डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

घडीभर विस्कटून पहा 
अगदी घडीतच जपायचा 
बोळा झालेला जीव लोळागोळा 
दरवाजा किंचित कधी उपडत जा.

नाच

तिच्या सगळ्या पिसांचा पिसारा
पिसांचे डोळे
डोळ्यांचा इशारा
इशान्यावर नाच
तुही नाच मीही नाच 
धा.. धिपिंधा धा.. धिविधा 
उसनी खुषी उसना सौदा 
पिसाऱ्याचा काय भाव? 
डोळ्यांमध्ये खोटा भाव 
डोळे गेले पळून 
पिसारा गेला गळून 
नव्हता ठेका, नव्हता ताल
कुठचा मोर अन् कुठला काय? 
नाचते लांडोर, नाचतात पाप 
नाचून नाचून थकला बाप!

---

घडी

घडीभर विस्कटून पहा 
अगदी घडीतच जपायचा 
बोळा झालेला जीव लोळागोळा 
दरवाजा किंचित कधी उपडत जा. 

---

जोगवा

माह्या जातीचे मढं
कुनी उकरीलं?
उकरल्या मढ्याची 
उभारली दुईबर गुढी 
रोवतांना गुडी, धार 
कुंकवाची, रगताची झाली. 
माह्या बापाची जात काय? 
माझ्या धन्याची जात काय? 
माह्या ल्येकीची जात काय? 
जात्यात जातीच्या मनं 
पार दपलं दयलं. 
हे काऊन घडलं? 
माझं काय चुकलं? 
इथं गुराला जात, दोराला जात, 
दोऱ्याला जात, बाया पान्याला जात 
आये, मानसाचं बीज दे ग 
ल्येकीच्या उदरात!

---

सुरकुतलेली

ती सुरकुतलेली
जाळीदार- आरपार,
पिंपळपान झालेली
वहीत पिंपळपान जपताना 
वहीच होते पिंपळपान
वर्तमान जगताना 
ती तशी इतिहास झालेली
ती कधी स्वच्छ सारवलेली होती 
ताज्या आंब्याच्या सालीसारखी
खरं सांगायचं तर 
ऊनऊन मऊ तूप मीठ भातासारखी! 
आता ती सुरकुतलेली. 
सवयीनं सार करत राहणारी
सुरकुत्यांच्या बेरजेत 
सप आणि वय वजा करणारी! 
कशी गं तू अशी सुरकतलेली? 
गालावर तिच्या गाल ठेवला 
काळ्या डोळ्यांनी प्रेमळ हसली 
आणि... 
गालावर माझ्या एक सुरकुती दिसली. 

---

पैज

'एकतरी सुई मरताना 
सोचत नेऊन दाखव माणसा 
नाव बदलेन' म्हणाला यम. 
'दरवर्षी 1 जानेवारीला
हीच पैज लावून कंटाळलोय
तुझ्या निर्माणापासून.. ' म्हणाला यम. 
'फॉर अ चेंज सुई ऐवजी 
एखादा शेअर, हिरा, चेक,
सीडी, पिझ्झा काहीही चालेल.. ' म्हणाला यम. 
'हरतोय ब्रह्मदेव वर्षानुवर्षे
अन् तो पण कायम 
रेडा घेऊन जिंकतोय
त्या न नेलेल्या सुईने, 
उसवत आपुष्यं सगळ्यांची.

Tags: पैज सुरकुतलेली जोगवा घडी नाच weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके