डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मला भावलेला अनुवाद: टिंडरबॉक्स

अनेक उर्दू शब्दांचे अर्थही अनुवादिकेने वेळोवेळी अगदी नेमकेपणाने दिले आहेत. उदाहरणार्थ- शिवाजीराजाने औरंगजेबाला जिझिया कराविरोधात खडसावून लिहिलेल्या पत्रातील मजकूर पाहा... ‘‘दिव्य ग्रंथांवर आणि ईश्वराच्या वचनांवर (कुराणावर) तुमचा विश्वास असेल, तर ईश्वर हा केवळ ‘रब-उल्‌- मुस्लिमीन’ म्हणजे मुसलमानांचा स्वामी नसून तो ‘रब- उल्‌-अलामीन’ म्हणजे सर्व मानवमात्रांचा स्वामी असल्याचं तुमच्या लक्षात येईल.’’

एखाद्या सर्जनशील साहित्यकृतीचा अनुवाद करणं वेगळं आणि एखाद्या इतिहासपर, विश्लेषणपर वा माहितीपर पुस्तकाचा अनुवाद करणं वेगळं. दोन्ही प्रकारच्या पुस्तकांच्या अनुवादात अनुवादकौशल्याची कसोटी लागते -  यात डावं-उजवं करता येत नाही; परंतु फरक पडतो तो यामुळे की, त्यांत काहीशी वेगवेगळी कौशल्यं आवश्यक ठरतात.

‘मी केलेला अनुवाद’ या शीर्षकाखाली माझ्या लेखात (साधना : 25 एप्रिल 2015) ‘लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घ पत्र’ या पुस्तकाच्या अनुवाद-प्रक्रियेबाबत लिहिलं होतं. सर्जनशील साहित्य आणि समकालीन व ऐतिहासिक, सामाजिक-राजकीय घडामोडींचं तर्कनिष्ठ विश्लेषण यांचा मिलाफ साधणारं ते पुस्तक आहे. आता, ‘मला भावलेला अनुवाद’ या शीर्षकांतर्गत लेखासाठी मी इतिहासपर विश्लेषणात्मक अशा एका अनुवादित पुस्तकाची निवड केलेली आहे- एम.जे.अकबर लिखित ‘टिंडरबॉक्स, द पास्ट अँड फ्युचर ऑफ पाकिस्तान’. या पुस्तकाचा रेखा देशपांडे यांनी केलेला अनुवाद- ‘ज्वालाग्राही पाकिस्तान’, हे पुस्तक पुण्याच्याच ‘चिनार पब्लिशर्स’ यांनी 2012 मध्ये प्रकाशित केलं आहे.

मला हा अनुवाद भावला, त्यामागची महत्त्वाची कारणं म्हणजे- अनुवादक रेखा देशपांडे यांची मूळ लेखकाच्या कथनशैलीच्या निकट जाण्याची तळमळ; विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन काही मूळ शब्दांचा अर्थ व उच्चारण याला दिलेलं महत्त्व आणि मराठी प्रतिशब्दांची काटेकोरपणे केलेली निवड. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे- एकंदरीत विषय व त्याची संदर्भभूमी, संघर्षमय इतिहासाशी निगडित घटक, मनोभूमिका, विचारप्रवाह यांचा विचार करता त्यांनी भाषेचा असा पोत स्वीकारलेला दिसतो की, त्यातून मागील दोन शतकांतील वातावरण, विचारविश्व डिस्‌कोर्स आणि तीव्र भावनिक चढ-उतार यांचा ‘एहसास’ आपोआपच मिळतो. ‘मराठमोळे’पणाला अवास्तव महत्त्व न देता आशयनिष्ठेला प्राधान्य दिलं, हे यामागचं महत्त्वाचं  कारण असावं. याबाबत अधिक सविस्तर सांगण्यापूर्वी मूळ इंग्रजी पुस्तकाचा विषय, त्याची रचना व भाषाशैली याबाबत थोडक्यात सांगणं आवश्यक वाटतं.

‘टिंडरबॉक्स’चा विषय व भाषाशैली

एम.जे.अकबर यांचं ‘टिंडरबॉक्स : द पास्ट अँड फ्युचर ऑफ पाकिस्तान’ हे पुस्तक शीर्षकातून सूचित केल्यानुसार ज्वलंत समस्येवर (‘टिंडरबॉक्स’ म्हणजे, अर्थात चकमकीची पेटीच- म्हणून ‘ज्वालाग्राही’) असलं, तरी ते भावना उत्तेजित करणारं पुस्तक नाही. त्याचप्रमाणे ते रूढार्थाने वा ढोबळपणे पाकिस्तानच्या निर्मितीचा वा फाळणीचा इतिहास सांगणारंही पुस्तक नाही. उलट, अत्यंत वस्तुनिष्ठपणे आणि संयततेने गेल्या दोन शतकांत ‘मुस्लिम अवकाशा’च्या कल्पनेचा पाठलाग करण्याचा ‘बेताबी’ने केला गेलेला प्रयत्न, त्यातून उपजलेली ‘पाकिस्तान’ची संकल्पना आणि त्या संकल्पनेशी झगडत राहणाऱ्या शक्तींमधील संघर्षामुळे तिथे निर्माण झालेलं आजचं दाहक चित्र याचा सूक्ष्म मागोवा हे पुस्तक घेतं.

एकूण 14 प्रकरणं असलेल्या या पुस्तकातील पहिली दहा प्रकरणं ही मुस्लिम राजवटींचा भारतीय उपखंडातील शिरकाव, विस्तार, उन्नती, अधोगती, ऱ्हास आणि या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर येथील मुस्लिमांची मानसिक आंदोलनं- ‘श्रेष्ठ’, ‘अल्पसंख्य’, ‘वैभवशाली’, ‘अभावग्रस्त’ अशा विविध गंडांनी प्रभावित असा त्यांचा मानसिक प्रवास; ऑटोमन साम्राज्यापासून ते हिंदुस्थानातील मुगलशाहीचा अंत- हा प्रवास झाल्यावर हिंदू व ब्रिटिशांशी नातं कसं राहावं, याबाबत त्या समाजांतर्गत असलेले परस्परविरोधी विचारप्रवाह ते खिलाफत चळवळीच्या निमित्ताने महात्मा गांधींसोबत (1919-22) झालेला ‘अहिंसक जिहाद’चा प्रवास... असं सर्व या 10 प्रकरणांत वस्तुनिष्ठपणे विशद केलं आहे.

बाकीच्या 45 प्रकरणांमध्ये स्वातंत्र्योत्तर पाकिस्तानमधील म्हणजे जीना ते मुशर्रफ यांच्या राजवटीतील व तालिबानच्या दहशतीखालील अस्थिर प्रवासाचं चित्र दिलं आहे; परंतु अर्थातच स्वातंत्र्यपूर्व काळातील वहाबी, बरेलवी, आधुनिकतावादी सय्यद अहमद ते मौदुदी आदी विविध विचारवंतांच्या विचारप्रणालींचं प्रतिबिंब त्या चित्रात कसं पडलं आहे ते दर्शवत, इतिहास व वर्तमानाचा पट  आपल्यासमोर उलगडला आहे.

आता एम.जे.अकबर यांच्या कथनशैलीबाबत व भाषाशैलीबाबत. विषय तसा म्हटला तर स्फोटक, पण कुणालाही व्यक्तिश: दोष न देता- राजे-सम्राट असो, राजकीय नेते असोत वा धार्मिक तत्त्वचिंतक- त्यांनी त्यांचे दृष्टिकोन, त्यांच्या हितकारक वा क्रूर कृती अत्यंत संयतपणे वस्तुनिष्ठपणे विशद केल्या आहेत. मुळात अकबर यांच्या वाक्यरचना, भाषेचा ओघ असा आहे की, रुक्षतेला वा क्लिष्टतेला स्थानच नाही. प्रत्येक प्रकरणाची सुरुवात थेट विषयाला भिडणारी, स्वत:चा दृष्टिकोन पुरेसा स्पष्ट करणारी व रस निर्माण करणारी आणि प्रत्येक प्रकरणाची अखेर मार्मिक टोला देणारी वा पुढील प्रकरणाला ‘चाल’ देणारी. आलंकारिकतेपेक्षा डौलदार वाक्यरचना एकापाठोपाठ रचणं, त्यातून ‘खटका’, ‘ताल-लय’ निर्माण करणं- हीच खरं तर त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये आहेत. अनुवादक रेखा देशपांडे यांना त्यांच्या इंग्रजी भाषेतील हे ‘ध्वनी’ बरोबर ऐकू आले, म्हणून तर ते ध्वनी-परिणाम आपल्या भाषेत उतरवणं त्यांना साध्य झालं.

अनुवादाची वैशिष्ट्ये

रेखा देशपांडे आपल्या मनोगतात म्हणतात, ‘‘या दोन देशांत (1971 मध्ये तिसराही जन्माला आला) ‘रक्ताचे नाते’ आहे ते दोन अर्थांनी- चांगल्या आणि वाईट! राष्ट्राराष्ट्रांत तेढ आहे आणि माणसा-माणसांत ओढ आहे, राष्ट्राराष्ट्रांत अविश्वास आहे आणि माणसे-माणसे भेटली की, गाढ विश्वासाने उराउरी भेटतात. यामुळे पाकिस्तान, त्याची निर्मिती, त्याची मानसिकता, त्याची वर्तमान परिस्थिती, त्याचे भविष्य- हे सगळे कुतूहल जागवत राहते... न उलगडणाऱ्या कोड्यातूनच ते कुतूहल जन्मलेले असावे.’’

एकंदरीत, एम.जे.अकबर यांनी संशोधक- अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या पुस्तकाकडे पाहण्याचा अनुवादिकेचा दृष्टिकोन असा विशुद्ध आणि निर्मळ आहे. त्यामुळे अकबर यांच्या प्रगल्भ जाणिवेशी नातं जोडण्यात त्यांना कुठेच अडचण आलेली आढळत नाही. त्याचप्रमाणेच त्यांच्या कथनशैलीचा बाज मराठीतही जवळपास तसाच ठेवण्यात त्यांना खूप प्रयत्न करावे लागले असतील, असंही वाटत नाही.

रेखा देशपांडे यांनी या पुस्तकाचा अनुवाद करण्यापूर्वी इर्शाद मंजीलिखित ‘द ट्रबल विथ इस्लाम टुडे’ व इम्तियाज गुललिखित ‘अल्‌ कायदा कनेक्शन’ या पुस्तकांचा अनुवाद  केलेला असल्यामुळे, त्यांना पाकिस्तानच्या समस्यांची समज चांगलीच असावी आणि त्यामुळेच या पुस्तकाचा गर्भित आशयही त्यांच्या चांगलाच पकडीत आलेला दिसतो. या सर्व गोष्टींचा फायदा असा होतो की, काही वेळा इंग्रजी भाषेत लिहिलेला परिच्छेद त्या भाषेचा ओघ लक्षात घेऊन वा सोईच्या संयुक्त वाक्यरचनेद्वारे केलेला असतो; पण मराठी भाषेत मात्र तो ओघ अनुरूप ठरत नाही. अशा वेळी आशयाला धक्का न लावता वाक्यांचा क्रम उलट-सुलट करून मराठीत परिच्छेदाची रचना करावी लागते. असं करताना भाषेवरील पकडीइतकाच समज वा जाणिवेचा मोठा उपयोग होतो.

उदाहरणार्थ- अठराव्या शतकात होऊन गेलेल्या वलीउल्लाह या विचारवंताच्या विचारातून पाकिस्तानची कल्पना मूलत: कशी रुजली आणि विसाव्या शतकात त्यांचं विकसित रूप कशाकशात दिसून आलं, याबाबत चर्चा करताना लेखक अकबर यांनी म्हटलं आहे-

‘The germination of the idea of Pakistan is clear, in restropect, in the thought and ‘hidayat’ of Shah Waliullah. His theory of distance was politically institutionalized in separate electrorates, the first demand of Muslim League after it was formed in 1906, through which only Muslims could vote for Muslim candidates. The natural corollary of distrust was a separate Muslim space.’’

याचा अनुवाद केलेला आहे तो असा....

‘‘मागे वळून पाहताना, पाकिस्तानची कल्पना कशी रुजली हे शाह वलीउल्लाहच्या विचारातून आणि ‘हिदायत’ (नैतिक उपदेश) मधून लक्षात येतं. सवत्या सुभ्याच्या, म्हणजेच अंतर राखण्याच्या त्याच्या सिद्धांताला राजकीय स्वरूप प्राप्त झालं ते वेगळ्या मतदारसंघाच्या मागणीतून. सन 1906 मध्ये स्थापना झाल्या-झाल्या मुस्लिम लीगने पहिली मागणी केली ती वेगळ्या मतदारसंघाची. याद्वारे मुस्लिम उमेदवारांची निवड केवळ मुस्लिम मतदारच करू शकणार होते. वेगळ्या मुस्लिम अवकाशाची मागणी हा अविश्वासाचा स्वाभाविक परिणाम होता.’’

 प्रकरणांची रोचक सुरुवात, मार्मिक अखेर

अकबर यांची कथनशैली ओघवती आहेच, परंतु प्रत्येक प्रकरणांची रोचक सुरुवात आणि एखाद्या मार्मिक टोला देणाऱ्या विधानाने वा पुढील प्रकरणाच्या आशयाबाबतच्या सूचक विधानाने प्रकरणाचा शेवट करण्याच्या त्यांच्या शैलीमुळे वाचकाचा पुस्तकातील (जवळपास 350 पानी) रस प्रकरणागणिक वाढत जातो. अनुवादिकेने मराठीतही या वैशिष्ट्याला जराही बाधा येऊ दिली नाही.

उदाहरणार्थ- दहाव्या प्रकरणाच्या सुरुवातीला एक ‘गोंधळवून टाकणारं’ नाट्यमय वाक्य येतं—

‘The idea of India is stronger than the Indian; the idea of Pakistan is weaker than the Pakistani.‘

अनुवाद- ...‘भारत’ ही संकल्पना ‘भारतीय’ या संकल्पनेपेक्षा सामर्थ्यवान आहे, तर ‘पाकिस्तान’ ही संकल्पना ‘पाकिस्तानी’ या संकल्पनेपेक्षा कमकुवत आहे.’’

आता विचारप्रवर्तक शेवटाबाबत- खिलाफत चळवळीतील गांधींच्या नेतृत्वाची चर्चा केल्यावर ‘अहिंसक जिहाद’ या सातव्या प्रकरणाच्या अखेरीस गांधी आणि त्यांना समकालीन असा तुर्कस्तानचा अतातुर्क अर्थात केमाल पाशा यांच्यातील फरक मूळ लेखकाने परिणामकारकतेने मांडला आहे, तो असा....

‘Ataturk and Gandhi used same slogan between 1919 and 1922; ‘Victory or Death’ cried Ataturk; ‘Do or Die’ demanded Gandhi. But while Ataturk’s battlefields did not offer a third option, Gandhi believed that a final confrontation could always be postponed on India’s minefields. Gandhi always lived to fight-or-fast-another day, until 1947 broke his country and 1948 took his life.’

अनुवाद- ‘‘अतातुर्क यांची घोषणा होती, ‘जिंकू किंवा मरू’. गांधीचं आवाहन होतं ‘करा वा मरा’. पण अतातुर्क यांच्या रणभूमीवर तिसरा पर्याय नव्हता, तर सुरुंग पेरलेल्या भारतभूमीच्या कुरुक्षेत्रावरचा अंतिम सामना पुढच्या दिवसापर्यंत तहकूब करता येतो, असा गांधींचा विश्वास होता. गांधी जगले ते कायम पुढची लढाई लढण्यासाठी, उद्याचं उपोषण करण्यासाठी. सन 1947 ने त्यांच्या देशाची फाळणी केली आणि 1948 ने त्यांचं प्राणहरण केलं, त्या क्षणापर्यंत ते जगले ते पुढची लढाई लढण्यासाठीच.’’

माझ्या मते- दोन्ही शेवट विचारप्रवर्तक, दृष्टी-दृष्टीतील फरक दाखवणारे आणि त्याचप्रमाणे हृदयाचा ठाव घेणारे आहेत- भाषा कोणतीही असो! आणखी काय पाहिजे?

पुस्तक ‘ऐकू’ यायला हवं!

मूळ पुस्तकाचा आशय मराठी वाचकापर्यंत परिणामकारकतेने जायला हवा आणि त्याला तो अस्सलतेने ‘ऐकू यायला’ हवा, यासाठीची अनुवादिकेची तळमळ  पदोपदी जाणवते.

देशपांडे आपल्या मनोगतात म्हणतात, ‘‘वातावरणनिर्मितीत भाषेच्या ध्वनीचा मोठा हात असतो. मराठीतील ज आणि ग या अक्षरांखाली नुक्ता(.) देण्याचे स्वातंत्र्य घेतले, तर ते अधिक अर्थपूर्ण परिणाम साधेल, असे सतत वाटत होते... (त्यानुसार लिहिलेले) आजाद, निजाम, नमाज, रोजा असे शब्द.... अकबर यांच्या कथाच्या प्रवाहाबरोबर पोहायला सुरुवात केल्यानंतर बरोबर वाटू लागले.’’

याच संदर्भात त्या म्हणतात, ‘‘उर्दू-हिंदीतील विशेषत: ‘ज’ आणि ‘ग’ या अक्षरांना अनुक्रमे ‘झ’ आणि ‘घ’ असे पर्याय वापरले जातात. प्रत्यक्षात त्यांचे उच्चार वेगळे आहेत.’’ त्याचप्रमाणे काही वेळा एका नुक्त्यामुळे शब्दांचा अर्थ बदलतो. उदा. ‘अजीज’ (प्रिय) आणि अजीज (नामर्द). तसेच अकबर यांनी इंग्रजीत अय्यूब (खान) यांचं स्पेलिंग ’र्अूील’ असं केलं असलं तरी अनुवादिकेने ‘अय्यूब’ (सहनशीलतेसाठी प्रसिद्ध असलेले एक प्रेषित) आणि ‘अयूब’ (दुर्गुण) यांतील फरक लक्षात घेऊन ‘अय्यूब खान’ असंच त्यांचं नाव लिहिण्याचं ‘विधायक स्वातंत्र्य’ घेतलं आहे. अर्थात, संशोधनाशिवाय असं स्वातंत्र्य घेण्याचा आत्मविश्वास प्राप्त होत नसतो!

अनेक उर्दू शब्दांचे अर्थही अनुवादिकेने वेळोवेळी अगदी नेमकेपणाने दिले आहेत. उदाहरणार्थ- शिवाजीराजाने औरंगजेबाला जिझिया कराविरोधात खडसावून लिहिलेल्या पत्रातील मजकूर पाहा... ‘‘दिव्य ग्रंथांवर आणि ईश्वराच्या वचनांवर (कुराणावर) तुमचा विश्वास असेल, तर ईश्वर हा केवळ ‘रब-उल्‌- मुस्लिमीन’ म्हणजे मुसलमानांचा स्वामी नसून तो ‘रब- उल्‌-अलामीन’ म्हणजे सर्व मानवमात्रांचा स्वामी असल्याचं तुमच्या लक्षात येईल.’’

न्याय आणि प्रतारणा

अकबर यांच्या मूळ पुस्तकातील आशयाचं मोल जाणून रेखा देशपांडे यांनी परिश्रमपूर्वक आणि मन:पूर्वक अनुवाद करून त्या पुस्तकाला न्याय दिला. परंतु, अकबर यांचं काय? सन 2011 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकातून त्यांनी धर्मनिरपेक्षतेचं मोल आणि उजव्या धर्माधारित राजकारणामुळे पाकिस्तानात कसे विपरीत परिणाम घडून आले, त्याबाबत वाचकाचं प्रबोधन केलं. परंतु त्यानंतर तीनच वर्षांत त्यांनी उजव्या धर्मविचारावर आधारित राजकारण करणाऱ्या नरेंद्र मोदी या नेत्याचे गोडवे गाण्यास उघडपणे सुरुवात केली आणि ‘भाजप’शी सोयरीक केली. त्यांचीच शैली वापरून म्हणावे- ‘लेखका’पेक्षा त्याचे ‘पुस्तक’ सशक्त आहे! आपल्याला पुस्तकाचा आशय भावला, अनुवादही भावला आणि जाणही वाढली, आणखी काय हवं?

Tags: पाकिस्तान भारत अनुवाद रेखा देशपांडे एम. जे. अकबर पुस्तक लेखक मिलिंद चंपानेरकर टिंडरबॉक्स मला भावलेला अनुवाद Pakistan India Translation Rekha Deshpande M. J. Akabar book author Milind Chanpanerkar Tinderbox Mala Bhawalela Anuwad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके