डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मासिकांच्या सुवर्णकाळाचे बिनीचे शिलेदार

एकंदरीतच अनेकांना नव्या, समानतेवर आधारित समाजाची स्वप्नं पडत होती. सामाजिक बदल घडू शकतो असा दुर्दम्य आशावाद होता आणि त्यातूनच आलेलं रसरशीत चैतन्य होतं. मुकुंदराव आणि ते संपादित करत असलेली मासिकं यांनी या काळाचं सोनं केलं. या मासिकांची नाळ या बदलांशी घट्टपणे जोडली गेली. सर्व अर्थानं आधुनिक संपादकीय दृष्टी त्यांच्याकडे होती. समर्थपणे ही जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यांचं हे योगदान मोठं आहे, कारण मासिकांच्या सुवर्णकाळातले ते बिनीचे शिलेदार होते. आजच्या काळात त्यांच्या पद्धतीची पत्रकारिता भले ‘इतिहासजमा’ झाली असेलही, पण पत्रकारांना आणि समाजालाही त्यातून प्रेरणा मिळाली, उर्जा मिळाली हे कसं विसरून चालेल?   

सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत कुणालाही हेवा वाटावा असा महाराष्ट्राचा पुरोगामी, चळवळ्या, सुसंस्कृत (आणि स्मार्टसुद्धा) चेहरा जोमानं आकार घेत होता. त्या चेहऱ्याचं ठसठशीत प्रतिबिंब उमटलं ते ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’ आणि ‘मनोहर’ या मासिकांत. नुसतं प्रतिबिंबच नव्हे तर या घडणीत मासिकांचाही सक्रीय सहभाग होता. समाजातल्या जोमदार प्रवाहांना एकत्र आणून त्याला व्यासपीठ देण्याचं, दमदार आवाज आणि पाठिंबा देण्याचं ऐतिहासिक काम या मासिकांनी केलं. समाजाची साहित्यिक, सांस्कृतिक अभिरुची घडवली. (अनिल अवचट, अरुण लिमये, निळू दामले, लक्ष्मण माने, जयंत नारळीकर, नरेंद्र दाभोलकर, मुकुंद टाकसाळे, भारत सासणे, गौरी देशपांडे, आशा बगे, सानिया, नरेंद्र चपळगांवकर अशी त्यावेळी ताज्या दमानं लिहिणाऱ्या कितीतरी लेखकांची नावं सहज आठवतात. ही यादी खरं तर खूप मोठी आहे आणि नामवंतांचीही आहे.) आधुनिक काळातली व्यक्तिस्वातंत्र्यासारखी मूल्यं या मासिकांनी रुजवली. ही मासिकं विकत घेऊन वाचणं, त्यावर चर्चा करणं, वाद घालणं ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे आणि या सगळ्याचं नेतृत्व करत होते शंकरभाऊंचा सुधारकी वारसा लाभलेले मुकुंदराव किर्लोस्कर. मुकुंदरावांचा अफाट उत्साह, माणसांना सांभाळण्याची आणि त्यांना लिहिते करण्याची हातोटी, मासिकांवर असलेलं त्यांचं अतोनात प्रेम आणि जिवंत, नवे काही घडवण्याची उमेद असलेला तो रसरशीत काळ यांचं ते सुंदर मिश्रण होतं.

मी या मासिकांच्या संपादन विभागात 1979 च्या आसपास सामील झाले तेव्हा कोणत्याही मराठी दैनिकापेक्षा ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ यांना अधिक ग्लॅर होतं, मुकुंदरावांचा दबदबा होता. ते निवृत्त होण्यापूर्वीचा एक दीड वर्षांचाच हा काळ पण मुकुंदरावांची कार्यपद्धती, लकबी, बलस्थानं यांची पुरेपूर ओळख करून देणारा. नारळीच्या झाडांनी वेढलेल्या आणि डुलणारी शेतं असणाऱ्या रम्य मुकुंदनगर परिसरात हे ऑफिस होतं. त्या काळात कोणत्याही मराठी संपादकाला नसेल अशी भव्य केबिन, मोठं टेबल आणि त्यांची ती ऐटबाज खुर्ची! केबिनच्या एका बाजूला पाहुण्यांना बसायला किंवा संपादकीय बैठकींसाठी कोच. हा सगळा बाज दबकवायला लावणारा असला तरी मुकुंदरावांचं दिलखुलास बोलणं आणि मोकळं हसणं यानं समोरचा पाहुणा सैलावायचा. मुकुंदराव झरझर चालत. एकंदरीतच त्यांच्या हालचाली चपळ होत्या. कार्यक्रमात ते उत्साहानं फोटो काढताना दिसत. (वयाची 85 ओलांडली तरी त्यांचं हा उत्साह टिकून होता.) काढलेल्या फोटोचं भेटकार्ड करून ते संबधितांना पाठवून देत. कुठे कुणाचा लेख वाचला की पत्र पाठवून दाद देत. समोर बसलेला त्यांना काही सांगत असेल तर पराकोटीची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची. (मराठी मासिकांच्या संपादकांध्ये हा गुण एकूणात दुर्मिळच!)

या मासिकांध्ये लेखकांना सन्मानाची वागणूक मिळायची. किंवा खरं तर लेखकांचे लाडच व्हायचे. मुकुंदराव लेखकांना मित्रासारखीच वागणूक द्यायचे. लेखकाचा अहंकार सुखावेल असं एकंदरीत वातावरण असायचं. शांताबाई किर्लोस्कर, विद्या बाळ, दत्ता सराफ, ह.मो.मराठे या संपादकांचाही असं वातावरण तयार करण्यात मोठा वाटा होता. पत्रकारितेत कम्प्युटर आणि इमेल यांचा शिरकाव होण्यापूर्वीचा हा काळ. माहिती सहज मिळायची नाही. (एवढंच काय, फोनसुद्धा निवडक भाग्यवंतांच्या घरी असायचे).  अशावेळी बऱ्याच मासिकांचा भर हा भाषांतरावर किंवा फक्त विश्लेषणात्मक लेख यावर असायचा. ‘किर्लोस्कर’मध्ये मात्र थेट त्या ठिकाणी जाऊन लिहिलेला वृतांत असे. लेखकांना प्रवासासाठी व इतर खर्चासाठी आगाऊ पैसे देऊन लेख मागवणं ही त्या काळातली दुर्मिळ गोष्ट मुकुंदराव सहजी करायचे. निळू दामले, अनिल अवचट यांचे असे लिहिलेले अनेक लेख गाजले..

मुकुंदरावांचा अफाट जनसंपर्क होता. त्याचा मासिकांना फायदा होत असे. एक उदाहरण आठवतं. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला परदेश दौरा होता. लंडनमधला या नाटकाचा प्रयोग तुफान गाजला. मुकुंदरावांनी आधीच लंडनमधील आपल्या स्नेह्यांना लेख लिहिण्याविषयी सांगितलं होतं. फोटोसह लेख तयार झाला. विशेष म्हणजे ताबडतोब विमानाने (एअरमेलने नव्हे, थेट विमानानेच) तो इकडे येण्यासाठी त्यांचीच कुठली तरी एअर इंडियामधील ओळख कामी आली. दैनिकात दौऱ्याच्या बातम्यासुद्धा येण्याच्या अगोदर हा लेख स-फोटो ‘किर्लोस्कर’च्या दिवाळी अंकात झळकला. गंमत म्हणजे हा लेख प्रसिद्ध झाला तेंव्हा नाटकाचा दौरा भारतात परत आलेला नव्हता. कलाकारांनाही इथे आल्यावर हा सुखद धक्का होता. तो काळ लक्षात घेतला तर हे सारं किती अवघड होतं हे लक्षात येईल. मुकुंदरावांनी हे घडवून आणलं. लेखकांनाही या मासिकांविषयी प्रेम असे. वाचकांना विश्वासात घेणं, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी छापील शब्दांबाहेर जाऊन संपर्क ठेवणं यालाही मुकुंदरावांनी महत्त्व दिलं. मोठ्या दिमाखात होणारे ‘किर्लोस्कर’चे लेखक-वाचक मेळावे अनेकांना आठवत असतील. ‘स्त्री’ मासिकाशी जोडलेलं स्त्री-सखी मंडळ हे त्याचं आणखी एक उदाहरण.

असाच 1980 साली ‘स्त्री’ मासिकाचा सुवर्णहोत्सव पुण्यात साजरा झाला. आधी दोन दिवस  लेखक मेळावा आणि तिसऱ्या दिवशी बालगंधर्व रंगमंदिरात जाहीर कार्यक्रम असं त्याचं भरगच्च स्वरूप होतं. साहजिकच भरपूर तयारी करावी लागणार होती. अशा कार्यक्रमांसाठी किती बारकाईने म्हणजे अगदी टेबलावरच्या तांब्या-भांड्यात पाणी आहे ना इथपासून गोष्टी कशा बघाव्या लागतात त्याचा वस्तुपाठच मुकुंदरावांच्या नेतृत्वाखाली मला उमेदवारीच्या काळात मिळाला. त्यांचं एक वाक्य अजून लक्षात आहे- आणि ते सतत पुढेही उपयोगी पडलं. ते म्हणायचे, ‘सगळं कसं शांतपणे, जणू काही फार श्रम न घेता पार पडतंय असं बघणाऱ्याला वाटलं की समजावं, आपण सगळी कामे वेळच्यावेळी नीट केली आहेत. याउलट जर तुम्ही सतत धावपळीत आहात आणि खूप कष्ट करताय असं बघणाऱ्याला वाटत असेल तर त्याचा अर्थ नियोजनपूर्वक गोष्टी घडलेल्या नाहीत आणि शेवटी पळापळ चालू आहे.’ पत्रकारितेतल्या आणि बाहेरच्याही अशा अनेक गोष्टी माझ्यासारख्या अनेकांना तिथे शिकायला मिळाल्या.

आपले संपादकीय सहकारी बदलत्या काळाबरोबर असावेत, त्यांनी नव्या गोष्टी माहीत करून घ्याव्यात यासाठी मुकुंदराव प्रयत्नशील असत. आपल्या संपादकांनी ओळखीच्या लोकांचं आणि अनुभवांचं वर्तुळ वाढवावं असं त्यांना वाटे. बाहेरगावच्या चर्चा-परिसंवादाना जाणं, कार्यशाळांना उपस्थित राहणं याला ते प्रोत्साहन देत. त्याचबरोबर कुणीही प्रतिष्ठित, किंवा बातम्यांमधील व्यक्ती पुण्यात येणार असेल तर त्यांना किर्लोस्कर प्रेसमध्ये बोलावलं जाई. त्यांच्याबरोबर संपादकखात्याचा गप्पांचा/चर्चेचा कार्यक्रम आखला जाई. मुकुंदराव त्यांना एकटे कधीही भेटू शकत होतेच, पण आपल्या सर्व वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांनाही ही संधी मिळावी असं त्यांना वाटत असे. मग ते ‘इंडिया टुडे’चे त्यावेळचे कार्यकारी व्यवस्थापक छोटू कराडीया असोत की परदेशातल्या भारतीय दूतावासातले सुधीर देवरे! नुकतेच सुरू झालेलं ‘इंडिया टुडे’ त्यावेळी प्रचंड फॉर्मात होतं. पत्रकारितेतील नियतकालिक हा प्रकार एका वेगळ्या वेगवान वळणावर पोचला होता. त्यावेळी छोटू कराडीयांना प्रत्यक्ष भेटणं, त्यांच्याच तोंडून अनेक गोष्टी ऐकणं, त्यांना प्रश्न विचारता येणं ही अप्रूपाची गोष्ट होती. नंतरच्या काही दिवसांत तर संपादक मंडळानं दर आठवड्यात एकत्र यायचं- आपण वाचलेलं नवं पुस्तक, बघितलेला चित्रपट किवा एखादं प्रदर्शन, ऐकलेला परिसंवाद किंवा भेटलेली एखादी व्यक्ती याविषयी बोलायचं. अनुभवांची देवाणघेवाण करायची असा कार्यक्रम असे. पुढे अनेक ठिकाणचे अनुभव मी घेतले मात्र इतकं समृद्ध, सर्वांना सामावून घेणारं आणि त्याचबरोबर तुम्हाला जागरूक ठेवणारं वातावरण पुढे या पद्धतीने कुठे वाट्याला आलं नाही.

मुकुंदरावांनी काही प्रथा इथे नीट रुजवलेल्या होत्या. लेखकांशी सतत संपर्क ठेवणं, आलेल्या प्रत्येक पत्राला उत्तरं देणं, लेख/कथा नाकारली असेल तर तेही गोड शब्दात कळवणं, नेहमीचा लेखक असेल तर का छापू शकत नाही याची कारणे देणं इत्यादी. मुकुंदराव मालक असले तरी पहिले हाडाचे संपादक होते, त्यामुळे त्यांना मालक- संपादकांच्या (विशेषतः अलीकडच्या) रांगेत न बसवलेलेच बरे!

मुकुंदराव गेले. ते ज्या पद्धतीची पत्रकारिता करत होते ती तर आता कधीची लोप पावली आहे. जाहिरातदारांच्या, मालदारांच्या पगड्याखाली बाजारहिताला प्राधान्य देण्याच्या आजच्या काळात सगळंच बदललं आहे. जनहित, सामान्य वाचकांशी बांधिलकी या शब्दांना तसाही अर्थ उरलेला नाही. पत्रकारितेतील ही पडझड माझ्यासारख्या अनेकांनी अनुभवली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मुकुंदरावांचा काळ आणि त्यातलं त्यांचं काम दोन्ही लख्ख उठून दिसतं. भरपूर वाचकवर्ग, प्रचंड संख्येनं छापल्या जाणाऱ्या प्रती, देशी- परदेशी मराठी माणसांवरचा त्याचा पगडा आणि तरीही समाजाशी- वाचकांशी पहिली बांधिलकी हे दुर्मिळ मिश्रण मुकुंदराव संपादित करत असलेल्या मासिकांध्ये होते. सुरुवातीला वर्णन केलेला महाराष्ट्रातला तो काळही अतिशय ‘व्हायब्रन्ट’ होता. अनेक सामाजिक-राजकीय चळवळी जो धरत होत्या. युक्रांद, दलित पँथर, विषमता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, मुस्लिम सत्यशोधक, स्त्री मुक्ती... कितीतरी! तेंडुलकरांची नाटकं गाजत होती. ‘थिएटर अकादमी’ नवे प्रयोग करत होती. स्त्री-मुक्ती चळवळ ‘स्त्री’ मासिकाशी जोडली जात होती. विद्या बाळ यांच्यासारखं नेतृत्व तिथे होतं. साहित्यामध्ये बंडखोर प्रवाह येत होते. अशोक शहाणे यांनी ‘मराठी साहित्यावर क्ष किरण’ हा साहित्याचा पंचनामा करणारा लेख ‘किर्लोस्कर’मध्ये लिहिला आणि त्यावर एवढे वादंग उठले की आत्ता-आत्तापर्यंत त्याचे पडसाद उमटत होते.

एकंदरीतच अनेकांना नव्या, समानतेवर आधारित समाजाची स्वप्नं पडत होती. सामाजिक बदल घडू शकतो असा दुर्दम्य आशावाद होता आणि त्यातूनच आलेलं रसरशीत चैतन्य होतं. मुकुंदराव आणि ते संपादित करत असलेली मासिकं यांनी या काळाचं सोनं केलं. या मासिकांची नाळ या बदलांशी घट्टपणे जोडली गेली. सर्व अर्थानं आधुनिक संपादकीय दृष्टी त्यांच्याकडे होती. समर्थपणे ही जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यांचं हे योगदान मोठं आहे, कारण मासिकांच्या सुवर्णकाळातले ते बिनीचे शिलेदार होते. आजच्या काळात त्यांच्या पद्धतीची पत्रकारिता भले ‘इतिहासजमा’ झाली असेलही, पण पत्रकारांना आणि समाजालाही त्यातून प्रेरणा मिळाली, उर्जा मिळाली हे कसं विसरून चालेल?

Tags: किर्लोस्कर मनोहर स्त्री मुकुंदराव किर्लोस्कर संध्या टाकसाळे विजय तेंडुलकर पत्रकार संपादक घाशिराम कोतवाल मासिक Vijay Tendulkar Journalist Sampadak Ghashiram Kotwal Masik Kirloskar Manohar Stri Mukundrao Kirloskar Sandhya Taksale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके