डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या राजकीय लढ्यांना साधनशुचितेचे परिमाण दिल्याने त्यांना मूल्यात्मकता प्राप्त  झाली. त्या वेळचे मुख्यमंत्री बॅ.अंतुले यांच्याविरुद्धचा लढा हा मुख्यमंत्र्याविरुद्धचा संघर्ष नव्हता तर मुख्यमंत्रिपदाचा दुरुपयोग करणाऱ्या पद्धतीला चपराक होती. हा लढा मृणालताईंनी व्यक्तींविरुद्ध केला नाही आणि मुसलमानविरोधी तर तो होऊच दिला नाही, हे त्यांच्या प्रगल्भतेचे निदर्शक आहे. समाजवादी चळवळीचे दिवस पालटले, त्याला उतरती कळा लागली, याला त्यांच्या चुकीबरोबरच एकूण व्यापक कारणमीमांसा ही होती की शहरांची वस्ती अफाट वाढली, नव्वद सालानंतरच्या धोरणाने एक नवा प्रबळ मध्यम वर्ग निर्माण झाला, संवेदनशीलतेपासून त्याने फारकत घेतली. 

मृणालताईंचे अवघे जीवन हा समर्पित लढाऊ नेतृत्वाचा वेगळा बाज होता. राजकारणात मूल्याधिष्ठित जीवन अस्सलपणे व कृतिशीलपणे जगणे ही साधना असिधाराव्रताएवढी म्हणजेच तलवारीच्या पात्यावरून चालत जाण्याएवढी कठीण असत्ते. मृणालताईंनी ती समर्थपणे आजन्म निभावली.  त्याग हा त्यांचा स्थायीभाव होता, पण त्यामुळे येणाऱ्या अहंकाराचा वारा कधीही त्यांच्या चित्ताला स्पर्श करू शकला नाही.उत्तम दर्जाचे वैद्यकीय शिक्षण मधेच सोडून त्यांनी समाजवादी कार्यसिद्धीसाठी जीवन झोकून दिले. मात्र त्याचा गर्व यत्किंचितही बाळगला नाही.

पुढे त्या ग्रामपंचायत सदस्यापासून ते खासदार म्हणून निवडून येण्यापर्यंत यशस्वी होत गेल्या. मात्र त्याही ठिकाणी त्यांनी हीच भूमिका जोपासली. दस्तुरखुद्द पंतप्रधान मोरारजीभाई देसाई ‘केंद्रीय मंत्रिपद स्वीकारा’ असा आग्रह करत असताना मृणालताईंनी सहजपणे त्याला नकार दिला आणि आयुष्यभर या गोष्टीचा गाजावाजा करणेही नाकारले. समाजवादी पक्ष जनता पक्षात विलीन करण्याबाबत त्यांची मानसिकता अनुकूल नव्हती. परंतु सर्व सहकाऱ्यांनी निर्णय घेतल्यावर त्या जनता पक्षात गेल्या आणि शेवटपर्यंत तेथे राहिल्या. मात्र सत्तेत जाण्याचे आणि त्याद्वारे परिवर्तनाचे वाहक बनण्याचे स्वप्न जनता पक्षाच्या मंत्रिमंडळाद्वारे प्रत्यक्षात येणार नाही याची मनोमनी खात्री असल्याने त्यांनी सत्तेपेक्षा जनतेबरोबरच राहणे पसंत केले. 

मात्र संघर्षात सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची व्यापकता त्यांनी दाखवली. त्यामुळे महागाईविरोधी संयुक्त प्रतिकार समितीत मार्क्सवादी नेत्या अहिल्या रांगणेकर आणि भारतीय जनता पक्षाच्या (त्या वेळच्या जनसंघाच्या) नेत्या जयवंतीबेन मेहता यांना त्यांनी आवर्जून सोबत घेतले. सत्तेच्या राजकारणात हा नीरक्षीरविवेक अपवादात्मक मानावा लागेल. मृणालताईंच्या नावाला ‘संघर्ष’ हा शब्द कायमचा जोडलेला होता आणि हा संघर्ष सातत्याने समाजातील उपेक्षित, कष्टकरी, शोषित यांच्यासाठी आणि या वर्गाला हा भोग भोगावयास लावणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध होता. मध्यमवर्गीय महिला मोठ्या संख्येने लढाऊपणे बाहेर पडतात हे मृणालताईंनी सिद्ध केले. त्यांनी लाटणे, हंडा, थाळीचा घंटानाद अशा अनेक अभिनव कल्पना राबवल्या. आंदोलन कटाक्षाने अहिंसात्मक राखले. मात्र त्याची धार, तेज व जोश कायम आणि वाढता ठेवला. सत्याग्रही अहिंसात्मक संघर्ष कसे करावेत आणि त्यांची तीव्रता कशी वाढवावी याचा आदर्श वस्तुपाठ जणू मृणालताईंच्या लढ्यामधून उभा राहिला.

या राजकीय लढ्यांना साधनशुचितेचे परिमाण दिल्याने त्यांना मूल्यात्मकता प्राप्त  झाली. त्या वेळचे मुख्यमंत्री बॅ.अंतुले यांच्याविरुद्धचा लढा हा मुख्यमंत्र्याविरुद्धचा संघर्ष नव्हता तर मुख्यमंत्रिपदाचा दुरुपयोग करणाऱ्या पद्धतीला चपराक होती. हा लढा मृणालताईंनी व्यक्तींविरुद्ध केला नाही आणि मुसलमानविरोधी तर तो होऊच दिला नाही, हे त्यांच्या प्रगल्भतेचे निदर्शक आहे. समाजवादी चळवळीचे दिवस पालटले, त्याला उतरती कळा लागली, याला त्यांच्या चुकीबरोबरच एकूण व्यापक कारणमीमांसा ही होती की शहरांची वस्ती अफाट वाढली, नव्वद सालानंतरच्या धोरणाने एक नवा प्रबळ मध्यम वर्ग निर्माण झाला, संवेदनशीलतेपासून त्याने फारकत घेतली. 

एका बाजूला या वर्गाला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची झळ लागेनाशी झाली. तर दुसऱ्या बाजूला अंत्योदयासारख्या अनेकविध शासकीय योजनांतून गरिबांना काहीना काही आधार मिळण्याची सोय झाली. स्वाभाविकच सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण या ऐवजी व्यक्तिगत कामे करण्यासाठी राजकारण असे राजकारणाचे स्वरूप बनले. जात, पैसा, संस्था यांपैकी ज्यांचे ज्यांचे जमेल तसे सहकार्य घेऊन मतदार संघ जोपासणारे नवे संस्थानिक आमदार जागोजाग तयार झाले.

गोरेगाव हा मृणालताई व त्यांच्या अनके बुलंद सहकाऱ्यांनी घडवलेला पक्षाचा बालेकिल्ला होता. तो या प्रतिकूलतेत टिकून राहणे शक्य नव्हते आणि घडलेही तसेच. तरीही किंकर्तव्यमूढ न होता संघर्षाचा मंत्र मृणालताईंनी सोडला नाही आणि त्याला रचनात्मक कामाची जोडही तेवढ्याच समर्थपणे दिली. शहरी गरिबांच्या घराच्या प्रश्नाला नागरीनिवारा या प्रकल्पाद्वारे मृणालताईंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे रचनात्मक उत्तर दिले त्याची पुरेशी बूज जर शासनाने राखली असती तर आजच्या मुंबई महानगरातल्या गरिबांच्या डोक्यावरील छपराला एक चांगला सक्षम पर्याय उभा राहिला असता. 

केशव गोरे स्मारक ट्रस्ट हा देखील मृणालताईंच्या पुढाकाराने स्थापन झाला आणि अनेकविध सेवा प्रकल्प, संशोधन, लेखन, कलात्मकता अशा अनेक पातळ्यांवर त्यामार्फत बहुआयामी काम घडले आणि घडत आहे. ‘पाणीवाली बाई’ असे सार्थ नामाभिधान त्यांना मिळाले. त्यातील दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. ज्या काळात झोपडपट्टीला पाणी देणे ही मुंबई महानगरपालिका आपली जबाबदारी मानत नव्हती त्या वेळी त्या ठिकाणी नळांची कोंडाळी पहिल्यांदा मिळाली ती मृणालतार्इंच्यामुळे. मात्र या बाईने महिला सक्षमीकरणाचा अखंड ध्यास तर घेतलाच, पण त्याला व्यापक परिमाणही दिले. म्हणूनच त्या अंगणवाडी कर्मचारी, मोलकरीण बाया यांची लढाई लढवू शकल्या. त्याच वेळी आंदोलनातून अनेक महिलांना सक्षम नेत्या म्हणून घडवू शकल्या आणि पुरुष-स्त्री यांची निर्मळ मैत्री असू शकते, ती अत्यंत स्वाभाविक आहे या मताचा आग्रहही धरू शकल्या. 

नैतिक वजन असलेल्याला सार्वत्रिक आदर कसा मिळतो याची सहज प्रचिती मृणालताईंच्या बरोबर कुठेही कामासाठी जाणाऱ्या व्यक्तीला येत असे. हा खास त्यांच्या जीवनसाधनेचा करिश्मा होता. काळाच्या आघाताने तो थांबला. साधना परिवाराची मृणालताईंना नम्रतापूर्वक आदरांजली.

Tags: झोपडपट्टी. आंदोलन राजकारण जनता पक्ष समाजवादी पक्ष मृणाल गोरे Slum Movement Politics Janata Party Samajwadi Party Mrinal Gore weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके