जीवन साफल्याचा आढावा घेतला जातो तेव्हा मिळालेल्या मान-मरातबाच्या जागांची बेरीज करून व्यक्तीचे मोजमाप केले जाते. हा निकष लावला तर लालाजींचे मूल्यमापन अगदी किरकोळ ठरेल. परंतु ध्येयवादाचा व मूल्यांचा दंडक घेऊन मोजमाप केले तर एक आदर्श अबोल कार्यकर्ता व सच्चा मित्र म्हणून लालजींची गणना उच्चतम श्रेणीतच करावी लागेल.
साधा खादीचा सदरा, पायजमा, जाड भिंगांचा चष्मा, डोक्यावर घट्ट बसवलेली गांधी टोपी, अंगावर जुनाट जाकीट, एका खिशात तपकिरीची डबी व डायरी आणि दुसऱ्या खिशात तपकिरीने रंगलेला रुमाल... खूप वर्षांपासून लालजींना पहात होतो. त्यांच्या पेहेरावात कधी बदल झाला नाही आणि आजारपणाने बेजार होईपर्यंत त्यांच्या हातातील दुचाकी ( सायकल ) कधी सुटली नाही. साठ वर्षे पूर्ण झाली तेव्हा मित्रमंडळींनी लालजींना एक लूना भेट दिली होती. परंतु खूप वर्षे साथ दिलेल्या सायकलीला हेवा वाटला असावा आणि श्रद्धावान लालजींची निष्ठाही कोठेतरी डिवचली गेली असावी. त्या लूनाला लालजींचा स्पर्श होऊ शकला नाही....!
कॉलेज शिक्षणासाठी पुण्याला आलो. सेवादल व समाजवादी पक्षात काम करीत असताना लालजींबरोबर परिचय झाला आणि कळत न कळत तो वाढत गेला. नाही म्हटले तरी मी 1940 पासून राजकारणात आहे. गेली 39-40 वर्षे असंख्य कार्यकर्त्यांबरोबर संबंध आला. सत्तेचा शोध घेत पुढे झेपावणारे, वेळप्रसंगी ज्यांच्या सहकार्यामुळे मोठे होतो त्या साथींना सोईस्करपणे विसरणारे, तळातील कार्यकर्त्यांचा विसर पडलेले कित्येक मित्र मी पाहिले आहेत, पहात आहे; परंतु लालजींची ठेवण काही वेगळीच होती. कोणत्याही प्रकारे सत्तेची अथवा स्वार्थाची अभिलाषा न बाळगता, प्रसिद्धीपासून दूर राहून निरलस भावनेने कार्य करणारा आणि लहान- सहान कार्यालाही मोठे मानणारा, लालजींसारखा थोर कार्यकर्ता अगदी विरळा. आयुष्यभर कधीही दर्शनी नेता न होण्याचा लालजींनी जणू निर्धारच केला असावा!
झटपट पुढारी होण्याची आजकाल फॅशनच झाली आहे. ध्येयवादाचे धडे इतिहासजमा झाले आहेत. तपश्चर्येचे तिकिट घेतल्याशिवाय राजकारणात काही नशीबवान महाभागांची 'एन्ट्री' होते ती कॉर्पोरेशन, विधान मंडळ अथवा संसदेचे तिकीट हातात घेऊनच! तळातील कार्यकर्त्यांचे कार्य व त्यांच्या भावना यांचा त्याला पत्ताही नसतो. खालील आधार नसल्यामुळे अशा महाभागांची मदार असते केवळ सोयिस्कर संधिसाधुपणावर! या पार्श्वभूमीवर लालजींसारखा सत्शील कार्यकर्ता अधिक उठून दिसतो.
भारतीय राजकारणाचा प्रवाह जवळून पहाण्याचे भाग्य मला मिळाले आहे. आजकाल त्यामधील उथळपणामुळे खळखळणारा आवाज खुपच वाढला आहे. ध्येयवादाचा झपाट्याने होणारा ऱ्हास हे प्रचलित राजकीय वाताहतीचे एक प्रमुख कारण आहे असे मला राहून राहून वाटते. ज्यांनी साऱ्या समाजाचे व देशाचे नेतृत्व करायचे तेच ध्येयवादापासून दूर झाले तर खालील कार्यकर्त्यांकडून वेगळी अपेक्षा काय ठेवणार? विश्वसनीय ध्येयवादाची जागा संधिसाधू विश्वासघाताने पटकावली असून लालजींसारखे कित्येक प्रामाणिक मित्र दूर फेकले जात आहेत. घटक वादाच्या दाट अंध:काराखाली गुदमरलेल्या जनता पक्षात ध्येयवादी कार्यकर्त्यांची तीच अवस्था झाली आहे. यासंबंधी लालजीबरोबर घाईगर्दीत थोडीफार चर्चा होई तेव्हा त्यांचे मुदमरलेले मन हाच विचार व्यक्त करीत असे आणि त्यांचे समाधान करणे केवळ अशक्य होई.
स्वातंत्र्य सैनिकांना स्वाभिमानाने जगता यावे म्हणून लालजींनी घेतलेला पुढाकार सारखा नजरेसमोर येतो. लालजी जितके सालस व गरीब होते, तितकेच स्पष्ट व रोख ठोक होते. स्वातंत्र्य सेनानींनी लाचारीची भूमिका घेणे त्यांना मंजूर नव्हते; त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारी लाचारीची वागणूकही त्यांना पसंत नव्हती. कित्येकदा फटकळ भाषेत तो राग व्यक्त होत असे. श्री दत्ता जगताप व लालजी या जोडगोळीने स्वातंत्र्य सैनिकांना प्रतिष्ठेची वागणूक मिळावी म्हणून सातत्याने घेतलेले कष्ट बाहेर फारसे माहीत नाहीत. कित्येक प्रकरणांत त्यांच्या चिवटपणामुळेच न्याय मिळू शकला. त्यामध्ये माझ्यासारख्यांना मिळालेल्या प्रशंसेत त्या दोघांचा वाटाही तितकाच मोलाचा आहे! आणीबाणीच्या काळात सर्व धोके पत्करून लालजींनी असंख्यांना दिलासा दिला. त्यांच्या अबोल पण कृतज्ञ स्वभावाची ती पावती आहे.
भारतीय स्वातंत्र्यासाठी सुरू झालेल्या संघर्षामध्ये लालजी सामील झाले आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उराशी बाळगलेले ध्येयवादाचे स्वप्न साकार करण्यासाठी जन्मभर झगडत राहिले. जीवन साफल्याचा आढावा घेतला जातो तेव्हा मिळालेल्या मान-मरातबाच्या जागांची बेरीज करून व्यक्तीचे मोजमाप केले जाते. हा निकष लावला तर लालाजींचे मूल्यमापन अगदी किरकोळ ठरेल. परंतु ध्येयवादाचा व मूल्यांचा दंडक घेऊन मोजमाप केले तर एक आदर्श अबोल कार्यकर्ता व सच्चा मित्र म्हणून लालजींची गणना उच्चतम श्रेणीतच करावी लागेल. लालजींच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी आजकालच्या स्वार्थाने बुजबुजलेल्या कृत्रिम वातावरणात अधिकच दुःखदायक ठरते! लालजींच्या पवित्र स्मृतीस माझे भावपूर्ण प्रणाम!
Tags: पुणे समाजवादी राष्ट्र सेवा दल संसद विधानमंडळ स्वातंत्र्यलढा Pune लालजी Samajwadi Party Rashtra Seva Dal Parliament Legislature Freedom Fighter Lalji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या