डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

बंदूकधारी गुंडाचा सामना करणारी मुलगी : गुंजन शर्मा (आसाम)

किती तरी वेळ तिच्या तोंडात बंदुकीची नळी ठेवून ते तिथं बसून होते. मघाशी लागणारी पोलिसांची चाहूल आता विरली होती. पुन्हा एकदा त्यानं पोलिसांना चकमा दिला होता.पोलीस दूर गेल्यावर यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. त्यानं तिच्या तोंडातली बंदूक काढली. 

तो म्हणाला, ‘‘मला तुझ्याएवढी पोरं आहेत. 

मी तुला काही करणार नाही. मी सेफ पोचलो की, तुला सोडून देईन.’’

गुंजननं फक्त मान हलवली. तिला वाटलं, 

हा माणूस इतका काही वाईट नाही. 

स्कूल व्हॅनमध्ये घुसलेल्या त्या माणसाच्या हातात छोटी बंदूक होती, ती त्यानं ड्रायव्हरकाकांच्या डोक्याला लावली होती. पहिल्या-दुसऱ्या इयत्तेत शिकणारी एकूण दहा मुलं आणि त्या सगळ्यांपेक्षा थोडीशी मोठी, सहावीत शिकणारी गुंजन व्हॅनमध्ये मागे बसलेली होती. तो माणूस अधून-मधून मागे बघत होता, बंदूक दाखवत होता. गुंजनचे हात-पाय दगडासारखे जड झाले होते. चालत्या बसमध्ये असूनही सगळं ठप्प झाल्यासारखं वाटत होतं. इतक्या कोलाहलातदेखील तिला स्वतःच्या हृदयाची धडधड कर्कश असल्यासारखी ऐकू येत होती. मग तिने त्या चिल्ल्या-पिल्ल्यांना रडताना पाहिलं. ती तिथे आता त्या छोट्या पोरांची ताई होती, कारण ती त्या सगळ्यांमध्ये मोठी होती. त्यामुळे आता घाबरायचं नाही, असं तिने ठरवलं.

गुंजन शर्मा ही आसाम राज्यातील शिवसागर जिल्ह्यात राहणारी. तिचे बाबा वडिलोपार्जित व्यवसाय करतात. आई गृहिणी आहे. तिला मोठा भाऊ आहे. गुंजन तिथेच जवळच्या केंद्रीय विद्यालय- नाझिरामध्ये शिकते. आसाम म्हणजे सेव्हन सिस्टर्सपैकी एक राज्य. ईशान्य भारताच्या सात राज्यांना ‘सेवन सिस्टर्स’ म्हणून ओळखलं जातं. उरलेल्या भारताची परिस्थिती अशी की, बहुतेकांना या राज्यांची सात नावंदेखील न अडखळता पटकन सांगता येत नाहीत. अगदीच एखाद्याला नावं सांगता आली, तरी ‘नकाशामध्ये कुठलं राज्य कुठं आहे, दाखवा बरं-’ म्हटलं तर दाखवता येत नाही. 

महाराष्ट्रासारखा मोजून-मापून पाऊस, ऊन, थंडी ईशान्य भारतात नसते. डोंगर-दऱ्यांनी भरलेल्या, अजूनही विपुल जंगलसंपदा राखून असणाऱ्या अशा या सेव्हन सिस्टर्स आहेत. 

नाझिरा गावापासूनदेखील असंच हाकेच्या अंतरावर जंगल आहे. आसाम-नागलँड सीमा म्हणजे जंगलच. शहरातल्या शाळेच्या व्हॅन ट्रॅफिकमधून वाट काढत मुलांना आपापल्या घरी सोडतात... पण नाझिऱ्याच्या शाळेतून मुलांना घेऊन व्हॅन निघते, तेव्हा ती दोन्ही बाजूला छान झाडी असलेल्या रस्त्यावरून जाते, रस्त्यांवर तुरळक वाहनं असतात- गर्दी नाही, ट्रॅफिक नाही. अशी ती व्हॅन मग आसपासच्या छोट्या-छोट्या गावांतल्या मुलांना आपापल्या घरी सोडते. 

दि. 4 डिसेंबर 2013 या दिवशी- रोजच्यासारखीच शाळा भरली होती. दुपार होत आल्यानं थोडं ऊन आलेलं होतं. सकाळचा थंडीचा जोर कमी झाला होता. शाळा सुटायची घंटा व्हायला थोडाच वेळ उरला होता.  शाळेपासून जवळ एक गाव आहे- सिमलुगिरी. तिथं मात्र सगळं आलबेल चाललेलं नव्हतं. बिमन बोरा नावाचा एक गुंड सिमलुगिरीमध्ये काही लोकांशी भांडण करत होता. भांडण खूपच वाढलं आणि धक्काबुक्की सुरू झाली. तेव्हा बिमन बोरानं अचानक खिशातून छोटी बंदूक काढली. त्याच्याशी भांडणाऱ्या लोकांना तो धमकावत होता. बंदूक बघून कोणी त्याच्याजवळ जायला तयार नव्हतं. तेवढ्यात कोणी तरी प्रसंगावधान दाखवून पोलिसांना फोन केला. काही मिनिटांत तेथे पोलीस आले. पोलिसांची गाडी येताना दिसताच तो घाबरला आणि उलट्या पावली पळत सुटला. जवळच्या झाडीत घुसला. त्या छोटेखानी जंगलाच्या दुसऱ्या बाजूला अन्य गावांना जोडणारा मुख्य रस्ता येतो. जंगलातून बाहेर पडून तो या मुख्य रस्त्यालाच येणार, म्हणून पोलीस त्या रस्त्यावर दबा धरून बसले. येईल-जाईल ते वाहन तपासू लागले. 

इकडे बरंच अंतर चालून आल्यानंतर बिमन बोराला रस्ता दिसला. त्यानं झाडाच्या मागे लपून पाहिलं, तर पोलिसांनी नाकाबंदी करून ठेवली होती. पुन्हा उलटं मागं जाऊन फायदा नव्हता. त्याला शेजारच्या राज्यात नागालँडला पळून जायचं होतं. थोडंसं अलीकडून तो मुख्य रस्त्याला लागला. आता त्याच्यापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर पोलीस होते. कसंही करून पोलिसांची नाकाबंदी तोडून त्याला पुढं जावं लागणार होतं. चालत जाऊन पोलिसांना चकवून पुढे जाता आलं नसतं, म्हणून त्याला गाडी हवी होती. म्हणून तो झाडामागं लपून कुठली तरी गाडी येण्याची वाट पाहू लागला.

दरम्यान नाझिरा गावातील शाळा सुटल्याची घंटा झाली. धावत-पळत मुलं-मुली व्हॅनकडे आली. ड्रायव्हरकाका मुलांची वाटच पाहत होते. त्यांनी गुंजनला सगळ्यांची हजेरी घ्यायला सांगितली. तिनं दहा लहानग्यांची हजेरी घेतली. गुंजनला मोठं झाल्यावर शिक्षिका व्हायचं आहे. त्यामुळं हे तिचं रोजचं आवडीचं काम आहे. हजेरी झाल्यावर नाझिऱ्याहून व्हॅन निघाली.

सिमलुगिरीपाशी दबा धरून बसलेल्या बिमन बोराला खूप वेळानंतर त्या रस्त्यावर एक गाडी येताना दिसली, तशी त्यानं रस्त्यावर उडी मारली. खिशातली बंदूक काढली आणि ती त्या गाडीवर रोखून तो रस्त्याच्या मधोमध उभा राहिला. 
असं मधे कोण उभं आहे, म्हणून ड्रायव्हरने हॉर्न वाजवला. जोरजोरात हॉर्न वाजवूनही तो माणूस बाजूला होत नव्हता. त्यामुळे सगळी मुलं पुढच्या सीटपाशी गोळा होत भेदरलेल्या डोळ्यांनी रस्त्यावरच्या त्या माणसाकडे पाहत होती. ड्रायव्हरने ब्रेक मारला, व्हॅनचा वेग कमी केला. त्याच्याजवळ गाडी पोचताच ड्रायव्हरला त्याच्या हातातली बंदूक दिसली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. 

त्यानं व्हॅन थांबवली, दरवाजा उघडला आणि तो ड्रायव्हरच्या शेजारी बसला. त्यानं बंदूक ड्रायव्हरच्या डोक्याला लावली आणि म्हणाला, 

‘‘व्हॅन नागलँडला घेऊन चल...’’

आणि मग तो मागच्या मुलांवर ओरडला, 

‘‘जागेवर जाऊन बसा रे मागं गप गुमान... चला... हला पट्‌कन.’’

मुलं आपापल्या जागेवर जाऊन बसली. कोणी मोठ्यानं ओरडून रडायला लागलं, कोणाची घाबरून दातखिळीच बसली. गुंजनदेखील घाबरली होती. पण त्या लहान मुलांची ताई होऊन तिनं भीती बाजूला ठेवली. त्या माणसाच्या हातात बंदूक होती. रागाच्या भरात माणसाला भान राहत नाही. ‘रागात त्यानं ती बंदूक चालवली तर?’ असा विचार करत ती मुलांना शांत करू लागली.

पाचच मिनिटांत समोर पोलीस दिसायला लागले. ते येणारी-जाणारी प्रत्येक गाडी तपासत होते. ड्रायव्हरच्या डोक्याला लावलेली बंदूक हलवत तो म्हणाला, 

‘‘गाडी थांबवायची नाही अजिबात- काही झालं तरी गाडी थांबवायची नाही. जोरात चालव, अजून जोरात चालव.’’

एवढ्या वेगाने येणारी स्कूल व्हॅन पाहून पोलिसांना संशय आला. ते साखळी करून रस्ता व्यापून उभे राहिले. 

‘‘जाऊ दे त्यांच्या अंगावर गाडीऽऽ पण थांबवायची नाहीऽऽ जोरात चल...’’

पोलीस हलत नाहीत असं बघून त्यानं खिडकीतून डोकं बाहेर काढलं. पोलिसांच्या दिशेनं बंदूक चालवली. ‘ठोयऽ’ असा मोठ्ठा आवाज झाला. व्हॅनमधली पोरं दचकली, पुन्हा रडायला लागली. त्यानं अशा एकामागोमाग तीन गोळ्या पोलिसांवर चालवल्या. एकाही पोलिसाला गोळी लागली नाही, पण त्या अचानक हल्ल्यानं पोलीस हटले. व्हॅनला पुढे जाण्यासाठी जागा मिळाली आणि पोलिसांची नाकाबंदी तोडून व्हॅन नागलँडच्या दिशेनं निघाली. 

पोलिसांना बघून गुंजनला वाटलं होतं की, हे आता आपल्याला वाचवतील. पण पोलीस मागे राहिले होते. गुंजनच्या लक्षात आलं की, आता आपल्या मदतीला कोणी येण्याची वाट पाहत बसण्यात अर्थ नाही; आपणच स्वतःला मदत केली पाहिजे.

पोलिसांना चकवा दिला असला तरी ते व्हॅनचा पाठलाग करत असणारच, हे बिमन बोराला माहीत होतंच. त्यामुळं सैजपूर गाव आल्यावर त्यानं व्हॅन थांबवायला सांगितली. इथून जंगलातून त्याला आसाम बॉर्डर पार करून नागलँडला जाता येणार होतं. पण पोलीस पाळतीवर होतेच. मग त्यानं त्या सगळ्या मुलांना ओलीस ठेवायचं ठरवलं. मुलांना सोबत घेऊन गेला आणि पोलीस पोचलेच त्याच्यापर्यंत, तर मुलांच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्याला निसटता येणार होतं. म्हणून सैजपूर फाट्यापाशी त्यानं मुलांना जबरदस्तीनं गाडीतून उतरवलं आणि हातातली बंदूक नाचवत तो म्हणाला, चला माझ्यासोबत. ड्रायव्हरकाका त्याला विनवण्या करत होते, पण तो काहीच ऐकत नव्हता. 

तेव्हा गुंजन त्याला म्हणाली, ‘‘मला एकटीला घेऊन चला...’’ 

कपाळावरती आठ्या घालून तो गुंजनकडं पाहायला लागला. 

‘‘ही मुलं छोटी आहेत. यांना जंगलात चालता पण येणार नाही नीट. मी येते तुमच्याबरोबर... यांना सोडून द्या इथंच.’’ गुंजन पुढे म्हणाली.

त्याला गुंजनचं म्हणणं सोयीचं वाटलं. व्हॅन, ड्रायव्हर आणि दहा मुलं यांना तिथंच सोडून तो जंगलात घुसला. त्याच्यापुढं गुंजन चालत होती. तिच्या डोक्यावर बंदूक रोखलेली होती. ती जंगलात दिसेनाशी होईपर्यंत ड्रायव्हरकाका तिच्याकडं बघत राहिले. आपण तिला वाचवू शकलो नाही, याचं त्यांना वाईट वाटत होतं. बावरून गेलेल्या मुलांना त्यांनी गाडीत बसवलं. किती तरी वेळ ते डोक्याला हात लावून जंगलाकडं बघत तिथंच बसून राहिले.

थोड्या वेळानं पोलीस तिथं पोचले. ड्रायव्हरने पोलिसांना सगळी हकिगत सांगितली. ते दोघं कुठल्या वाटेनं जंगलात गेले, ते दाखवलं. पोलिसांनी जादा कुमक मागवून घेतली आणि जंगलात गुंजनला अन्‌ बिमन बोराला शोधायला ते निघाले. बिमन बोराला पकडण्यापेक्षाही गुंजनचा जीव वाचवणं पोलिसांना महत्त्वाचं वाटत होतं. एका पोलीस अधिकाऱ्यासोबत त्या मुलांना आणि ड्रायव्हरला घरी जायला सांगून पोलीस जंगलात घुसले. 

इकडे पोलिसांची चाहूल लागताच बिमन बोरानं गुंजनच्या तोंडात बंदुकीची नळी घुसवली. एव्हाना रात्र व्हायला आलेली. 

गुंजन विचार करत होती-

‘सकाळी शाळेत डबा खाल्ला, त्याला आठ-दहा तास उलटून गेलेत. दुपारपासून पाणीसुद्धा प्यायला मिळालं नव्हतं. एवढं जंगल, रात्रीची वेळ, लांबून येणारे जंगली प्राण्यांचे आवाज, झाडांची सळसळ, तोंडात बंदूक आणि समोर एक गुंड माणूस... घरचे सगळे काळजी करत असतील. आई रडत असेल. बाबा आणि दादा मला शोधायला बाहेर पडले असतील. हे असं काही घडलं नसतं, तर आत्ता मी आई-बाबांबरोबर घरी रात्रीचं जेवण घेत बसले असते. 

‘पण भुकेसाठी, भीतीसाठी आत्ता माझ्याकडे वेळच नाहीय. मी आत्ता सतर्क राहिलं पाहिजे, धाडसाने वागलं पाहिजे. स्वतःचा जीव वाचवायचा, एवढं एकच लक्ष्य असलं पाहिजे आत्ता माझं...

‘बरं झालं, ती छोटी मुलं तरी सुटली याच्या तावडीतून. त्यांना उपाशीपोटी जंगलात इतकं चालणं जमलं नसतं. मी त्यांच्यापेक्षा स्ट्राँग आहे ना, त्यामुळं मीच त्यांना प्रोटेक्ट करायला पाहिजे.’

किती तरी वेळ तिच्या तोंडात बंदुकीची नळी ठेवून ते तिथं बसून होते. मघाशी लागणारी पोलिसांची चाहूल आता विरली होती. पुन्हा एकदा त्यानं पोलिसांना चकमा दिला होता.

पोलीस दूर गेल्यावर यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. त्यानं तिच्या तोंडातली बंदूक काढली. तो म्हणाला, ‘‘मला तुझ्याएवढी पोरं आहेत. मी तुला काही करणार नाही. मी सेफ पोचलो की, तुला सोडून देईन.’’

गुंजननं फक्त मान हलवली. तिला वाटलं, हा माणूस इतका काही वाईट नाही. 

गुंजन त्याच्यासोबत चालत राहिली. अंधारात नीट दिसत नव्हतं. नेहमीचा पायाखालचा रस्ता नसल्यामुळं अडखळायला होत होतं. किती तरी वेळा गुंजन ठेचकाळून पडली. त्याच्या मोबाईलच्या प्रकाशात ते थोडा वेळ चालले, पण आता त्याची फोनची बॅटरी उतरत आलेली होती.
‘‘तू इथंच थांब. मी आलोच.’’ असं म्हणून तो फोनच्या बॅटरीच्या प्रकाशात एका वाटेनं गेला. गुंजनपाशी आता संपूर्ण अंधार झाला. तो दिसेनासा होताच गुंजन उलट्या दिशेनं चालू लागली. जंगलात घुसल्यापासून आपण आत कसे आलो याच्या दिशा तिनं लक्षात ठेवल्या होत्या. त्या छोट्या मुलांचा जीव वाचला, आता स्वतःचा जीव वाचवायचा... काही झालं तरी जिवंत राहायचं- एवढंच तिने मनाशी ठरवलं होतं. त्यासाठी ती सतर्क राहिली होती. अंधारातही तिनं डोळे सताड उघडे ठेवले होते. दिशा, वळणं  यांची मनात नोंद करून घेतली होती. 

काल सकाळी शाळेमध्ये अकराच्या दरम्यान तिने डबा खाल्लेला. संध्याकाळी त्या माणसाबरोबर चालत या जंगलातून ती निघाली. अठरा तास झाले, तिने काही खाल्लेलं नाही. दहा-बारा तास झाले, ती जंगलात चालत होती- डोक्यावर टांगती बंदूक असताना. मात्र ती त्याच्या तावडीतून सुटली होती. त्यामुळे न थांबता, न आवाज करता, चालत-धडपडत ती पुढे जात राहिली. किती तास चालली, तिलाच आठवत नाही. पण तिच्यात जिद्द होती, आपण चालू शकू असा तिचा स्वतःवर विश्वास होता. 

5 तारखेला गुरुवारी जेव्हा लांबून घरं दिसू लागली, तेव्हा तिला आणखीच हुरूप आला. शरीरातलं सगळं बळ एकवटून ती चालत राहिली आणि आसाम-नागलँड बॉर्डरवरच्या बिहुभोर या गावात येऊन पोचली. तिथल्या गावकऱ्यांनी तिची विचारपूस केली. मग पोलिसांना फोन केला. पोलीस येईपर्यंत गावकऱ्यांनी तिला खाऊ-पिऊ घातलं. खाता-खाता तिनं गावकऱ्यांना सगळी हकीगत सांगितली. तेवढ्यात पोलीस आले. सोबत तिचे बाबा आले. गाडीत जाताना परत पोलिसांना आणि बाबांना सगळी हकिगत सांगावी लागली. घरी पोचली. आईला भेटली. दमून-भागून झोपली. उठल्यावर आईला, भावाला हकिगत सांगू लागली. त्या घटना ऐकून लोक घाबरत होते. गुंजन म्हणाली, ‘‘का कुणास ठाऊक, पण मला त्या माणसाची भीती वाटली नाही. पण आता परत आल्यानंतर वाटतंय की, कदाचित त्यानं मला मारूनसुद्धा टाकलं असतं!’’

दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये या घटनेच्या बातम्या आल्या. टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांनी गुंजनच्या मुलाखती घेतल्या. आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी गुंजनला दोन लाख रुपयांचं बक्षीस तत्काळ जाहीर केलं. त्यानंतर दहाच दिवसांनी म्हणजे दि.17 नोव्हेंबर 2014 या दिवशी गुवाहाटीमध्ये एका भव्य समारंभात आसाम सरकारकडून गुंजनला पहिला आसाम राज्य शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वतःच्या धाडसाने, प्रसंगावधानाने, त्यागाने दुसऱ्याचे प्राण वाचवणाऱ्या मुला-मुलींना भारत सरकार असे शौर्य पुरस्कार दर वर्षी देते. दि.22 जानेवारी 2015 या दिवशी गुंजन शर्माला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. (ही घटना घडली तेव्हा गुंजन केवळ 12 वर्षांची होती.)

जंगलातून परत आल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशीपासून ती शाळेला नियमित जाऊ लागली. टीव्हीवरच्या मुलाखती, पुरस्कार सोहळे सांभाळत ती अभ्यासाकडे जास्त लक्ष देऊ लागली.

पाच वर्षांपूर्वीची ही घटना आहे. गुंजन शर्मा उत्तम गुणांनी बारावी पास झालेली आहे. ‘‘मी आत्ता भरपूर अभ्यास केला, तरच मोठी झाल्यावर चांगली शिक्षिका होईन ना?’’ असं ती म्हणते. 

सरकारच्या व अन्य पुरस्कारांच्या रूपाने गुंजनला काही लाख रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली. स्वतःच्या पुढील शिक्षणासाठी गुंजन ती रक्कम वापरणार आहे. 

पुढे काही दिवसांनी पोलिसांनी बिमन बोराला पकडलं. गुंजनला बक्षिसाची रक्कम मिळाल्याचं समजल्यावर त्यातील अर्धा हिस्सा मला मिळायला हवा, अशी निर्लज्ज मागणी बिमन बोराने केली. ‘‘मी ती व्हॅन पळवली आणि तिला किडनॅप करून जंगलात घेऊन गेलो, म्हणून तिला पुरस्कार मिळाला. त्यामुळं तिच्या पुरस्कारात माझं श्रेय आहे!’’ असं त्याचं म्हणणं होतं. हा माणूस इतका बदमाश असतानादेखील त्याला पकडल्याची बातमी ऐकली तेव्हा गुंजन म्हणाली होती की, ‘पुन्हा अशी चूक करणार नाही,’ असं वचन देत असेल तर त्याला सोडून द्यायला पाहिजे.

Tags: बंदूकधारी गुंडाचा सामना करणारी मुलगी आसाम मृद्गंधा दीक्षित गुंजन शर्मा mrudgandha dixit asam gunjan sharma weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मृद्‌गंधा दीक्षित
mudra6292@gmail.com

सब एडिटर - कर्तव्य साधना 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके