डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पुणे विद्यापीठाचे यशस्वी कुलगुरु

मी व्यापार मंत्री असताना आसाममधील कित्येक नेते वा मळेवाले माझे मित्र होते. त्यांचा उपयोग आम्हाला होईल या भावनेने आम्ही तिघेजण कलकत्तामार्गे गोवाहटीला गेलो. ज्या भागात दंगली झाल्या तेथे भेट देऊ नका असे ठरले असतानाही आम्ही कोणतेही पोलीस संरक्षण न घेता भेटी दिल्या. असंख्य तरुणांना विश्वासात घेऊन चर्चा केली. मग हळूहळू त्याचा उलगडा होऊ लागला. आसामी तरुणांनी सुरू केलेला संग्राम तेथील जनतेच्या अस्मितेचा संग्राम होता. असाममध्ये राहूनदेखील आसामी नागरिकांना कोणतेही स्थान नव्हते. सर्व शैक्षणिक व सामाजिक संस्था ब्रिटिशांच्या काळामध्ये बंगाली व्यक्तींच्या हातात गेल्या होत्या. सर्व बाजार बाहेरील व्यापाऱ्यांनी ताब्यात घेतलेले होते. चहाचे मळे आसाममध्ये होते, परंतु मळ्यांची मालकी परदेशी अथवा कलकत्त्यामधील कंपन्यांच्या हातात होती. गुलामगिरीचे जीवन ते जगत होते. त्यांचा स्वाभिमानच डिवचला गेला होता.

पुणे विद्यापीठाचे यशस्वी कुलगुरू तसेच इंडियन इंस्टिट्यूट ऑफ एज्युकेशन (आयआयइ)चे संचालक, तसेच विविध शैक्षणिक समित्यांचे अध्यक्ष म्हणून देवदत्त दाभोलकर यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. पुणे विद्यापीठाचे यशस्वी कुलगुरू होणे अत्यंत अवघड आहे. परंतु आपल्या मानवी दृष्टिकोनातून आणि सुस्वभावातून त्यांनी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व अधिकारी वर्ग यांच्याशी सुसंवाद निर्माण केला आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये पुणे विद्यापीठ नावारुपाला आणण्यात त्यांनी खास भर दिला. विशेषत: शिक्षणक्षेत्रातील विविध प्रकारचे प्रयोग विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करणारे असावेत असा त्यांचा निर्धार होता. त्याच काळामध्ये वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मा.मुख्यमंत्री आणि देवदत्त दाभोलकर यांनी वैकुंठ मेहता इंस्टिट्यूटच्या जागेचा प्रत्यक्ष कब्जा दिला. त्यामुळेच आज त्या ठिकाणी वैकुंठ मेहता इंस्टिट्यूटची सुंदर इमारत उभी राहिली आहे. प्रा.दाभोलकर विद्यापीठाचे कुलगुरू होते त्या काळात आसाममध्ये सन 1980-81 मध्ये आसामी अस्मितेसाठी उग्र स्वरूप प्राप्त झाले. आसाम गणतंत्र परिषद व त्यांच्या नेत्यांनी आपला संघर्ष सुरू केला आणि सामान्य नागरिकांना शांतपणे जगणेही अवघड झाले. हे तरुण इतके का पेटले आहेत यासंबंधी माहिती घेण्यासाठी एस.एम.जोशी, प्रा.दाभोलकर आणि मी असे तिघांनी मिळून आसामचा दौरा करावा असे ठरले.

मी व्यापार मंत्री असताना आसाममधील कित्येक नेते वा मळेवाले माझे मित्र होते. त्यांचा उपयोग आम्हाला होईल या भावनेने आम्ही तिघेजण कलकत्तामार्गे गोवाहटीला गेलो. ज्या भागात दंगली झाल्या तेथे भेट देऊ नका असे ठरले असतानाही आम्ही कोणतेही पोलीस संरक्षण न घेता भेटी दिल्या. असंख्य तरुणांना विश्वासात घेऊन चर्चा केली. मग हळूहळू त्याचा उलगडा होऊ लागला. आसामी तरुणांनी सुरू केलेला संग्राम तेथील जनतेच्या अस्मितेचा संग्राम होता. असाममध्ये राहूनदेखील आसामी नागरिकांना कोणतेही स्थान नव्हते. सर्व शैक्षणिक व सामाजिक संस्था ब्रिटिशांच्या काळामध्ये बंगाली व्यक्तींच्या हातात गेल्या होत्या. सर्व बाजार बाहेरील व्यापाऱ्यांनी ताब्यात घेतलेले होते. चहाचे मळे आसाममध्ये होते, परंतु मळ्यांची मालकी परदेशी अथवा कलकत्त्यामधील कंपन्यांच्या हातात होती. गुलामगिरीचे जीवन ते जगत होते. त्यांचा स्वाभिमानच डिवचला गेला होता.

1826 मध्ये आसाम कराराच्या वेळी ओहम यांची राजवट ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतली. त्यावेळी आसामी जनतेने आपले असहकाराचे आंदोलन सुरू केले. कोणत्याही शासकीय, सामाजिक व शैक्षणिक सेवेमध्ये आसामी माणूस रूजू झाला नाही. इतकेच नव्हे तर कलकत्यापासून ढाक्याला वेगळी रेल्वेलाईन व्हाया गोवाहटीवरून जात होती. त्यासाठी साधा आसामी पोर्टरसुद्धा मिळू शकला नाही. असा संघर्ष आसामी जनतेने स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालू ठेवला याची नोंद इतिहासकारांनी घेतलेली नाही. मात्र याचा परिणाम म्हणून सर्व क्षेत्रामध्ये आसामी सोडून इतरांचाच वरचष्मा होता. आसामी अस्मितेवर झालेला हल्ला तरुणांना पटला नाही. म्हणूनच त्यांनी लोकशाहीतून न्याय मिळणार नाही या भावनेने आपला संघर्ष सुरू केला होता. त्यात कित्येक लोक मारले गेले. हे सर्व अनुभव आमच्या समितीने भडकलेल्या तरुणांकडून ऐकले. इतकेच नव्हे तर मोठ्या चलाखीने त्यावेळचे भूमिगत नेते फुंकन व महंतो यांच्याशी संपर्क साधला. हा तर धोकाच होता, परंतु तो आम्ही स्वीकारला. आठ दिवस आम्ही आसामचा दौरा करीत होतो. आम्हाला ज्या दोन खोल्या राहण्यासाठी मिळत, त्यातील एका खोलीत एस.एम.जोशी व दुसऱ्या खोलीत मी व प्रा.दाभोलकर राहात होतो. त्यावेळी होणाऱ्या गप्पा मी आजही विसरू शकत नाही. विशेषत: प्रा.दाभोलकर यांना असंख्य विनोदी किस्से येत असत. त्यामध्ये मीही मागे नव्हतो. त्यामुळे रात्रभर हास्याची कारंजी उडत असत. अशातऱ्हेने आमच्या उभयतांची मैफल रंगत असे.

दुसऱ्या दिवशी एस.एम. आम्हाला विचारत असत की, तुची एवढी कसली हास्याची खसखस पिकली होती, मीही त्यामध्ये सामील झालो असतो. एकदा आम्ही दौऱ्यावरून परत येत असताना आमचे पाय चिखलांनी भरले होते. एस.एम. जोशींच्या मनात आले की आपण जवळच्या तलावामध्ये पाय स्वच्छ करावेत. म्हणून त्यांनी हळूच आपले पाय तलावात घातले आणि क्षणात असंख्य जळवा एस.एम. यांच्या कपड्यावर चढल्या. जळू हा प्राणी असा आहे की, तो एकदा चिकटला की शरीरातील रक्त पिऊन झाल्याशिवाय सुटत नाही. आम्ही एस.एम. जोशी यांच्या शरीरावरील कपडे आडोसा घेऊन काढून टाकले. सुदैवाने आमच्या गाडीत कपडे होते ते त्यांना दिले. ज्या जळवा चढल्या होत्या त्या एक एक करून काढल्या व जळवांनी भरलेले कपडे तेथेच टाकून दिले. नंतर त्यांना बरोबर घेऊन खोलीवर आलो. ते सगळे तापदायक होते. पण तितकेच हसविणारे होते.

आसामचे मुख्यमंत्री सत्यनारायण सिन्हा यांनी आमच्यासाठी खास भोजनाचा बेत ठेवला. तर कलकत्त्याला माझ्या एका मित्राने आम्हाला घरी बोलावून आमचा सत्कार केला. त्यानंतर आम्ही पुण्याला परत आलो. प्रा.दाभोलकर व एस.एम.जोशी यांच्या समवेत झालेला दौरा अविस्मरणीय होता. माझे मित्रवर्य प्रा.देवदत्त दाभोलकर यांच्या निधनामुळे हा सर्व स्मृतीपट नजरेसमोर फिरू लागला, त्यांना अखेरचा मुजरा करण्यासाठी या आठवणी नमूद केल्या आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन

Tags: आसामी अस्मितता आसाम भेट देवदत्त दाभोलकर मोहन धारिया पुणे विद्यापीठाचे यशस्वी कुलगुरु assami asmitta assam bhet devdatta dabholkar mohan dhariya Pune vidhypitache yashasvi kulguru weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके