डिजिटल अर्काईव्ह

शरम आणि लज्जा यांचासुद्धा एक उद्योग तयार झाला आहे. इथे पैसा कसा मिळवला जातो? तर, इंटरनेटवर क्लिक करून. कंटेंट जितका लज्जास्पद, तितका तो अधिक लोकप्रिय आणि म्हणून तितक्या अधिक क्लिक्स त्याला मिळतात. जितक्या क्लिक्स जास्त, तितक्या अधिक जाहिराती. म्हणजे जाहिरातीतून येणारा पैसासुद्धा अधिक. असे हे दुष्टचक्र आहे. वाचायला शरम वाटावी अशा प्रकारचा कंटेंट आपण जितका अधिक वाचत जातो, तितके अधिक ज्यांची आयुष्ये यात गुंतलेली आहेत त्यांच्याविषयी संवेदनाहीन होत जातो. आणि जितकी आपली संवेदनशीलता कमी होत जाते, तितके आपण असा कंटेंट अधिकाधिक वाचत जातो. या सगळ्या प्रकारात कोणाच्या तरी प्रतिष्ठेचा बळी देऊन, कोणाच्या तरी वैयक्तिक आयुष्यावर आक्रमण करून पैसा कमावला जातो. आपल्या प्रत्येक क्लिकबरोबर आपण एक निवड करीत असतो. आपण सार्वजनिकरीत्या केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या निंदा-नालस्तीचा कंटेंट इंटरनेटवर जितका जास्त टाकत जाऊ, तितके ते अधिकाधिक स्वीकारार्ह होत जाईल.

गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनातून जाणीवपूर्वकरीत्या बाहेर राहिलेल्या स्त्रीचे (म्हणजे माझेच!) भाषण तुम्ही आज ऐकणार आहात. अर्थात आता परिस्थिती बदलली आहे. मी सार्वजनिक जीवनात पुन्हा वावरू लागले आहे. काही महिन्यांपूर्वीच फोर्ब्स कंपनीच्या तीस वर्षांखालील अधिकाऱ्यांसाठी मी माझे पहिले जाहीर व्याख्यान दिले. त्या व्याख्यानाला तीस वर्षांहून कमी वयाचे असे दीड हजार अतिशय हुशार लोक आले होते. याचा अर्थ असा की, जेव्हा 1998 मध्ये (वादग्रस्त कारणामुळे) मी प्रकाशझोतात आले, तेव्हा त्यांच्यापैकी सर्वांत मोठ्या वयाची व्यक्ती केवळ 14 वर्षांची होती, तर सर्वांत छोटी व्यक्ती 4 वर्षे वयाची होती. त्यामुळे मी तिथे विनोदाने असे म्हणाले की, तुमच्यापैकी काही जण मला केवळ माझ्यावरील गाण्यांमुळे ओळखत असतील. याचे तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटायला नको की, माझ्यावर एक-दोन नाही तर तब्बल 40 गाणी रचली गेली.

त्या दिवशी माझ्या भाषणानंतर एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली. भाषणानंतरच्या पार्टीत माझ्यासारख्या 41 वर्षे वयाच्या स्त्रीमध्ये एक 27 वर्षांचा तरुण रस घेत होता. ऐकायला कसे विचित्र वाटते ना? तो खूपच आनंदी आणि उत्साही होता. त्याला पाहून मी मनोमन सुखावले होते. पण तरीही त्याच्या वागण्याला मी काहीही प्रतिसाद दिला नाही. माझ्यावर प्रभाव पडावा म्हणून त्याने आमच्यातील बोलणे सुरू करताना मला काय सांगावे? की, तो मला पुन्हा एकदा मी 22 वर्षे वयाची असल्याची जाणीव करून देईल. त्या पार्टीनंतर रात्री मला असे जाणवले की, चाळिशीच्या वर वय असलेली मी कदाचित एकमेव अशी व्यक्ती असेन की, जिला तिचे वय पुन्हा 22 वर्षे व्हायला नको आहे. तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की, असे का व्हावे? मी 22 वर्षांची असताना माझ्या बॉसच्या प्रेमात पडले. माझ्या त्या प्रेमाचे परिणाम किती दु:खप्रद आणि  वेदनादायी होणार आहेत, हे वयाच्या 24 व्या वर्षी माझ्या लक्षात आले. मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो. इथे जमलेल्या लोकांपैकी कोणी वयाच्या 22 व्या वर्षी अशी चूक केलेली नाही का, की जिचा तुम्हाला पश्चात्ताप होत नाही? जवळपास कोणीच नाही ना! मलाही तेच वाटते. त्यामुळे मी 22 वर्षांची असताना जशी वागले तसे तुमच्यापैकी काही जण वागले असतील, चुकीच्या मार्गाने गेले असतील किंवा चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडले असाल. 

कदाचित तुम्ही तुमच्या बॉसच्यासुद्धा प्रेमात पडले असाल. पण जसा माझा बॉस त्या वेळी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष (बिल क्लिंटन) होता, तसा कदाचित तुमचा बॉस नसेल! आपले आयुष्य हे अशाच आश्चर्यकारक घटनांनी भरलेले असते, नाही का? तेव्हापासून माझ्या आयुष्यातील असा एकही दिवस जात नाही की, ज्या दिवशी मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली जात नाही. आणि माझ्या ‘त्या’ चुकीबद्दल मला खूप पश्चात्तापसुद्धा होतो. सन 1998 मध्ये मी एका बाजूला जशी प्रेमात आकंठ बुडाले होते; तशी त्याच वर्षी दुसऱ्या बाजूला माझ्या या प्रेमामुळे मी यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अशा स्वरूपाच्या राजकीय, कायदेशीर आणि माध्यमविषयक वादळात अडकले. माझे हे प्रेमप्रकरण उघडकीस आले तेव्हा माध्यमे एका डिजिटल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करू लागली होती. या क्रांतीपूर्वी लोकांना बातमी मिळवण्याचे तीनच पर्याय उपलब्ध होते. वर्तमानपत्रे किंवा मासिके वाचणे, रेडिओ ऐकणे आणि टीव्हीवर बातम्या पाहणे. परंतु माझे भाग्य इतके चांगले नव्हते की, माझ्या प्रेमप्रकरणाविषयीच्या बातम्या याच तीन माध्यमांपुरत्या मर्यादित राहतील. उलट, तेव्हा होत असलेल्या डिजिटल क्रांतीमुळे माझे प्रेमप्रकरण लोकांपर्यंत वर्तमानपत्रे, रेडिओ किंवा टीव्ही या तीन माध्यमांद्वारे नाही तर ते डिजिटल माध्यमातून पोचले. डिजिटल क्रांतीचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला हवी ती माहिती आपण हवी तेव्हा, हवी तिथे, आपल्याला हव्या तितक्या प्रमाणात मिळवू शकतो.

जानेवारी 1998 मध्ये माझ्या बॉसबरोबरच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या डिजिटल माध्यमातून बाहेर आल्या. माझी स्टोरी ही अशी पहिली मोठी स्टोरी होती की, जेव्हा बातम्या वाचण्यासाठी पारंपरिक माध्यमांपेक्षा डिजिटल माध्यमाचा वापर प्राधान्याने केला गेला. आणि डिजिटल क्रांतीची ‘रिच’ पाहता, त्या स्टोरीचे जगभर पडसाद उमटले. या प्रकरणामुळे माझे वैयक्तिक आयुष्य पूर्णतः बदलले. वयाच्या 24 व्या वर्षी एका रात्रीमध्ये मी माझे अतिशय वैयक्तिक आयुष्य जगणारी मुलगी न राहता, जगभर जिची निंदानालस्ती केली जात आहे अशी मुलगी बनले. माझी होती नव्हती ती सर्व प्रतिष्ठा एका रात्रीत संपूर्ण जगभरात मातीमोल होऊन गेली. या नव्या तंत्रज्ञानामुळे जसे अनेक फायदे झाले आहेत, तसेच अनेक तोटेही झाले आहेत. मागचा-पुढचा विचार न करता कोणत्याही विषयावर आपले मत झटपट बनवणे, हा असाच एक तोटा आहे. मला त्याचे विलक्षण वाईट परिणाम भोगावे लागले. माझ्यावर, माझ्या चारित्र्यावर चिखलफेक करणारे जमाव तयार झाले. मला हे माहीत आहे की, 1998-99 मध्ये आजच्यासारखे फेसबुक आणि टि्वटर आले नव्हते. पण तेव्हासुद्धा लोक बातम्यांवर ऑनलाईन कॉमेंट्‌स करू शकत होते. आपल्याला हवी ती बातमी ई-मेलद्वारे इतरांना पाठवू शकत होते. अतिशय क्रूर आणि संवेदनाहीन असे विनोद एकमेकांना पाठवू शकत होते.

आपल्या वर्तमानपत्राचा खप व्हावा म्हणून माझे फोटो तेव्हा सर्वत्र छापले गेले. आपले उत्पादन विकले जावे म्हणून जाहिरातींमध्ये माझ्या फोटोंचा वापर केला गेला. लोकांनी टीव्ही पाहत राहावा म्हणूनही माझ्या फोटोंचा वापर झाला. डोक्यावर निळ्या रंगाची हॅट घातलेला माझा त्या वेळेचा फोटो तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल, कदाचित. आता मी हे मान्य करते की, माझ्याकडून चुका झाल्या. त्यापैकी सर्वांत महत्त्वाची चूक म्हणजे, डोक्यावर ती निळ्या रंगाची हॅट घालणे. माझ्या प्रेमप्रकरणामुळे मला ज्या प्रमाणात मत-मतांतरे ऐकावी लागली आणि एकूण फोकस मिळाला, हे त्या काळात तरी ‘न भूतो न भविष्यति’ असेच होते. माझ्यासाठी अतिशय असभ्य भाषेत विशेषणे वापरली गेली. मला वेश्या-गणिका म्हटले गेले. तसेच माझा उल्लेख हेटाळणीपूर्वक ती ‘स्त्री’ असा केला गेला. मला विविध प्रकारे शिव्याशाप देणाऱ्यांपैकी फार कमी जण मला ओळखत होते. लोकांनी मला मुख्यतः इंटरनेटवर पाहिले होते. आता मी हे समजू शकते की, एकूण त्या सर्व वादळी काळात जिच्याविषयी आपण बोलत आहोत ती स्वतःच्या जगण्यावियी काही एक धारणा असलेली स्त्री आहे, तिला तिचे स्वतःचे असे एक मन आहे आणि ती एके काळी अतिशय ताठ मानेने जगणारी स्त्री होती, हे सर्व विसरणे फारच सोपे होते.

सतरा वर्षांपूर्वी माझ्यावर असा शिव्याशापांचा ऑनलाईन भडिमार झाला, तेव्हा लोकांच्या अशा वर्तनाला कोणतेही नाव दिले गेले नव्हते. आता आपण त्याला ‘सायबर विश्वातील दादागिरी’ आणि ‘ऑनलाईन छळ’ या नावांनी ओळखतो. आज मला माझे काही अनुभव तुमच्याशी शेअर करायचे आहेत. माझ्या ‘त्या’ अनुभवांमुळे माझे आपल्या संस्कृतीविषयीचे आकलन कसे बदलत गेले आहे, हे तुम्हाला सांगते. मला अशी आशा आहे की, माझे हे अनुभव ऐकून तुम्हा श्रोत्यांचे वर्तन बदलेल. तुमच्या अशा वर्तनबदलामुळे ऑनलाईन जगाचे बळी ठरलेल्या इतरांना कमी छळ-त्रास भोगावा लागेल. मी माझी प्रतिष्ठा 1998 मध्ये गमावली. परंतु तितकेच नाही, तर मी जवळपास माझे सर्वस्व गमावले. मी माझे आयुष्यसुद्धा अगदी गमावल्यातच जमा होते. मी त्या काळात काय भोगले याचे एक चित्र तुमच्यासमोर मांडते. तो 1998 मधील सप्टेंबर महिना चालू होता. कल्पना करा की, मी खिडकी नसलेल्या एका ऑफिसात, भडक दिव्यांच्या उजेडात बसलेले आहे. माझे प्रेमप्रकरण उघडकीस आल्यानंतरचे ते दिवस होते. मी ज्या सरकारी ऑफिसात बसलेले होते, तिथे मला माझ्याच आवाजातल्या, मला न सांगता रेकॉर्ड केलेल्या टेप्स ऐकाव्या लागत होत्या. तब्बल वीस तासांचे हे रेकॉर्डिंग माझा मित्र म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीने केले होते. 

अमेरिकी कायदेशीर प्रक्रियेनुसार मला स्वतःला त्या सर्व टेप्स ऐकून त्या अधिकृत आहेत की नाहीत, हे सांगायचे होते. आधीच्या आठ महिन्यांत त्या टेप्समध्ये मी काय बोलले आहे याची एक टांगती तलवार सतत माझ्या डोक्यावर होती. आपण एक वर्षापूर्वी काय बोललो, हे कोणाला आठवते? त्या टेप्स ऐकताना मला मेल्याहून मेल्यासारखे होत होते. भीतीची एक भावना दाटून येत होती. मी स्वत:चाच आवाज ऐकत राहते. त्या टेप्समध्ये मी दिवसभराच्या घडामोडी, माझे राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांच्यावरील प्रेम आणि माझा प्रेमभंग याविषयी बोलत असते. माझ्या स्वत:च्याच अनेकविध मूड्‌समधील आवाज मी ऐकत असते. कधी खेळकर तर कधी खट्याळ, कधी क्रूर तर कधी कोणतीही दयामाया न दाखवणारा असे माझे रूप त्या टेप्समधून माझ्यासमोर येते. माझ्या स्वतःच्या सर्वांत वाईट अशा स्वरूपाला (असे रूप ज्याची माझी मलाच ओळख पटत नाही) सामोरे जाताना मला आता खोलवर प्रचंड शरमेची भावना दाटून येत असते. त्यानंतर काहीच दिवसांनी माझ्या प्रेमप्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या स्टार समितीचा अहवाल अमेरिकी काँग्रेसला सदर केला जातो. माझे ते चोरलेले शब्द (म्हणजे त्या टेप्समधील संभाषण) त्या अहवालामध्ये असतात. आतापर्यंत लोक ते संवाद वाचू शकत होते, हीच एक भयानक गोष्ट होती. पण ते प्रकरण इथेच थांबले नाही. या टेप्स काही दिवसांनी टीव्हीवर ऐकवल्या गेल्या. त्यांचा बराचसा भाग ऑनलाईनही उपलब्ध झाला. हा असा सार्वजनिकरीत्या होणारा माझा छळ अतिशय त्रासदायक होता. 

आयुष्य अक्षरशः सहन करता न यावे असे झाले होते. लोकांचे खासगी संभाषण रेकॉर्ड करणे, त्यांच्या कृतींचा त्यांना न सांगता माग ठेवणे- लोकांचे फोटो आणि संभाषण कोणतेही संदर्भ न देता, कोणतीही परवानगी न घेता, कोणतीही सहानुभूती न दाखवता प्रकाशात आणणे असे प्रकार आता नेहमीच होताना दिसतात. लोकांनी चुका केल्या असोत किंवा नसोत, असे लोक सार्वजनिकरीत्या वावरणारे असोत किंवा नसोत माझ्यासारखे प्रसंग आता नेहमीच घडत असतात. या सगळ्याचे काही जणांच्या आयुष्यावर फारच भीषण परिणाम होत असतात. मात्र 1998 मध्ये असे प्रकार होणे तसे दुर्मिळ होते. आता तुम्हाला एक 2010 मधील प्रसंग सांगते. मधे 12 वर्षे गेली होती. दरम्यानच्या काळात सोशल मीडियाचा अफाट प्रसार झाला होता. सप्टेंबर 2010 मध्ये मी माझ्या आईशी फोनवर बोलत होते. आम्ही अमेरिकेतील युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या एका तरुण मुलाविषयी बोलत होतो. टायलर क्लेमेंटी नावाच्या या मुलाने आत्महत्या केली होती. अतिशय गोड, संवेदनशील आणि सर्जनशील असा हा मुलगा होता. दुसऱ्या एका मुलाशी शरीरसंबंध करीत असताना त्याच्या या कृतीचे गुप्तपणे ‘व्हिडिओ फिल्मिंग’ झाले होते.

जेव्हा ऑनलाईन विश्वाला हे कळले; तेव्हा त्याची खूप अपमानास्पद पद्धतीने मजा उडवली गेली, त्याचा सायबर विश्वात सर्व प्रकारे छळ झाला. ही व्हिडिओ टेप ऑनलाईन आल्यानंतर काहीच दिवसांत टायलरने एका पुलावरून उडी मारली आणि आत्महत्या केली. तेव्हा तो फक्त 18 वर्षांचा होता. टायलरचे जे काही झाले त्यामुळे आणि त्याच्या कुटुंबावर ओढवलेल्या आपत्तीमुळे माझ्या आईला फारच दु:ख झाले होते. मात्र तिला इतके दु:ख का झाले आहे, हे मला समजू शकत नव्हते. काही काळाने माझ्या लक्षात आले की, ती हा अनुभव 1998 च्या घटनांशी रिलेट करीत होती. ती तो काळ पुन्हा एकदा जगत होती. 1998 च्या त्या भीषण दिवसांत ती रोज रात्री माझ्या उशाशी बसून राहत असे. मी अंघोळ करताना बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवायला मला ती सांगत असे. हे सगळे करण्यामागील हेतू हा की, माझ्या आई-वडिलांना अशी भीती वाटत असे की, माझी इतकी कुचेष्टा झाली होती की मला ती सहन होणार नाही आणि मी आत्महत्या करेन. सध्याच्या काळात मात्र अनेक पालकांना असे करणे शक्य झालेले नाही. अनेकांना आपल्या मुलाच्या मानसिक संघर्षाविषयी आणि अपमानाविषयी कळते, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. टायलरसारख्या मुलाचा दु:खद आणि कारण नसताना झालेला मृत्यू हा माझ्यासाठी टर्निंग पॉइंट होता. त्याच्या मृत्यूमुळे मी माझ्याबाबत झालेल्या घटनांचा पुन्हा अर्थ लावू लागले आणि मला एक वेगळेच चित्र दिसू लागले.

1998 मध्ये इंटरनेट नावाचे तंत्रज्ञान काय करणार आहे याची आपल्याला काहीही कल्पना नव्हती. मात्र त्यानंतर आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा पद्धतीने इंटरनेटमुळे लोक एकमेकांना जोडले गेले. अनेकांना आपल्या जुन्या भावंडांशी पुन्हा जोडून घेता आले, लोकांची आयुष्ये वाचवण्यात इंटरनेटचा उपयोग झाला. इंटरनेटमुळे अरब देशांत क्रांत्या घडून आल्या. परंतु दुसऱ्या बाजूला इंटरनेटवर सायबर छळवणूक आणि व्यक्तिगत बदनामीचे एक काळोखे जगसुद्धा बहरले. इंटरनेटवर अनेक लोक छळ आणि शिव्याशाप यांची शिकार रोज बनतात. त्यामध्ये तरुण मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. ही तरुण मुले मानसिकरीत्या पुरेशी विकसित झालेली नसतात. त्यामुळे सायबर शिव्याशापांचा मुकाबला कसा करायचा, हे कळत नसलेली ही मुले असतात. त्यांच्यावर होणारा हा वर्षाव इतका जास्त असतो की, उद्याचा दिवस जगावं की जगू नये, असे प्रश्न त्यांना त्यातून पडू शकतात. त्यापैकी अनेक जण आत्महत्या करतात. इंटरनेटचे हे जग आभासी असले तरी या आत्महत्यांमध्ये काहीही आभासी नाही.

‘चाइल्ड लाईन’ नावाची ब्रिटनमधील एक स्वयंसेवी संस्था मुलांशी संबंधित प्रश्नांवर काम करते. गेल्या वर्षी त्यांनी एक धक्कादायक आकडेवारी सादर केली होती. सन 2012 ते 201 या काळात सायबर छळवणुकीशी संबंधित कॉल्स आणि इ-मेल्स यामध्ये तब्बल 87 टक्क्यांनी वाढ झाली होती. हॉलंडचे उदाहरण घेतले तर असे दिसून येते की, पहिल्यांदाच सायबर छळामुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण हे इतर छळामुळे केल्या जाणाऱ्या आत्महत्यांपेक्षा बरेच जास्त आहे. याहून अधिक धक्कादायक बाब ही की, दुसऱ्या एका संशोधनानुसार, आनंद किंवा रागापेक्षा ‘शरम’ ही भावना मनाला फार जास्त तीव्रतेने जाणवते. खरे तर मला याचे आश्चर्य वाटायला नको होते, पण तसे वाटले खरे. माणसांनी इतरांबाबत क्रूरतेने वागणे यात नवे काही नाही. परंतु तंत्रज्ञानाचा वापर करून जाणीवपूर्वक केली जाणारी निंदा-नालस्ती ही जास्त तीव्र, कोणतीही बंधने न घालता केलेली आणि कायम पाहता येईल अशी असते. पूर्वीच्या काळी तुमच्या लज्जास्पद, शरमदायक कृत्यांचे पडसाद तुमचे घर, गाव, शाळा किंवा तुमचा समाज इतपतच मर्यादित राहत असे. यामध्ये आता ऑनलाईन समूहांचा समावेश झालेला आहे. लाखो लोक स्वतःची ओळखसुद्धा न सांगता तुमच्यावर शाब्दिक प्रहार करू शकतात. तुम्हाला दिलेले हे शिव्याशाप कोणी पाहावेत, याला इंटरनेटवर काहीही बंधन नसते. त्यामुळे त्यातून येणारे दु:ख जास्त वेदनादायी असते. सार्वजनिकरीत्या वाटणाऱ्या शरमेची खूप वैयक्तिक अशी एक किंमत असते. इंटरनेटमुळे ती किंमत आता खूपच वाढली आहे.

गेली दोन दशके आपण शरम आणि सार्वजनिक स्तरावर केला गेलेला अपमान यांची बीजे आपल्या संस्कृतीत रोवली आहेत. यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या माध्यमांचा समावेश होतो. प्रसिद्ध व्यक्तींच्या मागे फोटोसाठी धावणारे फोटोग्राफर्स, वेगवेगळ्या प्रकारचे रिॲलिटी शोज, राजकारण, बातम्या देणारी वेबसाईट्‌स आणि काही वेळा इंटरनेटवर हॅक करणारे हॅकर्स असे सर्व जण यात निर्लज्जपणे सहभागी आहेत. याचा परिणाम असा झाला की, ऑनलाईन माध्यमात एक संवेदनाहीन असे वातावरण तयार झाले आहे; ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक टार्गेट करणे, व्यक्तींच्या खासगी स्पेसवर आक्रमण करणे, सायबरविेशातील छळवणूक करणे असे सर्व प्रकार चालून जातात. त्याच्यामुळे प्राध्यापक निकोलस मिल्स ज्याला लज्जेची-शरमेची-निंदेची ‘संस्कृती’ म्हणतात त्यात आपण सध्या वावरत आहोत. गेल्या सहा महिन्यांतील काही उदाहरणे हा मुद्दा समजून घ्यायला पुरेशी आहेत. ‘स्नॅपचॅट’ नावाची एक ऑनलाईन सेवा आहे. ही सेवा तरुणाई मुख्यतः वापरते. त्यांचा असा दावा आहे की, ‘स्नॅपचॅट’वरील मेसेजेसचे आयुष्य काही सेकंदांचेच असते. अशा कमी आयुष्यामुळे तिथे येणाऱ्या कंटेंटची तुम्ही कल्पना करू शकता. स्नॅपचॅटचा डेटा सेव्ह करावा यासाठी स्नॅपचॅट एका बाहेरील कंपनीची मदत घेत होती. त्या कंपनीवर हॅकर्सनी हल्ला केला आणि एक लाख वैयक्तिक संभाषणे, फोटो आणि व्हिडिओ ऑनलाईन टाकले गेले. आता त्या कंटेंटला इंटरनेटवरून पुसून टाकणे कधीही शक्य होणार नाही. 

जेनिफर लॉरेन्स व इतर अनेक अभिनेत्यांचे ‘आयक्लाऊड’ या वेबसाईटवरील अकाउंट हॅक केले गेले, आणि तेथे असलेले त्यांचे खासगी, नग्न असे फोटोज त्यांची परवानगी न घेता इंटरनेटवर टाकले गेले. गॉसिपवर चालणाऱ्या वेबसाईटवरील एका स्टोरीला तब्बल पन्नास लाख लोक बघून गेले होते. आणि सोनी पिक्चर्स कंपनीच्या सायबर हॅकिंगविषयी काय सांगावे? त्या हॅकिंगमधून प्रकाशित केल्या गेलेल्या ई-मेल्सपैकी ज्यांमधून सर्वाधिक जास्त अपमान-शरम उत्पन्न होऊ शकेल, अशा ई-मेल्सवर लोकांच्या उड्या पडल्या होत्या. अशा या लज्जासंस्कृतीमध्ये सार्वजनिकरीत्या निंदा-नालस्ती करण्याला एक वेगळ्या प्रकारची किंमत जोडली गेलेली आहे. ज्यांच्यावर चिखलफेक केली जाते अशी टायलरसारखी मुले, स्त्रिया, अल्पसंख्य समूह आणि समलिंगी व्यक्ती यांचा विचार ही किंमत मोजताना केला जात नाही; अशा चिखलफेकीतून ज्यांचा फायदा होतो, त्यांचा मात्र नक्कीच विचार केला जातो. इथे इतरांच्या वैयक्तिक जीवनावर आक्रमण करून कच्चा माल मिळवला जातो. त्या कच्च्या मालाचा वापर अतिशय निर्दयीपणे व उत्पादक पद्धतीने केला जातो आणि शेवटी त्याचीच विक्री करून त्यावर नफा कमावला जातो. सार्वजनिकरीत्या होणारी निंदा-नालस्तीची विक्री होऊ शकेल, असे एक मार्केट आता तयार झाले आहे.

शरम आणि लज्जा यांचासुद्धा एक उद्योग तयार झाला आहे. इथे पैसा कसा मिळवला जातो? तर, इंटरनेटवर क्लिक करून. कंटेंट जितका लज्जास्पद, तितका तो अधिक लोकप्रिय आणि म्हणून तितक्या अधिक क्लिक्स त्याला मिळतात. जितक्या क्लिक्स जास्त, तितक्या अधिक जाहिराती. म्हणजे जाहिरातीतून येणारा पैसासुद्धा अधिक. असे हे दुष्टचक्र आहे. वाचायला शरम वाटावी अशा प्रकारचा कंटेंट आपण जितका अधिक वाचत जातो, तितके अधिक ज्यांची आयुष्ये यात गुंतलेली आहेत त्यांच्याविषयी संवेदनाहीन होत जातो. आणि जितकी आपली संवेदनशीलता कमी होत जाते, तितके आपण असा कंटेंट अधिकाधिक वाचत जातो. या सगळ्या प्रकारात कोणाच्या तरी प्रतिष्ठेचा बळी देऊन, कोणाच्या तरी वैयक्तिक आयुष्यावर आक्रमण करून पैसा कमावला जातो. आपल्या प्रत्येक क्लिकबरोबर आपण एक निवड करीत असतो. आपण सार्वजनिकरीत्या केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या निंदा-नालस्तीचा कंटेंट इंटरनेटवर जितका जास्त टाकत जाऊ, तितके ते अधिकाधिक स्वीकारार्ह होत जाईल. त्याचबरोबर सायबर छळवणूक, एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक टार्गेट करणे, ऑनलाईन छळ, हॅकिंग यांचे प्रमाण वाढत जाईल. असे का होईल? तर, या सगळ्याच्या मुळाशी ‘शरम’ हा घटक केंद्रस्थानी आहे. आपण जी संस्कृती तयार केली आहे, त्याची ही वरवरची लक्षणे आहेत. कोणत्याही प्रकारचे वर्तन बदलायचे असेल, तर आधी आपल्याला त्यामागील मनाच्या धारणा बदलाव्या लागतात. वंशवाद, समलैंगिक व्यक्तींबाबत केला जाणारा भेदभाव आणि इतर अनेक भेदाभेद याबाबत आपण हे पाहिले आहे. 

समलैंगिक विवाहांबाबत आपण आपल्या धारणा जसजशा बदलल्या, तसतसे अधिकाधिक लोकांना समान स्वातंत्र्याचा उपभोग घेता येणे शक्य झाले. जेव्हा आपण पर्यावरणीय संवर्धनाला महत्त्व देऊ लागलो, तेव्हा अधिकाधिक लोक रिसायकल करू लागले. त्यामुळे जसजसे आपण आपल्या सार्वजनिक निंदा- नालस्तीबाबतच्या संस्कृतीचा विचार करू तसतसे आपल्याला लक्षात येते की, आपल्याला एका सांस्कृतिक क्रांतीची गरज आहे. सार्वजनिकरीत्या होणाऱ्या निंदा- नालस्तीकडे आपण खेळ म्हणून पाहणे थांबवायला हवे. इंटरनेट आणि आपली संस्कृती अशा दोन्ही ठिकाणी आपण हस्तक्षेप करायची गरज आहे. मला वाटते की, अतिशय साध्या-साध्या गोष्टी केल्याने यात बदल होऊ शकतात. पण अर्थात ते करणे सोपे नाही. आपण सर्वांनी दीर्घ काळ ज्यांना किंमत दिली, अशा ‘सहानुभूती आणि अनुकंपा’ या मूल्यांकडे परत जाण्याची गरज आहे. आपण ऑनलाईन असतो, तेव्हा तिथे आपल्या वर्तनात सहानुभूतीचा अभाव दिसून येतो. ब्रेन ब्राऊन या संशोधकाच्या मते, ‘सहानुभूतीपुढे शरमेचा टिकाव लागत नाही.’ मी माझ्या आयुष्यातसुद्धा काही फार काळेकुट्ट दिवस पाहिले आहेत. पण माझे कुटुंबीय, मित्रपरिवार, व्यावसायिक आणि काही वेळा अगदी अनोळखी व्यक्तींकडूनही मला सहानुभूती मिळाली. या सहानुभूतीमुळेच मी त्या दिवसांत टिकाव धरू शकले. अगदी एका व्यक्तीकडून मिळालेल्या सहानुभूतीचासुद्धा फार मोठा परिणाम घडू शकतो. छोट्या समूहांनी सातत्याने एखादी कृती केली, तर बदल घडू शकतो. 

ऑनलाईन जगात आपल्या वर्तनाने असा बदल घडवून आणू शकतो. आपण केवळ ज्यांची शिकार झाली आहे अशा व्यक्तींना सहानुभूती देणे इतक्यापुरतेच मर्यादित न राहता, आपण त्या व्यक्तीविषयी चांगल्या पॉझिटिव्ह कॉमेंट्‌स करू शकतो किंवा एखाद्या प्रकरणाची तक्रार करू शकतो. माझ्यावर विश्वास ठेवा सहानुभूतीपूर्ण कॉमेंट्‌समुळे नकारात्मकता कमी होते. आपण या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना मदत करू शकतो. अमेरिकेत टायलर क्लेमेंटी फाउंडेशन आहे, ब्रिटनमध्ये सायबर छळवणुकीविरुद्ध काम करणाऱ्या संघटना आहेत, ऑस्ट्रेलियात प्रोजेक्ट रॉकीट आहे. आपण आपल्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याची खूप चर्चा करतो, मात्र त्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीचे भान ठेवत नाही. आपल्याला प्रत्येकाला आपले म्हणणे ऐकायला कोणी तरी श्रोता हवा असतो. मात्र काही चांगल्या हेतूने बोलणे आणि इतर काही हेतूसाठी (उदा. मुद्दाम लक्ष वेधून घेण्यासाठी) बोलणे यात फरक असतो. इंटरनेट हा एक सुपर हायवे आहे. इतरांना सहानुभूती दाखवणे हे आपल्या सर्वांसाठी फायद्याचे असू शकते आणि त्यातूनच एक सुरक्षित व चांगले जग तयार होऊ शकते. आपण एकमेकांशी ऑनलाईन संवाद साधताना, बातम्या वाचताना, कशावरही क्लिक करताना सहानुभूती बाळगायला हवी. इतरांच्या जागी स्वतःला ठेवून पाहा कधी तरी.

वैयक्तिक प्रसंग सांगून मी या भाषणाचा शेवट करते. गेल्या नऊ महिन्यांत मला असा प्रश्न अनेकदा विचारला गेला की, मी आताच का भाषणे करू लागले आहे? माझे जुने बॉस बिल क्लिंटन यांची पत्नी हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून स्पर्धेत येणे याचा आणि मी सक्रिय होण्याचा काही संबंध आहे का? नाही. तर मग मी आताच का अशी एकदम सक्रिय झाले? मी सक्रिय होण्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. या प्रश्नाचे एकच उत्तर असू शकते आणि ते म्हणजे, या विषयावर बोलायची वेळ आली आहे. मी स्वतःचा नरेटिव्ह स्वतःच सेट केला पाहिजे. माझ्या या कृतीमधून केवळ स्वतःला वाचवणे इतकाच हेतू नाही. जे कोणी इंटरनेटवर केल्या जाणाऱ्या सार्वजनिक निंदा-नालस्तीला किंवा सायबर छळवणुकीला बळी पडले असतील, त्यांनी एक गोष्ट समजून घ्यायला हवी. ती म्हणजे, तुम्ही या सगळ्याला पचवून जगू शकता. असे जगणे सोपे नसेल, पटकन होणारे नसेल, मात्र तुम्ही स्वतःच्या स्टोरीला काही तरी वेगळा शेवट असावा, असा आग्रह नक्कीच धरू शकता. स्वतःसाठी सहानुभूती ठेवा. लक्षात ठेवा की, आपणा सगळ्यांनाच ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही जगात जगण्यासाठी सहानुभूतीची गरज असते. 

(अनुवाद : संकल्प गुर्जर)

(2015 मध्ये ‘टेड टॉक’ मालिकेत ‘प्राईस ऑफ शेम’ या विषयावर केलेले हे भाषण आहे.)        

Tags: बिल क्लिंटन मोनिका लेवेन्स्की प्राईज ऑफ शेम ब्रेन ब्राऊन संकल्प गुर्जर sankalp gurjar digital era brene brown Bill Clinton ‎Lewinsky scandal monica Lewinsky prise of shame ted talk weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी