डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सर्व कामगार संघटनांनी हे नाटक आपापल्या समुदायांना दाखवावं अशी आमची अपेक्षा होती, ते फारच कमी प्रमाणात घडलं. पण जे घडलं ते नक्कीच महत्त्वाचं होतं. मुंबई, औरंगाबाद, परभणी, नगर, कोल्हापूर, उल्हासनगर अशा ठिकाणी काही जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. अनेकांनी आपलं संघटनकौशल्य दाखवलं. चळवळींच्या अनेक त्रुटीही या साऱ्या प्रवासात उलगडल्या, जाणवल्या. रंगभूमीबाबत जागृत आणि संवेदनाक्षम असणाऱ्यांना कामगार चळवळ किंवा विचारसरणी याबद्दल फारशी आस्था नाही हा प्रत्यय पचवायला विलक्षण कठीण गेला. तर चळवळीतल्या म्हणजे आमूलाग्र बदल घडवू इच्छिणाऱ्या संघटनांना आपल्या समुदायांना लोकशिक्षण सांस्कृतिक माध्यमातून करण्याची गरज फारच जुजबी प्रकारात अडकल्याचं जाणवलं. 

जेव्हा अतुल पेठे यांनी ‘सत्यशोधक’ नाटकाची झेरॉक्स केलेली संहिता माझ्या हातात दिली, तेव्हा आम्हा दोघांनाही कल्पना नव्हती की अजून एका महत्त्वाच्या नव्या प्रवासाची ती सुरुवात असणार आहे. नाटकाचे लेखक गो.पु.देशपांडे असल्यामुळे संहिता वाचण्याची मला विशेष उत्सुकता होती. मी ती लगेचच वाचली. नाटक महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंच्या जीवनावरचं. पण ते काही साध्या घटनांनी भरलेलं असं नाटक नव्हतं, तर एक वेगळी गतिमानता घेऊन ते लिहिल्याचं जाणवत होतं. त्या काळातल्या समाजातल्या बदलत्या वास्तवात घडत जाणारे किंवा स्वतःला आणि इतरांनाही घडवत जाणारे महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई त्या संहितेमुळे मनाला संवेदनाक्षम करून गेले. सरंजामी युगाचा अस्त. पुण्यातल्या पेशवाईचा अस्त आणि इंग्रजांच्या सत्तेची पायाभरणी. या कालखंडाचा वेध घेत नाटक लिहिलेलं जाणवलं. संहिता वाचता वाचताच मनात प्रतिक्रिया उमटायला लागल्या. पेशव्यांना पराभूत करून इंग्लंडची राणी सत्तेवर आली, अशी ही केवळ सत्तांतराची घटना नव्हती. तर सातासमुद्रापल्याडच्या युरोपातल्या औद्योगिक क्रांतीच्या खडखडाटाची ती सुरुवात होती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा नारा देत राजे आणि त्यांच्या पिलावळींना गिलोटिनखाली देऊन सत्ताधीश होणाऱ्या भांडवलदारांच्या आधिपत्याची ती सुरुवात. नव्या भांडवली युगाची सुरुवात. पण याचाच परिणाम म्हणून झालेली शेतीतल्या कुळांच्याही मुक्ततेची ती नवी पहाट होती. युगानुयुगे जमिनीशी जखडून राहिलेल्या, जमीनदारांच्या जुलुमांचे फटकारे खाऊन पिचलेल्या कुळांच्या अपेक्षांची ती नवी सुरुवात होती. जमीन मालकांशी आजन्म बांधलेल्या कुळांची मुक्तता होणं आणि त्यातूनच नवा कामगार वर्ग जन्माला येणं म्हणजेच मानवी संस्कृतीच्या इतिहासाचं नवं पान सुरू होणं. वाढत्या कारखानदारीची गरज भागवण्यासाठी जमिनी आणि जमीनदारीपासून मुक्त होऊन शहरात निघालेला नवा श्रमिकांचा वर्ग. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या घोषणेतच स्वतःच्याही मुक्ततेचं स्वप्न शोधणारा नवा वर्ग. युरोपातल्या कारखान्यात राबायला सिध्द झालेला समाजातला हा नवा श्रमिकांचा समुदाय म्हणजे युरोपातला कामगार वर्ग. मानवी समाजात उदयाला आलेला नवा वर्ग, कामगार वर्ग ज्यानं पुढे स्वतःच्या मुक्ततेसाठी लढ्यांची एक अखंड मशालच पेटवली. तत्त्वचिंतकांना, अर्थतज्ज्ञांना, समाजशास्त्रज्ञांना मानवी श्रमावर अभ्यास करायला भाग पाडलं. युरोपमधल्या आणि विशेषतः इंग्लंडमधल्या या भांडवली युगाचे सारे पडसाद आणि बदल आपल्या देशात उमटणारच होते. असा हा म्हटलं तर विलक्षण कालखंड. नारायण मेघाजी लोखंडे यांनी महात्मा जोतिबांच्या सत्यशोधकी चळवळीपासून प्रेरणा घेऊन मुंबईत कामगार वर्गाला संघटित करायला उभं ठाकणं या नाटकाच्या शेवटापाशी माझं मन घुटमळलं. वा! क्या बात है! मी मनात म्हटलं. मजा येईल जर हे नाटक बसवता आलं तर. 

अतुल आहे म्हणजे काही प्रश्नच नाही, पण नाटक करायचं होतं ते युनियनच्या सहकार्यातून प्रत्यक्ष कामगार कलाकारांना घेऊन. चळवळीचं नाटक! माझ्या मनात न कळत भोपाळ दुर्घटनेवर मी नाटक लिहिलं होतं त्याची एक बोचरी आठवण जागी झाली. मी ते नाटक पुण्यातल्या एका नामांकित दिग्दर्शक आणि लेखक असणाऱ्या व्यक्तीला वाचायला दिलं होतं. तेव्हा माझं बाड परत करताना त्यांनी मला सुनावलं होतं, नाटक वगैरे प्रांत तुमचा नाही, तुम्ही आपलं ती काय चळवळ वगैरे करायची ती करत रहा... तेव्हा माझ्या मनात ‘इफ्टा’ चळवळीतलं म्हणजे डाव्या चळवळीतलं एक सोनेरी पर्व जागं झालं होतं. बलराज सहानी, चेतन आनंद, ए.के अब्बास, दीना पाठक वगैरे. पण त्या व्यक्तीला चळवळीबद्दलच काही तरी नापसंती होती. तेव्हा ते माझं बाड निमूटपणे हातात घेऊन मी माघारी फिरले होते. आज तर नाटक बसवण्याची जबाबदारी अतुल पेठे घेणार होते आणि तीही अशा काळात जेव्हा नव्या अधिकृत मुक्त आर्थिक धोरणाला जगात स्थिर होऊन दोन दशकं झाली आहेत, सोव्हिएत युनियन जगाच्या नकाशावरून नष्ट झालं आहे, चीननंही लाल बावटा नावालाच फडकवत ठेवलेला आहे. विकास आणि प्रगतीचा केवळ एक मुक्त भांडवलशाहीचा म्हणजे बाजारपेठेच्या हातीच मानवी भविष्य देण्याचा मार्ग रास्त आहे हे जसं सगळ्यांनीच मान्य करून टाकलं आहे. भले देशातले 77 टक्के लोक अर्धपोटी असेनात किंवा लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या असेनात- असा काळ. जेव्हा चळवळ करणं म्हणजे विशेष करून पुरोगामी डाव्या विचारांवर आधारित चळवळ करणं म्हणजे वेडगळपणाच आहे अशी धारणा समाजात खोलवर रुजलेली असताना, आमच्या युनियनपुढे एक छान नाटक आणि प्रस्ताव घेऊन अतुल पेठे आले होते. रंगभूमीवर नावाजलेले, त्या क्षेत्रात स्वतः वेगवेगळे प्रयोग करणारे आणि दिग्दर्शक म्हणून नाट्यवर्तुळात मान्यता असलेले अतुल पेठे यांच्यासारखे वेगळे रंगकर्मी नाटक बसवणार होते. झोकून देऊन वेगवेगळ्या समाज घटकांना बरोबर घेऊन नाटक करणारे. अपार मेहनत करणारे. आम्ही युनियनसाठी ‘कचराकोंडी’ हा माहितीपट तयार केला होता त्याचे दिग्दर्शक अतुलच होते. बुद्धिमान आणि कामानं झपाटलेला एक चांगला मित्र तेव्हापासूनच आमच्या चळवळीला मिळाला. या मैत्रीला एक नवे परिमाण मिळायचा दरवाजाही पुन्हा उघडला गेला होता. 

म्हटलं तर जनजागृतीसाठी नाटकं करणं पुरोगामी चळवळींना काही नवीन नाही. खुद्द महात्मा फुले यांनीही नाटकाच्या आधारे आपल्या सत्यशोधकी चळवळीच्या विचारांचा प्रचार केला होता. आंबेडकरी जलशांचीही सांस्कृतिक चळवळीच्या इतिहासात नोंद आहेच. आम्हीही आमच्या परीनं चळवळीत आल्यापासून नाटकं गाणी रचण्याचा, म्हणण्याचाही सोस बाळगलेलाच होता. पुणे महानगरपालिकेच्या आघाडीवर काम करण्याची संधी मला 1995 पासून मिळाली. कामगारांत काम करायला मिळणार ही माझ्यासारख्या मार्क्सवादी विचारानं भारावलेल्या कार्यकर्तीला मोठीच एक्साइटमेंट होती. पुण्याच्या औद्योगिक परिसरातल्या कामगार चळवळीत आणि लढ्यात अशोक मनोहर पूर्ण वेळ काम करायचा आणि आम्ही काही सहकारी स्त्रिया परिघावरून का होईना या चळवळीचा हिस्सा बनत असायचो. आमचं तेव्हा खरं नातं घट्ट झालं होतं ते स्त्रियांच्याच चळवळीत. 

‘बायजा’  द्वैासिक, पुरोगामी स्त्री संघटना, याशिवाय कामगार कर्मचारी स्त्रियांची संघटना असा आमचा प्रवास असे. जास्तीत जास्त स्त्रियांना स्त्रीमुक्तीच्या जाणिवेत ओढण्याचा प्रयत्न तर असेच आणि त्याला जोडून अनेक सैद्धांतिक वाद- चर्चाही असायच्या. पण तेव्हा आम्हीही नाटकं रचायचो. ‘संगतीला सूर्य घेतलाय’ हे नाटक मी स्वतःच लिहिलं होतं आणि आम्ही काहीजणींनी औरंगाबादच्या एका महिला परिषदेत ते सादरही केलं होतं. शेतमजुरांच्या जीवनावरचं कॉ.भास्करराव जाधव यांचंही एक वगनाट्य आम्ही म्हणजे मी, कॉ.मेधा व स्थानिक जबरदस्त गाणाऱ्या स्त्रिया असं नगर जिल्ह्यात फिरून केलं होतं. एवढंच नाही तर एकेकाळी आम्ही ‘माध्यम’ नावाचा पथनाट्य गट स्थापन केला होता. बंगालचे बादल सरकार, शंभू मित्र हे आमचं आकर्षण होतं. तेव्हा तिसऱ्या रंगभूमीचं (थर्ड थिएटरचं) आम्ही स्वप्नही बघायचो. असा नाटकं करणं हा आमचा एक आवडता कार्यक्रम असे. या सगळ्यात मुख्य भारावलेपणा आणि भिस्त कामगार वर्गीय पुढारपणाच्या स्वप्नावर विसावलेली असायची. 

बजाज कंपनीवरचा कामगारांवर झालेला पुण्यातला पहिला गोळीबार, टेल्को कामगारांचं शनिवार वाड्यासमोर झालेलं दीर्घ उपोषण, त्यात पोलिसांनी कामगारांची केलेली धरपकड, पिंपरी- भोसरी परिसरात सतत धुमसत असणारे छोटे-मोठे लढे न्याहाळत आम्ही कामगार वर्गाच्या राजकारणाचा अभ्यास शिकत होतो. हे असं आमचा अविभाज्य भाग बनलेलं कामगार जीवन आम्ही सांस्कृतिक पातळीवरही व्यक्त करण्यासाठी धडपडत असू. या सगळ्याच आठवणी माझ्या मनात गर्दी करून आल्या. तेव्हा ‘सत्यशोधक’ नाटक बसवण्याच्या विचारांना आकार मिळताना माझ्यासारख्या कार्यकर्तीचं मन उत्साही नाही झालं तरच नवल. या आठवणींच्या पायावरच तर कामगार चळवळीला कलापथक हवं, या हेतूनं पुणे मनपा कामगार युनियनने एक श्रमिक कलापथकही निर्माण केलं होतं. युनियनच्या मागण्यासाठी जेव्हाजेव्हा महापालिकेसमोर आम्ही आंदोलन करायचो किंवा अजूनही करतो, तेव्हा गाणाऱ्यांचा आणि वाजवणाऱ्यांचा अपूर्व उत्साह असायचा, असतो. 

सर्व कॉम्रेडस्‌ म्हणजे नागनाथ गायकवाड, भीमराव बनसोडे, कोणत्याही मागण्यांवर शीघ्र काव्य रचायचे आणि अशा प्रसंगी गायचे. प्रकाश चव्हाण, मीठू गायकवाड, लता म्हस्के, शाहीर सदाशिव भिसे, महादेव गायकवाड, शेवंताबाई चव्हाण, सचिन कदम, अरुण शेंडगे, उत्तम बनसोडे असे अनेकजण त्यात असायचे. त्यातूनच हे कलापथक निर्माण झालं होतं. ‘बाई मी  झाडूवाली’ हे वगनाट्यही काही वर्षांपूर्वी बाबाजी आहेरनं लिहिलं होतं. त्यात अरुण शेंडगे हा आमचा कार्यकर्ता घोटून दाढी करून लुगडं नेसून झाडूवाली सेविका बनायचा. प्रेक्षकांतूनच हजेरीला ‘आले आले..’ अशी आरोळी देत एन्ट्री घ्यायचा आणि झाडूवालीच्या गाण्यांना दादही मिळायची. एका वर्षी गणेश उत्सवात अनेक ठिकाणी हे वगनाट्य सादरही झालं होतं. हे सगळं ठीक होतं. म्हणजे चळवळीची तात्पुरती गरज या स्वरूपाचं. त्याची नोंद- दखल कलाक्षेत्रात घेतली जावी अशी अपेक्षा नव्हती की तसे प्रयत्नही नव्हते. 

आता माझ्या हातात असलेली ‘सत्यशोधक’ची संहिता काहीसं वेगळं आव्हान समोर ठेवत होती. नाटक तेही महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्या जीवनावरचं. दिग्दर्शक अतुल असणार होते. जाणीवपूर्वक व्यवस्थित निर्णय होणं जेवढं गरजेचं होतं, तेवढंच तो निर्णय सहभागी होणाऱ्यांनी पेलणं, एका वेगळ्या अनुभवाला त्यांनी म्हणजे कलाकार कामगारांनी तसंच खुद्द युनियनच्या कार्यकर्त्यांनी पेलणं तसं सोपं नव्हतंच. निर्णय घेणं, तो उचलून धरणं, त्यानुसार काम करणं, सहकार्य करणं वगैरे अनेक गोष्टींच्या आव्हानांचे पडघम त्यात जाणवत होते. म्हणूनच नाटकाच्या संहितेच्या अजून काही झेरॉक्स काढल्या. त्या प्रमुख कार्यकर्त्यांनी वाचल्या. मग अतुल पेठेंसमवेत जवळजवळ 45 ते 50 कार्यकर्त्यांची एक बैठक झाली. नाटक म्हणजे काय, तालमी म्हणजे काय इथपासून अनेक गोष्टी अतुलनं त्या वेळेस सहज सुंदरतेनं मांडल्या. युनियनच्या दृष्टीने काहीशा नवीन अनुभवाच्या आदान-प्रदानाची ती सुरुवात होती. 

युनियननं मागण्या केल्या, अगदी त्यातल्या 99 टक्के मान्य होऊन सहावा वेतन आयोग ग्रेडपेसह आम्ही मिळवला होता, शिवाय पाच वर्षांचा सानुग्रह अनुदानाचा करारही आम्ही मनपाबरोबर केला होता. महापालिका एक पुण्यातील सामाजिक जीवनातली सार्वजनिक महत्त्वाची संस्था, म्हणून आम्ही एक वेगळं नातं या संस्थेबरोबर विकसित केलं होतं. कचऱ्याच्या गाड्या पालिकेसमोर लावण्यापासून गटारांना बूच बसवून ते तुंबवण्यापर्यंत किंवा घेराव, मोर्चे आक्रमकता इत्यादी सगळं योग्य वेळी करताना, बाकी बहुसंख्य वेळेला प्रशासनाला सहकार्यही केलेलं होतं. आयुक्तांपासून आधिकाऱ्यांपर्यंत झालेल्या विविध हल्ल्यांध्ये वेळप्रसंगी युनियन रस्त्यातही उतरली होती तर जकात वाचवण्यासाठी तत्कालीन महापौर चंद्रकांत छाजेड यांच्यासह नागरीसेवा रक्षासमिती स्थापून महाराष्ट्रव्यापी तीव्र लढा करण्यात पुढाकारानं होती. 

युनियनच्या 68 वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, गिरणी कामगारांसह अन्य कामगारांचे लढे, शेतमजूर असंघटितांचे लढे हे युनियनच्या त्या काळातल्या कार्यकर्त्यांनी सक्रियपणे अनुभवले होते. पण हा इतिहास होता. आजची स्थिती काय होती? जागतिकीकरणाच्या नव्या कामगारविरोधी वातावरणात, कामगारवर्ग व विचारसरण्यांचा जसा अटळपणे अस्तच झाला आहे हा भ्रम वातावरणात रूजला आहे. जातवाद, धर्म-प्रांतवाद, गरीब श्रीमंत वाढलेली महाकाय दरी, स्त्रियांवरचे वाढलेले हल्ले, आक्रमक अस्मितांचं राजकारण, कला क्षेत्रातही भावना दुखवल्याचं निमित्त करून सुरू असलेली दडपशाही, जागोजागी वाढलेली गुंडगिरी आणि पुरोगामी चळवळ व मागण्यांचा कष्टकऱ्यांचा क्षीण झालेला आवाज, कामगार कायद्यांची हरवून चाललेली कवचकुंडलं, आणि हक्कविहीनपणे कष्टकऱ्यांना स्वीकारावी लागणारी कंत्राटदारांकडील बिनहिशोबी कष्टाची कामं असं सगळं एकीकडे तर या सगळ्याला सतत पोसणारा चंगळवाद, बाजारपेठीय वर्चस्ववाद दुसरीकडे. शिवाय श्रमशक्तीची घटत चाललेली किंमत, माध्यमांचा जोर आणि शासनकर्त्यांची उघडपणे कष्टकऱ्यांच्या न्याय्य आंदोलनानाही चिरडून काढायची दमननीती हे सगळं गळ्यात गळे घालून चाललेलं. इतकच नव्हे तर समाज वगैरेही जणू काही अदृश्यच झालेलं तिथे कामगार वर्ग किंवा कष्टकऱ्यांच्या चळवळी वगैरेंची काय कथा! 

सगळीकडेच व्यक्तिपूजेचं वातावरण आहे. अशा स्थितीत कामगारांचीच काय कोणतीही पुरोगामी वगैरे चळवळ समाजात ठसणं, लक्षात येणं महाकठीणच आहे. अशा विलक्षण कोंडीत सापडलेल्या पुरोगामी कामगार चळवळीच्या वातावरणात आम्ही आर्थिक मागण्या यशस्वीपणे पदरात पाडून घेतल्या होत्या. पण कामगार वर्गाला केवळ आर्थिक मागण्या पुरवत राहणं हे आमचं ध्येय होतं का? या विषम अर्थव्यवस्थेला ग्राहक पुरवत राहाणं हे आमचं उद्दिष्ट होतं का? अशा या गुदमरवून टाकणाऱ्या आमच्या चळवळीच्या स्थितीत अतुल पेठेंसारखा धडाडीचा दिग्दर्शक समोर येणं ही एक विलक्षण अपूर्व गोष्टच होती. म्हणूनच सत्यशोधकची संहिता वाचल्यानंतर महात्मा जोतिबांचा क्रांतिकारक विचार नाट्यरूपातून समाजापुढे विशेषतः कामगारांपुढे घेऊन जाणं ही काळाची गरजच आहे असं तीव्रतेनं मला वाटून गेलं. आम्ही युनियन म्हणून रामानुजन गणित, विज्ञान प्रकल्प, स्वच्छता अभियान, कामगारांच्या मुलांना प्रशिक्षण वगैरे सुरू केलंच होतं. पण महात्मा फुले यांचा विचार कामगारांपुढे नेणं- तेही नाटकाच्या माध्यमातून नेणं, या सगळ्यात गुणवत्तापूर्ण नवीन भर होती. 

ज्यांना नाटकात सहभागी व्हायचं आहे त्यांनी बरोबर दुपारी 2 वाजता श्रमिक ऑफिसवर येणं आवश्यक आहे, ही अतुलची सूचना होती. मग त्याप्रमाणे तालमींना सुरुवात झाली. सुरुवातीला 40 कार्यकर्त्यांची असलेली संख्या नंतर 15 ते 20 वर स्थिरावली. श्रमिक महिला मोर्चाच्या कॉ.मेधा थत्तेही काही काळ नाटकात सहभागी होण्यासाठी तालमींना आल्या. अर्थात, त्यांच्या व्यस्त कामातून त्यांना हा सहभाग इच्छा असूनही सुरू ठेवता आला नाही. तसंच आमच्या मोलकरीण संघटनेच्या पुष्पाताई चव्हाण यांचाही बरेच दिवस तालमीत सहभाग होता, मात्र  घरच्या कारणांमुळे त्याही नंतर येऊ शकल्या नाहीत. काही सफाईसेविका महिला कामगारही सुरूवातीला येत असत, पण घरातील जबाबदाऱ्यांपुढे सहभागी होण्याच्या इच्छेवर त्यांना पाणी सोडावं लागलं. श्रमिकच्या कार्यालयात असं खूपसं काही सुरू झालं होतं. मीही त्यांच्या संपर्कात राहत होते. ते सगळं न्याहाळत होते, ऐकत होते. 

या तालमी बघताना माझ्या मनात दर वेळेस एक विचार येई, अतुलबरोबर जेव्हा आम्ही ‘कचरा कोंडी’ हा माहितीपट केला तेव्हा आम्हांला समाजापुढे काही न्यायचं होतं. ते आमचं एक म्हणणं होतं. युनियनचा आणि लाल बावट्याचा विचार म्हणून माझीही काही आग्रही भूमिका होती. आजच्या म्हणजे भांडवलशाही समाजात एक फार मोठी गोची माणसामाणसांच्या संबंधांची झाली आहे. म्हणजे माणसं एकमेकांच्या सहकार्यातून समाजजीवन घडवतात, माणसामाणसांच्या संबंधांना एक प्रत्यक्ष नात्याचा मजबूत धागा असतो. पण जेव्हा बाजारपेठेसाठी माणसं काम करायला लागतात, तेव्हा माणसामाणसांतले सगळे संबंधच मुळी अदृश्य होऊन जातात. सगळे अधिकार मिळतात ते क्रयवस्तूंना. माणूस माणसापासून दुरावण्याची आधिकाधिक आत्मकेंद्री किंवा प्रसंगी स्वार्थी होण्याची जगण्यासाठी जणू पूर्व अट होऊन बसते. ‘कचरा कोंडी’ या माहितीपटातून आम्ही सफाई कामगारांच्या सामाजिक कामाचं नातंच समाजापुढे उलगडून सांगितलं होतं. कोणीतरी येतं आणि आमचं शहर स्वच्छ करून जातं, हा कोणीतरी कोण आहे? त्याचं जगणं कसं आहे? त्याच्या माणुसकीचे आयाम काय आहेत, या सगळ्यांवर झगझगीत उजेड टाकत ‘कचरा कोंडी’ने महाराष्ट्रातील आणि भारतातील असंख्य लोकांची झोप उडवली. पुणे-मुंबई-कोल्हापूर येथील अनेक महाविद्यालयांतील तरुणतरुणींनी हा माहितीपट बघून, कधी कविता करून तर कधी ढसाढसा रडून आपल्या भावना व्यक्त केल्या. माणसं संवेदनाक्षम झाली. 

या सर्व माहितीपटात अनेक सफाई कामगार समाजाशी बोलतात. आम्ही आयुष्यभर ही समाजाची घाण का काढायची? आमच्या जगण्याचं काय? असे अनेक मूलभूत प्रश्न ते विचारतात. पण आता नाटकाची सारी प्रक्रियाच वेगळी होती. अतुल पेठेंना प्रचंड परिश्रम घ्यावे लागत होते. अगदी वेगळी सामाजिक पार्श्वभूमी असणारे कामगार घेऊन त्यांना नाटकाचे संवाद पाठ करायला सांगणं, म.फुले समजावून सांगणं, त्यांच्या शारिरीक हालचालींना एक शिस्तबद्धता आणणं, त्यांचे आवाज, शब्दोच्चार इत्यादींवर मेहनत घेणं आणि या सगळ्यांबरोबर त्यांच्यातल्या त्रुटी दूर करणं हे सोपं नव्हतं. शिवाय त्यांच्यात माणूस म्हणून असणारे लहरीपण वगैरे सहन करणं इत्यादी सगळं अतुलच करू जाणे असं मला नेहमी वाटे. पण तरीही नाटक कसं साकार होईल आणि काय आकाराला येईल याचा मलाही नीटसा उलगडा नव्हताच. शिवाय, मराठी प्रेक्षक कोण असतील? त्याचे किती प्रयोग होतील याचाही फारसा अंदाज नव्हता. एक नक्की, आता सफाई कामगार नाही तर कलाकार म्हणून ते समाजापुढे येणार होते. माणसात किती तरी सुप्त गोष्टी दडलेल्या असतात, योग्य संधी मिळाली तर माणसं काहीही करू शकतात त्याचीच ती प्रचिती होती, जी विशेषकरून भारतीय समाजातील जातिव्यवस्थेनं निष्प्राण करून टाकलेली आहे. 

अशा जोखडातून मुक्तता मिळवण्यासाठी खुद्द सफाई कामगार (थोडे का होईना) समाजापुढे येताहेत ही बाब युनियन आणि कामगार चळवळ म्हणून आम्हांला मोलाची वाटत होती. निश्चित काय घडेल, कसं घडेल, याचा अंदाज प्रयोग उभा राहिला तरच येईल असं मला वाटत असे. सुमारे दीड-पावणे दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांच्या काळात त्या संचाची सर्वतोपरी तयारी करून घेण्यासाठी अनेक नामवंत व्यक्तींना अतुलनं श्रमिकवर आणलं. डॉ.राजीव शारंगपाणी, डॉ.सदानंद मोरे, हरी नरके, जोती सुभाष असे कित्येक. त्यानिमित्ताने अतुल पेठेंच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख आमचे कामगार कलाकारच मला अनेकवेळा येऊन सांगत. त्यांना एक ‘सर’ मिळाले होते. शेवटी मी जेव्हा रंगीत तालीम बघितली तेव्हा ‘सत्यशोधक’ नावाचं एक संपूर्ण कलाशिल्प अनुभवण्याची प्रचिती घेतली. मी भारावून गेले. एक नवंच नाटक मराठी रंगभूमीवर साकार होणार होतं, ज्याचा आधार जिवंत इतिहास होता आणि ज्यातून माणसांना पुन्हा एकदा माणूस म्हणून जागं करण्याचं आव्हान असणार होतं. 


8 जानेवारी 2012 च्या पाहिल्या शुभारंभाच्या प्रयोगाला पुण्यातील अनेक बुद्धिमान, रंगकर्मी, लेखक, अभ्यासक उपस्थित होते. नाटकाच्या पोस्टरचं उद्‌घाटन पुणे मनपा आयुक्त महेश पाठक, डॉ.बाबा आढव, डॉ.श्रीराम लागू यांनी केलं. पुणे महानगरपालिका कामगार युनियन सादर करीत होती ‘सत्यशोधक’.

प्रयोग सुरू झाले आणि प्रेक्षकांच्या अभूतपूर्व प्रतिसादात नाटक अक्षरशः न्हाऊन निघालं. लोकांना खूप काही वैचारिक हवं आहे याचाच जणू काही तो सिग्नल होता. लोकांना जातीय जोखडाच्या राजकारणापासून मुक्त होण्याचाही कदाचित मार्ग हवा होता, लोकांना स्वतःच्या माणुसकीचा प्रत्यय हवा होता. पण सर्वसाधारण लोक आणि मला अभिप्रेत असलेला कामगार वर्ग कुठे होता? खुद्द महानगरपालिकेतील कामगारांसाठी सुरुवातीला मुद्दाम अगदी अल्प दरानं तिकीट लावून ठेवलेल्या प्रयोगालाही ओसंडून प्रतिसाद नव्हता. कामगार वर्ग, कामगार चळवळ, कामगार संघटना.... मी नेहमीच मनात जुळणी करायला लागते. कॉ्रेड अण्णाभाऊ साठे यांचं एक गाणं होतं, एकजुटीचा नेता झाला कामगार तैयार, बदला यारे दुनिया सारी दुमदुमली ललकार.... कामगार म्हणजे एकजुटीचा नेता. त्याला संघटना बांधल्याशिवाय आणि संघटित लढे दिल्याशिवाय न्याय मिळूच शकत नाही आणि त्याला खरा न्याय तेव्हाच मिळू शकतो जेव्हा तो साऱ्या समाजाचं नेतृत्व करतो... शेतकरी आणि दलित जनाला घेऊन या पाठी, लोकशाही क्रांतीच्या आपुल्या एक ब्रिदासाठी...  

मुंबईत गिरणी कामगारांनी एक इतिहास घडवला, ज्यांना सर्वांत प्रथम संघटित केलं नारायण मेघाजी लोखंडे यांनी. गिरणी कामगारांनी लोकमान्य टिळकांसाठी सात दिवस संप केला, कॉ.डांगे यांचं लाल बावट्याचं नेतृत्व स्वीकारलं. त्यांच्या लढ्यातून अनेक कामगारांना नवे कायदे मिळाले. तो गिरणी कामगार तर 1982 नंतरच्या दीर्घ संपानंतर जसा नामशेषच झाला. मुंबईतून हद्दपारही झाला. आणि मग आमचा कामगार ज्याला आम्ही सहावा वेतन आयोग आणि पाच वर्षांचा बोनस करार मिळवून दिला... तो कुठे गेला? त्या आजच्या काळात जातीय वादाला मूठमाती देण्याची गरज वाटते का नाही? एक ना दोन असंख्य प्रश्न. रोज नवे प्रश्न माझ्या मनात प्रवेश करायला लागले. कामगार वर्ग समाजाला खऱ्या समानतेकडे घेऊन जाणारी एक शक्ती. आपल्या मुक्ततेच्या लढ्यात अन्य दबलेल्या घटकांना बरोबर घेऊन शासनाशी- दमनाशी टक्कर घेणारी शक्ती आज कुठे आहे? बाजारपेठेच्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या रेट्यात आणि जातजमातवादाच्या राजकारणात आपली खरी ध्येयधोरणं हरवून बसली आहे का? माझ्या मनात विचारांचं सतत सुरू असलेलं काहूर नाटकाच्या संदर्भात पुन्हा जागं होऊ लागलं. 

महाराष्ट्रात- दिल्लीत आणि इतरत्रही प्रचंड प्रतिसादात प्रयोग सुरू असतानाच आम्ही युनियन म्हणून मग जाणीवपूर्वक कामगारांना नाटक दाखवायची योजना आखली. प्रयत्न केले. त्यात महापालिकेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनाही सामावून घेतलं. गणेश कला क्रीडासारख्या महाकाय रंगमंचावर ओळीने चार दिवस 2500 ते 3000 कामगार विद्यार्थ्यांना आम्ही जमा केलं. प्रशासनाच्या आधिकाऱ्यांनाही निमंत्रित केलं. म्हणजे सुमारे 12,000 कामगार प्रेक्षक आम्ही जमवले. नाटकापूर्वीही त्यांच्या गणेश कला क्रिडाच्या बाहेर सभा घेतल्या. त्यांना नाटक म्हणजे काय, ते कसं बघायचं वगैरे माहिती दिली. कामगारांना नाटक आवडलं. आम्ही त्यांना त्यांची ओळख एका घोषणेतून करून दिली. ती अशी, ‘गर्वसे कहो हम कामगार है, मजदूर है आणि प्रेमसे कहो हम इन्सान है...’ ही ती घोषणा होती. 

सर्व कामगार संघटनांनी हे नाटक आपापल्या समुदायांना दाखवावं अशी आमची अपेक्षा होती, ते फारच कमी प्रमाणात घडलं. पण जे घडलं ते नक्कीच महत्त्वाचं होतं. मुंबई, औरंगाबाद, परभणी, नगर, कोल्हापूर, उल्हासनगर अशा ठिकाणी काही जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. अनेकांनी आपलं संघटनकौशल्य दाखवलं. चळवळींच्या अनेक त्रुटीही या साऱ्या प्रवासात उलगडल्या, जाणवल्या. रंगभूमीबाबत जागृत आणि संवेदनाक्षम असणाऱ्यांना कामगार चळवळ किंवा विचारसरणी याबद्दल फारशी आस्था नाही हा प्रत्यय पचवायला विलक्षण कठीण गेला. तर चळवळीतल्या म्हणजे आमूलाग्र बदल घडवू इच्छिणाऱ्या संघटनांना आपल्या समुदायांना लोकशिक्षण सांस्कृतिक माध्यमातून करण्याची गरज फारच जुजबी प्रकारात अडकल्याचं जाणवलं. म्हणजे थोड्या प्रमाणात गाणी किंवा पथनाट्य गरजेप्रमाणे करणे एवढेच. 

थेट प्रश्न हातात घेऊ लढे संघटित करण्यात बुडलेल्या या चळवळींना खरोखरच नाटक किंवा अन्य कलांची माध्यमं चळवळ बळकट करायला मदत करू शकतात असे किती वाटते हाही प्रश्न आहेच. कारण दिवसेंदिवस कामगार कष्टकऱ्यांवरचे, आदिवासी, शेतकऱ्यांवरचे बेफाम हल्ले परतवण्यासाठी थेट कृतीकार्यक्रम हाती घेण्याचीच निकड जास्त वाटत असावी. पण या सगळ्याला वैचारिक अधिष्ठान देण्यासाठी विचारांना चालना देणाऱ्या कला माध्यमांचा जाणकारांच्या साहाय्यानं उपयोग केला नाही तर समुदायांची वैचारिक तयारी कशी होईल? सत्यशोधक नाटकाच्या निमित्ताने वाटून गेलं, नव्या युगाची उकल होण्यासाठी जात-धर्मवादाच्या राजकारणाला आव्हान देण्याची शक्ती महात्मा फुले यांच्या विचारात होती. जिथे नाटकं संपतं तिथे खरं तर नवीन नाटक घडवण्याचं आव्हान पुढे येतं. कारण आता श्रमिकांची शक्ती ही नवी शक्ती नाही. भांडवली क्रांती जगात स्थिर होऊन 450 वर्षे उलटून गेली आहेत. भयानक विसंगतीच्या आजच्या काळात माणूस म्हणून सामुदायिक ओळख टिकवण्यासाठी जाति-धर्माच्या- प्रतीकांच्या ओळखीच्या आणि अस्मितांच्या मध्ययुगीन कल्पनांतून, टीव्हीच्या माऱ्यातून श्रमजीवींना मुक्त करणं गरजेचं आहे. 

त्यासाठी पुरोगामी विचारांचं भान असणारे, रंगभूमी आणि कलात्मकतेची जाण असणारे अन्यायाची चीड असणारे अतुल पेठेंसारखे अनेक दिग्दर्शक, लेखक, कलाकार पुढे येण्याची गरज आहे. रंगभूमी हेही एक राजकारणच आहे. कलेच्या प्रांगणात राजकारणाला प्रवेश नसावा, कारण राजकारण आलं की कला प्रचारकी होऊन जाते. एकीकडे धगधगणारं आणि माणसाच्या दैनंदिन आयुष्यावर पूर्ण कब्जा असणारं प्रस्थापित राजकारण आणि त्याच वेळेस त्यापासून अलिप्त राहणारी कला यांचा मेळ कधी बसेल का? जणू हेच महत्त्वाचं कोडं सोडवण्याची गरज आहे. हे कोडं सोडवतानाच दिल्लीत सफदर हाश्मींनी हल्लाबोल उभं केलं. आणि त्यात त्यांचा बळीसुद्धा गेला. लष्करशाहीला विरोध करत हाच प्रयत्न इंग्लंडच्या हेरॉल्ड पिंटरनं केला. तर इटलीतला डारिओ फो उभा राहिला तोच मुळी कामगारांसाठी नाटकं लिहिताना, आणि ब्रेश्टच्या रूपानं एक विलक्षण प्रभावी रंगभूमी साकारली, जिनं बदलत्या मानवी विश्वाचाच वेध घेतला. आज या सगळ्याची गरज आहे. हे सगळं पेलायला जोपासायला सक्षम कामगार संघटनांनी साथ करायला नको का? 

Tags: कचराकोंडी अतुल पेठे पु.गो.देशपांडे सत्यशोधक नाटक सावित्रीबाई फुले महात्मा जोतिबा फुले श्रीपाद डांगे चळवळ कामगार मनपा युनियन मुक्ता मनोहर Kachrajondi Atul Pethe P.G. Deshpande Satyshodhak Natak SavitriBai Phule Mahatma Jotiba Phule Shripad Dange Chalwal Kamagar Manapa Union Mukta Manohar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके