डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

(‘दिल्ली-मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार’ या वैशिष्ट्यपूर्ण घोषणेने आणि 1800 हेक्टर वनांवरचा सामूहिक अधिकार मिळवल्याने देशभर विख्यात झालेल्या, गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा (लेखा) या गावाच्या वाटचालीचे चित्रण करणाऱ्या, मिलिंद बोकील लिखित ‘गोष्ट मेंढा गावाची’ या पुस्तकाचे प्रकाशन साने गुरुजी स्मारक, सिंहगड रस्ता, पुणे येथे 9 सप्टेंबर 2012 रोजी संध्याकाळी 6 वाजता श्रीमती सुनीता नारायण, संपादिका, ‘डाउन टु अर्थ’ यांच्या हस्ते आणि प्रा.माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्या पुस्तकातील काही अंश.)

गोंड समाजाच्या ज्या काही सामाजिक रचना आहेत त्यात गोटूल (घोटूल) ही सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. किंबहुना बाकीच्या समाजाला गोंड समाजाविषयी जे कुतूहल आहे ते बऱ्याच अंशी गोटूलमुळे.

आपल्या गावात गोटूल बांधण्यासाठी मेंढा गावाने जो संघर्ष केला तो अतिशय उद्‌बोधक आहे.

मात्र तो समजून घेण्याआधी मुळात गोटूल म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय होते ते समजून घेतले पाहिजे.

एका वाक्यात सांगायचे झाले तर गोटूल म्हणजे ‘चांगले नागरिक बनवण्याची शाळा.’

अर्थात एका वाक्यात व्याख्या लिहिता आली तरी गोटूल संस्थेचे पूर्ण आकलन त्यातून होणार नाही. त्यासाठी त्याची सविस्तर माहिती घ्यायला पाहिजे.

दुर्दैवाने सध्या चंद्रपूर- गडचिरोली भागात पारंपरिक गोटूल कुठेच अस्तित्वात नाही. त्यामुळे ही माहिती पूर्वीच्या मानवशास्त्रज्ञांनी जे लिहून ठेवले आहे त्यावरून आणि सध्याच्या पिढीतल्या लोकांकडे वाडवडिलांकडून चालत आलेल्या ज्या आठवणी आहेत त्यावरूनच एकत्र करावी लागते.

बस्तर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी गोटूल अजूनही अस्तित्वात आहेत (या अभ्यासादरम्यान त्या गावांना आम्ही भेटी दिल्या. प्रत्यक्ष चालू असणारी गोटुले जरी बघायला मिळाली नाहीत तरी गोटुलांच्या इमारती आणि दहा-पंधरा वर्षांपूर्वी गोटूलमध्ये गेलेले लोक यांना भेटता आले).

गोंड समाजातल्या गोटूलचा सर्वांत चांगला आणि सखोल अभ्यास वेरियर एल्विन या ब्रिटिश मानवशास्त्रज्ञांनी केलेला आहे. तो अभ्यास बस्तर जिल्ह्यातलाच आहे.

एल्विन हे 1935 साली या भागात आले. बस्तर राज्याचे जनगणना अधिकारी म्हणून त्यांची 1940 साली नेमणूक झाली. नंतर त्यांना ‘मानद मानवशास्त्रज्ञ’ असा हुद्दा मिळाला. त्यांनी एका माडिया स्त्रीशी लग्न केले होते आणि आपल्या आयुष्याचा मोठा काळ त्यांनी मध्य भारतातल्या आदिवासी समूहांबरोबर घालवला.

त्यांचे ‘द मुडिया ॲन्ड देअर घोटूल’ हे सातशे पानांचे अप्रतिम पुस्तक म्हणजे गोटूल व्यवस्थेची तपशीलवार माहिती तर आहेच पण मुडिया गोंडांच्या जीवनाचाही सखोल अभ्यास आहे (1991). आज इतक्या वर्षांनंतरही गोंड समाजाची माहिती घ्यायची असेल तर एल्विन यांच्या पुस्तकांकडे वळल्याशिवाय गत्यंतर राहत नाही.

प्रत्येक समाजात मुलांचे शिक्षण हा कळीचा मुद्दा असतो. सध्या शिक्षण याचा अर्थ पुस्तकी शिक्षण असा झाला आहे परंतु आदिवासी समाजात शिक्षणाचा अर्थ फार व्यापक असायचा. शिक्षणाचे उद्दिष्ट मुलांना सर्व तऱ्हेची कौशल्ये शिकवून त्यांना समूहाचे चांगले सदस्य बनवणे हे होते.

ही कौशल्ये उपजीविका कशी चालवायची किंवा रानावनात आपले जगणे कसे चालवायचे एवढ्यापुरती मर्यादित नव्हती तर आपले जगणे हे स्वस्थ, सुंदर आणि समाधानी कसे करायचे यावर भर देणारी होती.

त्यामुळे त्या शिक्षणात नृत्य, गायन, वादन, संगीत, खेळ, हस्तकला यांचा समावेश होताच पण समूहात एकदुसऱ्याशी संघर्ष न करता सहकार्याने आणि आपलेपणाने कसे राहायचे याचाही समावेश होता.

मुख्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा विकास होऊ देत असताना सामाजिक नातेसंबंध कसे निर्माण होतील आणि समूहाची एकजूट कशी टिकून राहील याचा विचार होता. अशा तऱ्हेचे शिक्षण देण्याची गोंड समाजाची संस्था गोटूल ही होती.

गोटूलचा शब्दश: अर्थ म्हणजे ‘अविवाहित मुलामुलींचे खेळघर’ किंवा आजच्या भाषेत ‘यूथ क्लब’.

गावात एका बाजूला सभोवार भरपूर जागा सोडून हे घर (गुडी) बांधलेले असायचे. त्याला काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन-तीन दालने असायची. साधारण दहा-अकरा वर्षांपासून ते वीसपंचवीस वर्षांपर्यंतची मुले-मुली संध्याकाळचे जेवण झाले की तिथे जमायची.

गोटूलमध्ये निरनिराळ्या तऱ्हेची वाद्ये ठेवलेली असायची. तिथे गाणी म्हटली जायची. गोष्टी ऐकवल्या जायच्या. खेळ व्हायचे. चर्चा व्हायच्या. माहिती सांगितली जायची. जसा हंगाम असेल त्याप्रमाणे पारंपरिक नाच व्हायचे.

आणि नंतर मुलेमुली तिथेच झोपून मग पहाटे आपापल्या घरी जायची. गोटूल हे खेळघर जरी असले तरी ती एक शिस्तबद्ध व्यवस्था होती. तिचे नियम होते.

तिथे लग्न झालेल्या लोकांना जसा प्रवेश नसायचा तसेच अगदी लहान मुलांना म्हणजे शिशूंनाही प्रवेश नसायचा. गोटूल सगळ्यांसाठी खुले असले तरी त्याचे सदस्यत्व विधिवत्‌ दिले जायचे (आज एखाद्या क्लबची मेंबरशिप जशी कायदेशीर दिली जाते तशी).

गोटूलमध्ये प्रत्येकाला काही तरी नाव दिले जायचे. ते त्या त्या व्यक्तीचे जसे वैशिष्ट्य असेल तसे ठरायचे आणि ते अतिशय अभिमानास्पद आणि गौरवाने मिरवावे असे असायचे.

गोटूलमधले हे नाव फक्त गोटूलमध्येच चालायचे; गावात नाही. गोटूलचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिथली सगळी व्यवस्था ही कुमार मुले-मुलीच पाहायची. मुलांचा एक नायक असायचा तसाच मुलींचाही.

बस्तर भागात गोटूलमधल्या मुलग्यांना ‘चेलीक’ तर मुलींना ‘मोट्यारी’ असे म्हणत. नायकाला बहुतांशी पटेल म्हटले जायचे पण निरनिराळ्या भागात निरनिराळी नावे होती (शिलेदार, सरदार, लहरदार, मालिक, दिवाण, इत्यादी).

मुलींच्या नायिकांना बहुतांशी ‘बेलोसा’ म्हटलं जायचं पण त्यांनाही राणी, कोटवार, दुलोसा, तिलोका अशी नावे होती.

गडचिरोली भागात मुलांच्या नायकाला ‘लयोर-गायता’ तर मुलींच्या नायिकेला ‘लेयाह-गायत्री’ म्हणत.

गोटूलची व्यवस्था शिस्तबद्ध असल्याने प्रत्येकाला कामे तर वाटली जातच पण ती कामे पार पाडण्यासाठी हल्ली जशा समित्या असतात तसे मुला-मुलींचे गटही केले जात. या कामांमध्ये मुख्यत: शेकोटीसाठी लाकडे तोडून आणणे, ती फोडणे, झाडलोट करणे, पाणी भरणे, द्रोण-पत्रावळी तयार करणे, वाद्यांची निगा ठेवणे, हाताने वस्तू बनवणे अशांचा समावेश असायचा.

नेमून दिलेली कामे झालीच पाहिजेत यावर गोटूलमध्ये कटाक्ष असायचा. कामे झाली नाहीत तर दंड किंवा शिक्षाही व्हायची. गोंड समाजात गोटूलचे माहात्म्य इतके होते की तिथल्या व्यवस्थेत विवाहित किंवा वडीलधाऱ्या लोकांचा हस्तक्षेप अजिबात चालत नसे.

गोटूल ही एक स्वतंत्र आणि सार्वभौम व्यवस्था होती आणि त्या अर्थाने गावसमाजाचीच एक लहान प्रतिकृती होती. गावाची जशी पंचायत असायची तशीच व्यवस्था गोटूलमध्ये असायची. गाव जसे वागायचे तसेच ही कुमारवयीन मुले गोटूलमध्ये वागायची. किंबहुना मोठे झाल्यावर कसे वागायचे याचीच शिकवण गोटूलमध्ये दिली जायची. त्यामुळे तिथला व्यवहार हा मन:पूर्वक आणि गंभीरपणे केला जायचा.

वातावरण खेळकर आणि आनंदी असायचे पण बेतालपणा किंवा बेशिस्त खपवून घेतली जायची नाही. मुख्य म्हणजे वयाने मोठी मुलेच ही व्यवस्था बघत असल्याने लहान मुलांना त्यांच्याकडून शिकण्यात आनंद असायचा.

शिक्षणाची ही सर्वोत्तम पद्धत आहे हे आता जगभर मान्य पावलेले आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोटूल हे काही जन्मभरासाठी नसायचे. लग्न झाले रे झाले की गोटूलचे सभासदत्व संपुष्टात यायचे. गोटूलमध्ये प्रवेश देण्याचा जसा कार्यक्रम असायचा तसाच निरोप देण्याचाही समारंभ असायचा. त्यामुळे गोटूलमध्ये मोठ्या मुलांना अधिकार असला तरी तो तहहयात, वंशपरंपरागत नाही हे सगळ्यांनाच माहीत असायचे.

गावसमाजाला गोटूलची मुख्य उपयुक्तता ही कुमार-युवकांची एक कार्यतत्पर फौज असण्यात होती. गावात कोणतेही कार्य असले तर यजमान गृहस्थ गोटूलची मदत घ्यायचा. मात्र त्याला ही विनंती विधिवत्‌, नारळ देऊन करायला लागायची.

गोटूल ही सार्वभौम, स्वतंत्र व्यवस्था असल्याने त्याला गोटूलचा मान ठेवायला लागायचा. गोटूलने ते कार्य पार पाडायची जबाबदारी घेतली की यजमान निश्चिंत व्हायचा. मग त्याला कोणत्याच गोष्टीची फिकीर नसायची.

आज जसे कोणत्याही समारंभाचे व्यवस्थापन व्यावसायिक पद्धतीने केले जाते (इव्हेंट मॅनेजमेंट) तसे मग गोटूलचे सदस्य ते कार्य पार पाडीत. त्यात मग ते सगळी कामे करीत: पाणी भरण्यापासून ते लाकडे आणण्यापर्यंत आणि पत्रावळी तयार करण्यापासून ते वाजंत्री वाजवण्यापर्यंत.

ह्या अशा काम करण्यातूनच लहान मुलांचे शिक्षण होई. गोटूल जे जीवनशिक्षण देई ते अशा प्रकारे. यामध्ये केवळ शारीरिक कौशल्येच विकसित होत असे नाही तर समूहात परस्परांशी कसे वागायचे, सहकार्याने एखादे काम कसे करायचे, अडचणी आल्या तर कशा सोडवायच्या, संवाद आणि संभाषण कसे करायचे या सगळ्यांचेच शिक्षण होई. 

गोटूल हे कुमारांचे एकत्रित खेळघर असल्यामुळे तिथे त्यांचा परस्परांशी संबंध येणे साहजिकच असे. किंबहुना तसा तो यावा आणि त्यातून स्त्री-पुरुष सहजीवन विकसित व्हावे असाच त्यामागचा दृष्टिकोन होता.

त्यामुळे गोटूलमध्ये मुले-मुली आपापला जोडीदार निवडत आणि त्याच्यासंगे क्रीडा करीत. गोटूलमध्ये लैंगिक संबंधांना मज्जाव नव्हता. या वैशिष्ट्यामुळेच गोटूल ही संस्था बाकीच्यांच्या कुतूहलाचा, गैरसमजाचा आणि काही वेळा टीकेचाही विषय झाली आहे.

वेरियर एल्विन यांनी गोटूले ही प्रामुख्याने दोन प्रकारची होती असे म्हटले आहे. एकामध्ये जोडीदार निवडल्यावर तो लग्नापर्यंत कायम राहत असे तर दुसऱ्यामध्ये तो बदलण्याची मुभा असायची.

या अभ्यासाच्या निमित्ताने बस्तरमध्ये हिंडताना तिसऱ्याही प्रकारचे  गोटूल अस्तित्वात असल्याचे समजले; ज्यात मुली रात्री झोपायला आपापल्या घरी जात.

प्रकार कोणताही असला तरी लैंगिक संबंधांना विरोध नव्हता. मात्र ते जबाबदारीने आणि राजीखुषीने उपजलेले असत; त्यात कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा सक्ती नसायची.

गोटूलचे हे वैशिष्ट्य समजून घ्यायचे असेल तर या समाजाचा लैंगिक संबंधांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो मुळात समजून घ्यायला लागेल. या समाजाला स्त्री-पुरुषांचे एकमेकांच्या जवळ येणे हे अत्यंत सहज आणि नैसर्गिक वाटत होते. ती एक स्वाभाविक, उपजत प्रेरणा असल्याने समाजाने तिला दडपू नये अशी त्यांची धारणा होती.

त्याचप्रमाणे लैंगिक क्रीडा हा एक आनंदायक आणि मानवी मनाला प्रफुल्लित करणारा अनुभव आहे असा त्यांचा विश्वास होता. विवाहाचे पावित्र्य त्यांना मान्य होते आणि विवाह हा निव्वळ दोन व्यक्तींमधला करार किंवा संबंध नसून ती निरनिराळ्या कुटुंबांना आणि त्यांच्या माध्यमातून सर्व समूहाला जोडणारी घटना आहे अशीच त्यांची समजूत होती.

त्यामुळे लग्न झाल्यावर पती-पत्नींनी परस्परांशी एकनिष्ठ राहिले पाहिजे असाच दंडक होता. परंतु लग्न होण्यापूर्वी म्हणजेच गृहस्थ होण्यापूर्वी व्यक्तीला एक नैसर्गिक मोकळेपणा असला पाहिजे, विशेषत: जोडीदार निवडण्यासंबंधी स्वातंत्र्य असले पाहिजे अशी त्यांची धारणा होती.

दुसरे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांचा स्त्री-पुरुष समानतेवर विश्वास होता. जे स्वातंत्र्य पुरुषाला मिळणार तेच स्त्रीलाही दिले पाहिजे हे त्यांना मान्य होते. एरवीची व्यवस्था पुरुषसत्ताक असली तरी निकोप आणि निरोगी सहजीवनासाठी स्त्री-पुरुषांची समान भागीदारी पाहिजे हे त्यांना मुळातच मंजूर होते.

या लिंगभावसमानतेमधूनच गोटूलसारखी संस्था निर्माण झाली. मात्र गोटूलला केवळ सामाजिक उपयुक्तताच होती असे नाही तर आध्यात्मिक अधिष्ठानही होते.

गोंड समाजाची अशी धारणा आहे की आपला मूळ पुरुष किंवा कुळदेव, लिंगो यानेच गोटूलची आपल्याला भेट दिली. त्याने गोटूलची निर्मिती केली आणि गोटूलच्या आधाराने आपला समाज उभा करायला सांगितला.

प्रत्यक्ष देवानेच हे खेळघर आपल्याला दिलेले असल्याने ते पवित्र, महान व दैवी तर आहेच पण त्या खेळघरात जी मुले राहतात त्यांना कोणत्याही पापाचा वा गुन्ह्याचा संसर्ग होत नाही. एवढेच नाही तर त्यांना कोणतेही रोग वा विकारही होत नाहीत. गोटूलमध्ये मुला-मुलींनी एकत्रित राहणे हे पाप नाही. ही जी धारणा आहे ती सर्वांत महत्त्वाची आहे. आपण सध्या स्वत:ला आधुनिक आणि प्रगत समाज म्हणवतो परंतु लैंगिक संबंधांबाबतची आपली दृष्टी ही एका बाजूने अतिशय संकुचित आणि दुसऱ्या बाजूने ढोंगीपणाची आहे.

आपल्या समाजात जातीपातींच्या भिंती तर कठोर आहेतच पण तो पुरुषवर्चस्ववादी व पितृसत्ताक असल्याने स्त्री-पुरुष संबंधांकडे पाहण्याची त्याची दृष्टी ही सनातनी व दूषित आहे.

स्त्रियांवर बंधने घालण्याच्या हव्यासापोटी आणि एकत्र कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी या समाजाने स्त्री-पुरुष संबंधांचे नैसर्गिक, आल्हाददायक रूप नाहीसे करून टाकले. त्यातच एकोणिसाव्या शतकातील पाश्चात्त्यांचे नैतिक संकेत (व्हिक्टोरियन मोराल्स) स्वीकारल्याने तर ही दृष्टी अधिकच कठोर व प्रदूषित झाली.

स्त्री-पुरुषांना स्वातंत्र्य दिले तर समाजात हाहाकार माजेल व संस्कृतीचा अध:पात होईल अशा सनातनी धारणेमुळे स्त्री-पुरुषांच्या एकत्र येण्यावर जेवढी बंधने घालता येतील तेवढी या समाजाने घातली व त्यामुळे लैंगिक संबंध हे एका बाजूने अतिशय दबलेले तर दुसऱ्या बाजूने हिंसक करून टाकले.

याची फळे आपण रोज भोगतो आहोत. यातून मानसिक आजार व विकृती तर निर्माण होतातच पण वेश्याव्यवसायाची पद्धत आणि बलात्कारादी हिंसाचारही उत्पन्न होतात.

गोटूलमध्ये लैंगिक संबंध आल्याने मुली गरोदर राहत नसतील का अशी शंका कोणाच्याही मनात येईल. या बाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी जी मते मांडलेली आहेत आणि केवळ वेरियर एल्विनच नाही तर जगभरातल्या मानवशास्त्रज्ञांनी जी निरीक्षणे मांडलेली आहेत त्यावरून असे दिसते की पौगंडावस्थेतील हे संबंध नवरा- बायकोंसारखे किंवा प्रौढ स्त्री-पुरुषांतील समागमासारखे नसतात.

कुमार वयात लैंगिक अवयवांची वाढ पूर्णांशाने झालेली नसते, संबंधांची वारंवारिता आणि सातत्य कमी असते आणि एकाच जोडीत दीर्घकाळ संबंध येत नसल्याने संभाव्यता कमी होते. त्यामुळे निसर्गत: आणि प्रत्यक्ष अनुभवाला येते त्याप्रमाणे गर्भधारणेचे प्रमाण अत्यल्प असते.

त्यातूनही गर्भधारणा झाली तर विधिवत्‌ लग्न लावले जाते. सध्याच्या समाजात कुमारी मातेकडे जसे अवहेलनेच्या दृष्टीने पाहिले जाते तसा दृष्टिकोन या समाजात नाही. जन्माला येणारे मूल ही सगळ्या समाजाची संपत्ती आहे अशीच मुळात धारणा असल्याने गर्भपात वा भ्रूणहत्या या गोष्टींना थारा नव्हता.

सध्या इंग्लंड-अमेरिकेसारख्या पाश्चात्त्य समाजात विवाहपूर्व संबंधांना मोकळीक आहे. त्यांचे अंधानुकरण आपल्याकडे करण्याची पद्धत असल्याने तशी आधुनिकता आपल्याकडेही यावी अशी अनेकांची समजूत असणे अशक्य नाही.

मात्र पाश्चिमात्य धारणा आणि गोटूल यांमध्ये फरक आहे. गोटूलमागची दृष्टी ही सामाजिक आहे तर पाश्चात्य दृष्टी ही व्यक्तिस्वातंत्र्यवादी आहे.

समुदायामध्ये स्वस्थ, समाधानी आणि तणावरहित नागरिक तयार व्हावेत अशी त्या समाजालाच इच्छा असल्याने गोटूलसारखी व्यवस्था तयार होते. त्यामुळे गोटूल हे नियमांनी बांधलेले असते. कोणी कोणता जोडीदार निवडायचा आणि त्याच्याशी कशी वागणूक ठेवायची याचे नियम असतात आणि त्यांचे पालन कसोशीने केले जाते.

अनिर्बंध व्यक्तिस्वातंत्र्य ही गोटूलची प्रेरणा नाही तर स्वस्थ, अहिंसक व मैत्रीपूर्ण संबंधांतून संतुलित व एकसंध  समाज निर्माण व्हावा अशी धारणा आहे.

गोटूल पद्धतीमुळे हिंसा, मत्सर, असूया किंवा स्वामित्व या भावना काबूत राखल्या जात आणि तसे केल्याने मानसिकदृष्ट्या स्वस्थ नागरिक निर्माण होणे शक्य होई.

ही सगळी वैशिष्ट्ये असूनही गेल्या काही वर्षांत गोटूल ही संस्था हळूहळू नष्ट होत गेलेली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे दळणवळण, व्यापार, शिक्षण आणि समान राजकीय व्यवस्था यांमधून बाहेरच्या समाजांशी जसा संपर्क वाढला तसे गोंड समाजातल्या शिक्षित युवकांना गोटूल संस्था ही काही तरी चुकीची आहे असे वाटू लागले.

गैरआदिवासी समाजातले लोक तसे उघडपणे म्हणत. मिशनऱ्यांच्या तथाकथित नैतिक शिकवणुकीचाही परिणाम झाला. दूरदूरच्या गावांमध्ये शाळा निघाल्या तेव्हा शिक्षणाची पद्धत बदलली.

गोटूल ही व्यवस्था एका विशिष्ट सामाजिक पर्यावरणात निर्माण झालेली होती. ते पर्यावरण झपाट्याने बदलले. मुख्य म्हणजे हा समाज देशातील एका मोठ्या राजकीय, सामाजिक व्यवस्थेचा हिस्सा झाला. त्यामध्ये गोटूलला स्थान नव्हते.

चंद्रपूर-गडचिरोली भागात 70-80 वर्षांपूर्वी गोटूल नष्ट झाले. बस्तरमध्ये गेल्या 15-20 वर्षांत ते थांबले आहे. अबूजमाडच्या आतल्या भागात अजूनही ही व्यवस्था चालू असल्याचे समजते पण ती पूर्वीसारखी मजबूत नाही.

गोटूलचे हे असे महत्त्व असल्याने मेंढा गाव जेव्हा स्वत:च्या अस्मितेबद्दल जागृत झाले तेव्हा त्याने गोटूलसंबंधात विचार करणे साहजिकच होते.

गावकऱ्यांच्या लक्षात आले की आपला वारसा माडिया गोंडांचा असला तरी आपल्या गावात गोटूल नाही. आणि तसे नसल्याने आपल्याला गावबांधणीला अडचणी येत आहेत. गोटूल हे आपल्या समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक एकजुटीचे केंद्र होते. गोटूल व्यवस्थेुळे आपला समाज एकसंध होता.

पण आता आपल्याकडे गोटूल नसल्यामुळे आपली ताकद विखुरली जात आहे. आपण सध्या एकत्र जमण्यासाठी पाटलाच्या घरात बसतो पण गोटूलला जे अधिष्ठान होते ते त्याला नाही. त्यामुळे नव्या काळात जर आपल्याला आपली ओळख पटवायची असेल तर गोटूल पाहिजेच.

जुन्या काळातल्यासारखी गोटूल ही व्यवस्था जरी आपल्याला आता आणता आली नाही तरी गोटूलघर मात्र बांधता येईल. गावातल्या अभ्यास मंडळात यावर उलटसुलट चर्चा झाली.

काही लोक विरोधी मताचे होते. ते म्हणाले की गोटूल ही जुन्या काळातली गोष्ट आहे. आता ती परत आणायची म्हणजे समाजाला मागे नेण्यासारखे होईल.

काही म्हणाले की आताच्या गोटूलमध्ये आम्ही मुलींना कसे पाठवणार? मुली त्यात येणार नाहीत. मग ते कसले गोटूल? काही म्हणाले की गोटूल हे सागवानी लाकडाचे बांधायचे असते. सध्याच्या काळात सागवान कोण तोडू देणार? जमीनदाराच्या काळातही सागवान तोडायला बंदी होती. कोणी जर सागवान तोडले तर त्याला जबरदस्त दंड व्हायचा. आता तर जंगल खाते सागवान तोडला तर तुरुंगातच टाकेल. हे प्रश्न उपस्थित झाल्यावर त्यावरही सखोल चर्चा झाली.

गावातल्या महिला गोटूल बांधण्याच्या मुद्‌द्यावर आग्रही होत्या. त्या म्हणाल्या की आपल्या निस्तार जंगलातल्या सागवानावर आपला हक्क आहे. आपण आपल्या पारंपरिक पवित्र कामाकरता तो तोडला तर तो गुन्हा होणार नाही. सरकार आपल्या जंगलातून राजरोस सागवान तोडून नेते तेव्हा त्याला कोणी अडवते का? आपण गोटूल बांधायचे तर ते सागवानाचेच बांधायला पाहिजे. तसे केल्यानेच आपला आपल्या जंगलावरचा निस्तार हक्क शाबीत होईल.

हे म्हणायला सोपे होते पण प्रत्यक्षात ते करायला लोकांना भीती वाटत होती. जंगल खात्याच्या हडेलहप्पीचा अनुभव तर रोजच येत होता. साधा लाकूडफाटा किंवा बांबू आणायचा तरी ती चोरी मानली जायची आणि आता तर सागवान तोडायची गोष्ट करायची?

पण या गोष्टीवर अभ्यास मंडळात सतत चर्चा होत राहिली. हळूहळू लोकांमध्ये हिंमत येत गेली. त्यांच्या लक्षात आले की आपल्याला जर आपले निस्तार हक्क खरोखरच शाबीत करून घ्यायचे असतील तर वेळप्रसंगी जंगल खात्याशी टक्कर ही घ्यावीच लागेल. त्याला घाबरून चालणार नाही.

साग म्हणजे आग पण त्या आगीशी भिडावेच लागेल. त्यातून बाहेर आलो तरच आपण मजबूत होऊ. या आगीत गावकऱ्यांच्या एकजुटीचा कस लागेल. जंगल आपले आहे आणि आपल्या पारंपरिक गोष्टीसाठी आपल्याला लाकूड घ्यायचे आहे, तर भिऊन चालणार नाही. आपल्याला ही गोष्ट सत्याची वाटत असेल तर मग त्याचे जे काही परिणाम होतील ते आपण भोगले पाहिजेत. सरकार जर आपल्याला तुरुंगात टाकायला निघाले तर आपण सगळ्यांनी तुरुंगात जायचे; अगदी बायका-मुले, जनावरांसकट! कोणीच मागे राहायचे नाही.

सरकारने लाठ्या मारल्या तर सगळे मिळून लाठ्या सोसायच्या. गोळ्या चालवल्या तर सगळ्यांनी छाती पुढे काढून गोळ्या खायच्या.

आपण हात उचलायचा नाही, दगड मारायचा नाही, काठी घ्यायची नाही. मरायची वेळ आली तर सगळ्यांनी मिळून मरायचे!

चर्चा जेव्हा अशा पातळीवर आली आणि सगळ्यांचे मानस एक होत गेले तेव्हा लोकांमध्ये हिंमत आली. आपण प्रतिकार करायचा नाही, दुसऱ्याला मारायचे नाही, उलट वेळ आली तर स्वत:च मरायला सिद्ध व्हायचे अशी भूमिका बनली तेव्हा आपोआपच लोक निर्भय बनले.

हिंसा करायची नाही आणि दुसऱ्याने हिंसा केली तर प्राणही द्यायचे अशी जिगर जेव्हा निर्माण झाली तेव्हा लोक ताकदवान झाले.

या सगळ्या संघर्षात हीच गोष्ट लक्षात घेण्याची आहे. आपल्या मागण्यांसाठी किंवा सत्यासाठी मरून जावं असं जेव्हा वाटतं तेव्हा आपोआप निर्भयता येते.

कोणतीही   कृती नंतर होते; त्या कृतीच्या आधी जो निर्णय होतो आणि ज्या प्रक्रियेतून तो होतो त्यामुळे माणसांमध्ये निर्भयता येते. मेंढ्यामध्ये तशी निर्भयता आली आणि मगच त्यांनी आपल्या जंगलातून सागवान तोडून आणायचे ठरवले.

त्याप्रमाणे 1989 च्या डिसेंबर महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस निश्चित करण्यात आला आणि त्या दिवशी सर्व गावकरी एकत्र झाले आणि त्यांनी जंगलात जाऊन लाकडे कापून आणली.

गोटूल बांधण्यासाठी गावातच एक जागा ठरवण्यात आली आणि तिथे ही लाकडे रचून ठेवण्यात आली. मेंढा गावकऱ्यांनी गोटूल बांधण्यासाठी लाकूड तोडून आणलं आहे याची खबर वन विभागाला लगेच लागली. त्याच दिवशी फॉरेस्ट गार्ड गावात दाखल झाला. त्याने चौकशी केली.

गावकऱ्यांनी स्वच्छ सांगितले की पारंपरिक गोटूल बांधण्यासाठी निस्तार हक्कातून ही लाकडे आणलेली आहेत. गार्ड ते बघून परत गेला.

दुसऱ्या दिवशी डफेदार म्हणजे त्याच्या वरचा अधिकारी आला. तो म्हणाला की हा गुन्हा आहे. लोक म्हणाले की आम्हांला असे वाटत नाही. डफेदार परत गेला.

तिसऱ्या दिवशी रेंजरसाहेब दाखल झाले. ते म्हणाले की तुम्हांला लाकडे हवी होती तर तसा अर्ज तुम्ही वन विभागाकडे केला होता का? आमची परवानगी न घेता लाकूड तोडणे बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे आम्हांला ते जप्त करायला लागेल.

तेव्हा लोक म्हणाले की शेकडो वर्षांपासून आम्ही गोटूल बांधत आलो आहोत आणि त्या वेळी कधीच अर्ज करायची वेळ आली नव्हती. तेव्हा आता ती का यावी? ही गोष्ट आमच्या पारंपरिक हक्कांची आहे आणि आदिवासींचे असे हक्क मान्य करण्याचे सरकारी धोरण आहे. त्यामुळे तुम्ही हे लाकूड जप्त करू शकत नाही.

रेंजर साहेब परत गेले. नंतरच्या दिवशी वन खात्याचे फिरते न्यायालय आले (मोबाइल कोर्ट). आधीच्यासारखेच सवाल जबाब झाले. लोक शांत होते. त्यांनी नम्र शब्दात आपली बाजू सांगितली आणि म्हणाले की तुम्ही लाकूड जप्त कराल तर आम्ही शांततामय मार्गाने प्रतिकार करू.

लोक ऐकत नाहीत असे दिसल्यावर फिरते कोर्ट परत गेले. मात्र लोकांच्या लक्षात आले की ज्या कामासाठी आपण लाकूड आणले आहे ते काम आता ताबडतोब पूर्ण केले पाहिजे नाही तर वन विभागाचे लोक ते उचलून नेतील.

म्हणून त्या दिवशी म्हणजे 2 जानेवारी 1990 रोजी रात्री सगळे गाव एकत्र झाले आणि रातोरात परिश्रम करून त्यांनी गोटूल उभारले.

हे वृत्त कळताच वन विभागाने पोलीस कारवाई करण्याचे ठरवले. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या कारवाया चालत असल्याने तिथे कायमच मोठ्या संख्येने पोलीस असतात. वन विभागाने सांगितले की मेंढा गाव हेसुद्धा नक्षलवादी पद्धतीचा उद्योग करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईसाठी पोलीस फौज लागेल.

वन विभागाच्या मागणीप्रमाणे पोलीस फौज देण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 जानेवारी 1990 रोजी त्यांनी गावाला वेढा दिला. दोन मोठ्या पोलीस व्हॅन, दोन ट्रक आणि जीपगाड्यांतून 400 हत्यारबंद शिपाई गावात उतरले.

गावकऱ्यांच्या एकूण संख्येपेक्षा किती तरी जास्त. लष्करी कारवाई असावी असेच. गावकऱ्यांनी या गोष्टीची तयारी केली होतीच.

त्या दिवशी असे ठरले की सरकार बळाचा वापर करणार असल्याने पुरुष माणसांनी त्यामध्ये पडायचे नाही. पुरुष समोर आले की सरकार लाठ्याकाठ्या चालवेल. म्हणून त्यांनी आपापल्या घरातच थांबायचे.

गावातल्या बायका लढ्याचं नेतृत्व करतील. त्याच फक्त गोटूलघरात थांबतील आणि पोलिसांशी बोलतील.

पोलीस आले त्या वेळी बायका गोटूलघरात बसून गाणी म्हणत होत्या. पोलिसांनी त्यांना बाहेर येण्याचा हुकूम दिला. बायकांनी त्यांना आपली बाजू सांगायचा प्रयत्न केला की गोटूल बांधणे हा आमचा पारंपरिक हक्क आहे आणि त्यासाठी आम्ही निस्तारातून लाकूड आणले आहे. पण पोलीस ऐकायच्या मन:स्थितीत नव्हते. ‘‘तुम्ही बऱ्या बोलाने बाहेर निघाला नाहीत तर तुम्हाला खेचून काढू’’, ते गरजले.

‘‘तुम्ही ही बेकायदेशीर गोष्ट केली आहे. तेव्हा मुकाट्याने बाहेर पडा, आम्हांला गोटूल मोडायचे आहे.’’

त्या वेळी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या विमलाबाई उसेंडी पुढे झाल्या. त्यांनी विचारलं की, ‘‘ही गोष्ट कायदेशीर आहे की बेकायदेशीर हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तुम्हांला आहे का? तुम्हांला तो अधिकार नाही. तो अधिकार फक्त कोर्टाला आहे. तेव्हा जंगलखात्याला म्हणावे की तुम्ही कोर्टात जा. कोर्टाचा जो काही निकाल होईल तो आम्ही मानू.’’

तो जबाब ऐकून पोलीसही सुन्न झाले. पण त्यांना वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचा हुकूम होता.

ते म्हणाले की, ‘‘ते आम्हांला काही सांगू नका. वन खात्याचे लोक गोटूल मोडणार आणि तुम्हांला त्यात अडथळा करता येणार नाही. तुम्ही मध्ये पडाल तर आम्हाला बळाने कारवाई करावी लागेल.’’ त्यावर बायका म्हणाल्या की आम्ही प्रतिकार करणार नाही किंवा तुम्हाला शिवीगाळही करणार नाही. पण एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवा की तुम्ही परत गेलात की आम्ही असेच जंगलात जाऊ आणि लाकडे तोडून पुन्हा नवीन गोटूल बांधू. ती लाकडे तोडल्याची जबाबदारी तुमच्यावरच राहील.

पोलिसांनी त्यांच्या सांगण्याकडे लक्ष दिले नाही. बायका गोटूलमधून बाहेर येताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ते घर मोडले. सगळी लाकडे ट्रकमध्ये भरली आणि धानोऱ्यात नेऊन जमा केली. 

ते निघून जाताच गावकरी एकत्र झाले. काय करायचे ते ठरलेलेच होते. त्याच दिवशी सगळा गाव पुन्हा जंगलात गेला,  त्यांनी आवश्यक तेवढी लाकडे तोडली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 जानेवारी 1990 रोजी आपले गोटूल पुन्हा उभारले!

मात्र हे करताना त्यांच्या लक्षात आले होते की वन विभाग आपल्याला बदनाम करण्यासाठी आपण नक्षलवादी आहोत असे घोषित करेल. तसे होऊ नये म्हणून त्यांनी गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक रीतसर पत्र दिले होते. त्या पत्रात हेच लिहिले होते की गोटूल ही आमची पारंपरिक संस्था आहे आणि म्हणून ते बांधण्यासाठी आम्ही आमच्या हक्काच्या जंगलातून लाकडे तोडत आहोत.

या पत्राची प्रत जिल्हा वनाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना तर दिली होतीच पण डॉ.बी.डी.शर्मा, जे त्या वेळी केंद्र सरकारचे अनुसूचित जाती व जमाती आयुक्त होते त्यांनाही दिली होती. सुदैवाने डॉ.शर्मा त्या वेळी शेजारच्या बस्तर जिल्ह्यात आले होते. तेव्हा गावकऱ्यांनी त्यांची समक्ष भेट घेतली होती.

मेंढा गावचे गोटूल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने तोडल्याची बातमी सगळ्या धानोरा तालुक्यात झपाट्याने पसरली आणि आसपासच्या सगळ्या गावांत त्याची प्रतिक्रिया उमटली. गोटूल पद्धत जरी या गावातून बंद झालेली असली तरी गोटूलचे पारंपरिक माहात्म्य सगळ्यांना माहीत होतेच. बाहेरच्या लोकांना कल्पना येत नसली तरी गोंड समाजाला एकत्र ठेवणारे गोटूल हेच महत्त्वाचे साधन होते. त्यामुळे मेंढा गावावर असा अन्याय झाल्याचे कळताच सगळ्याच आदिवासी गावांमध्ये अस्वस्थता पसरली.

या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी धानोरा इलाक्यातील गावांची जी पारंपरिक पंचायत होती तिची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला 32 गावांचे प्रतिनिधी हजर होते.

मेंढा गावात देवाजी आणि इतर मंडळी गेली होती. वन विभागाने गोटूल तोडले याची सगळ्यांनाच चीड आली होती. या मुद्‌द्यावर काय करायचे याच्यावर सखोल चर्चा झाली. काहींचे असे मत पडले की सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून धानोरा तहसिलीवर मोर्चा काढावा.

काही म्हणाले की धानोरा कशाला, आपण गडचिरोलीवरच मोर्चा काढू. काही म्हणाले आपण धरणे धरू तर काहींनी उपोषणाचा मार्ग सुचवला.

या बैठकीत देवाजी आणि मेंढ्यांच्या मंडळींनीही आपले म्हणणे मांडले. ते म्हणाले की आपण मोर्चा कुठे काढणार? तर धानोरा किंवा गडचिरोली. ती आपली गावं आहेत का? नाही. ती तर सरकारी ठिकाणं. तिथं तर सरकार आपली पुरी ताकद घेऊन समोर येईल. तिथे सरकार मजबूत तर आपण कमजोर. तसं करून कसं चालेल?

आपला मुद्दा स्पष्ट होण्यासाठी त्यांनी पाण्यातल्या माशाची उपमा दिली. मासा कुठे जिवंत आणि गतिमान असतो? तर पाण्यात. पाण्याबाहेर काढला तर काय होतं? तो तडफडतो आणि मरतो.

मेंढा गावाचे लोक म्हणाले की हे तसंच आहे. कोणताही कार्यक्रम करायचा तर तो आपापल्या गावात केला पाहिजे. कारण आपण जे गावकरी आहोत ते आपल्या गावात मजबूत आहोत. गावाच्या बाहेर गेलो की आपली शक्ती संपली. हा मुद्दा सगळ्यांना पटला.

मग त्यावर विचार झाला की गावात आपण काय करू शकतो? तेव्हा साहजिकच हे लक्षात आलं की मेंढा गावाच्या लोकांनी काय केलं होतं? तर आपला पारंपरिक हक्क बजावला होता. तर तेच बाकीच्यांनी का करू नये?

गोटूल हा तर सगळ्यांचाच पारंपरिक हक्क आहे. मग आपापल्या गावात गोटूलच का बांधू नये? कोण गावकरी तयार आहेत गोटूल बांधायला? असा सवाल केला गेला तेव्हा 12 गावचे गावकरी ताबडतोब तयार झाले. त्यांच्या गावांतही गोटूलघर नव्हते.

त्यांनी ठरवले की आपणही आपल्या जंगलात जायचे आणि त्या जंगलातून सागाचे लाकूड आणून पारंपरिक पद्धतीचे गोटूल बांधायचे. पुढच्याच आठवड्यात या 12 गावांत गोटूल बांधली गेली!

ही बातमी ऐकली तेव्हा सरकारी खाती हबकून गेली. एका गावातले गोटूल तोडले तर 12 गावात गोटूल तयार झाली. आता 12 गावांतली गोटूल तोडली तर? तर काय होईल हे कळायला काही ज्योतिषाची किंवा कोणा पंडिताची गरज नव्हती.

धानोरा तालुक्यातल्या या घडामोडींची दखल उच्च पातळीवर घेतली गेली. मुळात हा सगळा भाग वेगळ्या कारणांनी चर्चेत होताच आणि सरकारी गलथान कारभाराची लक्तरं तर सगळीकडे लोंबत होतीच.

जिल्ह्याधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची व पुढाऱ्यांची बैठक बोलावली. त्यात हेच पुढे आले की लोक म्हणताहेत ते बरोबर आहे. गोटूल बांधणे हा त्यांचा पारंपरिक हक्कच आहे. ते त्यांच्या निस्तारातून लाकडे तोडत असतील तर त्याला वन विभागाने हरकत घेऊ नये. तशी ती घ्यायचा प्रयत्न केला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. सरकार शहाणे झाले.

मेंढा गावाने जे नवीन गोटूल बांधले होते त्याचे उद्‌घाटन करण्याचा एक मोठा कार्यक्रम 26 जानेवारी 1990 रोजी गावात ठेवला गेला. त्याला आसपासच्या गावांतले ग्रामस्थ, पुढारी आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते. सगळ्यांच्या समोर वाजत गाजत गोटूलची स्थापना साजरी झाली.

नंतरच्या वर्षांत सरकारने गोटूल बांधणे हा एक विकासाचा कार्यक्रमच केला. आदिवासी विकास विभागाने एक खास योजना तयार केली आणि त्या योजनेअंतर्गत जे गावकरी तयार होते त्या गावात गोटूल बांधली गेली.

ही गोटूल अर्थातच विटा आणि सिमेंटची होती आणि त्यांचे स्वरूप एक समाजमंदिर या प्रकारचे होते. पण मेंढा गावाने जो पुढाकार घेतला त्यामुळे समाजाचा हक्क तर शाबीत झालाच पण सगळ्या गावांना गोटूलची भेटही मिळाली.

Tags: पारंपरिक हक्क. सागाचे लाकूड जंगल समाजमंदिर गोटूल traditional rights saga wood forest Samajmandir Gotul weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मिलिंद बोकील

लेखक, सामाजिक कार्यकर्ते


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके