डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘...‘बिट्‌विन द लाइन्स’ अँड फार फार बियाँड!’

‘बिटविन द लाइन्स’मधील प्रत्येक अनुभवकथेवर किती लिहावे, असा मोह होतो आहे; पण चंद्रमोहनचे सुंदर लिखाण वाचताना त्यावरील माझ्या अधिक विवेचनाने रसभंग होईल कदाचित, तेव्हा थांबायला हवं इथेच! या सर्व अनुभवकथनात चंद्रमोहन अतिशय प्रामाणिक आहेत. कुठेही अहंपणा नाही. ते सिद्धहस्त चित्रकार आणि मराठी साहित्यविश्वातील नामवंत पृष्ठकार आहेत. आपल्या कामाला आधुनिकतेची जोड सातत्याने ते देत असतात. पेन्सिल, शाई, रंगांपासून विविध कॉम्प्युटर सॉफ्टवेअर्सचा कलात्म उपयोग ते करून घेत असतात. नावीन्यपूर्ण विषयांवर सतत चित्रनिर्मिती आणि त्यांची चित्रप्रदर्शने सर्व नामांकित गॅलरीत सातत्याने होत असतात. कोणत्याही माध्यमात काम करताना उत्तमतेचा ध्यास हा त्यांचा स्थायिभाव आहे. सतत कार्यरत राहून नवनवीन प्रयोग करत राहणे, ही त्यांची खासीयत आहे.
 

आपल्या आवडत्या कलाकाराच्या... चित्रकाराच्या कलाकृतींबद्दल लिहिण्याचा योग येणं, ही माझ्यासाठी नेहमीच खूप आनंददायक गोष्ट राहिली आहे. त्यातून हा चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णींसारखा शब्दप्रभूही असावा, हा एक अपूर्व संयोगच म्हणायला हवा. चंद्रमोहनचं ‘बिट्‌विन द लाइन्स’ हे पुस्तक वाचायला घेतल्यानंतर माझी अवस्था एका लहान मुलासारखी झाली. आवडता खाऊ हातात पडल्यावर जसा तो हळूहळू जपून खायचा प्रयत्न करतो, तसं चंद्रमोहनच्या जीवनानुभवांचं संचित या पुस्तकातून वाचत असताना त्यातील एक-एक लेख सुरूच राहावा... तो वाचत राहावा, तो संपूच नये- असं वाटतं राहतं. या पुस्तकाच्या शीर्षकापासून आपलं कुतूहल जागृत होतं. या पुस्तकातील संचिताला आणि संहितेला एका मजेदार सूत्राने जोडणारे ‘बिट्‌विन द लाइन्स’ हे शीर्षक मला अनेक अर्थाने प्रतीकात्मक वाटते. प्रत्येक चित्रकाराचं आयुष्य बिंदू, रंग, रूप, आकार, रेषा, पोत यांच्या परिघांमध्ये आणि परिघाबाहेरील अनुभवांमधून साकारलं जात असतं... कधी नाकारलंही जातं... पण सुंदर फलद्रूपही होत असतं.

चंद्रमोहन यांच्या जीवनात घडलेल्या विविध घटना,  कॅन्व्हासवर वा एखाद्या मुखपृष्ठाच्या डिझाईनमध्ये मुद्दाम रेखलेल्या किंवा कधी कधी सहजपणे अवतरलेल्या बिंदूंसारख्या भासतात. या बिंदूंना आणि त्यांनी जोडलेल्या रेषांनाही अनेक भावभावनांचे रंग आहेत. आशा-निराशा, अपेक्षा, यश-अपयशांतूनही कायम उत्तमतेचा ध्यास- हा चंद्रमोहन त्यांच्या चित्रकारितेच्या प्रवासातील स्थायिभाव आहे. सतत जागरूकपणे नवनव्या गोष्टी आत्मसात करणे... त्यांची सृजनशील मांडणी करणे... त्यातून उत्तमोत्तम कलाकृती साकारणे हा त्यांचा श्वास आहे. आपल्या चित्रांतून जितके सुंदर अभिव्यक्त होतात, तितकीच त्यांची लेखणी व त्यामधून झरणारे शब्द ताकतवर व प्रभावी आहेत. पुस्तकातला प्रत्येक लेख त्या-त्या अनुभवातील व्यक्तिरेखांचे रंग उलगडून दाखवतो. त्या-त्या प्रसंगातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचे वर्णन चंद्रमोहन त्यांच्या खास शैलीत करतात. सामान्यपणे लेखी भाषेत नसलेले, पण आपल्या बोलीभाषेत असल्याने आपल्याला अधिक जवळे वाटणारे शब्द चपखलपणे वापरणे, हे या लेखकाचे कसब आहे. ‘पिच्चर’, ‘सरबत’, ‘मटका’, ‘ढाबळ’, ‘भारी’... असे सारे शब्द आपलेपणा निर्माण करतात. प्रथितयश चित्रकार व सिद्धहस्त लेखक आपल्याच भाषेत अनुभवकथन करतोय, ही जाणीवच वाचकाला त्या-त्या वर्णनात खिळवून टाकते... पुढे-पुढे उत्सुकतेने वाचायला प्रवृत्त करते. अप्रतिम वर्णनशैलीमुळे पुस्तकातला प्रत्येक लेख आपल्याला त्या-त्या ठिकाणी घेऊन जातो. तिथल्या ठिकाणचे स्वाद व दर्प आपण अनुभवतो. विविध प्रसंगांतील माणसं त्यांच्या स्वभावातील पोतांसह आपण अगदी जवळून अनुभवतो. माणसांना जसं प्रत्येकाला एक वेगळं अस्तित्व असतं, अगदी तसंच चंद्रमोहन यांच्या वर्णनातील प्रत्येक वस्तूलाही एक वेगळं व्यक्तिमत्त्व असतं. असं जाणवतं की, त्या वस्तूही स्वभाववैशिष्ट्यांनुसार लेखकाशी संवाद करतात... चंद्रमोहन त्यांच्या खुमासदार शैलीत त्या वस्तूंना आपल्यासमोर सादर करतात.

आपल्या वडिलांच्या ‘निळ्या सायकली’चं वर्णन चंद्रमोहन करायला लागतात... तेव्हा त्या लेखातल्या पहिल्या पॅरिग्राफमध्ये, अलीकडेच पुण्यात निघालेल्या सायकलच्या दुकानाचं वर्णन करायला लागतात; त्या वेळी मला सायकल न चालवता, वाचता-वाचताच दम लागला! ‘फक्त सायकली विकणारं एक दुकान पुण्यात निघालंय. भारी-भारी सायकली मिळणारं तीन-चार मजली दुकान. साध्या सायकलपासून ते अगदी दहा-बारा गिअरवाल्या, चकाचक शायनिंगवाल्या. रंगीबेरंगी ग्राफिक्स, फ्लुरोसंट कलर्सवाल्या, रेसिंगच्या, सीट-हँडलची उंची कमी-जास्त करता येणाऱ्या, शेलाट्या अंगकाठीच्या, देखण्या, निरनिराळ्या ब्रँडच्या अतोनात सायकली. सायकलीच सायकली!’ वाचता-वाचता होणारी ही दमछाक आनंददायी वाटतेच, पण त्या शब्दांतली लयदार रचना त्या सायकलच्या दुकानाचं सुंदर चित्र आपल्यासमोर उभी करते... कल्पनांच्या दोन रेषांमधलं चित्रवास्तव आपल्यातलं लहान मूल जागं करतं!

चंद्रमोहन यांचे प्रिय बाबा, म्हणजे नानांची ‘निळी सायकल’ आणि तिचे वर्णन हे मला एखाद्या चित्रकृतीसारखंच वाटतं. आजच्या काळात मुलांना ज्या गोष्टी सहजासहजी मिळतात, त्या गोष्टी मोठ्या माणसांनीही बाळगायच्या, हे त्या काळात अप्रूप होतं... अभिमानाचं होतं. नानांचं आपल्या सायकलवर अतोनात प्रेम होतं, हे लहान विद्यार्थिदशेतील चंद्रमोहनना मनापासून भावलं... त्या प्रेमाचा ठसा त्यांच्या मनावर ठसला. सायकलचा निळा रंग त्यांनी मनभरून पाहिला. नानांचा हा प्रिय रंग. जिथे-जिथे शक्य होतं, तिथे-तिथे त्यांनी निळा रंग सायकलला लावला होता. सायकलची सजावटसुद्धा सर्व निळ्या रंगात असायची. सायकलचं हँडल, ब्रेक्सना लावायच्या रबरी ग्रिप्स, चेनकव्हर... सारं-सारं निळ्या रंगाचं... अगदी पेडल्‌कव्हरसुद्धा निळंच असायला हवं, हा कटाक्ष होता! चंद्रमोहन यांनी केलेलं वर्णन आजचं असलं तरी, मला ते लहान मुलांच्या मनावर होणाऱ्या रंगसंस्कारांचं देखणं रूप वाटतं. दर आठ-पंधरा दिवसांनी आणि वेळोवेळी परेड असायची, त्या वेळी नानांचं सगळ्या गोष्टींना लख्खं करणं... चकाचक करणं... ड्रेसची कडक इस्त्री, बेल्ट, युनिफॉर्मची-टोपीची बटणं, शिट्टी या सगळ्यांना पॉलिश करणं... आणि अर्थातच सायकलचे हँडल, स्पोक्स, पेंडलच्या मांड्या, घंटा या स्टील किंवा क्रोमियम फिनिशच्या गोष्टींना चमकावणं हे सारं-सारं मला सौंदर्यदृष्टी आणि उच्च विचारसरणीचा संस्कार वाटतो. चंद्रमोहन यांचं एखादं मुखपृष्ठ असो वा लेख वा एखादं देखणं पेंटिंग- त्यामागील लहानपणीचा हा सुंदर संस्कार मला सतत जाणवतो.

प्रत्येक चित्रकाराचं जीवन अगदी एकटं-एकटं सहसा असत नाही. चित्रकलाक्षेत्रातील नेहमीच चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे ‘कलेसाठी कला... की जीवनासाठी कला?’ या विषयावर नेहमीच दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घातले जातात. आयुष्यातील विविध अनुभवांची जमापुंजी साठल्यावर ह्या दोन्हीही मुद्द्यांचं सारखंच वजन असल्याचं लक्षात येऊ लागतं. ‘कलेसाठी कला’ करणारा एखादा चित्रकार शेकडो चित्रे काढून आपल्याच स्टुडिओत ठेवून अस्तंगत झालेला आपण पाहतो. ‘जीवनासाठी कला’ हे आजच्या स्पर्धात्मक जगातील महत्त्वाचे तत्त्वज्ञान आहे. अर्थातच यामध्ये आपल्या कलाकृतींसाठी मार्केट मिळवणं म्हणजे- त्यात अनेक चाहते, अनेक मित्र, अनेक व्यावसायिक मित्र प्रत्येक कलाकारासाठी आवश्यक आहेतच. तो जर ॲप्लाईड आर्टिस्ट असेल, तर ही गरज अधिकच असेल. चंद्रमोहन यांच्या अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थी-जीवनातील अनेक प्रसंगांतून, कलेची व व्यावसायिकतेची मूलतत्त्वे शिकत असताना, त्यांचा अगदी आठवीपासून महाविद्यालयापर्यंत जवळचा असणारा मित्र ‘पराग’ त्यांच्यासोबत सतत होता.

त्यांच्या मैत्रीच्या सहजीवनातून, घडलेल्या अनेक प्रसंगांतून, मन:पूर्वक केलेल्या अभ्यासातून, निरीक्षणांतून, वैचारिक वादविवादांतून, विविध अनुभवांतून उभयतांमधील मोठा चित्रकार, मोठा कलाकार बनण्याची बीजं रोवली गेली. चंद्रमोहन यांनी केलेल्या वर्णनातून दोन्ही मित्रांच्या सच्चेपणाची दाद वारंवार द्यावीशी वाटते. दोघांच्या विद्याशाखा वेगळ्या असल्या तरी, त्यातील कलात्मकतेशी-उत्तमतेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. सर्वोत्कृष्ट काम करण्याचा ध्यास दोघांमध्येही ठासून भरलेला आपण पाहतो. व्यक्तिचित्रणासाठी त्यांनी केलेले प्रयोग, व्यक्तींच्या चेहऱ्यावरील विविध भावभावनांचा परिपोष असताना डोळे, ओठ, नाक, कान, गाल यांवरील होणाऱ्या स्नायूंच्या हालचाली व रेखाटन करताना येणाऱ्या अडचणींची निरीक्षणं पाहून प्रत्येक वाचकाच्या लक्षात यावं की, चित्रकलेचा मन:पूर्वक अभ्यास काय असतो. एखाद्या सामान्य वाचकाला वाटू शकेल, या अभ्यासात चित्रपटांचं काय स्थान आहे? चंद्रमोहन यांनी सांगितलं आहे- आपल्या मित्राबरोबर पाहिलेल्या अनेक चित्रपटांतून ज्या संदर्भचौकटी मनावर बिंबल्या गेल्या, त्यांचं एक वेगळंच महत्त्व पुढील कलाजीवनासाठी अधोरेखित झालं आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, काळजी, चिंता... आनंद यांची हजारो एक्स्प्रेशन्स चित्रपटातून तर पाहायला मिळतात. विविध लोकेशन्स, फॅशन्स, ड्रेपरीज यांच्या तऱ्हा तिथेच आवर्जून दिसतात. फोटोग्रामी, विविध कोनांतून केलेलं चित्रण, प्रकाश योजना यांच्या असंख्य शक्यता शिकण्याचं हेच माध्यम! त्यातील रंगसंगतींचं आणि नाट्यमय प्रकाशयोजनांचंही संदर्भमूल्य चित्रकाराला किती आहे, याची जाणीव ते करून देतात.

आपल्या ‘मित्र’ या लेखात चंद्रमोहन अनेक ठिकाणी भावनाविवश होऊन आपल्या प्रिय मित्राबद्दलच्या भावना अभिव्यक्त करतात. ‘आर्ट स्कूलमध्ये आपण खूप गोष्टी शिकतो, ते शिक्षण तुम्हाला तुमच्या क्षेत्रात एका पायावर उभं करतं; पण आर्ट स्कूलच्या भिंतीबाहेर मित्रांबरोबर मुक्तपणे घेतलेलं शिक्षण तुम्हाला दोन्ही पायांवर उभं करतं. मी फार शिकलो माझ्या या मित्राकडून. आपले मित्र हे आपले गुरूही असतात, हे आपल्याला फार उशिरा समजतं. आजही स्टुडिओत काम करताना, एखादं चित्रप्रदर्शन पाहताना, सिनेमा पाहताना, एखादी कलर स्कीम न्याहाळताना, एखादा शॉट वा एखादं एक्स्प्रेशन बघताना तो सोबत असतो माझ्या- आजही!’

मधल्या काळात चंद्रमोहन रोमला गेले असताना, कलाइतिहास शिकताना अभ्यासलेल्या चित्र-शिल्पकृती प्रत्यक्ष पाहत असताना, आपल्या मित्राचा हात हातात होता, ही भावोत्कट प्रचिती आपलेही डोळे ओले करते. अकाली स्वर्गवासी झालेल्या आपल्या प्रिय चित्रकार मित्राला त्यांनी दिलेली ही मानवंदनाच म्हणायला हवी.

चंद्रमोहन यांच्याबरोबर गप्पांची मैफिल हा- मी व माझा चित्रकार मित्र धनंजय- आमच्यासाठी एक खूप आनंददायी अनुभव असतो. चंद्रमोहन जितके लिहितात सुंदर, तितकेच बोलतातही सुंदर. अलीकडच्या काळात कामाच्या निमित्ताने मध्य प्रदेशमध्ये त्यांचा मुक्काम व प्रवासही बरेच वेळा होत असतो. अशाच एका भेटीत त्यांनी नर्मदेच्या परिसरातील विविध अनुभवांचे जे वर्णन केलं, ते आम्ही अंत:करणपूर्वक ऐकतच राहिलो. ‘बिट्‌विन द लाइन्स’मध्ये त्यांनी लिहिलेला ‘नमामि नर्मदे’ हा लेख वाचत असताना प्रत्यक्ष ऐकलेल्या वर्णनाच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद मला मिळाला.

चंद्रमोहन हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार, मुखपृष्ठ चित्रकार, बोधचित्रकार आहेत. एखाद्या यशस्वी पुस्तकाला तितक्याच उत्कृष्ट मुखपृष्ठाची साथ असायला हवी, कारण त्या पुस्तकाचं व्यक्तिमत्त्व पुस्तकाच्या मुखपृष्ठामधून व्यक्त होतं... तो पुस्तकाचा चेहरा असतो. पुस्तकाच्या मलपृष्ठावरील ‘ब्लर्ब’ला जसं महत्त्व, त्यापेक्षा जास्त महत्त्व मुखपृष्ठाला. कारण पुस्तकाची कथा कमीत कमी वेळात कथन करण्याची ताकद मुखपृष्ठात असते. ते अत्यंत सृजनशीलतेने चंद्रमोहन साकारतात. आत्ता येथे हे तपशिलाने सांगण्याचे कारण असे की- चित्रकाराची शोधक नजर किती प्रकारे चित्रचौकटी व चित्रसंदर्भ आपल्या मनात साठवून ठेवत असते, याचा प्रत्यय ‘नमामि नर्मदे’ या लेखात आपल्याला वाचायला मिळतो आणि विशेष हे की, आपल्या डोळ्यांसमोर अनेक चित्रे उभी करतो.

चंद्रमोहन यांच्यासारखा प्रथितयश चित्रकार कोणकोणते चित्रतपशील डोळ्यांत साठवत असतो, याचं शब्दचित्र नर्मदेच्या घाटावर त्यांनी पाहिलेल्या गोष्टींतून वाचकांना अनुभवता येतं. ‘काचेच्या, तुळशीच्या, खऱ्या खोट्या दुहेरी रुद्राक्षांच्या, रेशीमगाठी असलेल्या, गोंडे-झिरमिळ्या. लहान-मोठ्या मध्यम लांबीच्या असंख्य माळा... स्फटिकाच्या, प्लॅस्टिकच्या, छोट्या दगडांच्या. रंगीत, बटबटीत, कसल्या-कसल्या खड्यांंच्या अंगठ्या. तकलादू पांढऱ्या धातूच्या अंगठ्या. कानातली, गळ्यातली तांब्याची, पंचधातूची, सप्तधातूची कडी. लहान-मोठ्या पूजेला लागणारी तांब्याची लहान-मोठी भांडी, तुळशी वृंदावनं, देवापुढचे दिवे, अगरबत्ती स्टँड, नर्मदेतले गोटे, रिबिनी, कंगवे, हेअरबँड, काजळाच्या डब्या, पेन्सिली, लिपस्टिकच्या भडक रंगाच्या कांड्या... काय वाट्टेल ते! जडी-बुटीवाल्यांच्या पथाऱ्या. औरंगजेबाच्या वगैरे काळातल्या उर्दू अक्षरं उमटवलेल्या व्यापारी मुद्रा, वाघनखं. वाघांच्या, हरणांच्या कातड्याचे कापून लहान करून मांडीखाली लपवून ठेवलेले तुकडे. तांब्याची, चांदीची नाणी. कचोरी, वडे, पोहे विकणारी छोटी-छोटी दुकानं. चहाच्या हातगाड्या, देवाच्या मूर्ती घडवणाऱ्या लोकांच्या टपऱ्या नि तिथेच इतस्तत: विखुरलेले, पसरलेले, अर्धवट घडलेल्या अवस्थेतले निरनिराळे देव. काही पूर्ण रंगवलेले, काही अर्धवट रंगवलेले. मोठ्या डोळ्यांनी आपल्याकडे पाहत असलेले असहाय देव. हाती शस्त्र घेतलेले मारुती, विष्णू, दुर्गा, राम अन्‌ शंकराच्या पिंडी!’

मित्रंनो ही यादी नव्हे, मला या साऱ्या गोष्टी विविध चित्रांविषयांची चित्रकाराच्या, चित्रकारातील लेखकाच्या मनातील बीजं भासतात. साऱ्या भक्तांना भक्तीशी आणि देवळांशी, वस्तूंच्या व्यापाऱ्यांशी निगडित ही एक जीवनधारा आहे. नर्मदा हे जीवन आहे त्यांच्यासाठी. जीवनातले असंख्य अडथळे पार करत नर्मदामाईच्या भेटीसाठी माणसं आवेगाने येतात येथे. नर्मदेतल्या केवळ एका डुबकीसाठी माणसं मैलोन्‌ मैल चालत येतात. रात्रंदिवस चालत, पाऊस-वाऱ्याला न जुमानता येथे येतात माईच्या भेटीसाठी. चंद्रमोहन याचा मनापासून आनंद घेताना मोकळेपणाने सांगतात की- माझ्याकडे छोटे स्केचबुक व कॅमेरा असतो, पण खूप सारे फोटो व स्केचेसपेक्षा मला ही स्पंदनं जपून ठेवायला आणि दृश्यं डोळ्यांत साठवायला अधिक आवडतात. 

प्रत्येक चित्रकारासाठी, आपल्या आर्ट स्कूल... कला महाविद्यालयातील विद्यार्थिदशेतील सोनेरी दिवस ही एक अत्तराची कुपी असते. विविध चांगल्या-वाईट आठवणींचा कॅलिडोस्कोप असतो तो. किती तरी हवेहवेसे वाटणारे प्रसंग असतात, तसेच विसरून जाव्यात अशाही आठवणी असतात... आवडते मित्र असतात, त्यांची सोबत हवी असते सतत. बोअर आणि नकोसे वाटणारेही सहाध्यायी असतात. ही गोष्ट शिक्षकांच्या-प्राध्यापकांच्या बाबतीतही असते. सगळेच प्राध्यापक विद्यार्थ्यांना आवडणे शक्य नाही... तर काही काही प्राध्यापक विद्यार्थ्यांना आपल्या गुरुस्थानी व पितृतुल्य वाटतात. आपल्या ज्ञानात वृद्धी करणारे, आपल्याला सृजनशीलतेच्या नव्या दिशा व नवे मागे दाखवणारे प्राध्यापक कोण आहेत, हे चंद्रमोहनसारखे गुणवंत विद्यार्थी जाणून असतात. ‘बिट्‌विन द लाइन्स’मधील अनेक लेखांतून, अभिनव कला महाविद्यालयातील आपल्या विद्यार्थी-जीवनातील आठवणींचा मधुकोष चंद्रमोहन यांनी खूप छान उलगडून दाखवला आहे. चंद्रमोहन विद्यार्थी असताना तिथे मीही प्राध्यापक होतो. चंद्रमोहन यांच्या वर्गावर शिकवण्याची संधी मला कधी मिळाली नाही. पण अर्थातच चंद्रमोहन यांच्या प्रदर्शनातील उत्तमोत्तम कामांना दाद देण्याची आणि शाबासकी देण्याची संधी मला सतत मिळत राहिली. त्यामुळे चंद्रमोहन हे अगदी तेव्हापासूनचे माझे मित्र आहेत. साहजिकच त्या काळातील विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्ही बाजूंची मला चांगली कल्पना आहे. मीही याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. विद्यार्थी असताना माझेही विचार चंद्रमोहन यांच्यासारखेच होते. 

चंद्रमोहन यांनी वर्णन केलेले ‘महामहोपाध्याय’ हे प्राध्यापक त्यापैकीच एक. ते आमचे विभागप्रमुख होते... पुढे प्राचार्यही झाले. चंद्रमोहन यांनी वर्णन केलेल्या सरांच्या त्या गूढ कपाटाविषयी आम्हा शिक्षकांमध्येही चर्चा व्हायच्या... हास्यविनोदही व्हायचे. त्यामधील मौल्यवान गोष्टींपैकी एक म्हणजे हा ‘सिंगल लेन्स रिफ्लेक्स’ कॅमेरा. खरंच हा कॅमेरा मुलांना स्वत: हातात घेऊन फारसा कधी वापरायला मिळाला नाहीच. व्हिजिटिंग प्रोफेसर प्रभाकर जोशी मात्र त्यांचा कॅमेरा, त्यांचा स्टुडिओ, त्यांच्या डार्करूम्स सर्व विद्यार्थ्यांना मोकळेपणाने वापरू द्यायचे. मीही फोटोग्राफीचा त्यांचाच विद्यार्थी होतो. जोशी सर सर्वांचे प्रिय असायचे, पण आमचे हेडसर विद्यार्थ्यांमध्ये आणि काही वेळा शिक्षकांमध्येही अन्‌पॉप्युलर असायचे. चित्रकला शिक्षणक्षेत्रात विद्यार्थ्यांना शिस्त लावणारे सर सहसा आवडत नाहीतच... त्यातून पळून जाणारे विद्यार्थी, अभ्यासात टंगळमंगळ करणारे विद्यार्थी, सबमिशन न करणारे विद्यार्थी यांना असे सर कसे आवडावेत?

अर्थातच चंद्रमोहन याला अपवाद असले तरी, त्यांनी सरांची बारकाईने केलेली निरीक्षणे पाहून मनातून हसू येते. चंद्रमोहन यांनी सरांचे केलेले व्यक्तिचित्रण सर्वांनाच आवडेल. बऱ्याच वेळा शिस्त लावणाऱ्या व्यक्तींना कधी कधी आपलं मन मोकळं करावंसं वाटतं. कदाचित माझ्या स्वभावामुळे म्हणा किंवा मी कॉलेजमधील कोणत्याही राजकारणाचा भाग नसल्याने हेडसरांनी मला एकदा ते गूढ कपाट दाखवले होते. चंद्रमोहन यांनी वर्णन केलेला अगम्य वस्तूंचा तो एक खजिना होता; ते एक म्युझियमच होतं. फायली कमी होत्या, पण कागद भरपूर होते. ड्रॉइंग पेपर्स, पेन्सिली, वेगवेगळी निब्ज, पोस्टर कलर्स, वॉटरप्रूफ शाईच्या बाटल्या... बऱ्याच शाई आणि रंगांच्या बाटल्यांतले रंग वाळलेले होते. टेबल टॉप फोटोग्राफीतील स्टिल लाईफची मांडणी करण्यासाठी वेगवेगळी काचेची, चिनीमातीची भांडी, कोल्हापुरी चपला, कॅनव्हासचे बूट... लाईफ ड्रॉइंगला मॉडेलला अंगावर घेण्यासाठी व बॅकग्राऊंडला सोडण्यासाठी कापडाच्या रंगीबेरंगी ड्रेपरीज... स्क्रीन प्रिटिंगच्या शाया, लाकडी फ्रेम्सवर ठोकलेल्या मेश, त्यांच्या सुट्या गुंडाळ्या, फोटोग्राफीची मटेरिअल्स, केमिकल्स, फिल्म्स, फोटोपेपर्स... हे सर्व पाहून माझ्या चेहऱ्यावरचे आश्चर्य लपले नाही. सर म्हणाले, ‘‘ही सर्व कॉलेजची प्रॉपर्टी आहे. उद्या तुम्हालाच मुलांसाठी वापरायची आहे. मी या वस्तू सांभाळल्या नसत्या, तर हे कपाट रिकामं व्हायला आणि नाहीसं व्हायला दोन मिनिटंसुद्धा पुरेशी आहेत!’’ सरांचं हे वाक्य मात्र मला पटलं. आमच्या अभिनव कला महाविद्यालयाच्या विविध विद्याशाखांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या व नामवंत कलाकार म्हणून गाजत असलेल्या चंद्रमोहन यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांच्या यशामागे आमच्या हेडसरांच्या व प्राचार्यांच्या शिस्तीचा थोडासा, छोटासा वाटा नक्कीच आहे, हे मला सांगावंसं वाटतं. 

चंद्रमोहन यांच्या ‘बिटविन द लाइन्स’मधील वर्णन केलेल्या अनेक व्यक्तिरेखांशी व प्रसंगांशी माझी वैयक्तिक मैत्री व जवळीक आहे. त्यामुळे त्या काळातील घटना व व्यक्तिमत्त्वांशी मला आपलेपणा वाटतो. त्यातील सुंदर शब्दचित्रांचा मी एक रसिक चाहता आहे. ‘व्यवहार’ या लेखामध्ये चंद्रमोहन यांनी एका सुंदर आणि आदरणीय व्यक्तिमत्त्वाच्या समवेत झालेल्या आंतरक्रियांचे व प्रसंगांचे खूप हृद्य वर्णन केले आहे.

मी प्रतिभा ॲडव्हर्टायझिंगमध्ये असताना चंद्रमोहन यांच्याप्रमाणेच ॲप्लाईड आर्टचा विद्यार्थी असल्यापासूनची ‘कॅप्टन रो’ यांची आणि माझी ओळख. दुपारी कॉलेज सुटले की, मी ‘प्रतिभा’मध्ये ट्रेनी म्हणून काम करायला जात होतो. मी मधल्या टेबलावर बसायचो. माझ्या दोन्ही बाजूला दोन दिग्गज बसायचे. एका बाजूला अशोक साईनकर- जे ‘हॉल ऑफ फेम’ क्रिएटिव्ह डिरेक्टर होते. दुसऱ्या बाजूला ‘प्रतिभा’चे ‘कॉपी चीफ’ कॅप्टन रो होते. ही दोन महान माणसे- ज्यांनी मला या क्षेत्रातल्या अनेक गोष्टी गप्पा-गप्पांमध्ये शिकवल्या, पण मी एक विद्यार्थी असल्याची जाणीव कधीही करून दिली नाही. चंद्रमोहन यांचा एकन्‌ एक शब्द माझ्या मनात रुंजी घालतो आहे... आम्ही त्यांना ‘कॅप्टनसाहेब’ म्हणायचो. त्या कॅप्टन रोंच्या आठवणी ताज्या करत आहे. चंद्रमोहन यांचे लाघवी शब्द मला ‘जसेच्या तसे’ येथे लिहिण्याचा मोह आवरता येत नाही... ‘परवा कुठे तरी जे कृष्णमूर्तींचा फोटो पाहिला आणि कॅप्टन रोंची आठवण झाली. कॅप्टन रो म्हणजे हसऱ्या चेहऱ्याचा झकास माणूस. त्यांच्या नावाचा उच्चार झाल्याबरोबर नजरेसमोर उभी राहते ती त्यांची सकाळच्या कोवळ्या उन्हासारखी उल्हसित हसरी मुद्रा. एके काळी पुण्यातल्या ॲडव्हर्टायझिंगचं क्षेत्र कॅप्टन रोंच्या नावातल्या अक्षरांशिवाय पूर्ण व्हायचं नाही!’

प्रतिभा ॲडव्हर्टायझिंग ही पुण्यातली राष्ट्रीय स्तरावरची ॲड एजन्सी. त्यासाठी कॉपीरायटिंगचं काम हा हरहुन्नरी मनुष्य करत असे. मोठा लोकप्रिय मनुष्य. जगातल्या जवळजवळ सगळ्या महत्त्वाच्या भाषा ह्याच्या लेखणीवर नृत्य करत असत. जिभेवर सरस्वती. वागणं-बोलणं गोड. ब्रिटिश आर्मीमध्ये सेवा केल्याने एक प्रकारची ऐट आणि आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर आणि वागण्यामध्येही दिसायचा. देखणेपण एखाद्या रोमन पुतळ्यासारखे वाटावे असे.

चंद्रमोहन विद्यार्थी असताना त्यांना मिळालेल्या एका जाहिरातीसाठी कॅप्टन रोंनी कॉपी लिहून दिली होती. चंद्रमोहन यांनी या साऱ्या प्रसंगाचं केलेलं वर्णन हे एक प्रकारे, एक उभरता क्रिएटिव्ह डिझाईनर आणि एक दिग्गज कॉपीरायटर यांच्यातील व्यवहारापलीकडे तयार झालेल्या, उमललेल्या नात्याचे एक सुंदर रूप आपल्याला दाखवते. उभय नात्यातील एकमेकांचा राखलेला आदर आणि उदारता आपल्या डोळ्यांत भरते. चंद्रमोहन यांचा विद्यार्थिदशेतसुद्धा उत्तमतेचा ध्यास आणि त्यासाठी सर्वांत उत्तम कॉपीरायटरला विनंती... आणि त्या उत्तमतेचं कौतुक करण्यासाठी कॅप्टनसाहेबांनी लिहून दिलेली कॉपी- या साऱ्या वर्णनातून आजकाल दुर्मिळ झालेल्या सौहार्दपूर्णतेचं मनोज्ञ दर्शन मला खूप सुखावते. त्यातली दुसरी कौतुकास्पद गोष्ट फक्त चंद्रमोहनसारखा कलंदर चित्रकारच करू शकतो. ती म्हणजे, जर कॅप्टनसाहेबांनी अडीचशे रुपयांतील सर्वच रक्कम मागितली असती, तरी द्यायची मानसिक तयारी!

‘बिटविन द लाइन्स’मधील प्रत्येक अनुभवकथेवर किती लिहावे, असा मोह होतो आहे; पण चंद्रमोहनचे सुंदर लिखाण वाचताना त्यावरील माझ्या अधिक विवेचनाने रसभंग होईल कदाचित, तेव्हा थांबायला हवं इथेच!

या सर्व अनुभवकथनात चंद्रमोहन अतिशय प्रामाणिक आहेत. कुठेही अहंपणा नाही. ते सिद्धहस्त चित्रकार आणि मराठी साहित्यविश्वातील नामवंत पृष्ठकार आहेत. आपल्या कामाला आधुनिकतेची जोड सातत्याने ते देत असतात. पेन्सिल, शाई, रंगांपासून विविध कॉम्प्युटर सॉफ्टवेअर्सचा कलात्म उपयोग ते करून घेत असतात. नावीन्यपूर्ण विषयांवर सतत चित्रनिर्मिती आणि त्यांची चित्रप्रदर्शने सर्व नामांकित गॅलरीत सातत्याने होत असतात. कोणत्याही माध्यमात काम करताना उत्तमतेचा ध्यास हा त्यांचा स्थायिभाव आहे. सतत कार्यरत राहून नवनवीन प्रयोग करत राहणे, ही त्यांची खासीयत आहे. मला आमच्या उभयतांतील मैत्रीचा अभिमान आणि आनंद वाटतो. नवनव्या प्रयोगांतून, विविध तंत्रांतून हुकूमत मिळवताना माझ्यासारख्या मित्रांबरोबर विचारांची नि:संकोच देवाण-घेवाण ते करत असतात.

मराठीतील सर्व ख्यातनाम लेखकांच्या साहित्य निर्मितीला आपल्या मुखपृष्ठांनी आणि सुंदर व सृजनशील बोधचित्रांनी त्यांनी ‘चार चाँद’ लावले आहेत. ख्यातनाम लेखकांच्या लेखनाला चंद्रमोहन यांनी आपल्याही प्रतिभेने नवे चेहरे आणि व्यक्तिमत्त्वे बहाल केली आहेत, असं मला वाटतं. केवळ चित्रे देऊन ते थांबले नाहीत, तर आपल्या चित्रांना आणि प्रतिभेला शब्दांचा सुंदर साज ते चढवतात. या पुस्तकाअगोदर अनेक नामवंत मासिके व वृत्तपत्रांतून जसे त्यांनी लेखन केले आहे, तसेच 'Call of the Seas'  आणि 'My way of Digital Painting' या दोन अतिशय यशस्वी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यातील ‘कॉल ऑफ द सीज्‌’ या पुस्तकाचे ‘सकाळ’मध्ये पुस्तक परीक्षण करण्याचा मला योग आला. चंद्रमोहन यांच्या उत्तम चित्रकृती व अनोख्या लेखन-शैलीतून मिळाली, हे मला आवर्जून सांगावेसे वाटते. या लेखनातून मिळालेला आनंद माझ्यासाठी विलक्षण होता.

चंद्रमोहन यांच्या अनुभवकथनातील अनेक व्यक्तींशी माझी प्रत्यक्ष ओळख असल्याने त्यांच्या भेटीचा योग या पुस्तक वाचनातून मला मिळाला... गजानन मंगेश रेगे सरांशी माझेही ममत्वाचे आणि मैत्रीचे संबंध होते. डार्करूम चालवणारा शिंदे दिवसा वा रात्री केव्हाही कॉपिंग करून द्यायचा. ब्रोमाईड्‌स द्यायचा... भय्यासाहेब ओंकार सर... या सर्वांच्या गुणवैशिष्ट्यांशी अन्‌ स्वभावांच्या अनेक पैलूंशी माझा परिचय होता. प्रत्यक्ष ओळख न झालेल्या, पण सुप्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तींच्या ओळखी चंद्रमोहन यांच्या अनोख्या लेखनशैलीतून झाल्या. पु.ल., सुनीताबाई, शांताबाई, ‘रुचिरा’च्या लेखिका कमलाबाई ओगले, शिल्पकार शर्वरी रॉय-चौधरी, आनंद अंतरकर यांच्या व्यक्तिरेखा, चंद्रमोहन यांच्या नजरेतून पाहताना आणि वाचताना आपल्याला वेगळाच आंनद देतात. दु:खाचे महाकवी ग्रेस आणि त्यांची सेवा करणारा पंढरी यांची अनुभवकथा वाचताना आपले डोळे पाणावतात. होशंगाबादच्या साधूचे आणि त्या ‘गॉगलवाल्या’चे वर्णन चंद्रमोहन यांनी आमच्या गप्पांच्या मैफिलीत आम्हाला जितक्या उत्कटतेने कथन केले होते, तितकेच प्रभावीपणे या पुस्तकवाचनातून ते अनुभवता आले... किंबहुना, मी असं म्हणेन की- चंद्रमोहन यांचे सुंदर कथन जितके ‘बिटविन द लाइन्स’’ आहे... त्याहीपेक्षा किती तरी पुढे... म्हणजे ‘फार फार बियाँड’ असे चित्रकाराच्या जीवनातील अनुभवविश्व साकारण्यात ते यशस्वी झाले आहेत. प्रत्येक कलाप्रेमी-साहित्यप्रेमी वाचकाच्या, कलाकाराच्या आणि चित्रकाराच्या संग्रही हे पुस्तक असायलाच हवे!

बिटविन द लाईन्स : चंद्रमोहन कुलकर्णी
राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठे 240, किंमत 300 रु. 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके