळी त्या शेतमजूर होत्या. आज त्यांना मॅडम अशी हाक मारतात शेतकरी. आमच्याकडे 10-12 agronomist मुलं मुली आहेत आणि अख्खी लॅब तरुण मुलींनी तयार केलेली आहे, तिथे एकही मुलगा काम करत नाही. आमच्या महिला weather forecast पण करतात. कधी पाऊस पडणार आहे, किती वाजता पडणार आहे, कुठली फवारणी करायला लागणार आहे, पिकावर कुठल्या प्रकारची आळी येऊ शकते, जमिनीत पाण्याची पातळी, ओलावा किती आहे... हे सगळं मार्गदर्शन शेतकऱ्यांना आमच्या महिला करतात. शेतकरी याचे पैसेपण द्यायला तयार आहेत. माणदेशी महिला बँक is the first bank in India to provide climate financing for farmers. एकदा तुम्ही 50 हजार रुपये भरले, तर आमचे agronomists दर महिन्याला तुमच्या बांधावरती भेट द्यायला येणार, तुम्हाला ते सांगणार, शिकवणार की आता काय करायचं, कसं करायचं... त्याचंही app आहे, ज्याच्यामध्ये आमचा agronomist आणि scientists तुमच्या जमिनीमध्ये काय आहे, ते दररोज बघत असतात, त्यांना लक्षात येतं, पाऊस येणार आहे, ते वाया जाऊ नये म्हणून काय करायला हवं. दुष्काळी भाग आहे. त्यामुळे, ह्या भागामध्ये तुम्ही ऊस, केळी लावू शकत नाही. तुम्ही डाळिंब करा, सीताफळ करा, द्राक्ष करा, आंबे करा, ड्रॅगन फ्रूट करा आणि it is a revolution happening on the ground. I now see that की, हेसुद्धा आंदोलनच आहे, पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावरचं. आमच्या मागण्या अजिबात नाहीयेत की, आम्हाला काहीतरी हमीभाव द्या, आम्हाला नको आहे तुमचा हमीभाव, तुमच्याकडेच ठेवा तो हमीभाव.

प्रश्न : तू जेव्हा परत आलास अमेरिकेतून, आणि हे काम सुरू केलंस, तेव्हा तुला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होता जिथे, चेतनाभाभी आणि विजयभाऊ, काम करत होते शेतकऱ्यांसाठी, शेतकरी महिलांसाठी. तर त्याचा तुला किती फायदा झाला, असं वाटतं?

- हो, 100 टक्के फायदा झाला. मी लहानपणापासून त्यांचं काम पाहिलंच नसतं, तर बहुतेक मी यात आलोही नसतो.

मला वाटतं की, माझ्या ह्या आयुष्यात जे काही आहे ते माझ्या आई-वडिलांमुळे. म्हणजे गावाकडे शिक्षण घेणं, अमेरिकेला जाणं आणि गावाकडे परत येणं, हे तुमच्या आई-वडिलांनी दिलेल्या एक्स्पोजरनेच होऊ शकतं. मी शून्य आहे. If my parents were not what they are today, I dont think I would have. म्हणजे मी कल्पनाही नाही करू शकत की मी आज कुठे असतो.

आणि हो, मी मुंबईत मिठीबाई कॉलेजला असताना अनघा या मुलीशी माझी ओळख झाली, नंतर काही वर्षांनी आमचं लग्न आई-वडिलांसारखंच कोर्टात केलं आणि आता माणदेशातील तरुण मुलींसोबत अर्थव्यवस्थेचं काम अनघा पाहते आहे.

संवादक : रिमा अमरापूरकर


विशेष नोंद

छापील अंकात या मुलाखतीमध्ये दोन-तीन ठिकाणी तपशीलाच्या चुका होत्या आणि दोन-तीन ठिकाणी विधानांचा चुकीचा अर्थ लावला गेला होता. त्याचे कारण, मुलाखतीचे रेकॉर्डिंग झाल्यावर व शब्दांकन केल्यावर तो ड्राफ्ट करण सिन्हा यांच्याकडून तपासून घेणे राहून गेले होते. नंतर करणने ती संपूर्ण मुलाखत वाचून केलेल्या दुरुस्त्यांसह हा ड्राफ्ट तयार झाला आहे. त्यामुळे, मुलाखतीचा हा ड्राफ्ट अंतिम समजावा. या चुकांमुळे लेखकाला त्रास झाला, वाचकांची गैरसोय झाली, त्याबद्दल दिलगीर आहोत.

संपादक, साधना साप्ताहिक

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी