डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

म्हातारा डफळ्या आजा बंदुक्याकडं कौतुकानं पाहात होता. माळ अंधाराच्या ग्लानीत सुस्त पडला होता. मध्यरात्री कुणाच्या तरी आवाजानं बंदुक्याला जाग आली. डफळ्या आजाबरोबर कोणतरी बोलत होतं. आवाज ओळखीचा होता. बंदुक्या कान देऊन ऐकू लागला. ओळखीचा आवाज म्हणत होता - ‘दोघंबी पोरं जाऊ दे शाळंला. तू तेवढा ये.’

‘पोरं उपाशी कशी जातील?’

‘दुपारचं मिळतंय शाळेत खायाला. तू एकटाच ये.’

‘न्हाई गड्या. पोरास्नीबी आणतोच.’

शाळा सुटली. बंदुक्यानं दप्तर काखेत मारलं. पोलिश्याचा वर्ग अजून चालूच होता. मुलं गृहपाठ लिहून घेत होती. जाधव सर पाठीवर हात बांधून वर्गात फिरत होते. 

बंदुक्या वर्गाच्या चौकटीला जाऊन थांबला. जाधव सरांची नजर त्याच्यावर गेली. त्यांनी पोलिश्याला ‘आटप रे, पळ, वस्तीवर जायला उशीर होईल’, म्हणूनच वर्गाबाहेर काढलं. जाधव सरांमुळेच ती दोघं शाळेत आली. 

बंदुक्या चौथीत तर पोलिश्या तिसरीत. जाधव सरांनी शंभर फेऱ्या मारल्या, तेव्हा बंदुक्याला शाळेत घातलं गेलं. त्यांच्या पालातला शाळेचा उंबरा गाठणारा पहिला मुलगा. जाधव सरांनी त्याला वर्गात आणलं. हजेरीत नाव घातलं. तर सगळी पोरं त्याच्या नावालाच हसायची. जाधव सरांनी एकदा सगळ्यांनाच बदडून काढलं. मुलांचं हसणं बंद झालं.

पोलिश्याला मात्र हा त्रास झाला नाही.  दोघांनी झपाझप पावलं उचलत गाव मागं टाकलं. समोरचा डोंगर पार करायचा होता. पायाखालची वाट. किर्र झाडी. पाखरांचीही शाळा सुटली असावी! आभाळभर पंख. बगळ्यांची लांबलचक माळ. 

पोलिश्या माळ बघत चालताना ठेचकाळला. दगड लागून अंगठा रक्तबंबाळ. बंदुक्यानं लगेच दगडी पाला चोळून अंगठ्यावर पिळला. कळ मेंदूत घुसल्यावर पोलिश्या जोरानं ओरडला.

त्याच्या आवाजानं समोरच्या झुडपातला कोल्हा एकदम बाहेर पडून पळू लागला. पोलिश्या कळ विसरून त्याच्या पाठीमागं पळू लागला.  बंदुक्यानं नेम धरून दगड मारला. कोल्हा झुडपात गायब झाला. 

दोघे काहीच घडलं नसल्यासारखं डोंगर चढू लागले. माळावर पाय टाकला. लांबलचक माळ. मध्ये पाच-दहा झोपड्या, उन्हापावसात तगून राहिलेल्या. सगळी मिळून पाच-पन्नास माणसांची वस्ती. ह्या माळाला भुताचा माळ म्हणतात. गाव शिवारातलं कोणीच फिरकत नाही इकडं. किनिट पडायला दोघं वस्तीवर पोहोचले. तर सगळं सामसूम.

बंदुक्यानं ओळखलं, तो पोलिश्याला म्हणाला, ‘जनावरं आल्ती वाटतं.’

जनावरं म्हणजे तालुक्याचे पोलिस. कुठं चोरी झाली, दरोडा पडला की पोलिस वस्तीवर येऊन धडकतात. वस्तीतली माणसं रानोमाळ पळत जंगलात जाऊन लपतात. हे नेहमीचंच. 

बंदुक्या-पोलिश्या झोपडीच्या दारात बसले. जंगलातून सगळे येईपर्यंत असंच बसणं भाग होतं. हळूहळू माळभर अंधार दाट होत चालला. कोणाचीच चाहूल नाही. 

बंदुक्यानं जोराची कुकारी टाकली. कोठूनच प्रतिसाद नाही. पोलिश्यानं मारलेल्या शिट्टीनं अंधार आरपार हेंदकळला. दूर झाडांत आवाज घुमला. मग स्तब्ध शांतता. 

दूरवरून एक कुकारी घुमली. पोलिश्याच्या जिवात जीव आला. बंदुक्यानं झोपडीत चाचपडत आगपेटी शोधली. दिवा पेटवला. अख्ख्या माळावरच्या अंधाराला भोक पडलं. दोघे दिव्यासमोर बसले. 

दुपारी शाळेत बक्कळ पोषक आहार खाल्ल्यामुळं अजून भूक लागली नव्हती. दूर कुठेतरी अंधार हलू लागला. पावलांचा आवाज येऊ लागला. पोलिश्याचा चेहरा उजळला. त्याला आईची आठवण येऊ लागली होती. त्याचे डोळे अचानक डबडबले. एवढ्यात डफळ्या आजा त्यांच्यासमोर आला. म्हणाला, ‘पोरांनु, जनावरं घेऊन गेली माणसास्नी. काय असंल शिळं-पाकं तर  ढकला पोटात. आनी झोपून टाका.’

पोलिश्याच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. बंदुक्या त्याला समजावीत स्वत:चे डोळे पुसू लागला. अशा रात्री त्याला सवयीच्याच होत्या. त्यानं डेचकं भरून पाणी पोलिश्याला दिलं. तोंड खळखळून धुवायला लावलं. तोवर झोपडीतली भांडी पालथी घातली. एका पालात दोन कोर भाकरी सापडली. कोरड्यास नाहीच. चटणीची चिमूट पाण्यात भिजवून भाकरीवर ठेवली. 

म्हातारा डफळ्या आजा बंदुक्याकडं कौतुकानं पाहात होता. माळ अंधाराच्या ग्लानीत सुस्त पडला होता. मध्यरात्री कुणाच्या तरी आवाजानं बंदुक्याला जाग आली. डफळ्या आजाबरोबर कोणतरी बोलत होतं. आवाज ओळखीचा होता. बंदुक्या कान देऊन ऐकू लागला. ओळखीचा आवाज म्हणत होता - ‘दोघंबी पोरं जाऊ दे शाळंला. तू तेवढा ये.’

‘पोरं उपाशी कशी जातील?’

‘दुपारचं मिळतंय शाळेत खायाला. तू एकटाच ये.’

‘न्हाई गड्या. पोरास्नीबी आणतोच.’

बंदुक्यानं ओळखलं. हा काडतुश्या मामाचा आवाज. त्यानंच त्याला जाधव सरांबरोबर शाळेत घातलं होतं. बंदुक्या झटक्यात उठून काडतुश्यासमोर गेला. अंधारात बलदंड मामा त्याला दगडासारखा वाटला.

‘लेकरा, कशी चाललीय शाळा?’ मामानं त्याला जवळ घेतलं. डोक्यावरून हात फिरवला. त्या हातातल्या ऊर्जेनं बंदुक्या एकदम ताजातवाना झाला. म्हणाला, ‘मामा, तालुक्याला कशाला?’ ‘लेकरा, मोरच्या काढायचा हाय. ही जनावरं सारखी सारखी आमा गरिबालाच तरास देत्यात.’ 

‘मोरच्या म्हणजे काय मामा?’ बंदुक्याचा सहज प्रश्न. 

‘उद्या ये आजाबराबर, म्हणजे कळंल. मोठं झाल्यावर तूच आमच्यासाठी लढशील.’ म्हणत काडतुशा मामा उठला. अंधारात काळाकुट्ट दगड चालावा तसा चालायला लागला. बंदुक्या पासोडीवर पुन्हा लवंडला. 

त्याच्या डोक्यात मोर्चा म्हणजे काय आसंल, हेच घोळायला लागलं. भगटायला डफळ्या आजानं दोघांना उठवलं. आजा-नातू डोंगर उतरायला लागले. म्हाताऱ्याबरोबर चालायचं म्हणजे त्या दोघांना पळायलाच लागायचं. 

पोलिश्याचा फुटलेला अंगठा चांगलाच ठणकायला लागला होता. पण त्याला पळणं भाग होतं. गाव ओलांडून तालुक्याच्या वाटंला लागायला दिवस कासराभर आला. अजून दोन-तीन तास लागणार. पोलिश्याला हळूहळू भूक लागल्यागत वाटायला लागलं. म्हाताऱ्यानं केविलवाण्या नजरेनं त्याच्याकडं बघितलं. त्याच्या पोटात खड्डा पडला. त्यानं पटक्याच्या शेवानं घाम निरपत दूर दिसणाऱ्या रस्त्यावर नजर रुतवली. पोरं फरफटत धावू लागली.  ते तिघे तालुक्यात पोहोचले. 

बंदुक्या रस्त्यालगतच्या उंच-उंच इमारती न्याहाळत होता. पोलिश्या रस्त्यावरच्या झगमगीत गाड्या, त्यांत बसलेली गुटगुटीत माणसं टाळा पगळून बघत होता. त्याच्या शेजारून मोटरसायकल गेली की उष्ण वाऱ्याचा झोत त्याच्या गुडघ्यावर धडकायचा. त्याला सगळं आबजुक वाटत होतं. 

‘बाऽऽ बाऽऽ ही केवढी गा इमारत?’ 

बंदुक्या एका उंच इमारतीकडं बघत ओरडला. म्हाताऱ्यानं त्याला ‘गुमान चल’ म्हणून दरडावलं, तरी त्याचे डोळे इमारतीवरून फिरतच होते. पुस्तकात बघितलेल्यापेक्षा कितीतरी मोठ्या इमारती! पोलिश्याच्या पोटातली भूक तालुक्याचं गाव बघता बघता गायब झाली होती. 

ते एस.टी. स्टॅन्डवर पोहोचले, तर काडतुश्यामामा पाच-पन्नास माणसांच्या घोळक्यात. त्यात बापय- बायामानसं. त्यांच्या कडेवर पोरंबाळं. थोडी ओळखीची. थोडी अनोळखी. 

पोलिश्याला बघताच त्याची आजी धावत आली. तिनं त्याला पोटाशी धरत पटापट मुके घेतले. तिच्या डोळ्यांतून पाणी घळघळत होतं. तासाभरानं काडतुश्यामामानं सगळ्यांना रांगेत उभं केलं. पोलिश्याला शाळेतल्या प्रभातफेरीची आठवण झाली.

बंदुक्याला मामानं सगळ्या रांगेच्या पुढं आणलं. ‘हा आमचा पठ्‌ठ्या. चौथीत हाय.’ सगळी रांग बंदुक्याकडं कौतुकानं बघायला लागली. आपल्यातलं  पोरगं शाळा शिकतंय म्हटल्यावर सगळ्यांचे ऊर भरून आले. 

एवढ्यात तालुक्यातले दहा-पंधरा पांढऱ्या कपड्यांतले लोक आले. त्यांनी काडतुश्यामामाला काय काय सांगितलं. काडतुश्या मामानं बंदुक्याला सांगितलं, ‘तू म्हणायचं - चोर नव्हता आमचा बाप. मी म्हणतो - उगाच का मग पोलिस ताप.’ 

... लगेच घोषणा सुरू झाल्या - चोर नव्हता आमचा बाऽऽप उगाच का मग पोलिस ताऽऽप बंदुक्या जोरानं घोषणा देऊ लागला. पोलिश्यासह डफळ्या आजाच्या अंगात वारं शिरलं. रांग सरकू लागली. तालुक्याच्या पेठेत आरोळ्या घुमल्या. लोक कुतूहलानं बघायला लागले. गर्दी जमा होऊ लागली. बघता बघता घोळका वाढला. सरकू लागला. 

पोलिश्या आपला फुटलेला अंगठा विसरून गेला. बंदुक्या भूक विसरला. फक्त घोषणा. मोर्चा पोलिस ठाण्यावर आला. समोर जनावरं बघितल्यावर काडतुश्या मामाला जोर चढला. तोच जोरानं घोषणा देऊ लागला. समोरचे पोलिस त्याच्याकडे डोळे फाडून बघत होते. काडतुश्यामामा पुन्हा पुन्हा चवताळून घोषणा देत होता. सगळ्यांना शांत बसवत पांढऱ्या कपड्यांतल्या लोकांनी एकट्याला पुढं केलं. 

तो म्हणाला - ‘पोलिसांनी आमच्या माणसांना उगाच पकडून आणलंय.’

बंदुक्या एकदम ओरडला - ‘सारखं सारखं त्ये आसंच करत्यात!’ 

बोलणारा म्हणाला, ‘शाब्बास रे फाकडूऽऽ, आता तू आमचा नेता.’

बंदुक्याला तो काय म्हणतोय कळालं नाही. सगळे ऐकत बसले. जनावरं भोवती उभी होती. भाषण संपलं. पांढऱ्या कपड्यांतले लोक आणि काडतुश्यामामा आत गेले. आया-बायांसह सगळा घोळका झाडाच्या सावलीला बसला. 

काडतुश्यामामा थोड्या वेळानं बाहेर आला. बंदुक्याला जवळ घेत म्हणाला - ‘लेकरा, ह्येलाच म्हणत्यात मोरच्या. आता सोडतो म्हणाल्यात तुझ्या आई-बाबा आनी सगळ्यास्नी.’

पोलिश्या एवढंच ऐकून एकदम हुरळला. पोलिसठाण्याच्या दाराकडं नजर लावून आईच्या पावलांची वाट बघू लागला. बंदुक्याच्या गळ्यात एकदम आवंढा आल्यागत झालं. सगळ्या घोळक्याची नजर पोलिसठाण्याच्या दरवाजावर खिळली. झाडाची सावली गडद होत गेली! 

एवढ्यात पोलिसठाण्यातून सुटलेल्या बापाची आकृती बंदुक्याला दिसली. तो जोरात ओरडला - ‘चोर नव्हता आमचा बाऽऽप’ सगळ्यांचा आतडी पिळवटून आवाज आला - ‘उगाच का मग पोलिस ताऽऽप’ 

Tags: भूक पोलिस चोर बाप पोलिसठाणे appetite police thief father police station weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके